मृगशीर्ष नक्षत्र विचार


विषय : मृगशीर्ष नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण मृगशीर्ष नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

५. मृगशीर्ष नक्षत्र :

मृगशीर्ष नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ५ वे नक्षत्र आहे. इंग्रजीमध्ये या नक्षत्राला “लांबडा ओरायन” असे म्हटले जाते. या नक्षत्राचे कारकांश ५३-२०’ ते ६६-४० पर्यंत आहेत. या नक्षत्राचे पहिले २ चरण वृषभ राशीत व शेवटचे २ चरण मिथुन राशीत आहेत, त्यामुळे हे द्विपाद नक्षत्र आहे. हे मंदलोचनी तीर्थग्मुखी, मैत्रगणी व देवगणी आहे. नक्षत्र दैवत शीतल असा चंद्र असून नक्षत्र स्वामी मंगळ व राशी स्वामी शुक्र व बुध आहेत. म्हणून या नक्षत्रात चंद्राचा अवखळपणा व मंगळाची विद्युल्लता, शुक्राचे कला कौशल्य व बुधाचा व्यावहारिकपणा यांचे मिश्रण आढळून येते.

आकाशामध्ये हे नक्षत्र फार सुंदर भासते. मृग नक्षत्र दिसण्यास भव्य व ठळक असल्याने सहज लक्षात राहते. या नक्षत्राच्या सभोवताली अनेक सुंदर व ठळक अशा ताऱ्यांचे समूह असल्याने या नक्षत्राचा परिसर नयनरम्य आहे. मृग नक्षत्राच्या उत्तर पूर्वेस आर्द्रा व पुनर्वसुचे तारे, आग्नेयेस व्याध तर पश्चिमेस कृत्तिका व रोहिणीसारखी सुंदर नक्षत्रे आहेत. मार्गशीर्ष महिन्यात हे नक्षत्र रात्रभर दिसते.

नक्षत्राची आकृती शेपूट वाल्या हरणासारखी दिसते. या नक्षत्राच्या आजूबाजूचे तारे व व्याध आणि नजीकचे तारे पाहील्यास पुराणामध्ये सांगितलेली व्याध व हरिणाची गोष्ट आहे हुबेहूब आकाशामध्ये दिसते. या नक्षत्रामध्ये पांढऱ्या रंगाचे तेजदार व सुंदर असे ११ तारे आहेत. त्यातील पुढील दोन ठळक तारे म्हणजे हरिणाचे पुढचे दोन पाय. त्यातील पूर्वेकडील तारा फार लालभडक आहे. या दोन पायांमध्येच बारीक बारीक तारे म्हणजेच हरिणांचे तोंड होय. या दोन ठळक ताऱ्यांना समांतर असे मागचे दोन तारे म्हणजे हरिणाचे मागचे पाय होत. पोटामध्ये सरळ रेषेत असलेले ठळक तीन तारे म्हणजे व्याधाने मारलेला बाण होय व मागच्या पायावर असलेले दक्षिण उत्तर तीन तारे त्याचे शेपूट आहे. नक्षत्राच्या आग्नेयेस अत्यंत पहिल्या प्रतीचा निळसर रंगाचा तारा म्हणजे व्याध (शिकारी) व त्याच्याच मागे त्याचे कुत्रे आहेत. या मृगाच्या पोटातील बाणाच्या दक्षिणेस तीन तारे आहेत. त्यातील मधल्या ताऱ्यांच्या भोवती एक सुंदर तेजोमेघ आहे. दुर्बिणीतून पाहिल्यास यात शेकडो तारे दिसतील. तसेच आकाशातील विषुववृत्तही मृग नक्षत्रातून गेलेले आहे. ७ जूनला दरम्यान सूर्य या नक्षत्रात आला म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे पावसाची सुरुवात होते. मृग नक्षत्रात पाऊस सुरू होऊन तप्त झालेली वसुंधरा आर्द्र होते, म्हणून याच्यापुढील नक्षत्राला आर्द्रा असे म्हणतात.

हे नक्षत्र देवगणी असल्याने मृग नक्षत्री जन्मलेले जातक सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, आनंदी वृत्तीचे, खेळाडू, रसिक, बुद्धिमान, चतुर, व्यवहारी, न्यायी, कलेत पारंगत, अभ्यासू, व उत्साही असतात. महत्त्वाकांक्षा अल्प असते. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा व टापटीपपणा अंगी असते. नक्षत्र अनिष्ट असल्यास जातक चंचल, बडबडे, अवखळ, खांदरट व कामात ढिसाळपणा असंणारे असतात. व्यसन लागण्याची शक्यता कमी असते.

मृग नक्षत्र जातक तुलनेने शारीरिकदृष्ट्या थोडे कमजोर असते. हे जातक उंच, मध्यम बांधा व थोडे नाजूक प्रकृतीचे असतात. या जातकांना शारीरिक कष्ट झेपत नाहीत. शारीरिक व जीवनऊर्जा तशी कमी असते.

स्त्रियांना मृगशीर्ष नक्षत्र सौंदर्य, कला व बुद्धिमत्ता बहाल करते. संपत्ती व ऐश्वर्य देणारे मृग नक्षत्र स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना आनंद व सुख देणारे आहे. मृग स्त्री जातक बांध्याने उंच, प्रमाणबद्ध व नीटनेटक्या, लांबट अवयव, लांब व उंच मान, उभट चेहरा, चाफेकळीसारखे नाक, अंगकाठी, हरणासारखी लवचिक व कमनीय पण जरा बारकट अंगकाठी, काळेभोर डोळे व जरा भेदरलेले भाव अशा वर्णाचे असू शकतात.

मृग स्त्री जातक अत्यंत चपळ व तरतरीत असतात. यांच्या सौंदर्यात कोमलपणा व हालचाली मोहक असतात. हरिण कधी एकाच जागेवर बसलेले चांगले दिसते का? उड्या मारताना, इकडून तिकडे धावताना, पाला खाताना, आपल्या पाडसाशी खेळताना किती सुरेख दिसते. तसे मृग स्त्री जातक धावताना, गाताना, नाचताना, रांगोळी किंवा शिवणकाम करताना, आपल्या बाळाला खेळवताना, ऑफिसमध्ये गप्पा मारताना, नाजूकपणे फोन करताना, फायली घेऊन उगाच इकडे तिकडे हिंडताना आढळतात व विद्युल्लतेप्रमाणे होणाऱ्या मनोवेधक हालचाली पुरुषांना खिळवून ठेवतात.

मृगशीर्ष नक्षत्र स्त्री जातक कलापारंगत व हुशार असतात. भरतकाम, शिवणकाम, रांगोळी, कशिदा काढणे ई. आवड असते. साधी पण आकर्षक, नीटनेटकी, व्यवस्थित राहणी असते. सुसंगत रंगसंगती प्रिय असते. कोणत्या साडीवर कोणता ब्लाऊज व कर्णफुले शोभतात ई. जन चांगली असते. विविध रंगांची कर्णफुले, बांगड्या, वस्त्रे, शृंगारिक अलंकार यांचा भरपूर साठा असतो. बॉबकट किंवा मोठ्या अंबाड्यापेक्षा तिला एकच शेपटा किंवा दोन वेण्या आवडतात. वेणीपेक्षाही तिला गजरा आवडतो. फॅशनेबल व भारी वस्तुपेक्षा उपयोगी गोष्टीं पसंत करतात. मृग स्त्री जातक घराबद्दल व कुटुंबाबद्दल फार प्रेम व ओढ असणारे असतात. ऑफिस सुटल्यावर हरणाप्रमाणे बाळाच्या ओढीने त्या तडक घर गाठतात व येऊन स्वयंपाकास लागतात. संसाराला व संगोपनाला हे जातक फारच चांगले असतात. व्यावहार चातुर्याने व कला-कौशल्याने, आपल्या संसारात अल्प मिळकतीतही आनंद निर्माण करतात. मृगशीर्षची स्त्री जातक म्हणजे एक मध्यमवर्गातील आदर्श गृहिणी होय. आजकालच्या महागाईने गांजलेल्या पुरुषाला अशी स्त्री जोडीदार मिळणे म्हणजे एक भाग्यच.

मृग नक्षत्र हे जातकास ललित कला, लेखक, प्रकाशक, हिशेबनीस, जमाखर्च ठेवणारे, संपादक, छपाईची कामे करणारे, किरकोळ व्यापारी, विक्रेते, प्रोफेसर अथवा शिक्षकवर्ग, टेलिफोन व तार खात्यात कामे करणारे, टेहळणी पथक, फिरते एजंट, वितरक, आर्किटेक्ट, पेन्टर, चित्रकार, भिक्षुकी, पुराणिक, शास्त्री, कीर्तनकार, बँकांतील नोकरवर्ग, स्टेशनरी व धान्याचे दलाल, दळणवळण खाते (रेल्वे, विमान व वाहतूक कंपन्या) ई. नोकरी व्यवसाय दर्शवतात.

मृग नक्षत्र सेवावृत्तीचे आहे. त्यामुळे थोरा-मोठ्यांच्या आश्रयाखालीच यांची भरभराट होते. हे नक्षत्र फार मोठे पद नेणारे किंवा फार नावलौकिक देणारे नाही. त्यामुळे यांना सहसा राजवैभव किंवा अति उच्च अधिकार योग दर्शवत नाही.

मृग नक्षत्र जातक तब्येतीने जरा नाजूक असल्याने, अति शारीरिक कष्टाने लगेच थकतात. हवामानातील बदल व रोगाची साथ याना लगेच त्रस्त करतात. सर्द प्रकृती असल्याने शीत विकारापासून फार त्रास होतो. सर्दी, कफ, श्लेष्मा, खोकला, थंडीताप (विशेषतः फ्ल्यू), छातीत कफ भरणे, मृग नक्षत्रात चंद्र शनियुक्त असता दमा, क्षय, आकडी, रक्तदाब, धाप लागणे, पक्षाघात असे दीर्घ मुदतीचे आजार होऊ शकतात. फुफ्फुसाचे विकार, मज्जातंतू कमजोर झाल्याने चक्कर, भोवळ, मानसिक चिंता ई. शक्यता राहतात.

मृग नक्षत्री रवि सामान्य बुद्धी व शारीरिक प्रकृती, मध्यम परिस्थिती, संपत्ती व ऐहिक सौख्य बरे देतो.

मृग नक्षत्री चंद्र उत्तम बुद्धिमत्ता, पाठांतर शक्ती, सौंदर्य व उत्तम हस्तकला कौशल्य देतो. हे जातक जरा चंचल व व्यवहारी असतात.

मृग नक्षत्री मंगळ डॉक्टर, आर्किटेक्ट, नृत्यकला ई. साठी अनुकूल असतो. जातकाचा स्वभाव जरा उग्र व कडक असतो. प्रकृती काटक असते.

मृग नक्षत्री बुध उत्तम बुद्धिमत्ता, वक्तृत्व, भाषण व लेखनाची आवड प्रदान करतो. हा बुध व्याकरण, गणित, जमाखर्च, हिशेब, किरकोळ व्यापार यांनाही अनुकूल ठरतो. हे जातक चुणचुणीत, चपळ व तरतरीत असतात.

मृग नक्षत्री गुरु बुद्धिमत्ता व शिक्षण, धार्मिक व सात्त्विक वृत्ती देतो. गुरु हिशेबनीस, ललितकला, भाषा, अर्थ व गणित, शास्त्र यांना बरा असतो. प्रोफेसर व शिक्षक वर्गाला हा फार चांगला.

मृग नक्षत्री शुक्र हस्तकला, गायन, वादन, पेंटिंग, ड्रॉईंग, नृत्यकला तसेच लहान प्रमाणातील व्यापाराला चांगला असतो. हे जातक रसिक व आनंदी असतात.

मृग नक्षत्री शनि विद्या व बुद्धीला चांगला. संशोधनाची आवड असते. विविध भौतिक शास्त्रे, गणित, शास्त्र, जमाखर्च, हिशेब यांना अनुकूल असतो. फार मोठ्या प्रमाणावरील घाऊक व्यापार करण्यास अनुकूल असतो.

मृग नक्षत्री राहू बुद्धिमत्ता व संशोधन वृत्तीला चांगला. हे जातक धडपड्या स्वभावाचे व पराक्रमी असतात.

मृग नक्षत्री केतू साधारण बुद्धिमत्ता, सेवावृत्ती देतो.

मृग नक्षत्री हर्षल असता जातकास बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी, हुशार, कल्पक, संशोधन वृत्तीचा,  पण जरा विक्षिप्त व अविचारी बनवतो.

मृग नक्षत्री नेपच्यून असता जातक रसिक व कला, काव्य यांची आवड असणारा असतो.

मृग नक्षत्र जरा मोठे व सुंदर असल्याने हस्ताक्षर ठळक, सुरेख पण उभट असते. या नक्षत्रावर ५ व ६ या अंकांचे वर्चस्व आहे. तसेच चंद्राचा मोती किंवा बुधाचा पाचू लाभदायक होतो. मंद लोचनी संज्ञक असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती थोड्याच प्रयत्नाने मिळू शकते.

मुहूर्त शास्त्रामध्येही हे नक्षत्र सर्व शुभकार्याला चांगले मानले आहे. मौंजी, साखरपुडा, विवाह, वास्तू, गृहप्रवेश, राज्याभिषेक ही कार्ये करण्यास चांगले. हे नक्षत्र तीर्थमुखी, मृदू व मैत्रगणी असल्याने बारसे, विद्यारंभ, नाच, गाणे किंवा निरनिराळ्या प्रकारची कलाकौशल्ये शिकणे, नवीन वस्त्र नेसणे, अलंकार घालणे किंवा नवीन करावयास टाकणे, स्त्रियांशी प्रेम-गोष्टी व नवीन ओळख करून घेणे तसेच प्रवास किंवा नवीन वाहन खरेदी करणे व इतर शोभादायक कार्ये करण्यास शुभ आहे. व्यापारी वर्गानेही या नक्षत्रावर नवीन व्यापारास अथवा दुकान सुरू करण्यास प्रारंभ करावा.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment