ज्योतिष शास्त्राचे एक अंग : शकून ज्योतिष (Omen)


नमस्कार,

ज्योतोष शास्त्राचा विकास अनेक नानाविध शाखांनी व वेगवेगळ्या भविष्यवाणी करण्याच्या पद्धतींनी झालेला आहे कि भरपूर पारंब्या असलेला एक डेरेदार वटवृक्षच जणू, अडलेल्या पांतस्थाला शीतल सावली देत आहे. अशीच एक वैशिष्ट्य पूर्ण शाखा म्हणजे शकून आठवा संकेत शास्त्र. पूर्वीच्या काळी अनेक ज्योतिषाचार्य व आजही काही जाणकार हे मानतात कि एखादा प्रश्न मांडताना कान, दृष्टी सजग ठेवून शकून पाहणे आवश्यक आहे, जे निश्चित व स्पष्ट भविष्यवाणी करण्यामध्ये फार उपयोगी सिद्ध होतील, कारण शकून स्पष्ट सूचना देउन ज्योतिषास चांगले मार्गदर्शन करतात.

“प्रश्नज्ञान’ ग्रंथामध्ये भटोत्बळ म्हणतात की, अंतरीक्ष अथवा बाह्य शकूनाच्या द्वारे जी निश्चयकारी तत्व आहेत, चांगले अथवा वाईट भविष्य कथन केले जाऊ शकते. असेही लोक आहेत जे शकून पाहिल्या नंतरच काही मनोमन काही निश्चित करतील. जर खराब शकून असला तर विवाह, घर खरेदी ई. कार्य ते करीत नाहीत व पुढे ढकलतील.

वराह मिहीरचे असे सांगणे आहे की शकून हे पूर्व जन्मातील चांगले व वाईट कर्माचे परिणाम दर्शवित असतात. शकून अंधविश्वास नाही.

शकुनास इंग्रजीमध्ये Omen म्हणतात. हा एक विस्तृत विषय आहे, या मध्ये मविष्यवाणी करता फार नियमांची गरज नाही. जर एखादे वेळी शकुन आढळले, तर त्याचा अर्थ काढणे हे व्यक्तीवर अवलंबून राहते, म्हणून तो बुद्धीमान मात्र असावा.

याप्रीत्यर्थ काही उदाहरणे देतो-

१) एक दिवस एक गुरु जापल्या शिष्या बरोबर शकुन व ज्योतिषा बद्दल विचार विनीमय करीत होते, एक जण अचानक आला व एक अतिमहत्त्वाचा प्रश्न शिष्या समोर विचारायला संकोच करू लागला. शेवटी गुरूने आश्वस्थ केल्यावर तो म्हणाला – माझी बायको मला सोडून गेली व काही गुप्त कारणास्तव ती वेगळी रहाते. तिचे अनेक महिन्या पासून पत्र वा संपर्क नाही. मी अत्यंत दु:खी आहे. माझ्या वैवाहिक जीवनाबद्दल भविष्य जाणू इच्छितो.

जेव्हा तो आपले दुःख प्रकट करत होता, त्या वेळेस गुरुपत्नी रस्त्यावरील सार्वजनिक विहीरीवर बादली व दोर घेऊन पाणी भरण्यास गेली व त्याचे म्हणणे पूरे होण्यापूर्वीच आत आली व तिने सांगितले की, ती पाणी भरत असतानाच दोरी तुटली व विहीर मध्ये बादली पडली, तरी ती वर काढा.

गुरुनी शिष्यांना विचारले की हा शकून पाहून या माणसाच्या प्रश्नाबद्दल तुमचे काय सांगणे आहे. ते सावधानपूर्वक विचार करून भविष्य सांगा. अधिकांश विद्यार्थी बोलले की पती व पत्नीचे बंधन मंगळसूत्र असते. शकुना मध्ये दोरी तुटली याचा असा अर्थ निघतों की, मंगळसूत्र तुटले, म्हणून पत्नी परत येणार नाही. पती-पत्नीचे बंधन आता राहणार नाही.

परंतु एका शिष्याने वैगळाच अर्थ घेऊन भविष्य सागितले की, ज्याच्या म्हणण्यास गुरूंनीही दुजोरा दिला.

तो म्हणाला कि, माझ्या दृष्टीने पत्नी लवकर भेटणार आहे. पती-पत्नी एकाच परिवाराचे असतात व नेहमी सोबत असतात. दोरी व बादली ही बाह्य विरोधी शक्ती आहे, जी पाण्यास पाण्यापासून वेगळे करू पाहत होते.. वाईट काळ टळला आहे. म्हणून दोरी तुटून बादलीतील पाणी पुन्हा विहीरीतील पाण्यास जाऊन मिळाले आहे. म्हणून व्यक्तीचे ही वाईट दिवस संपले आहेत व याची बायको पुन्हा येऊन आपल्या परिवाराबरोबर राहील.

अश्या प्रकारे अनेक पर्याय प्राप्त होतात व त्यातून शहाणपणाने तात्पर्य काढावयास हवे. जर पाणी काढल्यानंतर दोरी तुटली असती आणि पाणी बाहेर सांडले असते, तर पाणी विहीरी पासून वेगळे झाले म्हणून पती-पत्नी वियोग असा शकून झाला असता.

२) एक व्यक्ती आपल्या मुलाचे लग्न एका मुली बरोबर निश्चित करु या नको अश्या उद्वीग्न अवस्थेत होता. तो एका ज्योतिषाकडे गेला व ते या संदर्भात चर्चा करीत होते, तेव्हाच एका पोस्टमनने येउन एक लग्न पत्रिका दिली. हे पाहून ज्योतिषाने काही विचार न करिता सांगितले की, जी मुलगी पाहिली आहे तीच नक्की करा. कारण कोणतेही विवाहाचे निमंत्रण शकुन विचारात लाभप्रद होत असते. त्याने समजाविले की जर पोस्टमनने असे पत्र दिले असते, ज्या मध्ये विवाहा करिता कुंडल्या तपासण्यासाठी असत्या, तर मी सांगितले असते की आणखी मुली पहा. परन्तु पत्र हे सांगत आहे, की लग्न नक्की झाले. व काही दिवसात योग आहे म्हणून मी सांगू शकतो, की मुलगी डोळ्या समोर आहे तिच्याशी विवाह नक्की करा. काही जाठवड्या नंतर हा विवाह नक्की झाला. दोघेही उत्तम वैवाहिक जीवन उपभोगीत आहे. कोणी विवाह ज्योतिषास विचारून करत असोत वा नसोत, वैवाहिक जीवन त्याचा भाग्यानुसार होत असते, व हेच शकुनाद्वारे दर्शवले जाते.

देव ही नेहमी ज्योतिषास खरे भविष्य वर्तविण्या बद्दल मार्ग- दर्शन देत असतो. तो ज्याला शकून देतो, त्याचे पूर्व जन्म सकृत्य असावे. फक्त ते ज्यानी पूर्व जन्म पाप केले असेल त्यांना या जन्मी प्रत्येक कार्यामध्ये विपरीत परिणाम मिळतील. एवढेच नव्हे तर तो जाणकार ज्योतिषी देखील चुकीचे अर्थ घेऊन, चुकीच्या गणना आधारे सांगितलेले भविष्य चूकीचे असेल.

तेव्हाच भविष्य नीट असतील जेव्हा की दोघांचा ही काळ चांगला चालला असेल. जर त्यांचा काळ विपरीत असेल, तर प्रत्येक गोष्ट उलट होईल व जातकासही शांती प्राप्त होणार नाही. म्हणून फक्त चांगले कर्मच चागले फल देतात. म्हणून ज्योतिषशास्त्र आम्हास चांगले कार्य करणा-यांची आठवण देते. त्यामुळे लाभलेल्या ज्ञानाचा योग्य तो उपयोग करावा.

गर्ग मुनींनि देखील शिका प्रश्न, पल्ली पतन, काकशकून ई.वर लिहिले आहे ते येथे देत आहे..

शिंका प्रश्न :

शिंकेचा आवाज ऐकू आल्यावर लगेच आपली सावली आपल्या पावलांनी मोजावी. जितकी पावलें होतील त्यांत १३ मिळवावे, आणि त्या बेरजेस ८ ने भागावें. बाकी १। २। ६ उरले तर लाभ, आणि ३।४।५।७।० उरले तर कार्य होणार नाहीं असें समजावें.

आसनावर, शयनस्थानावर, दान देतेवेळी, भोजनाचे वेळीं, डाव्या बाजूस किंवा पाठीमागे अशा सहा ठिकाणच्या शिंका शुभ मानल्या आहेत. आपण महत्त्वाची गोष्ट बोलत असतां कोणी शिंकले तरच प्रश्न पहावा. एका शिंकेपेक्षा अधिक शिंका एकाच वेळी आल्यास प्रश्न पाहू नये.

 दिशापरत्वें शिंकाफल :

पूर्वेची शिंक अशुभ, आग्नेयीची दुःखकारक, दक्षिणेची विपत्ती कारक, नैर्ऋत्येची शुभ, पश्चिमेची मिष्टान्न भोजन देणारी, वायव्येची धनदायक, उत्तरेची कलह कारिणी, आणि ईशान्येची शुभ, असें जाणावें. तसेंच स्वतः आपल्याला शिंक आली तर भीति, ऊर्ध्व (वर) झाली तर शुभ, आणि मध्ये झाली तर मोठें भय याप्रमाणें समजावें.

काकशब्द शकुन :

आपण एखादी महत्त्वाची गोष्ट बोलत असतां कावळा ओरडला, तर लगेच प्रश्न पहावा. तो असा कीं, आपली सावली पावलांनी मोजून त्यांत १३ मिळवावे आणि त्या बेरजेस ६ ने भागावें. शेष राहील त्याचें फळ – १ उरेल तर लाभ, २ खेद, ३ सौख्य, ४ भोजन, ५ धनलाभ आणि उरलें तर अशुभ जाणावें, असें गर्गऋषींचे मत आहे. कोणाच्या मस्तकाला काकस्पर्श घडेल तर त्यापासून धनचिंता, रोग किंवा कलह हीं उत्पन्न होतात. स्त्रियांच्या मस्तकाला काकस्पर्श होईल तर पतीला किंवा अपत्याला अनिष्ट होय. परंतु एखाद्या वृक्षाखालीं राहिलें असतां, शिजलेलें अन भक्षण करीत असतां किंवा दहीं इत्यादि पदार्थ घेऊन जात असतां काकस्पर्श घडेल तर मात्र दोष नाहीं. काकमैथुन दृष्टीस पडेल तर तें अत्यंत अनिष्ट होय. म्हणून त्याबद्दल शांति करावी असें शांतिग्रंथांत सांगितलें आहे.

नेत्रस्फुरण :

थोडा वेळपर्यंत थांबून थांबून जर डोळा लवत असला तरच प्रश्न पहावा. कधीं कधीं दोनतीन दिवस पर्यंत देखील एकसारखा डोळा लवत असतो. तो बरेचदा वातविकारानें लवत असतो. अशा वेळेस प्रश्न पाहूं नये. नेत्राच्या वरील पापण्या स्फुरण झाल्या तर मनाचें दुःखहरण किंवा धनप्राप्ति, भिवयांच्या मध्ये स्फुरण होईल तर प्रियाची भेट, नासिकाजवळची स्फुरण झाली तर रोग, अधरप्रांत स्फुरण झाल्यास अपजय, असें जाणावें. पुरुषाचा उजवा डोळा लवत असला तर हीं फळें घ्यावी. डावा लवत असला तर त्याच्या उलट फळें घ्यावी. तसेंच स्त्रियांचा डावा लवत असला तर शुभ, आणि उजवा लवत असला तर अशुभ होय असें जाणावें.

पल्लीपतन :

अंगावर पाल पडली तर सचैल (त्या वेळेस अंगावर जीं वस्त्रे असतील त्यांसुद्धां) स्नान करावें. आणि शंकराचे देवळांत जाऊन तुपाचा दिवा लावून ॐ नमः ‘शिवाय’ या षडक्षरी मंत्राचा अकराशें निदान १०८ जप करावा, म्हणजे दोष दूर होतो असे ग्रंथांत सांगितलेलें आहे.

शरीरस्थान परत्वें शुभाशुभ फलें :

मनुष्य प्रयाणास निघाला असतां जर अंगावर पाल पडली तर त्याची फळें खालीं लिहिल्याप्रमाणे समजावीं. अशुभ फल असतां प्रयाण करूं नये.

उजवें मनगट… धनक्षय. डावें मनगट… धनकीर्तिलाभ, नखें… धान्यलाभ. मुख… मिष्टान्नभोजन. केस….रोग.. दक्षिणपाद… मार्ग चालणे. वामपाद…बंधुनाश. पावलांचा मध्य… विनाश. पावलांचा अंत… रोग. स्तन दुर्भाग्य, उदर…. आश्रयप्राप्ति. दक्षिणबाहु… राजाश्रय. वामबाहु… राजक्षोभ, पाठ…….बुद्धिनाश. ढोंपर, पोटऱ्या… शुभ. दोन्ही हात… वस्त्रलाभ. खांदा… विजय, नाभि …बहुधन,. मांड्या…वाहनलाभ. ई.

तर असे हे शकून शास्त्र आजच्या ज्योतिषांनी त्यावर काळानुसार संशोधन करून, त्यातून काही चांगले निष्कर्ष हाती लागत असतील तर त्याचा सर्वांना उपयोगच होईल, असे मला वाटते.

ज्योतिष मित्र मिलिंद

संपर्क : ७०५८११५९४७

(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

4 thoughts on “ज्योतिष शास्त्राचे एक अंग : शकून ज्योतिष (Omen)

    1. Pallu Patil कृष्णमूर्ती खंड, ज्योतिरमयुख यामध्ये ही माहिती दिली आहे, पण विस्तृत माहिती हवी असल्यास “प्रश्नज्ञान’ हा भटोत्बळ यांचा ग्रंथ, गर्ग मुनी, वराहमिहीर या जुन्या ज्योतिष धुरांधरांचे मूळ ग्रंथ उपलब्ध करुन वाचावे लागतील. जे अत्यंत दुर्मिळ आहेत व मिळणे सहजसाध्य नाही.

      Like

Leave a comment