शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग


विषय : शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : कलाविलासी शुक्र

मूळ लेखक : द. मा. लेले

नमस्कार,

आज आपण शुक्राचे हर्षल व नेपच्यून बरोबर होणारे योग याबाबत माहिती घेणार आहोत.

शुक्र हा स्त्री ग्रह हा प्रामुख्याने कला, सौंदर्य, विवाह ई गोष्टींचा कारक ग्रह आहे. त्यामुळे शुक्राचा भावनांशी घनिष्ठ संबंध असतो.

हर्षल हा ग्रह मुळातच चेतना देणारा अथवा उद्दीपित करणारा, लहरी, स्वच्छंदी, तांत्रिक, रूढी न मानणारा अपारंपारिक ग्रह आहे. नेपच्यून हा स्त्री ग्रह शुक्राशी कारकत्व साधर्म्य दाखवणारा ग्रह आहे. संवेदनशीलता, कल्पकता, सृजनशीलता, अतिविचार, भावना यांचे अतिरेकी रूप नेपच्यून दर्शवतो.    

त्यामुळे शुक्राबरोबर होणारे हर्षल अथवा नेपच्यून चे जन्म कुंडलीत अथवा गोचर मध्ये होणारे

योग अभ्यासण्या सारखे असतात.

१) शुक्र – हर्षल युती योग

हा एक अत्यंत प्रभावशाली योग असतो. शुक्राचा भावनांशी घनिष्ठ संबंध असल्याने आणि हर्षल त्यास चेतना देणारा असल्याने या योगात जातकाच्या भावना मोठ्या अस्थिर स्वरूपाच्या आढळतात. जातकाच्या भावनांची आंदोलने (Mood Swings) फारच तीव्र स्वरूपात होत असतात.

संगीत, साहित्य, काव्य इत्यादी कला हे शुक्राचे गुणधर्म हर्षल च्या युति योगात अगदी प्रखरपणे उजळतात. असे जातक नाट्य, चित्रकला, फोटोग्राफी, काव्य-संगीत ई. कलांत प्रकारांत प्रावीण्य मिळवितात. असे जातकाचे अंगी कल्पकता व नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याची उर्मी आढळते.

शुक्र हा कलत्रकारक, विवाहकारक व लैगिंक भावनावर अंमल गाजविणारा ग्रह हर्षलच्या युतीत असता, त्या दृष्टीने काही अनिष्ट व विचित्र फळे आढळतात. अशा जातकांना स्त्रियांच्या ओळखी वाढवण्याची आणि त्यांचे सहवासात रमण्याची हौस असते. या युतीमुळे जातकाचा प्रेमविवाह होण्याची दात शक्यता असते. पण हर्षल हा ग्रह वायू तत्वाचा रूढी न पाळणारा व सतत नावीण्याचा हव्यास असणारा ग्रह असल्याने घटस्फोटाची प्रकरणे होतात. घटस्फोट घ्यायचा व पुन्हा दुसरा विवाह करायचा अशा गोष्टी घडण्याचा संभाव असतो. या युतीची घटस्फोट, पतीपत्नींचे दीर्घ काळ विभक्त राहणे, लैगिंक विकृती, जोडीदाराची फसवणूक, प्रतारणा ई. फळे मिळण्याची शक्यता असते. कर्क, वृश्चिक व मीन या जल राशीत तसेच मेष, वृषभ, मिथुन, तूळ या राशीत ही युती असत्ता विक्षिप्त वैवाहिक भावना व वैचित्र्याची वृत्ती जातकामध्ये जास्त आढळते.

२) शुक्र – हर्षल शुभ योग

शुक्र ह्या भावनाशील, कलाप्रेमी व सौंदर्यप्रेमी ग्रहाला हर्षलच्या शक्तीची शुभ योगात मिळणारी साथ कित्येक जातकांच्या कुंडल्यांत मोठी नजरेत भरण्यासारखी असते. या योगात शुक्र व हर्षल या दोघांची कारक फळे मोठी उद्दीपित झालेली आढळतात. लाभ योग व नवपंचम योग बौद्धिक बाबतीत व कलेच्या दृष्टीने उत्तम फळे देतात. या योगात निरंतर स्फूर्ती आहे. गतिमान अशी शक्ती आहे. ध्येयवादीपणा आहे, तसेच कर्तृत्व आहे. हे जातक वाङ्मय, शास्त्र, कला अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग झेप घेणाऱ्या आढळतात. मिथुन, तूळ, कुंभ या बौद्धिक राशीतून होणारा नवपंचम योग उत्तम बुद्धिमत्ता, आकलनशक्ती देणारा योग असून अशा योगात रवी, बुध, चंद्र असता मोठा सर्जनशील योग होतो. जलराशीतून शुक्र-हर्षल नवपंचम योग असता जातक कामुक, विषयी, प्रणयी, विलासी असू शकतात. आयुष्यात रंगेलपणाची (Flirty Nature) किनार असते.

शुक्र हर्षल अंशात्मक शुभ योग असता जातकाच्या पुष्कळ ओळखी असतात. जातकाला सामाजिक कार्याची आवड असते. जातक हौशी व आनंदी व खुशहाल प्रवृत्तीचा आढळतो. जातकास सौदर्यांची आवड व आसक्ती आढळते. चित्रकला, फोटोग्राफी, काव्यगायन ई. कलांत रस असतो. शुक्र स्त्री कारक, सप्तमाचा नैसर्गिक कारक या दृष्टीने शुक्र हर्षल शुभ योगात विवाहासंबंधी काही अभिनव कल्पना असतात. प्रेमविवाह अथवा सहवासोत्तर विवाह याची शक्यता असते. असे जातक प्रेमाच्या बाबतीत जास्त पुढाकार घेणारे आढळतात. शुभ योगात विवाह अकस्मात होण्याची शक्यता असते. स्त्री वर्गात ओळखी जास्त असतात.

स्त्रियांच्या कुंडल्यात शुक्र – हर्षल शुभ योगामुळे सौदर्याभिरुची, नटण्या मुरडण्याची आवड, कपडे व इतर बाबतीत छानछोकीपणा जास्त असतो. वागणे, चालणे मोठे आकर्षक असते. अभिनव गोष्टींचे आकर्षण व भावनाशीलता जास्त असते.

(३) शुक्र – हर्षल अशुभ योग

हर्षल हा गरज फळे देण्याच्या बाबतीत अत्यंत प्रभावी असा ग्रह असून, त्यात त्याला केंद्रयोग व प्रतियोगातील नैसर्गिक शक्ती लाभते. त्यामुळे त्याचे परिणाम मोठे तीव्र स्वरूपाचे मिळतात. शुक्राच्या केंद्र वा प्रतियोगात हर्षल असता शुक्राचे स्वरूप थोड्याफार प्रमाणात विकृत किंवा बिघडलेले दिसून येते. अशा योगात वैवाहिक आयुष्याचा प्रांत मोठा नाजूक व कीचकट झालेला आढळतो. हा योग जातकाला सांसारिक सुख सरळपणे लाभू देत नाही. वैवाहिक आयुष्यात संघर्ष, असमाधान, अशांतता निर्माण होऊन त्या दृष्टीने एक विचित्र तणाव सतत राहतो. शुक्र – हर्षल अशुभ योगात विवाह ठरताना सुद्धा अडचणी येतात अथवा त्रास होतात अथवा जीवनसाथी विक्षिप्त, लहरी, हेकट, अहंमन्य असतो. घटस्फोट घेतलेल्या किंवा तीव्र असमाधान असणाऱ्या कुंडल्यांत शुक्र हर्षल अशुभ योग बरेच वेळा आढळतो. हर्षल वक्री असल्यास फळांची तीव्रता अजून वाढते.

हा योग स्वभावाच्या दृष्टीने जसा महत्त्वाचा आहे, तसाच वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या दृष्टीने वा बौद्धिक दृष्टीनेही तफावत दर्शवते. यात वैवाहिक जोडीदारास अपघात होण्याची शक्यता आढळते.

शुक्र – हर्षल अशुभ योगात दोघांना राशिबळ, स्थानबळ असता बौद्धिक वा कलाक्षेत्रात प्रावीण्य आढळते. असे जातक वाङ्मय, शास्त्र, कला, काव्य यात बुद्धीची चमक उत्तम दाखवू शकतात.

अशुभयोग असता व शुक्र, मंगळ, नेपच्यून वा शनीने बिघडला असता, जातकाचे चारित्र्य बिघडण्याची शक्यता असते. अशा जातकांची स्त्रियांकडून फसगत होते किंवा आयुष्यात मोठ्या नाट्यमय घटना घडून आयुष्य पूर्ण बदलून जाऊ शकते.

४) शुक्र – नेपच्यून युतीयोग

शुक्र – नेपच्यून या दोन ग्रहांची युती इतर कोणत्याही ग्रहयोगाच्या कुयोगात नसल्यास काही महत्त्वाची शुभ फळे देताना आढळते. अशा जातकांना कलाप्रेम व सुंदर गोष्टींबद्दल तीव्र आकर्षण असते. करमणुकीचो क्षेत्रे व वाङ्मय यात रस असतो. त्यांची रसिकता उत्तम असते. एखाद्या क्षेत्रात त्यांना चांगले प्रावीण्य लाभते व नावलौकिक होतो.

ही युती असलेले जातक अति भावनाशील असतात. असे जातक प्रेमळ व लाघवी असतात. सौंदर्यप्रेमी असतात. स्वभाव अधिक भावनाप्रधान असल्याने प्रेमाच्या व इतर बाबतीतही हे जातक नाजूक व संवेदनशील असतात. अशा जातकांना एखादे दुःख अगदी दूरगामी व दीर्घकाळ होते.

शुक्र – नेपच्यून युती पापग्रहांच्या अशुभ योगात असता, शारीरिक व मानसिक त्रास जास्त होतात. स्वप्नाळूपणा असतो. नैराश्याने अथवा काल्पनिक चिंतांनी हे जातक अगदी त्रस्त होतात. वैवाहिक आयुष्यात संकटे येतात.

ही युती असणाऱ्या जातकांची अन्य व्यक्तीकडून फसवणूक होताना आढळते अथवा अतिरेकी अपेक्षांमुळे त्यांचा अपेक्षाभंग होतो व आयुष्य नरकमय बनवून घेतात.

५) शुक्र – नेपच्यून शुभ योग

नेपच्यूनचे कारकत्व बऱ्याच प्रमाणात शुक्राशी सुसंगत आहे व ते शुभ योगात शुक्रास फार पोषक असते. नेपच्यून हा सुप्त मानसिक शक्तींशी निगडित असून शुक्रासारखाच कलासक्त असल्याने कलेच्या व भावनेच्या दृष्टीने, स्फूर्ती व कल्पनाशक्तीच्या दृष्टीने, मनाच्या व भावनांच्या नाजूक संवेदनांच्या दृष्टीने जास्त शुभ फलदायी होतात. नवपंचम योगात जास्त दर्शनीय फळे मिळतात. लाभयोग तेवढा शक्तिमान नसल्याने इतर ग्रहांच्या शुभ योगावर त्यांची शक्ती अवलंबून असते.

या योगामुळे जातक प्रेमळ व सहृदय असतात. कित्येक वेळा असे जातक प्रचंड ध्येयवादी, स्वप्नाळू व कल्पना साम्राज्यात रंगणारे आढळतात. हा योग स्फूर्ती व उत्तम कल्पनाशक्ती देणारा असल्याने असा योग कवी, लेखक, कलावंत यांच्या कुंडलीत प्रामुख्याने आढळतो. दोन्ही ग्रह कलासक्त व सौंदर्यासक्त असल्याने शुक्र नेपच्यून शुभ योगात शुक्रास राशिबळ व स्थानबळ असल्यास संगीत, गायन, वाद्यवादन, चित्रकला, मूर्तिकला, अभिनय, नृत्य वगैरे गोष्टीत जातकास उत्तम प्रावीण्य मिळते. हे जातक प्रेम, वात्सल्य, दयाळूपणा, भक्तिभाव वगैरे दृष्टीने संवेदनशील असतात.

६) शुक्र – नेपच्यून अशुभ योग

शुक्र नेपच्यून केंद्र प्रतियोग अशुभ योगांतही कला, साहित्य, सौंदर्य यासंबंधी, तसेच प्रेम, स्फूर्ती, कल्पनाशक्ती, गूढ गोष्टींचे आकर्षण या दृष्टीने शुभ योगासारखीच फळे देतात. अशुभ योगात भावनांना जीवनात महत्त्व आलेले दिसते. अत्यंत संवेदनशील व नाजूक वृत्ती असल्याने अशा जातकांच्या भावना खूप तीव्र व दिव्य असतात. भावना दुखावल्या गेल्यावर यांना दुःख मोठ्या तीव्रतेने होते. कित्येक वेळा अगदी ‘मूडी’ व्यक्ती आढळतात. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, बरोबरचे लोक यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख त्यांना अधूनमधून नेहमी होत असते. कित्येक वेळा काल्पनिक चिंता व दुःखेही होतात. भोवतालच्या परिस्थितीचे परिणाम यांच्या मनावर जास्त होत असतात. त्यामुळे वागण्यात एक प्रकारचा तर्हेवाईक पणा येतो.

शुक्र – नेपच्यून अशुभ योग, वैवाहिक, सांसारिक वा कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने अशुभ फळे देतो. पत्नीचे अनारोग्य, पती-पत्नीत वैचारिक संघर्ष, काही काळ मोठे गैरसमज असे परिणाम आढळतात. केंद्र प्रतियोगात एखादा ग्रह वक्री असता द्विभार्यायोग. स्त्रीसंबंधी नाट्यमय घटना घडू शकते. या जातकांना भावनिक संघर्षाचे मोठे दुःख आयुष्यात सहन करावे लागते. तरुण जातक प्रेमभंगाच्या दुःखात अनेक वर्षे व्यर्थ घालवू शकतो, अथवा जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे अनेक वर्षे दुःखी राहू शकतो. अंगीकृत कार्यात अपयश येणे, धक्का बसणे, एखाद्या विशिष्ट कार्यात अपयश येणे, एखाद्या गोष्टीत अनेक वर्षे दवडूनही माघारी यावे लागणे, आर्थिक भानगडी होणे, वगैरे फळे अशुभ योगात मिळताना दिसतात. तसेच प्रेमाच्या बाबतीत अथवा आर्थिक बाबतीत एखादी फसवणूक झाल्यासारखीच घटना घडते. कुंडलीत इतर अशुभ योग असता त्याला व्यसनाधीनता, गुप्त शत्रुत्व असते. तसेच मानसिक वा लैंगिक विकृती असतात. जीवनात स्त्री, व्यसन, पैसा वगैरेमुळे नावलौकिक जाण्याची शक्यता असते.

हे योग व त्याचे अनिष्ट परिणाम तपासताना योग अंशात्मक असता जास्त प्रभावी फळे मिळतात. व साहचर्य योगात तीव्रता कमी असते. तसेच कोणत्याही निष्कर्षास येताना कुंडलीतील इतर ग्रहयोग, ग्रहस्थिती, दशा अंतर्दशा काय निर्देश करतात हे बघणे महत्वाचे ठरते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment