Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

त्रिगुण महात्म्य


विषय : त्रिगुण महात्म्य

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : वेदांत विचार व आयुर्वेद महर्षी पांडुरंग कुलकर्णी यांचा एक लेख  

नमस्कार,

कोणत्या विषयाची नवीन माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी माझ्या मनात चर्चा चालू असताना, त्रिगुण नजरेसमोर तरळले आणि लेखनाचा विषय मिळून गेला. व त्यानुसार संकलन व मांडणी करण्याचे काम हाती घेतले.

या भूतलाची निर्मिती आणि त्यावरच्या प्राणिमात्रांचे आयुष्य हे तीन गुणांनी गुंफलेले असते. सत्त्व, रज, तम या त्रिगुण विषयी पुसट माहिती अनेकांना असते. याच त्रिगुणांचा आज आपण उहापोह करू या.

निर्गुण शुद्ध ब्रह्म हे जेव्हा मायेच्या गुणांचा स्वीकार करते, चैतन्यात जेव्हा मायेचे गुण प्रकट होतात,  तेव्हा त्या चैतन्याला ‘ईश्वर’ असे म्हणतात. एकटे ब्रह्म (मायेच्या गुणरहित निर्गुण ब्रह्म) निष्क्रिय असते. ते कोणतीही क्रिया करू शकत नाही. जगाची उत्पत्ति, स्थिति, लय वगैरे क्रिया एकटे निर्गुण ब्रह्म (मायेच्या गुणरहित असलेले) करु शकत नाही. ते जेव्हा मायेच्या आच्छादानाने त्रीगुणात्मक बनते, तेव्हा ते उत्पत्ति, स्थिति, लय या क्रिया करते. परंतु ब्रह्म आणि माया (प्रकृति) यांचा संयोग जगाची उत्पत्ति, स्थिती आणि लय यांचे आदिकारण मानला जातो. ऋग्वेद, यजुर्वेद, आणि सामवेद या तीन वेदानीही त्रिगुण महात्म्य वर्णिले आहे.

ब्रह्मा (ब्रह्मदेव) कोण आहे?

शुद्ध चैतन्य परात्पर ब्रह्म, जेव्हा मायेच्या रजोगुणाचा स्वीकार करते. किंवा शुद्ध चैतन्य परात्पर ब्रह्मात मायेचा रजोगुण प्राधान्यपणे प्रकट होतो, तेव्हा त्या चैतन्याला म्हणजेच ईश्वराला, आपल्या शास्त्रांनी ब्रह्मा (ब्रह्मदेव) असे नाव दिले आहे, आणि हा ब्रह्मदेव जगाची उत्पत्ति करण्याचे कार्य करतो.

विष्णू कोण आहे?

शुद्ध चैतन्य परात्पर ब्रह्मात मायेचा सत्वगुण प्राधान्यपणे प्रकर्षाने प्रकट होतो, तेव्हा त्या चैतन्य ब्रह्माला म्हणजेच ईश्वराला, आपल्या शास्त्रानी ‘विष्णु’ असे नाव दिलेले आहे. आणि हा विष्णू जगाची स्थिती, म्हणजेच संरक्षणाचे कार्य करतो. आणि हे जग रक्षणाचे काम परिणामकारकरीत्या पार पाडण्यासाठी जरूर पडेल तेव्हा या विष्णूला निरनिराळे अवतार धारण करावे लागतात.

महेश कोण आहे?

शुद्ध परात्पर ब्रह्मात मायेचा तमोगुण प्राधान्यपणे प्रकट होतो तेव्हा त्या मायावत म्हणजे ईश्वराला आपल्या शास्त्रानी महेश, शिव, शंकर अशी नावे दिली आहेत. आणि महेश लय करण्याचे कार्य करतो.

