Author: jyotish mitra milind

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन Astrological guidence and Counseling by jyotish mitra milind, Expertise in Dasha Reading. Working in this field from 2009.

एक सुगंधी संध्याकाळ


आजची संध्याकाळ एकदम सुगंधी ठरली. मुंबई येथील सहकारी ज्योतिष विद्या वाचस्पती सोनल पंडित यांचा पंडित फार्म्स डी पी रोड कर्वे नगर येथे भरलेल्या प्रदर्शनात त्यांचा आद्य एक्झीम हा स्टॉल लावण्यात आला आहे, तेथे सोनल पंडित यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या अभिनव पद्धतीच्या ज्योतिष कार्यास शुभेच्छा दिल्या.

या स्टॉल चे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतः अरोमा थेरपी व ज्योतिष शास्त्र यांचा एकत्रित अभ्यास व संशोधन करून त्यावर डॉ. समीक्षा ताई दारवलिकर संचालित अनिरुध्द नक्षत्र ज्योतिष या आयएसओ प्रमाणित संस्थेमध्ये प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली आहे.

व त्यांच्या अनुभव व कल्पकतेची फलश्रुती म्हणजे राशी स्वभावानुसार तसेच दोष निवारण करण्यासाठी आणि आपली ऊर्जा संतुलित करून अध्यात्मिक प्रगती, मन:शांती व एकाग्रता साधण्यासाठी राशिंनिहाय सुगंधी मसाला अगरबत्ती व इतर दर्जेदार उत्पादने वाजवी किंमतीत बाजारात आणली आहेत, जी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

तर सर्वांनी जरूर स्टॉल क्र. १४८ ला भेट देऊन आपली दिवाळी सुगंधित व उर्जायुक्त करावी.
( हे प्रदर्शन शनिवार व रविवार असे २६-२७ असे दोन्ही दिवस खुले आहे.)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग


विषय : शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कलाविलासी शुक्र

मूळ लेखक : द. मा. लेले

नमस्कार,

आज आपण शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग याबाबत माहिती घेणार आहोत.

शुक्र हा स्त्री ग्रह हा प्रामुख्याने कला, सौंदर्य, विवाह ई गोष्टींचा कारक ग्रह आहे. त्यामुळे शुक्राचा भावनांशी घनिष्ठ संबंध असतो.

हर्षल हा ग्रह मुळातच चेतना देणारा अथवा उद्दीपित करणारा, लहरी, स्वच्छंदी, तांत्रिक, रूढी न मानणारा अपारंपारिक ग्रह आहे. नेपच्यून हा स्त्री ग्रह शुक्राशी कारकत्व साधर्म्य दाखवणारा ग्रह आहे. संवेदनशीलता, कल्पकता, सृजनशीलता, अतिविचार, भावना यांचे अतिरेकी रूप नेपच्यून दर्शवतो.    

त्यामुळे शुक्राबरोबर होणारे हर्षल अथवा नेपच्यून चे जन्म कुंडलीत अथवा गोचर मध्ये होणारे

योग अभ्यासण्या सारखे असतात.

१) शुक्र – हर्षल युती योग

हा एक अत्यंत प्रभावशाली योग असतो. शुक्राचा भावनांशी घनिष्ठ संबंध असल्याने आणि हर्षल त्यास चेतना देणारा असल्याने या योगात जातकाच्या भावना मोठ्या अस्थिर स्वरूपाच्या आढळतात. जातकाच्या भावनांची आंदोलने (Mood Swings) फारच तीव्र स्वरूपात होत असतात.

संगीत, साहित्य, काव्य इत्यादी कला हे शुक्राचे गुणधर्म हर्षल च्या युति योगात अगदी प्रखरपणे उजळतात. असे जातक नाट्य, चित्रकला, फोटोग्राफी, काव्य-संगीत ई. कलांत प्रकारांत प्रावीण्य मिळवितात. असे जातकाचे अंगी कल्पकता व नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याची उर्मी आढळते.

शुक्र हा कलत्रकारक, विवाहकारक व लैगिंक भावनावर अंमल गाजविणारा ग्रह हर्षलच्या युतीत असता, त्या दृष्टीने काही अनिष्ट व विचित्र फळे आढळतात. अशा जातकांना स्त्रियांच्या ओळखी वाढवण्याची आणि त्यांचे सहवासात रमण्याची हौस असते. या युतीमुळे जातकाचा प्रेमविवाह होण्याची दात शक्यता असते. पण हर्षल हा ग्रह वायू तत्वाचा रूढी न पाळणारा व सतत नावीण्याचा हव्यास असणारा ग्रह असल्याने घटस्फोटाची प्रकरणे होतात. घटस्फोट घ्यायचा व पुन्हा दुसरा विवाह करायचा अशा गोष्टी घडण्याचा संभाव असतो. या युतीची घटस्फोट, पतीपत्नींचे दीर्घ काळ विभक्त राहणे, लैगिंक विकृती, जोडीदाराची फसवणूक, प्रतारणा ई. फळे मिळण्याची शक्यता असते. कर्क, वृश्चिक व मीन या जल राशीत तसेच मेष, वृषभ, मिथुन, तूळ या राशीत ही युती असत्ता विक्षिप्त वैवाहिक भावना व वैचित्र्याची वृत्ती जातकामध्ये जास्त आढळते.

२) शुक्र – हर्षल शुभ योग

शुक्र ह्या भावनाशील, कलाप्रेमी व सौंदर्यप्रेमी ग्रहाला हर्षलच्या शक्तीची शुभ योगात मिळणारी साथ कित्येक जातकांच्या कुंडल्यांत मोठी नजरेत भरण्यासारखी असते. या योगात शुक्र व हर्षल या दोघांची कारक फळे मोठी उद्दीपित झालेली आढळतात. लाभ योग व नवपंचम योग बौद्धिक बाबतीत व कलेच्या दृष्टीने उत्तम फळे देतात. या योगात निरंतर स्फूर्ती आहे. गतिमान अशी शक्ती आहे. ध्येयवादीपणा आहे, तसेच कर्तृत्व आहे. हे जातक वाङ्मय, शास्त्र, कला अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग झेप घेणाऱ्या आढळतात. मिथुन, तूळ, कुंभ या बौद्धिक राशीतून होणारा नवपंचम योग उत्तम बुद्धिमत्ता, आकलनशक्ती देणारा योग असून अशा योगात रवी, बुध, चंद्र असता मोठा सर्जनशील योग होतो. जलराशीतून शुक्र-हर्षल नवपंचम योग असता जातक कामुक, विषयी, प्रणयी, विलासी असू शकतात. आयुष्यात रंगेलपणाची (Flirty Nature) किनार असते.

शुक्र हर्षल अंशात्मक शुभ योग असता जातकाच्या पुष्कळ ओळखी असतात. जातकाला सामाजिक कार्याची आवड असते. जातक हौशी व आनंदी व खुशहाल प्रवृत्तीचा आढळतो. जातकास सौदर्यांची आवड व आसक्ती आढळते. चित्रकला, फोटोग्राफी, काव्यगायन ई. कलांत रस असतो. शुक्र स्त्री कारक, सप्तमाचा नैसर्गिक कारक या दृष्टीने शुक्र हर्षल शुभ योगात विवाहासंबंधी काही अभिनव कल्पना असतात. प्रेमविवाह अथवा सहवासोत्तर विवाह याची शक्यता असते. असे जातक प्रेमाच्या बाबतीत जास्त पुढाकार घेणारे आढळतात. शुभ योगात विवाह अकस्मात होण्याची शक्यता असते. स्त्री वर्गात ओळखी जास्त असतात.

स्त्रियांच्या कुंडल्यात शुक्र – हर्षल शुभ योगामुळे सौदर्याभिरुची, नटण्या मुरडण्याची आवड, कपडे व इतर बाबतीत छानछोकीपणा जास्त असतो. वागणे, चालणे मोठे आकर्षक असते. अभिनव गोष्टींचे आकर्षण व भावनाशीलता जास्त असते.

(३) शुक्र – हर्षल अशुभ योग

हर्षल हा गरज फळे देण्याच्या बाबतीत अत्यंत प्रभावी असा ग्रह असून, त्यात त्याला केंद्रयोग व प्रतियोगातील नैसर्गिक शक्ती लाभते. त्यामुळे त्याचे परिणाम मोठे तीव्र स्वरूपाचे मिळतात. शुक्राच्या केंद्र वा प्रतियोगात हर्षल असता शुक्राचे स्वरूप थोड्याफार प्रमाणात विकृत किंवा बिघडलेले दिसून येते. अशा योगात वैवाहिक आयुष्याचा प्रांत मोठा नाजूक व कीचकट झालेला आढळतो. हा योग जातकाला सांसारिक सुख सरळपणे लाभू देत नाही. वैवाहिक आयुष्यात संघर्ष, असमाधान, अशांतता निर्माण होऊन त्या दृष्टीने एक विचित्र तणाव सतत राहतो. शुक्र – हर्षल अशुभ योगात विवाह ठरताना सुद्धा अडचणी येतात अथवा त्रास होतात अथवा जीवनसाथी विक्षिप्त, लहरी, हेकट, अहंमन्य असतो. घटस्फोट घेतलेल्या किंवा तीव्र असमाधान असणाऱ्या कुंडल्यांत शुक्र हर्षल अशुभ योग बरेच वेळा आढळतो. हर्षल वक्री असल्यास फळांची तीव्रता अजून वाढते.

हा योग स्वभावाच्या दृष्टीने जसा महत्त्वाचा आहे, तसाच वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने वा बौद्धिक दृष्टीनेही तफावत दर्शवते. यात वैवाहिक जोडीदारास अपघात होण्याची शक्यता आढळते.

शुक्र – हर्षल अशुभ योगात दोघांना राशिबळ, स्थानबळ असता बौद्धिक वा कलाक्षेत्रात प्रावीण्य आढळते. असे जातक वाङ्मय, शास्त्र, कला, काव्य यात बुद्धीची चमक उत्तम दाखवू शकतात.

अशुभयोग असता व शुक्र, मंगळ, नेपच्यून वा शनीने बिघडला असता, जातकाचे चारित्र्य बिघडण्याची शक्यता असते. अशा जातकांची स्त्रियांकडून फसगत होते किंवा आयुष्यात मोठ्या नाट्यमय घटना घडून आयुष्य पूर्ण बदलून जाऊ शकते.

४) शुक्र – नेपच्यून युतीयोग

शुक्र – नेपच्यून या दोन ग्रहांची युती इतर कोणत्याही ग्रहयोगाच्या कुयोगात नसल्यास काही महत्त्वाची शुभ फळे देताना आढळते. अशा जातकांना कलाप्रेम व सुंदर गोष्टींबद्दल तीव्र आकर्षण असते. करमणुकीचो क्षेत्रे व वाङ्मय यात रस असतो. त्यांची रसिकता उत्तम असते. एखाद्या क्षेत्रात त्यांना चांगले प्रावीण्य लाभते व नावलौकिक होतो.

ही युती असलेले जातक अति भावनाशील असतात. असे जातक प्रेमळ व लाघवी असतात. सौंदर्यप्रेमी असतात. स्वभाव अधिक भावनाप्रधान असल्याने प्रेमाच्या व इतर बाबतीतही हे जातक नाजूक व संवेदनशील असतात. अशा जातकांना एखादे दुःख अगदी दूरगामी व दीर्घकाळ होते.

शुक्र – नेपच्यून युती पापग्रहांच्या अशुभ योगात असता, शारीरिक व मानसिक त्रास जास्त होतात. स्वप्नाळूपणा असतो. नैराश्याने अथवा काल्पनिक चिंतांनी हे जातक अगदी त्रस्त होतात. वैवाहिक आयुष्यात संकटे येतात.

ही युती असणाऱ्या जातकांची अन्य व्यक्तीकडून फसवणूक होताना आढळते अथवा अतिरेकी अपेक्षांमुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो व आयुष्य नरकमय बनवून घेतात.

५) शुक्र – नेपच्यून शुभ योग

नेपच्यूनचे कारकत्व बऱ्याच प्रमाणात शुक्राशी सुसंगत आहे व ते शुभ योगात शुक्रास फार पोषक असते. नेपच्यून हा सुप्त मानसिक शक्तींशी निगडित असून शुक्रासारखाच कलासक्त असल्याने कलेच्या व भावनेच्या दृष्टीने, स्फूर्ती व कल्पनाशक्तीच्या दृष्टीने, मनाच्या व भावनांच्या नाजूक संवेदनांच्या दृष्टीने जास्त शुभ फलदायी होतात. नवपंचम योगात जास्त दर्शनीय फळे मिळतात. लाभयोग तेवढा शक्तिमान नसल्याने इतर ग्रहांच्या शुभ योगावर त्यांची शक्ती अवलंबून असते.

या योगामुळे जातक प्रेमळ व सहृदय असतात. कित्येक वेळा असे जातक प्रचंड ध्येयवादी, स्वप्नाळू व कल्पना साम्राज्यात रंगणारे आढळतात. हा योग स्फूर्ती व उत्तम कल्पनाशक्ती देणारा असल्याने असा योग कवी, लेखक, कलावंत यांच्या कुंडलीत प्रामुख्याने आढळतो. दोन्ही ग्रह कलासक्त व सौंदर्यासक्त असल्याने शुक्र नेपच्यून शुभ योगात शुक्रास राशिबळ व स्थानबळ असल्यास संगीत, गायन, वाद्यवादन, चित्रकला, मूर्तिकला, अभिनय, नृत्य वगैरे गोष्टीत जातकास उत्तम प्रावीण्य मिळते. हे जातक प्रेम, वात्सल्य, दयाळूपणा, भक्तिभाव वगैरे दृष्टीने संवेदनशील असतात.

६) शुक्र – नेपच्यून अशुभ योग

शुक्र नेपच्यून केंद्र प्रतियोग अशुभ योगांतही कला, साहित्य, सौंदर्य यासंबंधी, तसेच प्रेम, स्फूर्ती, कल्पनाशक्ती, गूढ गोष्टींचे आकर्षण या दृष्टीने शुभ योगासारखीच फळे देतात. अशुभ योगात भावनांना जीवनात महत्त्व आलेले दिसते. अत्यंत संवेदनशील व नाजूक वृत्ती असल्याने अशा जातकांच्या भावना खूप तीव्र व दिव्य असतात. भावना दुखावल्या गेल्यावर यांना दुःख मोठ्या तीव्रतेने होते. कित्येक वेळा अगदी ‘मूडी’ व्यक्ती आढळतात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, बरोबरचे लोक यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख त्यांना अधूनमधून नेहमी होत असते. कित्येक वेळा काल्पनिक चिंता व दुःखेही होतात. भोवतालच्या परिस्थितीचे परिणाम यांच्या मनावर जास्त होत असतात. त्यामुळे वागण्यात एक प्रकारचा तर्हेवाईक पणा येतो.

शुक्र – नेपच्यून अशुभ योग, वैवाहिक, सांसारिक वा कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने अशुभ फळे देतो. पत्नीचे अनारोग्य, पती-पत्नीत वैचारिक संघर्ष, काही काळ मोठे गैरसमज असे परिणाम आढळतात. केंद्र प्रतियोगात एखादा ग्रह वक्री असता द्विभार्यायोग. स्त्रीसंबंधी नाट्यमय घटना घडू शकते. या जातकांना भावनिक संघर्षाचे मोठे दुःख आयुष्यात सहन करावे लागते. तरुण जातक प्रेमभंगाच्या दुःखात अनेक वर्षे व्यर्थ घालवू शकतो, अथवा जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे अनेक वर्षे दुःखी राहू शकतो. अंगीकृत कार्यात अपयश येणे, धक्का बसणे, एखाद्या विशिष्ट कार्यात अपयश येणे, एखाद्या गोष्टीत अनेक वर्षे दवडूनही माघारी यावे लागणे, आर्थिक भानगडी होणे, वगैरे फळे अशुभ योगात मिळताना दिसतात. तसेच प्रेमाच्या बाबतीत अथवा आर्थिक बाबतीत एखादी फसवणूक झाल्यासारखीच घटना घडते. कुंडलीत इतर अशुभ योग असता त्याला व्यसनाधीनता, गुप्त शत्रुत्व असते. तसेच मानसिक वा लैंगिक विकृती असतात. जीवनात स्त्री, व्यसन, पैसा वगैरेमुळे नावलौकिक जाण्याची शक्यता असते.

हे योग व त्याचे अनिष्ट परिणाम तपासताना योग अंशात्मक असता जास्त प्रभावी फळे मिळतात. व साहचर्य योगात तीव्रता कमी असते. तसेच कोणत्याही निष्कर्षास येताना कुंडलीतील इतर ग्रहयोग, ग्रहस्थिती, दशा अंतर्दशा काय निर्देश करतात हे बघणे महत्वाचे ठरते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

जन्म तारखे वरून जन्म वार शोधण्याची पद्धत


विषय : जन्म तारखे वरून जन्म वार शोधण्याची पद्धत

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : अंक ज्योतिष एक चमत्कार

मूळ लेखक : डॉ.कटककर

नमस्कार,

जेव्हा एखादा जातक एखाद्या ज्योतिषाकडे आला असता, आपण किती ज्ञानी आहोत, आपल्याला कशी दिव्य शक्ती प्राप्त झाली आहे ई. गोष्टी जातकावर बिंबवून प्रभाव पाडण्यासाठी अनेक जन अनेक क्लुप्त्या वापरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे जातकाने जन्म तारीख सांगितली असता पटकन जन्म वार सांगणे. जेणेकरून समोरचा चकित होतो.

वास्तविक हे असले चमत्कार, दिव्या शक्ती वगैरे असे काही नसून त्यामागे अंक ज्योतिष असते. जे चमत्कारिक पद्धतीने चटकन काही उत्तरे देते. ज्यांना अंकाशास्त्रात रुची आहे त्यांनी अंक ज्योतिष एक चमत्कार हे डॉ. कटककर यांचे पुस्तक जरूर अभ्यासावे व त्यात पारंगत व्हावे.

अंकशास्त्राच्या किमयेप्रमाणे संपूर्ण जन्म तारखे वरून जन्मवार पटकन शोधून काढण्याची पद्धत आहे. ही पद्धत अवगत केल्यास आपल्याकडे प्रश्न विचारण्यास आलेल्या जातकास आपण काही वेळात चकित करू शकतो. आलेल्या माणसाबरोबर आपले संभाषण चालू असताना त्याने दिलेल्या त्याच्या जन्मतारखेवरून आपण मनातल्या मनात गणित करून त्याचा बरोबर जन्म वार सांगितल्यास, त्याला आश्चर्याचा धक्का बसेल व ते प्रभावित होतील.

हे गुप्त गणित करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे-

शतकांना व प्रत्येक महिन्याला काही विशिष्ट क्रमांक दिले आहेत. ते खालीलप्रमाणे-

शतकाचे दिलेले अंक

१) १८ वे शतक : ४ अंक, २) १९ वे शतक : २ अंक, ३) २० वे शतक : ० अंक, ४) २१ वे शतक : ६ अंक

महिन्याला दिलेले अंक

जानेवारी : १ अंक, फेब्रुवारी : ४ अंक, मार्च : ४ अंक, एप्रिल : ० अंक, मे : २ अंक, जून : ५ अंक, जुलै : ० अंक, ऑगस्ट : ३ अंक, सप्टेंबर : ६ अंक, ऑक्टोबर : १ अंक, नोव्हेंबर : ४ अंक,  डिसेंबर : ६ अंक

महत्वाची टीप : लीप वर्षात जानेवारीचा अंक ० असतो, फेब्रुवारीचा ३ असतो.

जन्म तारखे वरून जन्मवार कसा शोधावा?

१) जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक यांना ४ ने भागावे.

२) आलेला पूर्णांक मूळ जन्मवर्षात मिळवावा.

३) वरील बेरजेमध्ये जन्मतारीख मिळवावी.

४) आलेल्या संख्येमध्ये जन्म महिन्याला जो अंक दिलेला आहे तो मिळवणे व शतकाचा अंक मिळवावा.

५) वरील आलेल्या संख्येला ७ ने भागावे व भागाकार झाल्यानंतर खाली जी बाकी राहील तो जन्मवार असतो.

बाकी १ राहिल्यास रविवार, २ राहिल्यास सोमवार, ३ राहिल्यास मंगळवार, ४ राहिल्यास बुधवार, ५ राहिल्यास गुरुवार, ६ राहिल्यास शुक्रवार, ० राहिल्यास शनिवार हा जन्म वार असेल.

उदाहरण :

जन्म तारीख : २१ ०८ १९७३

१) जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक ७३ आहेत. यांना ४ ने भागले असता १८ पूर्णांक मिळाला.

२) आलेला पूर्णांक १८ मूळ जन्मवर्ष ७३ मध्ये मिळवला असता १८+ ७३ = ९१ ही संख्या मिळाली.

३) वरील संख्या ९१ मध्ये जन्मतारीख २१ ही मिळवली असता ११२ ही संख्या मिळाली.

४) आलेल्या ११२ या संख्येमध्ये ऑगस्ट या जन्म महिन्याला दिलेला ३ हा अंक व २० व्या शतकाचा अंक ० मिळवला असता ११२ + ३ + ० = ११५ ही संख्या मिळाली.

५) वरील आलेल्या ११५ या संख्येला ७ ने भागले असता १६ पूर्णांक येऊन ३ बाकी मिळाली त्यामुळे जन्म वार हा मंगळवार आला.

आपण ही या पद्धतीने जन्म तारखे वरून पटकन गणित मांडून एखाद्यास जन्म वार सांगून चकित करू शकता.  

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

पारंपारिक व कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे एक अवलोकन


विषय : पारंपारिक व कृष्णमूर्ती पद्धतीचे एक अवलोकन

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कृष्णमूर्ती पद्धती एक चिकित्सा

मूळ लेखक : गजानन तेंडूलकर

नमस्कार,

आपला नेहमीचा अनुभव आहे की, ज्योतिष अभ्यासकांमध्ये आपण स्वीकारलेली भविष्य कथन पद्धत च कशी श्रेष्ठ आहे हे सांगण्याची चढाओढ लागलेली असते. पण काळाच्या ओघात आधीचे संशोधन काल बाह्य तरी होत असते किंवा विकसित तरी होत असते. पण श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या नादात सर्वजन हे विसरतात की, आज सचिन तेंडूलकरने केलेला विश्वविक्रम पुढे जाऊन कोणी विराट हा मोडणार असतो. पण कीर्ती मात्र भारताचीच होणार असते. तुम्ही या ज्योतिष शास्त्रासाठी किती योगदान दिले आहे, हे महत्वाचे नाही का. तसेच मूळ पारंपारिक ज्योतिष शास्त्र हा आदिवृक्ष आहे आणि इतर ज्योतिष पद्धती या त्याच्याच विकसित शाखा आहेत.

येथे पारंपरिक ज्योतिष व कृष्णमूर्ती पद्धतिचे विश्लेषण करण्याचा एक प्रयत्न केला आहे.

पा. प. १) लग्नकुंडली बरोबरच राशीकुंडली व नवमांश कुंडलीही पाहातात.

कृ. प. १) पाश्चात्य पद्धतीप्रमाणे फक्त जन्म कुंडलीलाच विचारात घेतात.

पा. प. २) बारा भाव, बारा राशी व नऊ ग्रह (दाक्षिणात्य ज्योतिषी मांदी व गुलिक हे ग्रहही घेतात) शिवाय आधुनिक ज्योतिषी हर्शल, नेपच्यून व प्लूटो हे ग्रहही घेतात.

कृ. प. २) बारा भाव, बारा राशी व नऊ ग्रह या घटकांना महत्त्व. हर्शल, नेपच्यून व प्लूटोना विंशोत्तरी दशेत स्थान नसल्याने नक्षत्र ज्योतिषातही स्थान नाही.

पा. प. ३) बारा राशी व सत्तावीस नक्षत्रे यांच्या संयोगावरून पडणारे १०८ नवमांश याना महत्त्व आहे. सुरवातीस कृष्णमूतीही नवमांश विभागाला महत्त्व देत.

कृ. प. ३) सत्तावीस नक्षत्र विभाग व विंशोत्तरी, दशेच्या प्रमाणावर आधारित राशीचक्राचे २४९ उपनक्षत्रविभाग याना अनन्य- साधारण महत्त्व आहे.

पा. प. ४) ग्रहबलाच्या कुंडल्यांना महत्त्व आहे. दृष्टीने षोडशवर्ग कुंडल्यांना महत्व आहे.

कृ. प. ४) जन्मलग्नकुंडलीखेरीज इतर वर्गाना स्थान नाही.

पा. प. ५) ग्रहांचे बलाबल ठरविणारे उच्च – नौचत्व, मित्रशत्रूत्व, समतत्त्व इ. राशीस्थित अवस्थांना फार महत्त्व असते. जसे-तूळेत शनी उच्च, मकरेत गुरू नीच, कुंभेत मंगळ शत्रुगृही, घनेत रवी मित्रगृही.

कृ. प. ५) ग्रहांचे बल प्रत्येक भावाच्या कार्येशाच्या प्रतवारीवर ठरत असते. जसे- कोणत्याही भावामध्ये असलेल्या ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह त्या भावाचा नंबर एकचा बलवान कार्येश असतो.

पा. प. ६) ग्रहांच्या कारकत्वाला महत्त्व असते. जसे – रवी-पितृकारक, चंद्र-मातृकारक, गुरू-पुत्रसंततीकारक, शुक्र-पत्नीकारक, मंगळ-भातृकारक इत्यादी. संतर्तीसाठी पंचमस्थानाबरोबर गुरूची स्थिती पाहातात.

कृ. प. ६) कृ. प. मध्ये ग्रहांच्या कारकत्वास दुय्यम वा नगण्य महत्त्व, जसे-संततीसाठी गुरुच्या स्थिती-पेक्षा पंचम भावाच्या उपनक्षत्र स्वामीची स्थिती प्रामुख्याने महत्त्वाची असते.

पा. प. ७) लग्न, चतुर्थ, सप्तम व दशम या भावांखेरीज इतर भावबिंदू श्रीपती पद्धतीप्रमाणे घेत असतात. काही प्रख्यात ज्योतिषी लग्नापासून तीस अंशांचे समभाव घेतात; स्पष्ट दशमबिंदूचा वापर बिलकूल करीत नाहीत.

कृ. प. ७) भावसाधन राफेलने स्वीकारलेल्या प्लॅसिडस याच्या सेमी-आर्कपद्धतीने केले जाते. या पद्धतीसाठी राफेलच्या कोष्टकांऐवजी एस. बालसुंदरम् व बी. बाला यांचे ‘युनिव्हर्सल टेबल्स ऑफ हाऊसेस’ हे पुस्तक उपयुक्त आहे.

पा. प. ८) इष्ट सांपातिक कालावरून येणारे लग्नादींचे अंश-कला-विकला भावमध्य म्हणून वापरले जातात. प्रत्येक भावाचा आरंभ हा मागील भावमध्यापासूनच्या अंतरावरून ठरतो. उदा. लग्न मेष १६ अंश व द्वादश मीन १२ अंश हे भाव मध्य असल्यास या दोघामधील अंतराच्या निम्म्या (३४÷२) म्हणजे १७ अंश अंतरावर अर्थात् मीनेच्या २९ अंशापर्यंत द्वादशभाव असतो व लग्नभाव सुरू होतो. मीन २९ च्यापुढे असलेला ग्रह लग्न भावचे फल देतो. श्रीपती पद्धतीचे भावमध्य लग्न- चतुर्थ, दशम-लग्न या अंतराचे तीन सारखे भाग करून ते अंतर अनुक्रमे लग्न व दशम यामध्ये मिळवून साधता येतात. ही प्रसिद्ध व अत्यंत सोपी अशी जुनी पद्धती आहे. जुने व पारंपरिक ज्योतिषी ही पद्धती वापरतात. काही ज्योतिषी राफेल्सचे कोष्टक वापरतात. परंतु भावमध्य धरून घेतात. लग्नबिंदूपासून तीस अंशांचे समभाव वापरणाऱ्या ज्योतिष्यात भावारंभ व भावमध्य असे भेद करणारे ज्योतिषी आहेत. काही ज्योतिषी ‘तारतम्य’ वापरून ग्रहांचे भावफल ठरवतात. काही अंश दीप्तांश घेतात.

कृ. प. ८) इष्ट सांपातिक काल घेऊन राफेलच्या ‘टेबल्स ऑफ हाऊसेस’ या जंत्रीवरून बारा भाव घेता येतात किंवा वर उल्लेखलेल्या दुसऱ्या पुस्तकावरून अंश-कलात्मक भाव काढता येतात. कृष्णमूर्ती पद्धतीत हे पाश्चात्य पद्धतीचे भाव त्या भावाचे आरंभ असतात. उदा. प्रथम भाव मेष १६ अंश २० कला आहे. द्वितीय भाव वृषभ २४ अं. १२ कला आहे. प्रथमभावाची व्याप्ती मेषेच्या १६०-२०’ पासून वृषभेच्या २४०- १२८ पर्यंत राहील. एखादा ग्रह वृषभ २४०- ११ असला तरी तो प्रथमस्थानी असेल तर मेषेत १६०-१९ असल्यास बाराव्या स्थानात समजला जातो. एवढी सूक्ष्मता या पद्धतीत असते. पाश्चात्य पद्धतीने जरी हे तत्त्व मांडले असले तरी असंख्य कुंडल्यांचे पाश्चात्यांचे विवेचन भाव- मध्याजवळचा ग्रह तारतम्याने घेताना आढळते. उदा. वरील उदाहरणाप्रमाणे मेष ११ अंशातील ग्रह लग्नस्थानचे फल देताना विवेचन केलेला आढळतो. शिवाय पाश्चात्य ज्योतिषांत भावस्फुट साधनाच्या अनेक पद्धती आढळतात. केवळ राफेलचे कोष्टक आयते तयार असल्याने ते सर्रास वापरले जाते.

पा. प. ९) भारतीय ज्योतिषातील दृष्टीयोग अंशात्मक असले पाहिजेत असा नियम नाही. प्रत्येक ग्रहांच्या सातव्या स्थानावरील पूर्ण दृष्टीखेरीज मंगळ, गुरू व शनी याना विशेषाधिकार आहेत. हे पूर्ण दृष्टीचे अधिकार इतर ग्रहांचे बाबतीत प्रतवारीने कमी आहेत. मंगळास ४,८ गुरुस ५,९ शनीस ३,१० या स्थानांवर पूर्ण दृष्टिबल आहे. हे बल इतर ग्रहांच्या बाबतीत अनुक्रमे ३/४, १/२ व १/४ इतके आहे. युतीयोग अर्थात् महत्त्वाचा असतो. हे योग ढोबळ मानाने पाहिले जातात. मेषेत १ अंशात असलेला ग्रह तूळेच्या ३० व्या अंशातील ग्रहास पूर्णदृष्ट्या पाहातो. या उलट तूळेच्या ३० व्या अंशातील ग्रहाची वृश्चिकेतील पहिल्या अंशातील ग्रहाशी युती समजली जात नाही. एखाद्याचे मेष लग्न २७ अंश असेल व समोर तूळेत ५व्या अंशात ग्रह असेल तरी त्याची लग्नावर पूर्ण दृष्टी असते असे समजले जाते. शेवटी दृष्टियोग राशीपासून मोजले जातात हेच खरे. अंशाना किंमत नसते. काही ज्योतिषी राहू-केतूनाही विशेष दृष्टियोग देतात. परंतु हे चंद्राचे पातबिंदू असल्याने युतिखेरीज वा इतर ग्रहांच्या यांच्यावरील विशेष दृष्टिखेरीज इतर दृष्टीना महत्त्व नाही.

कृ. प. ९) कृष्णमूर्ती भारतीय पद्धतीच्या दृष्टीयोगांबरोबरच पाश्चात्य दृष्टियोगांनाही महत्त्व देतात. दोन ग्रहांमधील १८च्या पाढ्यामधील व २२॥ च्या पटीचे अंशात्मक कोन शुभाशुभ दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यात ४५, ९०, १३५, १५०, १८० अंशांचे कोन हे विशेष अशुभ तर ६०, १२० अंशाचे विशेष शुभ असतात. इतर योग १८ व त्याच्या पटीच्या अंशांचे शुभ व २२ ॥ च्या पटीचे अशुभ परंतु कमी प्रतीचे आहेत. प्रत्येक योगाचे काही दीप्तांश असतात. त्यांचे प्रमाण वेगवान ग्रह व धीम्या गतीचे ग्रह यांच्यासाठी भिन्न असते. शिवाय अंतर जितके अधिक तितके दीप्तांश जास्त अनुभवास येतात. हा अनुभवाचा भाग आहे. स्वतः कृष्णमूर्तीनी सरधोपट दृष्टी मानली होती हे त्यांच्या विविध कुंडल्यांच्या स्पष्टीकरणावरून आढळते. दक्षिण भारतीय ज्योतिष्यांमध्ये दृष्टियोग ढोबळपणे स्वीकारतात. के.पी. मध्ये हीच पद्धत आहे. ग्रहांचे शुभाशुभत्व पाहाण्याची वेगळी रीत कृष्णमूर्तीनी दिली असताना त्यानी पाश्चात्य दृष्टियोगाना का महत्त्व दिले ते मात्र कळत नाही. राहू- केतूना विशेष दृष्टि असते असे ते मानीत नाहीत. तरी सप्तम दृष्टीचा विचार विवेचनात आढळतो.

पा. प. १०) ग्रहांचे शुभशुभत्व पाहाताना ६/८/१२ स्थानांचे स्वामी अशुभ समजले जातात. तसेच कोणत्याही स्थानाचा स्वामी ६/८/१२ मध्ये पडला की तो अशुभ असतो. तसेच नैसर्गिक पापग्रहांची दृष्टी अशुभ तर नैसर्गिक शुभ ग्रहांची दृष्टी शुभ असते. परंतु यामध्ये सुद्धा दोन प्रकारची भते आढळतात. तूळ लमास गुरू अशुभ फलदायी होतो. मग त्याची दृष्टी शुभ की अशुभ? तो कारकत्वाच्या दृष्टीने अशुभ की स्थानफलाच्या इटीने अशुभ ठरतो?

कृ. प. १०) कोणात्मक अंतरावरून शुभाशुभ मानण्याची पाश्चात्यांची पद्धत के.पी.मध्ये नाही. परंतु पाश्चात्य दृष्टियोगांचा उल्लेख आहे. शुभ स्थानाच्या अधिपतीचा अशुभ स्थानाच्या अधिपतीशी शुभ योग झाला की अशुभ फल मिळते व अशुभ योग झाला की शुभ फल मिळते अशा प्रकारचा विचार त्यानी केलेला आढळतो. ‘अॅडव्हान्स स्टेलर अॅस्ट्रॉलॉजी’ या ग्रंथात मात्र शुभाशुभत्वाची कल्पना वेगळ्या पद्धतीने मांडली आहे.

पा. प. ११) चंद, बुध, गुरु शुक्र शुभग्रह असून रवी, मंगळ, शनी, राह व केतू अशुभ ग्रह आहेत प्रत्येक ग्रह आपापल्या स्वभावाप्रमाणे शुभ वा अशुभ फल देतो. त्यांची दृष्टीही गुणधर्माप्रमाणे कार्य करते. ग्रहांच्या गुणधर्मांना येथे विशेष महत्त्व आहे. त्यांची शुभाशुभ फले देण्याची पद्धत स्वभावधर्माप्रमाणे असते. उदा. शनी ग्रहाचे गुणधर्म बव्हंशी अशुभ आहेत. जर तो योगकारक असेल तर जी शुभ फले मिळतील ती शनीच्या स्वभावानुसार मिळतील; ती गुरू-शुक्राच्या पद्धतीने मिळणार नाहीत. जसे-शुक्राचा अंमल असलेला पिता आपल्या मुलावरील प्रेमाचे प्रदर्शन करील. याउलट शनीप्रधान पितासुद्धा आपल्या मुलावर प्रेम करीत असतो परंतु त्याचे प्रदर्शन नसते. शनी ग्रहाला सत्ता द्यायची असल्यास तो दलित- पीडित-मागासवर्गीय-श्रमजीवी लोकां- कडून अथवा विधीनिषेधशून्य मागनि देईल; तो गुरू ग्रहाप्रमाणे सनदशीर साधनशुचितेच्या मागनि देणार नाही. याउलट वृषभ व तूळ लग्रास गुरू अशुभ फलदाता असतो. सत्ता, उच्च पद, अधिकार मिळाल्यास त्याचे जोडीस तितकेच जोरदार अशुभ फल मिळते. अचानक मुलाचा मृत्यू होणे, मुलगा बाईट मार्गास लागणे, संतती नसणे असे जोडफल अनुभवास येते. पाराशरी पद्धतीप्रमाणे प्रत्येक लग्राचे शुभाशुभ ग्रह ठरलेले असतात.

कृ. प. ११) प्रत्येक ग्रहामध्ये शुभाशुभ फले दण्याची पात्रता आहे हा पाश्चात्यांचा दृष्टिकोण के.पी. मध्ये आहे. मात्र ग्रह शुभ वा अशुभ ठरवणे हे विविध दृष्टियोगावर अवलंबून नाही, तर स्थानपरत्व त्यांच्या पात्रतेवर ठरते. के.पी मध्ये एकाचा लाभ तर दुसऱ्याची हानी हे तत्त्व लक्षात घेऊन शुभाशुभत्व ठरवले जाते. उदा. एखाद्याला लॉटरी लागली की समोरच्याला पैसे मोजावे लागतात. तसेच एखाद्या दशेत एखादी चांगली घटना घडली की घरातील अन्य नातेवाईकांच्या बाबतीत अशुभ घटना घडू शकते. हा दृष्टिकोण विचारात घेऊन प्रत्येक स्थानाचे बारावे स्थान हे त्या स्थानासंबंधी नकारात्मक असते, तर अकरावे स्थान लाभदर्शक असल्याने इच्छित शुभ फल प्राप्त होते या तत्वावर के. पी. फलादेशाची इमारत उभी आहे. नवमस्थानाचा गौरव पारंपारिक पद्धतीत कितीही केला असला तरी दशमस्थानाच्या दृष्टीने ते नकारात्मक ठरते. केंद्र- त्रिकोणाधिपती या दृष्टिने शुभ ठरतातच असे नाही. दशमकेंद्र कितीही बलवान असले तरी एकादश स्थानचे बारावे स्थान असल्याने त्या स्थानासंदर्भात अशुभच आहे. इथे पारंपरिक विचारांशी ते पूर्णतया फारकत घेतात. इथे योगकारकास स्थान नाही. पाराशरी पद्धतीला डावलून ग्रहांचे शुभाशुभत्व वरीलप्रमाणे ठरले जाते. मात्र अष्टम व द्वादश भावांचे अधिपती अशुभ समजले आहेत.

पा. प. १२) प्रत्येक स्थानासंबंधीची फले दोन्ही पद्धतीत साधारणपणे सारखी असली तरी शिक्षणस्थान व पितृस्थान दाक्षिणात्य ज्योतिषी अनुक्रमे चौथे व नववे घेतात, आपल्याकडे पाचवे व दहावे घेतात. जुन्या ग्रंथांतही याबाबत दुमत आहे.

कृ. प.१२) दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे के.पी. मध्ये शिक्षणाचा विचार चतुर्थस्थानावर घेतात. उच्च शिक्षणास नवमस्थान हा पूरक भाव घेतात. पित्याचा विचार नवमावर होतो. कुंडलीतील मारकस्थाने व बाधकस्थाने पारंपारिक विचाराप्रमाणे घेतात.

पा. प. १३) विविध भावातील ग्रह आपल्या आधिपत्यानुसार, दृष्टियोग व राशी वर्गबलानुसार कोणते फल देणार हैं ठरवितात. त्यासाठी दशा व गोचर ग्रहांची स्थाने घेतात. विंशोत्तरी, अष्टोत्तरी, कालचक्र, योगिनी अशा विविध दशा घटनांचा काल ठरविण्यासाठी वापरतात. दिनवर्ष पद्धतीचा अभ्यास केलेले ज्योतिषी ती पद्धती निरयन ग्रहांना वापरतात. जोडीस गोचर ग्रहांची स्थाने पाहातात. पारंपरिक ज्योतिषात या दिनवर्ष-पद्धतीस स्थान नसून ती पाश्चात्यांकडून घेतली आहे. मात्र अलिकडील ज्योतिषी ती वापरतात.

कृ. प. १३) कृष्णमूर्ती पद्धतीत नक्षत्रांना प्राधान्य आहे. विशिष्ट भावातील ग्रह फल मिळण्याची दिशा (Source) दर्शवितो. ती फले कोणत्या स्वरूपाची असतील हे त्या ग्रहाचा नक्षत्रस्वामी दर्शवितो. त्याचा उपनक्षत्रस्वामी त्या घटनेसंबंधी शुभाशुभ फल दर्शवितो. म्हणजे दृशाधिपतीचा उपनक्षत्रस्वामी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. के.पी. च्या फलादेशाचा व रचनेचा पायाच विंशोत्तरी दशा असल्याने केवळ हीच दशा वापरणे क्रमप्राप्त आहे. ग्रहगोचरीशिवाय इतर कोणतीही कालनिर्णयपद्धती त्यानी स्वीकारली नाही.

पा. प. १४) गौचरीने भ्रमण करणारे ग्रह आपापल्या राशी, स्थान व दृष्टीप्रमाणे फले देतात. उदा. भाग्यस्थानातून भ्रमण करणारा शनी आपल्या मूळच्या स्थितीनुरूप जातकास फलप्रद ठरतो. मूळचा शनी उत्तम असेल तर त्याचे हे भ्रमण भाग्यदायक ठरते. मूळ कुंडलीत त्याचा संबंध भाग्यस्थानाशी असलाच पाहिजे असे नाही. समजा, एखाद्याचा शनी-रवी प्रतियोग आहे. गोचरीचा शनी वा रवी त्यांच्याशी अशुभ गोचर भ्रमणात असता अशुभ फल अनुभवास येते. उच्च जागेवरून पतन, मोठे आर्थिक नुकसान, वडिलांना अशुभ वगैरे शनी आपल्या स्वभावाप्रमाणे व कारकत्वाप्रमाणे फल देईल. यातही सूक्ष्मता त्यांच्या मूळ भावस्थितीप्रमाणे साधता येते.

कृ. प. १४) के.पी प्रमाणे गोचर फल ठरविण्यास दशा-अंतर्दशा स्वामी, रवी व चंद्र याना महत्त्व असते. या स्वामींच्या राशी- नक्षत्रानुसार त्यांचे व त्यांच्या बरोबर रवी- चंद्राचे भ्रमण घटना घडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. उदा. गुरू महादशेत शनी अंतर्दशा असता त्यानी दिग्दर्शित घटना गुरू व शनी यांच्या राशी व विशेषतः नक्षत्रे यामधून ते ग्रह स्वतः किंवा/आणि रवी चंद्राच्या भ्रमणाने घडतात. इतर ग्रहांना त्या घटने-संदर्भात महत्त्व नसते. त्यातूनही राशीपेक्षा नक्षत्रे महत्त्वाची. कारण विंशोत्तरी दशेचा आधारच नक्षत्रे आहेत; राशी नाहीत. रवीचे नक्षत्र-प्रवेश के.पी. अभ्यासकांना मुखोद्गत करायला हवेत. यासंबंधीचे विशेष विवेचन प्रकरण ६ मध्ये आहे.

पा. प. १५) ग्रहांची पंचधा मैत्री, त्यांचे स्थान- दिक्-काल-चेष्टादी बल, भावबल, विंशोपक बल इत्यादी गोष्टी पारंपरिक ज्योतिषात आहेत.

कृ. प. १५) के.पी.मध्ये हे सर्व बल जोखण्याचे प्रकार विचारात घेतले जात नाहीत. चार ‘गोल्डन रूल्स’ प्रमाणे ग्रहांचे बल ठरवले जाते.

पा. प. १६) जुन्या संस्कृत ग्रंथांमधील सुनफा अनफा, केमद्रुम, पंचमहापुरुष इत्यादी योगांचा वापर निष्णात ज्योतिषी करीत असतात.

कृ. प. १६) के.पी.मध्ये या शेकडो ग्रहयोगांना अजिबात स्थान नाही. ग्रंथांतर्गत राजयोगांचाही ते फलादेशाकरिता वापर करीत नाहीत.

पा. प. १७) संवत्सर, ऋतू, मास, पक्ष, तिथी, योग, करण, विषकन्यायोग, गंडान्त इ. पारंपरिक गोष्टींचा वापर काही ज्योतिषी करतात.

कृ. प. १७) के.पी.मध्ये फलादेश पाहाताना या सर्व घटकांना काहीही स्थान नाही. उपनक्षत्रस्वामींची स्थिती अभ्यासणे हा अखेरचा व प्रमुख पर्याय आहे.

पा. प. १८) अयनांश १९५६ च्या पंचांग सुधारणा शिफारशीनुसार इ.स.२८५ हे शून्य अयनांशवर्ष धरून अयनांश-निश्चिती | झाली, व त्यानुसार पंचांगे बनू लागली. बहुतेक ज्योतिषी हीच पंचांगे वापरतात. ज्यो. लाहिडी यांची पंचांगे तसेच आपल्याकडील पंचांगे हाच आधार घेतात. हे चित्रासन्मुख अयनांश म्हणून प्रसिद्ध आहेत. जुन्या कुंडल्या राफेल्सच्या एफेमरीजवरून काढून या अयनांशानुसार निरयन करून घेण्याकडे ज्योतिष्यांचा कल आहे. अॅस्ट्रॉलॉजिकल मॅगझीनमध्ये मात्र सुमारे दीड अंश कमी अयनांश आहेत. रेवती पक्ष (टिळक पंचागे) व चित्रापक्ष यात सुमारे चार अंशांचे अंतर आहे. तथापी चित्रापक्षाचे अयनांश बहुसंख्य ज्योतिषी वापरतात.

कृ. प. १८) पंचागसुधारणा होण्यापूर्वी ज्यो. केतकर यानीही चित्रा तारेच्या भोगावरून अयनांश घेऊन करणग्रंथ रचला. यावरूनच निर्णयसागर, जन्मभूमी इ. पंचांगे करीत. परंतु त्या वेळेच्या चित्रा तारेच्या गणितात सूक्ष्म फरक राहिल्याने शून्य अयनांश वर्ष इ.स.२९१ घेतले गेले. इ.स. १९५६ पर्यंत ही पंचागे ६ कला फरकाने अयनांश घेऊन केली आहेत. कृष्णमूर्तीना १९४० पासून वा त्यापूर्वी कित्येक वर्षे याच अयनांशाची ग्रहस्थिती उपलब्ध होती. त्यावरून त्यांचे संशोधन असल्याने १९५६ नंतरचा बदल त्यानी स्वीकारला नाही. आजतागायत के. पी. अयनांश सुधारित चित्रा अयनांशापेक्षा ६ कलांनी कमी आहेत. तथापी ते मूळचे चित्रापक्षाचे म्हणूनच घेतले होते.

पा. प. १९) भिन्न भिन्न अयनांशावरून षोडशवर्ग कुंडल्या भिन्न होतात; भोग्य दशा भिन्न असतात; त्यामुळे ग्रहदशांचे स्पष्टीकरण भिन्न होते. एकच अयनांश घेतल्यास संशोधनास योग्य असते. चित्रा पक्षाच्या अयनांशामुळे हे कार्य सुकर झाले आहे. या अयनांशावरून मांडलेल्या कुंडल्यावरून सुद्धा विदशांपर्यंत अचूक कालनिर्णय करता येतो असे विद्वान ज्योतिष्यांचे मत आहे. अयनांश भिन्नतेमुळे कित्येक ज्योतिषी विदशा पाहात नाही.

कृ. प. १९) अयनांशातील सहा कलांच्या फरकाने जन्मतः जर दीर्घ मुदतीच्या महादशा आल्यास १॥-१ ॥ महिन्यांचा फरक दशाकालात पडतो. या पद्धतीत त्या मागे येतात. त्यामुळे एखाद्या घटनेच्या स्पष्टीकरणात विदशा वेगळी येऊ शकते. शिवाय ६ कलांमुळे उपनक्षत्रस्वामी वेगळा येऊ शकतो. म्हणून के.पी. अभ्यासकानी ६ कला कमी असलेलेच अयनांश वापरणे योग्य. १ ते २४९ उपनक्षत्र विभागाना हा फरक महत्त्वपूर्ण ठरतो.

पा. प. २०) पारंपरिक पद्धतीत राहू-केतु हे छायाग्रह इतर ग्रहांप्रमाणे महत्त्वाचे आहेत. याना स्वतःच्या मालकीच्या राशी नसल्याने हे ज्या राशीत असतात व ज्या ग्रहांच्या युतीत असतात त्या ग्रहांचे फल देतात असे मानतात. काही ज्योतिष्यानी त्याना स्वगृहे व उच्च राशी बहाल केल्या आहेत. याना सर्वसाधारणपणे अशुभ ग्रह मानतात. लग्नबिंदूप्रमाणे हे चंद्राचे पातबिंदू अत्यंत संवेदनाक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ असलेला ग्रह अतिशय बलवान् ठरतो, व आपल्या स्थितीप्रमाणे जोरदारपणे शुभाशुभ फले देतो. ज्या स्थानात हे ग्रह असतात त्यासंबंधी दर्शित गोष्टींचा मानसिकदृष्ट्या फार परिणाम होतो. शनिवत् राहू व कुजवत् केतू’ हे तत्त्व फलादेशाच्या दृष्टीने विचारात घेतात. हल्ली पंचागात राहू-केतूंची स्पष्ट स्थिती दिलेली असते. तथापि जुने ज्योतिषी यांची मध्यम स्थितीच घेतात.

कृ. प. २०) के.पी. मध्ये या पातबिंदूना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर ग्रहांपेक्षाही या पातबिंदूना अधिक कार्यक्षम व प्रत्ययकारी मानले आहे. यांच्या युतीतील व यांच्यावर दृष्टी असलेल्या, यांच्या राशी-नक्षत्रस्वामी असलेल्या ग्रहांप्रमाणे यांची फलप्रदान करण्याची दिशा असते. एखाद्या घटनेच्या कार्येश ग्रहांच्या राशी वा नक्षत्रात हे पातबिंदू असतील तर त्या ग्रहांपेक्षा या छायाग्रहांना अधिक महत्त्व येते. विंशोत्तरी दशेसाठी यांचे नक्षत्रस्वामी महत्त्वाचे असतात. परंतु एखाद्या ग्रहाच्या राशीत हे असतील व तो ग्रह कार्येश असेल तर त्याच्या दशेऐवजी या छाया ग्रहांची दशा परिणामकारक असते. ‘शनिवत् राहू व कुजवत् केतू’ हा विचार के.पी. मध्ये ग्राह्य नाही. इतर स्पष्ट ग्रहांप्रमाणे राहू-केतूंची स्पष्ट स्थिती न घेता मध्यम स्थितीच फलादेशाकरिता घेतात.

पा. प. २१) वक्री ग्रहासंबंधी ज्योतिष्यात भिन्न मते आहेत. शुभ ग्रह वक्री असल्यास चांगला. वक्री पापग्रह अशुभ फलदर्शक असतो. काहीचे मत असे आहे की ग्रह वक्री झाला की त्याचे फल रोखले जाते; त्यात बाधा निर्माण होते. खगोलशास्त्रीय स्थितीप्रमाणे वक्री ग्रह म्हणजे पृथ्वीच्या व त्या ग्रहाच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे भूमध्यस्थ स्थितीत राशीचक्रात तो उलट भ्रमण करीत असल्यासारखा काही काळ भासतो. साधारणतः बाह्य ग्रह रवीच्या पंचम ते नवमस्थानापर्यंत वक्री असतात. परिणामतः पृथ्वीपासून त्यांचे अंतर कमी असल्याने जोरदार फल देण्यास समर्थ असतात. कुंडलीतील मूळच्या स्थिती प्रमाणे शुभाशुभ फल जोरदारपणे मिळते. मात्र त्यांच्या वक्री व मार्गी होण्याच्या तारखेस तसेच वक्री स्थितीतील राशी संक्रमणाच्या तारखेस ज्या स्थानामध्ये तो प्रवेश करतो त्यासंबंधी महत्त्वाचे अनुभव येतात.

कृ. प. २१) कृष्णमूर्ती पद्धतीत वक्री ग्रह अशुभ मानीत नाहीत. इतर मार्गी ग्रहांप्रमाणेच त्यांचे फल असते. प्रश्वजातकात मात्र वक्री ग्रह मार्गी झाल्यानंतर फलदायी ठरतो, वक्री ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह निष्फळ होतात. एखाद्या वेळेस अनेक ग्रह वक्री असतात त्यामुळे त्यांच्या नक्षत्रातील बहुतेक ग्रह निष्फळ ठरतील असे मानणे चुकीचे आहे. ग्रह ज्या अंशात वक्री होतो तो अंश महत्त्वाचा असतो. प्रश्नकुंडलीत वक्री ग्रह निष्फळ का समजावा ? काही ग्रह चार पाच महिने वक्री असतात. जर त्यांचा संबंध प्रश्नाशी निर्माण झाला तर बलहीन समजून तिकडे दुर्लक्ष केल्यास प्रश्नाचे उत्तर काय मिळेल ? वक्री ग्रहांचे अंश जसे महत्त्वाचे तसेच राश्यंतरही महत्त्वाचे असते. मागील राशीत प्रवेश करताना तो कार्यान्वित होतो. के.पी. मध्ये नक्षत्रांना प्राधान्य असल्याने राशीना गौण महत्त्व येते. मात्र शुभाशुभत्वाचा वक्री स्थितीशी संबंध नसतो.

पा. प. २२) पारंपरिक ज्योतिषी लग्नकुंडली, राशीकुंडली व नवमांशकुंडली याना’ अनन्यसाधारण महत्त्व देतात. दाक्षिणात्य ज्योतिषी तर कित्येक वेळा नवमांश कुंडलीला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतात. ग्रहांचे बलाबल ठरविताना नवमांशातील बल जास्त महत्त्वाचे ठरते. जन्मलग्न कुंडलीचे सर्व नियम नवमांश कुंडलीस लावतात. पाराशरी पद्धतीने ग्रहांचे शुभाशुभ फल ठरते. लग्नकुंडलीत शुभ ठरलेला ग्रह नवमांशकुंडलीत अशुभ ठरू शकतो, व ती कुंडली अधिक सूक्ष्म असल्याने अशुभ फलाचा अनुभव येतो. म्हणजे लग्न-कुंडलीतील ६/८/१२ च्या स्वामपिक्षा नवमांश कुंडलीतील ६/८/१२ च्या स्वार्मीना अधिक अशुभत्व असते. त्याचप्रमाणे जन्मलप्रकुंडलीतील ६/८/ १२ स्थानांतील ग्रहांपेक्षा नवमांश कुंडलीतील ६/८/१२ मधील ग्रह अधिक अशुभ ठरतात. लग्नकुंडलीतील शुभ ग्रह चंद्र-कुंडलीत अशुभ ठरू शकतो. कित्येक नामांकित ज्योतिषी लग्न, राशी व नवमांश कुंडल्यांचा एकत्र विचार करून फलादेश वर्तवितात.

कृ. प. २२) के.पी मध्ये लग्नकुंडली, ग्रहांची नक्षत्रस्थिती व उपनक्षत्रस्वामी याना उत्तरोत्तर महत्त्व आहे. उपनक्षत्रस्वामीमुळे फलादेशास अचूकता येते. अगदी वर्गोत्तम असलेले ग्रह उच्च वा स्वनवमांशी असले तरी जर ते भिन्न उपनक्षत्रस्वार्मीच्या विभागात असून एक शुभ व दुसरा अशुभ ठरत असेल तर भिन्न फले अनुभवास येतात; ती सर्वस्वी शुभच असतील असे नाही. म्हणजे उपनक्षत्रस्वामी जर त्या स्थानाचा व्ययेश असेल तर तत्संबंधी अशुभ फलदायी होईल. इथे एक विपरित नियम आढळतो. जर नक्षत्रस्वामी शुभदर्शक भावात असल्यास त्याच्या नक्षत्रातील ग्रह ६/८/१२ मध्ये असले तरी शुभ फले देतात. हा नियम उपनक्षत्र स्वामीस शह देणारा आहे. कारण वरील ग्रह अशुभ ‘सब’ मध्ये असल्यास शुभ फले कशी मिळतील? प्रत्येक भावाचा उप- नक्षत्रस्वामी सूक्ष्मता साधण्यास विचारात घेतात. तो नकारात्मक भावांशी संबंधित असल्यास तसेच ८ व १२ वा स्थानांशी संबंधित असल्यास त्या भावफलात अशुभत्व येते.

पा. प. २३) नक्षत्रांच्या गुणधर्मास व योगताऱ्यांस महत्त्व आहे. विंशोत्तरी दशा मानणारे ज्योतिषी नक्षत्रस्वामीसुद्धा विचारात घेतात; नक्षत्रविभागानुरोधाने ग्रहांचे फल घेतात.

कृ. प. २३) नक्षत्रांचे विंशोत्तरी दशेप्रमाणे असलेले स्वामी महत्त्वाचे असतात. त्यांच्या स्वभावानुसार नक्षत्रफल ठरते. योगताऱ्यांना अगर नक्षत्राच्या तीक्ष्णादी गुणधर्माना मुळीच स्थान नाही.

पा. प. २४) षष्ठ्यंशापर्यंत म्हणजे अर्धा अंश सूक्ष्मतेपर्यंत ग्रहबलाचा विचार केलेला आहे. षोडश वर्ग कुंडल्या मांडण्याचा खटाटोप करतात. परंतु त्यांचा उपयोग किती ज्योतिषी करतात हा प्रश्नच आहे. फारच थोडे ज्योतिर्विद नवमांशकुंडली पलिकडे विचार करतात. षोडशवर्गांची निर्मिती ग्रहांचे बलाबल पाहाण्यासाठी झाली असली तरी जन्म कुंडलीप्रमाणे कित्येक वर्ग-कुंडल्या मांडतात व त्याप्रमाणे स्थानांचा अभ्यास करतात.

कृ. प. २४) नक्षत्रांचे नऊ भाग व त्यांचे पुन्हा नऊ भाग म्हणजे नक्षत्राचे ८१ भाग काढून सूक्ष्मता साधण्याचा खटाटोप केला आहे. यामुळे जुळ्या मुलांचा प्रश्न सोडविता येतो. नक्षत्र = महादशा, उपनक्षत्रविभाग अंतर्दशा व उपउपनक्षत्र विभाग म्हणजे विदशा. नक्षत्राच्या ८०० कला विंशोत्तरी दशेच्या प्रमाणात विभागल्या आहेत. नक्षत्राच्या या येणाऱ्या उपविभागाचे पुन्हा नऊ विभाग त्याच प्रकारे करून सूक्ष्मता साधली आहे.

पा. प. २५) प्रत्येक स्थानावरून कोणत्या गोष्टी पाहाव्यात याचा उल्लेख सर्व प्राचीन / अर्वाचीन ग्रंथात आहे. जसे-सप्तम स्थानावरून विवाह, पंचम स्थानावरून संतती, दशमावरून नोकरीधंदा वगैरे.

कृ. प. २५) के.पी. मध्ये एखाद्या घटनेचे स्वरूप जाणायचे झाल्यास स्थानांचे गट तयार केले आहेत. जसे विवाह ७-२-११, संतती ५- २-११, प्रवास ३-९-१२ म्हणजे मुख्य व त्यास पूरक भाव घेतात.

पा. प. २६) रवीच्या जवळ असलेला ग्रह अस्तंगत होऊन निष्फळ समजतात. त्याचे फल अशुभ मानण्याकडेही कल आहे.

कृ. प. २६) अस्तंगत दोष मानीत नाहीत. रवीइतकाच त्याच्या युतीत असलेला ग्रह फलदायक असतो.

पा. प. २७) प्रश्नकुंडली मांडताना प्रश्न विचारण्याच्या वेळची तात्कालिन लग्न कुंडली मांडून उत्तर काढण्याची पद्धत आहे. प्रश्न प्रत्यक्षात न विचारताही त्याचे स्वरूप प्रश्नकुंडलीवरून ओळखतात.

कृ. प. २७) प्रश्नकर्त्याकडून १ ते २४९ यामधील अंक घेऊन त्या उपनक्षत्रविभागावरून लग कुंडली मांडायची, व प्रश्न विचारण्याच्या वा सोडवण्याच्या वेळचे स्पष्ट ग्रह घेऊन उत्तर शोधायचे.

पा. प. २८) विंशोत्तरी दशेसंबंधी स्वभुक्ती, दशाछिद्र इ. मते दाक्षिणात्य ज्योतिषी मानतात.

कृ. प. २८) के.पी. मध्ये विंशोत्तरी दशेसंबंधी संपूर्णतया वेगळीच बाटचाल आहे. अतएव जुनी मते त्याज्य आहेत.

पा. प. २९) जुने ज्योतिषी ग्रह व जन्मलग्न यांचे अष्टकवर्ग काढतात व त्यांचा फलादेशासाठी वापर करतात. मात्र फार थोडे ज्योतिषी यांचा उपयोग करताना आढळतात.

कृ. प. २९) कृ. प. मध्ये अष्टकवर्गपद्धतीचा वापर कृ. प. अभ्यासक करीत नाही.

पा. प. ३०) भविष्यकथनाकडे केवळ दैववादी दृष्टीने पाहात नाहीत; प्रयत्नास वाव आहे. दैव अटळ मानीत नाहीत.

कृ. प. ३०) कृ. प. त भविष्य हे अदृष्ट व अटळ आहे. ज्योतिषशास्त्राद्वारे हे अदृष्ट केवळ जाणता येते.

या अवलोकन मध्ये एक सर्वसाधारण कट्टरवादी दृष्टिकोन मांडला आहे. माझ्या मते एका ज्योतिषाने सर्व पद्धतीतील मग ते पारंपारिक असो कृष्णमूर्ती असो वा अष्टक वर्ग असो. त्या त्या पद्धतीची आपापली वैशिष्ट्ये आहेत व कुठल्याही पद्धतीला कमी न लेखता आवश्यक ठिकाणी त्या त्या पद्धतीचा उपयोग करावा अथवा दोन्ही तिन्ही पद्धतीने उत्तरास पुष्टी मिळते का हे तपासावे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)