
विषय : उत्तरा भाद्रपदा नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण उत्तरा भाद्रपदा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील २६ वे नक्षत्र असून इंग्रजी नाव ‘आल्जेनबि’ असे आहे.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे २ तारे असून त्याच्या उत्तर पूर्वेकडील ताऱ्यामधून ३ तेजस्वी व प्रखर पण सुंदर ताऱ्यांची रांग गेलेली आढळते. तिला देवयानी म्हणतात. या देवयानीच्या पुंजक्यात आपल्या सूर्यमालेच्या बाहेरची प्रचंड दीर्घिका आहे. त्याच्या उत्तरेस ययातीचे धनुष्य व उत्तरेला शर्मिष्ठा असे बरेच ठळक व तेजस्वी तारे असल्याने हे नक्षत्र ओळखण्यास सोपे आहे. भाद्रपदा पुंजातील ‘उत्तरा भाद्रपदा’ हे शुभ व कल्याणकारी नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा म्हणजे उत्तर आयुष्यात कल्याण किंवा भद्र करणारे, पूर्वार्धातील कष्टाचे, धडपडीचे व श्रमाचे फल उत्तर आयुष्यात मिळते.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे ४ ही चरण मीन राशीत येत असल्यामुळे हे नक्षत्र चतुष्पादी आहे व या ४ चरणांवर अनुक्रमे रवी, बुध, शुक्र व मंगळ यांचे अधिपत्य आहे. नक्षत्र स्वामी शनी, राशिस्वामी गुरु व दैवत अहिर्बुध्य नावाची देवता आहे. त्यामुळे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात शनीची चिकाटी, निश्चय, धीमेपणा, गुरुचा न्यायी व उदारपणा, शहाणपणा यांचा सुरेख मिलाफ झालेला आढळून येतो, तसेच हे नक्षत्र ऊर्ध्वमात्र, ध्रुव स्थिर व सुलोचनी आहे. तारे तेजस्वी पण पांढरे असून थोडी निळसर झाक आहे.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्र मनुष्यगणी असले तरी बरेच शुभ आहे. यात सत्वगुणधर्म जास्त आढळून येतात. हे साधारण बलवान व लक्ष्मीप्रद आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक विद्वान, स्थिर बुद्धी, नम्र, सेवावृत्तीचे, धाडसी, कर्तृत्ववान, कर्तबगार, निश्चयी, विद्याव्यासंगी, व्यवहारकुशल, मिळून मिसळून वागणारे, समाजप्रिय, समाजकार्याची आवड असणारे, मेहनती, कष्टाळू श्रमिक, सदाचरणी, धार्मिक, महत्त्वाकांक्षी, ध्येयवादी थोडेसे’
मानी व कायद्याच्या चाकोरीतील आढळतात. हे नक्षत्र उच्च अधिकार अथवा मोठेपणासाठी व धनाच्या दृष्टीने साधारण आहे. या नक्षत्रात बुद्धी, गुण व रूप यांचा संगम झाला आहे.
उत्तरा भाद्रपदा पुरुषांना हे नक्षत्र जास्त अनुकूल आहे. धाडस, कर्तव्य, पराक्रम, स्वावलंबीत्व, कठोरपणा, धडाडी, महत्त्वाकांक्षा हे गुणधर्म चांगले आढळतात. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र शारीरिक ऊर्जा, बुद्धी व अधिकारयोग अशा सर्व दृष्टीने अनुकूल आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा उंचसर (मध्यम) थोडा आडवा, काटक, चौरस बांधा, कपाळ भव्य, चेहरा चौरस व भव्य असतो. चेहरा सुस्वरूप असतो. चेहऱ्यावर बौद्धिक व सात्विक तेज आढळते. शारीरिक जीवन व रोग प्रतिकारशक्ती बरी असते. सत्वगुणी, नम्न, विनयशील, सदाचारी, बुद्धीमान, विद्याव्यासंगी व सेवावृत्तीचे आढळतात. फारशी व्यसने नसतात. करारी, कर्तबगार व कर्तृत्ववान असतात. देवधर्माची आवड असते., सदाचारी वृत्ती आढळते.
उत्तरा भाद्रपदा स्त्रियांनाही हे नक्षत्र रूप व बुद्धीच्या दृष्टीने अनुकूल आहे. बांधा प्रमाणबद्ध, नीटनेटका असतो. अवयव भरलेले व साधारण फुगीर असतात. चेहरा चौरस व छाप पाडणारा असतो. चेहरा विद्वान, उच्च कुळातला व जरा सुशील दिसतो. गंभीर असला तरी थोडी हास्याची झाक असते. साधारण स्त्रिया बुद्धीवान, हुशार व संसारी असतात. टापटीप, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा व सुबक मांडणीची आवड असते. यांची घरातील वस्तूंची मांडणी आकर्षक असते. त्या बऱ्याच हौशी, रसिक व कलाप्रिय असतात. अगदी भारी नाही तरी किमती व सुंदर वस्त्रांची आवड असते. अधूनमधून वेणी, गजरे व दागिनेही घालतील. पण वागण्यात समतोलपणा व विवेक आढळून येईल. त्या बऱ्याच शिकलेल्याही आढळतात.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्राखाली येणारा वर्ग बराचसा बुद्धीजीवी, मध्यमवर्गीय असतो. सरकारी कार्यालये, बँका, विमा कंपन्या, न्याय खाते, रेल्वे, पोर्ट, ट्रस्ट, प्रवासी कंपन्या, खाजगी कंपन्यातील हिशोबनीस तसेच ऑडीट खात्यात काम करणारा वर्ग या नक्षत्राखाली येतो. त्याचप्रमाणे वकील, बॅरिस्टर्स, चार्टर्ड अकाउन्ट, सेक्रेटरी, शिक्षक व प्रोफेसर हा वर्गही येतो. खेडेगावातील मध्यम शेतकरी तसेच बातमीदार, प्रकाशक, छपाई खात्यात काम करणारा वर्गही येतो. काही वेळा दलाल व फिरते एजंटही येऊ शकतात.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री रवी शरीरप्रकृती व अधिकाराच्या योगाच्या दृष्टीने साधारण असतो. अधिकार मिळतात. कर्तव्य कर्तबगारी येते. तब्येत उत्तम असते.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री चंद्र असता सुडौल बांधा, देखणा, आनंदी, प्रसन्न, धनी, कुशल, शोधक, विद्वान, कायदेपंडित, पुराण व शास्त्रे जाणणारा, व्यवस्थित व नीटनेटकेपणे वागणारा असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री मंगळाला साधारण फळ आहे. रक्तन्यूनता, रक्तदोष, अशक्तपणा फार असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री बुध बुद्धीच्या मानाने साधारण असतो. थोडा अधिर बुद्धीचा, शोधक, उतावळा, विद्या व बुद्धी मध्यम व रोगट असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री गुरु असता सशक्त, अंगाने भरलेला, चेहरा सुंदर पण जरा ढिला असतो. उत्तरा भाद्रपदा नक्षत्री शुक्र सुखवस्तुपणाकडे जास्त कल देतो. हौशी, रसिक, लोकप्रिय, शृंगाराची आवड व थोडा बुद्धीमान असतो. रूप व धन यांना बरा ठरतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री शनीला बुद्धीमत्ता व शिक्षण यांच्या दृष्टीने अनुकूल असते. प्रकृती मध्यम व बरी असते. हे जातक बुद्धीवान, खोलवर विचार करणारे, व्यासंगी, चिकित्सक, चौकस, अभ्यासू असतात.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री राहू शरीरप्रकृतीला प्रतिकूल, पण बुद्धीला बरा असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री केतु हा आध्यात्मिक, पारमार्थिक, धार्मिक व तत्वज्ञान अशा गोष्टींना उत्तम. पण शरीर बांधा अप्रमानबद्ध व जरा आजारग्रस्त असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री हर्षल साधारण असतो. शरीरप्रकृती साधारण व बुद्धी आणि विद्याही मध्यम. या जातकांना नखरेलपणा, चैन, मजा यांची फार आवड आढळते.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री नेपच्यूनला बर्यापैकी अनुकूल आहे. शरीरप्रकृती बरी असते. चेहरा देखणा, भव्य पण उदासीनपणाची छटा जास्त असते. अंतर्ज्ञान, अंतःस्फूर्ती, आध्यात्मिक वेद, धार्मिक अध्ययन, तत्त्वज्ञान यांना फारच चांगला. पण समाधान, हर्षितपणा व प्रसन्नता कमी आढळते.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे व रेंगाळणारे असतात. थंडी, सर्दी, शीतविकार, हातापायाच्या तळव्यांना मुंग्या व घाम येणे, पोटाचे विकार, अपचन, केतू असता पोटात गॅसेस व वातशूळ होणे. शनी असता शैब्य व थंडी असता रक्तदोष, रक्तन्यूनता, रक्ताशय, राहू असता त्वचेचे रोग यांचा फार त्रास होतो. चंद्र-शनी युती असता दमा, कफ, रक्तदाबाचे विकार यांचा त्रास असतो.
उत्तरा भाद्रपदा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर मोठे पण वेडेवाकडे, फराटे जास्त असणारे असते. वळण कमी असते. नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती उत्तरेला गेलेली असते व कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाही. रत्न गुरूचा पुष्कराज किंवा शनीचा नीलमणी योग्य. या नक्षत्रावर ८ किवा ३ अंकाचे वर्चस्व आढळते.
मुहूर्त शास्त्रात उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सर्व शुभ कार्याला उत्तम आहे. या नक्षत्रावर घरे व देवळे बांधणे, राज्याभिषेक, नगर प्रवेश, बी पेरणे, नांगरणे, बाग करणे, शांतिकर्म, नवीन वस्त्र धारण करणे, अन्नप्राशन, उष्टावण, विवाह, अग्निहोत्रादी क्रिया, योगमुक्ती स्नान, औषधी वृक्ष लावणे, विहिर खणणे, द्रव्य देणे, ठेवणे. बारसे, नाक टोचणे, विद्यारंभ, घराचा पाया घालणे, खणणे, वधूप्रवेश, शेतकामास आरंभ यांना फारच चांगले.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)