ज्योतिषीचा दृष्टीकोन एक रूपक कथा


विषय : ज्योतिषीचा दृष्टीकोन एक रूपक कथा

स्वैर लेखन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : ओशोंची एक फोरवर्डेड पोस्ट

सौजन्य : अभ्यासक शिवाजी कणसे

नमस्कार,

मिडीयावर अनेक पोस्ट फिरत असतात. त्यातील अशीच एक पोस्ट समोर आली व चांगली वाटली. त्याच छोट्याशा रूपक कथेचा स्वैर अनुवाद येथे देत आहे.

फार पूर्वी एका राज्यात एक ज्ञानी व अनुभवी राज ज्योतिषी रहात होते. त्यांचा मुलगासुद्धा  ज्योतिर्विद्येत त्यांच्याइतकाच प्रवीण होता. एकदा राजाची तब्येत खालावल्याने त्यांना दरबारात पाचारण करण्यात आले. दोघे दरबारात गेले. दोघांनी राजाच्या कुंडलीचे सूक्ष्म परीक्षण केले.

मुलगा म्हणाला, हे राजा तुम्हाला वाईट वाटेल, पण सत्य सांगणं हे माझं काम आहे. तुम्ही फार काल जगाल असे वाटत नाही. माझ्या अभ्यासानुसार तुमचं आयुष्य आता सात दिवसांचं उरलेलं आहे.

भर दरबारात ही क्लेशदायक भविष्यवाणी ऐकून त्यास अपमान झाल्याचे वाटले आणि हे ऐकून राजा भयंकर संतापला. त्याने त्या ज्योतिष्याच्या मुलाला अभद्र भविष्य वाणी केल्याबद्दल चाबकाचे फटके मारून हाकलून देण्याचा आदेश दिला.

आता वडील पुढे सरसावले. ते म्हणाले, हे राजन माह्या कुंडली निरीक्षणानुसार तुमचं साम्राज्य लवकरच विस्तारणार आहे आणि तुमच्या सगळ्या चिंता-विवंचनांमधून तुम्ही लवकरच मुक्त होणार आहात. तुमच्या कुलदेवतेची उपासना करून पुढील मार्ग सुकर होवो असा आशीर्वाद घ्या.

हे ऐकून राजा प्रसन्न झाला व वडिलांचा सुवर्णमुद्रा देऊन सत्कार केला.

दरबारातून बाहेर पडल्यानंतर पाठ चोळत वडिलांबरोबर निघालेला मुलगा रागाने म्हणाला,  तुम्हालाही माहिती आहे की, सम्राट सात दिवसांच्या वर जगणार नाही. तुम्ही त्याला ते का नाही सांगितलंत? खोटं का बोललात?

वडील म्हणाले, मीही त्याला तेच सांगितलं, पण त्याला रूचणाऱ्या भाषेत.

सांगायचे तात्पर्य ज्योतिषी कितीही पारंगत असला, तरी भविष्य कथन करताना जातकाचा स्वभाव, भावना, आजुबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य व सकारात्मक रीतीने सत्य कथन करून त्यावर शक्य असल्यास उपाय सुचवणे खूप महत्वाचे आहे.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment