Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

!! श्री गणपती उवाच !!


विषय : श्री गणपती उवाच

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वलिखित व आजपर्यंतच्या वाचन, चिंतनाचा परिपाक

जय गणपती गुणपती गज वदना, आज तुझी पूजा केली गौरी नंदना…

गणपतीचे नुसते स्मरण होताच एक अनामिक ऊर्जा अंगात संचारते. कारण कामास सुरुवात करायची तर त्यालाच म्हणतात, चला कामाचा श्री गणेशा करू या. कोणतेही हिंदू घर पहा, दरवाज्यावर तुम्हाला गणपतीचे रूप दिसणारच. व्यावसायिक त्यांच्या चोपडीवर श्री गणेशाय नम: लिहूनच सुरुवात करणार.

कारण तो विघ्नहर्ता बाप्पा जो भक्तांना येणाऱ्या अडचणींचे, विघ्नांचे हरण करतो, मग ते मानव असो वा देव, सगळ्यांच्या आर्ततेला साद देणारा गजानन. ज्या लोकांवर गणेशाची कृपा राहते, त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे काम ते हाती घेतात ते निर्विघ्न पार पडते. श्रीगणेशाची विशेष कृपा असल्याने याना बुद्धी आणि कौशल्य उपजतच लाभते.

गणेश म्हणजे गणांचा ईश किंवा गणपती म्हणजे गणांचा पती. गण म्हणजे समूह, गण म्हणजे क्रमांक, गण म्हणजे शब्द ब्रम्ह. गणना, गणित हे शब्द याचीच व्युत्पत्ती. गणिताचा कारक ग्रह बुध, तसाच बुद्धीनायक गणपती. गणपती म्हणजे बुद्धी, वाणी, संपर्क यांचा नायक. त्यामुळे जे लोक बुद्धिनिष्ठ नोकरी व्यवसाय करतात. त्यांनी मनापासून गणपतीची उपासना करावी.

उदा. सी ए, सी एस, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, शिक्षक, प्रोफेसर, कर सल्लागार, लेखक, पत्रकार, कॅशियर, संपादक, ज्योतिषी, अकाऊंटंट, कॉपी रायटर, दुभाषी, प्रिंटींग, गणिती,  जनसंपर्क अधिकारी, ग्रंथ, टेलीफोन, संगणक, रेडीओ, टी.व्ही., जाहीराती, श्रवणयंत्रे ई.

गुणपती म्हणजे गुणांचा पती. यात अनेक विद्या, तांत्रिक, वेगवेगळ्या कला, संगीत, नृत्य, कविता ई. येतात. कारण हा गौरी नंदन म्हणजे गौरीचा पुत्र आहे. आदिशक्ती ऊर्जा, प्रेम, सौंदर्य, मातृत्वाची देवी आहे. जी निर्मिती आणि संहार यांचे शक्ती रूप आहे. तिचीच लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ही त्रिगुणात्मक रूपे आहेत. मग तिच्या मातृ भक्त पुत्रात हे सर्व गुण असणे साहजिक आहे. त्यामुळे कलेच्या प्रांतातील लोकांनी सुद्धा गणेशाची उपासना केली तर श्री कृपेने सर्व समृद्धी येईल, कारण मंगल (मंगळ) मूर्ती तुम्हाला त्यासाठी योग्य ते कौशल्य व धाडस सुद्धा प्रदान करेल.

केतू हा मोक्षकारक ग्रह गणपतीच्या अधिकारात येतो. त्यामुळे गणपतीच्या कृपेने वैदिक  उपासक अहंकार, काळ, परिस्थिती याचे पलीकडे जाऊन अध्यात्मिकते द्वारे आत्मज्ञान प्राप्त करू शकतात. व त्याचेसाठी मोक्षाचे दरवाजे उघडू शकतात.

गणेश हा एकमेव देव आहे, जो ज्योतिषशास्त्रातील बुध आणि केतू या दोन भिन्न गुणाधर्मी ग्रहांचा अधिपती आहे.

गणेश पुराणानुसार रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या कन्या, तर शिवपुराणानुसार त्या विश्वरूप प्रजापतीच्या कन्या. शंकर आणि पार्वती गणेशाचा विवाह योजणार आहेत, असे कळल्यावर विश्वरूप प्रजापतीने आपल्या दोन सुंदर कन्या गणेशास देण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानुसार त्यांचे गणपतीशी लग्न झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ असे दोन पुत्र गणपतीस झाले.

