Category: Uncategorized

भरणी नक्षत्र विचार


विषय : भरणी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण भरणी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

२. भरणी नक्षत्र :

भरणी हे नक्षत्र चक्रातील दुसऱ्या क्रमांकाचे नक्षत्र असून त्याची व्याप्ती १३ २० ते २६ ४० आहे. या नक्षत्राचे ४ ही चरण मेष राशीत येत असल्याने हे नक्षत्र चतुष्पादी आहे. हे अधोमुखी, उग्र व क्रूर नक्षत्र आहे. इंग्रजीत या नक्षत्राला ४१ ऐटरेस’ असे नाव आहे. याच्या ४ चरणांचे स्वामी अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळ आहेत. या नक्षत्री शुक्राची चैनी वृत्ति, मंगळाचा उतावळेपणा व यमाचा कठोरपणा यांचा संगम आढळून येतो.

नक्षत्राची आकृती योनीसारखी किंवा त्रिकोणासारखी आहे. नक्षत्रात ३ तारे असून, ते रंगाने काळसर व फिकट आहेत. तेजामध्ये हे नक्षत्र जरा कमी प्रतीचे आहे. आकाशामध्ये हे नक्षत्र ठळकपणे दिसत नाही.

या नक्षत्रावर जन्म घेणारे जातक मध्यम उंचीचे आढळतात. सडपातळ बांधा, मजबूत हाडाचे, काटक पण कमी मांसल असतात. डोके मेंढ्यासारखे, डोक्याचा मागचा भाग जरा रुंद व पुढे कपाळापर्यंत  निमुळते होत गेलेले असते. नाक सरळ व नाकपुड्या बारीक असतात. मान थोडी बारीक व उंच असते. शरीराला प्रमाणशीरपणा किंवा नीटनेटकेपणा थोडा कमी असून थोडा बेढबपणा असू शकतो. शारीरिक ऊर्जा, जीवनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती ठीक असते. झपाझप चालताना या व्यक्ती मध्येच थांबत पुन्हा चालताना आढळतील. हे जातक दिलदार, उदार, प्रामाणिक, विश्वसनीय असतात. पण रजोगुणी, निष्काळजी, आळशी, नेभळट, दुसऱ्यावर आंधळा विश्वास टाकून काही वेळा स्वतःचे नुकसान करून घेतात. कोणतत्याही श्रीगणेशा जोरात करून, नंतर मध्येच अर्धवट सोडणे, एकदम राग येऊन लगेच शांत होणे, जास्त महत्त्वाकांक्षा नसणे, मागचा पुढचा विचार न करणारी, व्यसनाधीन ई. असतात. नक्षत्राचा मुख्य अशुभ गुण म्हणजे जुगारी वृत्ति होय. कमी श्रमात भरपूर धन मिळविण्याची इच्छा बाळगल्याने या जातकांना पत्ते, रेस, जुगारांचा नाद लागण्याची संभावना जास्त असते. जुगारापायी या व्यक्ती आपला शारीरिक व आर्थिक नाश ओढवून घेतात. द्रौपदीची अब्रू जाण्याचा प्रसंग येऊन पांडवांना वनवास भोगावा लागला हे सर्वश्रुत आहेच.

हे नक्षत्र कला कौशल्य किवा सौदर्य देणारे नसल्याने स्त्री जातकास हे फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रिया जरा बावळट भासू शकतात. शरीराच्या ठेवण गोंडस नसते. चेहरा मेषपात्रा सारखा असतो. यांचे सौंदर्य त्यांच्या बावळट भासण्यातच आहे. या स्त्रिया थोड्याशा धांदरट व वेंधळ्या असतात. यांच्या वागण्यात, राहणीत किंवा पोषाखातही व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा व आकर्षितपणा याचा अभाव असू शकतो. दुसऱ्या स्त्रीचे अंधानुकरण करण्याची सवय असते, एखाद्या सुंदर स्त्रीने रेशमी किंवा वायलची साडी अथवा इतर फॅशनेबल पोषाख घातलेला पाहिल्यास, या जातकांना ही त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होतो, तो पेहराव, साड्यांचा रंग किंवा फॅशन स्वत:स कसे दिसेल हा विचार करणार नाहीत व अजागळ वाटतील. हे स्त्री जातक अंगापिंडाने मजबूत असल्याने यांना कलाकुसर पेक्षा घरातील स्वयंपाक व इतर अंगमेहनतीची कामे चांगली जमतात.

या नक्षत्राचे दैवत यम असल्याने हे नक्षत्र यमा प्रमाणे कठोर व काटेकोरपणे न्याय देणारे आहे. या नक्षत्राजवळ क्षमा हा शब्द नाही. एखाद्या न्यायाधीशाच्या कुंडलीत या नक्षत्रामध्ये शनि असल्यास तो काटेकोरपणे न्याय देईल. जसे कर्म तसे फळ या तत्त्वाने सर्व गोष्टी मोजूनमापून पाहिल्या जातात.

या नक्षत्रावर अनिष्ट कृत्य केल्यास त्याचे फळ भोगावेच लागते. मग जप करून, देवाला नैवेद्याची लालूच दाखवून किंवा बोटात रत्न घालून त्यातून सुटका होत नाही. अश्वत्थामा हत्तीच्या वेळी ‘नरो वा कुंजरो’ असे मोघम बोलल्याने धर्मराजांनाही स्वर्गात थोडेतरी शासन मिळालेच.

भरणी या शब्दाचा अर्थच भरणी करा, भरून घ्या असा आहे. एखादी व्यक्ती मृत झाल्यास पितृपक्षात (भाद्रपद कृष्ण पक्ष) जे प्रथम भरणी श्राद्ध करण्याची पद्धत आहे. आपली प्रिय व्यक्ती स्वर्गाच्या प्रवासास निघालेली आहे, तेव्हा प्रवासात लागणारे अन्न उपलब्ध असावे असा तो विधी आहे. कोणत्याही वस्तूची भरणी म्हणजेच साठा या नक्षत्रावर केल्यास तो बराच काळ टिकतो असे मानले जाते.

हे नक्षत्र पित्तप्रकृतीचे असल्याने वैद्यकीय शास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर होणारे रोग पित्ताची उलटी किंवा कावीळ होणे, अतिदाहक ताप, तापात बडबडणे, रक्तविकार, तसेच दंतरोग, पायोरिया, हिरड्या सुजून पू किंवा घाण येणे, तोंडाला वास येणे हे आहेत. हे नक्षत्र बिघडले असता शरीरात विजातीय अथवा दूषित द्रव्य साचून दीर्घ मुदतीचे रोग होऊ शकतात. शरीरात भयंकर उष्णता वाढून ती साचून रहाते व परिणाम स्वरूप निरनिराळ्या भागात गळवे, मोठमोठे फोड, आवाळू यांच्या रूपाने ती बाहेर पडते.

या नक्षत्री गुरु असता मेंदूत रक्त साठू शकते. या जातकांना होणारे रोग त्यांच्या व्यसनामुळे व खाण्यापिण्यातील अतिरेकीपणामुळे झौ शकतात. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, जागरण व सारखा चहा पिणे अशा सवयी स्वतःच्या शरीरास घटक ठरू शकतात याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. गुप्तरोगाचीही संभावना असते.

रवि या नक्षत्रात शरीरप्रकृती व आरोग्याला बरा असतो. कर्तव्य, अधिकार यासाठी फारसा अनुकूल नसतो. कठोर, आळशी व खाण्यापिण्यात मजा मारणारा व रवि बिघडला असता जुगाराचा नाद लागू शकतो.

या नक्षत्री चंद्र असता चंचल मनाचा, दिसण्यात बावळट व भोळसट, सांगकाम्या, सुस्त, घाबरट व उतावळा असतो. पैशांची लालसा असते. मध्यंतरी एक कुंडली पाहण्यात आली. या कुंडलीत चंद्र भरणी नक्षत्रात २ रे स्थानात, ८ वे स्थानात शुक्र राहूच्या स्वाती नक्षत्रात असल्याने ही मुलगी श्रीमंती व चैनीच्या हव्यासापायी चोरी करायला लागली होती.

या नक्षत्री मंगळ चोरटा व्यापार, शरीरप्रकृती व आरोग्याला बरा. हे जातक मजबूत हाडाचे व काटक असतात. तसेच डॉक्टरीपेक्षाही इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी चांगला असतो. जातक जरा रागीट, उतावळा व स्वार्थी स्वभावाचा असतो.

या नक्षत्री बुध शरीरप्रकृती व आरोग्यासाठी चांगला. हे जातक चपळ व तरतरीत असतात. मात्र बुद्धीने अगदीच साधारण व मंद असतात. पोस्टमन, पाळत ठेवणारा, बातमीदार, फिरते एजंट या कामासाठी चांगला.

या नक्षत्री गुरु शरीर मजबूत देतो. मात्र हे जातक जरा सुस्त व आळशी असतात. इंजिनिअर, ललितकला, कायदेशास्त्र यांचेसाठी अनुकूल असते.

या नक्षत्री शुक्र हा शारीरिक प्रकृती व आरोग्य यांना फारसा अनुकूल नसतो. तब्येतीची नेहमी तक्रार राहते. विषयवासना जास्त असू शकते. हे जातक पैशासाठी लोभी, चैनी, विलासी, सट्टेबाज, व्यसनाधीन तसेच नाटक, सिनेमा, गायन-वादन यांची आवड असणारे असू शकतात. शिक्षणाच्या बाबतीत मध्यम फळ देते.

या नक्षत्री शनी असता शरीर हाडापेराने मजबूत असते. शरीरातील नसा जास्त उठून दिसतात. हे जातक कमी मांसल असतात परंतु काटक, कणखर, कष्टाळू व मेहनती असतात. या नक्षत्राखाली कष्टकरी मजूर व कामगार व रोजंदारी करून पोट भरणारे येतात. धन संपत्तीसाठी शनि फारसा अनुकूल नसतो.

या नक्षत्रात राहू शरीरप्रकृती व आरोग्यासाठी चांगला असतो. विद्या व बुद्धी कमी राहते. शारीरिक कष्टाची कामे चांगली जमतात. राहू बिघडला असता वाममार्गाने धन मिळवण्याकडे कल असतो. उदा. चोरी, चोरटा व्यापार, दारूचे किंवा जुगाराचे अड्डे चालवणे ई. तसेच भूत पिशाच्च किंवा अघोरी विद्येची फार आवड असते. केतूही राहूसारखीच फळे देतो, मात्र यांना अघोरी विद्यापेक्षा गारुडी विद्या, मंत्रतंत्र, आध्यात्मिक विदयेची आवड असते.

या नक्षत्री हर्षल शरीरप्रकृती व आरोग्याला बरा. जातक जरा रागीट, हट्टी, विक्षिप्त व लहरी असतो. चंचल मन व फिरण्याची आवड असते. तसेच रेस, सट्टे, लॉटरी ई. नाद असू शकतो.

या नक्षत्री नेपच्यून शरीरप्रकृती, विद्या व बुद्धी यांना मध्यम फलदायी असतो.

भरणी नक्षत्र काळ्या रंगाच्या वस्तूंच्या व्यवसायासाठी चांगले असते. तसेच हे अधोमुखी नक्षत्र असून त्याचा खाणीशी संबंध असल्याने कच्चे लोखंड, तांबे, शिसे तसेच रॉकेल अशा वस्तूंच्या व्यापारास अनुकूल ठरते. प्रेत दहनाला लागणाऱ्या वस्तूचा व्यापार, चामडी व कातडी कमावणे या धंद्यांना पण दर्शवते.

या नक्षत्रावर २ किंवा ६ या अंकाचे वर्चस्व आहे. भाग्य रत्न शुक्राचा हिरा किंवा शनीचा नीलम आहे. हस्ताक्षर जरा गिचमीड, फिक्कट व लहान आढळते. लिहिणेही जरा पटपट, मध्येच हळू व परत पटपट असते. मध्यलोचनी असल्याने या नक्षत्रावर एखादी वस्तू हरवल्यास ती फार प्रयत्नानेच मिळू शकते.

हे नक्षत्र मनुष्यगणी, क्रूर व देवता यम असल्याने या नक्षत्रावर शुभ कार्ये करू नयेत. याचे महत्त्व पितृपक्षात पितरांसंबंधी कार्य करण्यास किंवा श्राद्ध वगैरे करण्यासाठी जास्त आहे. हे अधोमुखी नक्षत्र असल्याने खणणे, विहिरी, तलाव वगैरेंची कामे सुरू करणे, जमिनीत गाडलेले धन बाहेर काढणे किंवा जमिनीत पैसे अथवा इतर वस्तू पुरून लपवणे, मद्य काढण्यास आरंभ करणे यांना अनुकूल. भरणी नक्षत्र खोदकामास चांगले असले तरी ते अशुभ असल्याने पायाभरणीस मात्र योग्य नाही. क्रूर असल्याने घातपात, विषप्रयोग, वशीकरण, भूतपिशाच्च अथवा अघोरी विद्या शिकण्यास चांगले. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कारकत्वाचा सुखद अनुभव


विषय : कारकत्वाचा सुखद अनुभव

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वानुभव

कोणत्याही कुंडलीत आपण सर्व बारीक सारीक गोष्टी तपासून पाहतच असतो. पण भविष्यकथन करताना बरेच वेळा कारकत्व व स्थानांची योग्य सांगड घातली गेली तर जातकास चमत्कार वाटावा इतका अद्भुत अनुभव देऊन जातो. खर्र्तर यात चमत्कार वगैरे असे काही नसते. फक्त असलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा योग्य वापर एवढेच असते. आणि अदभूत मानायचेच तर त्यासाठी आपल्या प्राचीन ज्योतीषाचार्याना दाद द्यायला हवी, ज्यांनी हा अमुल्य ठेवा आपल्यासाठी निर्माण केला.

या संबंधी इतक्यातच घडलेला प्रसंग सांगतो. एका मुलीचे आईवडील अनेक ठिकाणी कुंडली दाखवून, २ विवाह योग सारख्या नकारात्मक गोष्टी ऐकून धास्तावत, अनेक उपाय ऐकून शेवटी माझ्याकडे मुलीची कुंडली घेऊन आले होते. कुंडली खूप सरळ होती किंवा इतर ज्योतिषांनी विनाकारण घाबरवले होते, अशातला भाग नाही. पण तो इथे सांगायचा मुद्दा नाही. पण निराश मनस्थितीत आशेचा एक किरण मनाला उभारी देऊन जातो तसे झाले.

वृषभ लग्नाची कुंडली व मेष रास. कुंडली तपासात असताना त्यांनी विचारले कि जोडीदार कुठला असू शकेल? सप्तमावर नजर टाकली. सप्तमात वृश्चिक रास व व्ययेश देखील मंगळ. चंद्र मेषेचा १२ व्या स्थानी. मंगळ अग्नी तत्व दर्शवते, तर चंद्र जलतत्व. चंद्र समुद्र पण दाखवतो. या सर्व गोष्टी एकत्र करून उष्ण व पाणी म्हणजे दमट वातावरण व समुद्र म्हणून स्थळ मुंबईचे असू शकते असे सांगितले. तसेच १२ वे स्थान पंरदेश व चंद्र प्रवासाचा कारक या गोष्टी विचारात घेऊन, त्यांना म्हणालो कि मुलगा कदाचित परदेशी किंवा परदेशी कंपनी मध्ये नोकरीस असू शकतो.

एवढे सांगितल्यावर ती ताई एवढी उल्हासित झाली आणि मला विचारले कि, तुम्हाला कसे कळाले हे सर्व? कारण ही गोष्ट फक्त आम्ही दोघे नवरा बायको व त्या मुलाचे आई वडील अशा चौघांनाच माहित आहे, फक्त चार च दिवसांपूर्वी आमचे या बाबतीत बोलणे झालेय आणि अजून आम्ही मुलांना पण ही गोष्ट सांगितलेली नाही.

ते स्थळ मुंबईचेच निघाले व मुलगा परदेशात नोकरी करत असून पुढील महिन्यात भारतात येणार आहे, तेव्हा दोघांची भेट करून द्यायची असे त्यांच्यात ठरले होते.

सांगायचे तात्पर्य एवढेच आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी आपल्यासाठी सर्व प्रकारचे कारकत्व, स्थान, स्थिती, वर्णन ई. सूक्ष्म निरीक्षण व सखोल अभ्यास द्वारे उपलब्ध करून दिले आहे. आपल्याला फक्त काळ व परिस्थितीनुसार कुंडलीचे अवलोकन करून योग्य दुवा जोडायचा आहे. अन्यथा घाबरवून सोडायला सप्तमेश व व्ययेश मंगळ एवढी गोष्ट सुद्धा पुरेशी आहेच की. पण नकारात्मक गोष्टीतली सकारात्मक बाजू उपयोगात आणून फळ नाही, पण फळाचे स्वरूप बदलण्यासाठी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. ते स्थळ आले नसते तरी, त्यांना बाहेर गावाचे स्थळ शोधा हा सल्ला त्यांना दिलाच असता.

तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जातकाला व आपल्याला देखील एक समाधान व नवा हुरूप देऊन जातात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अश्विनी नक्षत्र विचार


विषय : अश्विनी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण अश्विनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

क्रांतिवृत्ताचे समान १२ विभाजित केलेले भाग राशी आहेत. त्याचेच २७ समान विभाग केले म्हणजे त्यांना नक्षत्रे असे म्हणतात. क्रांतिवृत्तालाच राशीचक्र किंवा नक्षत्रचक्र असे संबोधिले जाते. वर्तृळाचा आरंभ बिंदू हा कोणत्याही ठिकाणी मानता येऊ शकतो. नक्षत्र चक्रही वर्तृळकार असल्याने त्याचा प्रारंभ कोणत्याही नक्षत्रापासून मानता येऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्रात ऋतुमान व कालगणना ठरविण्यासाठी मेष संपात किंवा वसंत संपात (ज्या ठिकाणी आकाशात क्रांतिवृत्त विषुववृत्ताला छेदून जाते तो बिंदू) हा राशी चक्राचा प्रारंभ मानतात. पण राशी समजण्यासाठी नक्षत्राचा उपयोग केला असल्याने या संपात बिंदूजवळ असलेले नक्षत्र नक्षत्र चक्राचा प्रारंभ म्हणून मानले जाते. निरयन राशी चक्राचा आरंभ अश्विनी नक्षत्रा पासून धरला आहे.

१. अश्विनी नक्षत्र :

अश्विनी हे नक्षत्र चक्रातील पहिले नक्षत्र असून त्याचे चार ही चरण मेष राशीत असल्याने हे नक्षत्र चतुष्पाद तसेच क्षिप्र, तीर्थमुखी, मंदलोचनी व देवगणी आहे. नक्षत्राची लांबी १ अंश ते १३ २० आहे. इंग्रजी नाव ‘बीट एरिटस’ आहे.. या नक्षत्राच्या चार चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्राचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी केतू, राशीस्वामी मंगळ व दैवत हे देवांचे वैद्य अश्विनकुमार आहेत. म्हणून या नक्षत्रात केतूचा त्यागीपणा, मंगळाचा पराक्रम व अश्विनीकुमारांची अप्रतिम बुद्धिमत्ता व चिकाटी यांचा सुरेख संगम दिसून येतो.

अश्विन महिन्यात हे नक्षत्र आपणाला रात्रभर आकाशात दिसू शकते. या नक्षत्रात तीन तारका असून आकृती इंग्रजी J या अक्षरासारखी किंवा पायमोज्यासारखी दिसते. काही प्राचीन ग्रंथात याचा आकार घोड्याच्या मुखासारखा किंवा तीन चाकाच्या रथासारखा सांगितला आहे. नक्षत्र चर असून तारे फिक्कट रंगाचे पांढरे व जरा धुरकट दिसतात. या नक्षत्राकडे पाहताना त्यातून वाफा निघतात, असे वाटते म्हणून ते अग्नितत्त्वाचे व तेजस्वी धरतात.

अश्विनीला घोड्याचे मुख का आले याविषयी प्राचीन ग्रंथात एक सुंदर कथा सांगितली आहे. देवांचा कारागीर त्वष्टा याला मधुविद्या (संजीवनी) येत होती. त्याने ही विद्या दधिची ऋषींना शिकवली. या विदयेमुळे दधिची ऋषी सदेह स्वर्गाला जात होते. अश्विनीकुमारांना ही विद्या शिकण्याची फार इच्छा होती. पण ही विद्या शिकण्यास इंद्राचा सक्त विरोध होता. विद्या शिकविणाऱ्याचे तो शिर उडविणार होता. तेव्हा अश्विनीने स्वतःच दधिचींचे शिर उडवून ते झाकून ठेवले व दधिचींना त्याने घोड्याचे मुख लावले व तो मधुविद्या ग्रहण करू लागला. इंद्राला हे समजल्यावर त्याने दधिचीचे अश्वमुख शिर उडवलेच, तेव्हा अश्विनीने या ठिकाणी झाकून ठेवलेले शिर पूर्ववत् लावले. मात्र अश्विनीकुमारांची ही विद्या अर्धवटच राहिली.

म्हणूनच अश्विनी नक्षत्रात जन्मलेल्या जातकांत महत्प्रयासाने विद्याप्राप्ती, विद्या ग्रहणाची आवड, असाध्य विद्या शिकण्याची हौस व चिकाटी दिसून येते.

तसेच अश्विनीने एक शिर उडवून व दुसरे शिर लावल्याने या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांत शरीराच्या कोणत्याही अवयवावर कलम करण्याची व शस्त्रक्रिया करण्याची विद्या चांगली येते.

तसेच पुराणकाळी शर्यतीच्या पणात अश्विनीकुमारांनी आपल्या बुद्धीने शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून त्यांना सर्व प्रकारची विद्या, यश व त्रैलोक्य कीर्ती प्राप्त झाली.

या नक्षत्राला नकुल व सहदेव यांची शक्ती मिळाल्यामुळे सर्व विद्या पारंगत व त्यापासून धनप्राप्ती व ऐश्वर्यप्राप्ती हे फलादेश दिसून येतात.

शारीरिकदृष्ट्याही हे नक्षत्र अनुकूल आहे. हे नक्षत्र लग्नी (प्रथम भावात) असता किंवा या नक्षत्रात चंद्र असता जन्मणाऱ्या जातकाचा बांधा उंच, प्रमाणशीर व नीटनेटका असतो. त्या हाडापेराने मजबूत व काटक असतात. शारीरिक आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. सहनशक्ती चांगली असून हे जातक श्रम व दगदग सहन करण्यात पटाईत व सक्षम असतात. चेहरा जरा उभट, नाकपुड्या मोठ्या व भालप्रदेश रुंद असतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना या नक्षत्रांचे महत्त्व जास्त आहे. कारण पुरुषांना लागणारा धीटपणा, धाडस, पराक्रम, कर्तबगारी, महत्त्वाकांक्षा, स्वातंत्र्यप्रियता, शौर्य, स्वावलंबित्व, अधिकार लालसा हे गुण या नक्षत्रात ठळकपणे दिसून येतात. हे नक्षत्र चर व अग्नितत्त्वाचे असल्याने हे जातक रागीट, मानी, उतावळ्या स्वभावाचे पण निश्चयी व महत्त्वाकांक्षी, उच्च आचारविचार, न्यायी, उदार, स्पष्टवक्ते, सडेतोड बोलणारे असतात. मर्दानी खेळाची आवड असून नित्य नवनव्या विद्या शिकण्याची हौस फार असते. प्रत्येक गोष्टीत त्यांना नावीन्य आवडते. प्रवासाची बरीच आवड असते. यांचे बोलणे, चालणे, लिहिणे जलद असते. हे जातक नेहमी घाई-गडबडीत असतात. वाहनात बसून प्रवासाची मौज अनुभवण्यापेक्षा बेफामपणे वाहन चालवून आपले कौशल्य व घडाडी दाखविण्याची हौस असते. हे जातक एके ठिकाणी बराच वेळ बसून राहिले तर अस्वस्थ होतात. थोडक्यात यांना व्यवहारात एक प्रकारची गतिमानता आवडते.

स्त्रियांना हे नक्षत्र मध्यम आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियाही सशक्त, बांधेसूद, सडपातळ व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या असतात. चेहरा सुरेख पण जरा रागीट, मानी, करारी व गंभीर वाटतो. डोळे जरा बारीक पण पाणीदार असतात. अंगात नाजूकपणा कमीच. त्या उच्च कुळात शालीन दिसतात. त्या पुरुष वृत्तीच्या पण सत्त्वगुणी असतात. राहणी साधी पण स्वच्छता, नीटनीटकेपणा व टापटीप यांची आवड असते. कर्तबगार व विद्याव्यासंगी असून त्यांची सर्व क्षेत्रांत पुरुषांची बरोबरी करण्याची धडपड चालू असते. त्या स्वतंत्रवृत्तीच्या असल्या तरी कुटुंबवत्सल असतात.

नक्षत्र अग्नितत्त्वाचे असल्याने प्रकृती उष्ण व पित्तकारक दर्शविते. या नक्षत्राचे मुख्य रोग म्हणजे डोके दुखणे, डोळ जळजळणे, सनस्ट्रोक हे आहेत. तसेच लहानपणी गोवर, कांजिण्या, देवी या रोगांची भीती असते. रवि मंगळ या नक्षत्रात दूषित असता वरील रोगांची भीती असते. बुध बिघडला असता चक्कर, भोवळ, ज्ञानतंतू व मज्जातंतू बिघडणे. गुरु बिघडला असता मेंदूत रक्तसंचय होणे, केतू असता मूळव्याध याचा संभव असतो. काही वेळा कापणे, भाजणे, हाड मोडणे, शरीराच्या एखाद्या भागाची शस्त्रक्रिया करावी लागणे या गोष्टी पण दिसून येतील. स्त्रीच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र बिघडला असता मासिक पाळीच्या वेळी त्रास होतो.

रवि या नक्षत्रात फारच चांगला. या नक्षत्रात रवि असून तो विशेष करून १ किवा १० या स्थानात असता या व्यक्ती लवकर लवकर अधिकारपदाला पोहोचतील. यांच्या हाताखाली अनेक माणसे काम करत असतात. नोकरी सरकारी किंवा कुठल्याही अंमलबजावणी खात्यातील असते.

मानसन्मान व कीर्ती चांगली मिळते. I.A.S. किंवा अशा चढा- ओढीच्या परीक्षेत चांगले यश देतो. शारीरिकदृष्ट्याही रवि चांगला असतो. स्वभाव जरा कडक, शिस्तप्रिय व स्वतःला विशेष समजणारा असतो. चंद्र या नक्षत्रात असता स्वभाव चंचल, भटक्या प्रवृत्तीचा व उतावळा असतो. मंगळ असता कुलदीपक, पराक्रमी, महत्त्वाकांक्षी, धडपड्या असतो. मंगळ वैद्यकीय, इंजिनिअरिंग व लष्करी शिक्षणाला फार चांगला. १, ३, ६ व १० या स्थानात या नक्षत्रातील मंगळ अधिकार देईल, श्रेष्ठ पदाला नेईल. या व्यक्ती फायर ब्रिगेड, कारखाने, पोलिस खाते, सैन्य व ज्या ठिकाणी यांत्रिक कामाचा संबंध येतो अशा ठिकाणी नोकरी करताना दिसून येतील. शरीरप्रकृती तर फारच चांगली असेल. बुधाला हे नक्षत्र जरा प्रतिकूलच आहे. शुभ बुध असल्यास लेखक, गणिती व वैद्यकीय शास्त्रांना चांगला. या नक्षत्रात १, ६, ८ व १२ या स्थानी बिघडलेला बुध वाईट असतो. गुरु या नक्षत्रात शुभ फलादेश उत्पन्न करेल. तसे उत्तम प्रकारची शरीर संपत्ती, उच्च विद्या, ज्ञान, लेखन, धन व मानसन्मान यांना चांगला असतो. तो डॉक्टर, इंजिनिअर, वकील, अर्थशास्त्रज्ञ यांना चांगला असतो. समाजप्रियता मिळते. गुरु असता देह भरदार व अवयव पुष्ट असतात. शुक्र असता दिसण्यास सुंदर व हसतमुख, कला, कौशल्य, गायन, वादन, नाटक, सिनेमा यांची आवड असणारा असतो. वाहनसौख्याची आवड जास्त, मात्र विद्येच्या बाबतीत मध्यम शरीरप्रकृतीलाही साधारणच असतो. शनीला हे नक्षत्र शरीरप्रकृतीच्या दृष्टीने बरे, पण विद्या, धन, ऐश्वर्य, अधिकार या दृष्टीने अनुकूल नसते. शरीर मजबूत, काटक, हाडाळ व शिरायुक्त असते. अंगावर मांस कमी असते. अंगमेहनत व कष्टाची कामे जास्त पडतात व त्या प्रमाणात धन मध्यम मिळते. राहू, केतू या नक्षत्रात शरीरप्रकृती व आरोग्य चांगले देतात. या व्यक्ती अतिशय धाडसी, पराक्रमी, शूर व कर्तबगार असतात. मंत्र तंत्र, जादूटोणा, गूढविद्या, मोहिनी विद्या, गारुडी विद्या, दैविक विद्या यांना हे ग्रह चांगले. केतू आध्यात्मिक व वैद्यकीय विद्येलाही चांगलाच. मात्र राहू या नक्षत्रात जसे धन, ऐश्वर्य व अधिकार देईल तसा केतू देऊ शकणार नाही. राहू बिघडला असता कुटिल, दुष्ट व त्रासिक स्वभाव दर्शवितो. केतू मात्र उदार, त्यागी व समाधानी वृत्ती दाखवील. हर्षल ज्योतिषशास्त्र, गूढ विद्या, संशोधन, विमान विद्या व विजेच्या साहाय्याने चालणाऱ्या मशिनरीसंबंधीचे शिक्षण व नवीन शोध यांना चांगला. शरीरप्रकृतीलाही बरा. नेपच्यून आरोग्य व शरीर प्रकृतीलाही मध्यम पण गूढविद्या, ज्योतिष, अंतःस्फूर्ती, साक्षात्कार, तत्त्वज्ञान व धार्मिक विद्येला चांगला.

या नक्षत्राचा अंक १ किंवा ८ आहे. त्यापैकी १ अंकाचे वर्चस्व जास्त वाटते. रत्न पोवळे आहे. यांना पांढरा व तांबूस रंग शुभ आहे. हस्ताक्षर फिकट, उभट व टोकदार असते. लिहिणे जरा जलद नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवली असता ती थोड्याशा प्रयत्नाने पण जरा विलंबानेच दक्षिण दिशेला सापडू शकते.

मुहूर्त शास्त्रामध्ये या नक्षत्राचे महत्त्व फार आहे. हे प्रारंभीचे नक्षत्र असल्याने कोणत्याही शुभ कार्याला आरंभ या नक्षत्रावर करावा. विशेषतः कोणतीही विद्या शिकण्याचा आरंभ, कलाकौशल्याची कामे, संगीत, गायन, नवीन वास्तू किंवा दुकानाचे उद्घाटन, नवीन धंदा किंवा नवीन कारखाना सुरू करणे, नवीन वाहन विकत घेणे, बागेत नवीन झाडे (विशेषतः औषधी वनस्पती) लावणे, डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू करणे यांना फार चांगले. या नक्षत्रावर कोणतीही शस्त्रक्रिया चांगली व यशस्वी होते. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना या नक्षत्राचा मुहूर्त दिला असता शुभ परिणाम दिसून आले. या नक्षत्रावर कोणत्याही वास्तूचा उद्घाटन समारंभ करावा. गृहप्रवेशाला हे नक्षत्र चांगले. मात्र मंगळवारी अश्विनी नक्षत्र असता अमृतसिद्धीयोग असूनही गृहप्रवेश करू नये. घर जळते. हे नक्षत्र राजनक्षत्र असल्याने राज्याभिषेकाला चांगले. कोळ्यांनी आपली नवी गलबते सुरू करावीत. रोग्यांना औषध घेण्यास व वैद्यांना औषधे करण्यास हे नक्षत्र शुभ असते. नक्षत्र चर असल्याने प्रवास, नवीन मोटार सायकल किंवा स्कूटर वापरण्यास सुरू करणे चांगले. इतर हलण्यासारखी शुभ कार्येही या नक्षत्रावर करावीत.

(टीप : जी नक्षत्रे शुभ कार्यासाठी सांगितलेली आहेत ती जर पापग्रहाने युक्त असतील किंवा त्या नक्षत्रावर ग्रहण झाले असता घेऊ नयेत.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)