ज्योतिष अभ्यासक होणे म्हणजे खोल सागरात डुबकी मारून मोती व विविध रत्ने वेचण्यासारखे आहे. जेवढे खोल जाऊ तेवढा जास्त खजिना नजसेस पडतो. फक्त त्यासाठी अवघे आयुष्य कमी पडते.
आपण लहानपणापासून वडीलधारे मंडळींकडून किंवा शाळेत शिकत असताना पाच तत्व महत्वाची आहेत हे ऐकत आलो आहोत. आपणा सर्वाना माहित आहे की, पंचतत्वांनी आपलं शरीर व्यापलं गेलं आहे, हीच पाच तत्व म्हणजे अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी.
आकाश तत्व :
आकाश हा एक असा घटक आहे ज्यामध्ये पृथ्वी, पाणी, अग्नि आणि वायू हे चारही घटक आहेत. आकाशाला आत्म्याचा वाहक मानला जातो आकाशात ढगही येतात, धूळही उडते आणि प्रकाशही असतो. त्याचप्रमाणे सुख, दुःख, शांती अशा सर्व भावना मनातही निर्माण होत असतात.
वायू तत्व :
पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी हवेला म्हणजेच वायूला सर्वात महत्त्वाचा घटक मानलं गेलं आहे. आपलं शरीर प्राणवायू च्या जवलानावर चालते, म्हणूनच त्याला सजीव असं म्हणतात. पृथ्वी, झाडं, वनस्पती, प्राणी, पक्षी ई. सर्वांनाच हवेची आवश्यकता आहे. म्हणूनच हवेला आयु म्हणजेच आयुष्य असंही संबोधलं जातं.
अग्नी तत्व :
अग्नी तत्व आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते, त्याचप्रमाणे अग्नी देखील उर्जेच्या रूपात आपल्या शरीरात वसतो. अग्नीमुळेच शरीर हालचाल करू शकते. अग्नीचा घटक उष्णता, शक्ती, ऊर्जा यांचे प्रतीक आहे. आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण म्हणजेच अग्नी तत्वाच्या समतोल साधल्याने मुख्यतः शरीर निरोगी राहते.
जल तत्व :
पाणी हा मानवाच्या जीवनाचा किंबहुना सृष्टीतल्या चराचराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. मानवी शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. त्याचप्रमाणे पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने भरलेला आहे. हे पाणी माणसाच्या रक्तात आणि शरीरात असते. सजीव काही दिवस अन्नाशिवाय जगू शकतात, परंतु पाण्याशिवाय जगणं कठीण आहे.
पृथ्वी तत्व :
एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे सजीवांच्या निर्मितीसाठी पृथ्वीशिवाय इतर चार गोष्टींचीही आवश्यकता असते. पृथ्वी हे माणसाचं आणि इतर सजीवांचं निवासस्थान मानलं गेलं आहे.
ही पाच विशिष्ट कालावधीसाठी १) पृथ्वी २) आप (पाणी) ३) तेज (अग्नी) ४) वायू ५) आकाश या विशिष्ट क्रमाने कार्य करतात.
सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत ते ठराविक म्हणजे प्रथम चढत्या क्रमाने फिरतात त्यास आरोह म्हटले जाते. आणि नंतर घड्याळाच्या उलट दिशेने उतरत्या क्रमाने फिरतात त्यास अवरोह म्हटले जाते.
आरोह कालावधी अनुक्रमे ६ १२ १८ २४ आणि ३० मिनिटे आहे; आरोह-अवरोहाचे प्रत्येक आवर्तन पूर्ण होण्यासाठी ३ तास लागतात. दिवसात प्रत्येकी ३ तासांची ८ चक्रे मिळून २४ तास पूर्ण होतात. प्रत्येक दिवशी सूर्योदयाच्या वेळी तत्वाचे स्वरूप आठवड्याच्या दिवसावर अवलंबून असते. खालील सारणी तपशील देते:
ज्योतिष सिद्धांत सार मध्ये या तत्वांचा उपयोग करून बालकाचा जन्म कोणत्या तत्वानुसार मुलगा का मुलगी असेल, हे समजण्यासाठी एक पद्धती दिली आहे. ज्याचा उपयोग करून जातकाने दिलेली जन्म वेळ बरोबर आहे का हे तपासण्यासाठी उपयुक्त ठरते.
त्या बाबतची माहिती येथे देत आहे.
सूर्योदयाच्या वेळी जे तत्व ज्या दिवशी उदित असते, त्यानुसार त्याच्या दिलेल्या कालावधीनुसार आरोह अवरोह क्रमाने मांडणी करून सारिणी बनवता येते.
१) पृथ्वी तत्व : पुथ्वी तत्व हे बुधवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ६ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस पृथ्वी तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
२) आप तत्व : आप तत्व हे सोमवारी व शुक्रवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १२ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस आप तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.
३) तेज तत्व : तेज तत्व हे रविवारी व मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी १८ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस तेज तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
४) वायू तत्व : वायू तत्व हे शनिवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी २४ मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस वायू तत्व उदित असेल, तर स्त्री जातक जन्मास येतो.
५) आकाश तत्व : आकाश तत्व हे गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी उदित असते. त्याचा कालावधी ३० मिनिटे असतो.
जन्माच्या वेळेस आकाश तत्व उदित असेल, तर पुरुष जातक जन्मास येतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर
१) जेव्हा पृथ्वी, तेज किंवा आकाश तत्व कार्यरत असेल, तेव्हा पुरुष बालक जन्म घेईल.
२) जेव्हा आप किंवा वायु तत्व कार्यरत असेल, तेव्हा स्त्री मूल जन्माला येईल.
३) पुरुष वाचक तत्व संपत असताना आणि स्त्री वाचक तत्व सुरू होत असताना जन्माला आलेली व्यक्ती नपुंसक असू शकते.
तत्व सिद्धांताचा त्या त्या तत्व कालावधीस दशां अंतर्दशा विभाजानासारखे अधिक विभाजीत करून तत्व अंतर तत्व अशा प्रकारे विभागले जाऊ शकते. व त्याचा सूक्ष्म वापर केला जाऊ शकतो.
जन्माच्या वेळी उदित असलेल्या तत्वाचे ज्ञान जातकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अंदाज देते.
१) पृथ्वी तत्वामध्ये जन्मलेले जातक महत्वाकांक्षी असतात. भौतिकवादी दृष्टीकोन असतो.
२) तेज तत्वामध्ये जन्मलेले जातक तेजस्वी आणि प्रभावी असतात.
३) आकाश तत्वामध्ये जन्मलेले जातकांची अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि कल्पक किंवा सर्जनशील बुद्धिमत्ता असते.
आरोह तथवा म्हणजे संधी आणि उपलब्धींमध्ये वाढत्या वयानुसार हळूहळू सुधारणा होत जाते व अवरोह तत्व कमी होत जाणारे परिणाम सूचित करते, या प्रकारे विश्लेषण करता येते.
याच पंच तत्वांचा प्रभावी वापर करून पाश्चात्य ज्योतिर्विद आलन लिओ याने प्रत्येक अंशाची फळे मांडली आहेत.
विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (कर्क अंश स्वरूप)
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक
मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे
नमस्कार,
जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.
त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.
प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.
आज आपण राशिचक्रातील कर्क मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.
कर्क अंश स्वरूप
अंश १ ला
राफेल : एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांचा हात धरून आनंदात मजा करत आहेत.
चारुबेल : ज्याच्या मोठ्या तबकडीवरील आकडे व काटे पूर्णपणे दिसत आहेत व उंच लोलक आहेत असे एक मोठे घड्याळ.
सेफारिअल : उन्हाळ्यातील उन्हात द्राक्षांनी भरगच्च भरलेली एक द्राक्षवेल एका जुन्या भिंतीवर लोंबत आहेत.
अंश २ रा
राफेल : दोन लहान मनोऱ्यांप्रमाणे दोन स्त्रिया उगीच उभ्या आहेत.
चारुवेल : एका लतामंडपात एक मनुष्य फुलझाडास झाऱ्याने पाणी घालीत आहे.
सेफारिअल : एक कुत्रा एका मांसरहित हाडुकावर पाय देऊन उभा आहे व त्याच्यासमोर दुसरे दोघे अर्धवट उपाशी असलेले कुत्रे आहेत.
अंश ३ रा
राफेल : दोन स्त्रिया खाली बसल्या असून समोर दोन मनुष्ये उभे आहेत.
