Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

अँजीओप्लास्टी : एक केस स्टडी


विषय : अँजीओप्लास्टी एक केस स्टडी

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्व अभ्यास

नमस्कार,

परवा एका जातकाचा फोन आला की माझी १५ जुलै, २०२३ ला अचानक अंजिओप्लास्टि झाली. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की, अचानक हे सर्व कसे काय घडले? हे योग जन्म कुंडलीत दिसत आहेत का?

त्याची जन्म कुंडली मांडून तपासले असता त्यात काहीसे तथ्य आढळून आले. ते निरीक्षण येथे देत आहे. जाणकारांनी त्यांची निरीक्षणे जरूर मांडावीत, त्यामुळे एक दिशा मिळेल…

सर्वात प्रथम मी अंजिओप्लास्टिची एक जुजबी व्याख्या तयार केली.

असा आजार ज्यात हृदयाकडे रक्त नेणाऱ्या अर्टीलरी अरुंद होतात व पुरवठ्यावर परिणाम होतो, रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे शस्त्र क्रिया द्वारे रुंद करून एक जाळी असलेली नळी (स्टेंट) बसवला जातो.

नंतर या व्याख्येची माझ्या ज्योतिष अभ्यासानुसार मीमांसा केली.

१. हृदय साठी ४ थे स्थान विचारात घ्यावे लागेल.

२. मंगळ लाल रंग, रक्त, शस्त्र याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध

३. शनि आर्टिलरी आकुंचन पावण्याचा कारक ग्रह याचा ४ थे स्थानाशी संबंध

४. या सर्वांचा त्रिक स्थाने (६, ८, १२ शी संबंध)

५. या सर्वांचा मारक स्थाने (२, ७) शी संबंध

६. या सर्व कारक ग्रह संबंधित दशा अंतर्दशा

जन्मकुंडलीचे निरीक्षण केले असता खालील गोष्टी समोर आल्या-

१. वृश्चिक लग्नाची कुंडली त्यामुळे ६ वे स्थानी मंगळाची मेष राशी

२. ३ रे व ४ थे स्थानी शनि ची मकर व कुंभ राशी

३. ४ थे स्थानी ७ व १२ व्या स्थानाचा स्वामी शुक्र गुरूच्या नक्षत्री स्थित

४. ४ थे स्थानी २ व ५ व्या स्थानाचा स्वामी गुरू राहूच्या नक्षत्री स्थित

५. ८ वे स्थानी षष्ठेश मंगळ व तृतीयेश व चतुर्थेश शनि मिथुन राशीत युतीमध्ये

६. अष्टमेश बुध षष्ठात मंगळाच्या मेष राशीत केतूच्या नक्षत्री

व या काळी या सर्व गोष्टींचे कारक ग्रह बुध महादशा शनि अंतर्दशा गुरु प्रत्यंतर व शनि सूक्ष्म दशा चालू होती.

व मंगळाचे मृग नक्षत्र होते.

तर आपण ही आपली निरीक्षणे मांडलीत तर, सर्वांना उपयुक्त ठरतील.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पीडा निवारण्यासाठी शांती


विषय : पीडा निवारण्यासाठी शांती

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडिक्टिव स्टेलर ॲस्ट्रोलॉजी

नमस्कार,

ज्योतिष शास्त्र हे प्रकृतिच्या नियमाची व्याख्या व मीमांसा करणारे पुरातन शास्त्र आहे. त्याचे जोडीस हे शास्त्र विज्ञानातील न्यूटनच्या गती तेथे प्रतीगती या तिस-या नियमाचे देखील समर्थन करते. प्रत्येक कार्यास त्याची प्रतिक्रिया ही होत असते. हे मात्र नक्की की कोणतेही कार्य बेकार नष्ट होत नाही. त्या मुळे ज्योतिष शास्त्र एक विश्वसनीय शास्त्र आहे. त्यामुळे ज्योतिषी द्वारा केलेली गेलेली कुंडलीची योग्य मीमांसा नेहमी उपयुक्त ठरत असते. पण हे मात्र तितकेच खरे कि प्रत्येक पापाचे प्रायश्चित द्शांती हे असू शकत नाही. पण लोकांचा या गोष्टीवर ठाम विश्वास असतो आणि आम्ही ज्योतिष मंडळी पण हा त्यांना ठाम विश्वास देतो की, की शांती केली कि सर्व संकटे दूर होतात.

मग असे आहे तर, आमच्या प्राचीन ऋषि मुनींनी शांती का करावयास सांगितली आहे?

जर प्रत्येक कार्याची प्रतिक्रिया होत असते, तर शांती देतील पापाचा नाश केल्या शिवाय कशी राहील?

हिन्दू ईश्वराची व ग्रहांची पूजा, हवन ई. करवितात. मोफत दवाखाने, धर्मशाळा, अन्न छत्र ई. निर्माण करवितात. गरीब व अनाथ लोकांना जेवण देतात व अडचणीत असलेल्याची मदद करतात. पण हे हे तितकेच खरे आहे की, हे सर्व कार्य करणाऱ्या सर्वांच्याच पीड़ा कमी करू शकत नाही. अन्य देशामध्ये होम-हवन प्रचलित नाही, तरी देखिल तेथेसुद्धा गोर गरीबाना सहायता देत असतात. मानवता वादी दृष्टीकोनातून केलेले हे सत्कर्म विदेशी लोकांना विश्वास असो वा नसो ते ह्या अश्या त्यागपूर्ण कार्याने त्याचे पाप दूर होण्यास मदत होणार नाही काय ?

ज्योतिष शास्त्र हे सांगते की भाग्यास बदलले जाऊ शकत नाही, पण भाग्याचा नीट व स्पष्ट अर्थ  फक्त एक जाणकार, अभ्यासू ज्योतिषीच समजू शकतो. जे कर्म पूर्वजन्मी केले गेलेले आहे त्या सर्व कर्माचे फळ भाग्य मध्ये लिखित असते, कोणाचे भाग्य त्याला शांती करण्याकडे घेऊन जाऊ शकते,  ज्यामुळे पुढे होणान्या पापास दूर करून, त्यास संरक्षण मिळू शकेल. काही निश्चित मर्यादे मध्ये शांती करण्या करता नाही म्हणता येते. भाग्य काही परिवर्तनाचे असे काही परिणाम दर्शवते, की ते फक्त अनुभव करण्यालायक असतात व तेव्हा त्या घटनांना आपली तर्कबुद्धी लागू पडत नाही. लोकांना आपल्या पूर्वकर्माधीन रहावे लागते व हेच भाग्य होय.

अश्या प्रकारे जातकांचे विभाजन चार समूहात केले जाते.

१. जातक जे शांति करतात व इच्छित फळ प्राप्त करतात. हे शांतीचे फायदे सांगतात.

२. जातक जे शांति करतात, तरी पण दु:खी राहता व कितीही शांती करेली, तरी आम्हास फळ काही मिळाल्रे नाही, हे सांगतात.

३. जातक जे शांति करत नाही व त्या मध्ये विश्वास ही करत नाहीत. तरी प्रसन्नता पूर्वक राहतात व धनवान असतात. नेहमी सफलता मिळत राहते.

४. जातक जे शांति करीत नाही व तरीहि दुःखी राहतात.

बिकट परिस्थितीमध्ये कोणी जातक अडकला असेल, तर तो सामान्यपणे संकटमुक्त होण्यासाठी शांती करतो. खरे तर सर्व परिणाम पूर्व जन्मातील कर्मानुसार होतात. व हे परिणाम जन्मकुंडली द्वारे माहित केले जाऊ शकतात. जाणकार ज्योतिषास पूर्वजन्माची वास्तविकता ओळखणे संभाव आहे. नदी ग्रंथामध्ये मध्ये पूर्व जन्मानुसार शाति करण्याचा सल्ला दिला जातो.

स्थूलमानाने कर्माचे तीन भाग पडतात.

१. धृत कर्म

२. धृत-अधृत कर्म

३. अधृत कर्म

धृत कर्म म्हणजे कोणतेही पूर्व जन्माचे मोठे पाप किंवा मोठी चूक जिचे गंभीर परिणाम कितीही शांती केली नाही केली, सत्कर्म केर्ले तरी या जन्मात वाईट फळ नष्ट करू शकत नाही.

उदा. हत्या, आई वडिलांची उपेक्षा, भावंडांना धोका देणे, लहान श्रमिकांना गंडा घालणे, मालकाचा सेवकांवर अत्याचार, बेईमानी इत्यादि.

धृत-अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शांती अथवा सत्कर्माने सौम्य करता येतात, तरी कोणतेही पूर्वकर्म त्याचा परिणाम सौम्य का होईना दिल्याशिवाय समाप्त होऊ शकत नाही. किंवा असे पाप केले जे क्षमा करणे योग्य आहे, त्यांना दया दाखवली जाऊ शकते व जर त्याने शांती अथवा सत्कर्म केले, तर त्याची पीडा निवारण होऊ शकते.

उदा. दोघांनी रु.५००००/- उधार घेतले एकाने ते परत न करता फसवणूक केली व दुसर्याने रु.४५०००/- फेडले, पण बाकीचे इच्छा असूनही फेडू शकला नाही. म्हणून फसवणार्याचे भाग्यात त्याचे दंड भोगणे लिहिले जाते व त्याने कितीही शांती, सत्कर्म केले, तरी त्याची पीडा कधीही संपत नाही. ती अटळ असते. पण दुसर्याचे भाग्यात त्याचे भोग सौम्य असतात व शांती व सत्कर्मा द्वारे त्याचे दुर्भाग्य संपून तो भाग्यवंत होऊ शकतो.

परमात्मा फार दयाळू आहे, पण तो त्याच्या न्यायाबद्दल फार जागरुक पण आहे व तो प्रत्येकाच्या पूर्व कर्माबाबत पूर्ण सजग आहे. प्रकृतीच्या नियमानुसार प्रत्येकास भोग हे भोगावेच लागतात. कोण शांती करेल व फलप्राप्ती करेल हे त्या नियमांनुसार भाग्यात लिहिलेले असते.

ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये नसतात. कारण हे सर्व जातकाच्या पूर्व कर्माबद्दल सांगतात.

ज्या जातकांनी पूर्वजन्मी धृत-अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी, लग्न व चंद्र व ९ वे स्थानाचा स्वामी हे सर्व गुरूच्या शुभ दृष्टिमध्ये असतात व अशा स्थितीमध्ये जातकाचे शांती, सत्कर्म द्वारा पीडा निवारण होऊन भाग्यस्वरूप बदलू शकते.

अधृत कर्म म्हणजे पूर्व जन्माचे पाप किंवा चूक जिचे परिणाम शुल्लक असतो. त्याचे मनात वाईट कर्माची इच्छा वा वासना निर्माण खालेली असते, पण प्रत्यक्षात कृती करत नाही.

उदा. एखादा वाटसरू थकून सावली साठी एका बहरलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभा राहतो. त्याची नजर त्या झाडाच्या रसरशीत आंब्यांवर पडते व तो चोरून खाण्याची वासना निर्माण होते. पण त्या झाडाचा मालक आपण घेतलेल्या कष्टाची रखवाली करीत असतो. व त्याचा आवाज ऐकून तो वाटसरू आंबा चोरून न खाता आपल्या वाटेने निघून जातो.

ज्या जातकांनी पूर्वजन्मी अधृत कर्म केले आहेत, त्यांच्या जन्म कुंडली मध्ये गुरु अथवा ९ वे स्थानाचा अधिपती लग्नी किंवा चंद्र, दशा स्वामी, अंतर्दशा स्वामी बरोबर असतो. हे जातक नेहमी आनंददायी राहतात, मग ते पुण्य, शांती, सत्कर्म करो अथवा न करो.

यालाच आपण म्हणतो कि सर्व विधिलिखित आहे. आणि जाणकार ज्योतिषी हे सर्व व जन्मकुंडलीतील इतर ग्रहस्थिती व घटक तपासून योग्य तो उपाय अथवा शांती सुचवत असतो, ज्याद्वारे जातकास त्याचा लाभ होऊन त्याचे आयुष्य सुखकर होईल.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मूळब्रह्म, मनश्चक्र, शरीरातील तत्त्व व त्रिविध ताप


विषय : मूळब्रह्म, मनश्चक्र, शरीरातील तत्त्व व त्रिविध ताप

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ॐ हा गुरु

ॐकार हे सर्व विश्व व्यापून आहे. ॐ हेच एक अक्षर ब्रह्म आहे. हा शब्द आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देतो. या शब्द ब्रह्माचे अनेक संत विभूतींनी मुक्त कंठाने वर्णन केले आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शब्द हा बहु-उपकाराचा रासी’.

भगवद्गीतेतही ‘शब्द हे परब्रह्म’ असे म्हटले आहे.

संत एकनाथ म्हणतात ‘शब्द हाचि थोर जगताचा आधार’

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘पै ब्रह्मवीजा जाहला अंकुरू । घोष, ध्वनी, नादाकारू। तयाचे भुवन गा जो ॐकारू । तोही मी गा।’

आता हे शब्दब्रह्म ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत कसे आले ते पहा. मूळ ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान नाही. जाणीवेच्या पातळीवर सर्व शून्य आहे. म्हणूनच शून्यास ब्रह्म व पूज्य अशी नवे आहेत. आकाश, प्रकाश, प्रेम हेच मूळ ब्रह्म. या आकाशात शब्द आहे, पण तो प्रकट नाही. जेव्हा तो प्रकट होतो तेव्हा घोष, ध्वनी, नाद होतो व आनंदलहरी निर्माण होतात. ज्यावेळी आनंदाची हालचाल होते, त्यावेळी त्यातून वायू निर्माण होतो, त्यातूनच अहंकार निर्माण होतो व तेच ब्रह्म मायारूपाने जीव बनून गुणांत येते. गुणांतून तत्त्वात येते व तत्त्वातून शब्दात येते. तेच ब्रह्म अष्टदिशांना बाहेर, तेच शरीरात अष्टवृत्ती, परमार्थात अष्टसिद्धी व शरीरातील मनशक्रात, अष्टदशकमळ कसे चालविते ते दिव्य पहा –

१. निर्गुण ब्रह्म : आकाश, प्रकाश, प्रेम ही अजःन शक्ती आहे. याला ज्ञान अज्ञान नाही.

२. जीवब्रह्म : घोष, ध्वनी, नाद यातूनच आनंद व नंतर जीवरूप आकारास येते.

३. मायाब्रह्म : जीवरूपातून अहंकार निर्माण झाला व तो वायुरूपात मिळून मायारूप झाला.

४. गुणब्रह्म : मायारूपाने अहंकार घेतल्याने तीन गुणांत विश्वनिर्मितीची इच्छा झाली.

५. तत्त्वब्रह्म : विश्वनिर्मितीची इच्छा झाल्याने गुणब्रह्मानेच पंचतत्त्वे निर्माण केली.

६. शब्दब्रह्म : या पंचतत्त्वातून जे आकार निर्माण झाले त्यांच्या व्यवहारासाठी हेच शब्दरूपाने नटले.

७. अन्न हे पूर्णब्रह्म : या सर्व अकारी जीवांना जगविण्याकरिता तेच अन्नब्रह्मरूपाने नटले.

८. नादब्रह्म : जगताकार जीव, त्यात नादब्रह्म हीच त्या ब्रह्माची संपत्ती आहे.

सर्व एकातच आहे, तो व मी एकच आहोत. हेच ज्ञान झाले म्हणजे आत्मज्ञान होते. ‘सोऽहं’ या दोघांचा उच्चार करताना मध्ये जो ‘अ’ आहे तोच आत्मा आहे. श्वास घेताना व सोडताना ‘सोऽहं’ असा ध्वनी होतो. म्हणून ‘अहं ब्रह्मास्मि’, ‘अयं ‘आत्मा’ असे म्हटले आहे. ‘अ’ म्हणजे अंतरीचा आत्माराम! हेच गुह्य, हेच आत्मज्ञान व हेच आपले स्वरूप! हे अनुभवाचे बोल आहेत.

संत कबीर म्हणतात, ‘हौ नाही के बीचमें साहेब समा रहा हैं।’

तसेच संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘मी तू हा भेद विवेके शोधणे। गोविंदा माधवा याच देही ।”

जोपर्यंत जीवन हे बाह्याधारी असते तोपर्यंत देव भेटणार नाही. याला उदाहरण द्यायचे म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदी जोपर्यंत स्वतः बचावाचा प्रयत्न करीत होती तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण गप्प बसले. कारण ती स्वतःचा आधार घेत होती. मात्र शेवटी जेव्हा ती पूर्णपणे निराधार झाली व देवाचा धावा आक्रोशाने करू लागली तेव्हाच देवाने वस्त्रे पुरविली व तिची लाज राखली, म्हणून सर्व काही त्याच्यावर सोपवा.

