राशीचक्राचे अंश स्वरूप (कर्क)


विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (कर्क अंश स्वरूप)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक

मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे

नमस्कार,

जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.

त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.

प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.

आज आपण राशिचक्रातील कर्क मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.

कर्क अंश स्वरूप

अंश १ ला

राफेल : एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांचा हात धरून आनंदात मजा करत आहेत.

चारुबेल : ज्याच्या मोठ्या तबकडीवरील आकडे व काटे पूर्णपणे दिसत आहेत व उंच लोलक आहेत असे एक मोठे घड्याळ.

सेफारिअल : उन्हाळ्यातील उन्हात द्राक्षांनी भरगच्च भरलेली एक द्राक्षवेल एका जुन्या भिंतीवर लोंबत आहेत.

अंश २ रा

राफेल : दोन लहान मनोऱ्यांप्रमाणे दोन स्त्रिया उगीच उभ्या आहेत.

चारुवेल : एका लतामंडपात एक मनुष्य फुलझाडास झाऱ्याने पाणी घालीत आहे.

सेफारिअल : एक कुत्रा एका मांसरहित हाडुकावर पाय देऊन उभा आहे व त्याच्यासमोर दुसरे दोघे अर्धवट उपाशी असलेले कुत्रे आहेत.

अंश ३ रा

राफेल : दोन स्त्रिया खाली बसल्या असून समोर दोन मनुष्ये उभे आहेत.

चारुबेल : जमिनीत खोल गेलेला एक खाणीचा भाग असून वरती अगदी समोर आकाशात एक विमान आहे.

सेफारिअल : खिन्न मुद्रेने बसलेली स्त्री, वने अव्यवस्थित, केश मोकळे, हातात कोमजलेल्या फुलांचा गुच्छ, त्यात काही गुलाबाची व काही लिलिची फुले आहेत.

अंश ४ था

राफेल : एक अविवाहित स्त्री उभी असून पुरुषाची वाट पहात आहे.

चारुबेल : पृथ्वीवरून कधीच दिसत नाही ती चंद्राची (दुसरी) बाजू दिसत आहे.

सेफारिअल : एक भोजनाचे टेबल ज्याच्यावर मेजवानी होऊन गेल्यानंतरचे तुकडे वगैरे उष्टे जिन्नस पडले आहेत.

अंश ५ वा

राफेल : एक स्त्री पुरुषाची वाट पहात आहे.

चारुबेल : हातात तराजू समतोल धरणारा मनुष्य.

सेफारिअल : मध्यभागात वाकलेले व तेथूनच वाकडे तिकडे वाढलेले एक लहानसे कोवळे झाड.

अंश ६ वा

राफेल : एका पितळेच्या भांड्यात शेळीला धरून उभा असलेला पुरुष.

चारुबेल : एक जमिनीचा विशेष भाग आखून ठेवला आहे. त्यावर उभे खांब व आडवे गज आहेत. या जमिनीचा लवकरच खळे करणे व घर बांधणे याकडे उपयोग करावयाचा असा बेत आहे.

सेफारिअल : श्रीमंती पोषाख केलेली स्त्री ओटीत काही रत्ने घेऊन त्यांच्याशी खेळत आहे.

अंश ७ वा

राफेल : शिंगांना वादी बांधून त्याला ओढीत नेत असलेला पुरुष.

चारुबेल : एक छानदार मोठे पिकलेले सिताफळ लोंबत असलेले दिसत आहे.

सेफारिअल : एका झाडाच्या बुंध्यावर लोखंडाचे हस्तत्राण, एक तलवार आणि एक चाबूक अशा वस्तू ठेवल्या आहेत.

अंश ८ वा

राफेल : एक घर जेथे एक स्त्री उभी आहे. जणू काय ती मागच्या बाजूने पळून जाण्याच्या विचारात आहे. चारुबेल : एका उंच वृक्षाच्या शेंड्याजवळ बांधलेच्या घंटेची दोरी एक मनुष्य ओढीत आहे.

सेफारिअल : एक पारवा जमिनीवर पडलेला आहे. त्यावर एक साप उडी घालण्याच्या तयारीत आहे.

