Category: Uncategorized

ग्रह विचार : नेपच्युन


विषय : ग्रह विचार- नेपच्युन

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : प्रेडीक्टिव्ह स्टेलर ॲस्त्रॉलॉजी रीडर

नमस्कार,

आज आपण नेपच्युन या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत.

नेपच्युन क्रमांक २ चा मोठा ग्रह आहे. हा आकाशामध्ये फारच दूर असल्यामुळे शक्तिशाली टेलीस्कोपच्या शिवाय दृष्टीस पडू शकत नाही. हा सूर्यापासून साधारण २,५९,३०,००,००० मैल दूर असून याचा व्यास २७,६०० मैल आहे. नेपच्युनचे वजन पृथ्वीपेक्षा १७ पट अधिक आहे. नेपच्यूनला १४ ओळखलेले आहेत, ज्यामध्ये ट्रिटन सर्वात मोठा आणि प्रसिद्ध आहे. हा ग्रह एक आइस जायण्ट म्हणून श्रेणीबद्ध आहे. नेपच्यूनमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन आणि हेलियम, मेथेन आणि अमोनिया मोठ्या प्रमाणात आहे. अशा या नेपच्यूनचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहान गॉटफ्रीड गॅल आणि त्याच्या सहायक हेनरिक लुई डारेस्ट यांनी २३ सप्टेंबर, १८४६ रोजी लावला. नेपच्युनला राशीचक्र मध्ये मध्ये एक फेरी पूर्ण करण्यास १४६ वर्ष लागतात.

राशीचक्रा मध्ये नेपच्यून ला मीन राशिचे स्वामीत्व देण्यात आले आहे. नेपच्यून  संवेदनशीलता, सहानुभूती, आणि कृपाबुद्धी, सृजनात्मक प्रवृत्ती, कला प्रेरणा आणि आपल्या डोक्यातील विलक्षण कल्पना, आध्यात्मिक विकास, अद्वैत वाद, भ्रम, भ्रांती, अतिरेकी भावना ई गुण दर्शवतो. नेपच्यून आध्यात्मिक गोष्टी मध्ये कार्य करतो जातकास दिव्य बनवितो. नेपच्यून मनोवैज्ञानिक क्षमता, भावना, प्रेरणा व विचार उत्पन्न करतो व जातकाचे भावनांमध्ये वाढ करतो. हा दूरदर्शीपणा प्रदान करतो जातक Crystal gazing (काचेच्या गोळ्यामध्ये विविध दृश्ये पाहणे) चा अभ्यास करु शकतो. हिप्नोटिज्म, विचार अध्ययन, प्रेम सल्लागार, आत्मिक गोष्टींचा निरीक्षक ई कार्य करू शकतो, कारण नेपच्यून जातकास विलक्षण कल्पनाशक्ति प्रदान करितो. हा कवि, संगीतज्ञ, कलाकार, पेंटर ई. करता लाभदायक आाहे.

नेपच्यून जातकास स्वप्नमय, कल्पनायुक्त अथवा काळी जादू माहित असणे अथवा अति धार्मिक होणे, अथवा विलक्षण कल्पनाती प्रेमासंबंधी मामल्यामध्ये अधिकाधिक रसिक बनवितो. गुप्त संबंध राखण्यात रुची असू शकते. नेपच्यून प्रधान जातकांना समजणे फार कठिण असते.

नेपच्यून अनिष्ट असेल, तर तो जातक अस्थिर असेल. नेहमी परिवर्तनाचा शौकीन, अविश्वसनीयअसू शकतो. ते फक्त वरिष्ठाबद्दल विचार करतील, षडयंत्रकारी व दुस-यांना नुकसानदायक प्रयत्न करतात. ते दुस-याना जास्त मात्रेत औषध, विष नशीला पदार्थ अथवा अफू सारखे पदार्थ देऊ शकतात.

शारीरिक आकृती : नेपच्यून नाडी मंडळ, रेटीना व डोळ्याच्या नसा ई. दर्शवतो.

आजार : डोळ्यांचे त्रास, मेंदूचे विकार, शिथिलता, मूर्च्छा, मानसिक व्यवधान, वेड, जलोदर, मादक पदार्थ, कोड, एलर्जी ई.

व्यवसाय : ज्योतिषी, जादूगार, दार्शनिक, अध्यात्मिक गुरु, कवि, संगीतज्ञ, सितार, वाद्य संगीत, नाटक, सिनेमा, आर्ट, पेन्ट, ड्रगिस्ट, मादक पेय, पदार्थ, तंबाखु, अफूचा व्यापारी, गैस प्लांट, विमान, जहाज, मासे, दवाखाना, आश्रम, कारागृहात मध्ये नोकरी, चहा बागायत, पेट्रोल, खाण मध्ये नोकरी, तेल किंवा क्लोरोफार्मचा व्यापारी, ईश्वर, नकली रेशीम, कोल्ड ड्रिंक व्यापारी ई.

स्थान : हवाई मार्ग, जलमार्ग, बंदर, कस्टम, एक्साइज, मत्स्य गृह, दारू, मादक पदार्थ, दवाखाना, कारागृह, आश्रम, गुप्त संस्था, शरणार्थी कैम्प, दुष्काळी छावण्या, साम्यवाद ई.

उत्पादक : चहा, विषारी औषधी, तेल, पेट्रोल, कलोरोफार्म, अफू, देवाच्या मुर्त्या, कलाकृती,  नायलान, जेरेनियम ई.

शुभ रंग : चमकता गुलाब किंवा फिक्कट पिवळा रंग.

शुभ अंक : ७, १६, २५, ३४ इत्यादि.

शुभ दिवस : सोमवार, गुरुवार.

हस्ताक्षर : अस्थिर, मोडकया, वाकड्या रेषा, वादळासारखे अनिश्चित हस्तलेखन असते.

नेपच्यूनची राशी स्थित स्थूल फळे :

मेष राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर विचार व भावना तीव्र बनवितों, धार्मिक, उत्साही, शक्ति संपन्नता, साहसी, रहस्यमय, अनुभव व विश्वास, यात्राचा शौकीन, सहानुभूतिवाला, व दानशूर असतो. नेपच्यून पीडित असेल, तर समाजाशी वैर, प्रसंगी चाकूने हत्या करण्यास मागे-पुढे न पाहणारा, एखाद्यास पळवून नेणे ई. अवगुण असतील.

वृषभ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर जातकाचे प्राप्ति मध्ये वृद्धि, बचत, व्यापार, सौंदर्य प्रेमी, दयाळू, मित्रांची आवड, संगीत मध्ये विशेष रूपाने वाद्य संगीतामध्ये रुची व कार्य, विनोदी, जमीन जुमल्याची प्राप्ति, भवन, मीठा द्वारे प्राप्ति व लाभ ई. नेपच्यून पीडित असेल, तर शत्रुमय, वैवाहिक आयुष्यात निराशा, जोडीदाराची कमी, धोका व भयंकर घटना होतात.

मिथुन राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर असामान्य बुद्धि, अंतर्ज्ञान, दूरदर्शिता, असाधारण तेज, उत्तम वक्ता, विलक्षण तर्कबुद्धी, ज्योतिषाचा विकास, आत्म- निरीक्षण, प्रेरणा, कल्पनाशक्ति, प्रवासाची आवड, उत्तम मैकेनिक अथवा उत्तम गणितज्ञ ई.  नेपच्यून पीडित असेल, तर अस्थिरता, अनिश्चितता, आरामहीन, चतुर घोडेस्वार ई.

कर्क राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर दयाळू, सहानुभूतिपूर्ण, प्रेमी, अंतर्ज्ञानी, दुःखी लोकांना मदत करणारा, आत्मिक बळाच्या विकासा करिता मदत करणारा, मनोवैज्ञानिक शाखा द्वारे लाभ, सुखी पारिवारिक वातावरणाचा शौकीन, नेहमी घर बदलणारा ई. नेपच्यून पीडित असेल, तर भूतबाधा असलेल्या घरात वास्तव्य.

सिंह राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर क्रियाशील मेंदू, भावनायुक्त, अत्यधिक प्रेमी, सहयोगीचा शौकीन, समाजप्रिय,खेळाची आवड, उदार व शैक्षणिक कार्यामध्ये लाभदायक,  संगीत, पेटिंग, सिनेमा, नाटक, कविता मध्ये सफलता, नेपच्यून पीडित असेल, तर प्रेमात निराशा व संतति मध्ये निराशा, लाजाळू, नम्र व भित्रा, अस्थिरतावादी, अनिश्चयी ई.

कन्या राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अतिशय बुद्धिमान, अंतर्ज्ञानी, प्रेरणायुक्त, भविष्यवेत्ता, भक्ती व आत्मचिंतन, जहाज, इंजीनियरिंग, क्लर्क, नर्स, गणित, अकाउन्ट्स, ऑडिट, जन स्वास्थ्य कार्यामध्ये उत्तम सफलता ई. नेपच्यून पीडित असेल, तर अनेक आजारांनी ग्रस्त व त्रस्त, प्रेमात अतिरेकी भावूक ई.

तुळ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अध्यात्मिक दलाचा विकास, संगीत, पेटिंग, नृत्य, कविता ई. मध्ये निपुण, सहयोगिच्या संगती मध्ये राहून जीवनाचा आनंद घेतो, उत्तम कल्पना, सुंदर विपरित यौनद्वारे आकर्षित, नेपच्यून पीडित असेल, तर कधीही जोडीदाराशी प्रतारणा, अवैध संबंध ठेवणारा, जोडीदारास धोका देणारा, पति अथवा पत्नी अविश्वसनीय ई.

वृश्चिक राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर विचार व भावना अत्यधिक असेल, शक्ति व उत्साह प्रदान करतो. विज्ञानाकडे ओढा, रहस्यमय विज्ञानामध्ये संशोधन, प्रकृतिचे रहस्य उकल करण्याची शक्ति, विज्ञानी जीवन, दारुडा, पार्टनरशिप मध्ये लाभ, विमा, पैतृक संपत्ति व आत्मशक्ति, रहस्यमय विज्ञानाचा व्यावहारिक प्रयोग ई. नेपच्यून पीडित असेल, तर  बुडणे, दुर्घटना होणे, अथवा औषधा मुळे मृत्यु होतो.

धनु राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर वास्तविक, भक्ति, प्रेरणा, धार्मिकता वादी, भविष्य कथन, संतांची स्वप्ने, वास्तविक दृष्टिकोण, लांबचा प्रवास, संतोषकारक सुख, मनोवैज्ञानिक अनुभव ई. नेपच्यून पीडित असेल, तर वाईट स्वप्न, खतरनाक दृष्टिकोण,  आरामहीन, प्रवासामध्ये विघ्न, व राजनीति मध्ये असफलता ई.

मकर राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर योजनाबद्ध मेंदू, मनन करणारे डोके, गंभीर प्रकृति, ध्यान करिता उत्तम, मोठा आघात, एक चांगला टेहळणीखोर, गंभीर समस्या सोडवू शकणारा, रहस्यमय व वैज्ञानिक शाखा संशोधन, कला व संगीत द्वारे लाभ ई.

कुंभ राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर अंतर्ज्ञानी, अनुभवी, प्राकृतिक दृष्याचा शौकीन, आशावादी, स्वप्न मुक्त, आदर्शवादी, सामाजिक सफलता, मानसिक विकास, मानवीय सहानुभूतिपूर्ण, चांगल्या दृष्टीत असेल तर, मित्र द्वारे लाभ व वाईट दृष्टि नुकसान, बेअब्रू, अपकीर्ति, अडचणी, निराशा ई.

मीन राशीत : नेपच्यून शुभ स्थिती मध्ये असेल, तर चांगला विचारक, उतम कल्पना, गंभीर दृष्टिकोण, प्रेरक, मध्यस्थताचे गुण, रहस्याचा शोध, शुभ दृष्टि जहाज द्वारे लाभ दर्शवतो नेपच्यून पीडित असेल, तर तो गुप्त शत्रु, धोका, प्रेतात्मक द्वारा कष्ट, कारावास, दारू सारख्या व्यसना पासून कष्ट ई.

नेपच्यूनची स्थित स्थानानुसार स्थूल फळे :

१ ले स्थान : मध्यस्थवादी, स्वप्न, मूर्च्छा, प्राण्याची भावना, चांगली प्रेरणा, दूरदर्शिता ब्रम्हसंबंधी शक्ति, जहाज अथवा तरळ पदार्थ द्वारा लाभ, कला मध्ये चांगली रुचि,

२ रे स्थान : तरळ पदार्थ द्वारा लाभ, साधारण, जीवनावश्यक वस्तु द्वारे लाभ, गुप्त व रहस्याचे मामले, शुम दृष्टि आर्थिक सफलता, दवाखाना, आश्रम, स्वास्थ्य गृह व जहाज, जलतरण, संरक्षित खाजगी सोसायटी ई. मध्ये नोकरी दर्शवतो. जर पीड़ित असेल, तर कधीही व्यापार करू नये, हा चुकीची संगत देतो. धोका व षडयंत्राद्वारे हानि,

३ रे स्थान : प्रेरक, लेखणी व पत्र-व्यवहार उच्च, आदर्श, संबंधी द्वारे अडचणी, अनेक लहान यात्रा, जर पीडित असेल तर दुस-याचे जागा, घोड्यापासून धोका ई.

४ थे स्थान : पारिवारिक जीवनामध्ये आध्यात्मिक वातावरण, निवास मध्ये परिवर्तन व तीर्थ यात्रा.

५ वे स्थान : उत्तम जलतरणपटू, भावुक, प्रेमी, लैंगिक आनंद, तेल कंपनी, शेअर वा जहाज द्वारे लाभ

६ वे स्थान : ब्रम्ह संबंधी शाखा, गुप्त प्रेतात्मा द्वारा धोका, नोकरा द्वारे हानि, जुने व लवकर बरे न होणारे आजार, शरिराला पोखरणारे आजार, मादक पदार्थ, व्यसने बंद करा तर स्वास्थ्य उत्तम राहील. कोंबडी पालन व पशु करिता प्रतिकूल.

७ वे स्थान : जर पीडित असेल तर तो अविश्वसनीय, जोडीदाराचे आजारपण, धोका, चालबाजी, पारिवारिक कष्ट, प्रेमात शंका, दोन प्रेमिका अथवा दोन विवाह

८ वे स्थान : पत्नी द्वारा लाभ, विचित्र, भयंकर, ब्रम्ह संबंधी स्वप्नाचे अनुभव, बुडणे अथवा विषाद्वारे अथवा मुर्छे चा धोका

९ वे स्थान : आध्यात्मिक ज्ञान, दर्शनशास्त्र, दीर्घयात्रा, करणी, पत्नीचे संदर्भात मुकादमाचे भय

१० वे स्थान : महत्वाकांक्षी, प्रेरक, नेतृत्व, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, कला व विज्ञानामध्ये निपुण, आध्यात्मिक पदाकडे जोड़ा, पैतृक संपत्ति द्वारे लाभ, तरळ पदार्थ, दवाखाना, खाजगी सुरक्षित सोसायटी, समुद्र व संगीत, मासे, लेखन ई.

११ वे स्थान : इच्छापूर्ती, चांगले मित्र, कवि करिता उत्तम, संगीतज्ञ, नाईट क्लब, समुद्र जलतरण पटू, मासेमारी ई.

१२ वे स्थान : विज्ञान रहस्य संशोधन, मोठ्या संस्था, दवाखाना, आश्रम, कारागृह ई. मध्ये नोकरी, जर पीडित असेल, तर धोका, कलंक, दु:ख, गुप्त शत्रु कारावासाची भीती ई.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

नक्षत्र गोचरी पद्धत


विषय : नक्षत्र गोचरी पद्धत

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कुंडलीची गोलंदाजी

नमस्कार,

भविष्य कथनाच्या अनेक विविध पद्धती ज्योतिष शास्त्रात पूर्वापार चालत आलेल्या आहेत. कोणी दशा पद्धत वापरेल, काहीजण राशी गोचर ला महत्व देतील, कोणी अंक शास्त्र, कोणी कृष्मुर्ती पद्धत उपयोगात आणेल. कोणी दिन वर्ष पद्धतीचा वापर करतो.

अशीच एक जुनी व सहज सोपी पद्धत आज पाहणार आहोत ती म्हणजे नक्षत्र गोचरी.

क्रांतीवृत्ताचे ३६० अंशाचे १२ विभाग केले असता राशी चक्र तयार होते, तसेच ३६० अंशाचे २७ नक्षत्रांमधे विभाजन करून नक्षत्र चक्र तयार होते. एका ग्रहाच्या मालकीची ३ नक्षत्रे असतात. या नक्षत्र चक्र आणि राशी चक्राची फ़ार सुंदर गुफ़ण करण्यात आली आहे. थोड्क्यात १ नक्षत्र म्हणजे १३ अंश २० कला चा एक विभाग. सहाजिकच राशीफ़लात सुक्ष्मता आणण्यासाठी नक्षत्र विभागाचा उपयोग होतो. या नक्षत्रांचा क्रम ठरलेला असतो. मेष राशीतील अश्विनी हे पहिले नक्षत्र जे केतूचे आहे तिथुन सुरु होऊन केतू, शुक्र, रवी, चंद्र, मंगळ, राहू, गुरु, शनी, बुध व परत केतू पासून बुध पर्यंत अशा क्रमाने ३ वेळा ९ ग्रह मिळून २७ नक्षत्रांचे एक चक्र पूर्ण होते. थोडक्यात ९ ग्रहांची एक माला १२० अंशात पूर्ण होते. १२० अंश गुणिले ३ माला बरोबर ३६० अंश.

जातकाचे जन्माचे वेळी ज्या नक्षत्रात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र फार महत्त्वाचे असते. नक्षत्रावरुन रास समजते, राशिवरुन चंद्र समजतो त्यावरुन मन व मनावरुन वासना सर्व गोष्टी मनावर अवलंबून असतात. मनाचे समाधान म्हणजे सर्वसमाधान, मन, वासना व देह हे त्रिकुट रोजचे जीवन जगत असते. त्याच्याशी निसर्गाचा व समाजाचा संबंध येऊन अडचणी व दुःखे येतात.

ही नक्षत्र गोचरी एका दृष्टीने राशिगोचरी पेक्षाही अधिक महत्त्वाची आहे. राशि हा ३० अं. भाग आहे व नक्षत्र १३ अं. २० क. चा भाग आहे. म्हणजे एकाराशीत २। नक्षत्रे येतात. नक्षत्र राशीपेक्षा जास्त सूक्ष्म भाग असल्याने फलादेशातही अधिक सूक्ष्मता येते. नक्षत्रांचे नऊ नऊ नक्षत्रांचा एक असे तीन वर्ग करून जन्म नक्षत्रापासून दर एक नक्षत्रास निरनिराळे फल खालीलप्रमाणे कल्पिले आहे.

जन्मसंपद्विपत्कोमः प्रत्वरः साधकस्त्या । नैधनो मित्रवर्गश्च परमो मैत्र एवच ।।

जन्म नक्षत्रापासून

१ ले नक्षत्र : उत्पत्तिकर

२ रे नक्षत्र : संपत्कर

३ रे नक्षत्र : विपत्तिदायक (अनिष्ट)

४ थे नक्षत्र : क्षेमकर

५ वे नक्षत्र : प्रयाणदर्शक (अनिष्ट)

६ वे नक्षत्र : साधकतादर्शक

७ वे नक्षत्र : मृत्युदायक (अनिष्ट)

८ वे नक्षत्र : मित्र प्राप्ती दर्शक

९ वे नक्षत्र : नक्षत्र : परममित्ररुप.

असा हा फळदर्शक क्रम आहे. नऊ नक्षत्रांचा एक क्रम पूर्ण झाल्यावर याच क्रमाने १० व्या पासून सुरुवात करावयाची. जातकाच्या जन्मनक्षत्रापासून ३ ५ ७ वे नक्षत्रात ज्यावेळेला गोचर ग्रह येतात, तेव्हा ते त्रासदायक ठरतात. मंद ग्रहांच्या वक्री ग्रहांचा परिणाम जास्त होतो. पंचांगात प्रत्येक ग्रहांचा नक्षत्र प्रवेश दिलेला असतो. त्याचा अभ्यास करावा.

मानवाला नेहमी प्रकाशाचा प्रभाव असावा असे वाटते. अंधाराचा प्रभाव सहन होत नाही. ठराविक काळात माणसाच्या बुध्दीला जडत्व येऊन विचार सुचत नाही. बुध्दी ठाम निर्णय घेऊ शकत नाही, संभ्रम होतो. जन्म नक्षत्रापासून ३-या, ५व्या, ७व्या, नक्षत्रात नुसते चंद्राचे भ्रमण झाले, तरी मनाच्या विरुध्द घटना घडतात, असा अनुभव येतो. पापग्रहांचे भ्रमण त्रासदायक जाते.

जन्मनक्षत्रापासून ३,५,७, वी दशा किंवा अंतर्दशा त्रासदायक जातात. जन्म नक्षत्र निश्चित माहित असले की, या गोष्टी पाहणे फार सोपे जाते. हा नऊ, नऊ नक्षत्राचा एक गट प्रभावीपणे मार्गदर्शक ठरतो.

जन्मचंद्रापासून रवि ३,५,७ व्या नक्षत्रात असल्यास व वर्षाने परत त्याच नक्षत्रात येतो त्यावेळेस जन्मतः जो ऋतु असतो त्या ऋतुसंबंधी प्रकृतीस त्रासदायक होतो. सर्व जगाच्या पाठीवर ऋतु मुख्यधरुन सण येत असतात म्हणुन ज्योतिष शास्त्र दृष्ट्या ऋतुमानाप्रमाणे आरोग्याबद्दल विचार करावयाचा म्हणजे रविच्या भ्रमणाचा परिणाम इतर ग्रहांच्या तुलनेने करावा लागेल. कारण रविच्या भ्रमणामुळे ऋतु आढळून येतात. आपले जन्मनक्षत्र समजले म्हणजे त्या त्या तक्त्यात प्रत्येक नक्षत्रात रवि केंव्हा येतो हे समजते उदा.- रविचे भ्रमण मेष राशीत आहे म्हणजे अश्विनी, भरणी, कृत्तिका ह्या नक्षत्रातून आहे. इंग्रजी महिन्याप्रमाणे एप्रिल मध्यापासून मे मध्यापर्यंत असते. त्यावेळी उष्णतासुध्दा सारखी वाढत्या प्रमाणात असते अशावेळी मंगळ सुध्दा मेषेला असल्यास उष्णतेचे प्रमाण भयंकर असते त्यावेळी ज्यांचे ३, ५, ७, नक्षत्रे येत असल्यास त्यांना सनस्ट्रोक, आगी लागणे वगैरे त्रास होतो रक्तदाब वाढतो. काही वेळेस मेंदूमध्ये सुध्दा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मेष ही चर राशी असल्यामुळे रविचे त्यातील नक्षत्राचे आस्तित्वामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन गोवर कांजिण्या सारखे सांसर्गिक रोग संभवतात व सामुदायिक रित्या ते ते नक्षत्र त्या मुलांना वाईट असते. असा अनुभव त्या त्या काळात येतो. सामुदायिक अपघाताच्या बाबतीतसुध्दा या नुसार संशोधन झाले पाहिजे. म्हणून प्रत्येकाने पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या तीन नक्षत्रांचा अभ्यास केला तरी बरेच काही हाती येईल. अनुभवांती व सरावाने आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे तक्त्यातील ९,९ गट पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यांत कसे येतात व त्यातील रविचे भ्रमण ३,५,७ नक्षत्रामध्ये असतांना कसा त्रास होतो हा अभ्यासाचा विषय आहे. माझ्या अल्पमतीने ह्यावर मी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्यावर प्रत्येकाने अनुभव घेऊन संशोधन करावे ही विनंती.

९ या अंकाला जन्मापासूनच महत्त्व आहे. एखाद्या जातकाचा जन्म आश्लेषा नक्षत्रावर झाला म्हणजे बुधाची नक्षत्रे आश्लेषा, जेष्ठा आणि रेवती या नक्षत्रावर अगर पुष्य हा परममित्र नक्षत्रावर गर्भधारणा झाली असे समजावे. सर्वसाधारण ९ महिने ९ दिवसानी बालकाचा जन्म होतो ते २७९ दिवस येतात त्याची बेरीज ९ च येते. नव ग्रहांना विंशोत्तरी दशेत स्थान देण्यात आले आहे. ९ ग्रहांचे ३ मालिका मिळून २७ नक्षत्रांचे चक्र पूर्ण होते. २७ ची बेरीज ९ च येते. २७ नक्षत्रे ३६० अंशात समाविष्ट असतात, ३६० याची बेरीज ९ च येते. अधिक सूक्ष्मता येण्यासाठी नवमांश स्वामी देखील अभ्यासावा. तो जन्म नक्षत्रापासून कितव्या नक्षत्राचा स्वामी आहे त्यावरून फळ शुभ अथवा अनिष्ट असेल हे ठरवता येईल. प्रत्येक नक्षत्रात ४ चरणे अशी २७ नक्षत्रे मिळून १०८ चरण होतात, ज्याची बेरीज देखील ९ येते. त्यामुळे जप माळ १०८ मण्यांची असते. ९ वे स्थान हे भाग्याचे, उपासनेचे, धार्मिकतेचे, प्रगतीचे आयुष्यातील महत्व दर्शवणारे स्थान असते. याच पध्दतीवर हल्लीच्या राशिगोचरी आलेली आहे. सूक्ष्मतेने पाहिले तर ६/८/१२ ही त्रिक स्थाने नेहमी अशुभ मानतात. जन्मलग्नापासून किंवा जन्मराशी पासून ६व्या राशीच्या आरंभी तिसरे म्हणजे विपत्तिदायक नक्षत्र येते. आठव्या राशीच्या प्रारंभी दुसऱ्या क्रमातील सातवे किंवा नैधन (वध) नक्षत्र येते. १२ व्या राशीच्या आरंभी २५ वे म्हणजे तिसऱ्या क्रमातील ७वे किंवा पुनः नैधन नक्षत्रच येते ही सर्व नक्षत्रे अशुभ फलदर्शक आहेत. हीच स्थिती शुभयोगांची. जन्मस्थ लग्न किंवा चंद्रापासून ५ वी ९ वी त्रिकोणराशि असल्याने शुभ असते. या राशीच्या प्रारंभी जन्म, कर्म म्हणजेच शुभ नक्षत्रे येतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विचार


विषय : पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण पूर्वाफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ११ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी आहे. पूर्वा व उत्तराफाल्गुनी या चार ताऱ्यांचा मिळून चौकोन तयार होतो. या नक्षत्रामध्ये दोन तारे असून ते थोड्या पांढऱ्या व जरा फिक्कट आहेत. फाल्गुन महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. मघाच्या कोयत्याच्या खाली या नक्षत्राचे तारे असतात. इंग्रजीमध्ये या नक्षत्राला ‘थीट लिओनीस’ असे म्हणतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचे ४ ही चरण सिंह राशीत असल्याने हे नक्षत्र एकपाद नक्षत्र आहे. हे अधोमुख, क्रूर, मनुष्यगणी व सुलोचनी आहे. नक्षत्र दैवत भाग्य देवता, नक्षत्र स्वामी शुक्र व राशी स्वामी सूर्य आहे. म्हणून या नक्षत्रात रवीचा मानीपणा व अधिकारलालसा व शुक्राचा रंगेलपणा यांचा मिलाफ दिसून येतो.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये सत्त्वरजमिश्रित गुणधर्म आढळून येतात. त्यात रजोगुण जास्त प्रमाणात असतात. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक बुद्धीमान, धूर्त, व्यवहारकुशल, थोड्या आपमतलबी, गर्विष्ठ, चैनी, विलासी, ख्याली-खुशालीत दंग, भोगी, स्वच्छंदी, व्यसनी, प्रवासी वृत्तीच्या, फारशी महत्त्वाकांक्षा किंवा ध्येयहीन, पण शूर, पराक्रमी व धाडसी असू शकतात. पूर्वाफाल्गुनी हे नक्षत्र स्वतःच्या पराक्रमाने व कर्तबगारीने पुढे येणारे आहे.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विशेषत: पाश्चात्य खेळ व कला यांना अधिक चांगले वाटते. उदा. बॉक्सिंग, क्रिकेट, टेबल टेनिस, स्विमिंग, ड्रायव्हिंग, बॅडमिंटन, विमानविद्या यात चांगले यश देते. बास्केटबॉल, विशेषतः या नक्षत्रात शुक्र किवा चंद्र असून त्याचा राहू किवा मंगळाशी शुभ योग असता हे निश्चित आढळून येते. त्यांच्या प्रत्येक हालचालीत आकर्षकता व सफाई आढळते.

पूर्वाफाल्गुनी जातक स्त्रियांना हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया पुरुषी बांध्याच्या व जरा राकट, उफाड्याचे शरीर, थोड्या मर्दानी थाटाच्या आढळतात. कोमलपणा किंवा नाजूकपणा थोडा कमीच. स्वभावही थोडासा फटकळ, मानी, चैनी, रजोगुणी, खावे, प्यावे व मजा करावी असा असू शकतो. सेवावृत्ती कमी आढळून येते. घरापेक्षा बाहेर मिरवण्याकडे जास्त लक्ष असते. पुरुषांप्रमाणेच त्या धीट, धाडसी, पराक्रमी, कर्तबगार असतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे आरोग्यासाठी चांगले आहे. प्रकृती कणखर असते. हे जातक कधीही साध्या तापाने अंथरूणावर पकडलेले दिसणार नाहीत. यांना होणारे रोग थोडे दाहक स्वरूपाचे आहेत. उष्ण प्रकृती असल्याने अतिशय उष्णता होणे, डोळे जळजळणे, अंगाची लाही लाही होणे, डोके दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, हाड मोडणे, जखमा, ऑपरेशन यापासून त्रास संभवतो. थोडी व्यसनाधीन प्रवृत्ती असल्याने अति मद्य सेवनामुळे पोटात कावीळ होणे, पित्त होणे, गुप्तरोग यापासून त्रास संभवतो. स्त्रियांना या नक्षत्रात चंद्र किंवा शुक्र असता पाळीच्या वेळी त्रास होऊ शकतो. यांना हृदयविकार संभवत नाही.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्राखाली इंजिनियर, यांत्रिक कामासंबंधी शिक्षण घेतलेला कुशल कामगार वर्ग, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू अधिकारी, कस्टम ऑफिसर्स, पोलिस किंवा लष्करी खात्यातील लोक, कारखानदार, फॉरेस्टर किंवा बऱ्याच ठिकाणचा अंमलबजावणी खात्यातील वर्ग येतो. या नक्षत्राखाली जातकांचा अनुभव असा येतो की यांनी काम शासकीय किंवा अंमलबजावणीचे असले तरी त्यांना प्रत्यक्षपणे अधिकाराची जाग मिळत नाही.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री रवी पुष्कळ अनुकूल असतो. रवी असता या व्यक्ती फार मानी, गर्विष्ठ व थोड्या त्रासिक असतात. पण उच्चपदे, अधिकारयोग व कर्तबगारी यांना चांगला.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री चंद्र पुष्कळसा चांगला. उत्तम खेळाडू, आनंदी, शौकीन, ऐहिक सौख्य भोगणारा असतो. विद्या कमी ओढ असु शकतो.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती उत्तम असते. शरीर वैशिष्ट्य दिसून येते. हाडापेराने मजबूत, पिळदार शरीराचे असते. स्वभाव फार तापट व भडक असतो. पण स्वपराक्रम, धाडस व कर्तबगारीने पुढे येतो. मल्लविद्या, लष्करी शिक्षण, इंजिनिअरग, शस्त्रक्रिया यांना मंगर चांगला, अधिकारयोग मिळतोच.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री बुध असता फारसे अनुकूल नाही. विद्या व बुद्धीनिष्ठतेकडे कमी ओढ असतो. थोडा स्वार्थी व काटकसरी असतो. नोकरी सामान्य प्रतीचीच मिळते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री गुरु उत्तम असतो. शरीर प्रकृती बळकट व देहयष्टी भरदार असते. हाडापेराने मजबूत व सशक्त असतात. धन चांगले मिळते. मोठ्या अधिकाराच्या जागा मिळतात. प्रापंचिक ओढ जास्त असते. मात्र या नक्षत्रातील गुरुच्या व्यक्ती उदार किंवा उदात्त वृत्तीच्या नसून थोड्या स्वार्थीच असतात. संतती अल्प, पण होते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शुक्र ऐहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला. तो पाश्चात्य कलांना फार चांगला. तो नीटनेटका व व्यवस्थित राहणारा असतो. फॅन्सी, पोषाख, वस्तू, अत्तरे, तेले, मोती, जवाहिरे, चैनीच्या वस्तू. छानछोकीपणा यांची फार आवड असते. खावे, प्यावे, मजा करावी व आयुष्यातील दिवस घालवावेत ही वृत्ती असते. बऱ्याच वेळा पुरुषांच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र असता ते स्त्रियांचे द्वेषी असतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शनि प्रतिकूल असतो. शरीरप्रकृती उत्तम असली तरी बांधा ऐटबाज नसून हाडाळ असतो. श्रम, कष्ट, धडपड, दगदग फार पडते.. त्यामानाने आवक कमी असते. अपयश फार असते. पैसा कमी मिळतो. संकटे व दुःखाचे प्रसंग फार येतात.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री राहू उत्तम प्रकारची शरीरप्रकृती देतो. या व्यक्ती शूर, पराक्रमी, धाडसी, कर्तबगार असून अधिकार भोगणाऱ्या असतात. मात्र चैन, विलास व बिघडलेला राहू असता गुन्हेगारीकडे प्रवृत्ती असते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री केतू असता शरीर प्रकृती बरी पण इतर दृष्टीने मध्यम, त्यागी वृत्ती असते. दगदग, कष्ट फार व नोकरीच (सेवा) करावी लागते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री हर्षल या नक्षत्रात शरीरप्रकृती बरी देतो पण जरा लहरी व विक्षिप्त व हेकेखोर असतो. गणित, इंजिनिअरिंग, विमानविद्या यांना चांगला.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नेपच्यून अंतर्ज्ञान, साक्षात्कार, गूढ विद्या, संशोधन, कला, ललितवाङ्मय यांना चांगला. चंद्र किवा शुक्र नेपच्यूनची युती फारच इष्ट असते.

पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नक्षत्र पांढरे व फिक्कट असल्याने हस्ताक्षर बारीक उभट पण एका रेषेत व व्यवस्थित असते. नक्षत्रावर ६ या अंकाचे वर्चस्व आहे व शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो. सुलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाही. काही वेळा प्रबल ग्रहयोग अनुकूल असल्यास उत्तरेकडे ती वस्तू सापडण्याची शक्यता असते. मुहूर्त शास्त्रामध्ये हे नक्षत्र मौली, विद्यारंभ, अष्टप्राशन, बाळंतिणीला स्नान घालणे अशा चांगले.  अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर खणण्यास आरंभ करणे, द्यूत खेळणे यांना चांगले तसेच उग्र क्रूर नक्षत्र असल्याने थात, अग्निकर्म, विष शास्त्रादी प्रयोग यात यश मिळते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अमावस्या योग


विषय : अमावस्या योग

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : भारतीय संस्कृती कोश व कुंडली मंथन

नमस्कार,

“अमावस्या” या शब्दालाच पूर्वापार गूढ वलय प्राप्त झाले आहे. नुसते अमावस्या म्हटलं, तरी अनेकांच्या मनात अशुभत्वाची पाल चुकचुकते. वास्तविकत: ही सूर्य व चंद्राची एक आकाशस्थ स्थिती आहे, जिच्यामुळे काही फळे निर्माण होत असतात.

रवी चंद्राच्या भ्रमणामुळे तिथी निर्माण होतात. चंद्राची गती सूर्याच्या गतीपेक्षा जास्त  असल्याने चंद्र नेहमीच सूर्याच्या पुढे जातो. सूर्याच्या पुढे जात असताना चंद्र सूर्याच्या भोगाचे १२ अंश कापण्यास चंद्रास लागणारा काळ म्हणजे एक तिथी मानली जाते. चंद्र हा कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेस पूर्णचंद्र आपल्याला दर्शन देतो. त्यानंतर उतरत्या क्रमाने त्याच्या कला कमी होत  अमावास्येला तो दिसेनासा होतो. या कला म्हणजेच चांद्रमासाची एकेक तिथी होय. या तिथीस प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी अशी नावे आहेत. पंचांगानुसार अमावस्या ही चंद्र महिन्याची ३० वी तिथी आणि कृष्ण पक्षाची शेवटची तिथी आहे. अमा म्हणजे गोळा होणे आणि वास म्हणजे वास करणे, राहणे. चंद्र आणि सूर्य युतीत आल्याची आकाशस्थ स्थिती अथवा तिथी म्हणजे ‘अमावस्या’. ज्यावेळी सूर्य आणि चंद्र यांचे क्रांतीवृत्तावरील आरंभ स्थानापासूनचे अंतर म्हणजेच भोग राशी, अंश, कला, विकलांनी समान होते, त्यावेळी अमावास्या संपते.

अमावस्या हे नाव कसे पडले असावे या विषयी मत्स्य पुराणाच्या १४ व्या अध्यायात एक रूपक कथा ऐकिवात आहे, त्यानुसार- प्राचीन काळी देवांच्या पूर्वजांनी ‘अछोड’ नावाचा तलाव बांधला होता. या देव पूर्वजांना ‘अमावसु’ नावाची एक मानस कन्या होती. तिने एकदा एक हजार वर्षे कठोर तपश्चर्या केली. म्हणून, देव पूर्वज प्रसन्न होऊन वर देण्यासाठी आले. त्यांच्यापैकी एक  अतिशय तेजस्वी पुरुष मुग्ध झाला आणि अमावसुकडे प्रेमाची याचना करू लागला. पण अमावसू चे मन यासाठी तयार नव्हते. अमावासूच्या संयमामुळे त्या दिवसाची तिथी पितरांना अत्यंत प्रिय झाली. तो दिवस कृष्ण पक्षाची १५ वी तिथी होती. तेव्हापासून ती तिथी या नावाने ‘अमावस्या’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अमावास्या या तिथीची देवता ‘पितर’ असून श्राद्धकर्मादी विधी या तिथीवर करण्याबाबत आपल्या धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख आढळतो.

अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे.

ज्योतिष शास्त्रात सूर्यास आत्मा कारक व चंद्रास मनाचा कारक मानले जाते. पाश्चात्य सूर्य राशीस महत्व देतात, तर आपल्याकडे चंद्र फलज्योतिष शास्त्रात महत्वाची भूमिका बजावतो. ज्योतिषी चंद्र कुंडलीचा विचार, ग्रहांच्या गोचर भ्रमणाशी पडताळून, भविष्य कथन करत असतो. विशोत्तरी दशा पद्धतीत जन्म काळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, तेथून महादशा सुरु होते.

रवी चंद्र युती (अमावास्या योग) दिवशी सूर्याच्या ऊर्जेमुळे चंद्राची सर्व शक्ती नष्ट होते. मनाचा कारक ग्रह चंद्रच सूर्यामुळे अस्तंगत झाल्याने निर्बली असतो व चंद्राच्या कारकत्वात, तसेच ज्या स्थानाचा मालक असतो त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टी, यांच्या फळात कमतरता निर्माण करतो.जर एखाद्या जातकाचा जन्म अमावस्या योगावर असेल तर चंद्र ज्या स्थानी स्थित असेल व ज्या भावाचा स्वामी असेल त्या संबंधी फळ जन्मभर कमी प्रमाणात किंवा अनिष्ट मिळण्याची शक्यता बळावते आणि म्हणूनच ही युती भारतीय पारंपरिक ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ मानली जाते.

चंद्र मनाचा कारक असल्याने अनेकदा या योगात जातकास आपल्या आयुष्यात काय घडत आहे हे न समजणे, अनपेक्षित उलथापालथ झाल्यामुळे अस्वस्थ होणे, निर्विकारपणा, कमी निर्णयक्षमता, अलिप्तपणा, अशा अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.

चंद्र मातृकारक असल्याने जातकाचे त्याच्या आईशी सतत मतभेद होऊ शकतात.

शुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या शुभ फलित प्रदान करू शकतील.

१. कोणताही ग्रह स्व राशीवर पूर्ण दृष्टी टाकत असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मकर व कुंभ राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

२. कोणताही ग्रह स्वराशीत स्थित असेल, तर त्या स्थानाची शुभ फळे देतो. या नियमानुसार कर्क व सिंह राशीतील अमावस्या योग शुभ फळे देऊ शकेल.

३) उच्चीचे ग्रह, त्यांचे राशी अधिपती शुभ असता, शुभ फळे प्राप्त होतात. या नियमानुसार मेष व वृषभ राशीतील अमावस्या योग, त्यांचे अधिपती अनुक्रमे मंगळ आणि शुक्र शुभ असता शुभ फळे देऊ शकेल.

४) केंद्र कोणातील शुभ ग्रह शुभ फळात वाढ करतात. या उलट पाप ग्रह अशुभ फळ कमी करतात. या नियमानुसार अमावस्या योग जर कुंडलीच्या केंद्र कोणात होत असेल तर निश्चितच अशुभत्व कमी करण्यास सहाय्यक ठरेल.

अशुभ अमावस्या योग :

खालील राशीतील अमावस्या अशुभ फलिते देईल.

१) कोणताही ग्रह स्वतःचे नीचक्षेत्री असून त्याचा राशी स्वामी अशुभ असता, अशुभ फळ देतो. या नियमाप्रमाणे तूळ व वृश्चिक राशीत होणारा अमावस्या योग अनुक्रमे शुक्र, मंगळ अशुभ असता, अशुभ फळ देईल. 

२) ग्रहण युक्त अमावस्या सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येलाच होत असल्याने ग्रहण युक्त अमावस्या योग नेहमीच अशुभ फळ देईल.

३) कोणताही ग्रह कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानात असता, शुभ ग्रह शुभत्व कमी करतो, तसेच अशुभ ग्रह अशुभत्व वाढवतो. या पारंपरिक ज्योतिष तत्त्वानुसार कुंडलीच्या ६, ८ व्या स्थानातील अमावास्या अशुभ फळ देईल.

प्रत्येक राशीवर सूर्य चंद्र अमावस्या योगाचा स्थूल परिणाम :

मेष राशीमध्ये अमावस्या योग असता तुम्हाला कार्य क्षेत्रात बदल करावा असे वाटेल.

वृषभ राशीतील अमावस्या योग वृषभ राशीची तीव्रता वाढवते आणि आता तुम्ही जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास सक्षम असाल.

मिथुन राशीचा स्वभाव द्वैत आहे. एकीकडे तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल उत्साही असाल तर दुसरीकडे तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंताही असेल.

कर्क राशीचा शासक ग्रह चंद्र आहे आणि तोच अस्तंगत असल्याने आणि तो नेहमी उर्जेवर प्रभाव टाकतो.

सिंह राशीच्या जातकांसाठी अमावस्या योग सकारात्मक राहणार नाही आणि तुम्ही दिवास्वप्नात हरवले असाल. तुम्हाला समस्यांवर उपाय सापडतील पण यशस्वी होणार नाही.

कन्या राशी जातकांना  अमावस्या योग खाली खेचेल आणि काळ खूप कठीण जाईल.

तूळ या राशीत अमावस्या योग आयुष्यात अनेक बदल देऊ शकतो. तुम्हाला चांगल्या गोष्टींची गरज असेल पण तुम्हाला ती नेहमी मिळणार नाही.

वृश्चिक या राशीचे जातक अमावस्या योगात अधिक निराश होऊ शकतात आणि पुढच्या क्षणी काय होईल याची तुम्हाला खात्री नसते.

धनु राशीच्या जातकाना अमावस्या योगात  साहसी उपक्रम आवडतील.

मकर राशीचे जातक त्यांना आवडत असलेल्या क्रियाकलापांमधून मजबूत नफ्याची अपेक्षा करू शकतात, परंतु करिअरशी संबंधित समस्या नेहमीच असतील.

कुंभ राशीच्या जातकांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी त्यांच्या योजना पूर्ण कराव्या लागतील आणि जीवनात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल.

मीन राशीच्या जातकांची अनेक स्वप्ने पूर्ण होतील, परंतु तरीही त्यांना हवे ते न मिळाल्याने ते दुःखी असतील.

अमावस्या योग पीडा निवारण :

१. पूजेमध्ये कलश पूजा आणि गणेश, शिव, मातृका, प्रधान-देवता आणि नवग्रह यांसारख्या इतर देवतांची पूजा समाविष्ट आहे. कुंडलीतील अमावस्या योगाचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी यज्ञ केला जातो. चंद्र नक्षत्र किंवा अमावस्येला यज्ञ केल्यास जास्तीत जास्त लाभ मिळेल.

२. सर्वपित्री अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावा.

३. तुमच्या वडिलांचा, विशेषतः तुमच्या पालकांचा अनादर करू नका.

४. अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजूंना तांदूळ, गूळ आणि दूध यासारख्या अन्नपदार्थांचे दान करा.

५. देवी कालीची पूजा करा, कारण ती मुख्य देवता आहे, जी अमावस्या दोषाचे परिणाम कमी करण्यात मदत करू शकते.

६. सोमवारी भगवान शिवाची आराधना करा आणि ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा १०८ वेळा जप करा. कारण शंकराने चंद्राला त्याच्या शापापासून वाचण्यास मदत केली.

७. अमावस्येच्या दिवशी शाकाहारी भोजन करा.

८. अमावस्येला दान करायच्या गोष्टी : अमावस्येला चांदी, तीळ, मीठ, कापूस, गाय इत्यादींचे दान करणे ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानले जाते.

९. अमावस्येला तीर्थ क्षेत्री स्नान केल्याने त्यांची सर्व पापे धुऊन जातात आणि नवीन कामांना सुरुवात होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. या दिवशी भक्त शिवमंदिरांना भेट देतात, उपवास करतात, मनाच्या आणि आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात, ज्यामुळे आयुष्यात आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होते.

१०. अमावस्येचा उपवास : अमावस्येला उपवास करावा, म्हणजेच अन्नाशिवाय उपवास करावा, असे शास्त्रात सांगितले आहे. अमावस्येला असे काम करावे, ज्यामुळे तुम्ही देवाच्या सान्निध्यात रहाल. सांसारिक कामे शेती, व्यवसाय इत्यादी तुम्हाला देवापासून दूर नेणारी आहेत. संध्याकाळचे हवन, सत्संग, भगवंताचे स्मरण, ध्यान ई. करावे.

११. पितृपूजा (श्राद्ध) : पितरांसाठी अमावस्या तिथीला श्राद्ध आणि दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. अमावस्येच्या दिवशी पूर्वज सूर्यास्तापर्यंत वायूच्या रूपात घराच्या दारात उपस्थित राहतात आणि आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. पितरांची उपासना केल्याने मनुष्याला वय, पुत्र, कीर्ती, कीर्ती, पुष्टी, बल, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

अमावस्येला मुलगी झाली तर इष्ट की अनिष्ट ?

अमावस्येला जन्मलेल्या मुली अत्यंत शक्तिशाली मानल्या जातात. मात्र, या मुलींची सहज दिशाभूल केली जाऊ शकते आणि लोक त्यांच्या निरागसतेचा सहज गैरफायदा घेऊ शकतात, असाही एक प्रचलित समज आहे. याच कारणामुळे अमावस्येला जन्मलेल्या मुलीच्या पालकांना त्यांच्या मुली वाढल्यानंतर त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

अमावस्येला विवाह करणे इष्ट की अनिष्ट ?

चंद्र मनाचा कारक ग्रह आहे, म्हणून लग्नाच्या हेतूंसाठी अमावस्येच्या तीन दिवस आधी आणि अमावस्येनंतर तीन दिवस चंद्राच्या स्थितीत असण्याआधी शुभ किंवा कोणत्याही नकारात्मकतेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चंद्र आपला सकारात्मक प्रभाव देऊ शकत नाही.

या तारखेला खरेदी-विक्री आणि सर्व शुभ कर्मे करण्यास मनाई आहे.

अमावस्येची दिशा ईशान्य आहे.

सोमवार, मंगळवार किंवा गुरुवारी येणारी अमावस्या आणि अनुराधा, विशाखा आणि स्वाती नक्षत्रांमध्ये येणारी अमावस्या विशेषतः पवित्र मानली जाते.

अमावास्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. (ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.) सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात. भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते. आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात ती श्रावण महिन्यातली अमावस्या असते, महाराष्ट्रातल्या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावस्येला दर्भग्रहणी अमावस्या (कुशोत्पाटिनी अमावस्या) हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावस्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे. मौनी अमावस्या पौषात येते. माघ अमावस्येला द्वापारयुगादी अमावस्या म्हणतात. मार्गशीर्ष अमावस्येला वेळा अमावस्या हे नाव आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)