मुखसामुद्रिक शास्त्र (FACE READING) : चेहरा वाचाल तर वाचाल


नमस्कार,

आपला चेहरा हा स्वभावाचा आरसा मा नला जातो. न बोलताही चेहरा बरेच काही सांगून जातो. आपल्या नेहमी सहवासात असलेल्या व्यक्तीची चेहऱ्यावरची रेघ आणि रेघ आपल्याला माहित असते. थोडासा झालेला बदल देखील त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, याचा अंदाज देऊन जातो. चेहरा ओंजळीत लपवला, तर तो लाजण्यासाठी कि रडणे झाकण्यासाठी हे आपण सहज ओळखून जातो. हे झाले जवळच्या व्यक्तीबाबत. पण समाजातील अशा अनोळखी, बहुरूपी बहुविध चेहर्यांचा देखील अभ्यास करून सूक्ष्म निरीक्षणे नोंदली गेली आहेत. देहबोलीचाच हा एक भाग आहे.

दोन व्यक्ती अगदी अपवादात्मक एकमेकांसारख्या दिसतात. प्रत्येकाची रचना वेगळी, ठेवण वेगळी, दोन डोळे, दोन कान, एक नाक व दोन ओठ ह्यांच्या अब्जावधी रचना होऊनही जगात दोन व्यक्ती सारख्या दिसत नाहीत हे विधात्याचे केवढे कौशल्य आहे. आणि चेहऱ्यावरून प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव कळतो हे अजून आश्चर्यकारक आहे.

अर्थातच देश-प्रदेश, काळ याप्रमाणे मुखसामुद्रिक शास्त्र सापेक्ष फलिते वर्तवीत असते. व्यक्तीचा जसा स्वभाव असतो, त्याप्रमाणेसुद्धा तिचा चेहरामोहरा, अंगकाठी, अंगकांती इत्यादींवर परिणाम होतो. भारतीय संशोधक देखील या बाबतीत मागे नाहीत. भारतीय व्यक्तिपुरता पूर्वजांनी ह्या नोंदवलेल्या निरीक्षणातून व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूंव्दारे स्वभावदर्शन होऊ शकते हे आपल्यासमोर ठेवत आहे. हे वर्णन वाचून कोणत्याही व्यक्तीबद्दल समाज गैरसमज करून घेऊ नये. व्यक्तिमत्व घडण्यास अनेक घटक कारणीभूत असतात हे ध्यानात ठेवावे.

आपल्याकडे पुरुषाची सरासरी उंची साडेपाच फूट व स्त्रीची सरासरी उंची पाच फूट धरतात. अति उंच व्यक्ती शांत प्रवृत्तीच्या, फार महत्वाकांक्षा नसलेल्या, कोणताही निर्णय सावकाश घेणाऱ्या असू शकतात. तर अत्यंत बुटक्या व्यक्ती शीघ्रकोपी, जबरदस्त महत्वाकांक्षी, कर्तबगार, सावधचित्त, दुसऱ्यावर हुकूमत गाजविणाऱ्या असू शकतात. व्यक्तीमत्वातील खुजेपणा त्या कर्तबगारीने भरून काढतात. एकंदरीत उंच व्यक्तीपेक्षा बुटक्या व्यक्तीच जास्त कर्तृत्ववान आढळून येतात.

कृष्णवर्णाच्या व्यक्ती निराश वृत्तीच्या, पापभिरू, कोठेतरी पक्की श्रद्धा ठेवणाऱ्या असू शकतात. तर गोऱ्यापान व्यक्ती फटकळ, अहंकारी, कमी मित्र-मैत्रिणी असलेल्या आढळतात. त्यातल्या त्यात तांबूस गौरवर्णी असलेल्या व्यक्ती तर फारच शिष्ट असू शकतात. क्षुल्लक चुकीलासुद्धा त्या क्षमा करीत नाहीत. सावळ्या रंगाच्या व्यक्ती मनमिळावू , प्रणयी स्वभावाच्या, रसिक आढळतात.

डोक्यावरील दाट कुरळे केस कलाकार मनाचे लक्षण असते. अति कुरळ्या केसांच्या व्यक्ती कामुक असू शकते. ज्या व्यक्तीच्या डोक्याच्या मागील बाजुचे केस उभे राहतात ती अत्यंत चतूर, हजरजवाबी, जागरूक, हिशोबी आढळते. विरळ केसांच्या व्यक्ती काळजी करणाऱ्या, गंभीर वृत्तीच्या, क्वचित कमनशिबीही असू शकतात.

कानाच्या बाजूचे केस व बाकीचे टक्कल असलेल्या व्यक्ती विनोदी, गमत्या स्वभावाच्या व उतार वयापर्यंत शरीरसुखाचा हव्यास असणाऱ्या असू शकतात. कोणत्याही गोष्टीकडे फार गंभीरपणे पहाणे त्यांना जमत नाही. कपाळ भव्य, परंतु मध्येच फुगीर असलेल्या व्यक्ती चांगल्या गोष्टींवर प्रेम करणाऱ्या व वाईट गोष्टींपासून कटाक्षाने दूर रहाणाऱ्या, करारी स्वभावाच्या, भाग्यवान असतात, अति भव्य कपाळ असलेली स्त्री सुलक्षणी, जोडीदाराला भाग्यवर्धक व सौभाग्यशाली असते.

कपाळाचा आकार खूप लहान व उतरता असलेल्या व्यक्ती खडतर नशीब असलेल्या, अपयशी व त्यामुळे वैतागलेल्या आढळतात.

कानाच्या पाळ्या चेहऱ्याला घट्ट चिकटलेल्या असल्यास व्यक्ती कमालीची हट्टी, कोणावरही विश्वास न ठेवणारी, छळवाद करणारी, शंकेखोर, गलिच्छ विचारसरणीची असू शकते, तर कानाच्या पाळ्या चेहऱ्यापासून काटकोनात असणाऱ्या व्यक्ती भोळसट, बडबड्या, निष्पाप असतात. कानाचा आकार वरून मोठा असून खाली अरुंद, चिंचोळा होत जाणाऱ्या व्यक्ती बहुश्रुत, हुशार, ग्रहणशील असतात.

कान चेहऱ्याच्या मानाने फारच लहान असता, व्यक्ती बेरक्या स्वभावाची असते. श्रवणशक्ती तीक्ष्ण असून, स्वभावात लुच्चेपणा असतो.

डोळे मोठे व बटबटीत असणारी व्यक्ती अत्यंत निरुपद्रवी, आळशी, तसेच अल्पबुद्धी असू शकते, तर डोळे चेहऱ्याच्या मानाने फारच लहान असता संधिसाधू, कारस्थानी आढळते. काळेभोर, मासोळीसारखे डोळे प्रेमळ, निष्कपटी स्वभाव दर्शवतात. घारे डोळे (विशेषत: हिरवट झाक असलेले) कंजुषवृत्ती, कपटीपणा, छद्मीवृत्ती, नास्तिकता, कमालीचा लोभी व स्वार्थी स्वभाव दर्शवतात. निळसर अगर गर्द निळे डोळे पारंपारिक अभिमान, प्रखर ध्येयवाद दर्शवतात, एखाद्या गोष्टीसाठी अगर तत्वासाठी त्या वाट्टेल तो त्याग करतात, ज्वाज्वल्य अभिमान असून निर्भिड वृत्ती आढळते.

केसरी रंगाचे डोळे दुर्मिळ असून, अंतःस्फुर्तीचे कारक असतात. अशा व्यक्ती स्वप्नाळू असून त्यांच्यात दैवी शक्ती असू शकते. त्यांना वाचासिद्धी असू शकते. त्यांना सूचक स्वप्ने पडतात. संधिकाळी त्यांच्यात शक्तीचा संचार होतो व त्या अगोदर पाहू शकतात, सांगू शकतात, त्यांच्या आयुष्यातही त्यांना आश्चर्यकारक दैवी साक्षात्कार होतात. लाल रंगाचे डोळे तापट व व्यसनी स्वभावाचे कारक असून उष्णतादर्शक असतात. ह्या व्यक्ती जुलुमी स्वभावाच्या असतात. निस्तेज डोळे पराक्रमशून्य, निराश वृत्तीचे, रोगट शरीराचे निदर्शक असतात..

लांबसडक व कुरळे दाट केस असलेल्या स्त्रिया अतिशय हौशी, रसिक, चारित्र्यवान असून लोकप्रिय असतात. त्या उत्तम संसार करतात व जोडीदाराला सर्वार्थाने सुखी करतात. त्या स्त्रियांच्या स्वभावात विनय, नम्रपणा असूनही शृंगारकला असते. म्हणूनच अशी ‘लंबकेशा’ स्त्रियांच्या स्वभावात आज्ञाधारक सून, आवडती वहिनी, तसेच मोहक पत्नी असते, अशी स्त्री अत्यंत सद्गुणी असते. अति कुरळे परंतु तोकडे केस असलेली स्त्री कामुक वृत्तीची व सुखोपभोगाकडे कल असलेली आढळते.

दोन भुवयांच्या मध्ये केस असलेली व्यक्ती उतारवयात खूप श्रीमंत, परंतु उधळी बनते. लांब पोपटी नाक असलेल्या व्यक्ती आढ्यताखोर, अति मानी परंतु कर्तबगार असतात. सर्वांनी त्यांना मान दिल्यास त्या खूष असतात. दुसऱ्यांना आपल्या तालावर नाचवणे त्यांना जमते व आवडते.

आखुड व पसरट नाकाची मंडळी शामळु, आत्मविश्वास कमी असलेली असतात. सरळ व नाजूक (चाफेकळी) नाकाच्या व्यक्ती हौशी, यशस्वी व सत्शील वृत्तीच्या असतात. नाकाच्या मानाने नाकपुड्या फेंदारलेल्या, मोठ्या असल्यास स्वभाव चिडका, पोकळ डौल अगर भपका दाखवण्याचा असतो.

अति स्थूल व्यक्ती तडजोड करणाऱ्या, फारशा कोणाच्या भानगडीत न पडणाऱ्या, आळशी स्वभावाच्या असतात. तर अत्यंत कृश व्यक्ती संशयी स्वभावाच्या, क्वचित चहाडखोर, चिडचिड्या स्वभावाच्या असतात. अति स्थूल व्यक्ती तडजोड करणाऱ्या का असतात हथाला एक गमतीदार कारण देतात. ते म्हणजे त्यांना मारामारी करता येत नाही व पळताही येत नाही. काही अति कृश व्यक्ती कपटी स्वभावाच्या आढळतात.

आपल्याही माहितीत अशी काही निरीक्षणे असतील तर कॉमेंट मध्ये जरूर लिहा, जेणेकरून सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल.

ज्योतिष मित्र मिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

5 thoughts on “मुखसामुद्रिक शास्त्र (FACE READING) : चेहरा वाचाल तर वाचाल

Leave a reply to Suvarna Halande Cancel reply