अंश ९ वा

राफेल : उजव्या हातात पिंजऱ्याचे दंडूक असलेली स्त्री.

चारुबेल : एक कोळी घराच्या कोपऱ्यात असून मूर्ख माशांचा गरगर नाच पहात आहे व निष्काळजीपणाने त्या त्याच्या जाळ्याच्या अगदी नजीक येऊन ठेपल्या आहेत.

सेफारिअल : सुपीक अशा दऱ्यात असलेले एक खेडेगाव.

अंश १० वा

राफेल : आपल्या उजव्या हातात पेटी धरून ठेवलेला पुरुष.

चारुबेल : एक कांद्याचे झाड मातीतून नुकतेच बाहेर पडत आहे आणि आपले सौंदर्य जगाला दाखवण्यास सुरवात करीत आहे.

सेफारिअल : अतिशय विशाल असा ओक वृक्ष. त्याच्या मुळातून लहान लहान रोपें उगवले आहेत. त्याच्या शाखांवरून पक्षी ऋतुपरत्वे गायन करीत आहेत.

अंश ११ वा

राफेल : पाण्यात उभे असलेले जहाज.

चारुबेल : तंतुवाद्य वाजवीत असलेली एक तरुण कुमारी.

सेफारिअल : उथळ वाळूच्या प्रदेशात येऊन लागलेले जहाज.

अंश १२ वा

राफेल : आपल्या खांद्यावर जनावराचे कातडे टाकून नेत असलेला पुरुष.

चारुबेल : ‘सायप्रस’ नावाचे झाड.

सेफारिअल : एका कवटीजवळ ठेवलेला खंजीर.

अंश १३ वा

राफेल : एक मुलगा पुढे उघडे पुस्तक व हातात लेखणी घेऊन बसला आहे.

चारुबेल: खणीत असलेला पुरुष

सेफारिअल : एक चंद्रकोर व दुसरा बहुतेक पूर्ण असे दोन चंद्र असून त्यांच्यामध्ये पौराणिक बुधाच्या हातातली काठी आहे.

अंश १४ वा

राफेल : डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले कोकरू.

चारुबेल : जादुगाराची सर्व उपकरणे आसपास लावून प्रेक्षकासमोर उभा असलेला पुरुष.

सेफारिअल : वसंतऋतूत उत्पन्न होणाऱ्या फुलांचा गुच्छ ज्याच्यावर एक तेजःपुंज तारा असून त्याचे तेजःपुंज किरण नीलवर्ण आकाशात चमकत आहेत.

अंश १५ वा

राफेल : एक घर. त्याच्या छपराच्या खालच्या बाजूस त्याच्या राहण्याच्या जागी एक निजलेला उंदीर. चारुबेल : पाण्याचे डबके.

सेफारिअल : एका उच्च ठिकाणी ठेवलेले सिंहासन असून त्याच्या गादीवर एक कुत्रा निजला आहे.

अंश १६ वा

राफेल : एक पक्षी ज्याने पायाखाली साप धरून ठेवला आहे असा.

चारुबेलः या अंशात काही दिसत नाही. परंतु ४ व १६ यांचे काही तरी गूढ दिसते. चार व त्याचे वर्ग दिसतात.

सेफारिअल : विशाल देहाचा मनुष्य मारलेल्या सिंहावर उभा आहे.

अंश १७ वा

राफेल : एक स्त्री उगीच उभी आहे.

चारुबेल: एक कृत्रिम पृथ्वीदर्शक गोल.

सेफारिअल : विजेची चमक.

अंश १८ वा

राफेल : दोन स्त्रिया टेबलाशी बसून खेळत आहेत.

चारुबेल : एक बैल आपल्या शिंगांनी एका मनुष्याला ढकलून देत आहे.

सेफारिअल : परकीय देशातल्या कोमेजलेल्या सुवासिक फुलांचा गुच्छ. वास अति मधुर आहे, परंतु वास घेण्यास कंटाळा येत आहे.