चारुबेल : जमिनीत खोल गेलेला एक खाणीचा भाग असून वरती अगदी समोर आकाशात एक विमान आहे.
सेफारिअल : खिन्न मुद्रेने बसलेली स्त्री, वने अव्यवस्थित, केश मोकळे, हातात कोमजलेल्या फुलांचा गुच्छ, त्यात काही गुलाबाची व काही लिलिची फुले आहेत.
अंश ४ था
राफेल : एक अविवाहित स्त्री उभी असून पुरुषाची वाट पहात आहे.
चारुबेल : पृथ्वीवरून कधीच दिसत नाही ती चंद्राची (दुसरी) बाजू दिसत आहे.
सेफारिअल : एक भोजनाचे टेबल ज्याच्यावर मेजवानी होऊन गेल्यानंतरचे तुकडे वगैरे उष्टे जिन्नस पडले आहेत.
अंश ५ वा
राफेल : एक स्त्री पुरुषाची वाट पहात आहे.
चारुबेल : हातात तराजू समतोल धरणारा मनुष्य.
सेफारिअल : मध्यभागात वाकलेले व तेथूनच वाकडे तिकडे वाढलेले एक लहानसे कोवळे झाड.
अंश ६ वा
राफेल : एका पितळेच्या भांड्यात शेळीला धरून उभा असलेला पुरुष.
चारुबेल : एक जमिनीचा विशेष भाग आखून ठेवला आहे. त्यावर उभे खांब व आडवे गज आहेत. या जमिनीचा लवकरच खळे करणे व घर बांधणे याकडे उपयोग करावयाचा असा बेत आहे.
सेफारिअल : श्रीमंती पोषाख केलेली स्त्री ओटीत काही रत्ने घेऊन त्यांच्याशी खेळत आहे.
अंश ७ वा
राफेल : शिंगांना वादी बांधून त्याला ओढीत नेत असलेला पुरुष.
चारुबेल : एक छानदार मोठे पिकलेले सिताफळ लोंबत असलेले दिसत आहे.
सेफारिअल : एका झाडाच्या बुंध्यावर लोखंडाचे हस्तत्राण, एक तलवार आणि एक चाबूक अशा वस्तू ठेवल्या आहेत.
अंश ८ वा
राफेल : एक घर जेथे एक स्त्री उभी आहे. जणू काय ती मागच्या बाजूने पळून जाण्याच्या विचारात आहे. चारुबेल : एका उंच वृक्षाच्या शेंड्याजवळ बांधलेच्या घंटेची दोरी एक मनुष्य ओढीत आहे.
सेफारिअल : एक पारवा जमिनीवर पडलेला आहे. त्यावर एक साप उडी घालण्याच्या तयारीत आहे.
अंश ९ वा
राफेल : उजव्या हातात पिंजऱ्याचे दंडूक असलेली स्त्री.
चारुबेल : एक कोळी घराच्या कोपऱ्यात असून मूर्ख माशांचा गरगर नाच पहात आहे व निष्काळजीपणाने त्या त्याच्या जाळ्याच्या अगदी नजीक येऊन ठेपल्या आहेत.
सेफारिअल : सुपीक अशा दऱ्यात असलेले एक खेडेगाव.
अंश १० वा
राफेल : आपल्या उजव्या हातात पेटी धरून ठेवलेला पुरुष.
चारुबेल : एक कांद्याचे झाड मातीतून नुकतेच बाहेर पडत आहे आणि आपले सौंदर्य जगाला दाखवण्यास सुरवात करीत आहे.
सेफारिअल : अतिशय विशाल असा ओक वृक्ष. त्याच्या मुळातून लहान लहान रोपें उगवले आहेत. त्याच्या शाखांवरून पक्षी ऋतुपरत्वे गायन करीत आहेत.
अंश ११ वा
राफेल : पाण्यात उभे असलेले जहाज.
चारुबेल : तंतुवाद्य वाजवीत असलेली एक तरुण कुमारी.
सेफारिअल : उथळ वाळूच्या प्रदेशात येऊन लागलेले जहाज.
अंश १२ वा
राफेल : आपल्या खांद्यावर जनावराचे कातडे टाकून नेत असलेला पुरुष.
चारुबेल : ‘सायप्रस’ नावाचे झाड.
सेफारिअल : एका कवटीजवळ ठेवलेला खंजीर.
अंश १३ वा
राफेल : एक मुलगा पुढे उघडे पुस्तक व हातात लेखणी घेऊन बसला आहे.
चारुबेल: खणीत असलेला पुरुष
सेफारिअल : एक चंद्रकोर व दुसरा बहुतेक पूर्ण असे दोन चंद्र असून त्यांच्यामध्ये पौराणिक बुधाच्या हातातली काठी आहे.
अंश १४ वा
राफेल : डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले कोकरू.
चारुबेल : जादुगाराची सर्व उपकरणे आसपास लावून प्रेक्षकासमोर उभा असलेला पुरुष.
सेफारिअल : वसंतऋतूत उत्पन्न होणाऱ्या फुलांचा गुच्छ ज्याच्यावर एक तेजःपुंज तारा असून त्याचे तेजःपुंज किरण नीलवर्ण आकाशात चमकत आहेत.
अंश १५ वा
राफेल : एक घर. त्याच्या छपराच्या खालच्या बाजूस त्याच्या राहण्याच्या जागी एक निजलेला उंदीर. चारुबेल : पाण्याचे डबके.
सेफारिअल : एका उच्च ठिकाणी ठेवलेले सिंहासन असून त्याच्या गादीवर एक कुत्रा निजला आहे.
अंश १६ वा
राफेल : एक पक्षी ज्याने पायाखाली साप धरून ठेवला आहे असा.
चारुबेलः या अंशात काही दिसत नाही. परंतु ४ व १६ यांचे काही तरी गूढ दिसते. चार व त्याचे वर्ग दिसतात.
सेफारिअल : विशाल देहाचा मनुष्य मारलेल्या सिंहावर उभा आहे.
अंश १७ वा
राफेल : एक स्त्री उगीच उभी आहे.
चारुबेल: एक कृत्रिम पृथ्वीदर्शक गोल.
सेफारिअल : विजेची चमक.
अंश १८ वा
राफेल : दोन स्त्रिया टेबलाशी बसून खेळत आहेत.
चारुबेल : एक बैल आपल्या शिंगांनी एका मनुष्याला ढकलून देत आहे.
सेफारिअल : परकीय देशातल्या कोमेजलेल्या सुवासिक फुलांचा गुच्छ. वास अति मधुर आहे, परंतु वास घेण्यास कंटाळा येत आहे.
अंश १९ वा
राफेल : उजव्या हातात भाला आणि डाव्या हातात बासरी असलेला पुरुष
चारुबेल : अति जुने असे दिसणारे पुस्तक पुढे घेऊन बसलेला पुरुष. ते जुन्या दफ्तरासारखे दिसत आहे. सेफारिअल : एक ढाल असून तीवर एक तंतुवाद्य आहे व एक हस्तस्त्राण असे चित्र आहे.
अंश. २० वा
राफेल : रथात बसलेला एक कुत्रा.
चारुबेल : पक्क्या दगडाच्या मितीची एक मोठी इमारत आहे. तिचा देखावा भयाण व उद्वेगजनक दिसत आहे.
सेफारिअल : अति तेजस्वी घोड्यावर बसलेला पुरुष, पोषाख नोकरा प्रमाणे आहे.
अंश २१ वा
राफेल : एक रिकामा रथ.
चारुबेल : घोडयावर बसलेला राजा, बादशहा किंवा सेनापति.
सेफारिअल : मावळणाऱ्या चंद्राच्या ढगातून अंधुक प्रकाश बाहेर पडत आहे व त्या प्रकाशात समुद्रातून एक जहाज दिसत आहे. ते पुढे चालण्यास असमर्थ आहे.
अंश २२ वा
राफेल : रिकामा बसलेला पुरुष
चारुबेल: पुष्कळशी खेळणी किया साधारण काचेचे चमकदार अलंकार.
सेफारिअल : उन्हाच्या तापाने झोपी गेलेला मनुष्य. त्याची आयुधे त्याच्या बाजूला आहेत.
अंश २३ वा
राफेल : वाहणारे पाणी.
चारुबेल : शरीराने मजबूत असा पुरुष. त्याच्यापुढे एक कामाचे वेळी वापरण्याचे वस्त्र ठेवले आहे. सेफारिअल : हातात एक दंड घेऊन पर्वतावर उभा असलेला पुरुष मावळत असलेल्या सूर्याच्या योगाने ज्याचे शरीर अस्पष्ट दिसत आहे.
अंश २४ वा
राफेल : दोन घोडे एक दुसऱ्याच्या पाठीवर उड्या मारीत आहे.
चारुबेल : एक लहानसे प्रार्थनामंदिर. परंतु फार उच्च पद्धतीने सजवलेले आहे.
सेफारिअल : मजबूत असा किल्ला एका उंच खडकावर आहे. त्याच्या भिंताडावर एक निशाण लावलेले आहे आणि त्या निशणाच्या डोक्यावर एक मुकुट आहे व ते निशाण हवेत फिरत आहे.
अंश २५ वा
राफेल : शेतांत धावत असलेला घोडा.
चारुबेल : अतिशय उंच असा देवदाराचा वृक्ष.
सेफारिअल : एक सशस्त्र घोडेस्वार वाळवंटांतून जात आहे व समोर एक जंगल असलेली टेकडी आहे.
अंश २६ वा
राफेल : पर्वतातून वहात येत असलेले पाणी.
चारुबेल : एक गृहस्थ पुष्कळशा स्त्रिया बरोबर गाडीत बसलेला आहे.
सेफारिअल : तुटलेला तारा.
अंश २७ वा
राफेल : लगाम लावलेला एक घोडा.
चारुबेल : रामफळ चे एक मोठे झाड मोठाल्या पिकलेल्या फळांनी भरला आहे.
सेफ़ारिअल : एक गाय नांगराला लावण्यासाठी तयार अशी उभी आहे.
अंश २८ वा
राफेल : झाडाखाली बसलेले दोन पुरुष
चारुबेल : सुवर्ण आणि चांदी यांच्या नाण्याचे पुष्कळ ढीग आहेत.
सेफारिअल : एका गावाचा सुंदर देखावा. तेथे प्रत्येक वस्तु मनोहर आहे, त्यामुळे मनाला अतिशय आनंद होऊन ईश्वराचे निश्चित ध्यान करावे असे वाटते.
अंश २९ वा
राफेल : फासावर लटकणारा पुरुष.
चारुबेल : पोळ हाकीत असलेला पुरुष.
सेफारिअल : बांधलेला घोडा. त्याच्यावर वाद्य दबून येत आहे.
पावसाळा तोंडावर आहे आणि अशातच एक या संदर्भात डॉ. वा. ल. मंजूळ यांचा एक मजेशीर परंतु माहितीपूर्ण लेख वाचनात आला. त्याचा मूळ गाभा तसाच ठेवून आपल्या माहितीसाठी देत आहे.
ज्यावेळी हवामान खात्याचे वैज्ञानिक अंदाज उपलब्ध नव्हते, त्यावेळी अनुभवातील म्हणीवरून शेतकरी पीकपाण्याची व्यवस्था पाहात असत. आता पंचांगात देखील पर्जन्य विषयक ज्योतिष अंदाज उपलब्ध असतो, तसेच अनेक ज्योतिषीदेखील यावर भाष्य करू लागले आहेत.
शरद ऋतुमध्ये मेघ केवळ गर्जना करतात पण थेंबभर पाऊस पडत नाही, तर वर्षाऋतुमध्ये आवाज न करणारे मेघ, म्हणजे मुके ढग जोरदार वर्षाव करून जातात. त्यामुळेच मराठी भाषेत म्हण आली आहे. ‘गर्जेल तो पडेल काय?’
पीक पाण्यावर अशा अनेक म्हणी आहेत. पीकपाण्याच्या म्हणी हा आमचा प्राचीन ठेवा आहे. इ. स. १८९९ साली एका ब्रिटिश संशोधकाने अशा म्हणीचे संकलन करून विषयवार मांडणी केली. आजच्या प्रगत ज्योतिष शास्त्राआधी ‘शकुनंति’ ‘सहदेव भाडळी’ यांसारखे ग्रंथ याबाबत मार्गदर्शन करीत असत आणि त्याची सत्यताही प्रत्ययाला येत असे. या दोन संस्कृत–प्राकृत ग्रंथांचे हस्तलिखिते पुण्यातील मराठी हस्तलिखित संग्रहालयात आज पहावयास मिळतात. मराठीतील नक्षत्रे-पाऊस पीकपाणी या संदर्भातील म्हणींचा थोडक्यात आढावा घेऊ.
१) ‘सत्ताविसातून नऊ जाती तर बाकी धूळ देती।’
नक्षत्रांची संख्या एकूण २७ आहे. पण त्यातील केवळ नऊ नक्षत्रेच पावसाचा अनुभव देतात. ती जर वाया गेली तर शेतकऱ्याच्या वाट्याला शेतीतील मातीची धूळ राहते. (म्हणजे पिकाऐवजी दुष्काळ)
२) ‘मृगाची लावणी आणि हस्ताची उगवणी।’
मृगनक्षत्रावर पेरणी करावी. साधारणपणे जून महिन्यात ते येते. तर पीक कसे आले याची पाहाणी हस्त नक्षत्रावर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात करावी.
३) ‘मघा आणि चुलीपाशी हगा (शौचाला बसा) नाही तर वरती बघा।’
मघा नक्षत्र खूप पाऊस पाडते. अगदी नैसर्गिक विधीसाठीही बाहेर पडता येत नाही. तर हेच मघा नक्षत्र पाऊस पाडू शकले नाही तर आशाळभूत दृष्टीने आभाळाकडे बघत राहावे लागते.
४) ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेचे आधी पळावे।’
नेहमी पेरणी मृग नक्षत्राचे आधी करावी. संकटात बोंब मारण्यापूर्वीच पळून जावे.
५) ‘पडेल हत्ती तर पाडेल भिंती
हस्त नक्षत्राचा धोऽधो पाऊस अगदी पार घराच्या भिंती पाडून टाकील.
६) ‘रोहिणी डागे, मृग गाजे, आर्द्रा वाहे पूर।
सहदेव कहे भाडळी घरघर वाजे।’
जर रोहिणी नक्षत्रात उकाडा झाला, मृग नक्षत्रात गडगडाट झाला आणि आर्द्रा नक्षत्रात पूर आला तर सहदेव आपल्या भाडळी ग्रंथाला म्हणतो जर या क्रमाने नक्षत्रे फळे देतील तर घराघरात हाताला काम मिळेल, यश मिळेल
७) ‘पडेल हस्त तर कुळंबी मस्त’
हस्त नक्षत्राचा पाऊस रब्बी पिकाला उत्तम असतो, पोषक असतो. त्यामुळे हस्ताचा पाऊस झाला की, शेतकरी मस्त जगेल.
८) ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती।’
असे म्हणतात स्वाती नक्षत्राच्या पावसामुळे शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. पण हाच स्वातीचा पाऊस कापसाचे पीक धुवून नेतो. अगदी देवापुढे समई लावायला वातीपुरता देखील कापूस मिळत नाही.
९) ‘पडतील उत्तरा तर अन्न न खाई कुतरा’
उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तर भाताच्या पिकाचे वाटोळे होते. म्हणजे पाळलेल्या कुत्र्याला घास भरविण्याइतका भात घरात नसेल.
१०) ‘लागत नसे मघा तर आकाशाकडे बघा’
मघा नक्षत्र शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे, ते जर बरसले नाही तर आकाशाकडे डोळे लावून बघत बसा (आतुरतेने)
११) ‘न पडतील चित्रा तर भात ना मिळे पितरा’
चित्रा नक्षत्राचा पाऊस (सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये) न झाल्यास पितरांच्या (भाद्रपदातील) श्राद्धाला पिंडासाठी भात कसा मिळणार.
१२) ‘चित्राच्या तापाने हरणांच्या पाठी काळ्या’
चित्रा नक्षत्र पावसाळ्याच्या शेवटी येते. पण येताना प्रचंड उष्णता घेऊन येते. त्यामुळे जंगलातील हरिणांची कोवळी कातडी काळी पडते.
१३) ‘आर्द्रा आणि पाडी गरदाडा’
सत्तावीसातले पावसाळी सहावे नक्षत्र आर्द्रा, हे जोरदार पडले तर घरांच्या भिंतीना भगदाडे पाडून हाहाकार माजवते.
१४) ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, अन हिवाळा भोगी’
उन्हाळ्यात आपण कमी कपडे वापरून उघडेच राहातो. (संन्यस्त वृत्तीने) पावसाळ्यात थंडी-ताप- खोकला-सर्दीने रोगी बनतो. तर हिवाळ्यात छान-छान खातो, पितो आणि भोगतोही.
१५) ‘धारण-मरण आणि पाऊस कोणाच्या हाती नाही’
बाजारभाव (चढउतार) केव्हाही येणारा मृत्यू आणि पाऊस हे कोणाच्याच हाती नसते एवढे मात्र खरे.
१६) ‘ वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेल
वळवाचा पाऊस आला आणि तळ्यातले शिल्लक पाणीही घेऊन गेला.
१७) ‘पाऊस पडेल तर पाणी साचेल’
एक अर्थ पाण्याचा साठा करण्यासाठी पावसाची गरज आहे तर दुसरा अर्थ मिळकत केली तर शिल्लक साठेल
१८) ‘माहो आणि हिवाचा लाहो’
माघ महिन्याची थंडी ही अधिक कडाक्याची असते
१९) ‘पुस (पौष) आणि घरोघरी हुस्स’
पौष महिना लागला की, थंडीमुळे हुश्य करावे लागते.
२०) ‘पाऊस पडे आणि माती तुडे’
पाऊस पडला तर मातीचा चिखल होतो आणि तुडवला जातो.
२१) ‘थंडी गेली बंडी केली’
थंडीमध्ये जाड कपडे वापरतो. ती गेली की, उन्हाळ्याचे बंडीसारखे (मलमलचे बिना कॉलर, अर्ध्या बाह्याचे कपडे) कपडे वापरतो.
२२) ‘चैत्र गळे, कुणबी पळे’
चैत्रात सहसा पाऊस येत नाही. त्यावेळी मशागती उघड्यावर चालतात पण त्याचवेळी पाऊस कोसळला तर शेतकऱ्याला धावाधाव करावी लागते.
२३) ‘धोंडा आणि पिकाचा लोंढा’
धोंडा महिना म्हणजे अधिक महिना त्यामुळे शेतात पिकाला उत येतो.
२४) ‘दुष्काळात तेरावा महिना’
अधिक महिना वर्षात तेरावा महिना असतो. तो जर दुष्काळात आला तर सर्वांनाच त्रास होतो.
२५) सुना आल्या सळा-सळा, सासुबाई पळा
मघा आणि पूर्वा नक्षत्राचे नाते सून सासूचे मानतात. त्यामुळे जर मघा (सुना) सळासळा आल्या तर पूर्व (सासू) पळापळा
२६) ‘म्हाताऱ्याने टेकली काठी, नाही तर साडेसाती
पुष्य नक्षत्र (म्हातारा) थांबले म्हणून साडेसातीचे संकट टळले.
२७) ‘गरजतो तो बरसतो का ?’
हस्त नक्षत्र केवळ गडगडाट करून गेले तर थेंबभर पाणी पडणार नाही.
पावसाची नक्षत्रे त्यांच्या वाहनावर वावरतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी जास्त मानले जाते. अशीही नक्षत्रे आणि त्यांची वाहने.
१) मृग नक्षत्र : गाढव वाहन, पावसाचे प्रमाण जूनमध्ये कोठे कमी कोठे जास्त
२) आर्द्रा नक्षत्र : वाहन कोल्हा पावसाचे प्रमाण कमी जास्त आणि हुलकावणी देणे.
३) पुनर्वसु : वाहन म्हैस, जुलैमध्ये जोरदार पावसाचे प्रमाण
४) पुष्य नक्षत्र : वाहन घोडा, जुलैमध्ये संमिश्र पावसाचे प्रमाण
५) आश्लेषा नक्षत्र : वाहन मोर, पावसाचे प्रमाण ऑगस्टमध्ये उघड-झाप करते.
६) मघा नक्षत्र : वाहन गाढव. पाऊस ऑगस्टमध्ये कुठे कमी, कुठे जास्त.
७) पूर्वा नक्षत्र : वाहन मेंढा ऑगस्ट सप्टेंबर जोरदार पाऊस
८) उत्तरा नक्षत्र : वाहन म्हैस, सप्टेंबर महिन्यात पाऊस जोरदार
९) हस्त नक्षत्र : वाहन कोल्हा, पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबर हुलकावणी
१०) स्वाती नक्षत्र : वाहन हत्ती, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोरदार वृष्टी