Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)


Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)

प्रत्येक क्षणावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा वा ग्रहांचा प्रभाव असतो. व त्याप्रमाणे घटना घडताना त्याचे परिणाम अनुभवास येतात. आकाशात जरी सगळे ग्रह असले तरी प्रत्येक ग्रह प्रत्येक वेळी कार्य करतोच असे नाही, तर प्रश्नवेळी कोणत्या ग्रहांचे प्रभुत्व आहे ते शोधावे लागते. त्यालाच क्रियाशील ग्रह किंवा कार्येश ग्रह म्हणतात. तेच ग्रह घटना घडताना कार्यान्वित असतात. थोड्याशा सरावाने रुलिंग प्लॅनेटच्या आधारे घटनेचे स्वरूप, घटनेचा क्रमसुद्धा सांगता येतो. त्यासाठी ग्रहांचे व राशींचे कारकत्व विचारात घ्यावे लागते.

असे कार्येश ग्रह जर शोधून काढता आले तर एखादे घटनेचा अंदाज वर्तवण्यात अधिक अचुकता येऊ शकते. या साठी अनेक पद्धती प्रचलित आहेत.

काही ज्योतिषी १ ते १०८ मधील एखादा आकडा जातकास विचारून त्यानुसार, तो कोणता नवमांश येतो त्यानुसार परीक्षण करतात.

काही ज्योतिषी प्रश्न समयी कोणता होरा व उपहोरा आहे ते पाहून त्यानुसार निष्कर्षास येतात.

केरळीय प्रश्न पद्धतीत ज्योतिषी शब्द, सुगंध फुल ई. ची नावे निवडून त्याचे नुसार निष्कर्ष काढतात.

कै. कृष्णमूर्तीं गुरुजींनी आपल्या अथक संशोधनाने Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) ही संकल्पना शोधून काढली.

जन्मकालिन कुंडलीतील एखाद्या घटनेचे कार्येश ग्रह, घटना घडताना चे कार्येश ग्रह व त्यासंबंधी तळमळीने प्रश्न सोडवतानाचे कार्येश ग्रह हे सारखेच वा संबंधित असतात हे यामागिल तत्व आहे.

याव्दारे जन्मकुंडली नसेल तरीही काही विवक्षित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे मोठे दालन उघडले गेले आहे. काही नामांकित ज्योतिर्विदांनी या पद्धतीस कृ.प. मधील चमत्कार, जादूची कांडी वा यक्षिणीची कांडी अशी संबोधने बहाल केली आहेत.

खाली दिलेल्या नियमांप्रमाणे असलेले ग्रह प्रश्नवेळी क्रियाशील असतात.
१. L : प्रश्नवेळी चालू असलेल्या लग्नाचा स्वामी १००% फ़ळ देतो.
२. S : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र नक्षत्राचा स्वामी ७५% फ़ळ देतो
३. R : प्रश्नवेळी असलेल्या चंद्र राशीचा स्वामी ५०% फ़ळ देतो
४. D : प्रश्नवेळ दिवसाचा स्वामी (सुर्योदया पासून पुढील सुर्योदया पर्यंत) २५% फ़ळ देतो

(फळामध्ये अधिक सूक्ष्मता येण्यासाठी काही वेळा लग्नाचा नक्षत्र स्वामी आणि चंद्राचा उप नक्षत्र स्वामी देखील तपासणे आवश्यक असते.)

या Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह)चा वापर अचुकतेसाठी अनेक प्रकारे केला जातो.

काही ज्योतिषी प्रश्न कुंडली म्हणजेच प्रश्न सोडवतानाची अंशात्मक कुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा वा जन्मकुंडली व Rulling Planets (तात्कालिक कार्येश ग्रह) चा संयुक्त वापर करतात.

काही प्रश्नात समजा एखादी गोष्टीचा आकारमान, रंग ई. ओळखायचे असल्यास वा घटना लवकर वा उशीरा घडणार असल्यास ग्रहाच्या नैसर्गिक कारकत्वाचा वापर करतात. मुलाला वा मुलीला किती % मार्क मिळू शकतात अशा प्रश्नांमधे ना उत्तरांचे पर्याय ठरवून त्यानुसार अंदाज वर्तवतात. चोराचे वर्णन, हरवलेली वस्तू, हरवलेली व्यक्ती, पुनर्मिलन, विवाह योग, संतती, दत्तक योग, घटस्फ़ोट, परदेश गमन, शस्त्रकिया कधी करावी पासून लॊटरी लागेल का पासून लाईट कधी येणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता येऊ शकतात.

वक्री ग्रह हे नेहमी रुलिंग प्लॅनेट ( क्रियाशील ग्रह) मधून वगळावेत; कारण वक्री ग्रह कार्य करण्यास असमर्थ ठरतात; परंतु ग्रहाच्या गुणधर्मानुसार (कारकत्व) नकारात्मक कार्य हमखास करतात. म्हणून त्यांचा तारतम्याने विचार करावा लागतो. राहू, केतू हे नेहमीच वक्री असल्यामुळे ते मार्गी समजूनच त्यांचा विचार करावा. राहू, केतू राशीस्वामीप्रमाणे फळे देतात. म्हणून प्रश्नवेळी (प्रश्नदिवशी ) राहू किंवा केतू ज्या राशीत असेल त्या राशीस्वामीलादेखील रुलिंगमध्ये गृहीत धरावा. रुलिंगमध्ये असलेल्या ग्रहांच्या युतीत असलेले ग्रहसुद्धा कालनिर्णय करताना विचारात घ्यावे.

रुलिंग प्लॅनेटमध्ये एखादा ग्रह दोनदा/तीनदा आल्यास दोनदा /तीनदा त्याचा वापर करता येतो.

रुलिंग प्लॅनेटमध्ये बुध आल्यास दोन शक्यता सांगाव्या लागतात.

एकाच ग्रहांच्या गोन राशी आल्यास रुलिंग प्लॅनेटमधील रास बलवान.

चर राशीचे लग्न असल्यास घटना लवकर घडते. स्थिर राशीचे लग्न असल्यास घटना विलंबाने घडते. द्विस्वभाव राशीचे लग्न असल्यास पहिले भ्रमण सोडून पुढील भ्रमण विचारात घ्यावे.

वर दिलेले महत्त्वाचे नियम तारतम्याने वापरून आपला सराव करावा, आपले कौशल्य वाढवावे. प्रत्येक वेळी सगळे नियम वापरलेच पाहिजेत, असे मुळीच नाही. सततच्या सरावाने व तारतम्याने कोणते नियं वापरावेत याचा अंदाज येतो.

रुलिंग प्लॅनेटचे उपयोग :

१) रुलिंग प्लॅनेटच्या आधारे लग्प्रशुद्धी म्हणजेच अचूक जन्मवेळ शोधता येते.

२) ग्रह व राशींच्या कारकत्वाचा म्हणजेच गुणधर्माचा उपयोग करून निश्चित घडणाऱ्या घटनांच्या अचूक तारखा, स्वरूप व क्रम सांगता येतो.

३) एखादा प्रश्न हाताळताना एखादा, ग्रह भावसंधीवर, ग्रह किंवा नक्षत्रसंधीवर असता द्विधा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा रुलिंग प्लॅनेटच्या आधारे अचूकता साधता येते (कुंडली क्र. १२ परदेशगमन पहा.).

४) अनेक पर्यायांमधून अचूक पर्याय निश्चित करता येतो.

५) रुलिंग प्लॅनेटमधील ग्रहांच्या (राशींच्या) अंकावरून पर्याय निवडण्यासाठी अंक पद्धतीनेदेखील उपयोग करता येतो.

रुलिंग प्लॅनेटच्या आधारे एखादी घडणारी घटना सांगणे

१) रुलिंग प्लॅनेटच्या आधारे आठवड्याभरात घडणारी घटना सांगणे

उदा. : दवाखान्यातून डिस्चार्ज कधी मिळेल ? पत्र किंवा पार्सल कधी मिळेल ? नोंदविलेला गॅस सिलेंडर कधी येईल ?

अशा आठवड्याभरात घडणाऱ्या घटनांसाठी प्रश्नवेळचे रुलिंग प्लॅनेटस् (R.P.) मध्ये लग्नाचा स्वामी (लग्न रास) जो असेल त्या वारी घटना घडेल म्हणून सांगावे.

लग्नाचा स्वामी हा सर्वांत बलवान असतो; पण लग्न स्वामी नेमका वक्री असेल तर अनुक्रमे चंद्रनक्षत्र, चंद्ररास किंवा वाराच्या स्वामीचा उपयोग करून त्या स्वामीच्या वारी घटना घडेल, असे सांगता येईल; परंतु एखादी घटना सरकारी कार्यालयाशी किंवा बँकेशी, पोस्टाशी संबंधित असेल व रविवारी घटना घडणार असेल, तर व्यावहारिकदृष्टीने रविवार सुटीचा वार असल्याने पुढील वार किंवा घटनेनुसार चंद्र नक्षत्रस्वामीचा उपयोग करावा. रुलिंगमध्ये राहू, केनू असल्यास राहू, केतू ज्या राशीत असतील त्या राशीस्वामीचा वार सांगावा.

२) रुलिंग प्लॅनेटसच्या आधारे दहा-पंधरा दिवसांत घडणारी घटना सांगणे

उदा. : दवाखान्यातून डिस्चार्ज कधी मिळेल ? खूप लांबून मागविलेल एखादे पत्र किंवा पार्सल कधी मिळेल ?

अशा दहा-पंधरा दिवसांत घडणाऱ्या घटनेसाठी प्रश्नवेळेचे रुलिंग प्लॅनेटस् (R.P. मधील बलवान ग्रहाच्या नक्षत्रातून ज्या वेळी चंद्राचे भ्रमण होईल त्या वेळ घटना घडेल.

३) रुलिंग प्लॅनेटसच्या आधारे महिन्याभरात घडणारी घटना सांगणे

उदा. : एल्. आय. सी. चेक कधी मिळेल ? गरोदर स्त्रीची प्रसूती केव्हा होईल ?

अशा महिन्याभरातील घटनेसाठी प्रश्नवेळेच्या रुलिंग प्लॅनेटस् (R.P.) मधील बलवान ग्रहाच्या राशीतून व नक्षत्रातून चंद्राचे भ्रमण होईल त्या वेळी घटना घडेल.

४) रुलिंग प्लॅनेटच्या आधारे वर्षभरात घडणारी घटना सांगणे

उदा. : नोकरी कधी लागेल ? नवीन ब्लॉकचा ताबा कधी मिळेल ? कंपनीची टाळेबंदी कधी उठेल?

अशा वर्षभरातील घटनेसाठी प्रश्नवेळेच्या रुलिंग प्लॅनेटस् (R.P.) मधील बलवान ग्रहाच्या सूर्य राशीतून व सूर्य नक्षत्रातून रविचे भ्रमण होईल त्या वेळी घटना घडेल.

रुलिंग प्लॅनेट व अंकशास्त्र

जीवनात अनेक वेळा आपल्यासमोर असे प्रश्न उभे राहतात की निर्णय करताना आपला गोंधळ होतो. त्यातून अनेक पर्याय समोर असतील तर नेमका कोणता पर्याय निवडावा, या बाबतीत मनाची द्विधा परिस्थिती होते. अगदीच अडचणीच्या वेळेला रुलिंग प्लॅनेटचा उपयोग अंकशास्त्र पद्धतीने करून अचूक पर्याय निवडता येतो.

नियम :

१) प्रश्नकर्त्याकडून क्रमाने पर्याय लिहून घ्यावे. कोणत्याही विशेष सूचना न करता प्रश्नांचा क्रम प्रश्नकर्त्याला स्वतः उत्स्फूर्तपणे ठरवू द्यावा.

२) प्रश्नवेळचे रुलिंग प्लॅनेट घ्यावे. रुलिंग प्लॅनेटमधील वक्री ग्रह विचारात घेऊ नये.

३) रुलिंग प्लॅनेटमधील ग्रहांच्या स्वराशींचे अंक त्यांच्यासमोर लिहावेत. उदा. मंगळ ग्रहाची पहिली मेष व आठवी वृश्चिक या दोन राशी म्हणून १+८ अंक लिहावे. शुक्र ग्रह असल्यास शुक्राची दुसरी वृषभरास व सातवी तूळ या दोन राशी म्हणून २+७ अंक लिहावे. ई.

४) राहू-केतू राशीस्वामीप्रमाणे फळे देतात म्हणून रुलिंग प्लॅनेटमधे नक्षत्रस्वामी म्हणून राहू-केतू आल्यास त्या दिवशी स्पष्ट ग्रहांमध्ये राहू-केतू कोणत्या राशीत आहेत हे पंचांगामध्ये बघून त्या राशीस्वामींच्या राशींचे अंक लिहावेत.

५) रुलिंग प्लॅनेटमधील वक्री ग्रह सोडून उरलेल्या राशीअंकांची बेरीज करावी. आलेल्या बेरजेची पुन्हा एकअंकी बेरीज करावी व त्या क्रमांकाचा पर्याय निवडावा. पर्याय ९ पेक्षा कमी असल्यास, पर्यायांची संख्या बेरजेच्या संख्येपेक्षा कमी असल्यास पर्यायाच्या संख्येने बेरजेच्या संख्येला भागावे व जी शिल्लक राहील तो पर्याय निवडावा.

६) पर्याय ९ पेक्षा जास्त म्हणजे १२/१५ असल्यास आलेल्या बेरजेची पुन्हा एकअंकी बेरीज करू नये. पर्यायाच्या संख्येने त्या बेरजेला भागावे व जी शिल्लक राहील त्या क्रमांकाचा पर्याय निवडावा.

७) पर्यायाच्या संख्येने त्या बेरजेला भागून बाकी शून्य राहिल्यास शेवटचा पर्याय निवडावा.

पण माझ्या अनुभवाने उत्तरे तेव्हाच जास्त अचुक येतात, जेव्हा जातकाची प्रश्न विचारण्याची आंतरिक व प्रामाणिक तळमळ, प्रश्न सोडवण्याची अचुक वेळ व ज्योतिषाचा अनुभव हे सारे जमून येते. एखादा प्रश्न हाताळताना काही वेळा रुलिंग प्लॅनेटचे साहाय्य मिळत नाही. अशा वेळी तो प्रश्न बाजूला ठेवावा व नंतर केव्हातरी, केव्हातरी म्हणजे ठरवून नव्हे, तर अचानक तीव्र इच्छा जागृत होईल त्या वेळी प्रश्न हाताळावा.

त्याच बरोबर राशी, ग्रहांच्या गुणधर्म व कारकत्व यांचा देखील विचार केला तर जास्त उपयुक्त ठरते असा माझा अनुभव आहे.

उदा. शिक्षणासंबंधी प्रश्नात रुलिंगमध्ये गुरू असल्यास गुरू हा विद्येचा, ज्ञानाचा कारक ग्रह असल्याने पास या उत्तरास बळकटी येऊ शकते. रुलिंग प्लॅनेटमध्ये जेव्हा शनि येतो (कुठेही) तेव्हा विलंबाने अथवा खूप कष्टाने घटना घडते असा निष्कर्ष आपण घेऊ शकतो..

तर मित्रांनो आपलेही काही असे प्रश्न असतील व जाणून घेण्याची तळमळ असेल, सरावाने तर नक्कीच या पद्धतीचा लाभ घेऊ शकता.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)

Leave a comment