अंश १९ वा

राफेल : उजव्या हातात भाला आणि डाव्या हातात बासरी असलेला पुरुष

चारुबेल : अति जुने असे दिसणारे पुस्तक पुढे घेऊन बसलेला पुरुष. ते जुन्या दफ्तरासारखे दिसत आहे. सेफारिअल : एक ढाल असून तीवर एक तंतुवाद्य आहे व एक हस्तस्त्राण असे चित्र आहे.

अंश. २० वा

राफेल : रथात बसलेला एक कुत्रा.

चारुबेल : पक्क्या दगडाच्या मितीची एक मोठी इमारत आहे. तिचा देखावा भयाण व उद्वेगजनक दिसत आहे.

सेफारिअल : अति तेजस्वी घोड्यावर बसलेला पुरुष, पोषाख नोकरा प्रमाणे आहे.

अंश २१ वा

राफेल : एक रिकामा रथ.

चारुबेल : घोडयावर बसलेला राजा, बादशहा किंवा सेनापति.

सेफारिअल : मावळणाऱ्या चंद्राच्या ढगातून अंधुक प्रकाश बाहेर पडत आहे व त्या प्रकाशात समुद्रातून एक जहाज दिसत आहे. ते पुढे चालण्यास असमर्थ आहे.

अंश २२ वा

राफेल : रिकामा बसलेला पुरुष

चारुबेल: पुष्कळशी खेळणी किया साधारण काचेचे चमकदार अलंकार.

सेफारिअल : उन्हाच्या तापाने झोपी गेलेला मनुष्य. त्याची आयुधे त्याच्या बाजूला आहेत.

अंश २३ वा

राफेल : वाहणारे पाणी.

चारुबेल : शरीराने मजबूत असा पुरुष. त्याच्यापुढे एक कामाचे वेळी वापरण्याचे वस्त्र ठेवले आहे. सेफारिअल : हातात एक दंड घेऊन पर्वतावर उभा असलेला पुरुष मावळत असलेल्या सूर्याच्या योगाने ज्याचे शरीर अस्पष्ट दिसत आहे.

अंश २४ वा

राफेल : दोन घोडे एक दुसऱ्याच्या पाठीवर उड्या मारीत आहे.

चारुबेल : एक लहानसे प्रार्थनामंदिर. परंतु फार उच्च पद्धतीने सजवलेले आहे.

सेफारिअल : मजबूत असा किल्ला एका उंच खडकावर आहे. त्याच्या भिंताडावर एक निशाण लावलेले आहे आणि त्या निशणाच्या डोक्यावर एक मुकुट आहे व ते निशाण हवेत फिरत आहे.

अंश २५ वा

राफेल : शेतांत धावत असलेला घोडा.

चारुबेल : अतिशय उंच असा देवदाराचा वृक्ष.

सेफारिअल : एक सशस्त्र घोडेस्वार वाळवंटांतून जात आहे व समोर एक जंगल असलेली टेकडी आहे.

अंश २६ वा

राफेल : पर्वतातून वहात येत असलेले पाणी.

चारुबेल : एक गृहस्थ पुष्कळशा स्त्रिया बरोबर गाडीत बसलेला आहे.

सेफारिअल : तुटलेला तारा.

अंश २७ वा

राफेल : लगाम लावलेला एक घोडा.

चारुबेल : रामफळ चे एक मोठे झाड मोठाल्या पिकलेल्या फळांनी भरला आहे.

सेफ़ारिअल : एक गाय नांगराला लावण्यासाठी तयार अशी उभी आहे.

अंश २८ वा

राफेल : झाडाखाली बसलेले दोन पुरुष

चारुबेल : सुवर्ण आणि चांदी यांच्या नाण्याचे पुष्कळ ढीग आहेत.

सेफारिअल : एका गावाचा सुंदर देखावा. तेथे प्रत्येक वस्तु मनोहर आहे, त्यामुळे मनाला अतिशय आनंद होऊन ईश्वराचे निश्चित ध्यान करावे असे वाटते.

अंश २९ वा

राफेल : फासावर लटकणारा पुरुष.

चारुबेल : पोळ हाकीत असलेला पुरुष.

सेफारिअल : बांधलेला घोडा. त्याच्यावर वाद्य दबून येत आहे.

अंश ३० वा

राफेल : पाण्यावर चालत असलेले जहाज.

