आपल्याला नाडी ग्रंथ व त्यांच्या भविष्य कथन पद्धती याबद्दल कायमच उत्सुकता वाटत आली आहे. जसे भृगु, अगस्ती आदी अनेक नाडी ग्रंथ प्रचलित आहेत, तसे त्यातील रहस्य जाणून घेण्याच्या देखील अनेक पद्धती आहेत. हस्त सामुद्रिक, फेस रीडिंग, कुंडली ई.
आज आपण अशाच प्रकारातील भृगु नंदी नाडी तंत्राची थोडक्यात माहिती घेणार आहोत. या तंत्रात ज्योतिषाचार्य आर.जी. राव सरांनी अत्यंत भरीव आणि मोलाचे कार्य केल्रे आहे.
या तंत्रात लग्न स्थानाचा उपयोग फक्त ग्रहांची ठराविक दिवसाची प्रत्यक्ष स्थिती ठरवण्यासाठी केला जातो, ग्रह कोणत्या स्थानात, भावात आहे हे महत्वाचे धरले जात नाही.
त्या ऐवजी प्रत्येक ग्रहास जे ठराविक कारकत्व दिले आहे व दोन ग्रहांमधील साधला जाणारा ठराविक कोनानुसार फलिताची दिशा ठरवली जाते.
भृगु नंदी नाडी तंत्रात खालील प्रमाणे प्रत्येक ग्रहांस कारकत्व दिलेले आहे.
(१) गुरु हा पुरुषांसाठी जीवकारक व शुक्र स्त्रीसाठी जीवकारक मानतात.
(२) शिक्षणासाठी बुधाला बुद्धीकारक मानतात
(३) व्यवसायासाठी शनीला कर्मकारक मानतात
(४) मोठ्या भावासाठी शनि ग्रहाचा विचार करा
(५) धाकट्या भावासाठी (२ नं. चा भाऊ) मंगळाचा विचार करा
(६) लहान भावासाठी (३ नं. चा भाऊ) बुधाचा विचार करा
(७) मोठ्या बहिणीसाठी चंद्र ग्रहाचा विचार करा
(८) धाकट्या बहिणीसाठी (२ नं. बहिण) शुक्राचा विचार करा
(९) धाकट्या बहिणीसाठी (३ नं. बहिण) बुध ग्रहाचा विचार करा
(१०) पत्नीसाठी शुक्राचा विचार करा
(११) पतीसाठी मंगळाचा विचार करा
(१२) वडिलांसाठी सूर्याचा विचार करा
(१३) आईसाठी चंद्राचा विचार करा
(१४) आजोबांसाठी राहुचा विचार करा
(१५) आजोबांसाठी केतूचा विचार करा
(१६) मामासाठी बुध ग्रहाचा विचार करा
(१७) मुलगी/मुलगा मित्रासाठी बुध ग्रहाचा विचार करा
(१८) सासूसाठी चंद्राचा विचार करा
(१९) सासरच्यांसाठी बुध ग्रहाचा विचार करा
(२०) पैशासाठी शुक्र ग्रहाचा विचार करा
(२१) वाहनासाठी शुक्राचा विचार करा
नाडी नियम
(१) बलहीन ग्रह तेव्हा मानले जातात, जेव्हा :
१) ग्रह शत्रूगृही आहे
२) ग्रह दोन शत्रू ग्रहांच्या मधोमध आहे
३) ग्रह राहू आणि केतू यांच्या युतीत आहे
४) ग्रह अस्तंगत आहे
५) ग्रह शत्रू ग्रहांच्या युतीत आहे
६) ग्रह शत्रू ग्रहांच्या दृष्टीत आहे.
(२) बलवान ग्रह तेव्हा मानले जातात, जेव्हा :
१) ग्रह मित्र गृही आहे
२) ग्रह दोन मित्र ग्रहांच्या मध्ये आहे
३) ग्रह स्वतःच्या राशीत आहे
४) ग्रह मित्र ग्रहांच्या युतीत आहे
५) ग्रह मित्र ग्रहांच्या दृष्टीत आहे.
(३) एक ग्रह नेहमी एकाच दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या ग्रहांचे कारकत्व परिणाम देईल.
(४) एखादा ग्रह कोणत्या राशीत असला तरीही तो लाभदायक परिणाम देईल, जर अनुकूल ग्रह खालील ठिकाणांहून मित्र मानल्या गेलेल्या ग्रहाकडे पाहत आहेत.
१-५-९ (समान दिशा)
३-७-११ (विरुद्ध दिशा) ( सप्तमापासून १-५-९)
२-१२ (पुढे आणि मागील).
शत्रू ग्रहाकडे पाहत असल्यास ते वाईट परिणाम देईल.
(५) जर एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी वरीलप्रमाणे जोडलेला नसेल किंवा त्याच्याशी संबंधित नसेल, तर राशीस्वामीचे कारकत्वप्रमाणे परिणाम देईल ज्यामध्ये तो ग्रह स्थित आहे.
(६) अनुकूल ग्रहाशी परिवर्तन योग असेल आणि अनुकूल ग्रहाशी जोडला गेला असेल, तर तो शुभ परिणाम देईल. शत्रू ग्रहाशी परिवर्तन योग करत असल्यास आणि शत्रू ग्रहाशी जोडल्यास किंवा अनिष्ट परिणाम देईल.
(७) एखादा ग्रह अस्तंगत असतो, तेव्हा तो ज्वलनात असतो असे म्हणतात. ग्रह फारसे फळ देणार नाही. जर अस्तंगत ग्रह अनुकूल ग्रहाशी वरीलप्रमाणे जोडला असेल तर फायदेशीर परिणाम देईल किंवा शत्रू ग्रहाशी जोडला असेल तर वाईट परिणाम देईल.
