Category: Uncategorized

वर्ज्य गोष्टी – अनुभविक ठोकताळे


विषय : वर्ज्य गोष्टी – अनुभविक ठोकताळे

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : अचूक निदान (खंड १ ला)

मूळ लेखक : कै. उद्धव विष्णू रुईकर (पंचांग कर्ते)

नमस्कार,

ज्योतिष शास्त्राची व्याप्ती अगदी दैनंदिन आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींपासून विशिष्ट महत्वाच्या घडामोडी, मुहूर्त ई. बघण्या पर्यंत पसरली आहे. डॉक्टर अथवा वैद्य जसे निरोगी राहण्यासाठी अथवा आजार होऊ नये म्हणून रोजच्या दिनक्रमात काही पथ्ये पाळण्यास सांगतात. तसेच एक जाणकार ज्योतिषी रोजच्या व्यवहारात ग्रह, नक्षत्रे, तिथी यांचे कारकत्व, गुणधर्म ई. नुसार अनुभवातून दरवेळी कुंडली न पाहताही काही गोष्टी वर्ज्य करण्यास सांगून उत्तम दिशा देऊ शकतो. पूर्वीचे जुने जाणते लोक याचा दैनंदिन आयुष्यात खुबीने वापर करत असत. पण आज नवीन पिढीपर्यंत काही माहिती न पोहोचल्याने किंवा एकंदरीतच जीवन शैली बदलल्याने व आधुनिकता वाढल्याने या गोष्टीचे महत्व हळू हळू नाहीसे होत चालले आहे. असो.

असेच काही अनुभविक ठोकताळे व वर्ज्य करावयाच्या गोष्टींचे संकलन येथे देत आहे. अनिष्टता दूर करण्यासाठी व सकारात्मकता व निर्विघ्नता वाढीस लागण्यासाठी या छोट्या छोट्या टीप उपयुक्त ठरतील.

खालीळ गोष्टी वर्ज्य कराव्यात. (टाळाव्यात)

१. रविवारी – तैलाभ्यंग करू नये. स्त्रियांनी न्हाऊ नये.

२. मंगळवारी – स्मश्रू (हजामत) करू नये.

३. बुधवारी – स्त्री-संग करू नये.

४. सूर्यास्तानंतर – रात्री माती, शेण, सरपण, गोमूत्र घरी आणू नयेत.

५. दिवसा – निद्रा करू नये.

६. देव, गुरु, पिता, यांचेकडे व दक्षिण दिशेस पाय करून झोपू नये.

७. प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या तिथीस तैलाभ्यंग; (न्हाणे) करू नये.

८. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी – स्मश्रू (हजामत) करू नये.

९. पंचमी, दशमी, पौर्णिमा, अमावास्या स्त्रीसंग करू नये.

१०. सप्तमीस – ताम्रपात्रात भोजन करू नये. तीळ खाऊ नये.

११. अष्टमीस – नारळ, खोबरे वर्ज्य करावे.

१२. नवमीस – भोपळा वर्ज्य करावा.

१३. दशमीस – पडवळ खाऊ नये.

१४. एकादशी – पावटे, वाल, घेवडा, चवळी वर्ज्य करावी.

१५. द्वादशीस – मसुर खाऊ नये.

१६. त्रयोदशीस – वांगी वर्ज्य करावी.

१७. तृतीया, अष्टमी, त्रयोदशी – मांस खाऊ नये.

१८. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या व संक्रांत या दिवशी तेल व मांस यांचे सेवन करू नये.

१९. हस्त, चित्रा, श्रवण या नक्षत्रास तेल वर्ज्य.

२०. मघा, कृत्तिका, तिन्ही उत्तरा या नक्षत्रांवर स्त्रीसंग वर्ज्य.

२१. विशाखा – स्मश्रू करू नये.

टीप : वरील तिथी, वार, नक्षत्रावर ती कृत्ये करू नयेत, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे, तथापि नैमित्तिक कारणाने ते करणे आवश्यक असल्यास हरकत नाही.

एखादा दिवस अनिष्ट चालला असेल, तर त्या दिन स्वामी ग्रहाची अनिष्टता दूर करण्यासाठी खालील गोष्टींचे दान करणे उपयुक्त ठरेल.

१. रवि अनिष्ट असता – गहू, मूळ, ताम्रपात्र यांचे रविवारी पूजन करून संकल्पपूर्वक दान करावे. २. चंद्र अनिष्ट असता – रुपे, मोती, तांदूळ, तूप, पांढरे कापड सोमवारी विधिपूर्वक पूजा करून दान करावे.

३. मंगळ अनिष्ट असता – ताम्रपत्रावर भौमाची प्रतिमा काढून विधीपूर्वक पूजन करावे. मंगळवारी मसुरा, गूळ, तांबडे वस्त्र, ताम्रपात्र यांचे संकल्प करून दान करावे.

४. बुध अनिष्ट असता – कास्यपात्र, मूग, तूप यांचे दान करावे.

५. गुरु अनिष्ट असता – कास्यपात्र, हरभऱ्याची डाळ, साखर, पिवळे कापड याची गुरुवारी पूजा करून दान करावे.

६. शुक्र अनिष्ट असता – तांदूळ, तूप, रौप्य, चित्रवस्त्र, खडीसाखर यांचे शुक्रवारी विधीपूर्वक दान द्यावे.

७. शनि अनिष्ट असता – शनिवारी लोखंड, उडीद, तेल, मीठ, काळे कापड यांची यथाशास्त्र पूजा करून त्याचे यथाशास्त्र दान द्यावे.

८. राहू काळ अनिष्ट असता – शिसे, तीळ, तेल, दान करावे.

९. केतू चा नक्षत्र दिन अनिष्ट असता – पोलाद, तीळ, तेल दान द्यावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

राहू केतुचे ग्रह युती फळ


विषय : राहू केतुचे ग्रह युती फळ

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : हे तर नक्षत्रांचे देणे (राहू-केतू)

मुळ लेखक : डॉ.रघुवीर खटावकर

नमस्कार,

राहू-केतू हे प्रत्यक्षात ग्रह नसून पात बिंदू असले तरी अगदी वराह मिहीर च्या काळापासून त्यांनी ज्योतिष शास्त्रात महत्वाचे स्थान पटकावले आहे. राहू केतू हे मानवी जीवनावर महत्वाचे परिणाम करणारे घटक आहेत.

मध्यंतरी डॉ. खटावकर यांचे राहू व केतू विषयी समग्र माहिती देणारे एक पुस्तक वाचनात आले. अत्यंत विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे. त्यातील राहू किंवा केतूच्या युतीतील ग्रहांचे निर्माण होणारे फळ याबाबत हे एक छोटेसे संकलन आपल्या समोर ठेवत आहे.

राहू किंवा केतूच्या युतीतील रवी किंवा चंद्र (ग्रहण योग) :

राहू किंवा केतूच्या जवळ ५ अंशावर रवी किंवा चंद्र असेल, तर ज्या स्थानात आहे, त्या स्थानासंबंधी अतिशय अनिष्ट फळे निर्माण करतात. धंदा बुडणे, नोकरी गमावणे, पत कमी होणे ई. अशुभ फले दशम स्थानाशी संबंधित असता मिळतात. तर पंचमस्थानाशी संबंधित असता अनपत्य दोष निर्माण करतात.

चंद्र राहू युती हिस्टेरिया, मानसिक खिन्नता, औदासिन्य, मज्जातंतूचे विकार, फेफरे, वेडेपणा, अतिरेकी स्वभाव अशाप्रकारची फले निर्माण करते.

राहू किंवा केतूच्या युतीतील मंगळ :

राहू किंवा केतूच्या युतीतील मंगळ असणाऱ्या जातकाला जबरदस्त येतो. राग राग आवरता आवरत नाही.

राहू किंवा केतूच्या युतीतील बुध :

राहू किंवा केतूच्या युतीतील बुध न ओळखता येणारे आजार, वेडेपणा निर्माण करतो.

राहू किंवा केतूच्या युतीतील गुरु :

राहू किंवा केतूच्या युतीतील गुरु धर्माची निंदा, हेटाळणी, अवहेलना करण्याकडे पाखंडी वृत्ती निर्माण करते.

गुरू-राहू युतीला चांडाळ योग म्हणतात. गुरू सत्वगुणी, तर राहू तमोगुणी आहे. गुरू राहू परस्परांचे मित्रही नाहीत पण शत्रूही नाहीत. असे असूनही त्यांचे दुष्परिणाम जातकावर होऊ शकतात. गुरू युतीत राहूची फले सुधारतात, पण गुरूची चांगली फळे कमी होतात. गुरू-राहू युती एकावेळी पत्रिकेतील चार स्थानावर परिणाम करत असते. ते ज्या स्थानात आहेत ते स्थान, त्यापासूनचे पाचवे, सातवे व नववे स्थान. यामुळेच पत्रिकेतील ही युती अशुभ समजली जाते. तसेच गुरूच्या अशुभ योगातही राहू अशुभच फळे देतो. गोचरीच्या गुरूचे पत्रिकेतील गुरूवरून भ्रमण किंवा त्या गुरूपासून पाचवा, सातवा, नववा गुरू आल्यावर गुरूची जन्मस्थ गुरूवरील दृष्टी ही नेहमी भाग्यकारक असते. परंतु गुरू राहू युती असताना या युतीवरून गुरूचे भ्रमण किंवा या युतीच्या त्रिकोण राशीतून गुरूचे भ्रमण हे अप्रिय किंवा दुःखद घटना घडवीत असते.  यामुळे एकप्रकारे भाग्यात कमतरता येते.

राहू-गुरू व्यतिरिक्त इतर ग्रहांबरोबर राहू असताना, ही युती ज्या स्थानात आहे त्या स्थानाचे व त्यासमोरील स्थानाचे नुकसान करू शकतात.

राहू किंवा केतूच्या युतीतील शुक्र :

राहू किंवा केतूच्या युतीतील शुक्र विपरीत विषय भावना, मृदू-कोमल भावनेचा अभाव, अभिरुचीची पारख नसणे ई. दोष निर्माण करतो.

राहू किंवा केतूच्या युतीतील शनी :

राहू-शनी युती असता खिन्नता, गुन्हेगारी प्रवृत्ती, आत्मघातकी प्रवृत्ती असते, पण गुरू दृष्ट असता व्यक्ती योगी बनू शकते. राहु-मंगळ-शनी अपघात प्रवृत्ती राहते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

तत्व सिद्धांत


विषय : तत्व सिद्धांत

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : ज्योतिष सिद्धांत सार

मूळ लेखक/सौजन्य : ज्यो.रामा राव

नमस्कार,

ज्योतिष अभ्यासक होणे म्हणजे खोल सागरात डुबकी मारून मोती व विविध रत्ने वेचण्यासारखे आहे. जेवढे खोल जाऊ तेवढा जास्त खजिना नजसेस पडतो. फक्त त्यासाठी अवघे आयुष्य कमी पडते.

आपण लहानपणापासून वडीलधारे मंडळींकडून किंवा शाळेत शिकत असताना पाच तत्व महत्वाची आहेत हे ऐकत आलो आहोत. आपणा सर्वाना माहित आहे की, पंचतत्वांनी आपलं शरीर व्यापलं गेलं आहे, हीच पाच तत्व म्हणजे अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी.

आकाश तत्व :

आकाश हा एक असा घटक आहे ज्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नि आणि वायू हे चारही घटक आहेत. आकाशाला आत्म्याचा वाहक मानला जातो आकाशात ढगही येतात, धूळही उडते आणि प्रकाशही असतो. त्याचप्रमाणे सुख, दुःख, शांती अशा सर्व भावना मनातही निर्माण होत असतात.

वायू तत्व :

पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी हवेला म्हणजेच वायूला सर्वात महत्त्वाचा घटक मानलं गेलं आहे. आपलं शरीर प्राणवायू च्या जवलानावर चालते, म्हणूनच त्याला सजीव असं म्हणतात. पृथ्वी, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी ई. सर्वांनाच हवेची आवश्यकता आहे. म्हणूनच हवेला आयु म्हणजेच आयुष्य असंही संबोधलं जातं.

अग्नी तत्व :

अग्नी तत्व आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, त्याचप्रमाणे अग्नी देखील उर्जेच्या रूपात आपल्या  शरीरात वसतो. अग्नीमुळेच शरीर हालचाल करू शकते. अग्नीचा घटक उष्णता, शक्ती, ऊर्जा यांचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण म्हणजेच अग्नी तत्वाच्या समतोल साधल्याने मुख्यतः शरीर निरोगी राहते.

जल तत्व :

पाणी हा मानवाच्या जीवनाचा किंबहुना सृष्टीतल्या चराचराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मानवी शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. त्याचप्रमाणे पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने भरलेला आहे. हे पाणी माणसाच्या रक्तात आणि शरीरात असते. सजीव काही दिवस अन्नाशिवाय जगू शकतात, परंतु पाण्याशिवाय जगणं कठीण आहे.

पृथ्वी तत्व :

एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे सजीवांच्या निर्मितीसाठी पृथ्वीशिवाय इतर चार गोष्टींचीही आवश्यकता असते. पृथ्वी हे माणसाचं आणि इतर सजीवांचं निवासस्थान मानलं गेलं आहे.

ही पाच विशिष्ट कालावधीसाठी १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज (अग्नी) ४) वायू ५) आकाश या  विशिष्ट क्रमाने कार्य करतात.

सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत ते ठराविक म्हणजे प्रथम चढत्या क्रमाने फिरतात त्यास आरोह म्हटले जाते. आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेने उतरत्या क्रमाने फिरतात त्यास अवरोह म्हटले जाते.

आरोह कालावधी अनुक्रमे ६ १२ १८ २४ आणि ३० मिनिटे आहे; आरोह-अवरोहाचे प्रत्येक आवर्तन पूर्ण होण्यासाठी ३ तास लागतात. दिवसात प्रत्येकी ३ तासांची ८ चक्रे मिळून २४ तास पूर्ण होतात. प्रत्येक दिवशी सूर्योदयाच्या वेळी तत्वाचे स्वरूप आठवड्याच्या दिवसावर अवलंबून असते. खालील सारणी तपशील देते:

ज्योतिष सिद्धांत सार मध्ये या तत्वांचा उपयोग करून बालकाचा जन्म कोणत्या तत्वानुसार मुलगा का मुलगी असेल, हे समजण्यासाठी एक पद्धती दिली आहे. ज्याचा उपयोग करून जातकाने दिलेली जन्म वेळ बरोबर आहे का हे तपासण्यासाठी उपयुक्त ठरते.

त्या बाबतची माहिती येथे देत आहे.

सूर्योदयाच्या वेळी जे तत्व ज्या दिवशी उदित असते, त्यानुसार त्याच्या दिलेल्या कालावधीनुसार आरोह अवरोह क्रमाने मांडणी करून सारिणी बनवता येते.

१) पृथ्वी तत्व : पुथ्वी तत्व हे बुधवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ६ मिनिटे असतो.

जन्माच्या वेळेस पृथ्वी तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.

२) आप तत्व : आप तत्व हे सोमवारी व शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १२  मिनिटे असतो.

जन्माच्या वेळेस आप तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.

३) तेज तत्व : तेज तत्व हे रविवारी व मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १८  मिनिटे असतो.

जन्माच्या वेळेस तेज तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.

४) वायू तत्व : वायू तत्व हे शनिवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी २४ मिनिटे असतो.

जन्माच्या वेळेस वायू तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.

५) आकाश तत्व : आकाश तत्व हे गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ३० मिनिटे असतो.

जन्माच्या वेळेस आकाश तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर

१) जेव्हा पृथ्वी, तेज किंवा आकाश तत्व कार्यरत असेल, तेव्हा पुरुष बालक जन्म घेईल.

२) जेव्हा आप किंवा वायु तत्व कार्यरत असेल, तेव्हा स्त्री मूल जन्माला येईल.

३) पुरुष वाचक तत्व संपत असताना आणि स्त्री वाचक तत्व सुरू होत असताना जन्माला आलेली व्यक्ती नपुंसक असू शकते.

तत्व सिद्धांताचा त्या त्या तत्व कालावधीस दशां अंतर्दशा विभाजानासारखे अधिक विभाजीत करून तत्व अंतर तत्व अशा प्रकारे विभागले जाऊ शकते. व त्याचा सूक्ष्म वापर केला जाऊ शकतो.

जन्माच्या वेळी उदित असलेल्या तत्वाचे ज्ञान जातकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अंदाज देते.

१) पृथ्वी तत्वामध्ये जन्मलेले जातक महत्वाकांक्षी असतात. भौतिकवादी दृष्टीकोन असतो.

२) तेज तत्वामध्ये जन्मलेले जातक तेजस्वी आणि प्रभावी असतात.

३) आकाश तत्वामध्ये जन्मलेले जातकांची अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि कल्पक किंवा सर्जनशील बुद्धिमत्ता असते.

आरोह तथवा म्हणजे संधी आणि उपलब्धींमध्ये वाढत्या वयानुसार हळूहळू सुधारणा होत जाते व अवरोह तत्व कमी होत जाणारे परिणाम सूचित करते, या प्रकारे विश्लेषण करता येते.

याच पंच तत्वांचा प्रभावी वापर करून पाश्चात्य ज्योतिर्विद आलन लिओ याने प्रत्येक अंशाची फळे मांडली आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

राशीचक्राचे अंश स्वरूप (कर्क)


विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (कर्क अंश स्वरूप)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक

मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे

नमस्कार,

जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.

त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.

प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.

आज आपण राशिचक्रातील कर्क मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.

कर्क अंश स्वरूप

अंश १ ला

राफेल : एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांचा हात धरून आनंदात मजा करत आहेत.

चारुबेल : ज्याच्या मोठ्या तबकडीवरील आकडे व काटे पूर्णपणे दिसत आहेत व उंच लोलक आहेत असे एक मोठे घड्याळ.

सेफारिअल : उन्हाळ्यातील उन्हात द्राक्षांनी भरगच्च भरलेली एक द्राक्षवेल एका जुन्या भिंतीवर लोंबत आहेत.

अंश २ रा

राफेल : दोन लहान मनोऱ्यांप्रमाणे दोन स्त्रिया उगीच उभ्या आहेत.

चारुवेल : एका लतामंडपात एक मनुष्य फुलझाडास झाऱ्याने पाणी घालीत आहे.

सेफारिअल : एक कुत्रा एका मांसरहित हाडुकावर पाय देऊन उभा आहे व त्याच्यासमोर दुसरे दोघे अर्धवट उपाशी असलेले कुत्रे आहेत.

अंश ३ रा

राफेल : दोन स्त्रिया खाली बसल्या असून समोर दोन मनुष्ये उभे आहेत.

चारुबेल : जमिनीत खोल गेलेला एक खाणीचा भाग असून वरती अगदी समोर आकाशात एक विमान आहे.

सेफारिअल : खिन्न मुद्रेने बसलेली स्त्री, वने अव्यवस्थित, केश मोकळे, हातात कोमजलेल्या फुलांचा गुच्छ, त्यात काही गुलाबाची व काही लिलिची फुले आहेत.

अंश ४ था

राफेल : एक अविवाहित स्त्री उभी असून पुरुषाची वाट पहात आहे.

चारुबेल : पृथ्वीवरून कधीच दिसत नाही ती चंद्राची (दुसरी) बाजू दिसत आहे.

सेफारिअल : एक भोजनाचे टेबल ज्याच्यावर मेजवानी होऊन गेल्यानंतरचे तुकडे वगैरे उष्टे जिन्नस पडले आहेत.

अंश ५ वा

राफेल : एक स्त्री पुरुषाची वाट पहात आहे.

चारुबेल : हातात तराजू समतोल धरणारा मनुष्य.

सेफारिअल : मध्यभागात वाकलेले व तेथूनच वाकडे तिकडे वाढलेले एक लहानसे कोवळे झाड.

अंश ६ वा

राफेल : एका पितळेच्या भांड्यात शेळीला धरून उभा असलेला पुरुष.

चारुबेल : एक जमिनीचा विशेष भाग आखून ठेवला आहे. त्यावर उभे खांब व आडवे गज आहेत. या जमिनीचा लवकरच खळे करणे व घर बांधणे याकडे उपयोग करावयाचा असा बेत आहे.

सेफारिअल : श्रीमंती पोषाख केलेली स्त्री ओटीत काही रत्ने घेऊन त्यांच्याशी खेळत आहे.

अंश ७ वा

राफेल : शिंगांना वादी बांधून त्याला ओढीत नेत असलेला पुरुष.

चारुबेल : एक छानदार मोठे पिकलेले सिताफळ लोंबत असलेले दिसत आहे.

सेफारिअल : एका झाडाच्या बुंध्यावर लोखंडाचे हस्तत्राण, एक तलवार आणि एक चाबूक अशा वस्तू ठेवल्या आहेत.

अंश ८ वा

राफेल : एक घर जेथे एक स्त्री उभी आहे. जणू काय ती मागच्या बाजूने पळून जाण्याच्या विचारात आहे. चारुबेल : एका उंच वृक्षाच्या शेंड्याजवळ बांधलेच्या घंटेची दोरी एक मनुष्य ओढीत आहे.

सेफारिअल : एक पारवा जमिनीवर पडलेला आहे. त्यावर एक साप उडी घालण्याच्या तयारीत आहे.

अंश ९ वा

राफेल : उजव्या हातात पिंजऱ्याचे दंडूक असलेली स्त्री.

चारुबेल : एक कोळी घराच्या कोपऱ्यात असून मूर्ख माशांचा गरगर नाच पहात आहे व निष्काळजीपणाने त्या त्याच्या जाळ्याच्या अगदी नजीक येऊन ठेपल्या आहेत.

सेफारिअल : सुपीक अशा दऱ्यात असलेले एक खेडेगाव.

अंश १० वा

राफेल : आपल्या उजव्या हातात पेटी धरून ठेवलेला पुरुष.

चारुबेल : एक कांद्याचे झाड मातीतून नुकतेच बाहेर पडत आहे आणि आपले सौंदर्य जगाला दाखवण्यास सुरवात करीत आहे.

सेफारिअल : अतिशय विशाल असा ओक वृक्ष. त्याच्या मुळातून लहान लहान रोपें उगवले आहेत. त्याच्या शाखांवरून पक्षी ऋतुपरत्वे गायन करीत आहेत.

अंश ११ वा

राफेल : पाण्यात उभे असलेले जहाज.

चारुबेल : तंतुवाद्य वाजवीत असलेली एक तरुण कुमारी.

सेफारिअल : उथळ वाळूच्या प्रदेशात येऊन लागलेले जहाज.

अंश १२ वा

राफेल : आपल्या खांद्यावर जनावराचे कातडे टाकून नेत असलेला पुरुष.

चारुबेल : ‘सायप्रस’ नावाचे झाड.

सेफारिअल : एका कवटीजवळ ठेवलेला खंजीर.

अंश १३ वा

राफेल : एक मुलगा पुढे उघडे पुस्तक व हातात लेखणी घेऊन बसला आहे.

चारुबेल: खणीत असलेला पुरुष

सेफारिअल : एक चंद्रकोर व दुसरा बहुतेक पूर्ण असे दोन चंद्र असून त्यांच्यामध्ये पौराणिक बुधाच्या हातातली काठी आहे.

अंश १४ वा

राफेल : डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले कोकरू.

चारुबेल : जादुगाराची सर्व उपकरणे आसपास लावून प्रेक्षकासमोर उभा असलेला पुरुष.

सेफारिअल : वसंतऋतूत उत्पन्न होणाऱ्या फुलांचा गुच्छ ज्याच्यावर एक तेजःपुंज तारा असून त्याचे तेजःपुंज किरण नीलवर्ण आकाशात चमकत आहेत.

अंश १५ वा

राफेल : एक घर. त्याच्या छपराच्या खालच्या बाजूस त्याच्या राहण्याच्या जागी एक निजलेला उंदीर. चारुबेल : पाण्याचे डबके.

सेफारिअल : एका उच्च ठिकाणी ठेवलेले सिंहासन असून त्याच्या गादीवर एक कुत्रा निजला आहे.

अंश १६ वा

राफेल : एक पक्षी ज्याने पायाखाली साप धरून ठेवला आहे असा.

चारुबेलः या अंशात काही दिसत नाही. परंतु ४ व १६ यांचे काही तरी गूढ दिसते. चार व त्याचे वर्ग दिसतात.

सेफारिअल : विशाल देहाचा मनुष्य मारलेल्या सिंहावर उभा आहे.

अंश १७ वा

राफेल : एक स्त्री उगीच उभी आहे.

चारुबेल: एक कृत्रिम पृथ्वीदर्शक गोल.

सेफारिअल : विजेची चमक.

अंश १८ वा

राफेल : दोन स्त्रिया टेबलाशी बसून खेळत आहेत.

चारुबेल : एक बैल आपल्या शिंगांनी एका मनुष्याला ढकलून देत आहे.

सेफारिअल : परकीय देशातल्या कोमेजलेल्या सुवासिक फुलांचा गुच्छ. वास अति मधुर आहे, परंतु वास घेण्यास कंटाळा येत आहे.

अंश १९ वा

राफेल : उजव्या हातात भाला आणि डाव्या हातात बासरी असलेला पुरुष

चारुबेल : अति जुने असे दिसणारे पुस्तक पुढे घेऊन बसलेला पुरुष. ते जुन्या दफ्तरासारखे दिसत आहे. सेफारिअल : एक ढाल असून तीवर एक तंतुवाद्य आहे व एक हस्तस्त्राण असे चित्र आहे.

अंश. २० वा

राफेल : रथात बसलेला एक कुत्रा.

चारुबेल : पक्क्या दगडाच्या मितीची एक मोठी इमारत आहे. तिचा देखावा भयाण व उद्वेगजनक दिसत आहे.

सेफारिअल : अति तेजस्वी घोड्यावर बसलेला पुरुष, पोषाख नोकरा प्रमाणे आहे.

अंश २१ वा

राफेल : एक रिकामा रथ.

चारुबेल : घोडयावर बसलेला राजा, बादशहा किंवा सेनापति.

सेफारिअल : मावळणाऱ्या चंद्राच्या ढगातून अंधुक प्रकाश बाहेर पडत आहे व त्या प्रकाशात समुद्रातून एक जहाज दिसत आहे. ते पुढे चालण्यास असमर्थ आहे.

अंश २२ वा

राफेल : रिकामा बसलेला पुरुष

चारुबेल: पुष्कळशी खेळणी किया साधारण काचेचे चमकदार अलंकार.

सेफारिअल : उन्हाच्या तापाने झोपी गेलेला मनुष्य. त्याची आयुधे त्याच्या बाजूला आहेत.

अंश २३ वा

राफेल : वाहणारे पाणी.

चारुबेल : शरीराने मजबूत असा पुरुष. त्याच्यापुढे एक कामाचे वेळी वापरण्याचे वस्त्र ठेवले आहे. सेफारिअल : हातात एक दंड घेऊन पर्वतावर उभा असलेला पुरुष मावळत असलेल्या सूर्याच्या योगाने ज्याचे शरीर अस्पष्ट दिसत आहे.

अंश २४ वा

राफेल : दोन घोडे एक दुसऱ्याच्या पाठीवर उड्या मारीत आहे.

चारुबेल : एक लहानसे प्रार्थनामंदिर. परंतु फार उच्च पद्धतीने सजवलेले आहे.

सेफारिअल : मजबूत असा किल्ला एका उंच खडकावर आहे. त्याच्या भिंताडावर एक निशाण लावलेले आहे आणि त्या निशणाच्या डोक्यावर एक मुकुट आहे व ते निशाण हवेत फिरत आहे.

अंश २५ वा

राफेल : शेतांत धावत असलेला घोडा.

चारुबेल : अतिशय उंच असा देवदाराचा वृक्ष.

सेफारिअल : एक सशस्त्र घोडेस्वार वाळवंटांतून जात आहे व समोर एक जंगल असलेली टेकडी आहे.

अंश २६ वा

राफेल : पर्वतातून वहात येत असलेले पाणी.

चारुबेल : एक गृहस्थ पुष्कळशा स्त्रिया बरोबर गाडीत बसलेला आहे.

सेफारिअल : तुटलेला तारा.

अंश २७ वा

राफेल : लगाम लावलेला एक घोडा.

चारुबेल : रामफळ चे एक मोठे झाड मोठाल्या पिकलेल्या फळांनी भरला आहे.

सेफ़ारिअल : एक गाय नांगराला लावण्यासाठी तयार अशी उभी आहे.

अंश २८ वा

राफेल : झाडाखाली बसलेले दोन पुरुष

चारुबेल : सुवर्ण आणि चांदी यांच्या नाण्याचे पुष्कळ ढीग आहेत.

सेफारिअल : एका गावाचा सुंदर देखावा. तेथे प्रत्येक वस्तु मनोहर आहे, त्यामुळे मनाला अतिशय आनंद होऊन ईश्वराचे निश्चित ध्यान करावे असे वाटते.

अंश २९ वा

राफेल : फासावर लटकणारा पुरुष.

चारुबेल : पोळ हाकीत असलेला पुरुष.

सेफारिअल : बांधलेला घोडा. त्याच्यावर वाद्य दबून येत आहे.

अंश ३० वा

राफेल : पाण्यावर चालत असलेले जहाज.

चारुबेल : बारीक टोकांचा त्रिकोण. ज्याच्या टोकावर फुलीच्या आकाराची खूण आहे.

सेफारिअल : तरुण घोडा शेतात इकडे तिकडे धावत आहे. त्याच्या गळ्यातील दोर मागे सरपटत येत आहे. वाऱ्याची झुळूक आली म्हणजे डोके वर करून श्वास घेतो.

कर्क अंशफल सार

१ गायनाची आवड, ममताळू सुखी व समाधानी.

२ सेफारिअलच्या मते आळशी. चारुबेलच्या मते बागबगीचे करणारा.

३ शास्त्रीय विषयाचा संशोधक व देववादी.

४ तीव्र कामविकार, कोणत्याहि धर्माला बांधून न घेणारा व जगावेगळा विचार करणारा.

५ खऱ्याखोट्याची निवड करणारा परंतु फाजील विश्वास ठेवणारा.

६ मनात आणिल ते करून दाखवणारा परंतु अव्यवहारी.

७ आपली सत्ता गाजविणारा व उच्च स्थितीला जाणारा.

८ वर्तमानपत्राचा संपादक असल्यास लोक त्याच्यावर अब्रू नुकसानीची फिर्याद करतील.

९. निपुण वकील किंवा उत्तम हेर.

१० आपल्या दीर्घ परिश्रमाने मिळविलेल्या फळांचा उत्तर आयुष्यात उपभोग घेईल.

११ कलाप्रिय, महत्त्वाकांक्षी, एक संकट टाळीत असता दुसर्यात पडणारा व त्याच्या कृत्यांना सतत विरोध असणारा.

१२ मरण शोकपर्यवसायी.

१३ कुशाग्र बुद्धीचा व अपूर्व स्मरणशक्तीचा. शास्त्रीय शोध लावणारा व सतत ज्ञान संपादन करणारा.

१४ कल्पनामय वृत्तीचा, उदात्त विचार, ज्योतिषी व लहान वयातच उदयास येणारा.

१५ सुखात काळ काढणारा, उद्योगाचा कंटाळा, बाहेरून चांगला पण अंतःकरण वाईट.

१६ चारुबेल म्हणतो या अंशात गूढ आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. आयुष्यात पुष्कळ झगडे करावे लागतील व पुष्कळ संकटे येतील पण त्यातून तो पार पडेल.

१७ शोध लावणारा, सुधारक व पुढारी.

१८ थोडक्या प्राप्तीतसुद्धा चैन करणारा, कोत्या मनाचा, शेवटी दिवस वाईट.

१९ गहन विषयांचा अभ्यास करणारा, उदार, गायनवादन अगर लष्कराशी संबंध असलेल्या कुळात जन्मास आलेला.

२० मोठाली कामे करून आपले नाव आपल्यामागे ठेवणारा व दीर्घायु.

२१ दुसऱ्यावर हुकमत चालवण्याचे सामर्थ्य, पुष्कळ गुण असतील पण यश कमी.

२२ दुर्दैवी, संकटे ओढून घेणारा व काम न करिता केवळ विचार करीत बसणारा.

२३ चारुबेलच्या मते हॉटेलवाला किंवा खाटीक. सेफारिअलच्या मते आपल्याकडे लोकांचे लक्ष लावणारा व भौगोलिक शोध लावणारा.

२४ अधिकारयुक्त वागणूक व धार्मिक वृत्ति.

२५ बोलण्यापेक्षा कृति करून दाखवणारा व दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपले काम सिद्धीस नेणारा.

२६ कल्पनामय व भावनामय वृत्तीचा व आयुष्यात वारंवार स्थित्यंतरे होणारा.

२७ शांतता प्रस्थापक.

२८ गरिबाचा श्रीमंत होणारा, पैशांवर विशेष प्रेम.

२९ चारुबेलच्या मते गुरांचा व्यापारी. सेफारिअलच्या मते पारतंत्र्यात दिवस घालवणारा.

३० स्वातंत्र्यप्रिय, दृढनिश्चयी व सरकारी अधिकारी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)