या प्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश ही एकाच ईश्वराची निरनिराळी नावे आहेत. परंतु खरे पाहता ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे तिघेही ब्रह्माहून अलग नाहीत सत्व, रज व तम या मिश्र गुणांपासून उत्पन्न झाल्याने, हे तीन अवतार भिन्न आहेत असे वाटते, परंतु हे तीनही ब्रह्माचीच रूपे असल्याने, ते ब्रह्माहून भिन्न नाहीत. श्रीमद् भागवतात चौथ्या स्कंदात, सातव्या अध्यायात, दक्षप्रजापतिचे यज्ञाचे वेळी परमात्मा (ब्रह्म) विष्णू रुपात प्रकट होतो असा प्रसंग आहे. आणि त्यावेळी तो स्पष्ट खुलासा करतो की ब्रह्मा, विष्णू, महेश ही एकाच ब्रह्माची तीन रूपे आहेत.

जसे गंगानदी एकच आहे परंतु ती आकाशात असताना तिला मंदाकिनी म्हणतात. पृथ्वीवर तिचे भागीरथी असे नाव आहे (भगीरथाने पृथ्वीवर आणली म्हणून) आणि पाताळांत तिला भोगावती म्हणतात. नावे तीन असली, तरी ती वास्तवात गंगाच आहे. तसेच हे तीनही एकच शुद्ध चैतन्य परात्पर ब्रह्मच आहे आणि त्या सर्वांचे एकच स्वरूप आहे. परंतु मायेचे आवरण असल्याने व श्रद्धा असल्याने विविध पंथांचे शिवपंथी (शैव) विष्णूपंथी (वैष्णव) आणि शक्तिपंथी (शाक) अनुयायी त्या त्या दैवताची उपासना करत असतात.

ब्रह्मा हा जगाच्या उत्पत्तिचा अधिष्टाता आहे. विष्णू जगाची स्थिती, म्हणजेच संरक्षणाचा अधिष्टाता आहे. आणि महेश जगाच्या लय संहाराचा अधिष्टाता आहे.

इंग्रजीत ईश्वराच्या या तीनही शक्ति एकाच शब्दात समाविष्ट केलेल्या आहेत.

G – जनरेटर – उत्पत्ति

O – ऑपरेटर – स्थिती

D – डिस्ट्रोयर – लय विनाशक

सांख्यशास्त्रात पुरुष किंवा ‘ज्ञ’ हा ज्ञाता किंवा उपभोग घेणारा आहे. हा प्रकृतीपेक्षा वेगळा आहे. म्हणून तो सत्त्व, रज, तम या गुणांपलीकडचा आहे. जगातील सर्व घटना, घडामोडी या प्रकृतीमुळे होतात. गीतेप्रमाणे प्रकृती ही भगवंताची माया आहे आणि पुरुष हा त्याचा अंश आहे, असे मानले जाते.

ज्या वेळी त्रिगुणयुक्त प्रकृती निराळी आणि देव निराळा याचे ज्ञान होते, ती मुक्ती असते. त्याला जाणता / बुद्ध आणि कृतकृत्य म्हणतात.

मन आणि बुद्धी हे प्रकृतीचे विकार म्हणजे रूपे आहेत. देहातील इंद्रिये आणि बुद्धी यांत प्रथम सत्त्वगुण वाढतो आणि उन्नती होते. त्रिगुणयुक्त प्रकृती आणि भगवंत हे निराळे आहेत हे कळते. त्याला त्रिगुणातीत म्हणजे सत्त्व, रज, तम या तीन गुणांपलीकडे पोचलेला असे सांख्य मानतात.

त्रिगुण म्हणजे, सत्त्व, रज आणि तम प्रत्येकाच्या मनाचे आणि पर्यायाने शरीराचे, आयुष्याचे नियंत्रण, चालन आणि सांभाळ ही कामे अविरत करत असतात. प्रत्येकाच्या शरीरात तीन गुणांचे प्रमाण वेगवेगळे असते. त्याचे संतुलन आयुष्याचा दर्जा ठरवत असते.

विश्वातील प्रत्येक पदार्थ, द्रव्य हे या त्रिगुणांनी बनलेले असते. सत्त्व म्हणजे शुद्ध, रज म्हणजे आवड आणि तम म्हणजे बधिर. तीन मूळ रंगांच्या वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रणातून असंख्य रंगछटा तयार होतात, तसेच तीन गुणांपासून असंख्य स्वभावाच्या व्यक्ती आपणाला भेटतात.

तम गुण (लय) : तम गुण म्हणजे, जडपणा, अज्ञान आणि निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती असते. तमामुळे आपल्या शक्तीची माणसाला जाणीव नसते, ती जणू मृत असते. जगायचं कशासाठी हे ती माणसं विसरलेली असतात आणि व्यसनाच्या आहारी जातात. अगदी बुडून जातात. परिणामाची काळजी न करता  मनात आला विचार आला की कृती मोकळे होतात, त्रासदायक गोष्टींमध्ये अडकत जातात, नाश पावतात ते कल्पनेतील उंच मनोरे चढत असतात. इतर माणसाच्या मान-सन्मानाला ते कवडीमोल मानतात. कमालीचा आळशीपणा, दुसऱ्याच्या सुख-दुःखाला काडीचीही किंमत देत नाहीत, त्यांना त्यात रस नसतो, त्यांची वागणूक अनैसर्गिक असते. बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांचा उपयोग केला जात नाही. ते सगळे वाया जाते. मुळात असलेल्या चांगल्या बाबींचा उपयोग होत नाही. तामसिक मंडळी खोल खोल गर्तेत कोसळतात, स्वत:चा नाश करून घेतात. जबरदस्त शक्तीची कार/गाडी, इंजिन बंद ठेवून चालविण्यासारखे यांचे आयुष्य असते.

राजस गुण (उत्पत्ती) : राजा गुणांमुळे अथक प्रयत्न केले जातात. जबरदस्त इच्छा, गगनापेक्षा उंच आकांक्षा हे त्यांचं इंधन, अन्न असतं. पण हे स्वार्थासाठी, स्वतःच्या ‘मी’ पणाला कुरवाळण्यासाठी असते. ही मंडळी महत्त्वाकांक्षी आणि चांगले स्पर्धक असतात. जिंकण्याची जबरदस्त इच्छा असते. पण यासाठी खूप किंमत मोजावी लागते, भांडणतंडण, वैर वाढते, मनावरचा ताण सतत वाढता असतो, लढाई कधी संपतच नाही. चुका आणि महाचुका होत राहतात. शांती, आनंद कधी मिळतच नाही, मनाने सर्वांच्या सतत विरोधात असतात. आपली वाईट अवस्था होईल असे वाटत राहते. सर्वांच्यावर प्रभुत्व मिळवावे, आपला एकछत्री अंमल असावा, या आकांक्षेपायी तो जितकं ओरबाडतो ते सगळं घालवतो. राजसिक मंडळी केव्हा जिंकतात, तर केव्हा हरतात. सर्वांशी वादावादी करून शेवटी कुटुंब आणि मित्र परिवारापासून सुटतो. स्वयंचलित वाहनाचा ब्रेक करकचून दाबून कार पळविण्यासारखी अवस्था होते.

सत्त्व गुण (स्थिती) : सत्त्वगुण म्हणजे शांती आणि शुद्धता यांची मूर्ती. लालसा, इच्छा यांपासून तो मोकळा असतो. सर्व बंधनाच्या पलीकडे जायचे आहे याची जाणीव त्यांना असते. सत्त्व व्यक्तीला थोरांचे आशीर्वाद लाभतात, त्यांच्या आयुष्यात बरकत असते, विपुलता असते आणि जे मिळाले त्याबद्दल तो नेहमी कृतज्ञ असतो. जगाच्या कल्याणासाठी या विभूती असतात. जो इतरांना देत असतो त्याला ती ऐपत मिळत असते. सत्वगुणी मंडळी आशा आकांक्षांची तटबंदी मोडतात, वृथा अभिमानाचे ओझे झुगारून देतात. अशी मंडळी स्वत:ला जाणतात आणि परमसुखाच्या सर्वोच्च पदास पोचतात.

