महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा


महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा

महाशिरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

सत्य हे शिव आहे व शिव सुंदर आहे.
महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशीला साजरी केली जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व जे अव्यक्त दिव्यत्वाचे तेज आहे ते मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीतलावर अवतीर्ण होते.

म्हणून या दिवशी भगवान शिव प्रसन्न व्हावेत यासाठी भक्त जन पूर्ण श्रद्धेने उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना, साधना, ध्यान ई. करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करतात अशी या मागची धारणा आहे.

महाशिवरात्री विषयी पुराणातील काही आख्यायिका, कथा पूर्वापार प्रसिद्ध आहेत.

काही पुराणांनुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते.

काही पुराण अभ्यासक सांगतात की

समुद्र मंथन समयी राक्षस आणि देव यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या मंथनात प्राप्त झालेला सगळा ऐवजाची समान वाटणी करण्यात आली होती. पण अमृत कोणी घ्यायचं यावरून, वाद विकोपाला पोचला होता. कारण हे अमृत जो कोणी प्राशन करेल तो कायमचा अमर होणार होता. परंतू समुद्र मंथनातून अमृत बाहेर काढत असतांना सुरवातीला विष बाहेर पडून सगळीकडे पसरत होते. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते, शेवटी हे सगळे भगवान शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष स्वतः पिऊन आपल्या गळ्यात थोपवून ठेवलं, त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकर नीळकंठ म्हणून प्रसिद्ध पावले. शंकरांनी स्वत: सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्र प्रकाशात म्हणजेच त्या रात्री शंकराचे गुणगान गायले गेले, म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात.

या महाशिवरात्री संबंधी अजून एक कथा सांगितली जाते

एकदा ब्रह्मा आणि विष्णू हे दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड कोलाहल निर्माण झाला. हे भांडण वाढत खूप विकोपाला गेले. सगळे देव चिंताग्रस्त झाले व त्यांनी शंकराच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा भगवान शिव एका मोठ्या अनादि अनंत पिंडीच्या स्वरुपात प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णू हे महाकाय रूप पाहून गोंधळून गेले. तेव्हा ब्रम्हदेवाने सुरवात शेवट शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यानंतर विष्णू ने हंस रूप धारण करून पिंडीची सुरवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. तो ही व्यर्थ ठरला. शेवटी दोघांनी त्या पिंडी समोर हात जोडले व शरण गेले. हात जोडताच त्यातून ऊॅं ध्वनी ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्म आणि विष्णू यांच्या लक्षात आले की, पिंडीच्या उजव्या बाजूला आकार, डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्फटीकाच्या रुपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची अनन्य भावाने पूजा करू लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रुपात माघ वद्य चतुर्दशीला प्रकट झाल्याने या रात्रीस महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते.

तर या लेख लिहिण्याचे प्रयोजन एवढेच की, अनादि अनंत असे हे अव्यक्त दिव्यत्व असे शिवतेज जो या सृष्टीचा परम आत्मा आहे तोच मात्र केवळ एक सत्य आहे बाकी सर्व नश्वर गोष्टी ही माया आहे. मग अहंकार कशाचा बाळगायचा? त्यामुळे महाशिरात्रीनिमित्त मात्रे का होईना त्या परम सत्यास शरण जावे व अनन्य भावाने अध्यात्मिक प्रगती वा मोहापासून मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी आराधना करावी.

सत्य हे शिव आहे व शिव सुंदर आहे.

सत्यम शिवम सुंदरम 🙏🏻

महाशिरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

4 thoughts on “महाशिवरात्री साजरी करण्यामागील आख्यायिका व पौराणिक कथा

Leave a reply to Pradeep Ravande Cancel reply