काम ही मनाची वृत्ती आहे. पण प्रेम ही मनोवृत्ती नाही. प्रेम जीवाचा स्वधर्म- स्वभाव आहे. कोणत्याही वस्तूची अपेक्षा न करता तो आनंद भोगत आहे. प्रेम हे ब्रह्म आहे. आत्म्याच्या ओळखीसाठी हा शब्द आहे. तेच ब्रह्म स्फूरण पावले व नंतर मानसिक ‘आनंदस्वरूप जीव पण तो झाला, तोच या देहात रमला. नंतर जेव्हा त्याला वाटले की आपण या विश्वात अन्य वस्तूंमध्ये आनंद भोगावयास जाऊ. तेव्हा तो आशेने, – मनाच्या द्वारे व इंद्रियांच्या आधारे आनंद लुटण्यामागे सैरावैरा पळत सुटतो; पण क्षणांत आनंद तर क्षणांत दुःख असा अनुभव त्याला येतो. शेवटी त्याला ज्ञान होते की बाहेर भोगात सुख नाही तर त्यागात सुख आहे. बाहेर नाही तर आत आत्मज्ञान आहे व अशा आत्मज्ञानाच्या अनुभवात नित्य आनंद आहे. यास्तव यालाच नित्य ‘सत्यब्रह्म’ म्हणतात. हेच सत्य व जगत् मिथ्या ! म्हणूनच सर्व जीवांवर प्रेम करण्यास शिकले पाहिजे. सर्व जीवांमध्ये तो प्रेमप्रभू सर्वत्र समान आहे हा अनुभव येईल. तो केव्हा तर जेव्हा आपण शुद्ध प्रेमभावाने वागू तेव्हा. म्हणून वाचेने गोड बोला. समदृष्टीने पहा, अंतरी दयाभाव ठेवा. समोर दिसणारे प्रत्येक रूप ‘तोच प्रभू’ या रूपाने नटलेला आहे हे ओळखून वागा. हाच तो शुद्ध प्रेमभाव.

‘जेये ज्याचा भाव लक्षिला । तेथे त्यासि देव भेटला ।’ आता सांगा, ‘तेथे काय उणे आम्हासी ?”

जोपर्यंत अंतःकरण मीलन आहे म्हणजे जो पर्यंत पापवासनायुक्त, विक्षेपसहित व चंचल असते तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही.

आता मनःश्चक्राबद्दल काही माहित करून घेऊ.

मनश्चक्र

मनुष्याच्या उजव्या बाजूला स्तन व कंठ यांच्या मधोमध जे हृदय आहे त्याच्या मागे म्हणजे पाठीच्या बाजूला मनश्चक्र आहे. त्याला आठ पाकळ्या आहेत त्याच त्या अष्टवृत्ती व तेच विचार. जागृत अवस्थेत आपले मन याच पाकळ्यांतून भ्रमण करते व पाकळीनुसार वृत्ती उद्भवते.

१) पूर्वपाकळी : रंग पांढरा

येथे मनाने प्रवेश केला असता धैर्य, औदार्य, धर्मबुद्धी, येईल तो लाभ अशा वृत्ती उठतात.

२) आग्नेय पाकळी : रंग रक्त

येथे मनाने प्रवेश केला असता उद्वेग, आळस, निद्रा या वृत्ती उठतात.

३) दक्षिण पाकळी : रंग काळा

येथे मनाने प्रवेश केला असता द्वेष, क्रोध, दुष्टबुद्धी उद्भवते

४) नैऋत्य पाकळी : रंग निळा

येथे संसारासक्ती व स्त्री-पुत्रादिकांविषयी अत्यंत प्रेम या वृत्ती उठतात.

५) पश्चिम पाकळी : रंग धूम्रवर्ण

अज्ञानानंद, हास्य, विनोद व सुखमयता या वृत्ती उठतात.

६) वायव्य पाकळी : रंग श्याम

तीर्थयात्रा, सत्संग या वृत्ती उठतात.

७) उत्तर पाकळी : रंग पिवळा

अष्टभोगांबद्दल प्रिती निर्माण होते.

८) इशान्य पाकळी : रंग गौर

येथे मनाने प्रवेश केला असता कृपा, क्षमा, शांती ज्ञान, किर्तन श्रवण या वृत्ती उठतात.

शरीरातील तत्त्व विभागणी व दैवत

शरीराचा प्रत्येक भाग तत्वांच्या अधिकाराखाली असतो. व प्रत्य्रेक तत्वासाठी एक इष्ट देवता असते.

१.      भूमितत्त्व : पायापासून गुडघ्यापर्यंत, दैवत : चतुर्भुज ब्रह्मा

२.  जलतत्त्व : गुडघ्यापासून नाभीपर्यंत, दैवत : पीतांबरधारी नारायण

३.  अग्नितत्त्व : नाभीपासून हृदयापर्यंत, दैवत : त्रिलोचन महारुद्र

४.  वायुतत्त्व : हृदयापासून भ्रुकुटीपर्यंत, दैवत : सर्वशक्तीमान ईश्वर

५.      आकाशतत्त्व : भ्रुकुटीपासून शेंडीपर्यंत, दैवत : गौरवर्ण महादेव

त्रिविध ताप

त्रिविध ताप ही एक महान शक्ती आहे. त्यातून कोणीही सुटत नसतो. ती शक्ती केव्हा आक्रमण करेल हे कोणालाही सांगता येत नाही. याच शक्ती मध्ये आपण सर्व गुरफटलो आहोत.

संत रामदास म्हणतात, ‘त्रिविध तापे बहु तापलो मी रामराया ।’

आधिभैतिक, आध्यात्मिक व आधिदैविक असे तापांचे तीन प्रकार आहेत.

आधिभैतिक तापाचा संबंध नेत्रांशी आहे. म्हणजेच अग्नितत्त्वाशी आहे. या लोकांना भयानक दृश्य पाहिले असता परिणाम होऊन मृत्यू भय राहते.

आध्यात्मिक तापाचा संबंध वाचेशी आहे. म्हणजे भूमितत्त्व व जलतत्त्व यांच्याशी आहे. या तत्त्वाच्या लोकांना कटू शब्दामुळे परिणाम होऊन दुःख होते व मृत्यू भय राहते.

आधिदैविक तापाचा संबंध कानाशी आहे. म्हणजेच वायूतत्त्वाशी आहे. या लोकांना अचानक वार्ता ऐकून धक्का बसतो व मृत्यू भय राहते.

या तापांपासून मुक्त होण्यासाठी खालीलप्रमाणे साधना कराव्यात.

आधिभौतिक तापाचा संबंध अग्नितत्त्वाशी म्हणजे मेष, सिंह, धनु या राशींशी आहे. या राशींच्या लोकांनी डोळे मिटून हृदयामध्ये ‘राम’ आठवावा.

आधिदैविक तापाचा संबंध वायुतत्त्वाशी म्हणजेच मिथुन, तुळ व कुंभ या राशीशी येतो. या राशींच्या माणसांनी या तापापासून मुक्त होण्यासाठी नासाग्री दृष्टी ठेवून अंतर्मुख होऊन समचरण आठवावे किंवा ‘ळ’ हे अक्षर हृदायात आठवावे.

आध्यात्मिक तापाचा संबंध भूमितत्त्वाशी म्हणजे वृषभ, कन्या व मकर व जलतत्त्वाच्या राशी म्हणजे मीन, वृश्चिक व कर्क अशा सहा राशींशी येतो. या सहा राशींच्या लोकांनी याचेमध्ये ‘हरि ॐ’ म्हणावे.

ॐॐॐ

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

दृष्टी विचार


विषय : दृष्टी विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : एलेमेंत्स ऑफ अस्त्रोलोजी

नमस्कार,

आज आपण ज्योतिष शास्त्रातील दृष्टी या घटकाबाबत माहिती घेणार आहोत.

एखाद्या जन्म कुंडलीचे परीक्षण करताना अनेक गोष्टीचा साकल्याने विचार, विस्तृत रूपाने विश्लेषण आणि न्यायसंगत तर्क लावावा लागतो. त्यातील च ग्रह दर्शित दृष्टी हा एक त्यातील महत्वाचा घटक आहे.

प्रत्येक स्थानाचे काही निश्चित गोष्टी ठरलेल्या जाहेत. जर कोणत्याही स्थानी एखादा ग्रह स्थित असेल, तर तो त्या स्थान संबधित लाभ आठवा हानी प्रदान करू शकतो. हे त्या ग्रहाचा स्वभाव, ग्रहाच्या राशी, त्या स्थानाचा अधिपती द्वारे दर्शित गोष्टी ई. नुसार ठरत असते. तसेच त्यावर कोणत्या ग्रहाची दृष्टी पडत असते त्याच्या शक्ती व गुण अनुसार त्या फळामध्ये बदल घडवत असतो.

दृष्टि म्हणजे काय ?

दोन ग्रहाच्या प्रकाश किरणांनी पृथ्वीवर जो कोन निर्माण होतो त्यास दृष्टि म्हटले जाते. दृष्टि या शब्दाचा प्रयोग ज्योतिषशास्त्रामध्ये राशीचक्रातील कोणत्याही दोन बिंदुंमधील कोनात्मक अंतर दर्शवण्यासाठी केला जातो. हे अंतर अंश व कलांमध्ये मोजले जाते.

हिंदू सिद्धांत :

प्राचीन हिंदू ज्योतीष आचार्यांच्या मते दृष्टिची मोजणी राशी ते राशी केली पाहिजे. ग्रह राशिच्या कोणत्या अंशांमध्ये आहे व दोन ग्रहाचे परस्पर कोनात्मक तर किती आहे, याचा विचार केला जात नव्हता.

उदा. एखादा ग्रह १ ले स्थानात मेष राशीत स्थित आहे. मग ती कितीही अंशावर असला ( १ ते ३० अंश च्या मध्ये) तरी समजा ७ वी दृष्टी मोजायची असेल तर मेष पासून ७ वी रास तुळ हिच्यावर म्हणजेच सप्तम स्थानावर दृष्टी ठेवेल.

अश्या प्रकारे दृष्टि सूर्य, चंद्र, मंगळ, गुरु, शनि, बुध व शुक्र सात ग्रहाची असते. (इतर ग्रह हिन्दू मोजणी मध्ये धरले जात नाहीत.)

सर्व ग्रहांना ७ वी दृष्टी पूर्ण मानली जाते.

सप्तम दृष्टिला सोडून ग्रह आपापल्या स्थानाहून ३ रे व १० वे स्थानाला एक चरण (नक्षत्राचा १/४ भाग)) ने देखिल पाहतात.

फक्त शनि ची ३ व १० वी दृष्टि पूर्ण असते.

गुरु ची ५ व ९ वी दृष्टि पूर्ण असते. ही दृष्टि गुरुच्या सप्तम दृष्टि पेक्षा जास्त बलवान असते.

मंगळ ची ४ व ८ वी दृष्टि पूर्ण असते. ही दृष्टि मंगळाच्या सप्तम दृष्टि पेक्षा जास्त बलवान असते.

‘फलदीपक’ मध्ये मंत्रेश्वर यांनी असे सांगितले आहे कि, फक्त सप्तम दृष्टि ही सर्व बाबतीत अधिक प्रभावशाली मानली पाहिजे, अन्य तितकी नाही. उत्तर कालामृत मध्ये १७ व्या श्लोकात स्कंध २८ मध्ये सांगितले आहे की, कोणताही ग्रह २, ६, १२ वे स्थानाला पाहत नाही व दोन ग्रहांची युती तेव्हाच मानायला हवी, जेव्हा १२ अंशाच्या आत असतील.

खादर ग्रहास किंवा स्थानावर दोन तीन ग्रह दृष्टी टाकत असतील. तर त्या सर्व दृष्ट्यांचा सारासार विचार करून निर्णय करावयास हवा. राशी ते राशी अंतर मोजण्याप्र्क्षा अशावेळी अंशात्मक अंतराचा विचार केला तर निर्णय करणे जास्त सोपे जाईल.

हिन्दू दृष्टि ला राशिमध्ये संशोधन करून देते व ज्यावर त्याची दृष्टि पड़ते, त्या ग्रहाची विशेषता मध्ये देखिल बदल करते, ज्याच्यावर दृष्टि पड़ते, परिणाम शुभ किंवा अशुभ होतील, हे त्या स्थानावर पडणा-या ग्रहाच्या अधिपत्य वर निर्भर असते. शुभ स्थानाचे अधिपति शुभग्रह असताना, वाईट फळ नष्ट करतील व शुभ फळा मध्ये वाढ करतील व ६, ८, १२ वे स्थानाचे अधिपति असून पापग्रह असता, ज्या राशिना पाहतील त्यांना पीड़ा देतील व त्या राशिच्या शुभ फळांना नष्ट करतील.