आपले जन्मास येणे सार्थकी लावायचे असेल, तर स्वत:मधला सत्त्वगुण ओळखणे आणि तो वाढावा म्हणून प्रयत्न करणे जरुरीचे आहे. रजगुण घासावा, पुसावा आणि उदात्त ध्येय, हेतू ठरवून त्याप्रमाणे काम करावे. मनामध्ये, कामामध्ये इतरांनाही सामावून घ्यावे, त्यांच्या हितासाठी काही कार्य करावे. तमोगुणावर अंकुश ठेवावा. अशा प्रकारे त्रिगुणात संतुलन साधत चांगला बदल करण्याचा प्रयत्न करावा. सर्वत्र विविधता आहे, पण त्यातही एकता आहे हे समजून घ्यावे. आजारपण, वृद्धत्व/ म्हातारपण, मरण, पुन्हा जन्म या त्रासदायक वर्तुळातून बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न करावा आणि अंती आत्म्याच्या आनंदी अमृतत्वाचा अनुभव घ्यावा.

प्रभू श्रीरामचंद्रांवर सत्त्वगुणाचा अधिक प्रभाव होता. त्यामुळे पितृभक्ती, बंधुप्रेम, प्रजाप्रेम, मित्रप्रेम, सेवकप्रेम आणि पत्निप्रेम असे गुण उच्च दर्जाचे होते.

रजगुण हा तेजासाठी, शौर्यासाठी आवश्यक भाग होता. परंतु त्याचा उपयोग दुष्ट निर्दालनासाठी, शत्रूनाशासाठी, भुईभार झालेल्यांसाठी, त्यांचा वध करण्यासाठी झाला होता. श्रीरामांनी कुणाबद्दल राग, आकस मनात ठेवला होता असे आढळत नाही. जी काही कर्मे केली, ती कर्तव्य म्हणून केली. त्यांचे सर्व आयुष्य संयमपूर्ण होते. अस्वस्थपणा, पळापळ, अविवेकी निर्णय कधी घेतले गेले नव्हते.

श्रीरामचंद्राच्या चरित्रातून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, सत्त्वगुण प्रभावी असेल तर रजगुण मदत करतो आणि एखादी गोष्ट साध्य करता येते.

कैकेयी ही राजा अश्वपती आणि केकेय यांची कन्या होती आणि राजा दशरथाची तिसरी पत्नी अयोध्येची सर्वात लहान राणी होती. ती हुषार होती. युद्धकलेत निपुण होती. अनेक युद्धांत तिने दशरथ महाराजांबरोबर प्रत्यक्ष भाग घेतला होता. एके प्रसंगी रथाच्या चाकात काही गडबड झाली, तेव्हा तिने कुशलतेने महाराजांसह रथ बाजूला योग्य ठिकाणी घेतला. तेव्हा दशरथ प्रसन्न झाले आणि तिला दोन वर दिले. वर म्हणजे इच्छापूर्ती करण्याचे वचन.

श्रीरामाला राज्याभिषेक करावयाचे ठरल्यानंतर कैकेयीची बालपणापासूनची सल्लागार मंथरा हिने ‘भरताला राज्याभिषेक व्हावयास हवा, त्यासाठी राम वनवासात जावयास हवा,’ असे कैकेयीस पटविले. मंथरेच्या मनावर रजगुण, तमोगुण यांचा वास अधिक होता. भरताचे कल्याण व्हावे त्यासाठी प्रयत्न करणे हे रजगुणाचे काम आहे. परंतु त्यासाठी रामाला त्रास व्हावा असा विचार हा तमोगुणाच्या अतिरेकामुळे निर्माण झाला. म्हणून मग हे दोन वर कैकेयीने दशरथ महाराजांकडे मागितले.

दशरथांनी अगदी अनिच्छेने भरताला राज्याभिषेक आणि श्रीरामाला वनवास या कैकेयीच्या इच्छा पूर्ण केल्या. इथे सत्त्वगुणाचेच अधिक्य दिसते, कारण स्वतःला त्रास सोसून, स्वतःचे नुकसान करूनसुद्धा इतरांचे भले करणे, हा विचार असतो. रजगुण त्याप्रमाणे कर्म करतो.