(८) वक्री ग्रहापासून १२ व्या राशीमध्ये अनुकूल ग्रह असल्यास फायदेशीर परिणाम देईल. शत्रू ग्रह वक्री ग्रहापासून १२ व्या राशीमध्ये असल्यास वाईट परिणाम देईल.
(९) जर राहु सोबत ग्रह युतीत असेल, तर तो ग्रह उच्च ग्रह असला तरीही आपली शक्ती गमावतो.
(१०) राहू आणि केतू एकाच दिशेने पडतील (१,५,९). ते उलट दिशेने पाहतील. राहू आणि केतू नेहमी वक्री असल्याने ते मागील (१२ वी रास) देखील पाहतील.
(११) कोणताही ग्रह १ ल्या दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल १००% परिणाम देतो.
(१२) कोणताही ग्रह २-५-९ दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल ७५% परिणाम देतो.
(१३) कोणताही ग्रह ३-७-११ दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल ५०% परिणाम देतो.
(१४) कोणताही ग्रह १२ व्या दृष्टीने पहात असेल तर अनुकूल वा प्रतिकूल २५% परिणाम देतो.
(१५) सूर्य चे मित्र ग्रह चंद्र मंगळ बुध गुरु आणि शत्रू ग्रह शुक्र शनि राहु केतू मानले जातात.
(१६) चंद्र चे मित्र ग्रह रवी, मंगळ, गुरु आणि शत्रू ग्रह बुध, शुक्र शनि राहु मानले जातात.
(१७) मंगळ चे मित्र ग्रह रवी, चंद्र, गुरु, शुक्र, केतू आणि शत्रू ग्रह बुध, शनि राहु मानले जातात.
(१८) बुध चे मित्र ग्रह शुक्र शनि राहु, रवी आणि शत्रू ग्रह चंद्र, मंगळ, गुरु, केतू मानले जातात.
(१९) गुरु चे मित्र ग्रह रवी, चंद्र, मंगळ, शनी, राहू, केतू आणि शत्रू ग्रह बुध, शुक्र मानले जातात.
(२०) शुक्र चे मित्र ग्रह बुध शनी, राहू, मंगळ, केतू आणि शत्रू ग्रह मानले जातात.
(२१) शनि चे मित्र ग्रह बुध, शुक्र, गुरु, राहू आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, मंगळ, केतू मानले जातात.
(२२) राहू चे मित्र ग्रह बुध, शुक्र, शनी, गुरु आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, मंगळ मानले जातात.
(२३) केतू चे मित्र ग्रह मंगळ, शुक्र, गुरु आणि शत्रू ग्रह रवी, चंद्र, बुध शनी मानले जातात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
विषय : राहू व केतूच्या आगामी राशी बदलाचे राशीनिहाय परिणाम
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : स्व अभ्यास
नमस्कार,
आपल्याला कल्पना आहेच, की नोव्हेंबर, २०२३ पासून राहू केतूचे राशी बदल मीन व कन्या राशीमध्ये होत आहे. ही स्थिती त्यापुढे १८ महिने राहणार आहे. ह्या कालखंडामध्ये लग्नस्थान अनुसार राहू केतूच्या स्थितीनिहाय परिणामांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्रकर्षाने मूळ जन्म कुंडलीत राहू, केतू व संबंधित ग्रहांच्या दशा अंतर्दशा असतील, तेव्हा ही फळे प्रकर्षाने जाणवू शकतात. कुंडलीतील इतर ग्रह स्थिती संबंधाचे अनुरोधाने यात बदल होऊ शकतात.
१. मेष :
मेष लग्नास राहू व्यय स्थानी आणि केतू षष्ठ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे विवाह जुळवताना, अडचणी, विवाहितांमध्ये वादविवाद, आरोग्याच्या तक्रारी, प्रवासामध्ये अडचणी, कर्जात वाढ, संतान संबंधी समस्या, दृष्टी दोष, पापाचरण, अपंगांची सहाय्यता, ई. फळे मिळू शकतात.
२. वृषभ :
वृषभ लग्नास राहू लाभ स्थानी आणि केतू पंचम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे काही शुभ फले देऊ शकतो. शत्रूवर विजय, पंडित, कानाची समस्या, मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे निर्णय चंचलतेमुळे चुका, नोकरी व्यवसायात नुकसान, शिक्षणात अडथळे, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे.
३. मिथुन :
मिथुन लग्नास राहू दशम स्थानी आणि केतू चतुर्थ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. आई वडिलांचे अनारोग्याच्या समस्या, कुटुंबात महत्त्वाच्या स्थावर मालमत्ते विषयक प्रश्नावर मतभेद, नोकरी- व्यवसायात ताणतणाव, वाढेल आणि धंद्यात स्पर्धकांचे आव्हान, संघर्ष ई. फळे मिळू शकतात.
४. कर्क :
कर्क लग्नास राहू भाग्य स्थानी आणि केतू तृतीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. आलेल्या संधीमध्ये अडचणी आल्यामुळे विलंबाने फायदा, प्रवासात वादविवाद किंवा अडचणी, विलंब, भावंडांशी मतभेद ई. फळे मिळू शकतात.
५. सिंह :
सिंह, लग्नास राहू अष्टम स्थानी आणि केतू द्वितीय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे कसोटीचा काळ, अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा, कौटुंबिक अडीअडचणी. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती बाधित, स्पर्धात्मक परीक्षात अपेक्षाभंग, संतती विषयक समस्या, ई. फळे मिळू शकतात.
६. कन्या :
कन्या लग्नास राहू सप्तम स्थानी आणि केतू लग्न स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे मानसिक मानसिक अस्वस्थता, जोडीदाराशी मतभेद सांसारिक जबाबदाऱ्यामध्ये वाढ, संबंधात ताणतणाव, चतुर्थ स्थानाच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी, स्थावर मालमत्तेसंबंधी योग्य निर्णय न होणे ई. फळे मिळू शकतात.
७. तूळ :
तूळ लग्नास राहू षष्ठ स्थानी आणि केतू व्यय स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो, समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील केतूमुळे उत्साहावर पाणी, बंधू-भगिनींशी मतभेद, प्रवासात विलंब अथवा अडचण ई. फळे मिळू शकतात.
८. वृश्चिक :
वृश्चिक लग्नास राहू पंचम स्थानी आणि केतू लाभ स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले आर्थिक लाभ आणि संधी, वाढता उत्साह तर दुसरीकडे निर्णयामधील चंचलता असा विरोधाभास अनुभवाला येईल. संततीविषयक महत्त्वाचे निर्णयात चूक, धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक अडचणी. कौटुंबिक वादविवाद ई. फळे मिळू शकतात.
९. धनु :
धनु लग्नास राहू चतुर्थ स्थानी आणि केतू दशम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे दोन केंद्र स्थानात राहू-केतू या कालखंडात येत असल्यामुळे स्थावर मालमत्तेसंबंधी कटकट, नोकरी-व्यवसाय साठी संघर्ष युक्त, आईवडिलांसाठी अनिष्ट, प्रतिकूल परिस्थिती ई. फळे मिळू शकतात.
१०. मकर :
मकर लग्नास राहू तृतीय स्थानी आणि केतू भाग्य स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे उत्साहात वाढ, रेंगाळलेली महत्त्वाची कामे पूर्ण, प्रवास लाभदायक, जबाबदाऱ्या पार पाडने, केतू भाग्यस्थानात असल्यामुळे भाग्योदयाच्या फारशा अपेक्षा नको. नोकरी व्यवसायासाठी साधारण. भावंडांकडून थोडा त्रास किंवा मतभेद ई. फळे मिळू शकतात.
११. कुंभ :
कुंभ लग्नास राहू धन स्थानी आणि केतू अष्टम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे आर्थिक चणचण, खर्चात वाढ, आर्थिक नुकसान, कौटुंबिक जबाबदाऱ्यात वाढ, असमाधान, आरोग्याच्या तक्रारी, संतती होण्यात अडचणी ई. फळे मिळू शकतात.
१२. मीन :
मीन लग्नास राहू लग्न स्थानी आणि केतू सप्तम स्थानी अशी स्थिती राहणार असल्यामुळे महत्त्वाचे विचार करताना संभ्रम, चुकीचे निर्णय, वैवाहिक संबंधात वितुष्ट, जोडीदाराशी मतभेद, दशम स्थानापासून राहु चौथा असल्यामुळे व्यवसायाय संघर्ष ई. फळे मिळू शकतात.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)
नमस्कार,
आज आपण आपल्या आयुष्याच्या रस्सीखेच मध्ये इतके रममाण झालो आहोत की, कशासाठी आपण मनुष्य जन्मास आलो, याचे साधे भान देखील आपल्याला उरलेले नाही. हे मी माझे परम भाग्यच समजतो की, श्री हीराभाई ठक्कर यांचे हे पुस्तक वाचनात आले आणि या विषयाकडे किमान लक्ष तरी गेले. त्यांना माझा साष्टांग दंडवत. आणि हे विचार सर्वाना पोहोचणे आवश्यक वाटले म्हणून हा प्रपंच. पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. भाग २ मध्ये कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें, सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना, प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें, माणसाने पुरुषार्थ करावा की नाही, प्रारब्ध व पुरुषार्थ एकमेकाना पूरक, कर्म करण्यांचे स्वातंत्र्य फळ भोगण्यांत परतंत्र ई. विषयांचा आढावा घेतला. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.
कर्म भोगण्यासाठी देह धारणा आवश्यक – कर्मात बेरीज वजाबाकी नाही :
शुभकर्माचे फळ सुख, अशुभ कर्माचे फळ दुःख, पण ही दोन्ही भोगण्यासाठी, देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्म-फळ-भोग भोगण्याचे साधन आहे. या मुळे कोणीही जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटूच शकत नाही. आणि जोपर्यंत जन्म-मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे, तोपर्यंत त्याला मोक्षप्राप्ति नाही. देहच धारण करण्यापासून मुक्तता, या अवस्थेचे नाव ” मोक्ष”. जोपर्यंत शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात शिल्लक आहे, तोपाफ्र्यंत जन्म-मरण चक्र अव्याहतपणे चालूच राहाणार. देह धारण करावयास लागणे, हेंच खरे तर बंधन आहे. शुभ कर्माचे फळ स्वरूप सुख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी, आणि अशुभ कर्माचे फळ स्वरूप दुःख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी. परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह हा धारण करावाच लागतो. म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ असो, जीवात्म्याला जन्म-मरण रूपी बेडयांत अडकवून ठेवते. बेडी सोन्याची असो वा लोखंडाची, दोन्हीही बंधनकारकच. सत्पात्री दानाचें फळ सुख, पण ते ही उपभोगण्यासाठी देह धारण करावा लागतोच.
सत्पात्री दान केल्याने माणूस धनवान होतो. धन प्रभावाने आणखी दान धर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होते. त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो आणि पुन्हा पुण्य करतो. अशा रीतीने शरीर धारणेचे चक्र सतत चालूच राहाते.
कुपात्र दानात् च भवेत् दरिद्रो ।
दारिद्र्य दोषेण करोति पापम् ।।
पाप प्रभावात् नरकं प्रयाति ।
पुनर् दरिद्रो पुनरेव पापी ।।
कुपात्री दान केल्याने दरिद्री होतो आणि परिणाम स्वरूप दारिद्रय दोषाने मग तो माणूस पापकर्मे करू लागतो, पाप प्रभाव वाढला की तो नरकात जातो. अशा रीतीने पाप क्षालनार्थ पुनः पुनः देह धारणेचे चक्र सतत चालू राहाते.
माणूस पाप करो वा पुण्य करो, दोन्ही बाबतीत संसारचक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहातें, त्यांत प्रत्येक जीव भरडून निघतो, त्याला मोक्ष (जन्म- मरणापासून सुटका मिळतच नाही, कारण प्रत्येक नवीन जन्मांत जीवात्मा नवनवीन क्रियमाण कर्मे करीतच राहातो, आणि सर्व कर्मे, तात्कालिक फल देऊन समाप्त न होता ती संचितरूपे जीवाच्या खात्यात जमेत राहातात, आणि त्यातील जीं फळे पक्व होऊन प्रारब्ध बनतात, ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो, आणि पुनः त्या जीवनदरम्यान पुढे अनेक जन्म ध्यावे लागतील अशी नवी कर्मे करतो. अनादि काळापासून हे दुष्ट चक्र चालत आलेले आहे व ते अनंत काळ चालू राहाणार.
जोवर कर्मरूपी मूळ आहे, तोवर शरीररूपी वृक्ष उगवणारच व त्याला, जात, आयुष्य व भोगरूपी फळे चिकटणारच.
कर्मात वजाबाकी नाही, केवळ बेरीज :
बरेच लोक असें समजतात की, पाप-पुण्याची वजाबाकी होऊ शकते. म्हणजे असे की, आपण समजा पांच मण पाप केले, व नंतर आठ मण पुण्य केलें, तर पुण्यातून पाच वजा जाता, तीन मण पुण्य आपल्या खाती उपभोगण्यास जमा होईल व पापाचे फळ मला भोगावे लागणार नाही. सामान्य व्यवहारातील हे गणित कर्म-नियमात लागू होऊ शकत नाही. तेथे वजाबाकी नाही केवळ बेरीज होते. म्हणजे असे की तुम्ही ५ माप पाप केलेत, नंतर ८ माप पुण्य केलेत, तर तुम्हाला ५ अधिक ८ अशा एकूण १३ माप कर्म फळ भोगावेच लागेल. ५ माप पाप कर्माचे फळ जे दुःख भोगासाठी व ८ माप पुण्य कर्माचे फळ जे सुख भोगासाठी पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकूण १३ माप कर्म फळ भोगण्यासाठी देह धारण करावा लागेल.
मात्र जसजशी फळे पक्व होतील, तसे फळ भोगावे लागत असल्याने एकाच देहांत सर्व पाप कर्म वा पुण्य कर्म फळ भोगावे लागतें असे नाही. तर पाप-पुण्याचे मिश्रण प्रत्येक देहात लाभते, म्हणूनच माणूस एकाच देहांत काही वेळा दुःखी तर काही वेळा सुखी आढळतो.
तर मग मोक्षप्राप्ति कधीं ?
प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, आणि ८४ लक्ष योनी फिरत, मानवी शरीर हे मोक्ष मिळण्यासाठींच प्राप्त झालेले आहे. मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळविल्यास, पुन्हा विविध योनीत फिरणे क्रमप्राप्त होतें. केवळ मनुष्यच या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटून, परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे, मात्र त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात आहे, कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे.
परंतु जोंवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपवित नाही, आणि जन्मजन्मांतरांत त्याचे खाती जमा झालेला महाकाय ‘संचित’ साठा तो नष्ट करीत नाही, तोपर्यंत अनंतकाळ पर्यंत, त्याला परत परत निरनिराळे देह धारण करणे क्रमप्राप्तच आहे.
जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, तर त्याला ज्ञानाग्निद्वारें समस्त पूर्वकमांचा साठा भस्म करणे क्रम प्राप्त आहे.
“ज्ञानाग्निः सर्व कर्माणं भस्मसात् कुरुते.”
या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपविलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियमाण कर्मे अशा खुबीने करावी लागतील, की जी या आयुष्य काळातच पक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील, आणि त्यांतील एकही त्याच्या संचितात जमा होऊन, त्यांच्या भोगासाठी त्याला नवा जन्म घ्यावा लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्व करणे याचेंच नाव ‘योग’.
“योगः कर्मसु कौशलम् ”.
पण कोणी कर्मच नाही केलें तर ?
क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचा धोका टाळण्यासाठी, काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल-देह बंधनातून सुटका होईल.
हा युक्तिवाद करणे सोपे, पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे, कारण कोणीही क्षणभर ही कर्म करणे टाळू शकत नाही.
भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात :
न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत। – गीता, अ. ३/५
शरीरयात्राऽपिच ते न प्रसिध्येत् अकर्मणः । – गीता, अ. ३/८
कोणीही मनुष्य, कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा (जीवन) क्षणभरही चालू शकत नाही. खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे, इतकेच काय श्वासोच्छ्वास करणे, या क्रिया हीं कर्मेच होत. निर्वाहासाठी नोकरी-धंधा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे, शरीर धारणार्थ अन्न प्राशन करणे, या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत, काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो, अव्याहतपणे चालूच राहते.
परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे, पिणे, इत्यादी जीवनावश्यक क्रिया (कर्मे), तात्काळ फळ देऊन शांत होतात, संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमाण कर्मेही अशा कौशल्याने करावी की जी याच जन्मात फळ देऊन शांत होतील, संचित बनून पुढल्या जन्मांचे कारण बनणार नाहीत. ‘योगः कर्मसु कौशलम्’.
कोणती क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत ?
(१) बाल्यावस्थेत केलेली कर्मे.
(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.
(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.
(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही).
(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.
(६) निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे.
(१) बाल्यावस्थेत आणि अभान अवस्थेत केलेली कर्मे :
बालपणी, अगर अभान अवस्थेत केलेली कर्मे, प्रीती द्वेष रहित असतात, त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत. एकाद्या बालकाने अग्नित हात घातला, तर भाजण्याचे तात्कालिक फल देऊन तें, शांत होईल, संचितात जमा होणार नाही. समजा, एखादे तीन-चार वर्षांचे मूल खाटल्यावर चढून उड्या मारित असेल, आणि तेथे असलेल्या दोन-तीन महिन्यांच्या धाकट्या भावंडाचे अंगावर त्याचा पाय पडला आणि अनावधानाने त्या बाळास गंभीर दुखापत झाली. तर त्या चार वर्षांचे मुलावर कोर्टात खटला भरता येत नाही. व ते कर्म अजाण अवस्थेत घडलेले असल्याने संचितात ही जमा होत नाही.
(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.
वेडेपणाचे झटक्यांत एखाद्या माणसाने शिवीगाळ वा मारहाण केली, व कोर्टात त्याचेवर खटला भरला गेला, तरी त्याचे ते कर्म अजाणतेपणे घडलेले असल्याने, कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही, (Intention is the gist of Crime) व ते संचितातही जमा होत नाही. कदाचित अशावेळी जमलेले लोक शिवीगाळ केल्याने, त्याला थोडीफार मारहाण करतील, व अशा तर्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक फल देऊन शांत होईल, असे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसल्याने संचितात ही जमा होत नाही.
(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.
मनुष्येतर योनीत केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत कारण, मनुष्य योनीशिवाय इतर योनी (पशु-पक्षी, इत्यादि व देवयोनी) या केवळ भोग योनि असतात. या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त झालेल्या असतात. त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर, त्याचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमाण कमें संचितात जमा होत नाहीत. घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादि योनीत असलेले जीवात्मे, केवळ त्या त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धिनुसार (instinct) वागत असतात. त्या योनीत प्रज्ञेचा (Intellect) भाग नसतो. वाघ-सिंह त्यांच्या त्या योनीतील उपजत बुद्धिनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. विंचू नांगी मारतो, साप डंख मारतो, त्यांत त्यांचा केवल नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. त्यांचे प्रारब्ध संपविण्यासाठी, त्यांची ती कर्मे घडत असतात, व तात्कालिक फळ देऊन समाप्त होतात. गाढवाने कोणाला लाथ मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो, कर्म फळ देऊन समाप्त होतें. सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने पडलेले असल्याने, संचितात जमा होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला, आणि परिणामतः असा माणूस दगावला, तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसांसाठी आहे, पशुपक्षांवर त्याचा अमल चालत नाही. गाई-म्हशी कोणाच्या शेतांत शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या, तर शेताचा राखणदार त्याना मारपीट करून त्याना हाकलून देतो, अगर त्याना पकडून कोंडवाड्यांत त्यांची रवानगी होते, व त्यांचे ते कर्म त्याना तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला, त्याच्या निष्काळजीपणाबद्दल, गाई-म्हशीना अतिक्रमण कायदा (Trespass Act) लागू नाही. याप्रमाणे मनुष्येतर तमाम योनी-पशु-पक्षी सरपटणारे प्राणी-जलचर प्राणी, यांची क्रियामाण कर्मे संचितात जमा होत नाहीत.
देवयोनी ही सुद्धा भोग-योनी समजली जाते. मनुष्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे देवयोनी प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्याने, त्यात केलेली क्रियमाण कर्मे चांगली वा वाईट संचितात जमा होत नाहीत. जीवात्मे, त्यांच्या पुण्य कर्मानुसार, देवलोक, स्वर्गलोक, इत्यादि ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात, व पुण्याचा साठा संपला की पुनः या मर्त्यलोकात लोटले जातात. अशा जीवात्म्यानी स्वर्ग लोकांत जरी पुण्यकारक क्रियमाण कर्मे केली, तरी त्यांचा पुण्य साठा वाढत नाही, व त्याना आपला तेथील मुक्काम वाढवता येत नाही.
आपण थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली की, आपल्याला घरी परतावे लागते. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले, तरी त्या साठी अधिक पैसे मिळविण्याचे साधन नसते. या प्रमाणेच स्वगत पुण्य साठा असे पर्यंतच देवलोकी राहता येते व नंतर पुन्हा या भूतलावर परतावें लागते.
कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्मे ‘अकर्म’ समजली जातात व संचितात जमा न होतां त्यांचे फळ भोगण्यासाठी परत देह धारण करावा लागत नाही आणि जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. एकाच्या न्यायाधिशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फर्मावली, तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही, कारण त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते. शिक्षा देण्याचे काम, तो आपले कर्तव्य म्हणून करीत असतो. कायद्याच्या कक्षेत राहून, न्यायदानाचे काम, सरकारचा त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून करीत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही त्याच्या संचितात ते जमा होत नाही.
म्हणूनच भगवंतानी गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की, या धर्मयुद्धांत तुझ्या हातून कितीही हत्या झाली, तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने, धर्मयुद्धांत, धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून, केवळ कर्तव्य भावनेने केले असल्यामुळे, तुला बंधनकारक ठरणार नाहीं. भगवान श्री कृष्ण सांगतात:
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न विद्यते । हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निवद्यते ।। गीता, १८/१७
अर्थ :
ज्याचे अंत:करण अहंकार युक्त नसतें, ज्याची बुद्धि फळासक्तिने मलिन झालेली नसते, त्याने या लोकाना ठार मारले तरी, तो मारणारा ठरत नाही, आणि त्या कर्माने बद्धही होत नाहीं.
हे तत्त्व जाणणारा आणि “मी करतो” असा अभिमान ज्याच्यात नाही असा जीव, धर्म- मर्यादेत राहून, न्याय नीतीच्या मार्गाने जी जी कर्मे, स्वतः चे कर्तव्य म्हणून करतो, ती ती त्याच्या हातून केवळ घडत असल्याने, त्याला बंधनकारक ठरत नाहीत, त्या कर्माना तो केवळ निमित्तमात्र असल्याने, जवाबदार ठरत नाही.
वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया, उदाहरणार्थ पाहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे-पिणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, मल-मूत्र विसर्जन, ग्रहण करणे, डोळयांच्या पापण्या उघडणे मिटणे, आदि कर्मे इंद्रिये आपापल्या विषयांचे ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. अज्ञानी मनुष्य त्या ‘मी करतो’ असा वृथाभिमान बाळगतो, ज्ञानी तसा अभिमान धरीत नाही.
बैलगाडी उन्हातून चालली असतां, सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो कीं, गाडीचे ओझे मीच वाढून नेत आहे, वास्तविक बैल ती गाडी ओढत असतात.
अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून, आयुष्यांत घडणाऱ्या सर्व घटना माझ्यामुळे घडल्या, मी घडवून आणल्या, असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतात. या मीपणाच्या अभिमानामुळे, त्यांची ती कर्मे त्याना बंधनकारक बनतात, व त्यांचे फळ भोगण्यासाठी त्याना पुनः पुनः देह बंधनात पडावे लागते.
भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायांत, स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. त्यांचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकाना नेहमी वाटत असतें की, मी आज हे मिळविले. माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या आणखी अधिक मिळवीन, आज मी या शत्रूचा नाश केला. उद्या आणखी शत्रूंचा निःपात करीन, मी स्वतः जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध-पुरूष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मीच धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळांत झाला आहे, माझ्यासमान श्रेष्ठ फक्त मीच आहे. मी मोठा दानधर्म करणारा आहे, मी मोठेमोठे यज्ञ करीन, मी मोठा मान-सन्मान प्राप्त करीन, ई. हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात.
अशा आसुरी वृत्तिच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात, हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारे, मोहरूपी जाळयांत पूर्णपणे गुरफटलेले लोक, विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले, निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रौरव नरकात पडतात, त्याना दुसरी गति नाही.
असे लोक जी जी कर्मे करतात आणि ती बहुधा अशुभच असतात. ती ती कर्मे त्यांच्या संचितात जमा होऊन, त्यांची कटु फळे भोगण्यासाठी त्याना सतत जन्म-मरणाच्या रहाटगाडग्यांत फिरावे लागते.
(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.
कित्येक कर्मे जन मानसाच्या दृष्टीने पाप कर्मे ठरत असली, तरी जर ती समष्टिच्या (जगाच्या) कल्याणासाठी केलेली असली, तर पाप कर्मे ठरत नाहीत व संचितात जमा होत नाहीत.
खोटे बोलणे हे पाप समजले जाते, तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे, हेही पाप समजले जाते. असे असूनही खुद्द भगवान श्रीकृष्णानी धर्मराजासारख्या, सत्यवक्ता अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन “नरो वा कुंजरो वा” असे बोलण्यास भाग पाडून, द्रोण पुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हें करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. पांडव जिंकले, तर त्याला राज्याचा काही भाग, अथवा काही दलाली मिळणार नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता, तर द्रोणाचार्य यांचे मरण असंभव होते. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टिच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. आततायी व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी, लढल्या गेलेल्या धर्मयुद्धांत पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते.
“अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा” हे अर्धसत्य बोलल्यामुळें युधिष्ठिराच्या, त्रिकाल सत्यवादी या कीर्तीला कलंक लागला, व त्याचे थोडे नुकसान झाले, ही गोष्ट खरी, परंतु व्यक्तिगत नुकसानापेक्षा समष्टिचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता ठरला, तरी श्रीकृष्णाचे समष्टि-कल्याणार्थ केलेले ते पापकर्म, त्याच्या संचितात जमा झाले नाही, व त्याला त्याचे फळ भोगावयास लागले नाही.
लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदां केली, गोपींच्या अनेक खोडया काढल्या, स्यमंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आळ आला मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून दुटप्पी वर्तन केले, पण त्याची ही सर्व कर्मे लीलास्वरूपाची होती. मोठेपणी जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हां ते समष्टि कल्याणार्थ होते, त्याचा व्यक्तिगत स्वार्थ, कोणते ही कपट-कारस्थान करताना, नव्हता.
म्हणून गीतेत त्याने स्वतःच असे म्हटले आहे की
।।” जन्म कर्मच मे दिव्यम्” ।।
माझा जन्म व माझी सर्व कर्मे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्णकाम आहे.
गीतेच्या तिसऱ्या अध्यायांत भगवान श्रीकृष्ण सांगतात :
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवासव्यं वर्त एव च कर्मणि ।। गीता, ३ / २२ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। गीता, ३/२३
हे पार्था, या त्रैलोक्यांत मला स्वतःला काहीच करावयाचे असे उरलेले नाही. कारण मला मिळालेले नाही किंवा मिळावयाचे आहे, असे काहीच नाही. तरी पण मी कर्म करतच असतो. कारण जर मी असा कर्मात आळस सोडून न वागेन, तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय आळशी होतील.
भगवंतानी आपला जन्म व सर्व कर्मे दिव्य म्हटली याला मुख्यतः तीन कारणे आहेत :
१) इतर जीवात्म्यांप्रमाणे भगवंतांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही ते प्रगट झाले.
२) त्यांचा जन्म पूर्व जन्मातील संचित कर्मे प्रारब्धरूपाने भोगण्यासाठी नाही, कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मेच नव्हती.
३) त्यांच्या अवतार काळांत, त्यानी जीं जीं कर्मे केली ती केवळ लीलास्वरूप आणि समष्टि (जग) कल्याणार्थ केली. राग, आसक्ति, द्वेषाने प्रेरित होऊन, स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागलेले नाहीत. कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तिने सर्व कर्मे त्यांचे हातून केवळ घडलेली आहेत. यामुळे भगवंतांचे एकही कर्म संचितात जमा होऊन, दुसऱ्या नवीन जन्माचा हेतु (कारण) बनू शकले नाही.
भगवंत म्हणतात मी आप्तकाम आहे, माझ्या इच्छेनुरूप जेव्हा ज्या देहाची जरूर पडेल, तो समष्टिच्या हिताकरतां धारण करू शकतो. संत तुलसीदासानी वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांचा अवतार म्हणजे केवळ ‘निज इच्छा निर्मित तनू’ आहे.
जगांत झालेले सर्व महापुरूष रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, विवेकानंद, महात्मा गांधी, येशु क्रिस्त, शंकराचार्य, भगवान बुद्ध, महावीर, महमद पैगंबर ई. या सर्वानी त्यांच्या जीवनकाळ दरम्यान जी जी कर्मे केली ती केवळ “सर्वलोक हिताय” केली. त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणत्याही कर्मात नव्हता म्हणूनच त्याना मुक्त पुरुष मुक्त जीवात्मे समजले जाते.
आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
आज आपण विशाखा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. विशाखा हे नक्षत्र चक्रातील १६ वे क्रमांकाचे नक्षत्र असून नक्षत्राचा आकार दाराला बांधलेल्या तोरणासारखा भासतो. विशाखालाच ‘राधा’ असेही म्हटले आहे. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असले तरी त्यातील २ च तारे जरा ठळक व एका रेषेत पण आडवे भासतात. नक्षत्रामधील २ तारे तोरणासारखे असून जरा हिरवट पांढऱ्या रंगाचे व बरेच तेजस्वी दिसतात. वैशाख महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. काहींच्या मते याची आकृती पोवळ्यासारखी आहे. विशाखा नक्षत्राचे इंग्रजी ‘अल्फा लिब्रा’ आहे.
या नक्षत्राचे पहिले ३ चरण तूळ राशीत व ४ थे चरण वृश्चिक राशीत असल्याने हे चतुष्पाद आहे. हे नक्षत्र अधोमुख, मिश्र साधारण व अंधलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी गुरु, दैवत इंद्राग्नी व राशी स्वामी शुक्र व मंगळ असल्याने या नक्षत्रात गुरूची अप्रतिम विद्वत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा व मंगळाची खलबुद्धी यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्त्व दिसते.
विशाखा नक्षत्राला तराजूचा दांडा असेही म्हणतात. हे नक्षत्र राक्षसगणी व तामसी असल्याने जरा अशुभच आहे. तसेच हे आश्रित असून या नक्षत्रावर जन्मलेले जातक थोरा-मोठ्यांच्या सहाय्याने पुढे येतात. विशाखा नक्षत्र जातक विद्वान पण रजोगुणी, तामसी, हट्टी, थोडे चिडखोर, हौशी, रसिक पण उथळ्या व खर्चिक वृत्तीचे, थोडे भांडखोर, लोभी, गोड बोलणारे, स्त्रीलंपट, थोड्या अविचारी, उलट उत्तरे देणारे असू शकतात. फार उच्च ध्येय किंवा महत्त्वाकांक्षा नसून खावे-प्यावे, मजा करावी असा स्वभाव दिसून येतो. विशाखा नक्षत्र धनाच्या दृष्टीनेही साधारण आहे.
विशाखा नक्षत्र पुरुष व स्त्रियांना मध्यमच आहे. पुरुषांना लागणारा स्वावलंबीपणा, पराक्रम, अधिकार गाजवण्याची वृत्ती, धाडस हे गुणधर्मच जास्त प्रमाणात दिसून येतात. विशाखा नक्षत्रावर जन्मणारे पुरुष जातक उंच, सडपातळ, प्रमाणशीर पण लांबट अवयव, उभट चेहरा व हाडापेराने जरा मजबूत, सडसडीत व जरा काटक दिसतात. चेहऱ्यावर मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्तेचे तेज दिसून येते.
विशाखा नक्षत्र स्त्रियांना हे नक्षत्र साधारण आहे. कारण सौंदर्यकला अथवा धनाच्या दृष्टीने ते कमी प्रतीचेच आहे व अनिष्ट असता सद्गुणापेक्षाही दुर्गुणच जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर असतो. कपाळ रुंद पण चेहरा त्रिकोणी दिसतो. नाक सरळ असते. सडसडीत असल्या तरी पुरुषीवृत्ती व बांधा दिसून येतो. नाजूकपणा, कोमलपणा, सौंदर्यहानी, हळवेपणा अथवा नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, अथवा कलाकौशल्याची अजिबात आवड दिसून येत नाही. मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्ता चांगली असते. विशाखा नक्षत्री बुध, गुरु असता त्या उच्च शिक्षण घेतलेल्या असतात. खाणेपिणे, कपडालत्ता, छानछोकीपणा, रंगेलपणा, खर्चिक वृत्ती, उधळेपणा असू शकतो. उपभोग (ऐहिक) व देह सौख्याकडे जास्त प्रवृत्ती असते. चालणे झपझप असले, तरी जरा धांदरट व जरा नीट नेटकेपणाचा अभाव असतो. असतात. फॅशनची आवड असली तरी तारतम्य, रंगसंगती या बाबत कमी आस्था दिसून येते. दागदागिने, उंची वस्त्रे, फुले, वेण्या यांचाही फार शौक नसतो. सिनेमा, नाटके व करमणुकीच्या साधनांची बरीच आवड असते.
विशाखा नक्षत्राखाली येणारा साधारण वर्ग बुद्धीमान लोक, शिक्षक, प्रोफेसर्स, सरकारी किंवा खाजगी कंपन्या क्षेत्रातील सेवक व अधिकारवर्ग, लहान लहान व्यापारी, वकील, इंजिनिअर्स, औषधी कंपनीत काम करणारा वर्ग, प्रवासी व बांधकाम खात्यात काम करणारा वर्ग इ आढळून येतात.
विशाखा नक्षत्री रवि फारसा अनुकूल नसतो. रवि असता बांधा उंच, सडपातळ पण जरा अशक्तच व नाजूक असतात. शारीरिक उर्जा कमी असून बुद्धीमत्ता साधारण असते. अधिकारयोग मिळत नाहीत. विशाखा नक्षत्री चंद्र असता जरा आडवा परंतु प्रमाणशीर बांधा, देखणा पण रागीट चेहरा, विद्या व बुद्धी कमी, गूढ व दुष्ट मनाचा. थोडा द्वेषी, चैनी, खर्चिक व उधळ्या असतो. छानछोकीकडे जास्त लक्ष असते.
विशाखा नक्षत्री मंगळ असता सडसडीत, उंच चपळ असतो. मंगळ मेडिकल लाईनचे शिक्षण किंवा सायन्सला बरा. औषधी वस्तूंचा व्यापार अथवा औषधी वस्तूंच्या दुकानात अथवा कारखान्यात नोकरी मिळेल. अपघात व वारंवार संकटे भोगणारा.
विशाखा नक्षत्री बुध असता शरीरप्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी तीष्ण, खोल व कुशाग्र असते. बांधा जरा आडवा पण चपळ व भरलेला असतो. मात्र स्वभावाने हे जातक खलबुद्धी, स्वार्थी, थोडे कुमार्गी व अतिव्यवहारी असू शकतात.
विशाखा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो, पण शरीरप्रकृती व धनाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नसतो. गुण चांगले पण नशीब प्रतिकूल असते. बांधा उंच, सडपातळ पण जरा नाजूक व अशक्त असतो. पचनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. दम लागणे किंवा रक्तदाबाचे विकार लवकर होतात. शिक्षक, प्रोफेसर, वकील या शिक्षणाला हा गुरु उत्तम, मात्र त्यांना गुणवत्तेप्रमाणे नोकरीत यश मिळत नाही.
विशाखा नक्षत्री शुक्र प्रमाणशीर व देह व बांधा देतो. मात्र चेहऱ्यावर शुक्राचे सौंदर्य, मोहकपणा अथवा आकर्षकपणा कमी आढळतो. शुक्राच्या शुभ गुणधमपिक्षा अशुभ गुण जास्त दिसून येतो. बुद्धी, विद्या व कला साधारण असतात. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा, टापटीप कमी असून स्वच्छंदी, चैनी, खर्चिक, उधळ्या, विलासी व रंगेल असू शकतो. बिघडलेला असता अविचारी, व्यसनी, वाईट वासनेचा, स्त्री लंपट, स्वच्छंदी व अनीतीच्या मार्गाने जाणारा व त्यामुळे शरीरप्रकृती रोगी व खराब करून घेणारा आढळतो. विशाखा नक्षत्री शनि असता हाडापेराने मजबूत पण हाडाळ, जरा वेडावाकडा बांधा, चेहरा उदास, गंभीर व प्रौढ दिसणारा असतो. स्वभाव कुजका, द्वेषी, कपटी दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारा, स्वार्थी, अविचारी, कंजूष, लोभी व गूढविद्येची (पिशाच्च) आवड असणारा असतो. बुद्धीमान, विद्वान व शिकलेला असला तरी त्याचा फार फायदा कमी होतो.
विशाखा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने उत्तम असतो. मात्र अतिसाहसी, धाडसी व जरा पापी वृत्तीचा, चैन, मजा, देहसौख्य, ख्याली- खुशाली यांचेकडे ओढ असू शकतो. बिघडलेला असता तर गुन्हेगारीच्या मार्गाने अथवा अनैतिक धंदे करून द्रव्य मिळविण्याकडे प्रवृत्ती असते. विषारी प्राणी दंशाची भीती असते.
विशाखा नक्षत्री केतू हा फक्त दैविक, आध्यात्मिकदृष्ट्या बरा असतो. शरीरप्रकृती किंवा बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने साधारण.
विशाखा नक्षत्री हर्षल असता सडपातळ उंच बांध्याचा, बुद्धीमान पण विलक्षण डोक्याचा असतो. बुद्धी विधायक कायपिक्षा विध्वंसक मार्गाकडे वळू शकते. वागणे विक्षिप्त, लहरी व स्वैर असते.
विशाखा नक्षत्री नेपच्यूनही फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम असून त्या मानाने नेहमी उदास व नैराश्यवादी दिसतात. गूढ रोग होतात.
विशाखा नक्षत्री होणारे रोग फारसे दाहक नसले, तरी बरेच रेंगाळणारे, चिकट व त्रास देणारे असतात. मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाबाचे विकार, त्वचेचे विकार, रक्तदोष, पित्त, विषबाधा तसेच कंबर दुखणे, लघवीचे विकार, ओकाऱ्या, मळमळणे, मंगळ बिघडलेला असता गुप्तरोग, कावीळ, कापणे, भाजणे, खरचटणे अशा रोगांपासून भीती असते. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र बिघडलेला असता चक्कर, भोवळ व दम लागतो.
या नक्षत्राला शाखाहीन नक्षत्र असेही म्हणतात. म्हणून या नक्षत्रात गुरु किंवा शनि असता संतती होण्यात खूप अडचणी येण्याचा संभव असतो.
विशाखा नक्षत्री हस्ताक्षर वेडेवाकडे, तिरके, गचाळ व अव्यवस्थित आढळते. धावत्या लिपीत लिहिण्याची आवड असते. नक्षत्रावर ३ किंवा ६ अंकाचा प्रभाव वाढतो. गुरुचा पुष्कराज लाभदायक वाटतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती पूर्वेला लवकर सापडू शकते. हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात शुभकार्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. हे अधोमुखी नक्षत्र विहिर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले धन काढणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, द्यूत खेळणे, राज्याभिषेक, बागाईत करणे, अग्निहोमादी क्रिया, दत्तक पुत्र घेणे या गोष्टींना चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे) संपर्क : 7058115947 (सशुल्क कुंडली मार्गदर्शन)