गणपतीचे रूप सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते.

गणपतीचे हत्तीचे डोके आपल्याला बुद्धीनायक असूनही हत्तीसारखे अफाट सामर्थ्य दर्शवते.

सुपासारखे मोठे कान आपल्याला हे तर सुचवत नसतील, की जगात चौफेर ध्यान असू द्यात. कान इतके मोठे करा की, सूक्ष्मातील सूक्ष्म बदल देखील कानांनी टिपला पाहिजे आणि सूप जसे खडे बाजूला करते, तसे सकारात्मक गोष्टी आत्मसात करून, नकारात्मक गोष्टी खड्या सारख्या बाजूला सारा.

गणपतीचे सुंदर डोळे आपल्याला सतत सांगतात की, बुद्धी तीक्ष्ण करून सर्व कला, विद्या, साहस, सौंदर्य संपादन केले की, त्याचे विलक्षण प्रभावाने, तूमच्या तेजस्वीपणाची झांक पहिली डोळ्यात चमकते.

गणपतीची वक्र सोंड आपल्याला योगी होण्यास सांगते. आपल्या शरीरात वेटोळ्या सर्पाकृती आकारात वसलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून केतुरुपी मोक्षाची वाट बुध रुपी बुद्धीने स्विकारा आणि आयुष्य सार्थकी लावा. मी येणाऱ्या सर्व विघ्नांचे हरण करेन.   

लंबोदर मला अवघ्या विश्वाच्या पसार्याची व खोल बेंबी या विश्वातील अनेक अगम्य, गूढ गोष्टींची, कृष्ण विवराची आठवण करून देते.

त्याचे चार हात मला चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे कर्तव्य बुद्धीने जगायला प्रेरणा देतात.

शिव आणि शक्तीचा पुत्र गणेश हा एक अद्वैत रूपच आह्रे. म्हणूनच कदाचित मला ओम बघितला की त्यात गणपतीचे रूप भासते.

अशा या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरु होत आहे. त्यानेच कदाचित माझ्यासारख्या अल्पबुद्धी ज्योतिष अभ्यासकाला लिहिण्याची स्फूर्ती दिली आणि आजपर्यंतच्या वाचनाचा परिपाक म्हणून हे लिखाण एका टप्प्यात झरझर उतरले. तरी जर अनावधानाने काही चुकीचे लिहिले असल्यास क्षमस्व.

!!! गणपती बाप्पा ….. मोरया !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

हस्त नक्षत्र विचार


विषय : हस्त नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण हस्त नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. हस्त हे नक्षत्र चक्रातील १३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नावाप्रमाणेच हाताच्या उघडलेल्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे ४ ही चरण कन्या राशीत येत असल्यामुळे ते चतुष्पादी नक्षत्र आहे. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र, दैवत सूर्य व राशी स्वामी बुध आहे. हे नक्षत्र देवगणी आहे. या नक्षत्रात चंद्राचे वात्सल्य, प्रेम, रवीची उच्च अभिरुची व सात्विक आचारविचार, बुधाचा व्यावहारिकपणा व शहाणपण यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र या चार ग्रहांची सत्ता आहे. तसेच नक्षत्र तीर्यङ्मुख, लघु व मंदलोचनी आहे. हस्त नक्षत्रात एकूण ५ तारे असून ते हाताच्या बोटासारखे दिसतात. तारे पांढऱ्या रंगाचे, स्वच्छ व मध्यम प्रतीच्या तेजाचे आहेत. तारे सुरेख, मोहक व पावसाच्या टपोऱ्या थेंबासारखे दिसतात. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. आकाशात हे नक्षत्र सहज ओळखता येते. हस्त नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘डेल्टाकाव्हीं’ असे आहे. कीर्व्हास याचा अर्थ कावळा असा आहे. आपण ज्याला कावळा असे म्हणतो, तो सूर्यदेव अपोलो याचा लाडका होता. परंतु एक त्याने गैरवर्तणूक केली म्हणून त्याला पाणी पिता येणार नाही असा त्याने शाप दिला. तसेच जलप्रलयानंतर नोहाने आपल्या नौकेमध्ये आणलेला कावळा तोच अशा आशयाच्या पाश्चात्य साहित्यात कथा आहेत. भारतीय पुराणात मात्र हे नक्षत्र प्रजापतीच्या उजव्या हाताचा पंजा असेही समजतात.

हस्त नक्षत्र देवगणी असून ते शुभ गुणधर्म युक्त, सत्त्वगुणी आणि सुशील आहे. तसेच ते लक्ष्मीदायक व देवनक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक सुंदर, कलाकुशल, विद्वान, बुद्धिवान, व्यवहारकुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वरभक्त, समाधानी, संतोषीवृत्तीचे, परोपकारी, कुटुंबवत्सल, सत्यभाषणी, नम्र, विनयशील, सेवावृत्तीचे, आज्ञापालन करणारे, निर्व्यसनी आढळून येतात. हस्त नक्षत्रात शुभग्रह असल्यास त्यांना सुपारीचेही व्यसन नसते. शिवाय हे जातक रसिक, हौशी, कलाप्रिय व सौंदर्याचे भोक्ते असतात. मात्र हे जातक थोरामोठ्याच्या सहकार्यानेच या पुढे येतात.

हस्ताच्या पावसामध्ये जणू काही वसुंधरेने हिरवा शालूच नेसलेला आहे अशी सर्व जमीन हिरवीगार दिसते.

हस्त पुरुष जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, बुद्धी व शरीरप्रकृतीला ठीक आहे. हस्त नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जाताकांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व जरा नाजूक असतो. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती मध्यम असते. हे जातक बुद्धिवान व कलाकार असतात, पण अधिकारयोगाच्या दृष्टीने हे मध्यम नक्षत्र आहे. पुरुषांना लागणारे शौर्य, पराक्रम, धाडस, शूरपणा किंवा अधिकारलालसा हे गुण त्यांच्यात साधारण असतात.

हस्त नक्षत्राच्या स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीर, सौंदर्य, बुद्धी, कला व गुण यांना फार अनुकूल असते. हस्त नक्षत्रावरच्या स्त्रिया या जणू बालकुमारीकाच असतात. प्रौढ वयातही या मुलींसारख्या तरुण दिसतात. त्यांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर, नीटनेटका व व्यवस्थित असतो. हातपाय, मांड्या, मनगटे, दंड यांचे आकार मध्यम गोलाकार असतात. चेहरा गोल पण फार फुगीर नसून शरीराला शोभेल एवढाच गोल असतो. डोक्यात बरोबर मध्ये भांग पाडायची सवय असते. अवयव फार मांसल किंवा गुबगुबीत नसून प्रमाणशीर व रेखीव असतात. चालणे जरा गजगतीसारखे असते. चेहरा सुंदर, आकर्षक व मोहक असतो व सात्विक तेज असते. त्यांचे दात फार सुंदर असतात. दात दुधासारखे पांढरे स्वच्छ असून पुढील दोन तीन दात जरा मोठे, पांढरे स्वच्छ व सरळ रेषेत असतात. त्या हसताना हे पुढील दात ठळकपणे दिसतात. त्यांचे हसणे साधे, स्मितहास्यही अत्यंत मोहक असते. हस्त स्त्री जातकांचे सौंदर्य त्यांच्या लाजण्यामध्ये आहे. शुभ स्थिती मध्ये असता त्यांना भडक रंगाचे कपडे किंवा फाजील फॅशन प्रिय नसून पांढरा, पिवळा, हिरवा, निळा अशा गढूळ रंगाची व मॅचिंग कलर्स प्रिय असतात. फुलांचे बरेच वेड असते. दागिन्यांचा फारसा हव्यास नसतो. मात्र स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा फार असतो. हस्त नक्षत्र स्त्रिया हस्तकौशल्यात विशेषतः भरतकाम, रांगोळी, कशिदा, विणणे, स्वयंपाक, पेंटिंग, चित्रकला यात फार हुशार, संसाराची फार आवड असणाऱ्या आढळतात. संसाराला अशी पत्नी मिळणे म्हणजे महाभाग्यच.

हस्त नक्षत्राखाली येणारा वर्ग बहुधा समाजातील घरंदाज व प्रतिष्ठित असा मध्यमवर्गच होय. या नक्षत्राखाली डॉक्टर्स, वकील, अॅडव्होकेटस्, शिक्षक, प्रोफेसर्स, बँका, पतपेढ्या किंवा निरनिराळ्या खाजगी कंपन्यात हिशेबी खात्यात काम करणारा वर्ग, आर्किटेक्ट, चित्रकार, कलाकार, लेखक, कवी, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ व्यापार करणारे व्यापारी, पुस्तक विक्रेते, फिरते एजंट, जाहिरातदार, छपाई खात्यात काम करणारा वर्ग, लहान लहान शेतकरी, बातमीदार, वर्तमात्रपत्रात काम करणारे संपादक, काही वेळा नाटकात कामे करणारा वर्ग, शिंपी, कलाकार या व्यक्ती प्रामुख्याने होत. नर्स व गृहिणीही या खाली येतात.

हस्त नक्षत्री रवी असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम असतो. हे जातक मध्यम बांध्याचे व काटक असतात,तसेच शांत, नम्र, ईश्वरीभक्ती करणारे, देव ब्राम्हणांचे पूजक, मध्यम विद्वान, गुणी असतात. विद्या व धनाच्या दृष्टीने रवि मध्यम असतो.

हस्त नक्षत्री चंद्र बुद्धी, विद्या, सौंदर्य व गुण याच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम, उंच भरलेला, जरा पुष्ट पण प्रमाणशीर असतो. चेहरा सुंदर व मोहक असतो. हे जातक बुद्धीमान व कलाकार असतात. चंद्र असता बुद्धी व कला, विद्या व सौंदर्य यांचा सुरेख संगम दिसून येतो. स्वभावही प्रसन्न, शांत, हौशी, रसिक व आनंदी असतो. धनाच्या दृष्टीने चंद्र मध्यम असतो.

हस्त नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती सडसडीत असते. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. चेहरा जरा उग्र असतो. स्वभावही थोडा करारी, स्पष्टवक्ता व मानी असतो. मात्र तरीही हे जातक रसिक, हौशी व लोकप्रिय असतात. हस्त नक्षत्री मंगळ आर्किटेक्ट, ड्रॉइंग, डॉक्टर या विद्येला अनुकूल व  स्वतंत्र व्यवसाय करण्यास चांगला.

हस्त नक्षत्री बुध हा शरीरसंपत्ती, बुद्धी व धनाच्या दृष्टीने चांगला. बांधा मध्यमव थोडा आडवा, अवयव गोलाकार व फुगीर असतात. बुद्धी कुशाग्र असून लेखन, वाचनाची आवड असते. बुध कोणत्याही वस्तूंच्या किरकोळ व्यापाराला चांगला. तसेच तो जाहिरातदार, बातमीदार, फिरते एजंट, विक्रेते यांना चांगला.

हस्त नक्षत्री गुरु सौंदर्य व बुद्धीच्या दृष्टीने चांगला. नाजूक पण उंच बांधा, चेहरा सुंदर, आकर्षक व सात्विक तेजाचा असतो. बुद्धी कुशाग्र असते. हे जातक अतिशय बुद्धीवान व विद्वान असतात. गुरु अर्थी, वाणिज्य, कायदा अशा विषयांना चांगला असतो. हस्त जातक उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर्स होऊ शकतात. स्वभावाने हे जातक उत्तम समाजसेवक असतात. स्वभाव नम्र, निगवीं, ममताळू व उदार असतो.

हस्त नक्षत्री शुक्र हा सौंदर्य व कलेच्या दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व रेखीव अवयव असणारा असतो. चेहरा मोहक, आकर्षक व जरा मादक असतो. शुक्र बरीच वर्षे यौवनावस्था देतो. शुक्र संगीत, नृत्य, हस्तकला, कौशल्य, पेंटिंग, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, नाटक-सिनेमा कलाकार यांना चांगला असतो. मात्र पैसा व दर्जाच्या दृष्टीने मध्यमच असतो.

हस्त नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती उत्तम असते. बांधा पुष्ट, भरलेला, गोलाकार अवयव पण जरा शिथिलपणा असतो. चेहरा सावळा, गंभीर पण नाकी डोळी बरा. शनि बुद्धीला चांगला. स्थापत्यशास्त्र व कायदेशास्त्र, वाणिज्यशास्त्र यांना फार चांगला. पण त्यापेक्षा व्यापाराला फार उत्तम. कापूस, तेलबिया, धान्ये, किराणा माल, कागद अशा वस्तूंचा व्यापार चांगला चालेल. धन चांगले मिळेल.

हस्त नक्षत्री राहू रूप, कला बुद्धीला चांगला. बांधा सडसडीत, उंची बांधेसूद, आकर्षक, रेखीव असतो. चेहरा मोहक व डोळ्यांत एक प्रकारची जादू असते. बुद्धी प्रकर्ष व उत्तम स्मरणशक्ती असते. पेंटिंग, डिझाईन, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, संशोधन व यांत्रिक कामासंबंधीत कला, फोटोग्राफी, सिनेमा-नाटकात काम करणे यांना चांगला.

हस्त नक्षत्री केतू हा शरीरप्रकृतीला साधारण, पण बुद्धीच्या दृष्टीने मध्यम. कला वगैरेत यश नाही. थोडा धार्मिक व आध्यात्मिक प्रकृतीकडे कल.

हस्त नक्षत्री हर्षल शरीरप्रकृतीला बरा व बुद्धीलाही चांगला. उंच व रेखीव बांधा. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. तसेच हे जातक बुद्धिमान, हुशार, संशोधक वृत्तीचे व विद्वान असतात. स्वभाव फारसा लहरी किंवा विक्षिप्तपणा नसतो.

हस्त नक्षत्री नेपच्यून असता शरीरप्रकृती साधारण. चेहरा सुंदर, मोहक, प्रसन्न आनंदी व संतोषी असतो. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, अंतःस्फूर्ती, काव्य, गायन कल्पनाशक्ती चांगली असते. वादन यांना चांगला.

हस्त नक्षत्री होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे आढळतात. थंडी, कफ, डोके दुखणे, अर्धशिशी, ओकाऱ्या, पोटात मळमळणे, अपचन, आतड्याचे विकार, पचनशक्ती बिघडणे, चक्कर, भोवळ येणे, कंबर दुखणे, मानसिक विकार, नैराश्य, उतारवयात रक्तदाबाचे विकार, शौचाची तक्रार असणे. अतिश्रमाने ग्लानी येणे हे आजार दिसतात. या जातकांना उगाचच औषधे व रेचके घेण्याची फार सवय असते.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, मध्यम गोल, वळणदार व जास्त रुंद असते. ओळी सरळ व व्यवस्थित असतात. लिहिताना सहजगत्या लिहितात. नक्षत्रावर २ किंवा ५ अंकाचा प्रभाव आढळतो. २ अंक जास्त भाग्यकारक वाटतो. चंद्राचा मोती अथवा बुधाचा पाचू लाभदायक आहे. नक्षत्र मंदलोचनी असल्याने वस्तू हरवल्यास ती थोड्याशा प्रयत्नाने मिळू शकते व वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असेल.

मुहूर्त शास्त्रात हस्त नक्षत्राला फार महत्त्व आहे. शुभ देवगणी व सत्वगुणी असल्याने मौजी, विवाह, बारसे, ई. साठी चांगले. तसेच या नक्षत्रावर बी पेरणे, नांगर धरणे, जनावरे घेणे, नाव, जहाज, गलबत चालू करणे, प्रयाण, नवीन दुकान चालू करणे, अलंकार किंवा वस्त्रभूषणे धारण करणे, विद्यारंभ, शिल्पकाम, औषध घेणे किंवा औषधी वृक्ष लावणे, बालकाचे कान टोचणे, अन्नप्राशन, गृहारंभ, वास्तुशांती, विहिर खणणे, राज्याभिषेक, संगीत, नृत्यादी कला शिकणे यांना फारच चांगले. कोणत्याही शुभकार्यास हे नक्षत्र चांगले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विवाह जमवताना…


विषय : विवाह जमवताना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : धनुर्धारी मधील व.दा. भट सरांचा लेख 

नमस्कार,

धनुर्धारी दीपावली विशेषांकमधील व.दा. भट सरांचा “वधूवर कुंडली मेलन” हा विस्तृत लेख वाचनात आला. अभ्यास करताना त्यातील काही मुद्दे जे मला भावले, तेवढेच आपल्या माहितीसाठी माझ्या शब्दांत व विचारानुरूप येथे देत आहे.

वधू-वरांचे विवाह ठरवताना शिक्षण, उत्पन्न, स्वत:चे घर, सुस्थिती हा व्यावहारिक भाग, समाज जाती व्यवस्था, अनुरुपता अशा अनेक घटकांना सामोरे जावे लागते आणि शेवटी वधू-वरांच्या कुंडल्या ज्योतिषांपुढे येतात. कुंडली जुळते, कुंडली जुळत नाही, असे एखादा ज्योतिषी म्हणतो, तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निकालासारखे त्याला महत्त्व येते. या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीतून पुढे सरकत असताना ज्योतिषी त्यात अजून, मंगळ, गुणमेलन, कु योग यांची भर घालत असतो.

गुरुवर्य व. दा. भट लेखात म्हणतात की, पति-पत्नी किंवा खरे तर इतर नाती ही गतजन्मीच्या ऋणानुबंधावर ठरलेली असतात. अशा व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम काळ करत असतो.

कै. म.दा. भट सर कित्येक प्रसंगी एखाद्या तरुणाला नेहमी म्हणत असत, तुला मनापासून मुलगी आवडली आहे ना, तिनेही तुला पसंत केले आहे ना, घरातल्या लोकांना मान्य आहे ना, मग कुंडलीबद्दल विचार न करता सरळ लग्न कर. फक्त तेच असे नाही, तर अनेक ज्योतिष ग्रंथकारानीही असे मत व्यक्त केले आहे.

विवाह वृंदावन या ग्रंथात दिलेले आहे –

अर्चितं वचनम् उच्चतं मनो निर्वेशेष सुखदं वपुर्दशाम् ।

अस्ति चेदधरपडमुखी मतिर्लक्षणैः किमपरैनृयोगिताम् ।।

सुंदर सुभाषण, उदार मन, रुप, दृष्टीस सुख देणारी देहाकृति, पापभीरू इतके गुण जर वधू वर ह्यांत असतीळ तर इतर गोष्टी पाहण्याची आवश्यकता नाही.

आपस्तंभ सूत्रानुसार –

यस्मिन्पत्रने मनः सनयने संतोषमृच्छेत्तथा ।

कन्यायामपि यत्र तत्र सकला ऋद्भिर्भवेदित्यतः।।

नान्यलक्षणमाद्वियेत…..

ज्या वराची वा वधूची आकृति देह पाहिल्याने नेत्रांना व मनाला संतोष होतो तेथे सर्व सिध्दी आहेत…….

असाही एक श्लोक आहे :

कन्या वरयते रुपं । माता वित्तं । पिता श्रुतम् । बांधवः कुलम् इंमिच्वंति । मिष्टान्नं इतरे जनः ।

प्रत्यक्ष व्यवहारांत आपण गुणमेलन करतच असतो. ते ३६ गुण असे सांगता येतील –

१) स्वजातिय : ४ गुण

२) रूप-दिसावयास अनुरूप : ८ गुण

३) शिक्षण अपेक्षेप्रमाणे : ८ गुण

४) आर्थिक स्थिती जबाबदाऱ्या : ८ गुण

५) घर वास्तू रहाण्याचे ठिकाण : ४ गुण

६) कुटुंब – आई- वडिल-बहिणी-भाऊ इ. : ४ गुण

  एकूण : ३६ गुण

अशा व्यावहारिक गोष्टींचे मूल्यमापन प्रत्येक जण करत असतोच. तरीसुद्धा विवाह संस्कार, ही आयुष्यातील अति महत्त्वाची घटना असल्यामुळे, भावी काळाबद्दल साशंकता असल्यामुळे म्हणा, व्यक्तीला निर्णय घेताना आणखी एखादा आधार हवा असतो.

अति प्राचिन काळी सुध्दा असे आधार कसे असत, त्याचे एक उदाहरण आपस्तंभ गृह्य सूत्रात सापडते.

वधू परीक्षेसाठी पांच मडक्यात विविध गोष्टी भरून ठेवून झाकण लावत. वधूला एका मडक्याला स्पर्श करण्यास सांगत १) विविध बियाणे २) शेतातील माती ३) स्मशानातील माती ४) गोशाळेतील वगैरे त्यावरून वधू कोणत्या पायगुणाची ते समजते. स्मशानातील माती नवऱ्याचा मृत्यू, चौकातील माती मुले जुगारी, वाळवंटातील माती मुले दरिद्री, यज्ञातील • मुले अध्यात्मिक ई. पद्धती अवलंबत असत.

हल्लीसुध्दा देवीला कौल लावणे, सत्पुरुषांची गुरुची अनुमती घेणे वगैरे गोष्टी आहेतच. भावी काळांत काय होईल ह्यांचा अंदाज देणारे ज्योतिष हे एकच शास्त्र असल्याने, वधू-वरांच्या बाबतीत लोक ज्योतिषाकडे धाव घेतात. गुणमेलन किंवा इतर पद्धतीने भावी संसाराचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असतात. बहुतेक ज्योतिषी गुणमेलन कोष्टक – मंगळ अभ्यासून हा निर्णय घेतात.

पूर्वकाल होरा ग्रंथ केवळ कुंडली शास्त्रावर जे पंथ आहेत. उदा. पाराशरी, बृहत्जातक, होराशास्त्र,  फलदिपिका जातक पारिजात वगैरे ग्रंथात वधू-वर पत्रिका मेलन हा भाग आढळत नाही. हा विषय ‘मुहूर्त पंथात आढळतो. दहा गुण ३६ गुणाची वाटचाल एकदम झालेली नाही. कालिदासप्रणीत ज्योतिर्विदाभरणम ग्रंथात, वधूवरांना दहा गुण मिळाले तरी विवाह करावा असा उल्लेख आहे. नक्षत्र (तारा) ३,५,७ नको. नाडी, योनि, वर्ग, विश्य युवा, गण वगैरे गोष्टींचा उहापोह केलेला आहे.

भारतात वेदकालापासून केवळ नक्षत्र विचार होता. त्यामुळे वधूवर कुंडली मेलनात नक्षत्रांचे गुणधर्म एकमेकांपासूनची नक्षत्रे (तारा) योनि, गण, नाडी एवढ्या पुरतेच गुणमेलन होते. वराह मिहीरनंतर राशि आल्या आणि गुणमेलन नक्षत्रापुरते मर्यादित न राहता राशी गुणधर्माचा विचार व त्यांना गुण देण्याची प्रथा आली. त्यानंतर अष्टकूट व त्यातील ३६ गुण संख्येने पुढे संपूर्ण भारतात ह्याचाच विचार होऊ लागला. गुणमेलन कोष्टक सर्वत्र अत्यंत लोकप्रिय झाले. आणि गेली ७००-८०० वर्षे ज्योतिषांच्या वापरात आले. कळायला, वापरण्यास सोपे असल्याने ते अत्यंत लोकप्रिय झाले. मग त्यात अनेक गोष्टी समाविष्ट झाल्या.

गण हे स्वभावाचे निदर्शक आहेत, तर नाडीने व्यक्तिची प्रकृति पित्त-वात-कफ कळते, एकनाड म्हणून वर्ज्य धरली असावी. गण ग्रहमैत्री ह्या तीन घटकांपैकी दोन चांगले असतील तर तिसरा घटक अनुकूल नसला तरी विवाह करण्यास हरकत नाही, असे मत वेगवेगळ्या ग्रंथकारांनी व्यक्त केले आहेत. योनि वर्ग, वर्ण, गण, योनि द्विर्द्वादशक, षडाष्टक ई. दोष असताहि ग्रहमैत्री असेल तर विवाह करावा. इतर सर्व कुटे शुध्द असतील तर एकनाडीचाहि दोष जातो. असे विवाहपटलात म्हटले आहे. नक्षत्रगुणधर्म महत्त्वाचे का राशी ग्रहमैत्री महत्त्वाची हा सतत वादाचा मुद्दा राहिला आहे. पुढे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भटोत्कुलोत्पन दामोदरसुत वसंत शर्मा नावाच्या ज्योतिषाने चंद्राच्या नवमांश राशीचा विचार आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ दिले ते असे.

पियुषधारेत – वसिष्ठ – राशिनाथे विरूध्देऽपि सबलावंशकाधिपौ । तन्मैत्र्यैऽपि च कर्तव्यं दंपत्यो शुभमिच्छता ।।

वधूवरांच्या राशीचे स्वामी परस्परशत्रू असताहि (मृत्यूषडाष्टक व इतर) जर नवमांश अधिपति सबल असून मित्र असतील तर विवाह करावा.

पुयुष धारेत अत्रि – राशीशयोः सुहृदभावे मित्रत्ते वा प्रशनाथयो । गणादिदौष्ट्ये अपि पुत्रपौत्रप्रवर्धनः ।

राशीस्वामीची किंवा नवमांश स्वामीची मित्रता असेल तर गण अदि दोष असूनही विवाह केल्याने पुत्रपौत्रांची वृध्दि होते .

असो. ज्योतिष शास्त्र दृष्टीने विचार करण्यासारखे घटक म्हणजे वधू वराच्या १) लग्नराशी २) रवि ३) शुक्र-राशी (स्थान) ४) शुक्र ग्रहयोगांत ५) राप्तमेश ६) आयुर्दाय ७) संतति

शुक्र ग्रहयोगांत शुक्राचे नवपंचम, केंद्र, प्रतियोग, युतीयोग हे अति महत्त्वाचे ठरतात.

कुंडलीच्या सप्तमेशचे असेच मूल्यमापन करता येईल. कुंडलीपैकी एखादी कुंडली आयुर्दायाच्या दृष्टीने धोकादायक असेल तर तसे स्पष्ट सांगावे.

संततिच्या बाबतीतहि आपली मते स्पष्ट सांगावी, ह्या दृष्टीने दोन्ही कुंडलीतील गुरुच्या राशीचे मूल्यमापन करावे. गुरु वृषभ तुळ-मकर-कन्या राशीत असता कमीत कमी दुसऱ्याचा तरी चांगला असावा,

पूर्वीच्या काळातील कांही ज्योतिषी वराच्या कुंडलीत त्या त्या राशीत वधूच्या कुंडलीतील ग्रह मांडत असत. त्यामुळे काही गोष्टीची झटकन कल्पना येते. उदा. सिंह रवि व वधूचा सिंह शनि असेल तर ही गोष्ट चटकन लक्षात येते.

वधू वरांच्या कुंडल्याचा तौलनिक अभ्यास करून अनेकांनी कांही मार्गदर्शक नियम दिले आहेत. स्त्री जातक नावाचा एक ग्रंथ पूर्वी होता त्यात व नवाथे ह्यांनी काही मार्गदर्शन केले आहे.

१) दोघांची लग्ने एका राशीची असणे.

२) एकाची लग्न राशी तीच दुसऱ्याची चंद्रराशी

३) दोघांची चंद्र राशी एक असणे.

४) एकाची चंद्रराशी दुसऱ्याच्या चंद्राच्या सप्तमात

५) एकाची चंद्रराशी ती दुसऱ्याची लग्न राशी

६) एकाची चंद्रराशी शुक्र राशी ती दुसऱ्याची लग्न, सप्तम किंवा चंद्र राशी असणे

७) एकाचा लग्नेश दुसऱ्याच्या सप्तमात किंवा उलट असणे.

८) दोघांचे लग्नेश व सप्तमेश एका राशीत वा समसप्तकात

९) दोघांचा शुक्र एका राशीत व समोरासमोर

१०) एकाच्या लग्नातील ग्रह दुसऱ्याच्या सप्तमात

११) दोघांच्या लग्नात व सप्तमात एकच ग्रह

१२) दोघांचे ग्रह एकमेकांच्या शुभयोगात

१३) दोघांचे कुटुंबेशाचे वरीलप्रमाणे योग असणे

१४) एकाचे लग्न दुसऱ्याचा चंद्र

कुंडल्या अभ्यासतांना एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे मानवी प्रयत्नापेक्षा दैव बलवत्तर असते.  कुंडल्या चांगल्या असून सुद्धा विवाह ठरत नाहीत. एखाद्याला नको असलेल्या ग्रहयोगाच्या कुंडल्याच समोर येतात. ज्योतिषी हा सुध्दा दैवाचे एक माध्यम असते. ज्योतिषाच्या तसेच व्यक्तीच्या प्रयत्नांना मर्यादा असतात. हॉस्पीटल काढले, तर हॉस्पीटल मध्ये काही मृत्यू होणारच. कोणीही ज्योतिषी कोणाचे दैव फारसे बदलू शकत नाही. ह्यांची कल्पना आपण काही वेळा द्यावी लागतेच. आणि ही स्पष्ट कल्पना देऊनच हे कार्य करावे.

वधू-वरांचे विवाह सुखाचे होण्याच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात ‘हमखास असे नियम करता येणे अवघड आहे, असे मला वाटते. कारण मुळात प्रत्येक कुंडली वेगळी असते. आपण फक्त भावी काळाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करून मार्गदर्शन करू शकतो. दैव बदलू शकत नाही.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)