Category: Uncategorized

वाईट संगतीला लागणे व घरातून निघून जाणारे सुखरूप घरी परत येण्याकरिता तोडगे


ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

कर्म सिद्धांत भाग ३


विषय : कर्म सिद्धांत (भाग ३)

संकलक व स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : THEORY OF KARMA (श्री हीराभाई ठक्कर)

नमस्कार,

आज आपण आपल्या आयुष्याच्या रस्सीखेच मध्ये इतके रममाण झालो आहोत की, कशासाठी आपण मनुष्य जन्मास आलो, याचे साधे भान देखील आपल्याला उरलेले नाही. हे मी माझे परम भाग्यच समजतो की, श्री हीराभाई ठक्कर यांचे हे पुस्तक वाचनात आले आणि या विषयाकडे किमान लक्ष तरी गेले. त्यांना माझा साष्टांग दंडवत. आणि हे विचार सर्वाना पोहोचणे आवश्यक वाटले म्हणून हा प्रपंच.  पहिल्या भागात आपण कर्म सिद्धांत, क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म याविषयी जाणून घेतले. भाग २ मध्ये कोणतेही कर्म फळ देऊनच शांत होतें, सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची क्रियमाण करण्याची कल्पना, प्रारब्धांत असतें तेवढेच मिळतें, माणसाने पुरुषार्थ करावा की नाही, प्रारब्ध व पुरुषार्थ एकमेकाना पूरक, कर्म करण्यांचे स्वातंत्र्य फळ भोगण्यांत परतंत्र ई. विषयांचा आढावा घेतला. आज या विषयाचा पुढील टप्पा क्रमश: व थोडक्यात पाहणार आहोत.

कर्म भोगण्यासाठी देह धारणा आवश्यक – कर्मात बेरीज वजाबाकी नाही :

शुभकर्माचे फळ सुख, अशुभ कर्माचे फळ दुःख, पण ही दोन्ही भोगण्यासाठी, देह धारण करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण देह हे कर्म-फळ-भोग भोगण्याचे साधन आहे. या मुळे कोणीही जन्म-मरणाच्या चक्रांतून सुटूच शकत नाही. आणि जोपर्यंत जन्म-मरणाच्या चक्रात जीवात्मा अडकलेला आहे, तोपर्यंत त्याला मोक्षप्राप्ति नाही. देहच धारण करण्यापासून मुक्तता, या अवस्थेचे नाव ” मोक्ष”. जोपर्यंत शुभ व अशुभ कर्माचा साठा संचितात शिल्लक आहे, तोपाफ्र्यंत जन्म-मरण चक्र अव्याहतपणे चालूच राहाणार. देह धारण करावयास लागणे, हेंच खरे तर बंधन आहे. शुभ कर्माचे फळ स्वरूप सुख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू सोन्याची बेडी, आणि अशुभ कर्माचे फळ स्वरूप दुःख भोगण्यासाठी देह धारण करणे ही जणू लोखंडाची बेडी. परंतु दोन्ही प्रकारची कर्मे भोगण्यासाठी देह हा धारण करावाच लागतो. म्हणजे कर्म शुभ असो वा अशुभ असो, जीवात्म्याला जन्म-मरण रूपी बेडयांत अडकवून ठेवते. बेडी  सोन्याची असो वा लोखंडाची, दोन्हीही बंधनकारकच. सत्पात्री दानाचें फळ सुख, पण ते ही उपभोगण्यासाठी देह धारण करावा लागतोच.

सुपात्र दानात् च भवेत् धनाढ्यो । धन प्रभावेन करोति पुण्यम् ॥

पुण्य प्रभावात् सुरलोकवासी । पुनर् धनाढ्यो पुनरेव भोगी ।।

सत्पात्री दान केल्याने माणूस धनवान होतो. धन प्रभावाने आणखी दान धर्म केला की त्याला पुण्य शरीर प्राप्त होते. त्यामुळे पुन्हा तो धनवान होतो आणि पुन्हा पुण्य करतो. अशा रीतीने शरीर धारणेचे चक्र सतत चालूच राहाते.

कुपात्र दानात् च भवेत् दरिद्रो ।

दारिद्र्य दोषेण करोति पापम् ।।

पाप प्रभावात् नरकं प्रयाति ।

पुनर् दरिद्रो पुनरेव पापी ।।

कुपात्री दान केल्याने दरिद्री होतो आणि परिणाम स्वरूप दारिद्रय दोषाने मग तो माणूस पापकर्मे करू लागतो, पाप प्रभाव वाढला की तो नरकात जातो. अशा रीतीने पाप क्षालनार्थ पुनः पुनः देह धारणेचे चक्र सतत चालू राहाते.

माणूस पाप करो वा पुण्य करो, दोन्ही बाबतीत संसारचक्र उलट वा सुलट दिशेने चालूच राहातें, त्यांत प्रत्येक जीव भरडून निघतो, त्याला मोक्ष (जन्म- मरणापासून सुटका मिळतच नाही, कारण प्रत्येक नवीन जन्मांत जीवात्मा नवनवीन क्रियमाण कर्मे करीतच राहातो, आणि सर्व कर्मे, तात्कालिक फल देऊन समाप्त न होता ती संचितरूपे जीवाच्या खात्यात जमेत राहातात, आणि त्यातील जीं फळे पक्व होऊन प्रारब्ध बनतात, ती भोगण्यासाठी जीवात्म्याला अनुरूप देह धारण करावा लागतो, आणि पुनः त्या जीवनदरम्यान पुढे अनेक जन्म ध्यावे लागतील अशी नवी कर्मे करतो. अनादि काळापासून हे दुष्ट चक्र चालत आलेले आहे व ते अनंत काळ चालू राहाणार.

महर्षि पतंजली सांगतात : सति मूले तव्दिपाकः जातिः आयुः भोगाः ।

जोवर कर्मरूपी मूळ आहे, तोवर शरीररूपी वृक्ष उगवणारच व त्याला, जात, आयुष्य व भोगरूपी फळे चिकटणारच.

कर्मात वजाबाकी नाही, केवळ बेरीज :

बरेच लोक असें समजतात की, पाप-पुण्याची वजाबाकी होऊ शकते. म्हणजे असे की, आपण समजा पांच मण पाप केले, व नंतर आठ मण पुण्य केलें, तर पुण्यातून पाच वजा जाता, तीन मण पुण्य  आपल्या खाती उपभोगण्यास जमा होईल व पापाचे फळ मला भोगावे लागणार नाही. सामान्य व्यवहारातील हे गणित कर्म-नियमात लागू होऊ शकत नाही. तेथे वजाबाकी नाही केवळ बेरीज होते. म्हणजे असे की तुम्ही ५ माप पाप केलेत, नंतर ८ माप पुण्य केलेत, तर तुम्हाला ५ अधिक ८ अशा एकूण १३ माप कर्म फळ भोगावेच लागेल. ५ माप पाप कर्माचे फळ जे दुःख भोगासाठी व ८ माप पुण्य कर्माचे फळ जे सुख भोगासाठी पाप पुण्याची बेरीज करून होणारे एकूण १३ माप कर्म फळ भोगण्यासाठी देह धारण करावा लागेल.

मात्र जसजशी फळे पक्व होतील, तसे फळ भोगावे लागत असल्याने एकाच देहांत सर्व पाप कर्म वा पुण्य कर्म फळ भोगावे लागतें असे नाही. तर पाप-पुण्याचे मिश्रण प्रत्येक देहात लाभते, म्हणूनच माणूस एकाच देहांत काही वेळा दुःखी तर काही वेळा सुखी आढळतो.

तर मग मोक्षप्राप्ति कधीं ?

प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, आणि ८४ लक्ष योनी फिरत, मानवी शरीर हे मोक्ष मिळण्यासाठींच प्राप्त झालेले आहे. मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळविल्यास, पुन्हा विविध योनीत फिरणे क्रमप्राप्त होतें. केवळ मनुष्यच या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटून, परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे, मात्र त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य दोन्ही त्याच्यात आहे, कारण तो परात्पर परब्रह्माचाच अंश आहे.

परंतु जोंवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपवित नाही, आणि जन्मजन्मांतरांत त्याचे खाती जमा झालेला महाकाय ‘संचित’ साठा तो नष्ट करीत नाही, तोपर्यंत अनंतकाळ पर्यंत, त्याला परत परत  निरनिराळे देह धारण करणे क्रमप्राप्तच आहे.

जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, तर त्याला ज्ञानाग्निद्वारें समस्त पूर्वकमांचा साठा भस्म करणे क्रम प्राप्त आहे.

“ज्ञानाग्निः सर्व कर्माणं भस्मसात् कुरुते.”

या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपविलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियमाण कर्मे अशा  खुबीने करावी लागतील, की जी या आयुष्य काळातच पक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील, आणि त्यांतील एकही त्याच्या संचितात जमा होऊन, त्यांच्या भोगासाठी त्याला नवा जन्म घ्यावा लागणार नाही. सर्व कर्मे अशी कुशलतापूर्व करणे याचेंच नाव ‘योग’.

“योगः कर्मसु कौशलम् ”.

पण कोणी कर्मच नाही केलें तर ?

क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचा धोका टाळण्यासाठी, काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणेच सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल-देह बंधनातून सुटका होईल.

हा युक्तिवाद करणे सोपे, पण आचरणात आणणे अशक्य कोटीतले आहे, कारण कोणीही क्षणभर ही कर्म करणे टाळू शकत नाही.

भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतात :

न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत। – गीता, अ. ३/५

शरीरयात्राऽपिच ते न प्रसिध्येत् अकर्मणः । – गीता, अ. ३/८

कोणीही मनुष्य, कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा (जीवन) क्षणभरही चालू शकत नाही. खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे, इतकेच काय श्वासोच्छ्वास करणे, या क्रिया हीं कर्मेच होत. निर्वाहासाठी नोकरी-धंधा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे,  शरीर धारणार्थ अन्न प्राशन करणे, या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत, काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो, अव्याहतपणे चालूच राहते.

परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे, पिणे, इत्यादी जीवनावश्यक क्रिया (कर्मे), तात्काळ फळ देऊन शांत होतात, संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमाण कर्मेही अशा कौशल्याने करावी की जी याच जन्मात फळ देऊन शांत होतील, संचित बनून पुढल्या जन्मांचे कारण बनणार नाहीत. ‘योगः कर्मसु कौशलम्’.

कोणती क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत ?

(१) बाल्यावस्थेत केलेली कर्मे.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही).

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

(६) निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे.

(१) बाल्यावस्थेत आणि अभान अवस्थेत केलेली कर्मे :

बालपणी, अगर अभान अवस्थेत केलेली कर्मे, प्रीती द्वेष रहित असतात, त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत. एकाद्या बालकाने अग्नित हात घातला, तर भाजण्याचे तात्कालिक फल देऊन तें, शांत होईल, संचितात जमा होणार नाही. समजा, एखादे तीन-चार वर्षांचे मूल खाटल्यावर चढून उड्या मारित असेल, आणि तेथे असलेल्या दोन-तीन महिन्यांच्या धाकट्या भावंडाचे अंगावर त्याचा पाय पडला आणि अनावधानाने त्या बाळास गंभीर दुखापत झाली. तर त्या चार वर्षांचे मुलावर कोर्टात खटला भरता येत नाही. व ते कर्म अजाण अवस्थेत घडलेले असल्याने संचितात ही जमा होत नाही.

(२) अजाणतेपणी घडलेली कर्मे.

वेडेपणाचे झटक्यांत एखाद्या माणसाने शिवीगाळ वा मारहाण केली, व कोर्टात त्याचेवर खटला भरला गेला, तरी त्याचे ते कर्म अजाणतेपणे घडलेले असल्याने, कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही, (Intention is the gist of Crime) व ते संचितातही जमा होत नाही. कदाचित अशावेळी जमलेले लोक शिवीगाळ केल्याने, त्याला थोडीफार मारहाण करतील, व अशा तर्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक फल देऊन शांत होईल, असे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसल्याने संचितात ही जमा होत नाही.

(३) मनुष्येतर योनीत केलेली कर्मे.

मनुष्येतर योनीत केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत कारण, मनुष्य योनीशिवाय इतर योनी (पशु-पक्षी, इत्यादि व देवयोनी) या केवळ भोग योनि असतात. या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त झालेल्या असतात. त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर, त्याचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमाण कमें संचितात जमा होत नाहीत. घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादि योनीत असलेले जीवात्मे, केवळ त्या त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धिनुसार (instinct) वागत असतात. त्या योनीत प्रज्ञेचा (Intellect) भाग नसतो. वाघ-सिंह त्यांच्या त्या योनीतील उपजत बुद्धिनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. विंचू नांगी मारतो, साप डंख मारतो, त्यांत त्यांचा केवल नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. त्यांचे प्रारब्ध संपविण्यासाठी, त्यांची ती कर्मे घडत असतात, व तात्कालिक फळ देऊन समाप्त होतात. गाढवाने कोणाला लाथ मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो, कर्म फळ देऊन समाप्त होतें. सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने पडलेले असल्याने, संचितात जमा होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला, आणि परिणामतः असा माणूस दगावला, तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसांसाठी आहे, पशुपक्षांवर त्याचा अमल चालत नाही. गाई-म्हशी कोणाच्या शेतांत शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या, तर शेताचा राखणदार त्याना मारपीट करून त्याना हाकलून देतो, अगर त्याना पकडून कोंडवाड्यांत त्यांची रवानगी होते, व त्यांचे ते कर्म त्याना  तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला,  त्याच्या निष्काळजीपणाबद्दल, गाई-म्हशीना अतिक्रमण कायदा (Trespass Act) लागू नाही. याप्रमाणे मनुष्येतर तमाम योनी-पशु-पक्षी सरपटणारे प्राणी-जलचर प्राणी, यांची क्रियामाण कर्मे संचितात जमा होत नाहीत.

देवयोनी ही सुद्धा भोग-योनी समजली जाते. मनुष्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे देवयोनी प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्याने, त्यात केलेली क्रियमाण कर्मे चांगली वा वाईट संचितात जमा होत नाहीत. जीवात्मे, त्यांच्या पुण्य कर्मानुसार, देवलोक, स्वर्गलोक, इत्यादि ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात, व पुण्याचा साठा संपला की पुनः या मर्त्यलोकात लोटले जातात. अशा जीवात्म्यानी स्वर्ग लोकांत जरी पुण्यकारक क्रियमाण कर्मे केली, तरी त्यांचा पुण्य साठा वाढत नाही, व त्याना आपला तेथील मुक्काम वाढवता येत नाही.

गीतेत भगवंतानी स्पष्ट सांगितले आहे  :

ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम्

अश्नन्ति दिव्यान्-दिवि देवभोगान् ।। गीता, ९/२०

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मत्र्त्यलोकं विशन्ति ॥ (गीता, ९/२१)

आपण थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली की, आपल्याला घरी परतावे लागते. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले, तरी त्या साठी अधिक पैसे मिळविण्याचे साधन नसते. या प्रमाणेच स्वगत पुण्य साठा असे पर्यंतच देवलोकी राहता येते व नंतर पुन्हा या भूतलावर परतावें लागते.

(४) कर्तृत्वाभिमान रहित कर्मे (ज्यांत ‘मी करतो’ हा अभिमान नाही). :

कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली कर्मे ‘अकर्म’ समजली जातात व संचितात जमा न होतां त्यांचे फळ भोगण्यासाठी परत देह धारण करावा लागत नाही आणि जन्म-मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. एकाच्या न्यायाधिशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फर्मावली, तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही, कारण त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते. शिक्षा देण्याचे काम, तो आपले कर्तव्य म्हणून करीत असतो. कायद्याच्या कक्षेत राहून, न्यायदानाचे काम, सरकारचा त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून करीत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही त्याच्या संचितात ते जमा होत नाही.

म्हणूनच भगवंतानी गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की, या धर्मयुद्धांत तुझ्या हातून कितीही हत्या झाली, तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने, धर्मयुद्धांत, धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून, केवळ कर्तव्य भावनेने केले असल्यामुळे, तुला बंधनकारक ठरणार नाहीं. भगवान श्री कृष्ण सांगतात:

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न विद्यते । हत्वापि स इमान् लोकान् न हन्ति न निवद्यते ।। गीता, १८/१७

अर्थ :

ज्याचे अंत:करण अहंकार युक्त नसतें, ज्याची बुद्धि फळासक्तिने मलिन झालेली नसते, त्याने या लोकाना ठार मारले तरी, तो मारणारा ठरत नाही, आणि त्या कर्माने बद्धही होत नाहीं.

हे तत्त्व जाणणारा आणि “मी करतो” असा अभिमान ज्याच्यात नाही असा जीव, धर्म- मर्यादेत राहून, न्याय नीतीच्या मार्गाने जी जी कर्मे, स्वतः चे कर्तव्य म्हणून करतो, ती ती त्याच्या हातून केवळ घडत असल्याने, त्याला बंधनकारक ठरत नाहीत, त्या कर्माना तो केवळ निमित्तमात्र असल्याने, जवाबदार ठरत नाही.

नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् । पश्यन् श्रुण्वन् स्पृशन् जिंछन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन् ।। प्रलपन् विसृजन् गृण्हन् उन्मिषन् निमिषम् अपि । इन्दियाणि इन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। गीता, ५/८-९

वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया, उदाहरणार्थ पाहाणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे-पिणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, मल-मूत्र विसर्जन, ग्रहण करणे, डोळयांच्या पापण्या उघडणे मिटणे, आदि कर्मे इंद्रिये आपापल्या विषयांचे ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. अज्ञानी मनुष्य त्या ‘मी करतो’ असा वृथाभिमान बाळगतो, ज्ञानी तसा अभिमान धरीत नाही.

बैलगाडी उन्हातून चालली असतां, सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो कीं, गाडीचे ओझे मीच वाढून नेत आहे, वास्तविक बैल ती गाडी ओढत असतात.

अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून, आयुष्यांत घडणाऱ्या सर्व घटना माझ्यामुळे घडल्या, मी घडवून आणल्या, असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतात. या मीपणाच्या अभिमानामुळे, त्यांची ती कर्मे त्याना बंधनकारक बनतात, व त्यांचे फळ भोगण्यासाठी त्याना पुनः पुनः देह बंधनात पडावे लागते.

भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायांत, स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. त्यांचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकाना नेहमी वाटत असतें की, मी आज हे मिळविले. माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या आणखी अधिक मिळवीन, आज मी या शत्रूचा नाश केला. उद्या आणखी शत्रूंचा निःपात करीन, मी स्वतः जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध-पुरूष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मीच धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळांत झाला आहे, माझ्यासमान श्रेष्ठ फक्त मीच आहे. मी मोठा दानधर्म करणारा आहे, मी मोठेमोठे यज्ञ करीन, मी मोठा मान-सन्मान प्राप्त करीन, ई. हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात.

अशा आसुरी वृत्तिच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात, हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारे, मोहरूपी जाळयांत पूर्णपणे गुरफटलेले लोक, विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले, निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रौरव नरकात पडतात, त्याना दुसरी गति नाही.

असे लोक जी जी कर्मे करतात आणि ती बहुधा अशुभच असतात. ती ती कर्मे त्यांच्या संचितात जमा होऊन, त्यांची कटु फळे भोगण्यासाठी त्याना सतत जन्म-मरणाच्या रहाटगाडग्यांत फिरावे लागते.

(५) समष्टिच्या (सर्व लोकांच्या) हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे.

कित्येक कर्मे जन मानसाच्या दृष्टीने पाप कर्मे ठरत असली, तरी जर ती समष्टिच्या (जगाच्या) कल्याणासाठी केलेली असली, तर पाप कर्मे ठरत नाहीत व संचितात जमा होत नाहीत.

खोटे बोलणे हे पाप समजले जाते, तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे, हेही पाप समजले जाते. असे असूनही खुद्द भगवान श्रीकृष्णानी धर्मराजासारख्या, सत्यवक्ता अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन “नरो वा कुंजरो वा” असे बोलण्यास भाग पाडून, द्रोण पुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हें करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. पांडव जिंकले, तर त्याला राज्याचा काही भाग, अथवा काही दलाली मिळणार नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता, तर द्रोणाचार्य यांचे मरण असंभव होते. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टिच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. आततायी व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी, लढल्या गेलेल्या धर्मयुद्धांत पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते.

 “अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा” हे अर्धसत्य बोलल्यामुळें युधिष्ठिराच्या, त्रिकाल सत्यवादी या कीर्तीला कलंक लागला, व त्याचे थोडे नुकसान झाले, ही गोष्ट खरी, परंतु व्यक्तिगत नुकसानापेक्षा समष्टिचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता ठरला, तरी श्रीकृष्णाचे समष्टि-कल्याणार्थ केलेले ते पापकर्म, त्याच्या संचितात जमा झाले नाही, व त्याला त्याचे फळ भोगावयास लागले नाही.

लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदां केली, गोपींच्या अनेक खोडया काढल्या, स्यमंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आळ आला मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून दुटप्पी वर्तन केले, पण त्याची ही सर्व कर्मे लीलास्वरूपाची होती. मोठेपणी जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हां ते समष्टि कल्याणार्थ होते, त्याचा व्यक्तिगत स्वार्थ, कोणते ही कपट-कारस्थान करताना, नव्हता.

म्हणून गीतेत त्याने स्वतःच असे म्हटले आहे की

।।” जन्म कर्मच मे दिव्यम्” ।।

माझा जन्म व माझी सर्व कर्मे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्णकाम आहे.

गीतेच्या तिसऱ्या अध्यायांत भगवान श्रीकृष्ण सांगतात :

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन । नानवाप्तमवासव्यं वर्त एव च कर्मणि ।। गीता, ३ / २२ यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ।। गीता, ३/२३

हे पार्था, या त्रैलोक्यांत मला स्वतःला काहीच करावयाचे असे उरलेले नाही. कारण मला मिळालेले नाही किंवा मिळावयाचे आहे, असे काहीच नाही. तरी पण मी कर्म करतच असतो. कारण जर मी असा कर्मात आळस सोडून न वागेन, तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय आळशी होतील.

भगवंतानी आपला जन्म व सर्व कर्मे दिव्य म्हटली याला मुख्यतः तीन कारणे आहेत :

१) इतर जीवात्म्यांप्रमाणे भगवंतांचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही ते प्रगट झाले.

२) त्यांचा जन्म पूर्व जन्मातील संचित कर्मे प्रारब्धरूपाने भोगण्यासाठी नाही, कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मेच नव्हती.

३) त्यांच्या अवतार काळांत, त्यानी जीं जीं कर्मे केली ती केवळ लीलास्वरूप आणि समष्टि (जग)  कल्याणार्थ केली. राग, आसक्ति, द्वेषाने प्रेरित होऊन, स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागलेले नाहीत. कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तिने सर्व कर्मे त्यांचे हातून केवळ घडलेली आहेत. यामुळे भगवंतांचे एकही कर्म संचितात जमा होऊन, दुसऱ्या नवीन जन्माचा हेतु (कारण) बनू शकले नाही.

भगवंत म्हणतात मी आप्तकाम आहे, माझ्या इच्छेनुरूप जेव्हा ज्या देहाची जरूर पडेल, तो समष्टिच्या हिताकरतां धारण करू शकतो. संत तुलसीदासानी वर्णन केल्याप्रमाणे भगवंतांचा अवतार म्हणजे केवळ ‘निज इच्छा निर्मित तनू’ आहे.

जगांत झालेले सर्व महापुरूष रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, विवेकानंद, महात्मा गांधी, येशु क्रिस्त, शंकराचार्य, भगवान बुद्ध, महावीर, महमद पैगंबर ई. या सर्वानी त्यांच्या जीवनकाळ दरम्यान जी जी कर्मे केली ती केवळ “सर्वलोक हिताय” केली. त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणत्याही कर्मात नव्हता म्हणूनच त्याना मुक्त पुरुष मुक्त जीवात्मे समजले जाते.

आज येथेच थांबतो. या पुढील विवेचन आपण पुढील भागांत पाहू.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

विशाखा नक्षत्र विचार


विषय : विशाखा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण विशाखा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. विशाखा हे नक्षत्र चक्रातील १६ वे क्रमांकाचे नक्षत्र असून नक्षत्राचा आकार दाराला बांधलेल्या तोरणासारखा भासतो. विशाखालाच ‘राधा’ असेही म्हटले आहे. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असले तरी त्यातील २ च तारे जरा ठळक व एका रेषेत पण आडवे भासतात. नक्षत्रामधील २ तारे तोरणासारखे असून जरा हिरवट पांढऱ्या रंगाचे व बरेच तेजस्वी दिसतात. वैशाख महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते. काहींच्या मते याची आकृती पोवळ्यासारखी आहे. विशाखा नक्षत्राचे इंग्रजी ‘अल्फा लिब्रा’ आहे.

या नक्षत्राचे पहिले ३ चरण तूळ राशीत व ४ थे चरण वृश्चिक राशीत असल्याने हे चतुष्पाद आहे. हे नक्षत्र अधोमुख, मिश्र साधारण व अंधलोचनी आहे. नक्षत्राचा स्वामी गुरु, दैवत इंद्राग्नी व राशी स्वामी शुक्र व मंगळ असल्याने या नक्षत्रात गुरूची अप्रतिम विद्वत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा व मंगळाची खलबुद्धी यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणावर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्त्व दिसते.

विशाखा नक्षत्राला तराजूचा दांडा असेही म्हणतात. हे नक्षत्र राक्षसगणी व तामसी असल्याने जरा अशुभच आहे. तसेच हे आश्रित असून या नक्षत्रावर जन्मलेले जातक थोरा-मोठ्यांच्या सहाय्याने पुढे येतात. विशाखा नक्षत्र जातक विद्वान पण रजोगुणी, तामसी, हट्टी, थोडे चिडखोर, हौशी, रसिक पण उथळ्या व खर्चिक वृत्तीचे, थोडे भांडखोर, लोभी, गोड बोलणारे, स्त्रीलंपट, थोड्या अविचारी, उलट उत्तरे देणारे असू शकतात. फार उच्च ध्येय किंवा महत्त्वाकांक्षा नसून खावे-प्यावे, मजा करावी असा स्वभाव दिसून येतो. विशाखा नक्षत्र धनाच्या दृष्टीनेही साधारण आहे.

विशाखा नक्षत्र पुरुष व स्त्रियांना मध्यमच आहे. पुरुषांना लागणारा स्वावलंबीपणा, पराक्रम, अधिकार गाजवण्याची वृत्ती, धाडस हे गुणधर्मच जास्त प्रमाणात दिसून येतात. विशाखा नक्षत्रावर जन्मणारे पुरुष जातक उंच, सडपातळ, प्रमाणशीर पण लांबट अवयव, उभट चेहरा व हाडापेराने जरा मजबूत, सडसडीत व जरा काटक दिसतात. चेहऱ्यावर मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्तेचे तेज दिसून येते.

विशाखा नक्षत्र स्त्रियांना हे नक्षत्र साधारण आहे. कारण सौंदर्यकला अथवा धनाच्या दृष्टीने ते कमी प्रतीचेच आहे व अनिष्ट असता सद्गुणापेक्षाही दुर्गुणच जास्त आढळतात. या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्रियांचा बांधा उंच, सडपातळ, प्रमाणशीर असतो. कपाळ रुंद पण चेहरा त्रिकोणी दिसतो. नाक सरळ असते. सडसडीत असल्या तरी पुरुषीवृत्ती व बांधा दिसून येतो. नाजूकपणा, कोमलपणा, सौंदर्यहानी, हळवेपणा अथवा नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, अथवा कलाकौशल्याची अजिबात आवड दिसून येत नाही. मात्र बुद्धीमत्ता व विद्वत्ता चांगली असते. विशाखा नक्षत्री बुध, गुरु असता त्या उच्च शिक्षण घेतलेल्या असतात. खाणेपिणे, कपडालत्ता, छानछोकीपणा, रंगेलपणा, खर्चिक वृत्ती, उधळेपणा असू शकतो. उपभोग (ऐहिक) व देह सौख्याकडे जास्त प्रवृत्ती असते. चालणे झपझप असले, तरी जरा धांदरट व जरा नीट नेटकेपणाचा अभाव असतो. असतात. फॅशनची आवड असली तरी तारतम्य, रंगसंगती या बाबत कमी आस्था दिसून येते. दागदागिने, उंची वस्त्रे, फुले, वेण्या यांचाही फार शौक नसतो. सिनेमा, नाटके व करमणुकीच्या साधनांची बरीच आवड असते.

विशाखा नक्षत्राखाली येणारा साधारण वर्ग बुद्धीमान लोक, शिक्षक, प्रोफेसर्स, सरकारी किंवा खाजगी कंपन्या क्षेत्रातील सेवक व अधिकारवर्ग, लहान लहान व्यापारी, वकील, इंजिनिअर्स, औषधी कंपनीत काम करणारा वर्ग, प्रवासी व बांधकाम खात्यात काम करणारा वर्ग इ आढळून येतात.

विशाखा नक्षत्री रवि फारसा अनुकूल नसतो. रवि असता बांधा उंच, सडपातळ पण जरा अशक्तच व नाजूक असतात. शारीरिक उर्जा कमी असून बुद्धीमत्ता साधारण असते. अधिकारयोग मिळत नाहीत. विशाखा नक्षत्री चंद्र असता जरा आडवा परंतु प्रमाणशीर बांधा, देखणा पण रागीट चेहरा, विद्या व बुद्धी कमी, गूढ व दुष्ट मनाचा. थोडा द्वेषी, चैनी, खर्चिक व उधळ्या असतो. छानछोकीकडे जास्त लक्ष असते.

विशाखा नक्षत्री मंगळ असता सडसडीत, उंच चपळ असतो. मंगळ मेडिकल लाईनचे शिक्षण किंवा सायन्सला बरा. औषधी वस्तूंचा व्यापार अथवा औषधी वस्तूंच्या दुकानात अथवा कारखान्यात नोकरी मिळेल. अपघात व वारंवार संकटे भोगणारा.

विशाखा नक्षत्री बुध असता शरीरप्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने बरा असतो. बुद्धी तीष्ण, खोल व कुशाग्र असते. बांधा जरा आडवा पण चपळ व भरलेला असतो. मात्र स्वभावाने हे जातक खलबुद्धी, स्वार्थी, थोडे कुमार्गी व अतिव्यवहारी असू शकतात.

विशाखा नक्षत्री गुरु बुद्धी व विद्येच्या दृष्टीने अनुकूल असतो, पण शरीरप्रकृती व धनाच्या दृष्टीने फारसा अनुकूल नसतो. गुण चांगले पण नशीब प्रतिकूल असते. बांधा उंच, सडपातळ पण जरा नाजूक व अशक्त असतो. पचनशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. दम लागणे किंवा रक्तदाबाचे विकार लवकर होतात. शिक्षक, प्रोफेसर, वकील या शिक्षणाला हा गुरु उत्तम, मात्र त्यांना गुणवत्तेप्रमाणे नोकरीत यश मिळत नाही.

विशाखा नक्षत्री शुक्र प्रमाणशीर व देह व बांधा देतो. मात्र चेहऱ्यावर शुक्राचे सौंदर्य, मोहकपणा अथवा आकर्षकपणा कमी आढळतो. शुक्राच्या शुभ गुणधमपिक्षा अशुभ गुण जास्त दिसून येतो. बुद्धी, विद्या व कला साधारण असतात. व्यवस्थितपणा, नीटनीटकेपणा, टापटीप कमी असून स्वच्छंदी, चैनी, खर्चिक, उधळ्या, विलासी व रंगेल असू शकतो. बिघडलेला असता अविचारी, व्यसनी, वाईट वासनेचा, स्त्री लंपट, स्वच्छंदी व अनीतीच्या मार्गाने जाणारा व त्यामुळे शरीरप्रकृती रोगी व खराब करून घेणारा आढळतो. विशाखा नक्षत्री शनि असता हाडापेराने मजबूत पण हाडाळ, जरा वेडावाकडा बांधा, चेहरा उदास, गंभीर व प्रौढ दिसणारा असतो. स्वभाव कुजका, द्वेषी, कपटी दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारा, स्वार्थी, अविचारी, कंजूष, लोभी व गूढविद्येची (पिशाच्च) आवड असणारा असतो. बुद्धीमान, विद्वान व शिकलेला असला तरी त्याचा फार फायदा कमी होतो.

विशाखा नक्षत्री राहू शरीरप्रकृती व बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने उत्तम असतो. मात्र अतिसाहसी, धाडसी व जरा पापी वृत्तीचा, चैन, मजा, देहसौख्य, ख्याली- खुशाली यांचेकडे ओढ असू शकतो. बिघडलेला असता तर गुन्हेगारीच्या मार्गाने अथवा अनैतिक धंदे करून द्रव्य मिळविण्याकडे प्रवृत्ती असते. विषारी प्राणी दंशाची भीती असते.

विशाखा नक्षत्री केतू हा फक्त दैविक, आध्यात्मिकदृष्ट्या बरा असतो. शरीरप्रकृती किंवा बुद्धीमत्ता यांच्या दृष्टीने साधारण.

विशाखा नक्षत्री हर्षल असता सडपातळ उंच बांध्याचा, बुद्धीमान पण विलक्षण डोक्याचा असतो. बुद्धी विधायक कायपिक्षा विध्वंसक मार्गाकडे वळू शकते. वागणे विक्षिप्त, लहरी व स्वैर असते.

विशाखा नक्षत्री नेपच्यूनही फारसा अनुकूल नसतो. शरीरप्रकृती मध्यम असून त्या मानाने नेहमी उदास व नैराश्यवादी दिसतात. गूढ रोग होतात.

विशाखा नक्षत्री होणारे रोग फारसे दाहक नसले, तरी बरेच रेंगाळणारे, चिकट व त्रास देणारे असतात. मूत्रपिंडाचे विकार, रक्तदाबाचे विकार, त्वचेचे विकार, रक्तदोष, पित्त, विषबाधा तसेच कंबर दुखणे, लघवीचे विकार, ओकाऱ्या, मळमळणे, मंगळ बिघडलेला असता गुप्तरोग, कावीळ, कापणे, भाजणे, खरचटणे अशा रोगांपासून भीती असते. स्त्रियांच्या कुंडलीत शुक्र बिघडलेला असता चक्कर, भोवळ व दम लागतो.

या नक्षत्राला शाखाहीन नक्षत्र असेही म्हणतात. म्हणून या नक्षत्रात गुरु किंवा शनि असता संतती होण्यात खूप अडचणी येण्याचा संभव असतो.

विशाखा नक्षत्री हस्ताक्षर वेडेवाकडे, तिरके, गचाळ व अव्यवस्थित आढळते. धावत्या लिपीत लिहिण्याची आवड असते. नक्षत्रावर ३ किंवा ६ अंकाचा प्रभाव वाढतो. गुरुचा पुष्कराज लाभदायक वाटतो. अंधलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती पूर्वेला लवकर सापडू शकते. हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने मुहूर्तशास्त्रात शुभकार्यासाठी फारसे महत्त्वाचे नाही. हे अधोमुखी नक्षत्र विहिर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले धन काढणे, जमीन नांगरणे, बी पेरणे, द्यूत खेळणे, राज्याभिषेक, बागाईत करणे, अग्निहोमादी क्रिया, दत्तक पुत्र घेणे या गोष्टींना चांगले.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

दग्ध राशी, पंचांगातील २७ नक्षत्र योग विचार


विषय : दग्ध राशी आणि पंचांगातील २७ नक्षत्र योग विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ज्योतिष सिद्धांत सार, ज्योतीर्मयुख 

नमस्कार,

हिंदू परिवारात पंचांगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ‘पंचांग’ जे ‘पाच अंगे’ म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांची माहिती देते. विवाह, उपनयनम, गृहप्रवेश इत्यादी महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी शुभ काळ मुहूर्त निश्चित करण्यासाठी सामान्यत: तिथी आणि वार हे गृहीत धरले जातात. नक्षत्र हा कुंडलीचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि भविष्य कथनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जन्मकुंडलीचे विश्लेषण करताना तिथी, वार, योग आणि करण यांचा क्वचितच विचार केला जातो. पण तिथी आणि योगाचे योग्य मूल्यमापन केल्यास ती फार उपयुक्त साधने बनू शकतात.

उदा. ज्या तिथीस आपला जन्म होतो, त्या तिथीनुसार काही राशी त्या जातकास निष्फळ अथवा निरुपयोगी ठरतात. त्यांना ‘दग्धा’ किंवा जळालेली रास म्हणतात.

आपल्या माहितीसाठी जन्म तिथी व त्यास अनुसरून दग्ध राशी देत आहे.

तिथी व दग्ध राशी

१.      प्रतिपदा : दग्ध राशी तूळ आणि मकर

२.  द्वितीया : दग्ध राशी धनु आणि मीन

३.  तृतीया : दग्ध राशी सिंह आणि मकर

४.  चतुर्थी : दग्ध राशी वृषभ आणि कुंभ

५.  पंचमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या

६.  षष्ठी : दग्ध राशी मेष आणि मकर

७.  सप्तमी : दग्ध राशी कर्क आणि धनु

८.  अष्टमी : दग्ध राशी मिथुन आणि कन्या

९.  नवमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक

१०.  दशमी : दग्ध राशी सिंह आणि वृश्चिक

११.  एकादशी : दग्ध राशी धनु आणि मीन

१२.  द्वादशी : दग्ध राशी तूळ आणि मकर

१३.  त्रयोदशी : दग्ध राशी वृषभ आणि सिंह

१४.  चतुर्दशी : दग्ध राशी मीन, मिथुन आणि कन्या

१५.  पौर्णिमा : दग्ध राशी नाही

१६.  अमावस्या : दग्ध राशी नाही

पारंपारिक ज्योतिष शास्त्रात २७ नक्षत्रांसाठी २७ योग सांगितलेले आहेत.

सूर्य रोज जवळपास ५९ कला एवढे अंतर पार करतो, तर चंद्र रोज ७९० कला एवढे अंतर पार करतो. योग म्हणजे चंद्र सूर्याच्या राशी-अंश-कला-विकालात्मक स्पष्ट भोगांची बेरीज. प्रत्येक ८०० कला इतक्या बेरेजेचा एक योग होतो. असे सत्तावीस योग आहेत. पहिला योग विष्कंभ आहे. पंचांगात योगाची समाप्तीची वेळ दिलेली असते. नक्षत्र व योगाची सुद्धा वृद्धी व क्षय होतो. वैधृती व व्यतिपात हे दोन योग शुभकार्यास वाईट समजले जातात. या योगावर जन्म झाल्यास शांती करावी असे सांगितले जाते.

कांही योग असे आहेत कीं, त्यांच्या आरंभापासून कांही घटिकांपर्यंत त्यांचा दोष असतो.

विष्कंभ आणि वज्र या योगांचा दोष आरंभापासून तीन घटिकांपर्यंत असतो.

परिधयोगाचा पूर्वार्ध संपेपर्यंत,

शूल योगाचा पहिल्या पांच घटिकांपर्यंत,

व्याघातयोगाचा नऊ घटिकांपर्यंत

गंड आणि अतिगंड योगांचा पहिल्या सहा घटिकांपर्यंत दोष असतो.

म्हणून तेवढ्या घटिका सोडून त्या त्या योगांवर शुभकार्ये करण्यास कांही हरकत नाहीं.

प्रत्येक योग विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो जो त्या विशिष्ट योगाच्या अंतर्गत जन्मलेल्या व्यक्तीमध्ये आढळण्याची शक्यता असते. ज्या नक्षत्रावर हा योग होतो, त्या नक्षत्राच्या उडू दशेत हे फळ प्रकर्षाने जाणवते. २७ योग व फळे खालीलप्रमाणे आहेत.

१.      विष्कंभ योग : योग फळ – इतरांवर विजय प्राप्ती व समृद्धी आणि संपत्तीचे वरदान आहे.

२.  प्रीती योग : योग फळ – सर्वांचा प्रिय आहे, विभिन्न लिंगी लोकांना आकर्षित करणारा

३.  आयुष्मान योग : योग फळ – चांगले दीर्घायुष्य आणि आरोग्य

४.  सौभाग्य योग : योग फळ – सुख आणि सुखसोयींनी आशीर्वादित

५.  शोभन योग : योग फळ – कामुक, लैंगिक मानसिकता

६.  अतिगंड योग : योग फळ – खूनशी स्वभाव, अडथळे आणि अपघातांचा सामना करावा लागणे

७.  सुकर्म योग : योग फळ – चांगली आणि उदात्त कृत्ये करणे, श्रीमंती

८.  धृती योग : योग फळ – इतरांच्या पैशात आणि स्त्रियांमध्ये गुंतलेला

९.  शूल योग : योग फळ – संतापी आणि भांडखोर

१०.   गंड योग : योग फळ – वाईट सवयी, चारित्र्य

११.   वृद्धी योग : योग फळ – दिवसेंदिवस परिस्थितीत सुधारणा, बुद्धिमान

१२.   ध्रुव योग : योग फळ – मनाची स्थिरता आणि आर्थिक स्थैर्य.

१३.   व्याघात योग : योग फळ – क्रूर स्वभाव

१४.   हर्षण योग : योग फळ – नेहमी आनंदी आणि हुशार

१५.   वज्र योग : योग फळ – श्रीमंत आणि कामुक.

१६.   सिद्धी योग : योग फळ – इच्छापूर्ती दायक, इतरांचा रक्षणकर्ता

१७.   व्यतिपात योग : योग फळ – अविश्वसनीय

१८.   वरियान योग : योग फळ – वाईट चारित्र्य आणि कामुक

१९.   परीघ योग : योग फळ – श्रीमंत आणि भांडखोर

२०.   शिव योग : योग फळ – राजगौरव, शास्त्र पारंगत, शीतल आणि शांत आणि श्रीमंत

२१.   सिद्ध योग : योग फळ – सुस्वभावी, धार्मिक संस्कारात रुची

२२.   साध्य योग : योग फळ – चांगुलपणा, सद्वर्तणूक

२३.   शुभ योग : योग फळ – धनवान, कीर्तिमान, गोरा

२४.   शुक्ल योग : योग फळ – डळमळणारे मन, सदाचारी, बोलका आणि आवेगपूर्ण.

२५.   ब्रह्म योग : योग फळ – अत्यंत गुप्त, उच्च महत्वाकांक्षा, न्याय करण्याची क्षमता

२६.   इंद्र योग : योग फळ – धनवान, शिक्षित आणि लोकोपयोगी.

२७.   वैधृती योग : योग फळ – धूर्त, गंभीर, श्रीमंत आणि बलवान

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

अक्षर ब्रह्म


विषय : अक्षर ब्रह्म

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : मानवी जीवनातील गूढ रहस्ये, ॐ हा गुरु

नमस्कार,

लहानपणी सर्वात प्रथम काय शिकवले जाते तर अक्षर ओळख. आज आपण अक्षराचे मूळ स्वरूपाचा बोध घेणार आहोत. अक्षरामध्ये अवघे ब्रह्म व देवदेवता वसलेली आहेत, हे पाहणार आहोत. अ क्षर म्हणजे कधी ही नष्ट न पावणारे ते परम तत्व.

सोळा स्वर छत्तीस व्यंजने मिळून बावन्न अक्षरे तयार होतात. या बावन्न अक्षरांना बावन्न मातृका असे म्हटले जाते. बावन्न मातृका संपूर्ण मंत्र शास्त्राचे मूळ आहे. या आपल्या मुखामध्ये असणारे वायू योग्य प्रकारे वळविल्यानंतरच या बावन्न मातृकांचा उच्चार करता येतो. आमच्या बालपणामध्ये लृ या अक्षराचा उच्चार कसा करायचा हे आम्हाला शिकविले गेले नाही व आजकालच्या मुलांना ङ या अक्षराचा उच्चार करता येत नाही. तसेच ञ या अक्षराचाही उच्चार करता येत नाही.

शरीरातील वायुला योग्य प्रकारे वळवून स्वरयंत्राद्वारे बाहेर आणल्यानंतरच मातृकांचा योग्य प्रकारे उच्चार होतो. आमच्या अक्षरांचे आकारही विशिष्ट पद्धतीने ठरविण्यात आलेले आहेत.

उदा. ऐं हे सरस्वती बीज आहे. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे व ऐं हा आकार मोरासारखा आहे.

लं हे पृथ्वीतत्त्वाचे बीज आहे. मनुष्य मांडी घालून बसल्यानंतर त्या मांडीचा आकार या लं प्रमाणे होतो.

ॐ हे ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देवी-देवता यांचे मूळ आहे. आपल्या शरीराचे जाणीवपूर्वक निरीक्षण केल्यास बऱ्याच ठिकाणी ॐ चा आकार दिसून येईल व ॐ हे सर्व देवी-देवतांचे आदिबीज असे का म्हटले जाते हे लक्षात येईल. राम म्हणाल्याने राम प्रसन्न होईल विष्णू म्हणाल्याने विष्णू प्रसन्न होईल. शिव म्हणाल्याने शिव प्रसन्न होईल. ॐ म्हणाल्याने सर्वच देवता एकदम प्रसन्न होतील. परंतु ही ॐ कार साधना प्रारब्धशुद्धी पूर्ण झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. दुष्प्रवृत्तींचा समूळ नाश झाल्याशिवाय ॐ कार साधनेचे रहस्य प्राप्त होत नाही. म्हणून प्रत्येक मंत्राच्या अगोदर ॐ लावावा असे सांगितले जाते. यात उद्देश असा की कुठल्या ना कुठल्या रूपाने ॐचे उच्चारण होत राहावे म्हणजे एक ना एक दिवस खऱ्या ॐ चा लाभ होईल.

मातृकांच्या वरती अनुस्वार दिला की त्या मातृकेला शक्ती रूप प्राप्त होते उदाः र हे अक्षर आहे. तर रं हे अग्निबीज आहे. या अग्निबीजाचा जप केला असता अग्नी निर्माण करता येतो. या करिता हे बीज सिद्ध करावे लागते. या बीजमंत्राच्या जपाने सूक्ष्मदेह शुद्ध होतो. जे लोक खूपच अपवित्र असतात दुष्ट विचारांनी भरलेले असतात त्यांनी या बीजाक्षराचा जप केला असता त्यांच्या अंगाची आग होऊ लागते व जवळ जवळ सर्व समाजच अशुद्ध व दुष्ट विचारांनी भरलेला असल्याकारणाने रं या बीजमंत्राला सौम्य करून त्याचे राम या नाममंत्रात रूपांतर करण्यात आले व रामनाम समाजाला दिले गेले

अशा प्रकारे प्रत्येक अक्षरामध्ये प्रचंड शक्ती दडलेली आहे. जप करून या शक्तीला स्वतःच्या अंगात निर्माण करावी लागते. प्रत्येक बीजाक्षराची एक एक देवता असून या देवता विशिष्ट प्रकारच्या मर्यादित सामर्थ्याने युक्त असतात. दोन अक्षरे एकत्र जोडल्यानंतर आणखी एक वेगळ्याच प्रकारची शक्ती निर्माण होते. ही शक्ती एक अक्षरी बीजापेक्षा जास्त शक्तिशाली असते.

उदा. हीं हे भुवनेश्वरी बीज असून या बीजाक्षराच्या जपाने ज्ञान व सामर्थ्य प्राप्त होते. शिव, विष्णू व भुवनेश्वरी देवी अशा तीनही देवता या एकाच बीजाक्षरात राहतात.

श्रीं हे महालक्ष्मीचे बीज असून या बीजमंत्राच्या जपाने महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.

क्लीं हे काली बीज आहे. या बीजाक्षराच्या जपाने अनेक विद्या प्राप्त होतात. क्लीं या बीजाचे सौम्य रूपांतर कृष्ण असे केले गेले व सामान्य लोकांना कृष्णभक्ती करण्यास सांगितले गेले.

गं हे गणपतीचे बीज आहे

द्राम् हे दत्तात्रेयांचे बीज आहे..

छोट्याशा बीजाक्षरामध्ये अद्भुत सामर्थ्य असते. बीजाक्षरे व त्याचा परिणाम यांचा अभ्यास करून दोन-दोन, तीन-तीन बीजाक्षरे एकत्र करून साधक जप करतात व अद्भुत सामर्थ्य प्राप्त करतात. काही काही मंत्रांमध्ये तर दहा-दहा, वीस-वीस बीजाक्षरे असतात व प्रत्येक बीज शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य तयार करते.

ऐं ह्रीं श्रीं या बीजाक्षरांमध्ये सरस्वती, भुवनेश्वरी व लक्ष्मी अशा तीन देवतांचे तेज आहे.

ऐं ॐ ऐं या मंत्रामध्ये सरस्वतीचे तेज असून, या मंत्राच्या जपाने बुद्धी तेजस्वी होते.

ऐं क्लीं सौः हा बाला त्रिपूरा देवीचा मंत्र असून, या मंत्राच्या जपाने समृद्धी व सफलता प्राप्त होते.

ऐं ह्रीं श्रीं क्लीं या मंत्रामध्ये चार देवतांचे तेज असून, या मंत्राच्या जपाने आर्थिक सुबत्ता प्राप्त होते.

ॐ द्राम् ॐ हा दत्तात्रेयांचा बीज मंत्र असून, या मंत्राच्य जपाने दत्तात्रेयांची कृपा प्राप्त होते. तसेच योगातील रहस्यांचे ज्ञान प्राप्त होते व संकटे दूर होतात, तेजस्विता प्राप्त होते.

अपवित्र, स्वार्थी किंवा संकुचित बुद्धीच्या साधका बीजाक्षरांचा जप केला असता त्याला खूप त्रास होतो. बीजाक्षरांच जप करणारा साधक नि:स्वार्थ बुद्धीचा, परोपकारी व मोठ्य मनाचा असावा लागतो. तरच बीजाक्षरांमध्ये असलेली शक्ती त ग्रहण करू शकतो.

एक अपात्र साधक एका बीजाक्षराचा अखंड जप कर असे. त्याचे मन अशुद्ध होते. २५-३० लाख जप झाल्यानंतर त्याला जिकडे-तिकडे आगीचे लोळ दिसू लागले. आकाश लाल दिसू लागले व त्याला पराकोटीची भीती वाटू लागली व त्याने मंत्रजप करणे सोडून दिले. असे प्रकार घडू नयेत म्हणून बीजाक्षराच्या जोडीला देवतेच्या नावाचे संपुट लावून जप करणे चांगले असते.

उदा. ॐ द्राम् दत्तात्रेयाय नमः

ॐ ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा

ॐ दुम् दुर्गायै नमः

ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः

ॐ ऐं सरस्वत्यै नमः

ॐ नहीं भुवनेश्वरी नमः

अशा प्रकारे देवतांच्या नावाने संपुट लावून व शेवटी नमः किंवा स्वाहा पल्लव लाविले असता बीजमंत्राचे तेज सौम्य व सुखकर होते. याशिवाय देवतेची कृपा होते. परंतु काही माणसे अशा जपातील तेजही ग्रहण करू शकत नाहीत. अशा लोकांनी फक्त नाममंत्राचा जप करावा. नाम जपाने कसलेही नुकसान होत नाही. चित्त शुद्ध होते. मन बलवान होते. अंगी सात्त्विकता वाढू लागते, सद्गुण निर्माण होतात व मंत्रजप करण्याची योग्यता प्राप्त होते.

श्री दत्त जय दत्त,

ॐ नमो नारायणाय,

ॐ दत्त दुर्गा ॐ

ॐ नम: शिवाय

अशा विविध नाममंत्रांनी परमेश्वराचे अखंड नामस्मरण केले असता अनेक वर्षांनंतर अंगी सात्त्विकता वाढू लागते. सद्प्रवृत्ती वाढू लागतात व साधना करण्याची पात्रता निर्माण होते.

अक्षर ब्रह्माच्या सहाय्याने असंख्य देव-देवतांची शक्ती आपल्यात निर्माण करता येते, इतकेच नव्हे तर असंख्य प्रकारच्या शस्त्रास्त्रांची निर्मितीही करता येते. उदा. अग्नी अस्त्र, पर्जन्य अस्त्र, ब्र्हमास्त्र ई. या अस्त्र विद्येच्या द्वारा प्रचंड संहार घडवून आणता येतो. एकंदरीत असे म्हणावे लागते, की अक्षरांनी काय होत नाही?

प्राचीन काळामध्ये मंत्राच्या सहाय्याने पाऊस पाडला जात असे. वादळे निर्माण केली जात असत, अग्नीचा वर्षाव केला जात असे, अशा प्रकारे विविध प्रकारच्या अस्त्रांची निर्मिती केवळ मंत्रांद्वारे केली जात असे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या विद्या अस्तित्वात होत्या. परंतु या विद्यांचा प्रचंड प्रमाणात दुरुपयोग झाल्या कारणाने या विद्या लोप पावल्या.

आजही असे साधक आहेत, की जे मंत्राने अग्नी निर्माण करतात, मंत्राने पाऊस पाडतात किंवा मंत्राने वादळे निर्माण करू शकतात,पण ते प्रसिद्धीपासून अलिप्त राहून एकांत स्थळी अखंड साधनेत मग्न असतात. अशा प्रकारे शब्द ब्रह्मामध्ये विविध प्रकारचे सामर्थ्य आहे. त्याचा सदुपयोग केला असता मनुष्य देव होऊ शकतो व दुरुपयोग केला असता माणसाचा राक्षस होतो.

सर्व देवतांचे व सर्व अक्षरांचे मूळ ॐ आहे. ॐ च्या ध्वनीमध्ये बावन्न मातृका सामावलेल्या आहेत. सर्व देव-देवता सामावलेल्या आहेत, सर्व विद्या सामावलेल्या आहेत, सर्व ज्ञान सामावलेले आहे, सर्व कला सामावलेल्या आहेत. फक्त या अक्षर ब्रह्माची साधना करण्याकरिता आवश्यक असणारी पवित्रता व योग्यता आपल्या अंगी असावी लागते. निःस्वार्थ बुद्धीच्या साधकांना ॐ काराच्या साधनेने कुंडलिनी जागृतीचा अनुभव येतो. षड्चक्रे जागृत होतात. विविध प्रकारचे ज्ञान होते. वातावरणातील देव-देवता व सिद्धपुरुष यांची दर्शने होतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होते. ध्यानामध्ये विविध प्रकारची दृश्ये दिसू लागतात. चिदाकाशात प्रवेश प्राप्त होतो. मरणाच्या चक्रातून सुटका होते. जन्म-अक्षर ब्रह्माच्या उपासनेने साधक जीवनमुक्त होतो, सिद्ध होतो, परमेश्वराशी एकरूप होतो. फक्त सद्बुद्धीने अक्षर ब्रह्माचा सदुपयोग करायला हवा. रावण, कुंभकर्णादी राक्षसांनी अक्षर ब्रह्माचा दुरुपयोग करून कुल संहार घडवून आणला होता. असे हे अक्षर ब्रह्म. सदुपयोग केला तर ब्रह्म पद प्राप्त करून देते व दुरुपयोग केला तर भ्रमात भरकटवीत राहते. 

‘रं’ या मंत्रामध्ये अग्नी निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे त्याचा मानसिक जप केला असता सूक्ष्मशरीर शुद्ध होण्यास मदत होते.

फार पूर्वी अनेक लोकांनी रं या मंत्राचा जप करून अनेक शक्ती प्राप्त केल्या. कालांतराने मंत्रातील तेज व शक्ती ग्रहण करण्यासाठी जे मनोबल लागते ते मनोबल कमी झाले. माणसे मानसिकरीत्या दुर्बल होऊ लागली. माणसांची मने दुर्बल झाली. रं या बीजाक्षराची साधना केल्यानंतर माणसांना सगळीकडे अग्री ज्वाला दिसू लागल्या. यामुळे तात्कालीन ऋषींनी रं या बीजाक्षराचे रूपांतर राम असे केले व राम मंत्राचा जप करण्यास जनतेला सांगितले. अशा प्रकारे राम नामाचा प्रसार सर्वत्र झाला.

रं हे बीजाक्षर तेजतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या जपाने तेजतत्त्व (अग्नी तत्व) सिद्ध होते. सूक्ष्म शरीर शुद्ध होते. प्रकाशमय मार्गात प्रवेश प्राप्त होतो. मेष, सिंह, धनु या राशीच्या लोकांनी रं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ रं किंवा राम नामाचा जप. यांचा मार्ग योग हा मार्ग आहे.

लं हे बीजाक्षर पृथ्वीतत्त्वाचे द्योतक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने पृथ्वीतत्त्वातून आपतत्त्वाकडे जाणारा मार्ग मिळतो. वृषभ, कन्या मकर या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ लं जय माई. यांचा मार्ग कर्म हा मार्ग आहे.

वं हे बीजाक्षर आपतत्त्वाचे (जलतत्व) कारक आहे. या बीजाक्षराचा जप केल्याने आपतत्त्वातून तेजतत्त्वाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. मीन, वृश्चिक, कर्क या राशीच्या लोकांनी वं (गं) हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ वं (गं) गणपये नाम: . यांचा मार्ग ज्ञान हा मार्ग आहे.

यं हे बीजाक्षर वायुतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने विहंगम मार्गाचे ज्ञान होते. मिथुन, तुळ, कुंभ या राशीच्या लोकांनी लं हे बीजाक्षर असलेल्या नामाचा जप करावा. उदा. ॐ यं किंवा विठ्ठल नामाचा जप. यांचा मार्ग भक्ती हा मार्ग आहे.

‘है’ हे बीजाक्षर आकाशतत्त्वाचे कारक आहे. या बीजाक्षराच्या साधनेने आकाशतत्त्वाचे ज्ञान होते.

अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांच्या अनुष्ठानाने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त करता येते. विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात. ज्याप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या बीजाक्षरांचा जप करून प्रकाशमय देवता प्रसन्न करता येतात, त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारच्या बीजाक्षरांचा जप करून भयानक अंधःकारमय विश्वातील भूत-भैरवांनाही प्रकट करता येते व त्यांचेकडूनही विविध प्रकारच्या विद्या प्राप्त करता येतात.

भूत, भैरव, शाकिनी, डाकिनी लवकर प्रकट होतात किंवा एक दोन दिवस साधना करून बळी दिल्याने एखादी विद्या देतात. यामुळे अंधःकारमय मार्गाच्या साधना करणारे साधक बरेच असतात. क्वचित एखादा साधक प्रकाशमय मार्गाने जातो व आपल्या सूक्ष्मदेहाला प्रकाशमय बनवितो. अंध:कारमय विश्वाची माहिती वाचकांना देणे योग्य नाही. म्हणून प्रकाशमय विश्वाचीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व अंध:कारमय विश्वाचा ओझरता उल्लेख केला आह्रे.

सगुण भक्ती, निर्गुण ब्रह्म, भक्तिमार्ग, योगमार्ग या सर्व गोष्टी प्रकाशमय विश्वात येतात. सद्गुणांचे आचरण, दान, नम्रता, परोपकार या गोष्टी प्रकाशमय मार्गात येतात. निःस्वार्थ प्रेम करणे, प्रेमाने वागणे व इतरांना मदत करणे हे प्रकाशमय मार्गात येते.

स्वार्थीपणा, कुढत राहण्याची प्रवृत्ती, संकुचित वृत्ती, ईर्षा, द्वेष, मत्सर करणे हे दुर्गुण म्हणजे अंध:कारमय विश्व. शब्द ब्रह्माचा म्हणजे नामजपाचा, मंत्रजपाचा आधार घेऊन आपण या अंधःकारमय विश्वाच्या पलीकडे जाऊ शकतो.

 ऐं या बीजाक्षराचा जप केला असता सरस्वतीची प्रसन्नता प्राप्त होते व ज्ञान प्राप्त होते.

श्रीम् या बीजाक्षराचा जप केला असता महालक्ष्मीची प्रसन्नता प्राप्त होते.

न्हीम् या बीजाक्षराचा जप केला असता अनेक प्रकारचे ज्ञान होते, भुवनेश्वरी देवी प्रसन्न होते.

अशा प्रकारे शब्दसृष्टीमध्ये असंख्य बीजाक्षरे असून या बीजाक्षरांचा जप केला असता अनेक देवता प्रकट होतात व भक्तांना सन्मार्ग दाखवितात. हिंदू धर्मामध्ये प्रकाशयम मार्गातील देवता म्हणून गणेशापासून दत्तापर्यंत, सरस्वती पासून दुर्गापर्यंत अनेक देवी-देवता प्रसिद्ध आहेत. यापैकी कुठल्याही एखाद्या देवतेची आराधना करून प्रकाशमय मार्गाचे आपण अनुसरण करू शकतो. 

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)