पाध्चात्य दृष्टीयोग :

या पद्धतीमध्ये दृष्टी शुभ व अशुभ अशा दोन भागामध्ये विभागली जाते. या पद्धतीनुसार शुभ दृष्टी  समान्ता व एक्ता उत्पन्न करणे ई. स्धुभ फळे निर्माण करते. पण अशुभ दृष्टि विरोद, असमानता ई. अशुभ फळ निर्माण करते.

माझ्या अभ्यासानुसार दोन शुभ ग्रह दृष्टी ठेवून जेव्हा सहयोग करतात व तो परिणाम उत्पन्न करितात, जो दशास्वामी व ग्रह दाखवतात. उदा. दशा स्वामी शुभ परिणामकारक असेल, तेव्हा ग्रह जे शुभ दृष्टी बनवतात, ते दशा स्वामी ला शुभ परिणाम देण्यामध्ये सहाय्यक ठरतील. पण जर विपरित दृष्टि असता, जर दश स्वामी शुभ फळ देणारा असेल, तर वाईट दृष्टी टाकणारा ग्रह त्या फळामध्ये विरोध करेल व अवांछित फळ देईल. हा ग्रह फक्त त्यावेळेस बाधा उत्पन्न करेल, जेव्हा त्या युतीचा काळ चालू असेल.

प्रमुख अंशात्मक दृष्टी येथे देत आहे.

शुभ दृष्टी :

१) Trine (त्रिकोण दृष्टी) : १२० अंशांतर

ही शुभ फळ देणारी दृष्टी बलवान असून सुखकर आहे.

२) Sextile (षटकोण दृष्टी) : ६० अंशांतर

ही शुभ फळ देणारी दृष्टी असून सुखकर आहे.

3) Semi sextile (अर्ध षटकोण दृष्टी) : ३० अंशांतर

चांगली, साधारण

4) Conjuction/Parallel (युती व समांतर दृष्टी) : ० अंशांतर

मिश्र फळ

अशुभ दृष्टी :

१) Opposition (विपरीत दृष्टी) : १८० अंशांतर

ही प्रभावी प्रतिकूल व तणाव सूचक दृष्टी आहे. ग्रह स्वाभाविक रूपाने पापग्रह असेल, तर आधिपत्य द्वारा वाईट असते.

2) Square (केंद्रीय दृष्टी) : ९० अंशांतर

अशुभ दृष्टी आहे.

3) Semi square (अर्ध केंद्रीय दृष्टी) : ४५ अंशांतर

अशुभ दृष्टी आहे, पण थोडी कमी वाईट आहे.

4) Sesqui Quadrate : १३५ अंशांतर

अशुभ दृष्टी आहे, पण थोडी कमी वाईट आहे.

5) Quincunx : १५० अंशांतर

अशुभ दृष्टी आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर :

२२.५ अंशाचे विभाजन होणारी अंशात्मक दृष्टी अशुभ असते.

उदा. २२.५, ४५, ६७.५, ९०, ११२.५, १३५, १५७.५, व १८० अंश या दृष्टी अशुभ आहेत.

१८ अंशाचे विभाजन होणारी अंशात्मक दृष्टी (९० अंश सोडून) व ३० अंशाचे विभाजन होणारी अंशात्मक दृष्टी (९० व १५० अंश सोडून) शुभ असते.

उदा. १८, ३०, ३६, ५४, ६०, ७२, १०८, १२०, १२६, १४४, व १६२  अंश या दृष्टी शुभ आहेत.

या सर्वांमध्ये ० अंशात्मक अंतर असलेली युती व सामानंतर दृष्टी सर्वाधिक शक्तिशाली असते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

मृगशीर्ष नक्षत्र विचार


विषय : मृगशीर्ष नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण मृगशीर्ष नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

५. मृगशीर्ष नक्षत्र :

मृगशीर्ष नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ५ वे नक्षत्र आहे. इंग्रजीमध्ये या नक्षत्राला “लांबडा ओरायन” असे म्हटले जाते. या नक्षत्राचे कारकांश ५३-२०’ ते ६६-४० पर्यंत आहेत. या नक्षत्राचे पहिले २ चरण वृषभ राशीत व शेवटचे २ चरण मिथुन राशीत आहेत, त्यामुळे हे द्विपाद नक्षत्र आहे. हे मंदलोचनी तीर्थग्मुखी, मैत्रगणी व देवगणी आहे. नक्षत्र दैवत शीतल असा चंद्र असून नक्षत्र स्वामी मंगळ व राशी स्वामी शुक्र व बुध आहेत. म्हणून या नक्षत्रात चंद्राचा अवखळपणा व मंगळाची विद्युल्लता, शुक्राचे कला कौशल्य व बुधाचा व्यावहारिकपणा यांचे मिश्रण आढळून येते.

आकाशामध्ये हे नक्षत्र फार सुंदर भासते. मृग नक्षत्र दिसण्यास भव्य व ठळक असल्याने सहज लक्षात राहते. या नक्षत्राच्या सभोवताली अनेक सुंदर व ठळक अशा ताऱ्यांचे समूह असल्याने या नक्षत्राचा परिसर नयनरम्य आहे. मृग नक्षत्राच्या उत्तर पूर्वेस आर्द्रा व पुनर्वसुचे तारे, आग्नेयेस व्याध तर पश्चिमेस कृत्तिका व रोहिणीसारखी सुंदर नक्षत्रे आहेत. मार्गशीर्ष महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसते.

नक्षत्राची आकृती शेपूट वाल्या हरणासारखी दिसते. या नक्षत्राच्या आजूबाजूचे तारे व व्याध आणि नजीकचे तारे पाहील्यास पुराणामध्ये सांगितलेली व्याध व हरिणाची गोष्ट आहे हुबेहूब आकाशामध्ये दिसते. या नक्षत्रामध्ये पांढऱ्या रंगाचे तेजदार व सुंदर असे ११ तारे आहेत. त्यातील पुढील दोन ठळक तारे म्हणजे हरिणाचे पुढचे दोन पाय. त्यातील पूर्वेकडील तारा फार लालभडक आहे. या दोन पायांमध्येच बारीक बारीक तारे म्हणजेच हरिणांचे तोंड होय. या दोन ठळक ताऱ्यांना समांतर असे मागचे दोन तारे म्हणजे हरिणाचे मागचे पाय होत. पोटामध्ये सरळ रेषेत असलेले ठळक तीन तारे म्हणजे व्याधाने मारलेला बाण होय व मागच्या पायावर असलेले दक्षिण उत्तर तीन तारे त्याचे शेपूट आहे. नक्षत्राच्या आग्नेयेस अत्यंत पहिल्या प्रतीचा निळसर रंगाचा तारा म्हणजे व्याध (शिकारी) व त्याच्याच मागे त्याचे कुत्रे आहेत. या मृगाच्या पोटातील बाणाच्या दक्षिणेस तीन तारे आहेत. त्यातील मधल्या ताऱ्यांच्या भोवती एक सुंदर तेजोमेघ आहे. दुर्बिणीतून पाहिल्यास यात शेकडो तारे दिसतील. तसेच आकाशातील विषुववृत्तही मृग नक्षत्रातून गेलेले आहे. ७ जूनला दरम्यान सूर्य या नक्षत्रात आला म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे पावसाची सुरुवात होते. मृग नक्षत्रात पाऊस सुरू होऊन तप्त झालेली वसुंधरा आर्द्र होते, म्हणून याच्यापुढील नक्षत्राला आर्द्रा असे म्हणतात.

हे नक्षत्र देवगणी असल्याने मृग नक्षत्री जन्मलेले जातक सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, आनंदी वृत्तीचे, खेळाडू, रसिक, बुद्धिमान, चतुर, व्यवहारी, न्यायी, कलेत पारंगत, अभ्यासू, व उत्साही असतात. महत्त्वाकांक्षा अल्प असते. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा व टापटीपपणा अंगी असते. नक्षत्र अनिष्ट असल्यास जातक चंचल, बडबडे, अवखळ, खांदरट व कामात ढिसाळपणा असंणारे असतात. व्यसन लागण्याची शक्यता कमी असते.

मृग नक्षत्र जातक तुलनेने शारीरिकदृष्ट्या थोडे कमजोर असते. हे जातक उंच, मध्यम बांधा व थोडे नाजूक प्रकृतीचे असतात. या जातकांना शारीरिक कष्ट झेपत नाहीत. शारीरिक व जीवनऊर्जा तशी कमी असते.

स्त्रियांना मृगशीर्ष नक्षत्र सौंदर्य, कला व बुद्धिमत्ता बहाल करते. संपत्ती व ऐश्वर्य देणारे मृग नक्षत्र स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना आनंद व सुख देणारे आहे. मृग स्त्री जातक बांध्याने उंच, प्रमाणबद्ध व नीटनेटक्या, लांबट अवयव, लांब व उंच मान, उभट चेहरा, चाफेकळीसारखे नाक, अंगकाठी, हरणासारखी लवचिक व कमनीय पण जरा बारकट अंगकाठी, काळेभोर डोळे व जरा भेदरलेले भाव अशा वर्णाचे असू शकतात.

मृग स्त्री जातक अत्यंत चपळ व तरतरीत असतात. यांच्या सौंदर्यात कोमलपणा व हालचाली मोहक असतात. हरिण कधी एकाच जागेवर बसलेले चांगले दिसते का? उड्या मारताना, इकडून तिकडे धावताना, पाला खाताना, आपल्या पाडसाशी खेळताना किती सुरेख दिसते. तसे मृग स्त्री जातक धावताना, गाताना, नाचताना, रांगोळी किंवा शिवणकाम करताना, आपल्या बाळाला खेळवताना, ऑफिसमध्ये गप्पा मारताना, नाजूकपणे फोन करताना, फायली घेऊन उगाच इकडे तिकडे हिंडताना आढळतात व विद्युल्लतेप्रमाणे होणाऱ्या मनोवेधक हालचाली पुरुषांना खिळवून ठेवतात.

मृगशीर्ष नक्षत्र स्त्री जातक कलापारंगत व हुशार असतात. भरतकाम, शिवणकाम, रांगोळी, कशिदा काढणे ई. आवड असते. साधी पण आकर्षक, नीटनेटकी, व्यवस्थित राहणी असते. सुसंगत रंगसंगती प्रिय असते. कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज व कर्णफुले शोभतात ई. जन चांगली असते. विविध रंगांची कर्णफुले, बांगड्या, वस्त्रे, शृंगारिक अलंकार यांचा भरपूर साठा असतो. बॉबकट किंवा मोठ्या अंबाड्यापेक्षा तिला एकच शेपटा किंवा दोन वेण्या आवडतात. वेणीपेक्षाही तिला गजरा आवडतो. फॅशनेबल व भारी वस्तुपेक्षा उपयोगी गोष्टीं पसंत करतात. मृग स्त्री जातक घराबद्दल व कुटुंबाबद्दल फार प्रेम व ओढ असणारे असतात. ऑफिस सुटल्यावर हरणाप्रमाणे बाळाच्या ओढीने त्या तडक घर गाठतात व येऊन स्वयंपाकास लागतात. संसाराला व संगोपनाला हे जातक फारच चांगले असतात. व्यावहार चातुर्याने व कला-कौशल्याने, आपल्या संसारात अल्प मिळकतीतही आनंद निर्माण करतात. मृगशीर्षची स्त्री जातक म्हणजे एक मध्यमवर्गातील आदर्श गृहिणी होय. आजकालच्या महागाईने गांजलेल्या पुरुषाला अशी स्त्री जोडीदार मिळणे म्हणजे एक भाग्यच.

मृग नक्षत्र हे जातकास ललित कला, लेखक, प्रकाशक, हिशेबनीस, जमाखर्च ठेवणारे, संपादक, छपाईची कामे करणारे, किरकोळ व्यापारी, विक्रेते, प्रोफेसर अथवा शिक्षकवर्ग, टेलिफोन व तार खात्यात कामे करणारे, टेहळणी पथक, फिरते एजंट, वितरक, आर्किटेक्ट, पेन्टर, चित्रकार, भिक्षुकी, पुराणिक, शास्त्री, कीर्तनकार, बँकांतील नोकरवर्ग, स्टेशनरी व धान्याचे दलाल, दळणवळण खाते (रेल्वे, विमान व वाहतूक कंपन्या) ई. नोकरी व्यवसाय दर्शवतात.

मृग नक्षत्र सेवावृत्तीचे आहे. त्यामुळे थोरा-मोठ्यांच्या आश्रयाखालीच यांची भरभराट होते. हे नक्षत्र फार मोठे पद नेणारे किंवा फार नावलौकिक देणारे नाही. त्यामुळे यांना सहसा राजवैभव किंवा अति उच्च अधिकार योग दर्शवत नाही.

मृग नक्षत्र जातक तब्येतीने जरा नाजूक असल्याने, अति शारीरिक कष्टाने लगेच थकतात. हवामानातील बदल व रोगाची साथ याना लगेच त्रस्त करतात. सर्द प्रकृती असल्याने शीत विकारापासून फार त्रास होतो. सर्दी, कफ, श्लेष्मा, खोकला, थंडीताप (विशेषतः फ्ल्यू), छातीत कफ भरणे, मृग नक्षत्रात चंद्र शनियुक्त असता दमा, क्षय, आकडी, रक्तदाब, धाप लागणे, पक्षाघात असे दीर्घ मुदतीचे आजार होऊ शकतात. फुफ्फुसाचे विकार, मज्जातंतू कमजोर झाल्याने चक्कर, भोवळ, मानसिक चिंता ई. शक्यता राहतात.

मृग नक्षत्री रवि सामान्य बुद्धी व शारीरिक प्रकृती, मध्यम परिस्थिती, संपत्ती व ऐहिक सौख्य बरे देतो.

मृग नक्षत्री चंद्र उत्तम बुद्धिमत्ता, पाठांतर शक्ती, सौंदर्य व उत्तम हस्तकला कौशल्य देतो. हे जातक जरा चंचल व व्यवहारी असतात.

मृग नक्षत्री मंगळ डॉक्टर, आर्किटेक्ट, नृत्यकला ई. साठी अनुकूल असतो. जातकाचा स्वभाव जरा उग्र व कडक असतो. प्रकृती काटक असते.

मृग नक्षत्री बुध उत्तम बुद्धिमत्ता, वक्तृत्व, भाषण व लेखनाची आवड प्रदान करतो. हा बुध व्याकरण, गणित, जमाखर्च, हिशेब, किरकोळ व्यापार यांनाही अनुकूल ठरतो. हे जातक चुणचुणीत, चपळ व तरतरीत असतात.

मृग नक्षत्री गुरु बुद्धिमत्ता व शिक्षण, धार्मिक व सात्त्विक वृत्ती देतो. गुरु हिशेबनीस, ललितकला, भाषा, अर्थ व गणित, शास्त्र यांना बरा असतो. प्रोफेसर व शिक्षक वर्गाला हा फार चांगला.

मृग नक्षत्री शुक्र हस्तकला, गायन, वादन, पेंटिंग, ड्रॉईंग, नृत्यकला तसेच लहान प्रमाणातील व्यापाराला चांगला असतो. हे जातक रसिक व आनंदी असतात.

मृग नक्षत्री शनि विद्या व बुद्धीला चांगला. संशोधनाची आवड असते. विविध भौतिक शास्त्रे, गणित, शास्त्र, जमाखर्च, हिशेब यांना अनुकूल असतो. फार मोठ्या प्रमाणावरील घाऊक व्यापार करण्यास अनुकूल असतो.

मृग नक्षत्री राहू बुद्धिमत्ता व संशोधन वृत्तीला चांगला. हे जातक धडपड्या स्वभावाचे व पराक्रमी असतात.

मृग नक्षत्री केतू साधारण बुद्धिमत्ता, सेवावृत्ती देतो.

मृग नक्षत्री हर्षल असता जातकास बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी, हुशार, कल्पक, संशोधन वृत्तीचा,  पण जरा विक्षिप्त व अविचारी बनवतो.

मृग नक्षत्री नेपच्यून असता जातक रसिक व कला, काव्य यांची आवड असणारा असतो.

मृग नक्षत्र जरा मोठे व सुंदर असल्याने हस्ताक्षर ठळक, सुरेख पण उभट असते. या नक्षत्रावर ५ व ६ या अंकांचे वर्चस्व आहे. तसेच चंद्राचा मोती किंवा बुधाचा पाचू लाभदायक होतो. मंद लोचनी संज्ञक असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती थोड्याच प्रयत्नाने मिळू शकते.

मुहूर्त शास्त्रामध्येही हे नक्षत्र सर्व शुभकार्याला चांगले मानले आहे. मौंजी, साखरपुडा, विवाह, वास्तू, गृहप्रवेश, राज्याभिषेक ही कार्ये करण्यास चांगले. हे नक्षत्र तीर्थमुखी, मृदू व मैत्रगणी असल्याने बारसे, विद्यारंभ, नाच, गाणे किंवा निरनिराळ्या प्रकारची कलाकौशल्ये शिकणे, नवीन वस्त्र नेसणे, अलंकार घालणे किंवा नवीन करावयास टाकणे, स्त्रियांशी प्रेम-गोष्टी व नवीन ओळख करून घेणे तसेच प्रवास किंवा नवीन वाहन खरेदी करणे व इतर शोभादायक कार्ये करण्यास शुभ आहे. व्यापारी वर्गानेही या नक्षत्रावर नवीन व्यापारास अथवा दुकान सुरू करण्यास प्रारंभ करावा.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)