Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

ग्रह विचार : प्लूटो


विषय : प्लुटो ग्रह विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : सहज सुलभ ज्योतिष शास्त्र, स्काय कास्टर, शोन द लैंड

नमस्कार,

आज आपण प्लुटो ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत. प्लूटो हा अगदीच अलीकडे शोध लागलेला ग्रह असून सूर्यापासून ९ वा आणि सर्वांत दूरचा ग्रह आहे. प्लूटोचा शोध इ. स. १९३० मध्ये लागला.

प्लूटो व त्याचा सर्वांत मोठा उपग्रह खारॉन यांना अनेकदा जुळे ग्रह मानण्यात येते. प्लूटोला अजून निक्स व हायड्रा हे दोन छोटे उपग्रह आहेत, ज्यांचा शोध २००५ मध्ये लागला.

प्लूटोचा शोध १९३० साली लागला प्लूटो हे नाव प्रथम व्हेनेशिया बर्ने (नंतरची व्हेनेशिया फेअर) या ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड,इंग्लंड येथील शाळकरी मुलीने सुचविले. व्हेनेशियाला रोमन दंतकथा तसेच खगोलशास्त्राची आवड होती. प्लूटो हे, हेडेस या ग्रीक पाताळभूमीच्या देवाचे दुसरे नाव आहे. तिला हे नाव या संभाव्य काळ्या व थंड ग्रहासाठी योग्य वाटले. तिने तिचे आजोबा फाल्कोनर मॅडन (जे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बोडलेईयन वाचनालयाचे ग्रंथपाल होते) यांच्याशी बोलतांना सुचविले. मॅडन यांनी ते नाव प्राध्यापक हर्बर्ट हॉल टर्नर यांना सांगितले व त्यांनी ते आपल्या अमेरिकेतील सहकाऱ्यांना तारेने पाठवून दिले. या नवीन ग्रहाला २४ मार्च,  १९३० रोजी औपचारिकरित्या हे नाव देण्यात आले.

हिंदू पौराणिक कथांमध्ये यमराजाला मृत्यूचा देव म्हणून नियुक्त केले आहे. तो सूर्यदेव किंवा सूर्य भगवान यांचा ज्येष्ठ पुत्र आहे आणि त्याला नरकाचा राजा म्हणून ओळखले जाते. चित्रगुप्त त्याला सर्व पापांचा आणि नश्वरांच्या पुण्यांचा हिशेब ठेवण्यास मदत करतो आणि त्यानंतर यमराज त्यानुसार शिक्षा घोषित करतो. असे मानले जाते की, तो जिथे वास्तव्य करत होता, तो ग्रह प्लुटो असावा व हिंदू पुराणात प्लुटो हा यमराजाचा मूळ ग्रह यम ग्रह म्हणून ओळखला जातो.

प्लूटो एका राशीत साधारण २५-३० वर्षे असतो. प्लूटोला इंद्र किंवा गोरख असेही म्हणतात. प्लुटोला त्याच्या लहान आकारामुळे एक बटू ग्रह म्हणूनसुद्धा ओळखले जाते. प्लूटोला एक राशी भोगण्यास सुमारे २४ वर्षे लागतात. प्लूटो वक्री होण्यापूर्वी ८ दिवस स्तंभी असतो व १६० दिवस वक्री असतो. तसेच मार्गी होण्यापूर्वीदेखील पुन्हा ८ दिवस स्तंभी असतो. हर्षल, नेपच्यून, प्लूटो या ग्रहांना कोणत्याही नक्षत्राचे स्वामित्व नसल्याने, त्यांना महादशेत स्थान नाही. तसेच प्लुटोला राशी अधिपतीत्व नसल्याने व अजून खूप संशोधन गरजेचे असल्याने कारकत्वाच्या अनुरोधानेच भविष्यकथन करावे लागते.

ज्योतिषशास्त्रात, जर एखाद्या व्यक्तीवर प्लूटोचा प्रभाव असेल, तर तो फसवणूक, भ्रष्टाचार, पापी वर्तन आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे येणारे मोठे संकट, भूकंपीय शक्ती, विनाशकता, परिवर्तन आणि उत्क्रांती, तात्विक परिवर्तन, शक्ती, आणि पुनर्जन्म ची फळे ई. दर्शवतो.

प्लुटो स्थित स्थानानुसार स्थूल फळे अशी सांगता येतील-

१ ले स्थानी प्लुटो : केलेल्या कामाकडे वळून न बघणे, मनासारखे काम न झाल्यास तीव्र संताप जाणवणे, आत्म-विध्वंसक विचार येणे, अंतर्मनाची शक्ती असणे. एकाग्रताने ध्यान करत असताना स्फोटक दृश्ये पाहणे, कारणाबद्दल जास्त विचार न करणे ई.

२ रे स्थानी प्लुटो : पैशाच्या बाबतीत कटू अनुभव, जोखमीचे मानसिक निर्णय, आरोग्य सांभाळा, श्रीमंती, उच्चभ्रू पद्धतीने जगणे, आधुनिकतेची इच्छा, खूप पैसे येऊन अक्षम्य चुकीने पैसा जाणे याबद्दल बेफिकिरी, कुटुंबाशी असहकार्याने वागणे टाळा.

३ रे स्थानी प्लुटो : अस्थिर मन, इतरांचे शब्द आणि कृती, विचार समजून घेण्यास सक्षम, प्रत्येक क्षेत्रातील माहिती आणि संशोधन करून ज्ञान आत्मसात करण्याची आवड, बौद्धिक संबंधित कोडी आणि खेळ सोडवण्याकडे, हेरगिरीकडे कल, कोणतेही काम करताना काही अडथळे आल्यास चिडचिड

४ थे स्थानी प्लुटो : स्वत:ची अथवा एखाद्याची प्रतिमा किंवा चित्र अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणे, अंतर्ज्ञान व त्याचा वापर, घरगुती वातावरणात रमणे, स्वत:च्या जगावेगळ्या पेहराव व वागण्याने कुटुंबातील सदस्यांना त्रास, अंतर्ज्ञानी असूनही समाजाकडून नाकारल्याची भावना, आई-वडिलांचा किंवा सासरच्या लोकांची उपस्थिति आनंदाचे किंवा त्रासाचे कारण ठरते, स्वत:च्या जन्मस्थानी काम, अभ्यास, लहानपणापासूनच डोक्यावर जबाबदारी, स्वतःने निर्माण केलेले वातावरण आणि स्वतःचे क्षेत्रफळ आणि भरभराट असू शकते.

५ वे स्थानी प्लुटो : निरुपयोगी सवयी, कार्यक्षमता आणि स्वतःचे प्रदर्शन करण्याची सवय, मुलांची मानसिकता समजून न घेणे, मुलांना उठसुठ यंत्रवत वागवणे, सतत कामे सांगणे, स्वतःच्या डोक्यातील कल्पना, अभ्यास लादणे, लैंगिक सुखासाठी अनेक कृत्रिम पद्धती वापरणे, लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कामुक दृश्ये, कामुक आवाज, अश्लील चित्रपट, अश्लील गाणी ई. विविध पद्धतीचा आधार घेणे,अति कामुकतेने शरीर रोग प्रतिकार शक्ती ढासळणे.

६ वे स्थानी प्लुटो : कामाच्या ठिकाणी केले काम प्रदर्शित करण्याची क्षमता, हाताखालील कर्मचार्यांनी, कामगारांची संघटना, यांनी त्याचे सल्ल्याने वागावे ही इच्छा, दीर्घकाळ काम करण्याची, अडचणींशी लढण्याची क्षमता व मानसिकता, जे इतरांना जमणार नाही ते काम  करण्याची आवड.

७ वे स्थानी प्लुटो : जोडीदारास स्वतःच्या पद्धतीने वागण्यास भाग पाडणे, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची फरफट व तटस्थ पणा, प्रसंगी कमकुवतपणामुळे शक्तीच्या प्रदर्शनामुळे असंतोष, इतरांमध्ये चांगली किंवा वाईट शक्ती निर्माण करण्याची कला, समोरच्या व्यक्तीची प्रशंसा देखील करू शकतात किंवा मारायलाही तयार, त्यामुळे समाजात खूप प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध होतात.

८ वे स्थानी प्लुटो : व्यावसायिक मानसिकता, विश्लेषणाची आंतरिक अद्भुत शक्ती,  भूतकाळातील, वर्तमानाविषयी व भविष्य कालीन विधाने करण्यास सक्षम, धैर्यवान, ज्योतिष, हस्तरेषा, साधना, उपासना ई. द्वारे शक्ती जागृत करण्याची अद्भुत क्षमता, जीवनाचा अर्थ, मृत्यूनंतर काय होते, भूत आणि अदृश्य शक्तींकडे कल, पत्नी आणि जोडीदाराने भौतिक वस्तूंवर, कामाच्या ठिकाणी स्वयंचलित साधनांवर जास्त खर्च केल्यामुळे वादाचे प्रसंग, जमा केलेल्या पैशांची कमतरता आणि बँकांमधून बचत करण्यात अडचण, सुरक्षेबाबत खूप संवेदनशील, लोकांवर सकारात्मक प्रभाव, अत्यधिक लैंगिक इच्छा, लैंगिक संबंधात कृत्रिम साधनांचा वापर, स्वत:साठी ताकद आणि सामाजिकदृष्ट्या उच्च दाखवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर.

९ वे स्थानी प्लुटो : सत्ता आणि तंत्र, मंत्र यांच्याबद्दल कुतूहल जागृत ठेवण्याची कला, समाधी अवस्था, ब्रह्मांड विहार आदि सिद्धी ससू शकतात, स्वप्नावस्थेत विविध प्रकारची स्वप्ने दिसणे, धर्म आणि धार्मिक क्षेत्रात विशेष रुची. व्हिडीओ, ऑडिओ ई.क्द्च्वारे धार्मिक प्रसार, विचारमंथनात हरवणे, सत्य स्वीकारणे जड जाते, परामानसशास्त्रीय शक्तींची मदत घेऊन, समाधी इत्यादीद्वारे खूप तणाव होतो, स्वप्नात दृष्टांत, आकाश प्रवास, त्यांना विमान प्रवास आणि पॅराशूटिंगमध्ये नोकरी, भौतिक साधनांसह उंच ठिकाणाहून उडी मारणे आणि स्टंट करणे याची आवड.

१० वे स्थानी प्लुटो : असामाजिक घटकांचा कामावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम,  लोकांकडून होणारे राजकारणाचा त्रास, स्वतःच्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवावे. स्वत:च्या क्षमतेवर कमी विश्वास, समाजासाठी आपली शक्ती खर्च करून देखील समाजाकडून अवहेलना, जलद प्रगतीसाठी निवडलेला मार्गच अधोगतीचे कारण, जे काम करतो, ते दिसत नाही, बाकी जे काही दिसत आहे ते प्रत्यक्षात घडत नाही.

११ वे स्थानी प्लुटो : मित्रांच्या आधाराची गरज भासते, स्वतः मित्रांच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, पालकांना विसरतो आणि कुटुंब आणि मित्र जे काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याच लोकांवरचा विश्वास कमी करतो, मैत्रीची भावना बर्‍याच प्रमाणात असते. मित्र वापर करतात आणि अशाश्वत असतात. वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध, कामांत, सामाजिक किंवा कौटुंबिक त्याच्या भविष्यातील प्रगती आणि अधोगतीसाठी जबाबदार मानले जातात, धडा घेऊन, तो आपल्या कृतीतून समाजाचा किंवा समाजाचा प्रमुख बनून आपल्या आयुष्यात पुढे येऊ शकतो. अन्यायाविरुद्ध लढत राहावे लागते,

१२ वे स्थानी प्लुटो : प्रवृत्ती सत्य आणि सर्वोच्च शक्ती शोधण्याची, सामाजिक नियमांचे पालन, तांत्रिक कृतीची आवड, कल्पनेतून लोकांना संमोहित करणे, अचानक शारीरिक किंवा मानसिक वेदना, अहंकारी कृतीचा नंतर त्रास, दांभिकता

प्लुटोची राशी स्थित स्थूल फळे अशी सांगता येतील-

मेष राशीत प्लूटो : ध्येयर्पुर्तीसाठी, प्रतिष्ठेसाठी सातत्याने वाटचाल, मनासारखे काम न झाल्यास प्रचंड चिडचिड, आत्म-विध्वंसक विचार येणे, अंतर्मनाची शक्ती असणे

वृषभ राशीत प्लूटो : आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्न सातत्याने यश, जोखमीचे निर्णय अंगलट, अनारोग्य, श्रीमंती, उच्चभ्रू पद्धतीने जगणे, आधुनिकतेची इच्छा यात पैसा जाणे, कुटुंबाशी असहकार्य .

मिथुन राशीत प्लूटो: बुद्धिमत्ता, विचार आणि संवाद संबंधि भूमिकेत अचानक बदल. माहिती आणि ज्ञान आत्मसात करण्याची आवड, बौद्धिक संबंधित कोडी आणि खेळ सोडवण्याकडे कल, चंचल मन

कर्क राशीत प्लूटो : मनासारखे वागण्याने कुटुंबातील सदस्यांना त्रास, अंतर्ज्ञानी असूनही समाजाकडून नाकारल्याची भावना, आई आनंदाचे किंवा त्रासाचे कारण ठरते. भावना अचानक अनियंत्रित होऊ शकतात.

सिंह राशीत प्लूटो : प्रतिष्ठेच्या आणि व्यक्तिगत स्वीकृतीच्या विषयांमध्ये आग्रही भूमिका. कार्यक्षमता आणि स्वतःचे प्रदर्शन करण्याची सवय

कन्या राशीत प्लूटो: दीर्घकाळ काम करण्याची, अडचणींशी लढण्याची क्षमता व मानसिकता, जे इतरांना जमणार नाही ते काम  करण्याची आवड. त्यांना आपल्या आरोग्याची पथ्ये पाळणे आवश्यक.

तुळ राशीत प्लूटो : वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची फरफट, प्रसंगी स्वताच्या इच्छेप्रमाणे संतुष्टतेच्या आग्रहापायी आणि अन्याय वैवाहिक आयुष्यात स्फोटक परिस्थिती.

वृश्चिक राशीत प्लूटो : गंभीर भावना आणि आपल्या गूढ विषयांमध्ये फार रुची असू शकते.  गुप्त संबंधांकडे ओढा.

धनू राशीत प्लूटो : ईश्वरी सत्ता आणि तंत्र, मंत्र यांच्याबद्दल कुतूहल जागृत ठेवण्याची कला, समाधी अवस्था, ब्रह्मांड विहार आदि सिद्धी ससू शकतात, स्वप्नावस्थेत विविध प्रकारची स्वप्ने दिसणे, धर्म आणि धार्मिक क्षेत्रात विशेष रुची. व्हिडीओ, ऑडिओ ई. संध्नानी धार्मिक प्रसार, अनिष्ट संबंध आल्यास अतिरेकी.

मकर राशीत प्लूटो : असामाजिक घटकांचा कामावर आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम,  लोकांकडून होणारे राजकारणाचा त्रास, स्वतःच्या अनियंत्रित विचार आणि कृती.

कुंभ राशीत प्लूटो : नातेवाईक, कुटुंब आणि मित्र जे काही म्हणतील त्यावर विश्वास ठेवल्यामुळे नुकसान, मैत्रीची भावना बर्‍याच प्रमाणात असते. मित्र वापर करतात आणि अशाश्वत असतात. वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी मैत्री, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध.

मीन राशीत प्लूटो : सत्य आणि सर्वोच्च शक्ती शोधण्याची लालसा, सामाजिक नियमांचे पालन, तांत्रिक कृतीची आवड, कल्पनेतून लोकांना संमोहित करणे, अचानक शारीरिक किंवा मानसिक वेदना, अहंकारी कृतीचा नंतर त्रास, बुवाबाजी मुळे संकटात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

चित्रा नक्षत्र विचार


विषय : चित्रा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण चित्रा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. चित्रा हे नक्षत्र चक्रातील १४ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नक्षत्राचा आकार मोत्यासारखा असून त्याचा एक ठळक व मोठा तारा आहे तारा हिरव्या रंगाचा असून अतिशय तेजस्वी आहे. आग्नेयेकडे उगवताना हे नक्षत्र  दिव्यासारखे चमकत असते. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते व हे नक्षत्र अतिशय ठळक, मोठे असल्याने आकाशात सहज ओळखता येते. या नक्षत्राला इंग्रजीत ‘स्पायका’ असे म्हणतात.

या नक्षत्राचे पहिले २  चरण कन्या राशीत व शेवटचे २ चरण तूळ राशीत येत असल्याने हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा स्वामी मंगळ, दैवत त्वष्ठा हा देवांचा कारागीर असून राशी स्वामी बुध व शुक्र असून हे राक्षसगणी आहे म्हणून या नक्षत्रात मंगळाचा हट्टीपणा, कर्तृत्व, बुधाची अप्रतिम बुद्धिमत्ता व शुक्राचे सौंदर्य व कलाकौशल्य व त्वष्टाची उत्तम कामगिरी यांचा अपूर्व संगम दिसून येतो. तसेच ते तिर्यङ्मुख, मध्यलोचनी व मित्रगणी आहे.

चित्रा या शब्दाचा अर्थच चित्रासारखे एखादे चित्र जसे, बराच काळ सुंदर व जशास तसे दिसते तसे चित्राने म्हणजे चिरकाल तारुण्य देणारे, नेहमी टवटवीत दिसणारे. चित्रा नक्षत्रावरच्या आई व मुली सारख्याच दिसतात. वडील व मुलगा बरोबर फिरायला निघाले की लोक त्यांना ‘भाऊ-भाऊ’ किंवा वडिलांनाच मुलगा समजतात.

चित्रा नक्षत्र राक्षसगणी असून शुभ गुणधर्मानी भरलेले आहे. तसेच लक्ष्मीदायक आहे. चित्रा  नक्षत्रावर जन्मलेले जातक उग्र बुद्धीचे, सुंदर, विद्वान, कलाकौशल्याची व छानछोकीची आवड असणारे,  बुद्धिमान, चळवळ्या स्वभावाचे, धडपडे, शूर, धाडसी, कर्तृत्ववान पण थोडे रागीट, तामसी व हट्टी असतात. मात्र त्यांच्यात क्रूरपणा किंवा खुनशीपणा दिसून येत नाही. तसेच त्या सदाचारी, ईश्वरभक्त, परोपकारी, कुटुंबवत्सल, व्यवहारकुशल, सेवावृत्तीच्या, संसारी आणि तडफदार असतात. हे जातक  स्वकर्तृत्वाने पुढे येतात.

चित्राच्या पावसात मोती तयार होतात. म्हणून ते मोत्यांना व खड्यांना चांगले.

चित्रा पुरुष जातकांना हे नक्षत्र शरीरप्रकृती, कलाबुद्धी व सौंदर्यालाही अनुकूल आहे. पण अधिकारयोगासाठी साधारण आहे. चित्रा पुरुष जातकांचा बांधा उंच, सडपातळ, सडसडीत, हाडापेराने मजबूत, काटक व प्रमाणशीर असतो. हे जातक श्रम व कष्ट करणारे व सौंदर्यवान वस्तू ख्यालीखुशाली, चैन, कलाकौशल्य याचीसुद्धा आवड असणारे असतात व धन व सुख यात या रमणारे असतात.

चित्रा स्त्री जातकांना मात्र हे नक्षत्र फार चांगले आहे. स्त्रियांना रूप, सौदर्य कलाकौशल्य, बुद्धी, धन अशा सर्वच दृष्टीने उत्तम आहे. या सर्वच गोष्टीचा मिलाफ चित्रा नक्षत्रात दिसून येतो. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया उंच पण सडपातळ बांध्याच्या प्रमाणशीर व रेखीव अवयव असणान्या, कंबरेच्या खालील भाग जरा उंच, कंबर बारीक, उभार, चेहरा, लावण्य असणारा, चमकदार, आकर्षक, मोहक, नाक सरळ व सुरेख काळेभोर डोळे, कमानशीर भुवया, व ओठ धनुष्याकृती, चेहरा अगदी मुसमुसणारा असतो. या नक्षत्रावरच्या स्त्रिया चिरकाल तरुण दिसणाऱ्या असतात. चित्रा स्त्री जातक हसताना असो, रागावलेली असो, उभी असो, बसलेली असो, लाजत असो किवा काम करत असो, तिच्या सौंदर्यात गोडवाच असतो. या नक्षत्रात फणकारा, तृप्तपणा, अवखळपणा, स्वप्नाळूपणा, लाजणे, ठसठशीतपणा, मादकपणा व तेजस्वीपणा या सर्वांचे अनोखे मिश्रण आढळून येते. या नक्षत्रावरच्या स्त्रियांना कधी शेपटे, कधी अंबाडा, कधी मोकळे केस, कधी गजरा तर कधी नुसतीच फुले यांची आवड असते. त्या फाजील फॅशनेबल नसल्या तरी थोडया नटून सजणाऱ्या असतात. दागिन्यांचा हव्यास नसला तरी मोत्याच्या माळा व खड्याच्या अंगठ्या प्रिय असतात. भरदार शालू किवा गडद अथवा मॅचिंग कपड्यापेक्षा त्यांना प्रिंटेड वायल्स अथवा पातळे जास्त आवडतात. विशेषत: निरनिराळ्या डिझाईनची व सताठ कडक राहणाऱ्या साड्यांची फार आवड असते. नेसणेही व्यवस्थित व आकर्षक असते.  सौंदर्यदृष्टी, चिकित्सक वृत्ती व निवड करण्याची वृत्ती अप्रतिम असते. त्या रसिक, हौशी, कलाप्रिय, आनंदी, सौंदर्यदृष्टीची आवड असणाऱ्या व विनयशील असल्या तरी रागीट, तामसी व थोड्या हट्टी असतात. त्या पटकन रागावतात व शांतही होतात. तसेच वेळप्रसंगी त्या धीट व धाडसीही बनतात. या स्त्रियांचे सौंदर्य हेच बऱ्याच वेळा त्यांच्या संकटाला कारण ठरू शकते. चित्रा नक्षत्रांच्या स्त्रियांचा आवडता छंद म्हणजे शॉपिंग होय. दोन-चार मैत्रिणींना घेऊन तीन-तीन, चार-चार तास शॉपिंग करणं यांना फार आवडते. प्रत्येक गोष्ट त्या अतिशय चिकित्सेने पहात असतात. एका साडीसाठी त्या संबंध दिवस व १५-२० दुकाने पालथी घालतील. तसेच त्या चित्रकला, नृत्य, रांगोळी. भरतकाम, शिल्पकाम, खोदकाम, कोरीव काम, कशिदा विणणे यातही पारंगत असतात. चंद्र व शुक्र या नक्षत्रात असता हे गुणधर्म विशेष आढळून येतात.

चित्रा नक्षत्राखाली येणारा वर्ग बराचसा सुखवस्तू व श्रीमंत असतो. विशेष करून कारागीरवर्ग जास्त आहे. सोनार, हिरेघासू, तांबा, पितळ अथवा इतर भांड्यांचे कारागीरी संबंधित, शिंपी, चित्रकार, पेंटर्स, शिल्पकार, सौंदर्यप्रसाधन तयार करणारे, सोने, चांदी, हिरे, माणके, रेशमी व उंची वस्त्रे यांचे व्यापारी, आर्किटेक्ट, इजिनिअर्स, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, डेकोरेटर्स, अत्तरे, फुले यांचे व्यापारी, पान्याचे व्यापारी, सुंदर व शोभेच्या वस्तू तयार करणारे, नाटक, सिनेमा यांना लागणारे पडदे व इतर वेशभूषा यांचे व्यापारी, चैनीच्या वस्तूंचे व्यापारी, सिनेमात करणारा वर्ग, स्त्रियांचे कपडे शिवणारे शिपी, कॉन्ट्रॅक्ट ई.

याखाली येतो.

चित्रा नक्षत्रात रवी शरीरप्रकृतीच्या दृष्टीने साधारण असतो. शरीर काटक व मजबूत असते. शारीरिक उर्जा उत्तम. बुद्धीने साधारण, अधिकार योगाला बरा.

चित्रा नक्षत्रात चंद्र नक्षत्रात अनुकूल असतो. बांधा गोंडस व प्रमाणशीर, चेहरा सुंदर, मोहक व मोठे डोळे बर्यापैकी बुद्धी, धीट, विनोदी व हुशार असतो. रूप, कला व धन प्राप्तीसाठी अनुकूल.

चित्रा नक्षत्रात मंगळ हे नक्षत्र स्वतःचेच असल्याने चांगला, बांधा उंच, सडपातळ, सडसडीत व काटक असतो. चेहरा सुंदर पण जरासा उग्र असतो. मंगळ आर्किटेक्ट, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, इंजिनिअर्स, यांत्रिक कलाकौशल्य यांना चांगला, पण रागीट, चैनी व कामासक्त प्रवृत्तीचा असू शकतो. बिघडला असता कामी, व्यसनी, व्यभिचारी, गर्विष्ठ व अस्थिर बुद्धीचा होतो.

चित्रा नक्षत्रात बुध फारसा अनुकूल नाही. बांधा मध्यम, चेहरा सुंदर, बुद्धी मध्यम असते. विनोदी, खुषमस्कऱ्या, आळशी व थोडा दुर्गुणी असतो. गणित व भूमितीला बरा.

चित्रा नक्षत्रात गुरु रूप व धन चांगले देतो. शरीर साधारण भरलेले, सशक्त, बुद्धी मध्यम, पण श्रीमंत व्यापारी, सोनार यांना अनुकूल असतो.

चित्रा नक्षत्रात शुक्र अनुकूल ठरतो. रूप, कला, धन या सर्वच दृष्टीने चांगला असतो. शरीर प्रमाणशीर, सुडौल, रेखीव अवयव, सुंदर आकर्षक व मोहक चेहरा असतो. तो टेक्स्टाईल इंजिनिअर, आर्किटेक्ट, गायन, वादन, नृत्य, कलाकौशल्याची कामे व उंची वस्त्रे, हिरे, माणके, सोने व सौंदर्यप्रसाधने यांच्या व्यापाराला चांगला, धन चांगले मिळते. वाहनसौख्य मिळते.

चित्रा नक्षत्रात शनि प्रतिकूल ठरतो. शरीरप्रकृती बरी, बुद्धी व रूपाने मध्यम, मात्र धनाच्या दृष्टीने उत्तम. कापड, धान्य, कापूस कारखाने, कॉन्ट्रॅक्टर व सर्व वस्तूंच्या घाऊक व्यापाराला चांगला, मात्र जरा कंजूष, लोभी व संशयी असतो.

चित्रा नक्षत्रात राहु अनुकूल ठरतो. बांधा उंच प्रमाणशीर, रेखीव ऐटबाज व डोळ्यात एक प्रकारचा मोहकपणा किंवा जादू आढळते. राहू हा आर्किटेक्ट, फोटोग्राफी, पेंटिंग, ड्रॉइंग, हस्तकला कौशल्य, जादूची विद्या यांना चांगला. मात्र हे जातक चैनी, विलासी, रंगेल, व्यसनी असू शकतात, धन मात्र चांगले मिळते.

चित्रा नक्षत्रात केतू फारसा चांगला नाही. शरीरप्रकृती बरी असली तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही विरक्त, अरसिक, आळशी व राहणाऱ्या असतात. मात्र शस्त्रक्रियेला चांगला.

चित्रा नक्षत्रात हर्षल बुद्धीला व शरीरप्रकृतीसाठी बरा असला, तरी बांधा जरा अप्रमाणबद्ध असतो. धन असूनही जातक अरसिक, आळशी व गबाळा राहणारा असू शकतो. शस्त्रक्रियेला चांगला असतो.  कल्पनाशक्ती, संशोधनवृत्ती व यांत्रिक, कलांना ठीक. इंजिनिअरिंग, मोठमोठे व्यापारी, कारखानदार यांना चांगला. पण अतिफॅशन, विलास, चैन व ख्याली- खुशालीची आवड असते. रंगेलपणा जास्त असतो. चित्रा नक्षत्रात नेपच्यून, शरीरप्रकृती व रूप यांना बरा. बांधा प्रमाणशीर, गोंडस व चेहरा सुंदर, तेजस्वी, मोहक व प्रसन्न दिसतो. तो तंतुवाद्य, संगीत, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, अंतःस्फूर्ती यांना अनुकूल असतो, मात्र विलासीपणा दिसून येतो. या जातकांना गूढविद्येची आवड असू शकते.

चित्रा नक्षत्रावर होणारे आजार मोठे नसले तरी दाहक असू शकतात. अतिउष्णतेने डोके दुखणे, डोळे जळजळणे, ताप, कंबर दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, शस्त्रक्रियेच्या जखमा, स्त्रियांना मासिक पाळीचा त्रास होणे किंवा लघवीचे विकार, मूतखडा, किडनीचे विकार, व्यसनामुळे होणारे रोग, कावीळ, डोळयाचे विकार हे प्रमुख होत. मंगळ अशुभ योगात असता ऑपरेशनने अपघात, चिघळणार्या जखमा संभवतात.

चित्रा नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, ठळक व उभट व रेखीव असते. वळण छान असते. लिहिताना सरळ व वरवर लिहितात. नक्षत्रावर ६ व ९ या अंकाचे वर्चस्व जास्त असते. ६ अंक भाग्यांक वाटतो. शुक्राचा हिरा किंवा बुधाचा पाचू लाभदायक असतो. मध्यलोचनी नक्षत्र असल्याने वस्तू हरवल्यास ती बऱ्याच प्रयत्नांनी वस्तू पश्चिमेला शोधाशोध केल्यावरच मिळते.

चित्रा हे राक्षसगणी नक्षत्र असले तरी मुहूर्त शास्त्रात यांचे महत्त्व जास्त आहे. या नक्षत्रावर नवीन अलंकार व वस्त्र घेणे, धारण करणे, नृत्य, कला, संगीत शिकण्यास प्रारंभ करणे, विद्याभ्यासास आरंभ करणे, औषधे घेणे, औषधी झाडे लावणे, विहिरी खणणे, शस्त्रक्रिया करणे, जनावरे घेणे व देणे, गलबत पाण्यात लोटणे, जमीन नांगरणे तसेच जावळ काढणे, बारसे, मुलाचे नाक, कान, टोचणे, मौंजी, वधू प्रवेश, घर बांधणे, फळे व फुले यांचे वृक्ष लावणे यांना चांगले. नारदमते हे नक्षत्र विवाहालाही अनुकूल आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

!! श्री गणपती उवाच !!


विषय : श्री गणपती उवाच

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वलिखित व आजपर्यंतच्या वाचन, चिंतनाचा परिपाक

जय गणपती गुणपती गज वदना, आज तुझी पूजा केली गौरी नंदना…

गणपतीचे नुसते स्मरण होताच एक अनामिक ऊर्जा अंगात संचारते. कारण कामास सुरुवात करायची तर त्यालाच म्हणतात, चला कामाचा श्री गणेशा करू या. कोणतेही हिंदू घर पहा, दरवाज्यावर तुम्हाला गणपतीचे रूप दिसणारच. व्यावसायिक त्यांच्या चोपडीवर श्री गणेशाय नम: लिहूनच सुरुवात करणार.

कारण तो विघ्नहर्ता बाप्पा जो भक्तांना येणाऱ्या अडचणींचे, विघ्नांचे हरण करतो, मग ते मानव असो वा देव, सगळ्यांच्या आर्ततेला साद देणारा गजानन. ज्या लोकांवर गणेशाची कृपा राहते, त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे काम ते हाती घेतात ते निर्विघ्न पार पडते. श्रीगणेशाची विशेष कृपा असल्याने याना बुद्धी आणि कौशल्य उपजतच लाभते.

गणेश म्हणजे गणांचा ईश किंवा गणपती म्हणजे गणांचा पती. गण म्हणजे समूह, गण म्हणजे क्रमांक, गण म्हणजे शब्द ब्रम्ह. गणना, गणित हे शब्द याचीच व्युत्पत्ती. गणिताचा कारक ग्रह बुध, तसाच बुद्धीनायक गणपती. गणपती म्हणजे बुद्धी, वाणी, संपर्क यांचा नायक. त्यामुळे जे लोक बुद्धिनिष्ठ नोकरी व्यवसाय करतात. त्यांनी मनापासून गणपतीची उपासना करावी.

उदा. सी ए, सी एस, माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, शिक्षक, प्रोफेसर, कर सल्लागार, लेखक, पत्रकार, कॅशियर, संपादक, ज्योतिषी, अकाऊंटंट, कॉपी रायटर, दुभाषी, प्रिंटींग, गणिती,  जनसंपर्क अधिकारी, ग्रंथ, टेलीफोन, संगणक, रेडीओ, टी.व्ही., जाहीराती, श्रवणयंत्रे ई.

गुणपती म्हणजे गुणांचा पती. यात अनेक विद्या, तांत्रिक, वेगवेगळ्या कला, संगीत, नृत्य, कविता ई. येतात. कारण हा गौरी नंदन म्हणजे गौरीचा पुत्र आहे. आदिशक्ती ऊर्जा, प्रेम, सौंदर्य, मातृत्वाची देवी आहे. जी निर्मिती आणि संहार यांचे शक्ती रूप आहे. तिचीच लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ही त्रिगुणात्मक रूपे आहेत. मग तिच्या मातृ भक्त पुत्रात हे सर्व गुण असणे साहजिक आहे. त्यामुळे कलेच्या प्रांतातील लोकांनी सुद्धा गणेशाची उपासना केली तर श्री कृपेने सर्व समृद्धी येईल, कारण मंगल (मंगळ) मूर्ती तुम्हाला त्यासाठी योग्य ते कौशल्य व धाडस सुद्धा प्रदान करेल.

केतू हा मोक्षकारक ग्रह गणपतीच्या अधिकारात येतो. त्यामुळे गणपतीच्या कृपेने वैदिक  उपासक अहंकार, काळ, परिस्थिती याचे पलीकडे जाऊन अध्यात्मिकते द्वारे आत्मज्ञान प्राप्त करू शकतात. व त्याचेसाठी मोक्षाचे दरवाजे उघडू शकतात.

गणेश हा एकमेव देव आहे, जो ज्योतिषशास्त्रातील बुध आणि केतू या दोन भिन्न गुणाधर्मी ग्रहांचा अधिपती आहे.

गणेश पुराणानुसार रिद्धी आणि सिद्धी या ब्रह्मदेवाच्या कन्या, तर शिवपुराणानुसार त्या विश्वरूप प्रजापतीच्या कन्या. शंकर आणि पार्वती गणेशाचा विवाह योजणार आहेत, असे कळल्यावर विश्वरूप प्रजापतीने आपल्या दोन सुंदर कन्या गणेशास देण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानुसार त्यांचे गणपतीशी लग्न झाले. सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ असे दोन पुत्र गणपतीस झाले.

गणपतीचे रूप सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी सांगत असते.

गणपतीचे हत्तीचे डोके आपल्याला बुद्धीनायक असूनही हत्तीसारखे अफाट सामर्थ्य दर्शवते.

सुपासारखे मोठे कान आपल्याला हे तर सुचवत नसतील, की जगात चौफेर ध्यान असू द्यात. कान इतके मोठे करा की, सूक्ष्मातील सूक्ष्म बदल देखील कानांनी टिपला पाहिजे आणि सूप जसे खडे बाजूला करते, तसे सकारात्मक गोष्टी आत्मसात करून, नकारात्मक गोष्टी खड्या सारख्या बाजूला सारा.

गणपतीचे सुंदर डोळे आपल्याला सतत सांगतात की, बुद्धी तीक्ष्ण करून सर्व कला, विद्या, साहस, सौंदर्य संपादन केले की, त्याचे विलक्षण प्रभावाने, तूमच्या तेजस्वीपणाची झांक पहिली डोळ्यात चमकते.

गणपतीची वक्र सोंड आपल्याला योगी होण्यास सांगते. आपल्या शरीरात वेटोळ्या सर्पाकृती आकारात वसलेली कुंडलिनी शक्ती जागृत करून केतुरुपी मोक्षाची वाट बुध रुपी बुद्धीने स्विकारा आणि आयुष्य सार्थकी लावा. मी येणाऱ्या सर्व विघ्नांचे हरण करेन.   

लंबोदर मला अवघ्या विश्वाच्या पसार्याची व खोल बेंबी या विश्वातील अनेक अगम्य, गूढ गोष्टींची, कृष्ण विवराची आठवण करून देते.

त्याचे चार हात मला चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे कर्तव्य बुद्धीने जगायला प्रेरणा देतात.

शिव आणि शक्तीचा पुत्र गणेश हा एक अद्वैत रूपच आह्रे. म्हणूनच कदाचित मला ओम बघितला की त्यात गणपतीचे रूप भासते.

अशा या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव सुरु होत आहे. त्यानेच कदाचित माझ्यासारख्या अल्पबुद्धी ज्योतिष अभ्यासकाला लिहिण्याची स्फूर्ती दिली आणि आजपर्यंतच्या वाचनाचा परिपाक म्हणून हे लिखाण एका टप्प्यात झरझर उतरले. तरी जर अनावधानाने काही चुकीचे लिहिले असल्यास क्षमस्व.

!!! गणपती बाप्पा ….. मोरया !!!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

हस्त नक्षत्र विचार


विषय : हस्त नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण हस्त नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. हस्त हे नक्षत्र चक्रातील १३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा आकार नावाप्रमाणेच हाताच्या उघडलेल्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे ४ ही चरण कन्या राशीत येत असल्यामुळे ते चतुष्पादी नक्षत्र आहे. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र, दैवत सूर्य व राशी स्वामी बुध आहे. हे नक्षत्र देवगणी आहे. या नक्षत्रात चंद्राचे वात्सल्य, प्रेम, रवीची उच्च अभिरुची व सात्विक आचारविचार, बुधाचा व्यावहारिकपणा व शहाणपण यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र या चार ग्रहांची सत्ता आहे. तसेच नक्षत्र तीर्यङ्मुख, लघु व मंदलोचनी आहे. हस्त नक्षत्रात एकूण ५ तारे असून ते हाताच्या बोटासारखे दिसतात. तारे पांढऱ्या रंगाचे, स्वच्छ व मध्यम प्रतीच्या तेजाचे आहेत. तारे सुरेख, मोहक व पावसाच्या टपोऱ्या थेंबासारखे दिसतात. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. आकाशात हे नक्षत्र सहज ओळखता येते. हस्त नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘डेल्टाकाव्हीं’ असे आहे. कीर्व्हास याचा अर्थ कावळा असा आहे. आपण ज्याला कावळा असे म्हणतो, तो सूर्यदेव अपोलो याचा लाडका होता. परंतु एक त्याने गैरवर्तणूक केली म्हणून त्याला पाणी पिता येणार नाही असा त्याने शाप दिला. तसेच जलप्रलयानंतर नोहाने आपल्या नौकेमध्ये आणलेला कावळा तोच अशा आशयाच्या पाश्चात्य साहित्यात कथा आहेत. भारतीय पुराणात मात्र हे नक्षत्र प्रजापतीच्या उजव्या हाताचा पंजा असेही समजतात.

हस्त नक्षत्र देवगणी असून ते शुभ गुणधर्म युक्त, सत्त्वगुणी आणि सुशील आहे. तसेच ते लक्ष्मीदायक व देवनक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक सुंदर, कलाकुशल, विद्वान, बुद्धिवान, व्यवहारकुशल, आनंदी, सदाचारी, ईश्वरभक्त, समाधानी, संतोषीवृत्तीचे, परोपकारी, कुटुंबवत्सल, सत्यभाषणी, नम्र, विनयशील, सेवावृत्तीचे, आज्ञापालन करणारे, निर्व्यसनी आढळून येतात. हस्त नक्षत्रात शुभग्रह असल्यास त्यांना सुपारीचेही व्यसन नसते. शिवाय हे जातक रसिक, हौशी, कलाप्रिय व सौंदर्याचे भोक्ते असतात. मात्र हे जातक थोरामोठ्याच्या सहकार्यानेच या पुढे येतात.

हस्ताच्या पावसामध्ये जणू काही वसुंधरेने हिरवा शालूच नेसलेला आहे अशी सर्व जमीन हिरवीगार दिसते.

हस्त पुरुष जातकांना हे नक्षत्र सौंदर्य, बुद्धी व शरीरप्रकृतीला ठीक आहे. हस्त नक्षत्रावर जन्मणाऱ्या पुरुष जाताकांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व जरा नाजूक असतो. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारशक्ती मध्यम असते. हे जातक बुद्धिवान व कलाकार असतात, पण अधिकारयोगाच्या दृष्टीने हे मध्यम नक्षत्र आहे. पुरुषांना लागणारे शौर्य, पराक्रम, धाडस, शूरपणा किंवा अधिकारलालसा हे गुण त्यांच्यात साधारण असतात.

हस्त नक्षत्राच्या स्त्री जातकांना हे नक्षत्र शरीर, सौंदर्य, बुद्धी, कला व गुण यांना फार अनुकूल असते. हस्त नक्षत्रावरच्या स्त्रिया या जणू बालकुमारीकाच असतात. प्रौढ वयातही या मुलींसारख्या तरुण दिसतात. त्यांचा बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर, नीटनेटका व व्यवस्थित असतो. हातपाय, मांड्या, मनगटे, दंड यांचे आकार मध्यम गोलाकार असतात. चेहरा गोल पण फार फुगीर नसून शरीराला शोभेल एवढाच गोल असतो. डोक्यात बरोबर मध्ये भांग पाडायची सवय असते. अवयव फार मांसल किंवा गुबगुबीत नसून प्रमाणशीर व रेखीव असतात. चालणे जरा गजगतीसारखे असते. चेहरा सुंदर, आकर्षक व मोहक असतो व सात्विक तेज असते. त्यांचे दात फार सुंदर असतात. दात दुधासारखे पांढरे स्वच्छ असून पुढील दोन तीन दात जरा मोठे, पांढरे स्वच्छ व सरळ रेषेत असतात. त्या हसताना हे पुढील दात ठळकपणे दिसतात. त्यांचे हसणे साधे, स्मितहास्यही अत्यंत मोहक असते. हस्त स्त्री जातकांचे सौंदर्य त्यांच्या लाजण्यामध्ये आहे. शुभ स्थिती मध्ये असता त्यांना भडक रंगाचे कपडे किंवा फाजील फॅशन प्रिय नसून पांढरा, पिवळा, हिरवा, निळा अशा गढूळ रंगाची व मॅचिंग कलर्स प्रिय असतात. फुलांचे बरेच वेड असते. दागिन्यांचा फारसा हव्यास नसतो. मात्र स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा फार असतो. हस्त नक्षत्र स्त्रिया हस्तकौशल्यात विशेषतः भरतकाम, रांगोळी, कशिदा, विणणे, स्वयंपाक, पेंटिंग, चित्रकला यात फार हुशार, संसाराची फार आवड असणाऱ्या आढळतात. संसाराला अशी पत्नी मिळणे म्हणजे महाभाग्यच.

हस्त नक्षत्राखाली येणारा वर्ग बहुधा समाजातील घरंदाज व प्रतिष्ठित असा मध्यमवर्गच होय. या नक्षत्राखाली डॉक्टर्स, वकील, अॅडव्होकेटस्, शिक्षक, प्रोफेसर्स, बँका, पतपेढ्या किंवा निरनिराळ्या खाजगी कंपन्यात हिशेबी खात्यात काम करणारा वर्ग, आर्किटेक्ट, चित्रकार, कलाकार, लेखक, कवी, निरनिराळ्या वस्तूंचे किरकोळ व्यापार करणारे व्यापारी, पुस्तक विक्रेते, फिरते एजंट, जाहिरातदार, छपाई खात्यात काम करणारा वर्ग, लहान लहान शेतकरी, बातमीदार, वर्तमात्रपत्रात काम करणारे संपादक, काही वेळा नाटकात कामे करणारा वर्ग, शिंपी, कलाकार या व्यक्ती प्रामुख्याने होत. नर्स व गृहिणीही या खाली येतात.

हस्त नक्षत्री रवी असता शरीर प्रकृतीच्या दृष्टीने मध्यम असतो. हे जातक मध्यम बांध्याचे व काटक असतात,तसेच शांत, नम्र, ईश्वरीभक्ती करणारे, देव ब्राम्हणांचे पूजक, मध्यम विद्वान, गुणी असतात. विद्या व धनाच्या दृष्टीने रवि मध्यम असतो.

हस्त नक्षत्री चंद्र बुद्धी, विद्या, सौंदर्य व गुण याच दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम, उंच भरलेला, जरा पुष्ट पण प्रमाणशीर असतो. चेहरा सुंदर व मोहक असतो. हे जातक बुद्धीमान व कलाकार असतात. चंद्र असता बुद्धी व कला, विद्या व सौंदर्य यांचा सुरेख संगम दिसून येतो. स्वभावही प्रसन्न, शांत, हौशी, रसिक व आनंदी असतो. धनाच्या दृष्टीने चंद्र मध्यम असतो.

हस्त नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती सडसडीत असते. बांधा उंच, सडपातळ व काटक असतो. चेहरा जरा उग्र असतो. स्वभावही थोडा करारी, स्पष्टवक्ता व मानी असतो. मात्र तरीही हे जातक रसिक, हौशी व लोकप्रिय असतात. हस्त नक्षत्री मंगळ आर्किटेक्ट, ड्रॉइंग, डॉक्टर या विद्येला अनुकूल व  स्वतंत्र व्यवसाय करण्यास चांगला.

हस्त नक्षत्री बुध हा शरीरसंपत्ती, बुद्धी व धनाच्या दृष्टीने चांगला. बांधा मध्यमव थोडा आडवा, अवयव गोलाकार व फुगीर असतात. बुद्धी कुशाग्र असून लेखन, वाचनाची आवड असते. बुध कोणत्याही वस्तूंच्या किरकोळ व्यापाराला चांगला. तसेच तो जाहिरातदार, बातमीदार, फिरते एजंट, विक्रेते यांना चांगला.

हस्त नक्षत्री गुरु सौंदर्य व बुद्धीच्या दृष्टीने चांगला. नाजूक पण उंच बांधा, चेहरा सुंदर, आकर्षक व सात्विक तेजाचा असतो. बुद्धी कुशाग्र असते. हे जातक अतिशय बुद्धीवान व विद्वान असतात. गुरु अर्थी, वाणिज्य, कायदा अशा विषयांना चांगला असतो. हस्त जातक उत्तम शिक्षक किंवा प्रोफेसर्स होऊ शकतात. स्वभावाने हे जातक उत्तम समाजसेवक असतात. स्वभाव नम्र, निगवीं, ममताळू व उदार असतो.

हस्त नक्षत्री शुक्र हा सौंदर्य व कलेच्या दृष्टीने अनुकूल असतो. बांधा मध्यम उंच, प्रमाणशीर व रेखीव अवयव असणारा असतो. चेहरा मोहक, आकर्षक व जरा मादक असतो. शुक्र बरीच वर्षे यौवनावस्था देतो. शुक्र संगीत, नृत्य, हस्तकला, कौशल्य, पेंटिंग, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, नाटक-सिनेमा कलाकार यांना चांगला असतो. मात्र पैसा व दर्जाच्या दृष्टीने मध्यमच असतो.

हस्त नक्षत्री शनी असता शरीरप्रकृती उत्तम असते. बांधा पुष्ट, भरलेला, गोलाकार अवयव पण जरा शिथिलपणा असतो. चेहरा सावळा, गंभीर पण नाकी डोळी बरा. शनि बुद्धीला चांगला. स्थापत्यशास्त्र व कायदेशास्त्र, वाणिज्यशास्त्र यांना फार चांगला. पण त्यापेक्षा व्यापाराला फार उत्तम. कापूस, तेलबिया, धान्ये, किराणा माल, कागद अशा वस्तूंचा व्यापार चांगला चालेल. धन चांगले मिळेल.

हस्त नक्षत्री राहू रूप, कला बुद्धीला चांगला. बांधा सडसडीत, उंची बांधेसूद, आकर्षक, रेखीव असतो. चेहरा मोहक व डोळ्यांत एक प्रकारची जादू असते. बुद्धी प्रकर्ष व उत्तम स्मरणशक्ती असते. पेंटिंग, डिझाईन, ड्रॉईंग, आर्किटेक्ट, संशोधन व यांत्रिक कामासंबंधीत कला, फोटोग्राफी, सिनेमा-नाटकात काम करणे यांना चांगला.

हस्त नक्षत्री केतू हा शरीरप्रकृतीला साधारण, पण बुद्धीच्या दृष्टीने मध्यम. कला वगैरेत यश नाही. थोडा धार्मिक व आध्यात्मिक प्रकृतीकडे कल.

हस्त नक्षत्री हर्षल शरीरप्रकृतीला बरा व बुद्धीलाही चांगला. उंच व रेखीव बांधा. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असते. तसेच हे जातक बुद्धिमान, हुशार, संशोधक वृत्तीचे व विद्वान असतात. स्वभाव फारसा लहरी किंवा विक्षिप्तपणा नसतो.

हस्त नक्षत्री नेपच्यून असता शरीरप्रकृती साधारण. चेहरा सुंदर, मोहक, प्रसन्न आनंदी व संतोषी असतो. ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, अंतःस्फूर्ती, काव्य, गायन कल्पनाशक्ती चांगली असते. वादन यांना चांगला.

हस्त नक्षत्री होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे आढळतात. थंडी, कफ, डोके दुखणे, अर्धशिशी, ओकाऱ्या, पोटात मळमळणे, अपचन, आतड्याचे विकार, पचनशक्ती बिघडणे, चक्कर, भोवळ येणे, कंबर दुखणे, मानसिक विकार, नैराश्य, उतारवयात रक्तदाबाचे विकार, शौचाची तक्रार असणे. अतिश्रमाने ग्लानी येणे हे आजार दिसतात. या जातकांना उगाचच औषधे व रेचके घेण्याची फार सवय असते.

या नक्षत्रावर जन्मणाऱ्यांचे हस्ताक्षर मोठे, मध्यम गोल, वळणदार व जास्त रुंद असते. ओळी सरळ व व्यवस्थित असतात. लिहिताना सहजगत्या लिहितात. नक्षत्रावर २ किंवा ५ अंकाचा प्रभाव आढळतो. २ अंक जास्त भाग्यकारक वाटतो. चंद्राचा मोती अथवा बुधाचा पाचू लाभदायक आहे. नक्षत्र मंदलोचनी असल्याने वस्तू हरवल्यास ती थोड्याशा प्रयत्नाने मिळू शकते व वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असेल.

मुहूर्त शास्त्रात हस्त नक्षत्राला फार महत्त्व आहे. शुभ देवगणी व सत्वगुणी असल्याने मौजी, विवाह, बारसे, ई. साठी चांगले. तसेच या नक्षत्रावर बी पेरणे, नांगर धरणे, जनावरे घेणे, नाव, जहाज, गलबत चालू करणे, प्रयाण, नवीन दुकान चालू करणे, अलंकार किंवा वस्त्रभूषणे धारण करणे, विद्यारंभ, शिल्पकाम, औषध घेणे किंवा औषधी वृक्ष लावणे, बालकाचे कान टोचणे, अन्नप्राशन, गृहारंभ, वास्तुशांती, विहिर खणणे, राज्याभिषेक, संगीत, नृत्यादी कला शिकणे यांना फारच चांगले. कोणत्याही शुभकार्यास हे नक्षत्र चांगले आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)