Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड


फुलवा आयुष्याचे रंग – राशिनुसार फुले व रोपांची लागवड

वैज्ञानिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की रंग प्रकाशाद्वारे तयार झालेली उर्जा शारीरिक कार्ये, मन आणि भावनांवर परिणाम करतात. घेण्यात आलेल्या अभ्यासानुसार मेंदू, सर्जनशीलता, उत्पादकता आणि शिक्षणाशी संबंधित असलेल्या रंगांचे फायदे दिसून आले आहेत. आधुनिक विज्ञानात अल्फा ब्रेन वेव्ह बदलण्यासाठी ठराविक रंग दर्शविले गेले आहेत. ईईजी आणि नाडी मोजण्याच्या प्रणालीनुसार, पुरुष आणि स्त्रिया रंगांवर भिन्न प्रतिक्रिया देतात. रंग डोळ्यापासून मेंदूमध्ये प्रसारित केला जातो तेव्हा मेंदू भावना, मनाची स्पष्टता आणि उर्जा पातळीवर परिणाम करणारे हार्मोन सोडतो. रंगांचा नकारात्मक आणि सकारात्मक मानसिक प्रभाव माणसांमध्ये वापरल्या जाणार्‍या संयोजनांच्या आधारावर दिसू शकतो.
समोहन, समुपदेशन, मानस शास्त्र या मधे अन्तर्मनात काही गोष्टी प्रक्षेपित करण्यासाठी रंगां चा प्रभावी वापर केला जातो. ज्योतिष शास्त्रातील काही उपाय सांगताना याची विज्ञानाशी कशा प्रकारे सांगड घातली आहे याची कल्पना देखील नसते. उदाहरणच द्यायचे झाले तर शानिला काळे उड़ीद वहा, गणपतीला लाल फूल वहा, वेगवेगळ्या रंगाचे खड़े, रत्न यांचा वापर ई.
आज आपण आयुष्यात समृद्धी, शांती, समाधान नांदावे, यासाठी रंगांचा असाच एक कल्पक व अल्हाददायक उपाय पाहणार आहोत.
आपल्या राशीनुसार रंगांचा उपयोग करुन त्या त्या विशिष्ट रंगांच्या फ़ुलझाडे, रोपटे, तुमच्या बाल्कनीमधे वा तुमच्या घरातला खास कोपरा असेल तेथे लागवड केली तर तर तो विशिष्ट रंग तुमच्या अंतरंगास भावेल व त्याचे निश्चितच चांगले परिणाम अनुभवास येतील.

मेष व वृश्चिक राशी च्या व्यक्तींनी लाल रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
वृषभ व तूळ राशी च्या व्यक्तींनी पांढरा रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मिथुन व कन्या राशी च्या व्यक्तींनी फ़ुले नसणारे हिरवट रोप लावावे.
कर्क राशी च्या व्यक्तींनी तुळशीचे वा सफेद रंगछटा असलेले फूल रोप लावावे.
सिंह राशी च्या व्यक्तींनी लाल रंगछटा असलेले रोप लावावे.
धनु व मीन राशी च्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाची फ़ुले असणारे रोप लावावे.
मकर व कुंभ राशी च्या व्यक्तींनी गडद निळा, जांभळा वा फ़ुले नसणारे शोभेचे रोप लावावे.

आपले आयुष्य हे फ़ुलां झाडां सारखे रसभरीत, टवटवीत व सदाबहार असावे ही सदिच्छा…

-ज्योतिषमित्रमिलिंद

ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक


ग्रहांचे मित्र, शत्रु व सम ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई.कोष्टक

खरे तर कुठलेही पंचांग घेतले आणि सहज चाळले तरी त्यात ग्रहांचे मित्र, शत्रु व सम प्रकारचे ग्रह, तत्व, दृष्टि, लिंग, दिशा, भाग्योदय वर्षे, भाग्यांक ई. ढ़ोबळ परन्तु उपयुक्त माहिती दिलेली असते. पण आयुष्याच्या धावपळीत ती नजरे आड़ करतो.
असेच एक कोष्टक देत आहे ज्यात ग्रह वाचताना त्यांच्या राशि जरी कल्पल्या तरी देखील आयुष्यातील अनेक पड़ताळे तुमचे तुम्हाला तपासता येतील.

-ज्योतिषमित्रमिलिंद

शरीरातील ७ प्रमुख आधार चक्र


शरीरातील ७ प्रमुख आधार चक्र
हिंदू वैदिक शास्त्रानुसार प्रत्येक जीव जंतूत एक चेतना असते. परंतु ती निष्क्रिय अवस्थेत असते. आपले पूर्वज, ऋषीमुनी ह्यांनी आपणास ह्या निष्क्रिय चक्रांच्या जागृतीने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साध्य करून मोक्ष प्राप्तीचे अनेक मार्ग दाखविले आहेत. आपणास त्यांनी संपूर्ण सुष्टीच्या शक्तींना केंद्रस्थानी ठेवून वेद, ग्रंथ, उपनिषद ह्यात ह्या संबंधी ज्ञान व विज्ञान सांगितले आहे. आपले शरीर हे कशा प्रकारे सुष्टीच्या सर्व शक्तींचे केंद्रस्थान असून त्या शक्तींना प्राप्त करण्यासाठी आपणास आपल्या मूळ सात चक्राना कसे जागृत करावे लागेल हे त्यांनी आपणास सांगितले आहे. ह्या चक्रांच्या माध्यमातून आपण त्या चैतन्यास प्राप्त करणे हेच मानव जीवनाचे ध्येय आहे. तर आता आपण ह्या चक्रां विषयी जाणून घेऊ…
मूळ चक्रे व त्यांचे कार्य
मनुष्याच्या शरीरात अनेक चक्र असतात, परंतु योग व आयुर्वेदात ज्यांना मूळ चक्रे मानण्यात आली आहेत त्यांची संख्या ११४ आहे. त्यातील ७ चक्रानाच मूळ आधार चक्र मानण्यात येते. आयुर्वेदात नाड्यांचा संगम किंवा त्यांचा एकमेकांशी होणाऱ्या मिलनासच चक्र म्हटले गेले आहे. ह्या नाड्यांचे मिलन स्थान अधिकतर त्रिकोणाकारच असते, परंतु तरीही त्यांना चक्र म्हटले गेले आहे.
शरीरातील नाड्यांच्या ह्या त्रिकोणीय मिलन बिंदूंना चक्र संबोधण्या मागे त्यांची कार्यशीलता किंवा निरंतरता हे मुख्य कारण आहे. शरीरातील हे त्रिकोणीय मिलन बिंदू शरीराच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस गतिशीलता दर्शवित असल्याने त्यांना चक्र ह्या नांवाने संबोधण्यात येते. ह्या चक्रांचे मुख्य कार्य शरीरातील चेतनेस किंवा उर्जेस खालून वर पर्यंत हस्तांतरित करणे हे आहे.
१. मूलाधार चक्र
२. स्वाधिष्ठान चक्र
३. मणिपूर चक्र
४. अनाहत चक्र
५. विशुद्ध चक्र
६. आज्ञा चक्र
७. सहस्त्रार चक्र


१. मूलाधार चक्र – मानवी शरीरातील गुदस्थान व जननेंद्रिय ह्या मध्ये हे चक्र असून ते भौम मंडळ ह्या नांवाने सुद्धा ओळखले जाते. चार पाकळ्यांचे हे आधार चक्र भौतिक स्वरूपात सुगंध व आरोग्याचे नियंत्रण करते. आध्यात्मिक दृष्ट्या हे चक्र धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्यांच्याशी जोडले गेलेले असते. ज्या लोकांच्या जीवनात भोग, संभोग व निद्रेस प्राधान्य असते त्यांची ऊर्जा ह्या चक्राच्या अवती – भोवती एकत्रित झालेली असते.
हे चक्र जागृत करण्यासाठी भोग, संभोग व निद्रा ह्यावर मात करण्याची आवश्यकता असते. हे चक्र जागृत झाल्यावर निर्भयता प्राप्त होऊन सिद्धी प्राप्त होतात.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “लं”

२. स्वाधिष्ठान चक्र – जननेंद्रियांच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे चक्र स्थित असून त्यास सहा पाकळ्या असतात. ह्याचा आकार अर्धचंद्राकार असतो. हे चक्र जागृत करून आपण अविश्वास, अवहेलना, सर्वनाश, आग्रह, क्रूरता ह्या सारख्या भावनांवर नियंत्रण मिळवू शकता. परंतु हे चक्र जर निष्क्रिय असेल व त्यावर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नसेल तर आपण आनंद – प्रमोद, मौज – मस्ती, हिंडणे – फिरणे व मनोरंजनात्मक भावनां मध्ये गुंतून जाल व आयुष्य कधी संपुष्टात येत आहे हे आपणास समजणार सुद्धा नाही.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “वं”

३. मणिपूर चक्र – बेंबीच्या बरोबर मागे हे चक्र दहा पाकळ्यांनी युक्त असते. रक्त वर्णाचे हे चक्र अग्नी तत्वास नियंत्रित करते. ह्या चक्रास ऊर्जेचे केंद्र मानण्यात येते व ज्या व्यक्तीची ऊर्जा ह्या चक्रातून प्रवाहित होत असते त्यास कर्मयोगी म्हटले जाते. अशी व्यक्ती सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त काम करण्यावरच आपले लक्ष केंद्रित करते. हे चक्र सक्रिय झाल्याने मोह, भीती, घृणा, लज्जा, ईर्ष्या, चहाडी ह्या सारख्या भावना नियंत्रित होतात. राजस गुणांचे हे चक्र आत्मशक्ती, आत्मबल व आत्मसन्मानाची वृद्धी करते. ह्या गुणांमुळे व्यक्ती जीवनातील सर्व समस्यांचा सामना करू शकते.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “रं”

४. अनाहत चक्र – सात ऊर्जा चक्रातील हे चौथे चक्र आहे. हृदयाच्या बरोबर मागे पाठीच्या कण्यावर हे स्थित असलेले चक्र सत्वगुण प्रदान करते. १२ पाकळ्यांचे हे चक्र षटकोनी असते. हे चक्र जागृत झालेली व्यक्ती सृजनशील, नेहमी काही तरी नवीन रचना करणारा, संशोधक असू शकते. हे चक्र जागृत झाल्याने मोह, कुतर्क, कपट, चिंता, हिंसा, दंभ, अहंकार व अविवेकाची समाप्ती होते. त्याच बरोबर अशी व्यक्ती सुरक्षित, चारित्र्यवान, आत्मविश्वासाने भरलेली, जवाबदार व भावनात्मक दृष्ट्या संतुलित होते.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “यं”

५. विशुद्ध चक्र – १६ पाकळ्यांचे हे चक्र सरस्वतीच्या स्थानी कंठाच्या बरोबर मागे स्थित असते. त्याचा वर्ण बहुरंगी व आकार अनियमित असतो. हे चक्र जागृत झाल्यास सोळा कला व सोळा विभूतींचे ज्ञान प्राप्त होते. एका मान्यतेनुसार संगीतातील सात सुरांचा जन्म ह्या चक्रातूनच झाला. हे चक्र जागृत झाल्याने भौतिक ज्ञान, भगवंतास समर्पण, कल्याण, महान कार्य, विष व अमृत समान वृत्ती नियंत्रित होतात.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “हं”

६. आज्ञा चक्र – हे चक्र दोन भुवयांच्या मध्ये भृकुटीत स्थित असते. दोन पाकळ्यांचे हे चक्र असून त्याची एक पाकळी पांढरी व एक काळी असते. ह्या चक्राच्या प्रतीक रूपात २ विरुद्ध रंगाच्या पाकळ्यांच्या माध्यमातून भगवंत व संसार ह्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जातो.
ह्या चक्राचे बीज मंत्र आहे – “ह” “क्ष”
७. सहस्त्रार चक्र – मस्तकात शेंडीच्या स्थानाच्या बरोबर खाली हे चक्र स्थित असून त्यास सहस्त्र पाकळ्या असतात. शुभ्र पांढऱ्या रंगांच्या ह्या चक्रास तंत्राची काशी असे सुद्धा म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने यम, नियमांचे पालन करून मागील सहा चक्रां सहित ह्या चक्रास सुद्धा जागृत केले तर ती व्यक्ती परमहंस पदास प्राप्त करू शकते. मूलाधारा पासून सहस्त्रार चक्रा पर्यंत पोचणाऱ्या मनुष्याचा संसार, संन्यास व सिद्धींशी काही संबंध येत नाही. ह्या चक्राचे कोणतेही बीज मंत्र व ध्यान मंत्र नाही.

-ज्योतिषमित्रमिलिंद

जैमिनी सूत्रम


जैमिनी सूत्रम

तुम्ही अस्सल पुणेकर असाल तर तुम्हाला हे नक्की माहित असेल, एखादी लागणारी आवश्यक वा अप्रचलित गोष्ट नेमकी कुठे मिळेल.
मग पूण्याचा जुना बाजार पण तुम्हाला वेळेस साथ देऊन जातो. ज्योतिष प्रेमी व अभ्यासू मंडळींना अभंग, गोडबोले, अक्षरधारा ही नावे मी सांगायला नकोत. असो असेच एक्दा संग्रह असण्यासाठी पुस्तके पहात असता विनय कुर्हेकर यांचे जैमिनी सूत्रम हे पुस्तक हाती लागले. ज्यात जैमिनी ऋषि यांनी सांकेतिक शब्दात व श्लोकात ज्योतिष सूत्रे व माहिती दिलेली आढळून आली व मला ती पद्धत फ़ार रंजक वाटली. ती पद्धत तुमच्यासमोर ठेवावी असे वाटले म्हणून या लेखाचा प्रपंच. ज्यांना यात अजून विस्तृत माहिती घ्यायची असेल त्यांनी मूळ ग्रंथ वा मराठीत अनुवाद असलेले विनय कुर्हेकर यांचे हे पुस्तक जरुर वाचावे. या मूळ ग्रंथावर राघवभट्ट, नरसिंह सुरी व निळकंठ या ३ ग्रंथकारांच्या टीका उपलब्ध आहेत.

या सूत्र रुप ग्रंथात स्थान वा राशी ह्या सांकेतिक “कटपयादी वर्ग” अशा गणितात्मक सूत्राने दर्शवले आहे.तर ग्रह हे सामान्य संस्कृत पदाप्रमाणे लिहिलेले आहेत.
जैमिनींचा वेगळेपणा हा कारकत्वावर आधारित आहे. त्यांचा कारकत्व काढण्याचा प्रकार हा प्रत्येक जातकानुसार बदलत असल्याने त्यांना चरकारक असे संबोधतात. ग्रहांचे बलाबल पाह्ण्याची पद्धत सोपी आहे व राजयोग हे सुद्धा कारक व दृष्टी आधारित असून “कर्ता, केवल, योगद, महायोगद असे बलानुरुप नावे दिली आहेत. फ़ळे पाहण्यासाठी कारकांश, आरुढ, उपपद वरुन ठरवली जातात व फ़ळ, फ़ळ विभाग व आयुर्विभाग असा भेद करुन दशा तपासल्या जातात.

“कटपयादी वर्ग” चा गूढ वापर समजण्यासाठी या लेखाबरोबरच्या चित्राच्या सहाय्याने एक उदाहरण पाहू.
यात स्वरांना शून्य ( ० ) व व्यंजनांना वेगवेगळे अंक दिलेले आहेत. क, ट, प, य आदि अक्षरांना १ अंक दिला आहे त्यावरुन “कटपयादी वर्ग” हे नाव पडले. या मधे श्लोक देवनागरी मधे लिहावा, चित्राप्रमाणे अंक लिहावेत. जे अंक येतील ते उलटे लिहावेत. त्याला १२ ने भाग द्यावा. जी बाकी येईल तो अंक कालपुरुषाच्या कुंडलीतील स्थान किंवा राशी समजावी व त्यानुसार सूत्राचा अर्थ अभ्यासावा.

उदा. दारा = द + र = ८२, याचे उलट लिहिले असता २८ अंक मिळेल. २८ भागिले १२ केले असता २ पूर्ण भाग येऊन बाकी ४ उरेल.
याचाच अर्थ श्लोकात दारा असे लिहिले असेल तर ते सूत्र ४ थे स्थान वा ४ थी राशी म्हणजेच कर्क राशी यांचे संदर्भात असलेले सुत्र अशाच सांकेतिक भाषेत दिलेले असेल.

अशा गणिती व गूढ भाषेत ज्योतिष सूत्रे मांडणारे महर्षी जैमिनी यांना नम्र अभिवादन.

