अतुल परचुरे यांना भावपूर्ण आदरांजली 🙏


सुन्न !!!
आधीच आमच्या पिढीमध्ये हयात आदर्श व्यक्तिमत्त्वांची कमतरता आहे. त्यातही जी व्यक्तिमत्त्वं आहेत ती एकेक सोडून जायला लागल्यावर आमच्या पिढीने कोणाकडे आशेने बघायचं? रतन टाटांचा धक्का नुकताच लोक पचवत होते. आणि अगदी कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या वयामुळे कधी ना कधी ही वेळ येणार याची कल्पना होतीच. पण अतुल परचुरे? आधीच कॅमेरासमोर उभं राहून न विसरता वाक्य म्हटली म्हणजे अभिनय जमला असे मानणारे तरुण हौशी नट आणि अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊनही वैश्य आणि वेश्या यातला फरक न समजणारे नट ( सन्माननीय अपवाद वगळता)यांच्या सद्दीत आम्ही असताना अतुल परचुरे सारखे अभिनेते नैसर्गिक अभिनय आणि अभ्यासू वृत्ती यांचा एक वस्तुपाठ घालून देत होते. कोणत्याही चित्रपटातली अतुल परचुरेची एका मिनिटाची भूमिका काढून पाहिली, तरी अभिनय काय असतो हे कळतं. मधुकर तोरडमलांनी अतुल असल्याशिवाय तरुण तुर्कचा प्रयोग करायचा नाही असं का म्हटलं असेल हे कुंदा भागवत पाहून कळतं. स्त्रैण भूमिका, शारीर होऊ न देता विनोदी कशी करायची हे कोणत्याही नटाने शिकावं असा कुंदा ! एखादी पंचलाईन सुद्धा शिळी होऊ न देता पूर्ण चित्रपटात कशी खुलवावी यासाठी गोलमाल (मराठी) मधला डिटेक्टिव्ह भाभि बघावा. मार खाऊन सुद्धा मजा आली…पण पूर्वीचा दम नाही राहिला तुझ्यात या लाईनवर लाफ्टर कसा काढावा यासाठी बे दुणे साडे चार मधला धोडपकर बघावा. काका किशाचा मधला विसरभोळा बापट, नवरा माझा नवसाचा मधला वॅकीचा मित्र, नारबाची वाडी‌मधला ज्योतिषी, वादळवाट, होणार सून मी, किती नावं घ्यायची…आणि अर्थात आमच्या पिढीसाठी पुलं पुन्हा जिवंत करणारा अभिनेता म्हणूनही त्याचं आमच्यावरचं ऋण मोठं आहे.
आधी रसिका जोशी आणि आता अतुल परचुरे…कर्करोगाने आमचे दोन लाडके मोती आमच्यापासून अकाली हिरावून घेतलेत, आधीच आमच्या पिढीत ज्यांचे पाय धरावेत असे लोक कमी, त्यात ज्यांचे पायही धरावे आणि गळाभेटही घ्यावी अशी ही माणसं जर अकाली हिरावून घेतली, तर उथळ मनोरंजनाच्या जमान्यात सकस खुराकाची कमतरता आमच्यासारख्यांनी कशी भरुन काढायची?
या प्रश्नांची उत्तरे कधीच न‌ मिळणारी आहेत. आणि काळ पुढे जाताना त्यात भरच पडत्ये.
श्रद्धांजली हा शब्द इतक्या लवकर अतुल परचुरेसाठी असूच शकत नाही.
एरंडाच्या झुडपांमधल्या मोजक्या कल्पवृक्षांपैकी एक होतात तुम्ही ! आणि राहाल !!

घनश्याम सारडा
पुणे🙏🙏

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment