नाम आणि नाम स्मरण


नमस्कार,

आज आपण नाम व नामस्मरण या विषयावर थोडा उहापोह करणार आहोत.

परमशक्ती मिळवण्याचा रामबाण मार्ग म्हणजे नाम, असे सर्व प्रमुख धर्मात समजले जाते. मात्र धर्मातील या धनुष्याला कल्पनेचे किंवा प्रत्यक्ष असे फुलांचे बाण लावलेले असतात. आणि नको त्या गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. असो.

नाम हा शब्द ‘नम्’ धातूपासून तयार झाला आहे. संपूर्णपणाने योग्य वस्तूपाशी नमणे वा शरण जाणे, हे नाम. नाम घेणे याचा अर्थ फक्त प्रत्यक्ष उच्चार करणे असा अर्थ होत नाही, तर मोठ्या अर्थाने नमणे, असा तो अर्थ आहे. नमण्याची क्रिया म्हणजे मूलतः मन अहंकारमुक्त करण्याची क्रिया असते. त्यासाठी एखादी श्रेष्ठ शक्ती मनात आठवायची किंवा उच्चारायची.

त्याच्या पातळ्या म्हणजे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. उतरत्या मोजणीने या पायऱ्या अशा :- (१) मानसिक आठवण (२) मनाच्या डोळ्याने पाहणे (३) उच्चार आणि अनुच्चार याच्या मधली अवस्था, पुटपुटणे (४) प्रत्यक्ष उच्चार.

‘विचारपूर्वक शब्द’ हा मेंदूशास्त्रा प्रमाणे डाव्या भागाशी संबंधित आहे. पण शब्दशून्य मनकल्पना, हा उजव्या मेंदूचा भाग आहे. साधारणतः त्या भागावरच, नाम घेणारे लोक, टिळा लावतात. दुःखी किंवा भांबावलेला माणूस, शब्दासह किंवा शब्दातीत अवस्थेत डोके धरून बसतो, तेव्हा मेंदूतल्या त्याच शक्तीचे संतुलन होते.

अहंकार सोडून आपल्यापेक्षा उच्च अशा प्रतीकासमोर नम्र होणे, ही नामशक्ती घेण्याची खुबी आहे. त्या खुबीतूनच नामशक्तीचा फलस्वरूप म्हणजे आपल्या आत्मशक्तीचे पोषण. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाही, असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. अंतरंगात नाम आणि आपले कर्म असा अंतर्बाह्य समतोल मात्र त्यासाठी आवश्यक आहे.

सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तित्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते. आपल्या मनातील विकारांचे उच्चाटन करण्यासाठी नामसाधना अत्यंत प्रभावी आहे. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो. अहंकार नाहीसा झाला म्हणजे संकुचितपणाही नाहीसा होतो.

नामस्मरणाचे महत्व अनेक संतांनी सांगितले आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे हरिपाठाचे अभंग लिहिले त्यातही त्यांनी ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ असे म्हटले आहे. वास्तविकत: सर्वच संतांनी नाम महात्म वर्णन केले आहे. ,‘नामस्मरण’ म्हणजे ‘ईश्वर शक्तीचे वारंवार स्मरण’ करणे होय. रोजचे काम करताना मुखी नाम असावे म्हणजे कर्म नकळत सुकर्मात बदलायला लागते. नाम आणि रूप यांच्या संबंधातील अन्योन्यता संतांच्या अभंगांमध्ये दिसते.

नामस्मरणात मनाला विषयापासून दूर ठेवले जाते. भरकटणारे मनाची बाहेरची ओढ आत वळते. नाम एका बाजूला षड रिपूंचे हरण करते, तर दुस-या बाजूला नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा मनोमय कोश शुद्ध करते. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रकाश आणि अंधार यांचा सिध्दान्त असे सांगतो की, अंधार ही संकल्पना स्वतंत्रपणे नाहीच. प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजेच अंधार. नामाचे महत्त्वदेखील प्रकाशासारखेच. त्याची अनुपस्थिती म्हणजेच अज्ञानरुपी अंधार. नामस्मरणाने स्वभावात प्रेमळता, स्नेह, आस्था, जिव्हाळा या भावना वाढीस लागतात. विचारांत सर्वसमावेशकता येते.

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात-

वेद अनंत बोलिला,

अर्थ इतुकाचि साधिला।

विठोबासी शरण जावे,

निज-निष्ठे नाम गावे।।

या तुकारामबुवांच्या अभंगात वेदांनी सांगितलेला नाममहिमा विस्ताराने येतो. वेदांचे सार हेच परमेश्वराचे नाम आणि सर्व वेद ईश्वराच्या नामाचे व्यापकपणे चिंतन मांडताना, तुकारामबुवांनी केलेली मांडणी विचारांना चालना देते.

सदगुरूंकडून मिळालेले नाम हृदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरसमीप नेते.

सद‍्गुरूंकडून मिळालेले नाम, नामस्मरणाची क्रिया, सदाचरण आणि सत्संग ही नामस्मरणाची पंचांगे मानली जातात. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा.

ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो.

सिद्धयोगातही नामस्मरणाची गरज वर्णिली आहे. योगप्रक्रियेत जेव्हा विघ्न येऊ लागतात, तेव्हा दीर्घ प्रमाणात प्रणवाचा अथवा गुरूने सांगितलेल्या नामाचा जप केला पाहिजे. पुढे तर श्वासावर नाम चालवणाऱ्या व्यक्तींना ‘अजपाजप’ साध्य होतो; त्यामुळे त्या व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैत्यन्यरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो.

एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी आपल्या अंतर्मनास जाग आणण्याचे काम नाम करते. हेच वेद-पुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळया शब्दांत वर्णिले आहे. त्या निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप व्हायचे असेल तर आपण आपल्या गुण अवगुणांपासून अलिप्त राहून आपल्या अहंकाराची साथ सोडायला हवी. तर आणि तरच सोहम ची म्हणजे तो परम आत्मा माझ्या आतच दडलेला आहे याची अनुभूती येईल. आणि परमानंद प्राप्तीचा मार्ग मोकळा होईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

6 thoughts on “नाम आणि नाम स्मरण

Leave a reply to Jyotsna J. Cancel reply