
विषय : नक्षत्रे-पाऊस पीकपाणी आणि म्हणी
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : ज्योतिष विषयक मासिकातील एक लेख
मुळ लेखक : डॉ. वा. ल. मंजूळ
नमस्कार,
पावसाळा तोंडावर आहे आणि अशातच एक या संदर्भात डॉ. वा. ल. मंजूळ यांचा एक मजेशीर परंतु माहितीपूर्ण लेख वाचनात आला. त्याचा मूळ गाभा तसाच ठेवून आपल्या माहितीसाठी देत आहे.
ज्यावेळी हवामान खात्याचे वैज्ञानिक अंदाज उपलब्ध नव्हते, त्यावेळी अनुभवातील म्हणीवरून शेतकरी पीकपाण्याची व्यवस्था पाहात असत. आता पंचांगात देखील पर्जन्य विषयक ज्योतिष अंदाज उपलब्ध असतो, तसेच अनेक ज्योतिषीदेखील यावर भाष्य करू लागले आहेत.
शरद ऋतुमध्ये मेघ केवळ गर्जना करतात पण थेंबभर पाऊस पडत नाही, तर वर्षाऋतुमध्ये आवाज न करणारे मेघ, म्हणजे मुके ढग जोरदार वर्षाव करून जातात. त्यामुळेच मराठी भाषेत म्हण आली आहे. ‘गर्जेल तो पडेल काय?’
पीक पाण्यावर अशा अनेक म्हणी आहेत. पीकपाण्याच्या म्हणी हा आमचा प्राचीन ठेवा आहे. इ. स. १८९९ साली एका ब्रिटिश संशोधकाने अशा म्हणीचे संकलन करून विषयवार मांडणी केली. आजच्या प्रगत ज्योतिष शास्त्राआधी ‘शकुनंति’ ‘सहदेव भाडळी’ यांसारखे ग्रंथ याबाबत मार्गदर्शन करीत असत आणि त्याची सत्यताही प्रत्ययाला येत असे. या दोन संस्कृत–प्राकृत ग्रंथांचे हस्तलिखिते पुण्यातील मराठी हस्तलिखित संग्रहालयात आज पहावयास मिळतात. मराठीतील नक्षत्रे-पाऊस पीकपाणी या संदर्भातील म्हणींचा थोडक्यात आढावा घेऊ.
१) ‘सत्ताविसातून नऊ जाती तर बाकी धूळ देती।’
नक्षत्रांची संख्या एकूण २७ आहे. पण त्यातील केवळ नऊ नक्षत्रेच पावसाचा अनुभव देतात. ती जर वाया गेली तर शेतकऱ्याच्या वाट्याला शेतीतील मातीची धूळ राहते. (म्हणजे पिकाऐवजी दुष्काळ)
२) ‘मृगाची लावणी आणि हस्ताची उगवणी।’
मृगनक्षत्रावर पेरणी करावी. साधारणपणे जून महिन्यात ते येते. तर पीक कसे आले याची पाहाणी हस्त नक्षत्रावर म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात करावी.
३) ‘मघा आणि चुलीपाशी हगा (शौचाला बसा) नाही तर वरती बघा।’
मघा नक्षत्र खूप पाऊस पाडते. अगदी नैसर्गिक विधीसाठीही बाहेर पडता येत नाही. तर हेच मघा नक्षत्र पाऊस पाडू शकले नाही तर आशाळभूत दृष्टीने आभाळाकडे बघत राहावे लागते.
४) ‘मृगाचे आधी पेरावे आणि बोंबेचे आधी पळावे।’
नेहमी पेरणी मृग नक्षत्राचे आधी करावी. संकटात बोंब मारण्यापूर्वीच पळून जावे.
५) ‘पडेल हत्ती तर पाडेल भिंती
हस्त नक्षत्राचा धोऽधो पाऊस अगदी पार घराच्या भिंती पाडून टाकील.
६) ‘रोहिणी डागे, मृग गाजे, आर्द्रा वाहे पूर।
सहदेव कहे भाडळी घरघर वाजे।’
जर रोहिणी नक्षत्रात उकाडा झाला, मृग नक्षत्रात गडगडाट झाला आणि आर्द्रा नक्षत्रात पूर आला तर सहदेव आपल्या भाडळी ग्रंथाला म्हणतो जर या क्रमाने नक्षत्रे फळे देतील तर घराघरात हाताला काम मिळेल, यश मिळेल
७) ‘पडेल हस्त तर कुळंबी मस्त’
हस्त नक्षत्राचा पाऊस रब्बी पिकाला उत्तम असतो, पोषक असतो. त्यामुळे हस्ताचा पाऊस झाला की, शेतकरी मस्त जगेल.
८) ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती, पण कापूस न मिळे वाती।’
असे म्हणतात स्वाती नक्षत्राच्या पावसामुळे शिंपल्यामध्ये मोती तयार होतात. पण हाच स्वातीचा पाऊस कापसाचे पीक धुवून नेतो. अगदी देवापुढे समई लावायला वातीपुरता देखील कापूस मिळत नाही.
९) ‘पडतील उत्तरा तर अन्न न खाई कुतरा’
उत्तरा नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तर भाताच्या पिकाचे वाटोळे होते. म्हणजे पाळलेल्या कुत्र्याला घास भरविण्याइतका भात घरात नसेल.
१०) ‘लागत नसे मघा तर आकाशाकडे बघा’
मघा नक्षत्र शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे, ते जर बरसले नाही तर आकाशाकडे डोळे लावून बघत बसा (आतुरतेने)
११) ‘न पडतील चित्रा तर भात ना मिळे पितरा’
चित्रा नक्षत्राचा पाऊस (सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये) न झाल्यास पितरांच्या (भाद्रपदातील) श्राद्धाला पिंडासाठी भात कसा मिळणार.
१२) ‘चित्राच्या तापाने हरणांच्या पाठी काळ्या’
चित्रा नक्षत्र पावसाळ्याच्या शेवटी येते. पण येताना प्रचंड उष्णता घेऊन येते. त्यामुळे जंगलातील हरिणांची कोवळी कातडी काळी पडते.
१३) ‘आर्द्रा आणि पाडी गरदाडा’
सत्तावीसातले पावसाळी सहावे नक्षत्र आर्द्रा, हे जोरदार पडले तर घरांच्या भिंतीना भगदाडे पाडून हाहाकार माजवते.
१४) ‘उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, अन हिवाळा भोगी’
उन्हाळ्यात आपण कमी कपडे वापरून उघडेच राहातो. (संन्यस्त वृत्तीने) पावसाळ्यात थंडी-ताप- खोकला-सर्दीने रोगी बनतो. तर हिवाळ्यात छान-छान खातो, पितो आणि भोगतोही.
१५) ‘धारण-मरण आणि पाऊस कोणाच्या हाती नाही’
बाजारभाव (चढउतार) केव्हाही येणारा मृत्यू आणि पाऊस हे कोणाच्याच हाती नसते एवढे मात्र खरे.
१६) ‘ वळवणी आले आणि तळवणी घेऊन गेल
वळवाचा पाऊस आला आणि तळ्यातले शिल्लक पाणीही घेऊन गेला.
१७) ‘पाऊस पडेल तर पाणी साचेल’
एक अर्थ पाण्याचा साठा करण्यासाठी पावसाची गरज आहे तर दुसरा अर्थ मिळकत केली तर शिल्लक साठेल
१८) ‘माहो आणि हिवाचा लाहो’
माघ महिन्याची थंडी ही अधिक कडाक्याची असते
१९) ‘पुस (पौष) आणि घरोघरी हुस्स’
पौष महिना लागला की, थंडीमुळे हुश्य करावे लागते.
२०) ‘पाऊस पडे आणि माती तुडे’
पाऊस पडला तर मातीचा चिखल होतो आणि तुडवला जातो.
२१) ‘थंडी गेली बंडी केली’
थंडीमध्ये जाड कपडे वापरतो. ती गेली की, उन्हाळ्याचे बंडीसारखे (मलमलचे बिना कॉलर, अर्ध्या बाह्याचे कपडे) कपडे वापरतो.
२२) ‘चैत्र गळे, कुणबी पळे’
चैत्रात सहसा पाऊस येत नाही. त्यावेळी मशागती उघड्यावर चालतात पण त्याचवेळी पाऊस कोसळला तर शेतकऱ्याला धावाधाव करावी लागते.
२३) ‘धोंडा आणि पिकाचा लोंढा’
धोंडा महिना म्हणजे अधिक महिना त्यामुळे शेतात पिकाला उत येतो.
२४) ‘दुष्काळात तेरावा महिना’
अधिक महिना वर्षात तेरावा महिना असतो. तो जर दुष्काळात आला तर सर्वांनाच त्रास होतो.
२५) सुना आल्या सळा-सळा, सासुबाई पळा
मघा आणि पूर्वा नक्षत्राचे नाते सून सासूचे मानतात. त्यामुळे जर मघा (सुना) सळासळा आल्या तर पूर्व (सासू) पळापळा
२६) ‘म्हाताऱ्याने टेकली काठी, नाही तर साडेसाती
पुष्य नक्षत्र (म्हातारा) थांबले म्हणून साडेसातीचे संकट टळले.
२७) ‘गरजतो तो बरसतो का ?’
हस्त नक्षत्र केवळ गडगडाट करून गेले तर थेंबभर पाणी पडणार नाही.
पावसाची नक्षत्रे त्यांच्या वाहनावर वावरतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी जास्त मानले जाते. अशीही नक्षत्रे आणि त्यांची वाहने.
१) मृग नक्षत्र : गाढव वाहन, पावसाचे प्रमाण जूनमध्ये कोठे कमी कोठे जास्त
२) आर्द्रा नक्षत्र : वाहन कोल्हा पावसाचे प्रमाण कमी जास्त आणि हुलकावणी देणे.
३) पुनर्वसु : वाहन म्हैस, जुलैमध्ये जोरदार पावसाचे प्रमाण
४) पुष्य नक्षत्र : वाहन घोडा, जुलैमध्ये संमिश्र पावसाचे प्रमाण
५) आश्लेषा नक्षत्र : वाहन मोर, पावसाचे प्रमाण ऑगस्टमध्ये उघड-झाप करते.
६) मघा नक्षत्र : वाहन गाढव. पाऊस ऑगस्टमध्ये कुठे कमी, कुठे जास्त.
७) पूर्वा नक्षत्र : वाहन मेंढा ऑगस्ट सप्टेंबर जोरदार पाऊस
८) उत्तरा नक्षत्र : वाहन म्हैस, सप्टेंबर महिन्यात पाऊस जोरदार
९) हस्त नक्षत्र : वाहन कोल्हा, पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबर हुलकावणी
१०) स्वाती नक्षत्र : वाहन हत्ती, ऑक्टोबर-नोव्हेंबर जोरदार वृष्टी
.लोकभाषेत नक्षत्रांना टोपननावाने खेड्यातून ओळखतात.
१) मृग : खरीप
२) पुनर्वसु : तरणा
३) पुष्य : म्हातारा
४) आश्लेषा : आसळका
५) मघा : सासूबाई
६) पूर्वा : सूनबाई
७) उत्तरा : रब्बी पाऊस
८) हस्त : हत्तीचा पाऊस
तर अशी ही नक्षत्रे-पाऊस पीकपाणी आणि म्हणी यांची गावरान मेजवानी.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)