अध्यात्म आणि अध्यात्मिकता


अध्यात्म आणि अध्यात्मिकता

काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र. हे दृष्य विश्व पंचमहाभूतांचे आहे. पृथ्वी, आप (पाणी), तेज (उष्णता), वायू, आकाश, या पंचभौतिक प्रकृतीत तीन गुण १) सत्व,२) रज, ३) तम यांची मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली. प्रत्येक प्राणी मात्रांचे शरीर ह्या अष्टधा प्रकृतीने बनलेले आहे. शरीर हे जड (जे डोळ्यानां दिसते) आहे. परमात्मा अजड आहे (अदृष्य आहे, जो चराचरात भरला आहे, प्रत्येक प्राणीमात्रांच्या ह्रदयात आहे ज्याची या जगावर सत्ता आहे तो परमात्मा, ईश्वर) त्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म.
अधि म्हणजे बुद्धी. बुद्धी आत्म्याकडे वळवणे म्हणजे अध्यात्म. देह बुद्धीच्या पलीकडे जाऊन स्वानंद मिळवणे म्हणजे आध्यात्म. देह बुद्धी विसरणे म्हणजे देह विसरणे नव्हे तर एक प्रकारे देहाच्या अनावशक क्रिया विसरणे. परमेश्वर निर्मित सृष्टी रचना व नियम (जन्म, मृत्यू, संकटे, आनंद, दु:ख ई) समजून चित्त शांत व स्थिर करुन भौतिकतेकडे ओढ असलेली मनोवासना नियंत्रित करणे हे अध्यात्म शिकवते.
अध्यात्म- ‘अधि आत्म’- म्हणजे स्वतकडे पाहणे. अर्थातच आत्मपरीक्षण. ऐहिक गोष्टींपेक्षा मोठे काहीतरी, परिपूर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काही आहे याचा विचार आणि एक ‘पूर्णत्वा’ची आस निर्माण होणे. त्याचा वेध घेऊन त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय, कार्य काय, हे शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता.
मनात चांगल्या विचारामुळे चांगल्या इच्छा निर्णाण होतात ज्या मनाला समाधान देतात. मनुष्य चुकीचा विचार करून, चुकीच्या मार्गाने जाऊन अनावश्यक चिंता ओढावून घेत असतो. नि:शंक व निर्भय मन शरीराला पुरेशी झोप / ताकद / आरोग्य देते. भीती फक्त मनात असते. नि:शंक निर्भय होण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म. प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता, काळजी आहेच. ती मनाची तगमग थांबवण्याचे शास्त्र अध्यात्म. हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे.
अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचा भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव वा शक्ती असते हे आध्यात्मिक माणूस मानेलच असे नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात. धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी धार्मिकता, धर्मश्रद्धा ही आध्यात्मिकता वाढवणेसाठी फ़ायदेशीर होऊ शकते.

आजच्या संघर्षमय जीवनात, मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे. सभोवताली अनेक भौतिक प्रलोभने, जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटाकुटीस येतो. मनात निर्माण होणाऱ्या चिंता, विषाद, एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वाचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टींप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो हे आत्तापर्यंतच्या विविध शास्त्रीय संशोधनातून क्षात आले आहे.
अध्यात्माकडे कल असलेल्या व्यक्तीच्या मेंदूतील मज्जातंतूंच्या जाळ्यात बदल होतात. अंत:स्राव करणाऱ्या संस्था आणि प्रतिकारशक्ती यांमध्ये अनुकूल बदल घडतात. त्यामुळे त्या व्यक्तीचे रोगांपासून, शारीरिक आणि मानसिक संरक्षण होते. विषादाच्या मनोविकाराचा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामना केला तर उदासी कमी होते. आयुष्यात समाधानी असलेला आणि ‘आपल्या जीवनात काही शुद्ध हेतू आहे’ असे मानणारा कमी निराश होतो.
कॅन्सर, हृदयरोग सारख्या विकाराचा सामना करताना किंवा मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेतून बरे होताना जी अति चिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी आध्यात्मिकतेचा उपयोग होतो. मानसिक विकारांची रुग्णाकडून माहिती घेताना त्याचा धार्मिक, आध्यात्मिक दृष्टिकोन समजून घेणे दिवसेंदिवस महत्त्वाचे बनले आहे. मानसिक उपचारांमध्येदेखील आध्यात्मिकतेचा उपयोग केला जाऊ लागला आहे.
देऊळ, देवळातले वातावरण, भजन-कीर्तन, नामस्मरण, चर्च- मशिदीतील वातावरण या सगळ्याचा आध्यात्मिकता वाढण्यासाठी उपयोग होतो. प्रार्थनेत, निसर्गाच्या सान्निध्यात अंतर्मुख करण्याची, लीनता निर्माण करण्याची, विनम्र भाव निर्माण करण्याची शक्ती असते. मोठय़ाने उच्चारलेले मंत्रोच्चारण, ठेक्यात आणि तालात एकत्र म्हटलेले भजन, चर्चमध्ये गायली जाणारी ईशस्तुती, प्रवचन या सगळ्यातून अमाप मनशांती आणि समाधान मिळते.
आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते. मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते. नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या कालाविष्कारांतूनही आध्यात्मिकता व्यक्त होते. एक अवर्णनीय मानसिक शांती प्राप्त होते. येणारी अनुभूती स्वतचा शोध घ्यायला लावणारी असते.
अशी अनुभूती मनाला उभारी देते, भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते.
आपल्याकडे संतसाहित्यही आध्यात्मिकतेतून मनाचा विचार मांडताना दिसते.
समर्थ रामदासांनी तर ‘मनाचे श्लोक’ लिहिले. आपले दुख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतपलीकडचा व्यापक विचार करण्याचा एक उत्तम परिपाठच.
II मना मानसी दुख आणू नको रे II II मना सर्वथा शोक चिंता नको रे II
II विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी II II विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी II
माझ्या अल्पबुद्धीनुसार घेतलेला हा अध्यात्मिकतेचा बोध. आपण आपला आत्मशोध घेऊन समाधानी व्हावे ही सदिच्छा…

– ज्योतिषमित्रमिलिंद

ज्योतिष सल्ला व मार्गदर्शनासाठी (सशुल्क) संपर्क : 7058115947(whatsapp only)
contact@jyotishmitramilind.in
jyotishmitramilind.in

4 thoughts on “अध्यात्म आणि अध्यात्मिकता

Leave a reply to तुकाराम गर्ग जोधपूर राजस्थान Cancel reply