चोरी कोणी करेल तर


विषय : चोरी कोणी करेल तर

लेखक व संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद 

संदर्भ : भारतीय ज्योतिष सिद्धांत

मूळ लेखक : ल.म. सहस्रबुद्धे 

नमस्कार,

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण मेहनतीने, बुद्धी कौशल्याने नियोजन करून भविष्याची तरतूद म्हणून धनसंचय, दागिने जमा करत असतो. घरी सणवारी अथवा विशिष्ट प्रसंगी बँकेत ठेवलेले पैसे दागदागिने घरी आणतो, ऑफिस मध्ये व्यवसायानिमित्त रोख रक्कम बाळगत असतो. अथवा नोकरीत रोख रक्कम ने आन करण्याची जोखीम पत्करावी लागते. काहीना घरीच ऐवज ठेवण्याची सवय असते. आपण योग्य ती सुरक्षितता व सावधानी बाळगतच असतो. पण वाईट वेळ काय तुम्हाला सांगून येत नाही. जर अशावेळी चोरी झाली, तर आभाळ कोसळते आणि सुचायचे बंद होते. आजच्या काळात गुन्हा अन्वेषण तंत्र बरेच विकसित झालेले असले तरी, जसजse दिवस पुढे जात राहतील, तस तसे दरवेळी मुद्देमाल सही सलामत परत मिळेल याची शक्यता धूसर होत जाते. तसेच पोलीस चौकशी, कोर्ट ई. ससेमिरा मागे लागतो आणि चोरीच्या दु:खाबरोबर च मनस्ताप मिळतो तो वेगळाच.

ज्योतिष शास्त्रात देखील चोरी प्रश्नाचा आपल्या पूर्वासुरींनी वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, ज्यामुळे कोठे शोध घ्यायचा या बद्दल दिशा मिळू शकते. व वेळेत त्या दिशेने प्रयत्न केल्यास कदाचित गेलेला ऐवज सुखरूप परत प्राप्त होऊ शकतो.

आज असेच काही चोरी या संदर्भातील ठोकताळे आपल्या समोर ठेवत आहे.

१) प्रश्नलग्न स्थिर राशी असेल किंवा स्थिर राशीच्या नवमांशात प्रश्नलग्न असेल किंवा स्वतःच्या वर्गोत्तम नवमांशाची प्रश्नलग्न राशी असेल, तर बंधु, स्वजातीय, उच्चजातीय, व्यक्ती किंवा नोकर चोर असू शकतो.

२) प्रश्नलग्न प्रथम द्रेष्काणात असेल, तर चोरीला गेलेली वस्तू घराच्या दाराजवळ, द्वितीय द्रेष्काणात असेल तर घराच्या मध्य भागात आणि तृतीय द्रेष्काणात असेल तर घराच्या मागच्या भागात असते.

३) लग्नात गुरू दृष्टीयुक्त पूर्ण चंद्र असता, तसेच शीषोंदय राशी ३।५।६।७।८।११ लग्नात असेल, तसेच लग्नात बलवान आणि शुभग्रह स्थित असतील आणि लग्नेश, सप्तमेश, दशमेश, लाभेश, बलवान चंद्र परस्पर मित्र असतील किंवा इत्यशाल ई. शुभ योग होत असतील, तर चोरीला गेलेली वस्तू पुन्हा सापडण्याची शक्यता असते.

४) बली किंवा पूर्ण चंद्र लग्नात, शुभग्रह शीर्योदय किंवा लाभ स्थानी असेल, तसेच शुभग्रहाने युक्त किंवा दृष्ट असेल, तर चोरीला गेलेले धन सापडते. पूर्ण चंद्र लग्नात असेल, गुरू किंवा शुक्राची त्यावर दृष्टी असेल किंवा शुभग्रह लाभ स्थानी असेल, तरी चोरीला गेलेले धन परत मिळते.

५) प्रश्नकाळी जो ग्रह केंद्रात असेल, त्याच्या दिशेला चोरीला गेलेली वस्तू असण्याची शक्यता असते. जर केंद्रात दोन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रह असतील, तर त्यांच्यात जो बली असेल, त्या ग्रहाच्या दिशेला चोरीला गेलेली वस्तू असण्याची शक्यता असते. जर केन्द्रात ग्रह नसेल, तर लग्न राशीच्या दिशेला चोरीला गेलेली वस्तू असण्याची शक्यता असते.

६) सप्तम स्थानी शुभग्रह असता किंवा लग्नेश सप्तमात स्थित असता किंवा क्षीण चंद्र सप्तमात असेल,  तर चोरीला गेलेली वस्तू किंवा विसरलेली वस्तू मिळणे अवघड असते. सप्तमेश व चंद्र सूर्याबरोबर स्थित असता, चोरीला गेलेली वस्तू मिळत नाही.

७) ३।५।७।११ व्या स्थानात शुभग्रह असतील, तर प्रश्नकर्त्याला धन मिळते.

८) लग्नावर सूर्य, चंद्राची दृष्टी असेल, तर अगदी जवळची व्यक्ती चोर असण्याची शक्यता असते.

९) लग्नेश आणि सप्तमेश लग्नात असतील, तर कुटुंबातील व्यक्ती चोर असण्याची शक्यता बळावते’.

१०) सप्तमेश २।१२ व्या स्थानी असेल, तर नोकर चोर असू शकतो.

११) मेष प्रश्न लग्न असता ब्राह्मण, वृषभ असता क्षत्रिय, मिथुन लग्न असता वैश्य, कर्क लग्न असता शूद्र, सिंह लग्न असता अन्त्यज, कन्या लग्न असता पत्नी, तूळ लग्न असता पुत्र, भाऊ किंवा मित्र, वृश्चिक लग्न असता नोकर, धनु लग्न असता पत्नी किंवा भाऊ, मकर लग्न असता वैश्य, कुंभ लग्न असता मनुष्येतर प्राणी उंदीर ई. चोर असण्याची शक्यता असते. आणि मीन लग्न असता वस्तू विसरली असे समजावे.

१२) चर प्रश्न लग्न असता दोन अक्षरे असणाऱ्या नावाचा चोर, स्थिर प्रश्न लग्न असता चार अक्षरे असणाऱ्या नावाचा चोर आणि द्विस्वभाव लग्न असता तीन अक्षराच्या नावाचा चोर असू शकतो.

१३) चर प्रश्न लग्न असता चोराच्या नावाचे पहिले अक्षर संयुक्त असू शकते. उदा. प्रकाश, ब्रिजेश इत्यादी. स्थिर लग्न असता कृदन्त पदसंज्ञक वर्ण चोराच्या नावाचे प्रथम अक्षर असू शकते. उदा. भवानी प्रसाद, मंगलसिंह ई. द्वि स्वभाव लग्न असता स्वर्णवर्ण चोराच्या नावाचे प्रथम अक्षर असू शकते. उदा. उमाशंकर, उमसेन, ईश्वरी ई.

प्रश्न लग्नानुसार चोर आणि चोरीच्या वस्तूचा विचार :

१) मेष लग्नात चोरी झाली किवा प्रश्नकाळी मेष लग्न असता चोरीची वस्तू पूर्व दिशेला असू शकते. चोर ब्राह्मण जातीचा असू शकतो आणि त्याचे नाव ‘स’ अक्षराने असू शकते. नाव दोन किंवा तीन अक्षराचे असू शकते.

२) वृषभ लग्नात वस्तू चोरीला गेली किंवा प्रश्नकाळी वृषभ लग्न असता चोरीची वस्तू पूर्व दिशेला गेलेली असू शकते. चोरी करणाऱ्या माणसाची क्षत्रिय जात आणि त्याच्या नावातील पहिले अक्षर ‘म’ तसेच नाव चार अक्षरी असू शकते.

३) मिथुन लग्नात चोरीला गेलेली वस्तू किंवा प्रश्नकाळी मिथुन लग्न असता चोरीची वस्तू आग्नेय दिशेला असू शकते. चोरी करणारी व्यक्ती वैश्य वर्णाची व त्याचे नाव ‘क’ वर्गातील असून त्यात तीन अक्षरे असू शकतात.

४) कर्क लग्नात वस्तू चोरीला गेली असता किंवा प्रश्नकाळी कर्क लग्न असता चोरीची वस्तू दक्षिण दिशेला, चोरी करणारा शूद्र किंवा अन्त्यज असू शकतो. त्याचे नाव ‘त’ काराने सुरू आणि नावात तीन अक्षरे असू शकतात.