इतरांना सर्व प्रसंगी साथ द्यावी, हा विचार सत्त्वगुणप्रधान मंडळींमध्ये असतो. म्हणून सीता व लक्ष्मण रामाच्या अतिकष्टदायक अशा वनवासात जाण्यासाठी त्याच्याबरोबर गेले. सुखाचे जीवन सोडून वडिलांच्या इच्छेसाठी वनवासात जाणे आणि भावाच्या, पतीच्या प्रेमासाठी आपल्या सुखाचा त्याग करून श्रीरामाला साथ देणे हे सत्त्वगुण प्रधानता दर्शवते.

सत्त्वगुण आहे त्या पातळीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. अधिक वाढला तर सर्वोत्तम, पण रजगुण हा सत्त्व व तम गुणाला धक्के मारतच असतो. त्यामुळे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे आपल्याला अनुभवावे लागते..

त्रिगुण संतुलन साधत नेहमीच्या ऐकण्यातील पण नेहमीचे रटाळ बौद्धिक म्हणून दुर्लक्षिलेल्या पुढील सूचनांप्रमाणे वागले तर रज, तम गुण प्रमाणाबाहेर वाढत नाहीत, आटोक्यात राहतात, सत्त्वगुण पातळी चांगली राहते. अन्यथा आयुष्य ढवळून निघू शकते.

१) खोटे कधी बोलू नये.

२) दुसऱ्याची मालमत्ता बळकावू नये..

३) इतरांची संपत्ती लुबाडू नये.

४) कुणाशीही शत्रुत्व पत्करू नये.

५) वाईट कृत्य, त्रासदायक बोलणे टाळावे

६) पापी / दुष्ट माणसाबरोबरसुद्धा वाईट वागू नये,

७) कुणाच्या चुका काढू नयेत, दाखवू नयेत

८) दुसऱ्याच्या गुप्त गोपनीय गोष्टी इतरांना सांगू नयेत वा वाच्यता करू नये.

९) सामाजिक योग्य, न्याय, नीतिनियम तोडणाऱ्या मंडळीशी संबंध ठेवू नयेत.

१०) विश्वासघातकी मंडळीपासून चार हात लांब असावे.

११) अयोग्य गोष्टींमध्ये रस घेऊ नये.

१२) असंस्कारी माणसाच्या आश्रयाला जाऊ नये.

१३) इतरांना भीती दाखवू नये.

१४) खूप खाणे, खूप पिणे टाळावे.

१५) कुणाची कुरापत काढू नये. भांडण सुरू करू नये.

१६) जेवताना कुणाबद्दल वाईट बोलू नये. इतर वेळी पण नको.

१७) सज्जनांचे दोष काढत हिंडू नये.

१८) मद्यपान, जुगार, वेश्या यांपासून लांब राहावे.

१९) नोकरांचे पगार, सर्व देणी वेळच्या वेळी द्यावी.

२०) कुणावरही विश्वास ठेवताना काळजी घ्यावी.

२१) केव्हाही, कशाबद्दलही चिंता, काळजी करू नये.

२२) मनाचा वारू (घोडा) भरकटू देऊ नये.

२३) स्वतःचे शरीर आणि मन यांना विनाकारण शिणवू नये.

२४) कोणताही निर्णय घेताना फार वेळ लावू नये. दीर्घसूत्रीपणा नसावा,

२५) नेहमी रागावू नये. अति आनंदाने नाचू नये.

२६) स्वतःची काळजी घेऊन शरीर व मन यांचे आरोग्य चांगले राहते.

२७) इतरांनी आपल्याला ठेवलेली नावे दिलेली दूषणे वारंवार आठवत बसू नये.

२८) सर्वांशी स्नेहयुक्त बोलणे करावे.

२९) ज्ञानेंद्रियांना मोकाट सोडू नये (नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा).

या गोष्टींचे रोज पालन करायला हवे. म्हणजे त्रिगुणांचे संतुलन साधले जाते आणि आपल्याला आनंदी जीवनासाठी त्याचा उपयोग होतो.

(संदर्भ : चरक व सुश्रुत संहिता)

सत्व, रज आणि तम हे त्रिगुण सर्व अस्तित्वाचा मुलभूत पाया आहेत.

राजस कार्यकारी शक्ती आहे. सत्व, तम यांना हलविण्याचे काम राजस करते.

सत्व, तम हे स्थिर आहेत. परंतु त्यांच्याकडे सुप्त शक्ती आहे.

सत्यगुण : सावध आणि सहनशील व निर्गर्वी.

रजगुण : दुःखाचा बाऊ करतो. सुखामध्ये हर्ष वायु होतो.

तमोगुणी : आळस नडतो. प्रयत्न करावा अशी इच्छा नसते.

शेवटी एवढच सांगेन की, गर्भधारणे समयी तीन गुण विविध प्रमाणांत एकमेकांत मिसळतात. त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. पण मनुष्य जन्म ही कर्म योनी असल्याने आपण प्रयत्नपूर्वक व बुद्धीने, ज्ञानाने आपल्या व्यक्तीमत्वात आणि पर्यायाने आपल्या प्रारब्धात बदल करण्याची संधी आपल्याला लाभली आहे, तिचा सदुपयोग करून घेणे आपल्या हातात आहे. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

ज्योतिष शास्त्रातील ऋण विचार


विषय : ज्योतिष शास्त्रातील ऋण विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : लाल किताब

नमस्कार,

अनेकदा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी आढळतात की, ज्याची तर्क संगती लागणे मुश्कील असते. चांगल्या सुस्थितीत असलेले कुटुंब एकदम कर्जाच्या खाईत सापडून लयास जाते, संपूर्ण पिढीस वारसच जन्मास येत नाही जो घराण्याचे नाव पुढे लावेल, घरातील विवाहितांचे वैवाहिक संबंध अचानक मोडकळीस आलेले दिसतात, गृह कलह, कुटुंबियांची आपसात जोरदार भांडणे, उच्च गुणवत्ता असून देखील, त्याचे फळ मिळण्यात बाधा, अपमृत्यू इ. गोष्टी घडताना आढळतात. जन्म कुंडली मध्ये राजयोग दिसत असतानाही अनिष्ट फळे मिळत राहतात. अनेक उपाय, तोडगे करून देखील योग्य फळ मिळताना दिसत नाही. तर असे का घडत असावे याचे उत्तर न मिळाल्यामुळे डोके सुन्न होऊन जाते.

तर अशा लोकांच्या कुंडलीत ऋण योग आहे का हे तपासणे देखील गरजेचे असते. ऋण योग म्हणजे आपल्या पूर्वजांनी, पितरांनी किंवा घरातील मोठ्यांनी केलेल्या पापाचे भोग जे ते पूर्वसंचीत फळ पक्व झाल्यावर चालू पिढीला कुप्रभाव भोगायला लागणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, हे ऋण म्हणजे इतरांनी केलेल्या चुकीची परतफेड चालू पिढीने करणे. कुंडलीतील ऋण योग नातेवाईकांच्या कुंडलीत देखील दिसून येऊ शकतात. ह्या ऋण योगाचे परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो व त्यासाठी संपूर्ण कुटुंबाला मिळून त्यावर उपाय योजना करावी लागते. हे ऋण उतरल्याशिवाय कुंडलीतील ग्रह शुभ योगाचे फळ देण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही मार्ग सापडत नसेल तर या लेखासोबत दिलेले ग्रह योग जन्म कुंडलीत असता सांगितलेले उपाय केल्यास फायदा ऋण मुक्त होऊ शकतो.

हे ऋण योग अनुभवास येताना दिसतात व त्यावरचे उपाय हि प्रभावी ठरताना दिसतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

शुभ दीपावली २०२३


अविवेकाची काजळी विवेक दीपाने दूर करण्याचा हा मंगल सण. या सणाला आपल्या शरीरावरीलच नाही तर मनावरील मालिन्य दूर करून मन लख्ख करूया खऱ्या मोत्यासारखे तेजस्वी होण्यासाठी…!
शुभदिपावली !!

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)