
विषय : गुण मेलन कोष्टका मधील योनी मैत्री
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : दाते पंचांग
नमस्कार,
विवाह जमवताना बहुतांशी पालक सर्वात पहिले काम काय करतात, तर पंचांगात दिलेल्या गुण मेलन कोष्टका प्रमाणे १) वर्ण १ गुण, २) वश्य २ गुण, ३) तारा ३ गुण, ४) योनी ४ गुण, ५) ग्रह मैत्री ५ गुण, ६) गण ६ गुण, ७) भृकुट ७ गुण ८) नाडी ८ गुण या ३६ पैकी किती गुण जुळतात हे पाहतात.
गुणमेलन पहावे की नाही हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवून आज आपण त्यापैकी योनी मैत्री याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत.
चंद्र नक्षत्रांवर आधारित वेगवेगळ्या योनीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये खालील वैशिष्ट्ये आढळतात.
१. अश्व योनी (अश्विनी आणि शताभिषा) असलेले जातक : मुक्त स्वभाव, शूर, सदाचारी, तेजस्वी, उत्साही, जबाबदार, निष्ठावंत, खेळकर, अग्रणी, कोणाचेही वर्चस्व न स्वीकारणारा, गायन आणि वाद्यांमध्ये रस असलेला.
२. गज योनी (भरणी आणि रेवती) असलेले जातक : बलवान, कणखर, शांत स्वभावाचा, गंभीर, ज्ञानी, उत्साही, सत्यवादी, उपभोक्ता, राजेशाही.
३. मेष (कृतिका आणि पुष्य) असलेले जातक : मर्दानी, पराक्रमी, बुद्धिमान, निर्भय, कष्टाळू, श्रीमंत, समाजसेवक, परोपकारी पण संघर्षशील.
४. सर्प योनी (रोहिणी आणि मृगशिरा) असलेले जातक : कठोर हृदयाचा, क्रोधी, क्रूर, कृतघ्न, ढोंगी, इतरांचा नाश करणारा, सूडाची भावना असलेला.
५. श्वान योनी (आर्द्रा आणि मुळ) असलेले जातक : मेहनती, उत्साही, धाडसी, मातृ-पितृ भक्त, वाचाळ, स्व-जात विरोधी, सर्वप्रकारचे भक्षण करणारा, उत्कृष्ट संदेश वाहक.
६. मार्जार योनी (पुनर्वसु आणि आश्लेषा) असलेले जातक : कार्यकुशल, घाबरट, चपळ, हुशार, भांडखोर, विनाकारण संतापणारा, निर्दयी, क्रूर, गोड खाणारा, दुष्टांच्या संगतीत राहणारा.
७. मूषक योनी (मघा आणि पूर्वा फाल्गुनी) असलेले जातक : बुद्धिमान, श्रीमंत, अहंकार न बाळगणारा, कामासाठी नेहमी तत्पर, अविश्वासू, स्वार्थी.
८ गौ योनी (उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा भाद्रपदा) असलेले जातक : उत्साही, आनंदी, सुखी, सुंदर, प्रेमळ, उदार, परोपकारी, नम्र, वक्तृत्ववान, सज्जन.
९. महिषी योनी (हस्त आणि स्वाती) असलेले जातक : जाड, श्रीमंत, खादाड, बोलके, मंदबुद्धी, आळशी, मंद गतीने चालणारे आणि हट्टी.
१०. व्याघ्र योनी (चित्रा आणि विशाखा) असलेले जातक : स्वच्छंद, चतुर, हुशार, चपळ, स्फुर्तीवान, भटकंती करणारा, सर्वभक्षी, श्रीमंत, बलवान, स्वतःची प्रशंसा करणारा.
११. मृग योनी (अनुराधा आणि ज्येष्ठा) असलेले जातक : सुंदर, आकर्षक, सत्यवादी, स्वातंत्र्यप्रेमी, स्वजन प्रिय, निर्मळ स्वभाव, दयाळू, चंचल, कार्यरत, ललित कला प्रेमी.
१२. वानर योनी (पूर्वाषाढा आणि श्रवण) असलेले जातक : चंचल, चपळ, गोड खाणारा, अनुकरण करणारा, धनाचा लोभी, संशयी, शूर, कामुक, भांडखोर.
१३. मुंगुस योनी (उत्तराषाढा) असलेले जातक : परोपकारी, श्रीमंत, लोकप्रिय, हुशार, मातृ-पितृ भक्त पण स्वार्थी.
१४. सिंह योनी (धनिष्ठा आणि पूर्व भाद्रपदा) असलेले जातक : शक्तिशाली, प्रभावशाली व्यक्तिमत्व, शक्तिशाली नेतृत्व, धार्मिक, कार्यकुशल, सदाचारी, कुटुंब आणि आश्रयींचे रक्षण करणारा.
वधू व वर यांचे योनी नुसार परस्पर संबंधांवर आधारित गुण दिले जातात.
१. जर वधू आणि वर दोघांचीही योनी परम मैत्री दर्शवत असेल, तर गुणमेलन मध्ये पूर्ण ४ गुण मिळतात.
२. जर वधू आणि वर दोघांचीही योनी मैत्री दर्शवत असेल, तर गुणमेलन मध्ये ३ गुण मिळतात.
३. जर वधू आणि वर दोघांचीही योनी सम संबंध दर्शवत असेल, तर गुणमेलन मध्ये २ गुण मिळतात.
४. जर वधू आणि वर दोघांचीही योनी शत्रू संबंध दर्शवत असेल, तर गुणमेलन मध्ये १ गुण मिळतात.
५. जर वधू आणि वर दोघांचीही योनी परम शत्रू संबंध दर्शवत असेल, तर गुणमेलन मध्ये ० गुण मिळतात.
विवाहासाठी, परम मित्र आणि मित्र संबंध दर्शित योनी सर्वोत्तम असते. परम शत्रू आणि शत्रू योनि त्याज्य मानल्या आहेत. जर गुणमेलनात इतर घटकांचे गुण मुबलक प्रमाणात असतील, तर समयोनी स्वीकार्य आहे. जर भृकुट चे गुण उत्तम असतील, तर योनी दोष नाहीसा होतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
(सशुल्क ज्योतिष अभ्यास वर्ग)