५) प्रश्नकाळात किंवा चोरीच्या वेळी सिंह लग्न असता चोरीची वस्तू नैऋत्य दिशेला, चोरी करणारा नोकर असू शकतो. आणि तो अन्त्यज किंवा कोणत्याही निम्न श्रेणीच्या जातीचा व चोराचे नाव ‘न’ काराने सुरू होणारे तीन किंवा चार अक्षरांचे असू शकते.

६) प्रश्नकाळी किंवा चोरीच्या वेळी कन्या लग्न असता चोरीला गेलेली वस्तू पश्चिम दिशेला असू शकते. चोरी करणारी व्यक्ती स्त्री व तिचे नाव ‘म’ कारापासून सुरू होऊन नावात बरीच अक्षरे असू शकतात.

कन्या लग्नात बुध आणि चंद्राचा नवांश असता ब्राह्मण स्त्री चोर असू शकते. मंगळाचा नवांश असेल तर क्षत्रिय स्त्री, शुक्राचा नवांश असेल तर वैश्य जातीची स्त्री आणि शनी रविचा नवांश असेल, तर शूद्र किंवा इतर खालच्या जातीची स्त्री चोर असू शकते.

७) प्रश्न काळी तूळ असता चोरीला गेलेली वस्तू पश्चिम दिशेला, चोरी करणारा पुत्र, मित्र, भाऊ किंवा एखादा जवळचा नातेवाईक असू शकतो. त्याचे नाव ‘म’ काराने सुरू होऊन नावात तीन अक्षरे असू  शकतात. तूळ लग्नात गुरू, चंद्र आणि बुधाचे नवांश असेल, तर चोरी करणारी व्यक्ती कुटुंबातील, मंगळ आणि रवीच्या नवांशात लांबचा नातेवाईक आणि शनीच्या नवांशात आलेला पाहुणा किंवा इतर परिचित व्यक्ती ज्या व्यक्ती बरोबर केवळ थोडी ओळख असते ती व्यक्ती चोर असू शकते.

तूळ लग्नात चोरीला गेलेली वस्तू फार मुश्किलीने प्राप्त होते.

८) प्रश्न काळी वृश्चिक लग्न असता चोरीला गेलेली वस्तू पश्चिम दिशेला, चोरीची वस्तू घरापासून १००-१५० मीटरच्या अंतरातच असू शकते. चोर घरातील नोकरच असू शकतो. त्याचे नाव ‘स’ काराने सुरू होऊन नाव चार अक्षरी असू शकते. याच लग्नाचा नवांश गुरू किंवा शुक्राचा असेल तर चोरीची वस्तू सापडू शकते. तसेच चोरी करणारी व्यक्ती उत्तम वर्णाची असते. बुधाचा नवांश असेल तर चोरी करणारा शेजारीही असू शकतो. शेजारी गौर वर्णाचा आणि त्याची उंची साडेपाच फूट, दिसायला चांगला व बडबड्या असू शकतो.

९) प्रश्नकाळात धनु लग्न किंवा धनुचा नवांश असता चोरीला गेलेली वस्तू वायव्येला असू शकते. चोरी करणारी स्त्री असू शकते. तिचे नाव ‘स’ काराने सुरू होऊन नावात एकुण चार अक्षरे असू शकते.  मंगळाच्या नवांशात चोरी झाली, तर चोरी करणारी युवती, बुधाच्या नवांशात चोरी एखाद्या कन्येच्या हातून झालेली असू शकते. शुक्राच्या नवांशात चोरी करणाऱ्याचे वय ७-८ वर्षे असू शकते. तसेच ही चोरी एखाद्या ब्राह्मण किंवा अन्त्यज बालकाकडून होते. धनु लग्नात असून गुरू त्रिकोण किंवा केन्द्रात स्थित असता चोरीला गेलेली वस्तू सापडत नाही. ही चोरी कोणत्यातरी जवळच्या व्यक्तीने केलेली असू शकते. शनीचा नवांश प्रश्नकाळात असेल, तर चोरी पुरूष आणि स्त्री दोघांनी मिळून केलेली असू शकते. पुरूषाचे नाव ‘ह’ किंवा ‘र’ अक्षराने आणि स्त्रीचे नाव ‘स’ ने सुरु होऊ शकते. धनु लग्नात साधारणपणे चोरीला गेलेली वस्तू मिळत नाही. जर प्रश्नकाळात धनु लग्नाचे शेवटचे सहा अंश बाकी राहिले असतील, तर प्रयत्नांती चोरीला गेलेली वस्तू सापडू शकते.

१०) प्रश्नकाळात मकर लग्न असता चोरीला गेलेली वस्तू उत्तर दिशेला असू शकते. चोरी करणारी व्यक्ती वैश्य जातीची, नावाचे प्रथम अक्षर ‘स’ ने सुरू होऊन चार अक्षरी नाव असू शकते. मकर लग्नात शनीच्या नवांशात चोरीची वस्तू सापडत नाही. गुरूचा नवांश असेल तर चोरीला गेलेली वस्तू एखाद्या धर्मस्थान, मंदिर, विहीर किंवा तीर्थस्थानात वस्तू असू शकते.

११) प्रश्नकाळात कुंभ लग्न असता चोरीला गेलेली वस्तू उत्तर किंवा वायव्येला असू शकते. प्रश्न लग्नानुसार चोरी करणारा मनुष्य ऐवजी उंदीरच ई. वस्तू इकडे-तिकडे कातरू शकतो. ही वस्तू एक महिन्याच्या आतच सापदु शकते. प्रश्नकाळात बुधाचे नवांश असेल, तर वस्तू पलंग किंवा गिरणीमागे असू शकते. शुक्र आणि चंद्राच्या नवांशात चोरीची वस्तू शयनकक्षात किंवा त्या शेजारच्या खोलीत असू शकते.

१२) मीन लग्नात वस्तूची चोरी झाली असेल किंवा प्रश्नकाळात मीन लग्न असेल, तर ईशान्येला वस्तू असू शकते. चोरी करणारा शूद्र किंवा अन्त्यज असू शकते आणि ती वस्तू चोर जमिनीखाली ठेवू शकतो. त्या चोराचे नाव ‘व’ अक्षराने सुरू होऊन नावात तीन अक्षरे असू शकतात. मीन लग्नात तृतीय नवांशात चोरी झाली तर चोर स्त्री असू शकते. चोरी करणारी स्त्री घरातील मोलकरीण किंवा इतर कोणी परिचित स्त्री असू शकते.

नक्षत्रानुसार चोरीला गेलेल्या वस्तूच्या प्राप्तीचा विचार :

१) रोहिणी, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, विशाखा, पूर्वाषाढा, घनिष्ठा आणि रेवती ही नक्षत्रे अंधलोचन संज्ञक आहेत. यात हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू पूर्व दिशेला असते आणि ती लगेच मिळते.

२) मृगशीर्ष, आश्लेषा, हस्त, अनुराधा, उत्तराषाढा, शततारका आणि अश्विनी ही नक्षत्रे मन्दलोचन संज्ञक आहेत. यात हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू पश्चिम दिशेला असते आणि बराच प्रयत्न केल्यावर सापडते.

३) आर्द्रा, मघा, चित्रा, ज्येष्ठा, अभिजित्, पूर्वाभाद्रपदा आणि भरणी या नश्वत्रांची मध्यलोचन संज्ञा आहे. यात हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू दक्षिण दिशेला असते आणि ती वस्तू सापडत नाही, मात्र बऱ्याच दिवसानंतर त्या वस्तूसंबंधी बातमी समजते.

४) पुनवर्स, पूर्वाफाल्गुनी, स्वाती मूळ, श्रवण, उत्तराभाद्रपदा आणि कृत्तिका सुलोचन संज्ञक आहेत. यात हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू उत्तर दिशेला असते व ती कधीही सापडत नाही किंवा त्यासंबंधी बातमीही समजत नाही.

५) मधा ते उत्तराफाल्गुनीपर्यंतच्या नक्षत्रात हरवलेली वस्तू जवळपासच सापडते. त्यासाठी फारसे श्रम घ्यावे लागत नाहीत.

६) हस्तापासून धनिष्ठापर्यंतच्या नक्षत्रात हरवलेली वस्तू इतर एखाद्या व्यक्तीच्या हातात सापडते.

७) शततारकापासून भरणीपर्यंतच्या नक्षत्रात हरवलेली वस्तू आपल्याच घरात सापडते.

८) कृत्तिका ते आश्लेषापर्यंतच्या नक्षत्रात हरवलेली वस्तू दृष्टीलाच पडत नाही. ती वस्तू लांब कुठेतरी नेली जाते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment