Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

ऋषी पराशर आणि स्थान विचार


विषय : ऋषी पराशर आणि स्थान विचार

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : टेक्स्टबुक ऑफ अस्त्रोलोजी

नमस्कार,

पराशर ऋषींनी “बृहत पराशर होरा शास्त्रम्” मध्ये नमूद केले आहे की, ग्रह जातकांस लग्न स्थानाच्या अधिपतीनुसार अनुकूल आणि अनिष्ट परिणाम देतात. त्यांच्या मतानुसार, ५ आणि ९ वे स्थान  अनुकूल परिणाम दर्शवतात. तर ६, ८, १२ आणि ११ वे स्थान हानिकारक आहेत. बाकीची स्थाने परिस्थितीनुसार परिणाम देतील.

पण वेगवेगळ्या कुंडल्यांचा अभ्यास करताना असे आढळून येते की, ६, ८, १२ स्थान आजार, कोर्ट कचेरी, वाद, भांडणे, अडथळे, वासना, मृत्यू, दुर्भाग्य, गैरमार्ग, हानी, चिंता, अपघात इत्यादी वाईट परिणाम देतात.

परंतु ११ वे स्थान चांगले परिणाम देते. ११ वे स्थान अनुकूल असल्याशिवाय जातक काहीही सहज साध्य करू शकत नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ११ वे स्थानास आपण लाभ स्थान असे मानतो. ६, ८, १२ देखील ११ वे स्थान संबधित असेल, तर काही चांगले परिणाम देतात. ५ आणि ९ वे स्थान कधीतरी प्रतिकूल परिणाम दर्शवतात.

मग पराशर ऋषींनी असा दृष्टिकोन का व्यक्त केला असावा ?

या गोष्टीवर विचार करताना माझ्या असे लक्षात आले की, ऋषी आणि विचारवंत यांचा ओढ आत्मिक, अध्यात्मिक उन्नती करण्याकडे असतो. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपू स्वत:ची असलेल्या सहा भावनांवर विजय मिळवून परमात्मा जो निर्गुण म्हणजेच सत्व, रज, तम रहित असतो, त्याचे प्राप्तीसाठी अवघे आयुष्य समर्पित केलेले असते. सांसारिक बाबींमध्ये रस उरलेला नसतो. हे षड्रिपू त्यांच्या उच्च ध्येयप्राप्ती मध्ये अडसर असतात, ज्या भावनांमुळे मन अशांत होते. व एकचित्त साधना होऊ शकत नाही.

विधात्याने मानवी जीवनाची रचना अशी केली आहे की, सर्वत्र समतोलत्वचा नियम आढळून य्रेतो. त्याला जीवनात एक गोष्ट प्राप्त झाली तर, त्याला दुसऱ्याचा त्याग करावा लागतो. डोंगर आला म्हणजे त्याबरोबरोबर दरी देखील आलीच.

५ आणि ९ वे स्थान यांना अत्यंत प्रिय असते.

५ वे स्थान मंत्र, ग्रंथ, चिंतन उपासना, पूर्वजन्म, संस्कृती, ज्ञान, ई. दर्शवते.

९ वे स्थान भाग्य, उच्च ज्ञान, तत्वज्ञान, धर्म, धर्म श्रद्धा, तीर्थ यात्रा, मंदिर, पुरण, सत्संग, दृष्टांत, पुण्यकर्म, उपासना, गुरु, संशोधन, उपदेश, अध्यात्मवाद ई. दर्शवते.

११ वे स्थान सर्व भौतिक आकांक्षांची पूर्ती, जसे कि पैसा, नफा, अलंकार, सोने, मित्र, आयुष्याचा जोडीदार, संतती ई. प्रकारचे लाभ दर्शवते.

अशा प्रकारचा भौतिक सुखाचा लाभ हा त्यांच्या आध्यात्मिक कार्यात अडथळा असून निरुपयोगी आहे. आत्मिक प्रगती साधायची असेल तर भौतिक गोष्टीत मन रमून कसे चालेल. म्हणून ऋषींनी ते अपायकारक मानले असावे.

ग्रहांची शुभ अशुभता संबंधी ऋषींनी सांगितलेले नियम खालीलप्रमाणे आहेत:

१) त्रिकोन स्थानांचे अधिपती नेहमीच शुभ परिणाम देतात. त्यांची दुसरी रास जरी ६, ८, १२  स्थांनामध्ये जरी पडले तरीसुद्धा शुभ परिणाम प्रदान करतात. त्रिकोणातील ९ वे स्थानाचा स्वामी ५ वे स्थानापेक्षा बलवान असतो. ५ वे स्थानाचा स्वामी लग्न स्थानापेक्षा बलवान असतो.

२) जर त्रिकोन स्थानांचा अधिपती केंद्र स्थानाचा पण स्वामी असेल, तर तो ग्रह योगकारक ग्रह बनतो. योगकर्ता नेहमीच शुभ परिणाम देतो.

३) सर्व केंद्र स्थानांपैकी १० वे स्थानाचा स्वामी सर्व केंद्रस्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. १० वे स्थानाचा स्वामी ७ वे स्थानाच्या स्वामी पेक्षा बलवान असतो. ७ वे स्थानाचा स्वामी ४ थे स्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. आणि ४ थे स्थानाचा स्वामी लग्न स्थान स्वामी पेक्षा बलवान असतो. जर केंद्र स्थानाचा स्वामी नैसर्गिक पापग्रह असेल तर, तो शुभ परिणाम देईल. जर केंद्र स्थानाचा स्वामी नैसर्गिक शुभग्रह असेल तर, त्याला केंद्राधिपत्य दोष प्राप्त होतो.

४) ३, ६, ११ या उपचय स्थानांचे स्वामी अशुभ परिणाम देतात. ३ रे स्थान हे ६ व्या स्थानापेक्षा कमी अशुभ परिणाम देते. तर ११ वे स्थान हे ३, ६ व्या स्थानापेक्षा सर्वाधिक अशुभ परिणाम देते.

५) ६, ८, १२ घरांचा स्वामी अशुभ परिणाम देतो.

६) २, ७ वे स्थानाचे स्वामी हे मारक घरांचे स्वामी आहेत. याचा अर्थ असा होतो की, ते मृत्यूदर्शक आहेत.

७) जर चंद्र आणि सूर्य ८ व्या स्थानाचे स्वामी असतील, तर ते इतर ग्रहांप्रमाणे अशुभ नाहीत.

८) जर एखाद्या ग्रहाची मूळ त्रिकोन रास त्रिकोनातच असेल आणि दुसरी ६, ८, १२ स्थांनामध्ये असेल तरी ग्रह शुभ परिणाम देईल. या उलट जर एखाद्या ग्रहाची मूळ त्रिकोन रास ६, ८, १२ स्थांनामध्ये  असेल आणि दुसरी त्रिकोनात असेल तरी ग्रह अशुभ परिणाम देईल.

९) लग्नेश त्रिकोण आणि केंद्र स्वामी असल्यामुळे, नेहमी शुभ परिणाम देतो. जर लग्नेश हाच ८ व्या स्थानाचा स्वामी असेल तर तो शुभ परिणाम देतो.

उदा. मेष लग्नास ८ वे स्थानी वृश्चिक रास येते, येथे त्यांचा स्वामी मंगळ शुभ परिणाम देईल.

तूळ लग्नास ८ वे स्थानी वृषभ रास येते, येथे त्यांचा स्वामी शुक्र शुभ परिणाम देईल.

१०) बाधक स्थानांचे स्वामी देखील मृत्यूदर्शक आहेत.

हे सर्व सांगायचे तात्पर्य एवढेच की, एखाद्या जातकाची कुंडली तपासताना तो ऐहिक प्रगती साधू इच्छितो की भौतिक प्रगती साधू इच्छितो हे जाणून घेऊन व कुंडलीत कोणत्या स्थानी कोणता त्रिकोण येत आहे (धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम त्रिकोण, मोक्ष त्रिकोण) त्यांचे स्वामी कोठे स्थित आहेत या सर्वाचे नीट अवलोकन करून त्यानुसार जातकास फळ सांगावे. कोणता नियम कोठे वापरायचा याचे आकलन सर्वात महत्वाचे आहे.  

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

केंद्र अधिपत्य दोष


विषय : केंद्र अधिपत्य दोष

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडिक्तिव्ह स्टेलर अस्त्रोलोजी रीडर

नमस्कार,

आज आपण केंद्र अधिपत्य दोष या विषयी माहिती घेणार आहोत.

ज्योतिष अभ्यास करत असताना अनेकानेक प्रश्न मनात येत असतात. पण त्याची समाधानकारक उत्तरे मात्र मिळायला फार कष्ट पडतात. उलट आपल्या मनात गोंधळाची स्थिती तयार होते.

या विषयाबाबत बोलायचे झाल्यास केन्द्र अधिपत्य काय असते ? नैसर्गिक शुभ ग्रह त्यांचे अधिपती असता ते त्यांच्या दशेमध्ये वाईट असतात का ? ते नेहमी जातकाचे आयुष्याचा अंत करतात का ? केंद्राधिपति आणि केंद्र स्थानात स्थित ग्रह कोण-कोणते विभिन्न परिणाम प्राप्त होतात ई.

केंद्र हा मूळ संस्कृत शब्द आहे. याला चतुष्टय व कंटक पण म्हटले जाते. पारंपारिक पद्धतीनुसार लग्न स्थानी जी राशि स्थित असते, ती राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते. तसेच चंद्रापासून अथवा कोणत्याही ग्रहापासून तो ग्रह स्थित राशी व त्या राशी पासून अथवा लग्नापासून ४, ७, १० वी राशींना त्या ग्रहापासून केंद्र राशी अथवा केंद्र स्थान मानले जाते तात्पर्य एवढेच आहे की ते ते ग्रह एकाच राशिमध्ये युतीत अथवा त्या ग्रहा पासून ४, ७, १० व्या राशित आहेत.

लग्न अथवा चन्द्राच्या राशि मध्ये अंशात्मक अंतर पाहिले जात नाही. मग ती राशिस्थित ग्रह ९ अंशावर असो वा 29 अंशावर.  फक्त राशी अंतर मोजण्यासाठी घेतल्या जातात. उदा. एखांदे कुंडलीत मेष लग्न भावारंभ २५ अंशावर आहे तर २५ अंशाच्या अलीकडील भाव १२ वे भावात जात असेल तरी केंद्र रास मेष च धरली जाईल. मग त्यातील ग्रह १ ल्या भावात असो वा मागच्या भावात असो.

म्हणजे या उदाहरणात केंद्र स्थान मेष, कर्क, तुळ व मकर होतील.

समजा चंद्र अथवा कोणताही ग्रह या कुंडलीत वृषभ राशीत असेल तर चंद्र वा त्या ग्रहापासून ती केंद्र स्थाने वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ होतील मग तो ग्रह कितीही अंशात अथवा कोणत्याही भावात असला तरीही.

पण जेव्हा कोणाला एखाद्या ग्रहाच्या बदल जाणून घ्याचे असेल की, तो केंद्र आधिपत्य च्या आधारावर शुभ ग्रह आहे अथवा पापग्रह आहे, तर मात्र त्या ग्रहास लग्न स्थानापासून पासून मोजावयास हवे, चंद्र अथवा अन्य कोणत्याही ग्रहापासून नाही.

गुरु, शुक्र, शुक्ल पक्षाचा चंद्र व अपीडीत बुध हे नैसर्गिक शुभ ग्रह मानले जातात. व असे म्हटले जाते, जर हे शुभ ग्रह १, ४, ७, १० व्या राशिचे अधिपति असल, तर त्यांची अनुकूल प्रवृति बदलून प्रतिकूल प्रवृति होते. असेही सागितले जाते, जर ते २ रे  अथवा ७ वें स्थानात असता जातकास अत्यन्त अशुभ परिणाम व मृत्यु प्रदान करतात. पुन्हा या पण गोष्टीवर जोर दिला गेला आहे की, गुरु, शुक्र व चंद्र हे केंद्राधिपती असतील तर ते बुधापेक्षा जास्त वाईट होतात. नैसर्गिक पापग्रह सूर्य, कृष्ण पक्षातील चंद्र, मंगळ, पीड़ित बुध व शनि हे हे केंद्राधिपती असतील, तर शुभ परिणाम प्रदान करतात.

माझ्या अभ्यासानुसार केंद्राधिपती दोष फक्त एखाद्याचे आरोग्य व दीर्घायू ला प्रभावित करतात. ज्या स्थानाचे ते अधिपति आहेत, त्यांचे द्वारा दर्शित फलास ते अशुभ ठरणार नाहीत. लग्न स्थान हे जातकाचे स्वास्थ्य व आयुष्य दर्शवते. लग्नेश जर ६, ८, १२ व्या स्थानात स्थित नसेल तर, निश्चित पणे त्याचे आरोग्य, वाईट काळ दशेत रक्षण करेल.

चतुर्थेश जातकाची स्थायी संपत्ती, वाहन व आई दर्शवते. सप्तम स्थान पत्नी, विवाहाचा काळ व सप्तम स्थाना द्वारा दर्शित अन्य गोष्टी दर्शविते. दशम स्थान जातकाच्या व्यवसाय, नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैतृक संपत्ति दर्शवते.

उदा.

मिथुन लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व ४ थे व गुरु ७ वे व १० वे केंद्र स्थानाचा अधिपति असतो.

कन्या लग्न असलेल्या जातकाच्या कुंडलीत बुध १ ले व १० वे व गुरु ४ थे व ७ वे केंद्र  स्थानाचा अधिपति असतो.

मिथुन जातकास सामान्यपणे गुरु दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

कन्या जातकास सामान्यपणे बुध दशमेश म्हणजेच कर्म स्थानाचा अधिपती असल्याने बुध द्वारा दर्शित व्यवसाय व समृद्धि देईल. गुरु सप्तमेश म्हणजेच भार्या स्थानाचा अधिपती असल्याने गुरु द्वारा दर्शित जोडीदार व वैवाहिक सौख्य देईल.

(टीप : इतर घटक विचारात घेऊन त्याप्रमाणे बदल होतील, पण केवळ नैसर्गिक ग्रह केंद्राचा अधिपती म्हणून या स्थानासंबंधी अशुभ फळ मिळणार नाही.)

आपल्याला हे माहित आहे की अष्टमेश हा सर्वात पापग्रह मनाला जातो कारण तो एखाद्यास मृत्यू, दुर्भाग्य ई. दर्शवतो. पण जातक चंद्रिका नुसार याला अपवाद सांगितला आहे की, जर अष्टमेश हा लग्नेश असेल, तर हा दोष नाहीसा होतो. मग आपल्या उदाहरणाप्रमाणे एखादा ग्रह चतुर्थेश किंवा दशमेश असूनही लग्नेश असता केंद्राधिपती दोष नाहीसा व्हायला हवा.

सांगायचे तात्पर्य एवढेच की एखादा ग्रह जो लग्नेश आहे तो वाईट स्थितीत नसता इतर स्थान दर्शित फळांसाठी प्रतिकूल न होता उलट रक्षकच बनेल. व फक्त आरोग्य व आयु साठी अशुभ ठरेल जे फळ लग्न स्थान दर्शवते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

रोहिणी नक्षत्र विचार


विषय : रोहिणी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण रोहिणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

रोहिणी हे नक्षत्रचक्रातील ४ थे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण वृषभ राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद नक्षत्र आहे. तसेच ते स्थिर उर्ध्वमुखी व अंधलोचनी आहे. नक्षत्रांचे कारकांश वृषभ राशीच्या १० ते २३ २० पर्यंत आहे. इंग्रजी नाव ‘आल्डेबरान’ आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे अधिपत्व आहे.

रोहिणी नक्षत्राचा आकार इंग्रजी V सारखा दिसतो. या नक्षत्रात ५ तारे असून यातील मुख्य तारा थोडा लाल आहे. हे ५ ही तारे ठळक असून अतिशय तेजस्वी, सुंदर व उठून दिसणारे आहेत. तारे रंगाने थोडेसे लाल व पिवळसर आहेत. ब्रम्ह या नक्षत्राचे दैवत आहे. राशी स्वामी शुक्र व नक्षत्राचा स्वामी चंद्र असल्याने या नक्षत्रात शुक्राचा मोहकपणा, सुंदरता, कोमलपणा व चंद्राचा आनंदीपणा, लावण्य, शांती यांचा सुरेख संगम दिसून येतो. हे नक्षत्र चंद्राचे अतिशय आवडते असल्याने साहित्यामध्ये चंद्र- रोहिणीचा संबंध दांपत्यासारखा सारखा केलेला आढळतो. महिन्यातून एकदा चंद्र आपल्या लाडक्या रोहिनीशी जवळीक साधून जातो, हे अतिशय विलोभनीय दृश्य दिसते.

रोहिणी या शब्दाचा अर्थ आरोहण असा आहे. या बाबतीत असे सांगितले जाते की, या नक्षत्रातील मुख्य लाल तारका स्वर्गात जाण्यासाठी एकसारखी वरवर चढत गेली म्हणून तिला रोहिणी म्हटले आहे. दुसरी एक आख्यायिका अशी आहे की, रोहिणीच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन प्रजापतीने हिचा पाठलाग केला म्हणून ती रागाने लाल झाली.  असेही सांगण्यात येते की, रोहिणीचा प्रियकर चंद्राच्या तिच्यावरील उत्कट प्रेमाने ती lajjiत होऊन आरक्त झाली. रोहित शब्दाचा अर्थ लाल असा आहे.

रोहिणी ही शांत व आनंदी आहे. कारण तिचा चेहरा रागाने लाल नव्हे, तर ते लाजून गुलाबी झालेला आहे.

रोहिणी नक्षत्र अतिशुभ, प्रचंड कार्य करणारे व सिद्धी देणारे मानले जाते. आकृती V सारखी म्हणजेच कोणत्याही कार्यात विजय (Victory) मिळवून देणारी आहे. रोहिणी हे असे नक्षत्र आहे, जे शारीरिक, मानसिक व ऐहिक सौख्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करते. रोहिणी नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचे व्यक्तिमत्त्व शांत, सालस, आनंदी, रसिक, विलासी, विद्वान, चतुर, मधुर भाष्य, संगीत, कलेची  फुलांची व सुगंधी अत्तरांची आवड असणारे, भावनाप्रधान तरी विचारी व विवेकी असते. जातकाची बुद्धी व विचार स्थिर असतात. प्रेम, प्रणय, वाहनसुख व अलंकार ई.साठी रोहिणी नक्षत्र अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणाऱ्यां जातकांचा बांधा सुंदर असतो. हे जातक मध्यम उंचीचे व सशक्त असतात. चेहरा तेजस्वी व मोहक असतो.

पुरुषांपेक्षाही स्त्रियांना रोहिणी नक्षत्र हे खूप चांगले आहे. या नक्षत्रात चंद्र व शुक्र असता ते स्त्रियांना लावण्यवती बनवतात. या स्त्रिया जन्माने अतिशय सौंदर्यवान किंवा श्रीमंत घराण्यातील असू शकतात. जुन्या ग्रंथात रोहिणीचे केलेले वर्णन फार बोलके आहे. एक अतिशय धनवान व भरल्या घरातील, भव्य वाड्यात राहणारी मालकीण, जिचे घर धन धान्य व फळाफुलांनी भरलेले आहे. जिच्या गोठ्यात अनेक गाई-म्हशी आहेत, दाराशी हत्तीची अंबारी डुलत आहे. घरामध्ये सोने-नाणे व अलंकार आहेत. हाताखाली चोकरचाकर आहेत. घरात मुलेबाळे, सासुसासरे आहेत असे केलेले आढळते. आपण हे वर्णन तारतम्म्याने घेणे गरजेचे आहे. आजची आधुनिक रोहिणीही दिसायला सुंदर, बंगल्यात किंवा फ्लॅटमध्ये किंवा सुखवस्तू कुटुंबात राहत आहे. तिच्या दारात सुंदर मोटार आहे. घरात रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, उंची वस्त्रे व अलंकार आहेत ई.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रि जातकांचा बांधा गोंडस असतो. त्या अंगाने भरलेल्या असतात. शरीर मांसल व गुबगुबीत असू शकते. मांड्या, पोटऱ्या, दंड, मनगटे ई. पुष्ट व घाटदार, गोलाकार, चेहरा गाल रुंद, गोल व भव्य, सुंदर व पाणीदार मोठे डोळे, काळे व लांबसडक केस असे असू शकते. रोहिणी नक्षत्राच्या स्त्रियांना उंची वस्त्रे व सोन्याचे दागिन्याची आवड आणि मोह असतो. अंगभर दागिने, पूरक रंगाचे उंची शालू, पैठण्या, साड्या याची आवड असते. खोट्या व कृत्रिम अलंकारापेक्षा सोन्याचे खरे व खुलून दिसणारे भारी अलंकार समारंभात मिरवणे त्या पसंत करतात. साध्या मंगळसूत्राप्रमाणे गळ्यात चपलाहार, मोहनमाळ किंवा मोत्याचा कंठा, कमरेला कमरपट्टा, दंडाला वाकी, हातात घाटदार बांगड्या किंवा तोडे, सोन्याच्या पाटल्या, घड्याळाला सोन्याचा पट्टा, चष्मा असल्यास त्याला सोनेरी फ्रेम, बोटात दोन-तीन अंगठ्या, लांबसडक केसांचा अंबाडा व अंबाड्यावरही भरगच्च अशा दोन-तीन वेण्या अशी स्त्री रोहिणी नक्षत्र जातक असण्याची जास्त संभावना असते.

रोहिणी ही शांत व आनंदी असली पण रोहिणी जातकाना आपल्या रूपाचा फार गर्व असून आपल्यापेक्षा दुसरे कोणी सुंदर नाही असेच वाटते. सहसा आपल्यापेक्षा कमी सौंदर्यवान स्त्रियांत व गरीबवर्गात त्या मिसळणे टाळू शकतात. रोहिणी ही मालकीण आहे. नोकर नाही. स्वतः काम करण्यापेक्षाही हाताखालच्या हुकुम करून नोकराकडून काम करून घेणे हे जातक पसंत करतात. यांना श्रमाचा थोडा कंटाळा असून जरा सुस्त असू शकतात. रोहिणी जातक स्त्रिया ऑफिसमध्ये नोकरीला असतील, तर घरी आल्यावर स्वयंपाक करणार नाहीत. स्वयंपाक, घरकामासाठी असलेल्या नोकरांनी घरी आल्यावर स्वयंपाक तयार ठेवला पाहिजे. नसेल तर बाहेर जेवणे वा बाहेरून पदार्थ मागवणे अशी मानसिकता असू शकते.

रोहिणी नक्षत्राच्या अधिकारात फुलांचे व्यापारी (चाफा, चमेली, मोगरा, गुलाब वगैरे) धनिक शेतकरी, धान्य सोने-चांदी, अलंकार, उंची रेशमी वस्त्रे, अत्तरे, सुगंधी पदार्थाचे व्यापारी, जवाहिरे, गुरेढोरे पाळणारे, दूध-दुभत्याचे व्यावसायिक, सुशिक्षित समाजवर्ग, शेतकीविषयक व भौतिक शास्त्राचे पदवीधर, सिनेमा व नाटकात काम करणारे नटनट्या येतात. हे नक्षत्र रोख पैसा देणारे असल्याने द्राक्षे, मोसंबी, ऊस, चिक्कू, आंबे अशा बागायतीला अनुकूल आहे. कमी कष्टात भरपूर मोबदला हा या नक्षत्राचे फलादेश आहे.

रोहिणी नक्षत्राचा प्रभाव स्वर, गळा व घशावर आहे. या नक्षत्रावरच्या लोकांना फळे, फळांची सरबते, शीत पेये व गोड पदार्थ फार आवडतात. यामुळेच यांना होणारे आजार गळा किंवा घशाचे रोग, सर्दी, कफ, घसा बसणे, सुजणे, घटसर्प, टॉन्सिल वाढणे, पोटात गॅसेस धरणे, हवामानातील बदलामुळे तब्येत बिघडणे, शरीरात साखर उत्पन्न होऊन मधुमेह (उत्तरार्धात) होणे अशा प्रकारचे असतात. परंतु रोहिणी नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक किंवा तीव्र नसून सौम्य पण सारखे उद्भवणारे असतात. या जातकांनी आहार व वागण्यामध्ये नियमितपणा ठेवल्यास व व्यायामाची सवय लावल्यास ठणठणीत राहतील.

सर्वसाधारणपणे या नक्षत्रात बहुतेक सर्वत ग्रह शुभ फळे व थोडे तरी धन देणारे आहेत.

रोहिणी नक्षत्री रवि उत्तम शरीरप्रकृती देतो. धनिक शेतकरी, बागवान, सरकारी अमलदार तसेच मानमान्यता यांना चांगला.

रोहिणी नक्षत्री चंद्र यश, सौंदर्य, शांतता, ऐश्वर्य, रसिकता, व्यापार, शेती, दलाली व वाहनसौख्य चांगले देतो.

रोहिणी नक्षत्री मंगळ शेतीवाडी, जमीनजुमला, दुभती, गुरेढोरे पाळण्यास किंवा वाहन अथवा वस्त्रासंबंधी यांत्रिक कामाचे शिक्षण ई. प्रदान करतो.

रोहिणी नक्षत्री बुध व्यावहारिकपणा, सर्व वस्तूंची विशेषतः धान्य व वस्त्रांच्या व्यापारातील दलाली, किरकोळ व्यापार तसेच चतुरपणा, हिशेबीपणा देतो. शिक्षणासाठीही बुध अनुकूल.

रोहिणी नक्षत्री गुरु उत्तम बुद्धिमत्ता, वाणिज्य व निरनिराळ्या शास्त्रातील उच्च शिक्षण, लेखन, काव्य, सौंदर्य, ऐश्वर्य, मानसन्मान व संसारसुख देतो.

रोहिणी नक्षत्री शुक्र सौंदर्य, भोग, अलंकार, वाहन सौख्य, ऐश्वर्य, विलास, गायन, वादन ई. कला, समाजप्रियता देतो. चंद्र, शुक्र या नक्षत्रात असल्यास या स्त्रि जातकांना हवाई सुंदरी अथवा मॉडेलिंग क्षेत्रासाठी चांगला असतो.

रोहिणी नक्षत्री शनि असता स्थिर बुद्धी, मोठा व्यापारी विशेषतः कापड, धान्य व लॉटरी, कॉन्ट्रॅक्टर तसेच मोठ्या प्रमाणावर शेतीवाडी, जमीन व गुरेढोरे असणारा असतो. शास्त्र, व्यापार अथवा इंजिनिअरिंग शिक्षणासाठी चांगला.

रोहिणी नक्षत्री राहू गावी शेतीवाडी, जमीनजुमला व इस्टेट देतो. तसेच मेंढपाळ अथवा गुरेढोरे व म्हशी बाळगण्यासाठी चांगला असतो. शास्त्रीय तसेच स्थापत्य शास्त्राच्या शिक्षणासाठी अनुकूल असतो. गावात वजनदार व्यक्ती म्हणून नावलौकिक असू शकतो.

रोहिणी नक्षत्री केतू फारसे नाही, पण उत्तम शरीरयष्टी व गरजेपुरते धन देईल.

रोहिणी नक्षत्री हर्षल असता विलक्षण बुद्धी, संशोधक, जरा रसिक, आनंदी व थोडीफार मालमत्ता करणारा असतो.

रोहिणी नक्षत्री नेपच्यून शांत व आनंदी स्वभाव, संगीताची व सौंदर्याची आवड, तसेच साक्षात्कार व ईश्वरभक्ती यांना अनुकूल असतो.

रोहिणी नक्षत्र सुंदर व तेजस्वी असल्याने हस्ताक्षरही मोठे, गोल, वळणदार व सुरेख असते. या नक्षत्रावर २ व ६ या अंकाचे वर्चस्व आहे. आणि रत्न चंद्राचा मोती किंवा शुक्राचा हिरा आहे. नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास, ती थोड्याच प्रयत्नाने व जवळच सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रात रोहिणी हे तर महत्वाचे नक्षत्र आहे. मुंजी, विवाह, बारसे, नवीन वस्त्र नेसल्यास किंवा सोन्याचे अलंकार अंगावर धारण करण्यास, अलंकार करावयास देण्यास, नवीन वाहन किंवा सुखसोयीच्या वस्तू विकत घेण्यास तसेच गायन, वादन व कलाकौशल्याची कामे शिकण्यास फारच चांगले. स्थिर नक्षत्र असल्याने पायाभरणी, शिलान्यास, कोनशिला बसविणे, वास्तुशांती किवा गृहप्रवेश, ई कार्यासाठी शुभ असते. ऊर्ध्वमुखी असल्याने शोभादायक कृत्ये, घरावर मजला चढवणे, देवळावर कळस चढवणे ही कार्ये करणेस चांगले. शेतकरी वर्गाला बी पेरण्यास, बागायतदार, फळाफुलांचे व सुगंधी वस्तूंचे व्यापारी यांना नवीन व्यवसाय किंवा दुकान सुरू करण्यास उत्तम.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

सामुदायिक प्राण संकट आणि ज्योतिष


विषय : प्राणघातक सामुदायिक अपघात आणि ज्योतिष

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : फलज्योतिषातील शंका समाधान

नमस्कार,

जेव्हा जेव्हा एखादी दुर्घटना घडते आणि एकाच वेळीं अनेक जण प्राण गमावतात, तेव्हा तेव्हा या सर्वांची कुंडली मृत्यू योग दाखवते का, त्यावेळी त्या सर्वांचे ग्रहयोग बिघडले होते का? ज्योतिषशास्त्राचे यावर काय उत्तर आहे? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. विशेषतः ज्योतिषशास्त्राची चेष्टा करणारे तर या गोष्टीचे नेहमीच भांडवल करतात. 

याचे उत्तर ज्योतिषी वि. के. फडके यांनी त्यांच्या एका पुस्तकात थोडक्यात पण तर्क युक्त दिले आहे.

मृत्यूचे एकंदर दोन प्रकार आहेत. अपमृत्यू व महामृत्यू. 

यांपैकी अपमृत्यू हा केव्हाही व कुठेही येऊ शकतो. 

महामृत्यू मात्र असा केव्हाही येत नाही. 

प्रत्येकाच्या महामृत्यूची तारीख व वेळ निश्चित असते. त्या तारखेला व वेळेला हा मृत्यू येणारच. मग तुम्ही त्या वेळी अगदी सुरक्षित ठिकाणी एखाद्या गादीवर लोळत असा वा तुमच्याभोवती संरक्षणासाठी दहा-बारा संरक्षक त्या वेळी असोत! त्या मृत्यूला कोणीही थोपवू शकत नाही.

अपमृत्यूचे मात्र तसे नसते. रस्त्याने चालता चालता मागून स्कूटर किंवा रिक्षाची धडक बसली, तर तो मनुष्य त्या वेळी त्याच्या नशिबात महामृत्यू लिहिलेला नसतानाही मृत्यू पावतो. एखादे विमान किंवा जहाज यामधून प्रवास करताना ते विमान पडले किंवा जहाज पाण्यात बुडाले तर त्यातील बहुतेक प्रवासी अपमृत्यूचे बळी ठरतात. 

अशा वेळी त्या प्रवाशांपेक्षा त्या विमानाची किंवा जहाजाची वा वाहनाची कुंडली काम करीत असते, त्या कुंडलीमध्ये तुम्हाला हे योग आढळून येतील.

मला तरी हे विश्लेषण योग्य वाटले. पण या दृष्टीने सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. खरेच त्यात तथ्यांश आढळला, तर अशा वाहनांच्या उत्पादनाची जन्म टिपण पाहून अनिष्ट काळात त्या वाहनाच्या फेरी रद्द केल्या आणि लोकांचा अपमृत्यू टाळता आला तर, याच्या इतके प्राचीन ज्योतिष शास्त्राचा उपयोग करून केलेलं संशोधन सर्वात अभिनव व मानवोपयोगी ठरेल, असे मला वाटते.

आपल्याला काय वाटते?

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)

संपर्क : 7058115947

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)