-ज्योतिषमित्रमिलिंद

वैदिक घड्याळाची संकल्पना



वैदिक घड्याळाची संकल्पना

घड्याळात वेळ दर्शवणारे १२ आकडे असतात त्यातील एकेक अंकाला वेदातील नावे दिलेली आहेत. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.
आदित्य : १२ हा अंक आदित्य या नावाने दर्शवला आहे. कारण सूर्याचे १२ प्रकार आहेत.
अंशुमन, आर्यमान, इंद्र, त्वष्टा, धातू, पर्जन्य, पुषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णू
ब्रह्म : १ हा अंक ब्रह्म या नावाने दर्शवला आहे. कारण ब्रह्म १ च प्रकारचे आहे.
एको ब्रह्म व्दितीयो नास्ति
अश्विनी : २ हा अंक अश्विनी कुमार ऐवजी अश्विनी या नावाने दर्शवला आहे. कारण अश्विनी कुमार दोन आहेत.
त्रिगुणा: : ३ हा अंक त्रिगुणा: या नावाने दर्शवला आहे. कारण तीन प्रकारचे गुण आहेत.
सत्व गुण, रजोगुण आणि तमो गुण.
चतुर्वेदः : ४ हा अंक चतुर्वेद: या नावाने दर्शवला आहे. कारण चार प्रकारचे वेद आहेत.
ॠग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
पंचप्राण: : ५ हा अंक पंचप्राण: या नावाने दर्शवला आहे. कारण प्राणाचे पाच प्रकार आहेत.
अपान, सम, प्राण, उदान आणि व्यान
षडसा: : ६ हा अंक षडसा: या नावाने दर्शवला आहे. कारण रस हे ६ प्रकारचे आहेत.
गोड, तूरट, खारट, कडू, तिखट आणि कसाय
सप्तर्षय: : ७ हा अंक सप्तर्षय: या नावाने दर्शवला आहे. कारण सात ऋषी आहेत.
कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ
अष्टसिद्धी: : ८ हा अंक अष्टसिद्धी: या नावाने दर्शवला आहे. कारण सिद्धी आठ प्रकारच्या आहेत.
अनिमा, वैभव, लहानपणा, मोठेपण, प्राप्ति, पुण्य, अर्थ आणि सामर्थ्य
द्रव्यणि : ९ हा अंक द्रव्यणि या नावाने दर्शवला आहे. कारण ९ प्रकारचे निधी आहेत.
पद्मा, महापद्मा, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, खर्व
दशदिशा: : १० हा अंक दशदिशा: या नावाने दर्शवला आहे. कारण १० दिशानिर्देश आहेत.
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, आकाश, पाताळ
रुद्र: : ११ हा अंक रुद्र: या नावाने दर्शवला आहे. कारण ११ प्रकारचे रुद्र आहेत.
कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिरबुद्धय, शंभू, चंद आणि भव
अशा प्रकारे खुप सारी रंजक व उपयूक्त माहिती पूरातन वैदिक, ज्योतिष ई. शास्त्रात आपल्याला पहायला मिळते.

-ज्योतिषमित्रमिलिंद

रास व उपासना


रास व उपासना

कोणतीही उपासना, जप, मंत्र श्रद्धे ने पठन करण्याने मन एकाग्र होते, असंख्य विचारांची वादळ शांत होऊन मनाच्या गाभारा च्या पोकळीत अन्तर्मनाचा नाद ऐकू येतो. मन विकार रहित होऊन आत्मशक्ति वाढते व आनंदाच्या चैतन्य लहरी निर्माण होतात. तुमची जन्म रास व राशि स्वामी विचारात घेऊन त्यानुसार काही उपासना देत आहे.

मेष
मंत्र – ||ॐ गं गणपतये नमः
उपासना – गणपती अथर्वशिर्ष
वृषभ
मंत्र – ||ॐ श्रीं नमः||
उपासना – कुलदेवता किंवा देवीचे स्तोत्र
मिथुन
मंत्र – ||ॐ -हीं सूर्याय नमः||
उपासना – हनुमान स्तोत्र
कर्क
मंत्र – ||ॐ श्रीं नमः||
उपासना – गणपती अथर्वशिर्ष
सिंह
मंत्र – गायत्री मंत्र
उपासना – आदित्य ह्रदय
कन्या
मंत्र – ||ॐ -हीं नमः||
उपासना – श्री सूक्त हनुमान
तूळ
मंत्र – ||ॐ श्रीं नमः||
उपासना – श्री सुक्त
वृश्चिक
मंत्र – ||ॐ गं गणपतये नम:||
उपासना – अथर्वशिर्ष
धनु
मंत्र – ||श्री स्वामी समर्थ||
उपासना – दत्तस्तोत्र, अक्कलकोट स्वामीं
मकर
मंत्र – ||ॐ नमः शिवाय||
उपासना – शिवस्तुती
कुंभ
मंत्र – ||ॐ शनैश्वराय नमः||
उपासना – शनी व हनुमान
मीन
मंत्र – ||ॐ गं गणपतये नमः||
उपासना – अथर्वशिर्ष

ही स्वानुभवाची गोष्ट आहे. झाला तर फ़ायदाच होईल, नुकसान काहीच नाही.
रास माहित नसेल तर तुम्हाला भावनारी देवता चे मंत्र वा उपासना करुन एकाग्रता साधा.

-ज्योतिषमित्रमिलिंद

मांगल्य चिन्ह आकाशातील स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती


मांगल्य चिन्ह आकाशातील स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती

आज आपण हिंदू संस्कृतीतील प्राचीन व पूर्वापार चालत आलेले मांगल्य चिन्ह स्वस्तिक च्या निर्मितीची भूमिती जाणून घेणार आहोत.

स्वस्तिक हे उत्तर ध्रुवणाचे प्रतिनिधित्व करणारे आकाशातील एक भौमितिक चित्राकृती आहे.
सप्तर्षी हा आकाशात स्थित असलेल्या मारिची, वसिष्ठ, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह आणि क्रतु या सात तारकांचा समुह आहे. पुलह व क्रतु तारकांच्या आंतराच्या ५ पट अंतरावर सरळ रेषेत वाढवत नेले की ध्रुव तारा आपणांस दिसतो. विश्वाची निर्मिती स्थापित करण्यात याला सर्वात महत्त्व आहे. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव या अक्षाच्या मधे सर्पिल आकार असलेली आपली आकाशगंगा अनादि अनंत काळ गोलाकाल फ़िरत आहे. उत्तर ध्रुव तारका ला संस्कृत साहित्यात ध्रुव नक्षत्र म्हणतात. जे सर्वदा स्थिर व अढळ असते. सप्तर्षी हा आकाशात स्थित असलेल्या मारिची, वसिष्ठ, अंगिरस, अत्रि, पुलस्त्य, पुलह आणि क्रतु या सात तारकांचा समुह आहे. त्यामध्ये आणखी एक तारा किंचित दिसतो, ज्याला “अरुंधती” म्हणून ओळखले जाते. ध्रुव कालचक्रांचे केंद्र आहे ज्याभोवती सप्तर्षी मंडळ घड्याळाच्या दिशेने या निश्चित केंद्राभोवती फिरत आहे.

चित्राकृती प्रमाणे वसंत ऋतू मधे वरील बाजूस दाखवल्याप्रमाणे पाठी वर करुन झोपलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो.
शिशिर ऋतू मधे म्हणजे हिवाळ्यात उजवीकडील बाजूस दाखवलेल्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो.
शरद ऋतू मधे जेव्हा पानगळ होते तेव्हा खालील बाजूस दाखवल्याप्रमाणे पाठीवर झोपलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो.
ग्रीष्म ऋतू मधे म्हणजे उन्हाळ्यात वरील डाव्या बाजूस दाखवल्याप्रमाणे शीर्षासन केलेल्या प्रश्न चिन्हाच्या स्थितीत सप्तर्षी तारका समुह आपल्याला दिसतो.
या चारही आकृत्या सरळ रेषेत ध्रुव नक्षत्रास जॊड्ल्यावर एक विशिष्ठ आकृतीबंध तयार होतो. तेच मूळ आकाश स्थित स्वस्तिक. स्वास्तिकचे हात सूर्य, वारा, पाणी आणि माती.याचे प्रतिनिधित्व करतात.
अध्यात्मिक स्वस्तिक :
‘सु’ म्हणजे ” चांगले आणि ’अस्ति’ ” होणे किंवा असणे अस्तित्व, “क” जो “कल्याणशी संबंधित आहे, सु+अस्ति+क= स्वस्तिक.
त्याचे चार पाय 90° वर वाकलेले असतात. कालचक्र, युग धर्म आणि चतुर्पदाचे चे प्रतिनिधित्व करतात. चांगले होणे, कल्याणकारी असणे, स्वास्थ्यकारी याचे प्रतिक म्हणून कोणत्याही मंगल कार्यात, व्यवसायाचे ठिकाणी, घराच्या दारावर, देव्हारा मधे ई. ठिकाणी स्वस्तिक चिन्हांचा वापर केला जात आलाय. हे अगदी खरे आहे की नुसते शुभ चिन्ह लावून काही मंगलमय होणार नाही, पण त्या शुभ चिन्हामुळे, सकारात्मक ऊर्जा मेंदूमधे उत्पन्न होऊन, त्यानुसार कल्याणकारी गोष्टी घडण्यासाठी चांगले प्रयत्न करायला बळ निश्चित मिळेल.

वेदांमध्ये असे म्हटले आहे की ‘स्वस्तिक’ हे आपल्या स्वतःच्या रूपात विश्वाचे प्रतिनिधित्व करते. निर्मात्याच्या तर्जनी वर आवर्त आकाशगंगा. हे ब्रह्मांड संकल्पना ‘काल’ किंवा वेळ म्हणून स्थापित करण्यात सर्वात महत्त्वाचे आहेत. हे काल चक्राचे एक उत्तम प्रतीक आहे.
काळ हा मानवी दिनदर्शिकेपेक्षा अधिक प्रगत असल्याचे दिसणारे एक प्रतीक आहे, ज्याला भगवान शिव अर्धाकार चंद्र व्दारे दर्शवितात. पश्चिम तिबेट मधील कैलास पर्वताच्या पश्चिमेला अस्थपद पर्वतावर हा निसर्गाचा शास्त्रीय अविष्कार स्पष्ट्पणे पाहता येतो. यावरुन अध्यात्मातील कैलासाचे महत्व व त्याची विज्ञानाशी असलेले नाते च अधोरेखीत होते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जन्म नक्षत्रे आणि त्यांची तत्वे


जन्म नक्षत्रे आणि त्यांची तत्वे

नमस्कार,

ज्योतिष अभ्यास करताना असे लक्षात येते की, प्रामुख्याने अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या चार तत्वांमधे राशी व नक्षत्रे विभागली आहेत.
आपल्या माहितीसाठी येथे नक्षत्रे, त्यांची तत्वे व त्याचे गुण असे एक छोटेसे कोष्टक देत आहे.

-ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : ७०५८११५९४७
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ॐ स्वरूप व तत्वे व राशी


ॐ स्वरूप व तत्वे व राशी

ओम (ॐ) हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा ‘अ’कार,’उ’कार व ‘म’कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो. ब्रह्मदेवाने पूर्ण ब्रम्हाण्डचे दोहन केल्यावर ऋग्,यजु व साम हे तीन वेद उत्पन्न झाले. या वेदांमध्ये संपूर्ण ब्रम्हांडाचा अंश आहे असे मानतात. या वेदांमधील प्रत्येक ऋचा ही अनेक ऋषींनी उच्चारली आणि त्यातून अनुक्रमे ‘अ’, ‘उ’ आणि ‘म्’ हे वर्ण उगम पावले . हे वर्ण सम्पूर्ण ब्रम्हाण्डात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.
ओंकारातील अ या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. त्याने सृष्टी निर्माता ब्रह्माचे स्मरण होते. उ या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चंबू होतो. त्याच्या गोलाकार स्वरूपाने सृष्टीचा पालनहार विष्णूचे स्मरण होते व सृष्टीचक्राचा प्रारंभ होतो. म् उच्चारतांना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे. त्याने सृष्टिसंहारक शिवाचे स्मरण होते. अशाप्रकारे, ओम (ॐ) हे परमतत्त्व प्रदर्शक चिन्ह आहे.
(ॐ) हे मातृकांनी बनलेले आहे. प्रत्येक मातृका एक एक वर्ण तत्व विषद करते. आणि या तत्वाच्या राशी बनतात.
ऒंकाराची ‘अ’कार मातृका ही भूमितत्वाची आहे. अ म्हणजे अहं म्हणजे मी. या ‘अ’कार मातृकेतून जो घॊष निर्माण झाला, त्यातून ब्रह्म निर्माण झाला. याचे निजतत्व सत्य जी पृथ्वी रुपाने भूमीतत्व साकार झाले. या तत्वामधून ज्या वासना निर्माण झाल्या त्या म्हणजे राशी. अशाप्रकारे ‘अ’कार मातृकेतून वृषभ, कन्या, मकर या भूमीतत्वाच्या राशी निर्माण झाल्या.
ऒंकाराची ‘उ’कार मातृका ही जलतत्वाची आहे. याचे निजतत्व सत्व जे जल रुपाने जल तत्व साकार झाले. पूर्वकर्मानुसार कोणते शरीर भोग आहेत या सत्वाचा स्वामी विष्णू व त्याचे ज्ञानाचा स्वामी गणपती, या देवतांच्या मीन, वृश्चिक, कर्क या राशी निर्माण झाल्या.
ऒंकाराची ‘म’कार मातृका ही अग्नितत्वाची आहे. याचे निजतत्व शील जे अग्नि रुपाने अग्नि तत्व साकार झाले. शील निजतत्वाचा अविष्कार म्ह्णून दत्त व राम या देवतांच्या मेष, सिंह, धनू या राशी निर्माण झाल्या.
ऒंकाराची अर्ध (निराकार) मातृका ही वायू तत्वाची आहे. याचे निजतत्व दया. प्राणवायू हीच एक मोठी दया आहे. वायू ही निराकार व अव्दैत शक्ती आहे. शिवाला आकार नाही म्हणून आपण पिंडीची पूजा करतो. यातूनच शिव व सूतपूत्र मारुती या देवतांच्या मिथुन, तुळ, कुंभ या राशी निर्माण झाल्या.
असे हे ओंकार तत्व संपूर्ण चराचर सृष्टी व्यापून राहिले आहे
ॐ कार स्वरूपा तूज नमो… तूज नमो… तूज नमो…

– ज्योतिषमित्रमिलिंद

नक्षत्र नुसार नवीन कपडे परिधान करण्याचा दिवस


नक्षत्र नुसार नवीन कपडे परिधान करण्याचा दिवस

आदरणीय कै. के.एस. कृष्ण्मूर्ती यांनी त्यांच्या प्रेडिक्टिव्ह स्टेलर अस्ट्रॊलॊजी रीडर ३ मधे चंद्र कोणत्या नक्षत्रात असताना नवीन कपडे परिधान केल्यास काय परिणाम मिळतील याचे वर्णन केले आहे. आपणही याचा अनुभव घेऊन पहावा.

चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, त्यानुसार मिळणारे परिणाम

चंद्र कोणत्या नक्षत्रातमिळणारे परिणाम
१ अश्विनी नक्षत्र :नवीन कपड्यांचा लाभ
२ भरणी नक्षत्र :चोरीस जाण्याचे भय
३ कृतिका नक्षत्र :अग्नीपासून भय
४ रोहिणी नक्षत्र :आर्थिक परिस्थितीत सुधारणा
५. मृगशीर्ष नक्षत्र :कापड कुरतडले जाऊ शकते
६ आद्रा  नक्षत्र :पैशाचे नुकसान
७ पुनर्वसु नक्षत्र :चांगला दिवस जाईल
८ पुष्य  नक्षत्र :आर्थिक आवक चांगली राहील
९ आश्लेषा  नक्षत्र :कापडाचा नाश संभवतो
१० मघा नक्षत्र :धोकादायक
११ पूर्वा फाल्गुनी :शासकीय कटकट
१२ उत्तरा फाल्गुनी :उत्पन्न, आरोग्य सुधारेल
१३ हस्त नक्षत्र :यशोदायी
१४ चित्रा नक्षत्र :अजुन नवीन खरेदी
१५ स्वाति नक्षत्र :उत्तम खाद्यपेयांचा आस्वाद
१६ विशाखा  नक्षत्र  :लोकप्रियता वाढेल
१७ अनुराधा नक्षत्र :मैत्रीसंबंध, सामाजिक यश
१८ ज्येष्ठा नक्षत्र :नुकसानकारक
१९ मूळ नक्षत्र :ढोब्याकडून नुकसान
२० पूर्वाषाढा नक्षत्र :प्रकृती बिघाड
२१ उत्तराषाढा नक्षत्र :चमचमीत मेजवानी
२२ श्रवण नक्षत्र :नेत्रविकार
२३ धनिष्ठा नक्षत्र :स्वत:ची जागा, शेतीतून उत्पन्न
२४ शततारका नक्षत्र:         विषज्वर धोका
२५ पूर्वाभाद्रपदा नक्षत्र :      पाण्यापासून धोका
२६ उत्तराभाद्रपदा नक्षत्र :    संतती धारणेसाठी उपयुक्त
२७ रेवती नक्षत्र :रत्नखरेदीसाठी उपयुक्त

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)