Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

नाम जप साधना


विषय : नाम जप साधना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नाप जपाचे महत्व आणि लाभ (परात्पर डॉ. जयंत आठवले यांचे संकलनातून 

नमस्कार,

आज आपण इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी विशिष्ट इंद्रिय देवता आणि नाम जप साधना या विषयाची माहिती घेणार आहोत.

आपण जसे राशी दैवत, नक्षत्र देवता, ग्रह देवता, तिथी ची देवता अशा विविध देवता असतात, तसेच मानवी शरीराच्या इंद्रियांना नियंत्रण करणाऱ्या देखील विशिष्ट देवता असतात. या  इंद्रियांच्या देवतांना प्रसन्न करून इंद्रियांना होणारे विकार दूर करण्यासाठी या देवतांचा नामजप करणे सहाय्यकारी असते.

उदा. डोळ्यांनी आपण पाहू शकतो. डोळ्यांमुळे सभोवतालची सृष्टी आपल्याला दृश्यमान होते. डोळे हे प्रकाशतत्त्वाचे (तेजतत्त्वाचे) प्रतीक आहेत. सूर्य (अर्क) ही प्रकाशाची देवता आहे. म्हणून डोळ्यांचे कार्य मंदावले, तर ते सुधारण्यासाठी सूर्यदेवाचा नामजप (ॐ अर्काय नमः) करणे उपयुक्त ठरते.

सोबतच्या तक्त्यात निरनिराळ्या इंद्रियांचा कोणकोणत्या देवतेशी संबंध आहे. तसेच एखाद्या इंद्रियाचे कार्य सुधारण्यासाठी कोणत्या देवतेचा जप कसा करावा, ते दिले आहे. इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी इंद्रियांच्या देवतांचा नामजप करण्यासह वैद्यकीय उपचारही चालू ठेवले, तर इंद्रियांचे कार्य लवकर सुधारण्यास साहाय्य होते.

प्रत्येक देवतेचे म्हणजे देव किंवा देवी यांचे विशिष्ट कंपन असते. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने निर्माण होतात, त्यांनी व्याधीद्वारे निर्माण झालेले विचित्र / अनैसर्गिक / प्रमाणबाह्य कंपन सुधारण्यास सहाय्य होते. 

वाईट शक्ती आणि त्यांमुळे होऊ शकणारे त्रास :

मनुष्याला त्रास देणारे भूत, पिशाच आदी अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे ‘वाईट शक्ती’ (आसुरी शक्ती) मुळे होऊ शकणाऱ्या त्रासांची काही लक्षणे वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनुष्याच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक इत्यादी विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सध्या पृथ्वीवरील सात्त्विकता पुष्कळ अल्प झाली असल्याने आसुरी शक्तींचा त्रासही पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे बहुतांश व्यक्तींना अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतोच. विशेषतः समष्टी साधना (उदा. धर्मप्रसार, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्र- रक्षण) करणाऱ्यांना आसुरी शक्तींच्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.

त्रासांची काही लक्षणे पुढे दिली आहेत.

अ. कित्येक वर्षे औषधोपचार करूनही व्याधी बरी न होणे

आ. कोणतेही शारीरिक कारण नसतांना सतत थकवा असणे इ. घरात सतत भांडणे, कारण नसतांना आर्थिक चणचण किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असणे

ई. झोपेत ओरडणे, दात करकरवणे किंवा भयानक स्वप्ने पडणे

उ. नामजप करतांना अनावर गुंगी येणे

काळाची आवश्यकता लक्षात घेऊन व काळाला अनुसरून असा वाईट शक्तींच्या त्रासांवर सर्वांनी  नामजप करणे अधिक परिणामकारक ठरते. याचा लाभ साधकाला त्याच्या भावानुसार होतो.

असा त्रास होत असल्यास तो जाईपर्यंत नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. त्रास गेल्यावर तो पुन्हा होऊ नये, यासाठी हा नामजप प्रतिदिन किमान २ तास करावा.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप : सध्या बरेच जण श्राद्ध, पक्ष इत्यादी करत नसल्यामुळे त्यांना अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतात. विवाह न होणे, पती-पत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, ही त्रासाची काही लक्षणे आहेत. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

इंद्रिय तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभर करत असल्यास दत्ताचा नामजप करू नये.

तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभरात २ तास करत असल्यास दत्ताचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार पुढीलप्रमाणे करावा.

१. वर सांगितलेल्या लक्षणांनुसार सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला, तरी पुढे होऊ नये म्हणून किंवा थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ तास ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ तास करावा.

३. तीव्र त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ तास करावा.

समष्टी साधना करणाऱ्यांना आसुरी शक्तींमुळे होणाऱ्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी ‘सर्वांसाठीचे उपाय’ या स्तंभात सांगितलेला नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. अशांनी अन्य नामजप (उदा. कुलदेवता, दत्त) करण्याची आवश्यकता नाही.

वर सांगितलेल्या सांगितलेल्या त्रासापेक्षा इतर त्रासावर काही नाम मंत्र उपलब्ध न झाल्यास ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा नामजप करावा.

४. वास्तूशुद्धीसाठी नामजप उपयुक्त वास्तूदोष घालविण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बऱ्याचदा वास्तूत रहाणाऱ्या व्यक्तीचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा त्रास, दुःख, भवरोग ‘नामाने नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयाची आसक्ती हे सर्व दुःखांचे मूळ आणि सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे चित्त वळते आणि इतर ठिकाणची आसक्ती आपोआप सुटून दुःख नाहीसे होते. भगवंत हा आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दुःख त्या ठिकाणी राहू शकत नाही.

नामजपाने कुंडलीतील द्वादश स्थानांची शुद्धी होते.

‘१ कोटी नामजप : तनुस्थान शुद्ध होते. शरिरातील रज-तमाचा नाश होऊन सत्त्ववृद्धी होते. रोगविजांचा नाश होतो आणि रोग निर्बल होतात. शुभ स्वप्ने पडू लागतात.

२ कोटी नामजप : धनस्थान किंवा कुटुंबस्थान शुद्ध होऊन धनप्राप्ती किंवा कौटुंबिक सौख्यवृद्धी होते.

३ कोटी नामजप : पराक्रमस्थान, भातृस्थान किंवा सहजस्थान शुद्ध होते. अशक्य गोष्टी साध्य होतात. बंधू- बंधूत द्वेष असल्यास प्रेमवृद्धी होऊ लागते.

४ कोटी नामजप : सुहृदस्थान, मातृस्थान किंवा स्वास्थ्यस्थान शुद्ध होऊन शारीरिक आणि मानसिक आघात न्यून होतात.

५ कोटी नामजप : पुत्रस्थान किंवा विद्यास्थान शुद्ध होते. अपुत्री (निपुत्रिक)

पुत्रवान होतो. पुत्र द्वेष करणारा असल्यास अनुकूल होतो. अविद्वानाला एखाद्या विद्येत प्रवेश करण्याची बुद्धी होते. धारणाशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते.

६ कोटी नामजप : शत्रूस्थान आणि रोगस्थान शुद्ध होते. बाहेरील शत्रू आणि अंतरातील काम-क्रोधादी शत्रू नाहीसे होतात. रोग संपूर्ण बरे होतात. (एक कोटी नामजपाने रोग निर्बल होतात आणि) सहा कोटी नामजपाने रोग निखालस बरे होतात.

७ कोटी नामजप : जायास्थान शुद्ध होते. अविवाहितांचे लग्न होते. प्रतिकूल पत्नी अनुकूल होते. स्त्रियांस पतीसौख्य लाभते.

८ कोटी नामजप : मृत्यू-गंडांतरस्थान शुद्ध होऊन अकालमृत्यू (अशुभ काळी आलेला मृत्यू) आणि अपमृत्यू (अपघात, आत्महत्या यांसारखे मृत्यू) टळतो.

९ कोटी नामजप : धर्मस्थान शुद्ध होऊन मंत्रदेवतेचा सगुण साक्षात्कार होतो.

१० कोटी नामजप कर्मस्थान किंवा पितृस्थान शुद्ध होते. दुष्कर्मे नाहीशी होऊन सत्कर्मे पडतात. संतांचे दर्शन आपोआप होते.

११ कोटी नामजप : लाभस्थान शुद्ध होते. धनधान्य, गृह, भूमी इत्यादींचा लाभ होतो. सत्त्वगुणाची पूर्ण वृद्धी होते.

१२ कोटी नामजप : व्ययस्थान शुद्ध होते. रज-तम गुणांचा पूर्ण नाश होतो. गुरूंचा अनुग्रह स्वप्नात किंवा प्रत्यक्षपणे होऊन कृतार्थता प्राप्त होते.

ईश्वराच्या नामजपातील मानसिक प्रक्रियाही हीच आहे. नामजप करणाऱ्या व्यक्तीत कळत-नकळत ईश्वराविषयी काही भावना किंवा कल्पना असतात. त्याच्या गुणांचेही थोडेफार ज्ञान असते. ‘ईश्वराच्या कृपेने आपले कल्याण होते आणि नामजप हे त्याची कृपा संपादन करण्याचे साधन होय, याविषयी त्या व्यक्तीला श्रुतीज्ञान झालेले असते. त्यामुळे ‘एवंगुणविशिष्ट ईश्वराचे नाम आपण स्मरत आहोत’, असा भाव त्या नामाशी निगडित होतो. या भावामुळेच ईश्वराविषयीच्या आदर, प्रेम, भक्ती, दुष्कृत्यांची भीती इत्यादी भावना वाढत जातात. त्यामुळे तद्विरुद्ध असणाऱ्या भावना हळूहळू मंद होऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चित्ताची हळूहळू शुद्धी होते.  जप चालू असतांना चित्तातील वासनाकेंद्र, आवड नावड केंद्र, स्वभावकेंद्र वगैरे केंद्रे तसेच बुद्धीकेंद्रातील संस्कारांकडून येणाऱ्या संवेदना (बाह्य) मन स्वीकारत नाही. असे सातत्याने बराच काळ झाले की, या केंद्रांमधील संस्कार न्यून होऊ लागतात. जप चालू असतांना तेवढा वेळ तरी चित्तावर इतर गोष्टींचे नवीन संस्कार होत नाहीत. चित्तावर नवीन संस्कार होऊ नयेत, यासाठी जागृतावस्थेतील सर्वोत्तम मार्ग म्हणजे नामजप होय. (धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांतही चित्तावर इतर गोष्टींचे संस्कार होत नाहीत.) नामजपाने वासनाक्षय होण्याची प्रक्रिया: ‘जेथे देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होते. ‘देह मीच आहे’, या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. नाम घेऊ लागल्यावर मात्र मन हळूहळू बाहेर धावण्याचे न्यून होते. बाहेरची धाव न्यून झाली की, वासनेची शक्ती आपोआप न्यून होते. पुढे तेच मन नामामध्ये रंगू लागते. जे मन वासना भोगायचे, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर मनातील वासना आपोआप क्षीण होतात आणि काही दिवसांनी त्या मरून जातात. वासना सूक्ष्म आहे; म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्म अस्त्रच पाहिजे. ते अस्त्र म्हणजे ‘नाम’ होय.’ नामजप करत असल्यामुळे आतील विचार उफाळून बाहेर येऊन नष्ट होत असल्याने काही अनुभूती प्राप्त होतात. व्यावहारिक बोलण्यामुळे वाणी चित्तशुद्धीपासून निवृत्त होते, म्हणजे अशुद्ध होते. ती शुद्ध व्हावी म्हणून नामजप करावा. जोपर्यंत पाप आणि पुण्य शिल्लक आहेत, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. ‘ज्याला याच एका जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यावयाची आहे. त्याने आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे पूर्ण नियमन करून कोणतेही पाप होऊ न देता, नामाचे कोणतेही अपराध होऊ न देता, अविरत नामजप केला पाहिजे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विवाह वर्ष पाहण्याची ढोबळ पद्धत


विषय : विवाह वर्ष पाहण्याची ढोबळ पद्धत

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : जातक वेध 

नमस्कार,

मुले मुली शिक्षण पूर्ण होऊन त्यांचे विवाह वय होणे ही पालकांसाठी चिंतेची व संवेदनशील बाब असते. अर्थात त्यामागे त्यांचे आयुष्य मार्गी लागावे हेच उद्दिष्ट असते.

