
विषय : जन्म तारखे वरून जन्म वार शोधण्याची पद्धत
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : अंक ज्योतिष एक चमत्कार
मूळ लेखक : डॉ.कटककर
नमस्कार,
जेव्हा एखादा जातक एखाद्या ज्योतिषाकडे आला असता, आपण किती ज्ञानी आहोत, आपल्याला कशी दिव्य शक्ती प्राप्त झाली आहे ई. गोष्टी जातकावर बिंबवून प्रभाव पाडण्यासाठी अनेक जन अनेक क्लुप्त्या वापरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे जातकाने जन्म तारीख सांगितली असता पटकन जन्म वार सांगणे. जेणेकरून समोरचा चकित होतो.
वास्तविक हे असले चमत्कार, दिव्या शक्ती वगैरे असे काही नसून त्यामागे अंक ज्योतिष असते. जे चमत्कारिक पद्धतीने चटकन काही उत्तरे देते. ज्यांना अंकाशास्त्रात रुची आहे त्यांनी अंक ज्योतिष एक चमत्कार हे डॉ. कटककर यांचे पुस्तक जरूर अभ्यासावे व त्यात पारंगत व्हावे.
अंकशास्त्राच्या किमयेप्रमाणे संपूर्ण जन्म तारखे वरून जन्मवार पटकन शोधून काढण्याची पद्धत आहे. ही पद्धत अवगत केल्यास आपल्याकडे प्रश्न विचारण्यास आलेल्या जातकास आपण काही वेळात चकित करू शकतो. आलेल्या माणसाबरोबर आपले संभाषण चालू असताना त्याने दिलेल्या त्याच्या जन्मतारखेवरून आपण मनातल्या मनात गणित करून त्याचा बरोबर जन्म वार सांगितल्यास, त्याला आश्चर्याचा धक्का बसेल व ते प्रभावित होतील.
हे गुप्त गणित करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे-
शतकांना व प्रत्येक महिन्याला काही विशिष्ट क्रमांक दिले आहेत. ते खालीलप्रमाणे-
शतकाचे दिलेले अंक
१) १८ वे शतक : ४ अंक, २) १९ वे शतक : २ अंक, ३) २० वे शतक : ० अंक, ४) २१ वे शतक : ६ अंक
महिन्याला दिलेले अंक
जानेवारी : १ अंक, फेब्रुवारी : ४ अंक, मार्च : ४ अंक, एप्रिल : ० अंक, मे : २ अंक, जून : ५ अंक, जुलै : ० अंक, ऑगस्ट : ३ अंक, सप्टेंबर : ६ अंक, ऑक्टोबर : १ अंक, नोव्हेंबर : ४ अंक, डिसेंबर : ६ अंक
महत्वाची टीप : लीप वर्षात जानेवारीचा अंक ० असतो, फेब्रुवारीचा ३ असतो.
जन्म तारखे वरून जन्मवार कसा शोधावा?
१) जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक यांना ४ ने भागावे.
२) आलेला पूर्णांक मूळ जन्मवर्षात मिळवावा.
३) वरील बेरजेमध्ये जन्मतारीख मिळवावी.
४) आलेल्या संख्येमध्ये जन्म महिन्याला जो अंक दिलेला आहे तो मिळवणे व शतकाचा अंक मिळवावा.
५) वरील आलेल्या संख्येला ७ ने भागावे व भागाकार झाल्यानंतर खाली जी बाकी राहील तो जन्मवार असतो.
बाकी १ राहिल्यास रविवार, २ राहिल्यास सोमवार, ३ राहिल्यास मंगळवार, ४ राहिल्यास बुधवार, ५ राहिल्यास गुरुवार, ६ राहिल्यास शुक्रवार, ० राहिल्यास शनिवार हा जन्म वार असेल.
उदाहरण :
जन्म तारीख : २१ ०८ १९७३
१) जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक ७३ आहेत. यांना ४ ने भागले असता १८ पूर्णांक मिळाला.
२) आलेला पूर्णांक १८ मूळ जन्मवर्ष ७३ मध्ये मिळवला असता १८+ ७३ = ९१ ही संख्या मिळाली.
३) वरील संख्या ९१ मध्ये जन्मतारीख २१ ही मिळवली असता ११२ ही संख्या मिळाली.
४) आलेल्या ११२ या संख्येमध्ये ऑगस्ट या जन्म महिन्याला दिलेला ३ हा अंक व २० व्या शतकाचा अंक ० मिळवला असता ११२ + ३ + ० = ११५ ही संख्या मिळाली.
५) वरील आलेल्या ११५ या संख्येला ७ ने भागले असता १६ पूर्णांक येऊन ३ बाकी मिळाली त्यामुळे जन्म वार हा मंगळवार आला.
आपण ही या पद्धतीने जन्म तारखे वरून पटकन गणित मांडून एखाद्यास जन्म वार सांगून चकित करू शकता.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)