Category: Uncategorized

श्रवण नक्षत्र विचार


विषय : श्रवण नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण श्रवण नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

श्रवण हे नक्षत्र चक्रातील २२ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘आद्वेर’ असे म्हणतात. नक्षत्राचे ४ ही चरण मकर राशीत असल्याने ते चतुष्पादी आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्व आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र, राशीस्वामी शनि व दैवत विष्णू असल्याने या नक्षत्रात चंद्राचा आल्हादपणा, शनीची कष्ट करण्याची वृत्ती व भगवान विष्णूचा शहाणपणा व मुत्सद्दीपणा या सर्व शुभ गुणाधर्माचा सुरेख मिलाफ दिसून येतो.

श्रवण नक्षत्राचे तीन तारे असून ते आडव्या रेषेत आहेत. त्यातील मधला तारा हिरवा असून अतिशय तेजस्वी व प्रखर आहे. हाच श्रावणातला योग तारा होय. मध्यभागी बाळ श्रावण होऊन दोन्ही बाजूचे दोन तारे म्हणजे कावडीत असलेले आई-वडील होत अशी कल्पना आहे. या नक्षत्राच्या जरा उत्तरेला तेजस्वी अभिजित व मागे हंस पक्ष्याचा पिसारा आहे. या भागाला स्वरमंडळ म्हणतात. या नक्षत्रालाच गरूड असेही म्हणतात.

‘बाळ श्रावण, तू बोलत का नाहीस? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही.’ श्रावणचे वडील दशरथ राजाला विचारीत होते. नाइलाजास्तव दशरथांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. शोकाकूल मातापित्यांनी पाणी न पिता. प्राण सोडला. पण दशरथ राजाला ‘तूही असाच पुत्रशोकाने मरण पावशील’ असा शाप दिला. रामायणातील ही कथा माहीतच आहे. यात श्रावण नक्षत्राला शाप आहे. ज्याचे चंद्र नक्षत्र, रवि नक्षत्र किंवा लग्न बिंदू श्रवण नक्षत्रात असतो त्यांना काही तरी दुःख असतेच. बाहेरून या व्यक्तींनी आपण कितीही सुखी आहोत असे दाखविले तरी अंतर्यामी त्या दुःखी असतातच. तसेच श्रवणाचा माणूसही रागावला की शाप देणारा असतो व तो बाधतो.

श्रवण नक्षत्र ऊर्ध्वमुख चर व सुलोचनी आहे. हे नक्षत्र देवगणी असून त्यात अतिशय सत्त्वगुण आहेत. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सदाचारी, ईश्वरभक्त, धार्मिक, सच्छील, विद्वान, परोपकारी, सेवावृत्तीच्या, दयाळू, श्रमिक, कष्टाळू, आज्ञाधारक, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, दुसऱ्याचे हित पाहणाऱ्या, थोड्याशा हट्टी व एकनिश्चयी असतात. तसेच समयसूचक व कुटुंबवत्सल असतात.

श्रवण नक्षत्र पुरुषांना बरेच अनुकूल आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक मध्यम उंच, जरा आडवे, थोडा अप्रमान्बाद्ध बांधा, हाडे रुंद व जरा मोठी, शिरा मजबूत, काटक, चेहरा जरा निमुळता, सर्व सांध्यातील हाडे मोठी, अंगावर मध्यम मांस असे असतात. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारक शक्ती बरी असते. हे पुरुष जातक दिसायला सुंदर असून तेजस्वी व साधुपुरुषांसारखे दिसतात. स्वभाव शांत पण निश्चयी, चिकित्सक, शोधक, श्रम, कष्ट, दगदग यांची आवड असणारा दूरदर्शी, संयमी, धीमा, व्यवहारी, समयसूचक, उदार, धार्मिक, पौराणिक व कर्तव्यनिष्ठ असतो. हे नक्षत्र सांपत्तिकदृष्ट्या व अधिकाराच्या दृष्टीने मध्यम आहे. स्वपराक्रम व स्वकर्तृत्वाने हे जातक उच्च पदाला जातात.

श्रवण नक्षत्री जन्मलेल्या स्त्रियांनाही हे नक्षत्र रूप, गुण, बुद्धी व धन यांच्या दृष्टीने बरेच अनुकूल आहे. या नक्षत्रावरच्या स्त्रिया तशा सुंदर असतात. बांधा मध्यम, उंच, आडवा, जरा बेढब, हाडपेर मोठे व रुंद, मजबूत असते. अंगावर थोडे मांसही असते. थोडी प्रमाणबद्धताही असते. चेहरा जरा वाटोळा व निमुळता असतो. हसणे मोहक असते. चेहरा शांत, आनंदी, प्रसन्न व समाधानी असतो. मात्र चेहरा सुंदर असला तरी चेहऱ्यावर जरा प्रौढपणा व विरक्तपणा असतो. अगदीच साधेपणा किंवा अवखळ फॅशनची आवड नसून देहाला शोभेल अशीच वस्त्र व अलंकार यांची आवड असते. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा आवडतो. तसेच वागणे व स्वभावही नम्र, विनयशील, आज्ञाधारक व सेवावृत्तीचे असते. तसेच त्या श्रमिक, कष्टाळू, धडपड्या व व्यवहारकुशल असतात. संसारी व कर्तव्यदक्ष असतात. त्या धार्मिक असून त्यांना देवाधर्माची बरीच आवड असते. त्या नोकरी करणाऱ्या असल्या तरी श्रावणी सोमवार करणाऱ्या, मंगळागौर पुजणाऱ्या, वटसावित्रीची पूजा करणाऱ्या व श्रावण महिन्यात व्रतसंकल्प करणाऱ्या असतात.

श्रवण नक्षत्री रवि बरीच शुभ फले देतो. उंची मध्यम, शरीर प्रकृती, कारक, चेहरा तेजस्वी पण करारी, गुणाने सदाचारी, ईश्वरभक्त, परोपकारी, नीतिमान असतो. थोडा फार अधिकार योगही मिळतो.

श्रवण नक्षत्री चंद्र स्वत:चेच नक्षत्र असल्याने चंद्र बराच चांगला असतो. मध्यम उंची आडवा बांधा, अवयव भरलेले, चेहरा सुंदर आकर्षक, गोड व सात्त्विक असून थोडासा होशी, रसिक व कलाप्रिय असतो. बुद्धी चांगली असते. धार्मिक व देवभक्त असतो. तसेच थोडा सुख व श्रीमंती भोगणारा, उदार व सदाचाराने वागणारा असतो. कुटुंबवत्सल असून संसाराची आवड असते.

श्रवण नक्षत्री मंगळ मध्यम असतो. आर्किटेक्चर अथवा कारखानदारीला बरा.

श्रवण नक्षत्री बुध असता बुद्धीमान, हुशार, कर्तव्यदक्ष, संसारी, चाणाक्ष, व्यवहारकुशल, व्यापारी होतो. चुणचुणीत व चुटचुटीतपणा चांगला असतो.

श्रवण नक्षत्री गुरु असता सुंदर, देखणा पण कृश शरीराचा असतो. मात्र बुद्धीमत्ता तीव्र असते. संपूर्ण ग्रहणशक्ती व आकलनशक्ती बरी असते. कॉमर्स, कायदेशास्त्र, तत्त्वज्ञान, वेदान्त यांना चांगला अतिशय तात्विक व देवभोग असून स्नानसंध्येचे व थोडे सोवळ्या ओवळ्याचे फॅड जास्त असते. धन व अधिकाराच्या दृष्टीने मात्र मध्यम असतो.

श्रवण नक्षत्री शुक्र असता सुडौल बांधा, नीटनेटकेपणा व सुबकपणा असतो. मात्र हाडपेरच जास्त मजबूत असते. चेहरा सुंदर आकर्षक व जरा दिसण्यात प्रौढ असतो. दंतपंक्ती फार विरळ असते. हौशी, रसिक व छानछोकीपणा असला तरी उधळेपणा किंवा स्वैरपणा नसून हिशोबीपणा दिसून येतो. बुद्धीमत्ताही बरी असते. रसायनशास्त्र, निसर्गशास्त्र, ललितकला, पेंटिंग, ड्रॉइंग बागा चांगला.

श्रवण नक्षत्री केतू असता शरीरप्रकृती बरी पण अति धार्मिक, अंधश्रद्धावादी व बुवाच्या मागे लागलेला असतो.

श्रवण नक्षत्री हर्षल असता शरीरप्रकृती बरी तसेच बुद्धीमान, हुशार, कल्पक व कारखानदार होऊ शकतो.

श्रवण नक्षत्री नेपच्यूनही बरीच अनुकूल फळे निर्माण करतो. अंतःस्फूर्ती, ध्यान धारणा शक्ती, प्रतिभा शक्ती बरी असते. चेहरा सुंदर, भव्य व ज्ञानी किवा संत पुरुषासारखा असतो.

श्रवण या नक्षत्राखाली होणारे रोग फारसे दाहक किंवा क्रूर नसले तरी रेंगाळणारे, जरा चिकट असतात. मुरणारी सर्दी, त्वचेचे रोग, गुडघे दुखणे, सांधे धरणे, चंद्र शनी युती असता क्षय, दमा, ताप, शरीराची झीज होणे अशा रोगांची भीती असते. साथिजन्य रोग फार होतात.

श्रवण नक्षत्री येणारा वर्ग हा बुद्धीवान व मेहनती असतो. हिशेबनीस, जमाखर्च लिहिणारे, वकील बॅरिस्टर्स, इंजिनिअर, सेल्स टॅक्स व इन्कम टॅक्स प्रैक्टिस करणारा वर्ग, कॉन्ट्रॅक्टर, लहान लहान कारखानदार, उत्पादक करणारा वर्ग, श्रम व कष्ट करणारा मजूरवर्ग, शेतकरी, दलाल, धान्य व तेलाचे व्यापारी तसेच मसाला, लोणची, पापड तयार करणारे, खनिज औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग, सरकारी खात्यापैकी पोस्ट टेलिग्राफ खाते व स्वतंत्र व्यवसाय करणारा वर्ग याखाली येतो. तसेच हे धार्मिक नक्षत्र असल्यास पौरहित्य करणारा वर्ग, भटजी, भिक्षुकी करणारा वर्गही येतो.

श्रवण नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर जरा बारीक, गोल पण एकसारखे सरळ रेषेत व सुंदर असते.

श्रवण नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती कितीही प्रयत्न केले तरी सापडू शकत नाही. वस्तू उत्तरेला गेलेली असते.

रत्न चंद्राचा मोती किंवा शनीचा नीलमणी असले तरी चंद्राचा मोती योग्य वाटतो. अंकशास्त्राप्रमाणे हे नक्षत्र २ किवा ८ अंकाखाली येत असले तरी ८ या अंकाचे वर्चस्व जास्त वाटते.

हे नक्षत्र देवगणी असल्याने सर्व शुभकार्याला योग्य असले तरी धार्मिक व जरा विरक्त प्रवृत्तीचे असल्याने विवाहाला योग्य नाही. काल्पयानाच्याप्रमाणे ते विवाहाला योग्य आहे. मात्र मौजी, बारसे, राज्याभिषेक, औषध घेणे, नवीन औषधी वनस्पती लावणे, नांगरणे, बी पेरणे, विद्यारंभ, नवीन अलंकार वस्तू धारण करणे, यांना योग्य आहे. उपमुखी नक्षत्र असल्याने मजला चढणे, देवालयाचा कळस बांधणे यांनाही चांगले. धार्मिक नक्षत्र असल्याने सत्यनारायण किवा इतर शुभ वैदिक अथवा धार्मिक कार्यसंकल्प अशा कल्पनांना फार शुभ आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

नाम जप साधना


विषय : नाम जप साधना

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नाप जपाचे महत्व आणि लाभ (परात्पर डॉ. जयंत आठवले यांचे संकलनातून 

नमस्कार,

आज आपण इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी विशिष्ट इंद्रिय देवता आणि नाम जप साधना या विषयाची माहिती घेणार आहोत.

आपण जसे राशी दैवत, नक्षत्र देवता, ग्रह देवता, तिथी ची देवता अशा विविध देवता असतात, तसेच मानवी शरीराच्या इंद्रियांना नियंत्रण करणाऱ्या देखील विशिष्ट देवता असतात. या  इंद्रियांच्या देवतांना प्रसन्न करून इंद्रियांना होणारे विकार दूर करण्यासाठी या देवतांचा नामजप करणे सहाय्यकारी असते.

उदा. डोळ्यांनी आपण पाहू शकतो. डोळ्यांमुळे सभोवतालची सृष्टी आपल्याला दृश्यमान होते. डोळे हे प्रकाशतत्त्वाचे (तेजतत्त्वाचे) प्रतीक आहेत. सूर्य (अर्क) ही प्रकाशाची देवता आहे. म्हणून डोळ्यांचे कार्य मंदावले, तर ते सुधारण्यासाठी सूर्यदेवाचा नामजप (ॐ अर्काय नमः) करणे उपयुक्त ठरते.

सोबतच्या तक्त्यात निरनिराळ्या इंद्रियांचा कोणकोणत्या देवतेशी संबंध आहे. तसेच एखाद्या इंद्रियाचे कार्य सुधारण्यासाठी कोणत्या देवतेचा जप कसा करावा, ते दिले आहे. इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी इंद्रियांच्या देवतांचा नामजप करण्यासह वैद्यकीय उपचारही चालू ठेवले, तर इंद्रियांचे कार्य लवकर सुधारण्यास साहाय्य होते.

प्रत्येक देवतेचे म्हणजे देव किंवा देवी यांचे विशिष्ट कंपन असते. त्या देवतेच्या नावाचा जप केल्याने जी विशिष्ट कंपने निर्माण होतात, त्यांनी व्याधीद्वारे निर्माण झालेले विचित्र / अनैसर्गिक / प्रमाणबाह्य कंपन सुधारण्यास सहाय्य होते. 

वाईट शक्ती आणि त्यांमुळे होऊ शकणारे त्रास :

मनुष्याला त्रास देणारे भूत, पिशाच आदी अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे ‘वाईट शक्ती’ (आसुरी शक्ती) मुळे होऊ शकणाऱ्या त्रासांची काही लक्षणे वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनुष्याच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक इत्यादी विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सध्या पृथ्वीवरील सात्त्विकता पुष्कळ अल्प झाली असल्याने आसुरी शक्तींचा त्रासही पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे बहुतांश व्यक्तींना अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास असतोच. विशेषतः समष्टी साधना (उदा. धर्मप्रसार, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्र- रक्षण) करणाऱ्यांना आसुरी शक्तींच्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागते.

त्रासांची काही लक्षणे पुढे दिली आहेत.

अ. कित्येक वर्षे औषधोपचार करूनही व्याधी बरी न होणे

आ. कोणतेही शारीरिक कारण नसतांना सतत थकवा असणे इ. घरात सतत भांडणे, कारण नसतांना आर्थिक चणचण किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनाधीन असणे

ई. झोपेत ओरडणे, दात करकरवणे किंवा भयानक स्वप्ने पडणे

उ. नामजप करतांना अनावर गुंगी येणे

काळाची आवश्यकता लक्षात घेऊन व काळाला अनुसरून असा वाईट शक्तींच्या त्रासांवर सर्वांनी  नामजप करणे अधिक परिणामकारक ठरते. याचा लाभ साधकाला त्याच्या भावानुसार होतो.

असा त्रास होत असल्यास तो जाईपर्यंत नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. त्रास गेल्यावर तो पुन्हा होऊ नये, यासाठी हा नामजप प्रतिदिन किमान २ तास करावा.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप : सध्या बरेच जण श्राद्ध, पक्ष इत्यादी करत नसल्यामुळे त्यांना अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतात. विवाह न होणे, पती-पत्नीचे न जुळणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, ही त्रासाची काही लक्षणे आहेत. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

इंद्रिय तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभर करत असल्यास दत्ताचा नामजप करू नये.

तक्त्यात सांगितलेला नामजप दिवसभरात २ तास करत असल्यास दत्ताचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार पुढीलप्रमाणे करावा.

१. वर सांगितलेल्या लक्षणांनुसार सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला, तरी पुढे होऊ नये म्हणून किंवा थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ तास ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करावा.

२. मध्यम त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन २ ते ४ तास करावा.

३. तीव्र त्रास असल्यास ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ४ ते ६ तास करावा.

समष्टी साधना करणाऱ्यांना आसुरी शक्तींमुळे होणाऱ्या त्रासांना मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी ‘सर्वांसाठीचे उपाय’ या स्तंभात सांगितलेला नामजप दिवसभरात जास्तीतजास्त वेळ करावा. अशांनी अन्य नामजप (उदा. कुलदेवता, दत्त) करण्याची आवश्यकता नाही.

वर सांगितलेल्या सांगितलेल्या त्रासापेक्षा इतर त्रासावर काही नाम मंत्र उपलब्ध न झाल्यास ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा नामजप करावा.

४. वास्तूशुद्धीसाठी नामजप उपयुक्त वास्तूदोष घालविण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बऱ्याचदा वास्तूत रहाणाऱ्या व्यक्तीचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा त्रास, दुःख, भवरोग ‘नामाने नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयाची आसक्ती हे सर्व दुःखांचे मूळ आणि सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे चित्त वळते आणि इतर ठिकाणची आसक्ती आपोआप सुटून दुःख नाहीसे होते. भगवंत हा आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दुःख त्या ठिकाणी राहू शकत नाही.

नामजपाने कुंडलीतील द्वादश स्थानांची शुद्धी होते.

‘१ कोटी नामजप : तनुस्थान शुद्ध होते. शरिरातील रज-तमाचा नाश होऊन सत्त्ववृद्धी होते. रोगविजांचा नाश होतो आणि रोग निर्बल होतात. शुभ स्वप्ने पडू लागतात.

२ कोटी नामजप : धनस्थान किंवा कुटुंबस्थान शुद्ध होऊन धनप्राप्ती किंवा कौटुंबिक सौख्यवृद्धी होते.

३ कोटी नामजप : पराक्रमस्थान, भातृस्थान किंवा सहजस्थान शुद्ध होते. अशक्य गोष्टी साध्य होतात. बंधू- बंधूत द्वेष असल्यास प्रेमवृद्धी होऊ लागते.

४ कोटी नामजप : सुहृदस्थान, मातृस्थान किंवा स्वास्थ्यस्थान शुद्ध होऊन शारीरिक आणि मानसिक आघात न्यून होतात.

५ कोटी नामजप : पुत्रस्थान किंवा विद्यास्थान शुद्ध होते. अपुत्री (निपुत्रिक)

पुत्रवान होतो. पुत्र द्वेष करणारा असल्यास अनुकूल होतो. अविद्वानाला एखाद्या विद्येत प्रवेश करण्याची बुद्धी होते. धारणाशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते.

६ कोटी नामजप : शत्रूस्थान आणि रोगस्थान शुद्ध होते. बाहेरील शत्रू आणि अंतरातील काम-क्रोधादी शत्रू नाहीसे होतात. रोग संपूर्ण बरे होतात. (एक कोटी नामजपाने रोग निर्बल होतात आणि) सहा कोटी नामजपाने रोग निखालस बरे होतात.

७ कोटी नामजप : जायास्थान शुद्ध होते. अविवाहितांचे लग्न होते. प्रतिकूल पत्नी अनुकूल होते. स्त्रियांस पतीसौख्य लाभते.

८ कोटी नामजप : मृत्यू-गंडांतरस्थान शुद्ध होऊन अकालमृत्यू (अशुभ काळी आलेला मृत्यू) आणि अपमृत्यू (अपघात, आत्महत्या यांसारखे मृत्यू) टळतो.

९ कोटी नामजप : धर्मस्थान शुद्ध होऊन मंत्रदेवतेचा सगुण साक्षात्कार होतो.

१० कोटी नामजप कर्मस्थान किंवा पितृस्थान शुद्ध होते. दुष्कर्मे नाहीशी होऊन सत्कर्मे पडतात. संतांचे दर्शन आपोआप होते.

११ कोटी नामजप : लाभस्थान शुद्ध होते. धनधान्य, गृह, भूमी इत्यादींचा लाभ होतो. सत्त्वगुणाची पूर्ण वृद्धी होते.

१२ कोटी नामजप : व्ययस्थान शुद्ध होते. रज-तम गुणांचा पूर्ण नाश होतो. गुरूंचा अनुग्रह स्वप्नात किंवा प्रत्यक्षपणे होऊन कृतार्थता प्राप्त होते.

ईश्वराच्या नामजपातील मानसिक प्रक्रियाही हीच आहे. नामजप करणाऱ्या व्यक्तीत कळत-नकळत ईश्वराविषयी काही भावना किंवा कल्पना असतात. त्याच्या गुणांचेही थोडेफार ज्ञान असते. ‘ईश्वराच्या कृपेने आपले कल्याण होते आणि नामजप हे त्याची कृपा संपादन करण्याचे साधन होय, याविषयी त्या व्यक्तीला श्रुतीज्ञान झालेले असते. त्यामुळे ‘एवंगुणविशिष्ट ईश्वराचे नाम आपण स्मरत आहोत’, असा भाव त्या नामाशी निगडित होतो. या भावामुळेच ईश्वराविषयीच्या आदर, प्रेम, भक्ती, दुष्कृत्यांची भीती इत्यादी भावना वाढत जातात. त्यामुळे तद्विरुद्ध असणाऱ्या भावना हळूहळू मंद होऊ लागतात. त्यामुळे त्या व्यक्तीच्या चित्ताची हळूहळू शुद्धी होते.  जप चालू असतांना चित्तातील वासनाकेंद्र, आवड नावड केंद्र, स्वभावकेंद्र वगैरे केंद्रे तसेच बुद्धीकेंद्रातील संस्कारांकडून येणाऱ्या संवेदना (बाह्य) मन स्वीकारत नाही. असे सातत्याने बराच काळ झाले की, या केंद्रांमधील संस्कार न्यून होऊ लागतात. जप चालू असतांना तेवढा वेळ तरी चित्तावर इतर गोष्टींचे नवीन संस्कार होत नाहीत. चित्तावर नवीन संस्कार होऊ नयेत, यासाठी जागृतावस्थेतील सर्वोत्तम मार्ग म्हणजे नामजप होय. (धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांतही चित्तावर इतर गोष्टींचे संस्कार होत नाहीत.) नामजपाने वासनाक्षय होण्याची प्रक्रिया: ‘जेथे देहबुद्धी असते तेथेच वासना उत्पन्न होते. ‘देह मीच आहे’, या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियांतून बाहेर धावत असते. त्याच्या मनाची तृप्ती कधीच होत नाही. नाम घेऊ लागल्यावर मात्र मन हळूहळू बाहेर धावण्याचे न्यून होते. बाहेरची धाव न्यून झाली की, वासनेची शक्ती आपोआप न्यून होते. पुढे तेच मन नामामध्ये रंगू लागते. जे मन वासना भोगायचे, तेच मन दुसरीकडे रंगू लागल्यावर मनातील वासना आपोआप क्षीण होतात आणि काही दिवसांनी त्या मरून जातात. वासना सूक्ष्म आहे; म्हणून तिचा काटा काढण्यास सूक्ष्म अस्त्रच पाहिजे. ते अस्त्र म्हणजे ‘नाम’ होय.’ नामजप करत असल्यामुळे आतील विचार उफाळून बाहेर येऊन नष्ट होत असल्याने काही अनुभूती प्राप्त होतात. व्यावहारिक बोलण्यामुळे वाणी चित्तशुद्धीपासून निवृत्त होते, म्हणजे अशुद्ध होते. ती शुद्ध व्हावी म्हणून नामजप करावा. जोपर्यंत पाप आणि पुण्य शिल्लक आहेत, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. ‘ज्याला याच एका जन्मात भगवंताची प्राप्ती करून घ्यावयाची आहे. त्याने आपली इंद्रिये, मन आणि बुद्धी यांचे पूर्ण नियमन करून कोणतेही पाप होऊ न देता, नामाचे कोणतेही अपराध होऊ न देता, अविरत नामजप केला पाहिजे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)