जातकाचे साठी विवाह कोणत्या वर्षी होऊ शकतो हे पाहण्याची एक ढोबळ पद्धत येथे देत आहे. या पध्दतीत हो किंवा नाही हे सांगता येत नाही. परंतु “हो” हे उत्तर गृहीत धरले, तर विवाह कोणत्या वर्षी होऊ शकतो हे सांगता येते. काही अपवादात्मक कुंडल्यांना ही पध्दत लागू पडत नाही. त्याचबरोबर लग्न होईल साठी आलेली वये ९, १८, २७, ३६, ४५ अशी असली तरी त्यातील त्याचे सध्याचे वयास अनुसरून त्याप्रमाणेच उत्तर मिळवता येते.

या पध्दतीसाठी एक सूत्र वापरले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

ड = अ – ब – क + १ (यामध्ये १ हा नेहमी अंशात असेल.)

हे सूत्र वापरण्याची पद्धत :

आजकाल SOFTWARE मुळे सायन निरयन अंश तुम्ही सहज पाहू शकता.

१.      जातकाचे सायन कुंडलीतील सप्तमेश कोण आहे हे पाहून त्याचे निरयन अंश कला याची नोंद करणे. यास अ मानू.

२.      सप्तमेश सायन कुंडलीत कोणते स्थानी आहे याची नोंद करणे. यास ब मानू. (ही संख्या नेहमी अंकात असेल)

३.  चंद्राचे निरयन अंश व कलेची नोंद करणे यास क मानू.

४.  वरील सूत्रात अंश कला लिहून ड ची संख्या काढणे. (उत्तर वजा मध्ये आल्यास ३० अंश  मिळवणे, संख्या ३० पेक्षा मोठी आली तर ३० वजा करणे)

ड = अ – ब – क + १

५.  ड चे अंश कला नुसार दिलेल्या तक्त्यातील जातकाचे चालू वयाचे पुढील वय पाहणे. ते जातकाचे विवाहाचे वेळी वय असेल.

उदा.

एका जातकाचा जन्म २००० साली झाला आहे.

१.  जातकाचे सायन कुंडलीतील सप्तमेश कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. शनी निरयन कुंडलीत २३ अंश १२ कला वर आहे. यास अ मानू.

२.      सप्तमेश सायन कुंडलीत १० वे स्थानी आहे. यास ब मानू.

३.  चंद्राचे निरयन २२ अंश व ५१ कला आहेत. यास क मानू.

४.  ड = अ – ब – क + १

= २३ १२ – १० – २२ ५१ + १

= -२२ ५१ + १४ १२

= -७ २१

५.      यात -७ २१ हे अंश कला आल्याने ३० मिळवा.

= २३ २१ हे तक्त्यातील रकान्यात ८ व्या ओळीत आहेत.

 त्या ओळीत ५, १४, २३, ३२, ४१, ५०, ५९, ६८, ७७ ही वये दिली आहेत.

आत्ता जातकाचे वय २४ चालू आहे व शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यापुढील ३२ वय हे विवाहाचे वय असेल.

म्हणजेच जन्मवर्ष २००० + ३२ = २०३२ हे विवाह वर्ष असेल.

जातक वेध मध्ये दिलेली प्रोग्रेशन वर आधारित ही गणिती पद्धत ढोबळ मानाने विवाह वर्ष निर्णयासाठी उपयुक्त वाटते. तरी अजून अनेक कुंडल्यांचा दशा, गोचर, कृष्णमुर्ती अशा पद्धतीने पडताळा घेऊन तपासता येईल. पण या पद्धतीला मर्यादा आहेत, त्यामुळे सखोल विश्लेषणाची अपेक्षा ठेवता येत नाही.

(टीप : जातक वेध या पुस्तकात ही पद्धत दिलेली असून मी फक्त आपल्या समोर मांडलेली आहे, काही शंका असल्यास मूळ पुस्तक वाचावे.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पादुका आणि चरण स्पर्श


विषय : पादुका व चरण स्पर्श

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वअभ्यास व अवांतर वाचन

नमस्कार,

आज लेखनासाठी “पादुका व चरण स्पर्श” हा विषय मांडायची बुद्धी झाली आहे.

पादुका म्हणजे नित्य पूजा, उपासना, दर्शनासाठी देव अथवा गुरु यांचा पायाचा ठसा. पादुका पूजन हे आपल्या वैदिक संस्कृतीत अगदी रामाच्या काळापासून आढळून येते. श्रीराम वनवासात असताना भ्राता भरत याने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीने राज्य कारभार सांभाळला, ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परकीय शत्रूद्वारे मूर्तीभंजनाच्या काळात, याच पादुकांनी वैदिक धर्म टिकवून ठेवण्यास मोठा हातभार लावला. दत्त संप्रदायात तर पादुकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. दत्तात्रेयांचा वा इतर सर्व संत, ईश्वरी अवतार यांचा गुरु स्वरूपात सर्वत्र संचार असतो. वारकरी संप्रदायाचा पालखी सोहळा तर जगभर प्रसिद्धी पावला आहे. पादुकांच्या पूजनामुळे भाविकाचे अंतःकरण शुद्ध होते व पापांपासून मुक्ती मिळते, ही श्रद्धा आहे, त्यामुळे पादुकांचे महत्व आजच्या काळातही धार्मिकांमध्ये टिकून आहे. नरसोबाची वाडी, अक्कलकोट, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर, गिरनार ई. स्थळी आजही भक्तांची गर्दी उसळलेली आढळते.

भारतीय संस्कृतीत पायांचे अढळ स्थान आहे. पायाचे महत्व ठसवणाऱ्या बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले ही म्हण, बटू वामन ची कथा, महाभारतात श्रीकृष्णाचे चरणी बसून अर्जुनास अवघा श्रीकृष्णच सारथी म्हणून प्राप्त झाल्याची कथा ई. अनेक म्हणी, कथा आजही प्रचलित आहेत. भरीव व समाजोपयोगी कार्य केलेल्या विभूतींच्या कार्याच्या पाऊलखुणा या जनमानसाच्या हृदयावर दीर्घ काळ उमटतात.

सद्य काळाच्या ओघात विसर पडत चालला असला तरी, आजही बरेच घरांमध्ये गुरुंच्या, थोरा-मोठ्यांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आढळून येते. या मुळे गुरूंची, श्रेष्ठांची, सत्पुरुषांची सर्व दैवी, आंतरिक शक्ती जी त्यांच्या चरणांत एकवटलेली असते. चरण स्पर्शाने जी कंपने निर्माण होतात, त्याद्वारे शक्तीच्या नियमाप्रमाणे (LAW OF ENERGY) ती शक्ती उच्च बल स्थानापासून निम्न बलस्थानाकडे वाहत येते आणि आपले आज्ञा चक्र जागृत होऊन, आपल्याला चरण स्पर्श लाभतो. काही जण पायांना शिव आणि शक्तीचे स्वरूप मानतात आणि चरणांना स्पर्श केल्यामुळे आपल्यात समतोलत्व निर्माण होते.

ज्योतिष अभ्यासक असल्यामुळे पादुका व चरण स्पर्श या विषयावर लिहिताना माझी पावले कुंडलीकडे वळणे स्वाभाविक आहे. काल पुरुषाच्या कुंडली मध्ये मेष रास किंवा कुंडलीमधील १ ले स्थान डोके दर्शवते व मीन रास किंवा १२ वे स्थान पाय दर्शवते. परम आत्मा (परमात्मा) हा निर्गुण निराकार असतो. म्हणजेच जो आत्मा सत्व, रज, तम या गुण अवगुणांच्या परे आहे, जो आकाराने अमर्याद आहे म्हणजेच निराकार आहे (Zero tends to infinity), अशा या परमात्माचा अंश आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि शरीराचे बंधन प्राप्त करतो आणि आपला जन्म होतो. म्हणूनच आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि आपल्याला अहंकार (अहम आकार) होतो व आपण निर्गुण ऐवजी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदि षडरिपू मध्ये अडकतो. त्यामुळे जन्मलग्न कुंडलीतील लग्न स्थान हे जड शरीर, अहंकार आदि गोष्टी दर्शवते. कोणत्याही कुंडलीतील १२ वे स्थान व्यय स्थान दर्शवते. १२ वे स्थान मोक्ष त्रिकोणातील एक महत्वाचे स्थान आहे.

म्हणजेच आपल्या अहंकाराच्या मायेतून वा षडरीपुंचा व्यय करायचा असेल अथवा त्यांचे तावडीतून मुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात परतायचे असेल, तर १२ वे स्थानाकडे एक एक पाऊल टाकावे लागेल. मोक्षाचे व पायांचे प्रतिनिधित्व करणारी मीन रास गुरुचे स्वामित्वाखाली येते. यावरून आपले मूळ स्वरूप, गुरु, पाय व पादुका यांचा संबंध स्पष्ट होतो.

ज्ञान कारक गुरूला ९ वी रास धनु व १२ वी राशी मीन यांचे स्वामित्व दिलेले आहे. ९ वे स्थान भाग्य, धार्मिकता, अध्यात्मिकता, उच्च ज्ञान, प्रगती, दीर्घ प्रवास, कीर्ती ई. गोष्टी दर्शवते. धर्म त्रिकोणातील ही एक महत्वाचे स्थान आहे. तर १२ वे स्थान आपले पाय जमिनीवर ठेवून, मोह मायेपासून अलिप्त राहून मोक्षाच्या अज्ञात प्रांतात विहार करणे दर्शवते. थोडक्यात आपले जगणे ९ वे स्थान दर्शित धर्म, उच्च ज्ञान, अध्यात्मिक (अधी म्हणजे बुद्धी. बुद्धी व आत्मा यांचा संगम असणारा म्हणजे अध्यात्मिक) उन्नती व १२ वे स्थान संयोगे भौतिक मोहांच्या जडत्वातून अलिप्ततेने सुटका, त्या जोडीला सेवावृत्ती, दान, सत्कृत्य यांची जोड या दोन भक्कम पायांवर उभे असेल तर, आपला जन्म खर्या अर्थाने सार्थकी लागेल.           

ज्योतिष शास्त्रात ९ व १२ या अंकांचे महत्व खूप आहे. ९ ग्रह व १२ राशी मिळून आपल्या आयुष्याची दशा व आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. नवांश कुंडलीचे सूक्ष्म फलीतातील महत्व सर्वांनाच माहित आहे. जन्मलग्न कुंडली जातकाचे बाह्यरंग दाखवत असेल, तर नवांश कुंडली त्याचे अंतरंग दाखवते. याची रचना देखील तुम्हाला हेच सांगते की, एका राशीचा नववा भाग म्हणजे नवांश. १२ राशीं गुणिले ९ भाग असे मिळून जन्मलग्न कुंडलीचे एकूण १०८ सूक्ष्म विभाग तयार होतात. या भागालाच किती समर्पक नावे आहेत बघा – पद किंवा चरण. जपमाळ यासाठीच १०८ मण्यांची असते.

सांगायचे प्रयोजन एवढेच की, आपला अहंकार गुंडाळून ठेवून श्रद्धा भावनेने त्या परम शक्तीस शरण जाऊन त्याचे चरणावर डोके ठेवले, तर आपल्याच डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडेल व जगात असताना भाग्यशाली (९) ठराल  व शरीराचा व्यय झाल्यावर जन्म मरणाच्या फेर्यातून मुक्ती (१२) प्राप्त होऊ शकते.

लेखाच्या शेवटी एकच गोष्ट सांगतो, की आजकाल स्वत:च्या तथाकथित उच्च शिक्षणाच्या वृथा गर्वापायी या भक्तांना अंधश्रध्द म्हणून हिणवले जाते. पण गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते. खाली म्हणजे कोठे, तर पायाच्या ही खाली म्हणजे पाताळात असते, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे व आपल्या पूर्वजांनी ज्या काही प्रथा, पद्धती आपल्याला दिल्या, त्याचे वैज्ञानिक व तात्विक पातळीवर विचार करून जे योग्य आहे ते अंगिकारावे.

हे देवा आम्हा सर्वांना योग्य मार्ग निवडण्यास बुद्धी प्रदान कर हीच तुझ्या “चरणी” मनोभावे प्रार्थना.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)