
विषय : पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण पूर्वाफाल्गुनी नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील ११ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राची आकृती शय्येसारखी आहे. पूर्वा व उत्तराफाल्गुनी या चार ताऱ्यांचा मिळून चौकोन तयार होतो. या नक्षत्रामध्ये दोन तारे असून ते थोड्या पांढऱ्या व जरा फिक्कट आहेत. फाल्गुन महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते. मघाच्या कोयत्याच्या खाली या नक्षत्राचे तारे असतात. इंग्रजीमध्ये या नक्षत्राला ‘थीट लिओनीस’ असे म्हणतात.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचे ४ ही चरण सिंह राशीत असल्याने हे नक्षत्र एकपाद नक्षत्र आहे. हे अधोमुख, क्रूर, मनुष्यगणी व सुलोचनी आहे. नक्षत्र दैवत भाग्य देवता, नक्षत्र स्वामी शुक्र व राशी स्वामी सूर्य आहे. म्हणून या नक्षत्रात रवीचा मानीपणा व अधिकारलालसा व शुक्राचा रंगेलपणा यांचा मिलाफ दिसून येतो.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये सत्त्वरजमिश्रित गुणधर्म आढळून येतात. त्यात रजोगुण जास्त प्रमाणात असतात. पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेले जातक बुद्धीमान, धूर्त, व्यवहारकुशल, थोड्या आपमतलबी, गर्विष्ठ, चैनी, विलासी, ख्याली-खुशालीत दंग, भोगी, स्वच्छंदी, व्यसनी, प्रवासी वृत्तीच्या, फारशी महत्त्वाकांक्षा किंवा ध्येयहीन, पण शूर, पराक्रमी व धाडसी असू शकतात. पूर्वाफाल्गुनी हे नक्षत्र स्वतःच्या पराक्रमाने व कर्तबगारीने पुढे येणारे आहे.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र विशेषत: पाश्चात्य खेळ व कला यांना अधिक चांगले वाटते. उदा. बॉक्सिंग, क्रिकेट, टेबल टेनिस, स्विमिंग, ड्रायव्हिंग, बॅडमिंटन, विमानविद्या यात चांगले यश देते. बास्केटबॉल, विशेषतः या नक्षत्रात शुक्र किवा चंद्र असून त्याचा राहू किवा मंगळाशी शुभ योग असता हे निश्चित आढळून येते. त्यांच्या प्रत्येक हालचालीत आकर्षकता व सफाई आढळते.
पूर्वाफाल्गुनी जातक स्त्रियांना हे नक्षत्र फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रिया पुरुषी बांध्याच्या व जरा राकट, उफाड्याचे शरीर, थोड्या मर्दानी थाटाच्या आढळतात. कोमलपणा किंवा नाजूकपणा थोडा कमीच. स्वभावही थोडासा फटकळ, मानी, चैनी, रजोगुणी, खावे, प्यावे व मजा करावी असा असू शकतो. सेवावृत्ती कमी आढळून येते. घरापेक्षा बाहेर मिरवण्याकडे जास्त लक्ष असते. पुरुषांप्रमाणेच त्या धीट, धाडसी, पराक्रमी, कर्तबगार असतात.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे आरोग्यासाठी चांगले आहे. प्रकृती कणखर असते. हे जातक कधीही साध्या तापाने अंथरूणावर पकडलेले दिसणार नाहीत. यांना होणारे रोग थोडे दाहक स्वरूपाचे आहेत. उष्ण प्रकृती असल्याने अतिशय उष्णता होणे, डोळे जळजळणे, अंगाची लाही लाही होणे, डोके दुखणे, कापणे, भाजणे, खरचटणे, हाड मोडणे, जखमा, ऑपरेशन यापासून त्रास संभवतो. थोडी व्यसनाधीन प्रवृत्ती असल्याने अति मद्य सेवनामुळे पोटात कावीळ होणे, पित्त होणे, गुप्तरोग यापासून त्रास संभवतो. स्त्रियांना या नक्षत्रात चंद्र किंवा शुक्र असता पाळीच्या वेळी त्रास होऊ शकतो. यांना हृदयविकार संभवत नाही.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्राखाली इंजिनियर, यांत्रिक कामासंबंधी शिक्षण घेतलेला कुशल कामगार वर्ग, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स, सरकारी अंमलदार, रेव्हेन्यू अधिकारी, कस्टम ऑफिसर्स, पोलिस किंवा लष्करी खात्यातील लोक, कारखानदार, फॉरेस्टर किंवा बऱ्याच ठिकाणचा अंमलबजावणी खात्यातील वर्ग येतो. या नक्षत्राखाली जातकांचा अनुभव असा येतो की यांनी काम शासकीय किंवा अंमलबजावणीचे असले तरी त्यांना प्रत्यक्षपणे अधिकाराची जाग मिळत नाही.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री रवी पुष्कळ अनुकूल असतो. रवी असता या व्यक्ती फार मानी, गर्विष्ठ व थोड्या त्रासिक असतात. पण उच्चपदे, अधिकारयोग व कर्तबगारी यांना चांगला.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री चंद्र पुष्कळसा चांगला. उत्तम खेळाडू, आनंदी, शौकीन, ऐहिक सौख्य भोगणारा असतो. विद्या कमी ओढ असु शकतो.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री मंगळ असता शरीरप्रकृती उत्तम असते. शरीर वैशिष्ट्य दिसून येते. हाडापेराने मजबूत, पिळदार शरीराचे असते. स्वभाव फार तापट व भडक असतो. पण स्वपराक्रम, धाडस व कर्तबगारीने पुढे येतो. मल्लविद्या, लष्करी शिक्षण, इंजिनिअरग, शस्त्रक्रिया यांना मंगर चांगला, अधिकारयोग मिळतोच.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री बुध असता फारसे अनुकूल नाही. विद्या व बुद्धीनिष्ठतेकडे कमी ओढ असतो. थोडा स्वार्थी व काटकसरी असतो. नोकरी सामान्य प्रतीचीच मिळते.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री गुरु उत्तम असतो. शरीर प्रकृती बळकट व देहयष्टी भरदार असते. हाडापेराने मजबूत व सशक्त असतात. धन चांगले मिळते. मोठ्या अधिकाराच्या जागा मिळतात. प्रापंचिक ओढ जास्त असते. मात्र या नक्षत्रातील गुरुच्या व्यक्ती उदार किंवा उदात्त वृत्तीच्या नसून थोड्या स्वार्थीच असतात. संतती अल्प, पण होते.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शुक्र ऐहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला. तो पाश्चात्य कलांना फार चांगला. तो नीटनेटका व व्यवस्थित राहणारा असतो. फॅन्सी, पोषाख, वस्तू, अत्तरे, तेले, मोती, जवाहिरे, चैनीच्या वस्तू. छानछोकीपणा यांची फार आवड असते. खावे, प्यावे, मजा करावी व आयुष्यातील दिवस घालवावेत ही वृत्ती असते. बऱ्याच वेळा पुरुषांच्या कुंडलीत या नक्षत्रात शुक्र असता ते स्त्रियांचे द्वेषी असतात.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री शनि प्रतिकूल असतो. शरीरप्रकृती उत्तम असली तरी बांधा ऐटबाज नसून हाडाळ असतो. श्रम, कष्ट, धडपड, दगदग फार पडते.. त्यामानाने आवक कमी असते. अपयश फार असते. पैसा कमी मिळतो. संकटे व दुःखाचे प्रसंग फार येतात.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री राहू उत्तम प्रकारची शरीरप्रकृती देतो. या व्यक्ती शूर, पराक्रमी, धाडसी, कर्तबगार असून अधिकार भोगणाऱ्या असतात. मात्र चैन, विलास व बिघडलेला राहू असता गुन्हेगारीकडे प्रवृत्ती असते.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री केतू असता शरीर प्रकृती बरी पण इतर दृष्टीने मध्यम, त्यागी वृत्ती असते. दगदग, कष्ट फार व नोकरीच (सेवा) करावी लागते.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री हर्षल या नक्षत्रात शरीरप्रकृती बरी देतो पण जरा लहरी व विक्षिप्त व हेकेखोर असतो. गणित, इंजिनिअरिंग, विमानविद्या यांना चांगला.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नेपच्यून अंतर्ज्ञान, साक्षात्कार, गूढ विद्या, संशोधन, कला, ललितवाङ्मय यांना चांगला. चंद्र किवा शुक्र नेपच्यूनची युती फारच इष्ट असते.
पूर्वाफाल्गुनी नक्षत्री नक्षत्र पांढरे व फिक्कट असल्याने हस्ताक्षर बारीक उभट पण एका रेषेत व व्यवस्थित असते. नक्षत्रावर ६ या अंकाचे वर्चस्व आहे व शुक्राचा हिरा लाभदायक ठरतो. सुलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाही. काही वेळा प्रबल ग्रहयोग अनुकूल असल्यास उत्तरेकडे ती वस्तू सापडण्याची शक्यता असते. मुहूर्त शास्त्रामध्ये हे नक्षत्र मौली, विद्यारंभ, अष्टप्राशन, बाळंतिणीला स्नान घालणे अशा चांगले. अधोमुखी नक्षत्र असल्याने विहीर खणण्यास आरंभ करणे, द्यूत खेळणे यांना चांगले तसेच उग्र क्रूर नक्षत्र असल्याने थात, अग्निकर्म, विष शास्त्रादी प्रयोग यात यश मिळते.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)