चारुबेल : बारीक टोकांचा त्रिकोण. ज्याच्या टोकावर फुलीच्या आकाराची खूण आहे.

सेफारिअल : तरुण घोडा शेतात इकडे तिकडे धावत आहे. त्याच्या गळ्यातील दोर मागे सरपटत येत आहे. वाऱ्याची झुळूक आली म्हणजे डोके वर करून श्वास घेतो.

कर्क अंशफल सार

१ गायनाची आवड, ममताळू सुखी व समाधानी.

२ सेफारिअलच्या मते आळशी. चारुबेलच्या मते बागबगीचे करणारा.

३ शास्त्रीय विषयाचा संशोधक व देववादी.

४ तीव्र कामविकार, कोणत्याहि धर्माला बांधून न घेणारा व जगावेगळा विचार करणारा.

५ खऱ्याखोट्याची निवड करणारा परंतु फाजील विश्वास ठेवणारा.

६ मनात आणिल ते करून दाखवणारा परंतु अव्यवहारी.

७ आपली सत्ता गाजविणारा व उच्च स्थितीला जाणारा.

८ वर्तमानपत्राचा संपादक असल्यास लोक त्याच्यावर अब्रू नुकसानीची फिर्याद करतील.

९. निपुण वकील किंवा उत्तम हेर.

१० आपल्या दीर्घ परिश्रमाने मिळविलेल्या फळांचा उत्तर आयुष्यात उपभोग घेईल.

११ कलाप्रिय, महत्त्वाकांक्षी, एक संकट टाळीत असता दुसर्यात पडणारा व त्याच्या कृत्यांना सतत विरोध असणारा.

१२ मरण शोकपर्यवसायी.

१३ कुशाग्र बुद्धीचा व अपूर्व स्मरणशक्तीचा. शास्त्रीय शोध लावणारा व सतत ज्ञान संपादन करणारा.

१४ कल्पनामय वृत्तीचा, उदात्त विचार, ज्योतिषी व लहान वयातच उदयास येणारा.

१५ सुखात काळ काढणारा, उद्योगाचा कंटाळा, बाहेरून चांगला पण अंतःकरण वाईट.

१६ चारुबेल म्हणतो या अंशात गूढ आहे, त्यामुळे काही सांगता येत नाही. आयुष्यात पुष्कळ झगडे करावे लागतील व पुष्कळ संकटे येतील पण त्यातून तो पार पडेल.

१७ शोध लावणारा, सुधारक व पुढारी.

१८ थोडक्या प्राप्तीतसुद्धा चैन करणारा, कोत्या मनाचा, शेवटी दिवस वाईट.

१९ गहन विषयांचा अभ्यास करणारा, उदार, गायनवादन अगर लष्कराशी संबंध असलेल्या कुळात जन्मास आलेला.

२० मोठाली कामे करून आपले नाव आपल्यामागे ठेवणारा व दीर्घायु.

२१ दुसऱ्यावर हुकमत चालवण्याचे सामर्थ्य, पुष्कळ गुण असतील पण यश कमी.

२२ दुर्दैवी, संकटे ओढून घेणारा व काम न करिता केवळ विचार करीत बसणारा.

२३ चारुबेलच्या मते हॉटेलवाला किंवा खाटीक. सेफारिअलच्या मते आपल्याकडे लोकांचे लक्ष लावणारा व भौगोलिक शोध लावणारा.

२४ अधिकारयुक्त वागणूक व धार्मिक वृत्ति.

२५ बोलण्यापेक्षा कृति करून दाखवणारा व दुसऱ्याच्या मदतीशिवाय आपले काम सिद्धीस नेणारा.

२६ कल्पनामय व भावनामय वृत्तीचा व आयुष्यात वारंवार स्थित्यंतरे होणारा.

२७ शांतता प्रस्थापक.

२८ गरिबाचा श्रीमंत होणारा, पैशांवर विशेष प्रेम.

२९ चारुबेलच्या मते गुरांचा व्यापारी. सेफारिअलच्या मते पारतंत्र्यात दिवस घालवणारा.

३० स्वातंत्र्यप्रिय, दृढनिश्चयी व सरकारी अधिकारी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment