
विषय : भक्तीमार्गी आणि अध्यात्मिक प्रगतीच्या कुंडलीतील पाऊल खुणा
लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा खंड ३ रा
मूळ लेखक : ज्यो. कृष्णराव वाईकर
नमस्कार,
आज आपल्याला बरेचसे जग भौतिक सुखांच्या प्राप्तीकरता धडपडताना दिसत आहे. पण असेही लोक आहे ज्यांना भक्तिमार्गाची, परमार्थाची, अध्यात्मिक प्रगतीची आस आहे. कुंडलीत या गोष्टींचा शोध घेत असताना ज्येष्ठ ज्योतिर्विद कृष्णराव वाईकर यांचा कुंडलीची भाषा खंड ३ रा हा ग्रंथ वाचनात आला. त्यात याबाबत माहिती दिलेली आहे. तीच येथे संकलित व स्वैर स्वरूपात येथे देत आहे.
भक्तीमार्गी
पंचमस्थान हे उपासनेचे स्थान आहे व व्यय स्थानावरूनवरुन अध्यात्मिक ज्ञान, तत्वज्ञान वगैरेचा बोध होतो. त्यामुळे
१) व्ययेश पंचमात असता, जातकाचा उपासना व ईश्वर भक्तीकडे कल असतो.
२) हाच योग पंचमेश शुभ ग्रह असून व्ययात शुभस्थिती असताही घडुन येतो.
उदा.- सिंह लग्र पंचमेश गुरु व्ययात उच्च, शुभग्रह संबंधीत असता श्रेष्ठ उपासना द्वारे जन्मभर मोक्षप्राप्तीच्या मार्गात हे जातक असतात.
३) नवमावर शुभदृष्टी असता जातक धर्मनिष्ठ व गुणवान असतो.
४) व्ययेश दशमात दशमेशयुक्त असता धार्मिक अगर धर्मदाय कामात खर्च करतो. व्यय-खर्च, दशम-कृती, दशमात बलवान झाल्यामुळे धर्मदाय कामात खर्च करतो.
५) व्ययस्थानावर शुभग्रहांची दृष्टी असता जातक एकांतवासाकडे वळतो व अध्यात्मिकाचा व्यासंगी असतो.
६) व्ययस्थान पापकर्तरीत व्ययेशावर पापग्रहाची दृष्टी अगर वास्तव्य असता क्षुद्र देवतांची उपासना व करणीसारखे प्रयोग करणे व शेवटी त्याच्यावर उलटणे अशा गोष्टी दिसून येतात.
७) व्ययेश लाभात लाभेशयुक्त असता धंद्यात पिछेहाट व तोटा देतो. ह्या भावात कोणत्या ग्रहाकडून लामेश व व्ययेश योग दुषित झाला असेल. त्या ग्रहाने दर्शविलेल्या व्यक्तीकडून तोटा सहन करावा लागतो.
पंचमेश असता पुत्रांच्या वागणूकीमुळे तृतीयेश संबंधीत असता बंधुकडून तोटा होतो. चतुर्थेश असता मातेकडून, सप्तमेश असता स्त्रीकडून तोटा होतो.
८) लग्न अगर लग्नेश बलवान असता व व्ययेश शुभ ग्रहयुक्त असता जावकपेक्षा आवक जास्त असते व शुभग्रहाच्या दशेत चांगल्या कामात पैसा खर्च होतो.
दयाळु परोपकारी व्यक्ती खालील योगावर जन्मास येतात :
या योगात चतुर्थ दशमाचे स्वामी केंद्रात शुभ स्थितीत असतात व व्ययेश हा गुरुने, नवमस्वामीने दृष्ट असतो. चंद्र अगर बुध शुभस्थितीत असतात.
चंद्र हे मन, बुध ही बुध्दी यांचे हे प्रेरक ग्रह आहेत. ते मनाचा व बुध्दीचा कल दाखवितात.
चतुर्थावरुन माणसाची विचारसरणी कळते. अंतःकरणातील विचार पक्के झाल्यावर ते कृतीत उत्तरतात. त्यावरुन खर्च करण्याची उदारताही व्ययस्थान दाखविते.
म्हणून ही स्थाने व ग्रह शुभसंबंधित बलवान असावी लागतात.
नवमस्थान हे परोपकारी दृष्टी देते.
चंद्र व बुध दुषित असता दानधर्म अगर परोपकारात नावलौकीक होण्याकरता दानधर्म करतो व परोपकाराचे बाह्य दिग्दर्शन फक्त होते.
लग्नेश भाग्येश परिवर्तनयोग परोपकार बुध्दीस चांगला असतो.
नवमेश व्ययात अगर नवमेश नवमांशात शुभगृही हे दानधर्मास पोषक आहे.
लग्नेश गुरु, नवमेश पाप नवमांशात अगर क्रूर षष्ठांशात दानधर्मात स्वतःचे नावलौकिक होण्याचा उद्देश असतो.
जैमिनी सूत्र नुसार :
जैमिनीसुत्राप्रमाणे आत्माकारक ग्रह हा कुंडलीत फार महत्वाचा आहे व त्याची जन्मकुंडलीतील व नवमांशामधील स्थितीही महत्वाची बाब ठरते. आत्माकारक नवमांशात मीन राशीत असता जातक सर्वसंगपरित्याग करील. कालपुरुषाच्या कुंडलीत मीन राशी ही मोक्षराशी ठरते.
मरणोत्तर परिस्थितीचा विचार या स्थानावरुन करतात.
व्ययस्थानात शुभ ग्रह असणे अगर व्ययभाव शुभकर्तरीत असता जातक मोक्षाप्रत जातो.
दशमेश गुरु असून व्ययात असता व शुक्र अगर पूर्ण चंद्राने दृष्ट असता अगर शुभसंबंधीत रविने दृष्ट असता जातक मरणोत्तर चांगल्या लोकांत जातो.
कारक अमांशाच्या व्ययात केतू असता कैवल्यधाम प्राप्त होते व पुनर्जन्म येत नाही. व्ययात केतू हा मोक्षकारक असतो.
अध्यात्मिक प्रगती :
अध्यात्मिक बाबतीत कुंडलीचा विचार करतांना कुंडलीचे महत्वाचे चार विभाग पडतात.
त्यांना धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, कामत्रिकोण व मोक्ष त्रिकोण अशी नावे आहेत. या चार पुरुषार्थापैकी धर्मत्रिकोण व मोक्ष त्रिकोण ही अनुक्रमे (१-५-९) व (४-८-१२) ही स्थाने अध्यात्मिक प्रगती करता उपयोगी पडतात. या स्थानातील ग्रह ही स्थाने व या स्थानाचे स्वामी व या स्थानात असलेले विशिष्ट ग्रह योग विचारात घ्यावे लागतात.
प्रत्येक योगाची फले साध्य होण्यास लग्न व लग्नेश बलवान असावयास पाहिजे.
राशींमध्ये धनु, मकर, कुंभ, मीन ह्या काळ पुरुषाच्या कुंडलीतल्या अध्यात्मिक राशी आहेत. ह्यांचे स्वामी हे गुरु शनि हे आहेत व ते अध्यात्मिक प्रगतीत मुख्य ग्रह ठरतात.
विशिष्ट परिस्थितीत राहूचाही विचार होतो. पण केतू हा मात्र मोक्षकारक मानला गेला आहे व व्ययस्थान हे त्याचे कारक स्थानच आहे. शिवाय आत्माकारक रवि, मनःकारक चंद्र, बुध्दिकारक बुध, उत्साह व शक्तीचा कारक मंगळ ह्यांची तपाचरण व प्रगती करण्यास साथ लागते.
स्थानामध्ये पंचम, नवम ही पूर्वपुण्य स्थाने आहेत.
पंचमावरुन उपासना भक्ती, पूर्वसुकृत, धर्म शास्त्र, मंत्रशास्त्र प्रगती वगैरे पहातात.
नवम स्थानावरुन धर्मश्रध्दा, धार्मिक आचार विचार, दानधर्म हे पहातात.
चतुर्थ हे मनातील विचारांचे स्थान आहे व विचार परिपूर्ण झाल्यावर ते कृतीत उतरतात. ते दशम स्थानावरुन समजते.
व्ययस्थानावरुन परोपकारवृत्ती व मोक्षप्राप्ती-सद्गती ईश्वरोपासना वगैरे पहातात.
पंचमेश व्ययेश संबंध अगर अन्योन्य योग ईश्वरभक्ती अगर उपासना ही श्रेष्ठ दर्जाची देतात.
अध्यात्मिकाच्या संबंधात गुरु हा पाया आहे. तो सत्वगुणप्रधान असून देवांचा गुरु आहे. तो आपल्या स्पर्शाने दृष्टीकटाक्षाने मातीचे सोने करण्याची किमया करणारा ग्रह आहे. हा कुंडलीत शुभस्थानी असता माणसे सद्गुणी व ईश्वरप्रणित होतात व जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. हाच ग्रह भक्तीची प्रेरणा देणारा, परोपकार करणारा, सद्बुध्दी देणारा आहे. गुरु सचिदानंद आहे. त्याचे अधिष्ठान असल्याखेरीज अंतःकरणास खरे समाधान व शांतता मिळणार नाही. अध्यात्मिकाच्या बाबतीत याच गोष्टीची प्रामुख्याने आवश्यकता भासते. म्हणून शुभस्थितीतला गुरु हा जातकास अध्यात्मिकाचा पाया रचण्यास सर्वश्रेष्ठ गुरु आहे. गुरुविरहीत अध्यात्माची सर्व अंगे लंगडी पडतात.
लग्नातील गुरुपेक्षा चतुर्थ गुरु जास्त महत्वाचा आहे. याच स्थानातील गुरु मोक्षत्रिकोणात येतो व चतुर्थात राहून दोन अनिष्ठ स्थानावर पंचम व नवम दृष्टी ठेवतो व दशम ह्या कृती तपाचरण स्थानावरही सप्तम दृष्टीने पहातो.
अष्टम व्ययावरील दृष्टीमुळे गंगास्नान व उर्ध्वगतीला पोषक ठरतो.
सद्वर्तनाचा पाया जरी गुरुने दिला तरी कळसापर्यंत जाण्यास तपाचरण, कष्ट, सातत्य, एकाग्रता यांची जरुरी असतेच.
या सर्व गोष्टी शुभसंबंधित शनि सहजगत्या घडवून आणतो. ज्ञानयोग देणाऱ्या गुरुस ध्यानयोग देणाऱ्या शनिची जोड असल्याखेरीज खरा मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होणार नाही. याकरता शनिशी गुरुचा संबंध पाहिजे. मग तो राशी परत्वे असो नक्षत्रपरत्वे असो अगर दृष्टीपरत्वे असो पण शनि हा गुरुच्या पकडीत पाहिजे.
गुरुची शनिवर पकड नसता व शनिची गुरुवर पकड असता शनि हा गुरुला भौतिक वादाकडे ओढतो व गुरुच्या खऱ्या स्वरुपाचा लोप होतो. व शनि आपल्या स्थायी भावाप्रमाणे जडवादाकडे गुरुला खेचतो. असे लोक सत्प्रवृत्त व धार्मिक असले तरी ऐहिक संसारातून बाहेर पडत नाहीत व संसारात राहून संसाराचे धक्के खात जन्मभर बसतात. प्रवृत्ती सत्शील असल्यामुळे धर्म कर्म करीत राहतात. धर्मोपदेशक, प्रवचनकार, किर्तनकार या सदरात मोडतात किंवा मुमुक्षु अवस्था संपवून ते साधक दशेच्या कनिष्ठ पातळीवर घुटमळत असतात. त्यांचे स्थान कोणते हे समजून घेण्याकरता गुरु-शनि यांच्या बलाबलाचा विचार करावयास पाहिजे. गुरुचे प्राबल्य असून इतर काही अशुभ राशी, योगराशी, नक्षत्रपरत्वे असल्यास आत्मसाक्षात्कारापर्यंत जातात. पण ते पद टिकविता येत नाही. लहान लहान सिध्दीच्या मागे लागून व त्यातच गुरफटून सिध्दावस्थेऐवजी खालच्या पातळीवर येतात. शुभयोग असल्यास आत्मसाक्षात्कार झाल्यावर सिध्दपुरुष म्हणून जगत राहतात व दुःखी लोकांना मार्गदर्शन करतात.
अध्यात्मिक योग, संन्यासयोग, निवृत्तीयोग, प्रवज्या योग
केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानाबद्दल ऐहिक दृष्टी विशेष चांगली फले देत नाहीत. त्याचा गुणधर्म ऐहिक सुख नष्ट करुन परमार्थ तृष्णा वाढवितो. हा ग्रह चंद्राच्या नवमांशात अगर कारक अंशात याच्या ५-९-१२ स्थानी असल्यास व गुरुच्या दृष्टीपथात असल्यास मनुष्य अध्यात्म मार्गाकडे वळतो.
योग –
१) केतू हा लग्नांच्या नवमात असून जर चंद्राच्या पंचमात गुरु दृष्ट असता अध्यात्मविद्येची प्राप्ती होतो. तसेच कारक अमांशाच्या व्ययातील केतू शुभ ग्रह दृष्टीयोगात असता मोक्षप्राप्ती अगर विदेही अवस्था देतो.
केतू हा एक अध्यात्मिक ग्रह ला मोक्ष कारक म्हटले आहे. हा समाधी व ध्यानधारणा देणारा ग्रह आहे. अध्यात्म बाबतीत हा नवम व गुरुदृष्ट असता अगर लग्नाच्या नवमात असून चंद्राच्या पंचमात व गुरुशी संबंध आल्यास श्रेष्ठ पारमार्थिक योग होतो.
वृषभ लग्न भाग्यात मकरेचा केतू व चंद्राच्या पंचमात असता त्याचा स्वामी शनि हा दशमात शुभस्थितीत पंचमेश बुधाने युक्त असून गुरुने दृष्ट असता अध्यात्मिक प्रगती वरच्या दर्जाची असते. हा योग वृषभ लग्नाला चांगला होतो.
२) पंचम दशमातले ग्रह, लग्न, नवम, दशमभाव हे बलवान असल्यास जातक चारीही वेद व धर्म शास्त्र यात पारंगत होतो. अंतर्ज्ञानी होतो.
३) दशमात तीन ग्रह उच्च, स्वगृही व शुभवर्गात व दशमेश बलवान असता जातक संन्यासी होतो.
४) चार ग्रह दशमात असता विरक्त होतो.
५) दशमेशासह पाच ग्रह केंद्र कोणात असता जीवनमुक्त महात्मा जन्मास येतो. या वरील दोन योगात (४-५ मध्ये) रवि असल्यास अस्तगंत योग झाल्यास जातक जरी धार्मिक व परलोक विद्येत पारंगत असला तरी संसार सोडणार नाही. जगाशी संपर्क राहिल.
६) लग्नेश फक्त शनिने दृष्ट असता जातक संन्याशी होतो. मात्र या योगात शनि हा कोणत्याही ग्रहाने दृष्ट नसावा व शनिच्या बलवत्तेचाही विचार करावयास पाहिजे.
७) लग्नेश शनिला पहात असता जातक संन्यासी होतो, पण लग्नेश मात्र कोणत्याही ग्रहाने दृष्ट नसावा व शनिच्या बलवत्तेचाही विचार करावयास पाहिजे.
८) शनिच्या राशीत चंद्र असून अगर शनिने अगर मंगळाने युक्त अगर दृष्ट असा द्रेष्काण कुंडलीत असता संन्यास योग होतो. (विवेकानंद यांच्या कुंडलीत हा योग होता.)
९) दशमस्थान मीनेचे असून व तेथे शनि असता जातक संन्यासी होतो. (पाराशरी प्रमाणे)
१०) शनि केंद्रात असून दुर्बल चंद्र स्वामीने दृष्ट असता प्रवज्या योग होतो.
११) जर लग्न चंद्र व गुरु हे शनिच्या दृष्टीत असल्यास जातक संन्यास मार्ग पत्करेल.
१२) दशमेश राहूने युक्त असता संन्यास योगाचा भंग होतो. संन्यास अगर प्रवज्या योगात शनि बलवत्ता महत्वाची आहे. लग्नी राहू हा संन्यास योग भंग करणारा आहे.
१३) पंचमेश व्ययेश संबंधित अगर पंचमेश व्ययेशाशी किंवा व्ययस्थ ग्रहाशी संबंधित असता ईश्वरभक्ती योग होतो.
१४) व्यय भावात शुभ ग्रह अगर व्यय भाव शुभ कर्तरित असता अगर व्ययात योगकारक ग्रह मीनेतल्या गुरुने दृष्ट असता श्रेष्ठ अध्यात्मिक योग होतो.
१५) कारक अमांशातील केतू व्यय स्थानात असता मोक्ष प्राप्त होतो. तसेच कारक अमांशात पापग्रहही निवृत्ती योग देतात.
१६) व्ययेश अष्टमात उच्च व भाग्येश व्ययात असल्यास प्रगती चांगली व उर्ध्वगती योग होतो.
१७) धर्मकर्माधिपयोग व्ययात व लग्नातील बुध गुरुने दृष्ट व लग्नेश मंगळाने दृष्ट असता श्रेष्ठ अध्यात्मिक योग होतो. हा योग वृश्चिक लग्नाला होतो.
अध्यात्मिकाच्या बाबतीत किंवा ईश्वर भक्तीमध्ये कारक आमांशाचा फार मोठा वाटा आहे. कुंडलीत जो ग्रह जास्त अंश गेलेला असतो त्याला आत्माकारक ग्रह म्हणतात. जैमीनी ह्या ग्रहाला अधिक ग्रह म्हणतो. पण ही पूर्व कल्पना पराशराचीच आहे. आत्माकारक ग्रह ज्या नवमांशात असतो त्या नवमांशातला कारक अमांश ही संज्ञा आहे व ह्या कारक अमांशाच्या १-५-९-१२ व्या स्थानी गुरुचे महत्य अध्यात्मिक बाबतीत फार आहे. कारक अमांशाच्या व्ययात गुरु शनि व मोक्ष कारक केतू असता अध्यात्मिक प्रगती फार दिसून येते. अष्टम, व्ययातला गुरु हा अध्यात्म प्रगतीस चांगला समजावा. विरक्ती करता शनिचा आधार लागतो. संन्यास व विरक्तीचा शनि हा मुख्य व आधारभूत ग्रह आहे. शनिच्या सहाय्याखेरीज जातक संन्यासी होऊ शकत नाही. नवम स्थानाला एकटा शनि पाहात असता जातक घरदार सोडून निवृत्ती मार्गाकडे वळतो.
शुभं भवतु !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)