राशीचक्राचे अंश स्वरूप


विषय : राशीचक्राचे अंश स्वरूप मालिका (मेष अंश स्वरूप)

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : सुलभ जातक

मुळ लेखक/आभार : ज्यो. विष्णू गोपाळ नवाथे

नमस्कार,

जसे आपल्या भारत देशात अनेक व्यासंगी, ज्ञानी व नामांकित ज्योतिषी होऊन गेले. तसेच पाश्चात्य देशांतही अनेक उत्तम ज्योतिष अभ्यासक होऊन गेले. आपल्या कडील जैमिनी ऋषींनी जशी ज्योतिष शास्त्रीय तत्वे गूढ भाषेत सूत्रबद्ध केली. तसे चारुबेल, सेफारिअल, राफेल या पाश्चात्य ज्योतिष अभ्यासकांची नावे डोळ्यासमोर येतात, ज्यांनी चित्र वर्णनात्मक भाषेत ३६० १६ व्या शतकामध्ये झालेल्या जोन आंग्ले या आंग्ल अभ्यासकाने केलेले अंश वर्णन राफेल याने “द फेसीस एन्ड डिग्रीज ऑफ झोडिआक” या पुस्तकात अंशाच्या राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत. “द डिग्री ऑफ झोडिआक सिम्बोलाईज्द” या पुस्तकात चारुबेल आणि सेफ़ारिअल यांनी १८९८ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात राशीचक्रातील प्रत्येक अंशांची फळे लिहून ठेवली आहेत.

त्याचे रुपांतर पूर्वीचे नामांकित ज्योतिषी कै.विष्णू गोपाळ नवाथे यांनी त्यांचे १९२९ साली प्रकाशित झालेल्या सुलभ जातक या ग्रंथ मालिकेतील चतुर्थ खंडात दिलेले आहे. अर्थात त्या वर्णनांचा मतितार्थ हा प्रत्येक जन आपली तर्कबुद्धी प्रमाणे घेत असतो. त्यामुळे अर्थामध्ये मत मतांतरे असू शकतात.

प्रत्येक लग्नांश साधारण ४ मिनिटाने बदलतो. या पुस्तकात दिलेली अंश वर्णने व ज्यो. नवाथे यांनी केलेले रुपांतर पाश्चात्य पद्धतीची असल्याने ती सायन राशिना लागू होतात. त्यामुळे सायन कुंडलीनुसार फळे पडताळून पहावीत.

आज आपण राशिचक्रातील मेष मधील प्रत्येक अंशाचे स्वरूप पाहणार आहोत.

१. मेष अंश स्वरूप

अंश १ ला

राफेल : उजव्या हातात विळा व डाव्या हातात लढण्याचे शत्र धारण करणारा पुरुष.

चारुबेल : एका अमर्याद मैदानाच्या मध्यभागी नांगरीत असलेला पुरुष.

सेफारिअल : एक बलवान पुरुष उभा आहे. त्याचा पोषाख चामड्याचा किंवा जाड्या भरड्या, जड व सैल अशा जिनसांचा आहे; त्याचे खांदे बहुतेक उघडेच आहेत व त्याच्या हातात एक मजबूत सोटा आहे. या व्यक्ती-वरून मारुतीची (इर्क्युलिसची) आठवण होते.

अंश २ रा

राफेल : ज्याचे डोके कुत्र्याप्रमाणे आहे व ज्याने आपला उजवा हात आकाशाकडे धरला आहे व डाव्यात काठी आहे असा एक पुरुष

चारुबेल : एका अतिशय अंधाराच्या खोलीत एक पुरुष एका टेबलाशी बसला आहे, व पुस्तके, कागद व गणितोपयोगी उपकरणे अव्यवस्थित स्थितीत त्याचे भोवती पडलेली आहेत.

सेफारिअल : रत्नांच्या बटनांनी युक्त अशा लाल व जांभळ्या रंगाचा उंची पोषाख घालून उभा असलेला पुरुष. ज्याचे शिरस्त्रान उंची पितळेचे अथवा सुवर्णाचे आहे, ज्याच्या हातात तळवार व भाला ही आयुधे आहेत व जो दृश्यपणी लढाईला सज्ज झाला आहे व ज्याला यशाची पूर्ण खात्री आहे.

अंश ३ रा

राफेल : असा एक कांतिमान पुरुष.जो आपल्या उजव्या हाताने जगातील सर्व वस्तू जणू काय दाखवीत आहे व ज्याने आपला डावा हात त्याने घातलेल्या कंबर पट्टयाला लावला आहे.

चारुबेल : हातात तलवार घेतलेली आहे, असा एक घोड्यावर बसलेला मनुष्य सशस्त्र लोकांच्या टोळीला जाऊन मिळण्यास्तव वेगाने जात आहे.

सेफारिअल : कोणाशी तरी जणू काय संभाषण करीत असलेली अशी एक खुचींवर बसलेली स्त्री. तिने आपले हात हळूच आपल्या मांडीवर जोडून धरले आहेत व तिच्या चेहेऱ्यात आनंदी आणि हास्याची मुद्रा आहे. तिने ग्रीक पद्धतीचा सैल झगा घातला आहे, तिची मान व सबंध हात उघडे आहेत.

अंश ४ था

राफेल : डोक्यावर कुरळे केस असलेला पुरुष, त्याने उजव्या हातांत ससाणा व डाव्या हातात चाबूक धरला आहे.

चारुबेल: ज्याच्या शरीरावर अत्यंत मौल्यवान अलंकार व शृंगार नखशिखांत भरलेले आहेत असा एक पुरुष पुष्पे, फले व पुष्करिण्या, कारंजी ई. युक्त आहेत, अशा एका उद्यानाच्या मध्यभागी उभा आहे. सूर्य प्रखर तेजाने प्रकाशत आहे व तो पुरुष अतिशय स्वाभिमानपूर्वक या सर्वांचा यथेच्छ उपभोग घेत आहे.

सेफारिअल : एक अरण्य, ज्यात पुष्कळ झुडपे दाट वाढली आहेत व निरनिराळ्या जातीची व निरनिराळ्या रंगांची पुष्कळशी लहान लहान झाडे आहेत.

अंश ५ वा.

राफेल : दोन पुरुष. एक जण हातातील कुल्हाडीने लाकूड फोडीत आहे व दुसऱ्याच्या उजव्या हातात राजदंड आहे.

चारुबेल : एक मोठा लोखंडी क्रॉस जमिनीवर पडलेला आहे. सर्वत्र काळोख, दुःख व उदासीनता दिसत आहे, देखाव्यांत संपूर्ण स्तब्धता नांदत आहे. मुळीच गडबड नाही, कसलाहि ध्वनि नाही. सेफारिअल : एक मनुष्य भयंकर वादळ चालू असता त्यात एका लडकावर चढत आहे. विद्युत्यकाशात कृष्णाकृतीने ती व्यक्ति दृग्गोचर होत आहे. तो मनुष्य सामर्थ्ययुक्त दिसत आहे.

अंश ६ वा.

राफेल : मुकुट धारण करणारा राजा. त्याच्या उजव्या हातात एक गोल आहे व डाब्यात राजदंड आहे.

चारुबेल : जिकडे तिकडे हिरवेगार दिसत आहे; प्रत्येक वस्तु हरित वर्णाची दिसते.

सेफारिअल : एक घोड्यावर स्वार असलेला पुरुष एका कड्याच्या काठावर आहे व खालील दरीत जेथे लोक काम करीत आहेत तिकडे पहात आहे.

अंश ७ वा

राफेल : सर्वत्र हत्यारबंद पुरुष ज्यानें उजव्या हातात एक बाण घेतलेला आहे.

चारुवेल : मोठमोठ्या ओक वृक्षांचे एक मोठे अरण्य. झाडांच्या बुडांशी झुडुपे मुळीच नाहीत, अगदी मोकळे आहे. येथून ऐसपैस मैदान लागते, ज्यात हिंडण्याला मनसोक्त वाव आहे.

सेफारिअल : एका भिंतीच्या सावलीखालील मार्गाने धावत जाणारा कोल्हा.

अंश ८ वा

राफेल : ज्याने आपल्या डोक्यावरील शिरस्त्राणाशिवाय दुसरे कोणतेहि हत्यार घेतले नाही, मात्र जव्या हातात धनुष्य धरलेले आहे असा पुरुष.

चारुबेल : पृथ्वीवर बर्फाचा जाड थर पडलेला दिसत आहे, वनस्पति अथवा जीवजंतु यांचा मुळीच मागमूस नाही.

सेफारिअल : भांडण करण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी वेढलेला मनुष्य.

अंश ९ वा

राफेल : ज्याचे डोके उघडे असून बाकीचे सर्व शरीर झग्याने चांगले झाकलेले आहे, अशा पुरुषाने खाली टोक करून डाव्या हातात तलवार धरली आहे.

चारुबेल : एक सरळ रस्ता. हा अगदी सरळ रेषेत एका बिंदूपर्यंत जातो व तेथे चार दिशाना जाणारे त्यास चार रस्ते फुटतात. येथे एक मार्गदर्शक स्तंभ आहे व या पहिल्या निर्देशित सरळ रस्त्याचा एकच मार्ग तो दाखवितो.

सेफारिअल : एका उच्च स्थानी उभा पुरुष. त्याने आपले हात गुंडाळून घेतले आहेत व शीर ताठ आहे.

अंश १० वा.

राफेल : डोके उघडे परंतु बाकीचे सर्व अंग वस्त्राच्छादित आहे असा पुरुष एका अस्वलाला आरपार भाल्याने भोसकत आहे.

चारुबेल : एक मोठा कांचेचा गोल. त्याच्यात आकाशातील ताऱ्यांची प्रतिबिंबे ग्रहण करण्याची शक्ति आहे व पृथ्वीच्या स्थित्यंतरांचीही प्रतिचित्रे त्यात दिसतील असा आहे.

सेफारिअल : एक घोडेस्वार एकटाच एका रणमैदानाच्या मध्यभागी उभा आहे, तेथे त्याचे सभोवार मृत व मरणासन्न लोक पडलेले आहेत.

अंश ११ वा

राफेल : हातात सूत काढण्याची काठी घेतलेली आहे अशी एक स्त्री.

चारुबेल : एक मोठी दुर्बिण घेतलेला एक मनुष्य, तिचा उपयोग मुख्यत्वेकरून अगदी नजीकच्या वस्तु व जे पृथ्वीवर आहे ते पाहण्याकडे तो करतो. तो त्या दुर्बिणीच्या मोठ्या टोकाकडे पाहत आहे.

सेफारिअल : दया व सौंदर्य यानी युक्त मुद्रेची एक स्त्री एकटीच उभी आहे व तिने अंगावर घातलेला झगा फक्त अर्ध्याच शरीराला अच्छादित आहे व तो झगा तिच्या डाव्या खांद्यावरून खाली लोंबत आहे.

अंश १२ वा.

राफेल : एक गरुड मादी आपल्या अंगाखाली बसलेल्या आपल्या पिलांवर आपले पंख पसरीत आहे.

चारुबेल : एक अति बिकट चक्रव्यूह.

सेफारिअल : एक पुरुष दोन लहान मुले हातांत धरून चालवत नेत आहे.

अंश १३ वा

राफेल : एक चतुर पुरुष, ज्याने आपल्या उजव्या हातात शिंगांनी बोकडाला धरून ठेवले आहे.

चारुबेल : दाट धुक्यात बुडून गेलेला उलटा घरलेला त्रिकोण; हळूहळू ते धुके उडून जाते व तो त्रिकोण सतेज नीलवर्णाचा सुवर्ण- वर्णभूषित असा दिसत आहे.

सेफारिअल : एका पर्वतशिखरावर असलेला पुरुष, अस्तमान सूर्याच्या किरणांनी विशेष दृश्यमान होणारा, त्याच्या उजव्या हातात त्याने एक दंड धरलेला आहे आणि डाव्या हातात मुकुट आहे.

अंश १४ वा

राफेल : एक कैदी दोन खांचाच्या मध्ये ताठ उभा आहे व त्याचे हात दोन साखळदंडांनी बांधले आहेत.

चारुबेल : आग्नेयेस उगवणारा एक सूर्य. हा आकाशाचा भाग शारदसंपाती सूर्य जेथे असतो तेथून आणखी थोडासा पुढे दक्षिणेकडे आहे.

सेफारिअल : एका तराफ्यावर बसलेला मनुष्य महासागराच्या मध्यभागी आहे. क्षुधा तृषा पीडित व अगदी करुणास्पद स्थितीत आहे.

अंश १५ वा.

राफेल : उघड्या डोक्याचा मनुष्य. त्याने आपले हात लांब पसरले आहेत व मान व छाती चिलखताने झाकली आहे.

चारुबेल : एक काळाकुट्ट पडदा, झग्यासारखा, जो दृष्टि स्तंभित करण्यासाठीच आहे.

सेफारिअल : पूल मोडून खाली पाण्यांत गटंगळ्या खात असलेला व ज्याच्या डोक्यावर पूल पडला आहे असा मनुष्य.

अंश १६ वा.

राफेल : शेण काढण्याचे आऊत घेतलेला मनुष्य अथवा कधी कधी भांडयातून पाणी ओतणारा मनुष्य.

चारुबेल : ज्याच्या एका काखेत विळा घेतला आहे असा पुरुष.

सेफारिअल : हातात पुस्तक घेतलेला एक तरुण, एका मैदानातून भटकत आहे; त्या मैदानाच्या वर आकाशात सभोवारच्या झाडांच्या फांद्या पुढे आल्या आहेत. सूर्याचे किरण त्या झाडीतून तिरपे येऊन त्या विद्यार्थ्यांच्या शरीरावर पडत आहेत.

अंश १७ वा.

राफेल : अंगावर उत्तम रेशमी वस्त्रे धारण करणारा रिकामटेकडा उभा मनुष्य.

चारुबेल : महासागराच्या मध्यवर्ती एक जहाज, जिकडे-तिकडे पाणीच पाणी अमर्याद पसरले आहे व ते व्यापारी जहाज आहे.

सेफारिअल : अशी एक स्त्री जिच्या तागडीच्या एका पारड्यात छाल रंगाची दारु आहे व दुसऱ्यात सोन्याची पुष्कळ नाणी आहेत.

अंश १८ वा.

राफेल : आपला उजवा हात वर उंच क्सरून खुर्चीवर बसलेली स्त्री.

चारुबेल : जेथे दोन विरुद्ध सैन्यांचे तुंबळ युद्ध चालू आहे असे एक रणमैदान

सेफारिअल : एक पुरुष व स्त्री हातात हात घालून उभी आहेत व एकमेकांकडे प्रेमाने पहात आहेत.

अंश १९ वा

राफेल : मान व छाती यांवर चिलखत घातलेला मनुष्य हातांनी खजिना व पैसा दाखवीत आहे.

चारुबेल : एका पर्वताच्या पायथ्याचे खेडे, पुष्कळ लहान लहान घरे आहेत. जवळपास कोळशाच्या खाणी आहेत. एक गरीब स्त्री एका तान्ह्या मुलाला खाऊ घालीत आहे व. नुकतीच गतभर्तृका झाली यामुळे रडत आहे.

सेफारिअल : एक वृद्ध पुरुष. त्याने आपल्या अंगावर एक साधा व अतिशय जीर्ण असा झगा घातला आहे व तो आपल्या मजबूत हातांनी आपल्या उराशी घट्ट धरून दोन सोन्याने भरलेल्या गोण्या नेत आहे

अंश २० वा

राफेल : डोक्यावर शिरस्त्राण आहे, टोपीत शहामृगाचे पीस आहे, बैलावर बसला आहे व डाव्या हातात घोडयाला धरून चालवीत आहे असा मनुष्य.

चारुवेल : कंठ चिरलेला एक पुरुष जमिनीवर पडला आहे.

सेफारिअल : रानावनांतल्या त्रासदायक प्रवासार्थ सज्ज पुरुष त्याने पट्टे व शस्त्रे धारण केली आहेत.

अंश २१ वा.

राफेल : एक कुत्रा बसला आहे आणि त्याने आपले तोंड सिंहाकडे फिरविले आहे.

चारुबेल : एका उघड्या थडग्याजवळ उभे फावडे. त्याने त्या थडग्यात एक पुरुष खणीत आहे. सेफारिअल : एक बलवान् व उत्साहपूर्ण चेहेऱ्याचा असा पुरुष आपले हात पुढे लांबवर पसरून उभा आहे व त्याने आपल्या हातात मद्याने भरलेले भांडे घेतले आहे.

अंश २२ वा.

राफेल : एक अस्वल बसले आहे व त्याने तोंडात एक मोठे बाहाल धरले आहे.

चारुबेल : नृत्य, गायन, वादन, यांचे कार्यक्रम करण्याची एक करमणुकीची जागा. एक प्रचंड नृत्यागार.

सेफारिअल : अडखळत व अनिश्चित गतीने जाणारा एक पुरुष, तो आपल्या हातातून पाणी नेत आहे व जमिनीवर सांडत आहे.

अंश २३ वा.

राफेल : सहा सर्प. त्यांपैकी तिघेजण दुसऱ्या तिघांशी लढत आहेत.

चारुबेल : लांबलचक अशा शेपटीचे टोक पृथ्वीच्या बाजूस समोर आहे असा धूमकेतु.

सेफारिअल : एक मोठे मद्याने भरलेले भांडे हातात घेतले आहे व आता मद्य पिण्याच्या बेतात आहे असा एक पुरुष. दुसरे दोघेजण दूर उभे आहेत व ते आपली तोंडे उलट बाजूस फिरवून आपसात बोलत आहेत.

अंश २४ वा.

राफेल : एख नग्न स्त्री डाव्या हाताने गुह्येन्द्रिय झांकले आहे व तिने आपला उजवा हात वर उंच धरलेला आहे.

चारुबेल : एक हिरवेगार शेत व त्याचे सभोवार लहान लहान झुडुपे असलेली जागा, त्या शेताच्या ईशान्येस एक सुंदर बंगला आहे.

सेफारिअल : एक रंगीत गोळ्याशी खेळत असलेला पुरुष, त्याचे पाठीकडचे बाजूस एक लज्जाहीन स्त्री उभी आहे.

अंश २५ वा.

राफेल : एक पुरुष. ज्याचे मागील बाजूस केस फिरवलेले आहेत व तो एका एडक्यावर बसला आहे व त्याची शिंगे धरली आहेत.

चारुबेल : एक उपगृह व त्याला एक काळोखाचा माळा आहे; व या माळ्याला, बेघर लोकांना त्या माळ्यावर चढायला यावे यासाठी एक शिडी लावलेलो आहे.

सेफारिअल : एक सामर्थ्यवान् शरीराचा पुरुष. तो एका उच्छृंखल घोडयावर स्वार आहे व त्या घोड्याला लगाम घातला आहे.

अंश २६ वा.

राफेल : एकमेकांवर प्रकाश पाडणारे दोन सूर्य.

चारुबेल : ज्याच्या जन्मात हा अंश उदय पावत असेल, तो नवीन शोध लावील व त्याच्या द्वारे जगात नवीन विचाराचा उदय होईल.

सेफारियल : एक दयाळू व्यक्ति गुडघे टेकून असलेल्या एकाला राजदंड बक्षीस देत आहे.

अंश २७ वा

राफेल : एक मोठा ड्रॅगन (पंखांचा सर्प) जमिनीवर पसरून निजलेला आहे.

चारुबेल : काही झाडांच्या फांद्या छाटीत असलेला बागेतील पुरुष.

सेफारिअल : एक उंची पोषाखाचा पुरुष पाय घसरल्यामुळे जमिनीवर पडत आहे.

अंश २८ वा.

राफेल : चांगली वस्त्रे नेसून ताठ उभी असलेली एक स्त्री.

चारुबेल : एक शेतावरील वाडा. पुष्कळशा गाई आहेत, व एक स्त्री गाईचे दूध काढीत आहे. सेफारिअल : उंची पोषाख केलेली एक सुंदरी एकटीच उभी आहे.

अंश २९ वा.

राफेल : उजव्या हातांत करवत घेतली आहे असा मनुष्य

चारुवेल : आपसात लढत असलेले दोन पुरुष.

सेफारिअल : अगदी गरीब दिसणारा परंतु सामर्थ्यवान् पुरुष कुल्हाडीने झाड तोडून पाडीत आहे.

अंश ३० वा.

राफेल : एक कडक शिस्तीची स्त्री एका खोगीर घातलेल्या घोड्याला हातांनी धरून चालवीत नेत आहे.

चारुबेल : एका खोल गेलेल्या मार्गाने मातीने भरलेली हातगाडी चालवीत असलेला मनुष्य. सेफारिअल : एक घोडेस्वार जणू काय लढाईसाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला, मावळणाऱ्या चंद्राकडे पहात आहे.

मेष अंश फलसार :

१ प्रबळ, स्वतंत्र विचार, उच्च ध्येय व प्रतिपक्षाचा हेवा करणारा.

२ आत्मविश्वास, स्वाभिमान, गणितज्ञ, स्वतंत्र विचार व कलहप्रिय.

३ शांत, भांडण टाळणारा, सर्व लोकांत मिसळणारा व आनंदी.

४ हा अंश चारुबेलच्या मते मोठा भाग्यशाली आहे. सेफारिअलच्या मते गांवढळ.

५ दुःख व संकटे फार. कदाचित व्यंग असेल.

६ सत्ताधारी, अतर्क्य गोष्टींची आवड, परंतु वारंवार संकटे येतील.

७ प्रसंगावधान, शहाणपणा, पुराणमतवादी, युक्तीने काम करणारा व प्रत्येक कामात सावधगिरी ठेवणारा.

८ शीघ्रकोपी, अविचारी व जहाल.

९ मार्गदर्शक, वक्ता अगर लेखक, स्वावलंबी व मोठा अभिमानी.

१० सत्यप्रिय, न्यायी, मोठा दर्जा व हाती धरलेल्या कामात जय.

११ परोपकारी, सभ्य व बढाईखोर.

१२ लहरी, सामाजिक मानसन्मान, अप्रसिद्ध व पुराणप्रिय.

१३ पूर्व वयात संकटे व उत्चर वयात मान्यता व कष्टाळू स्वभाव

१४ एकलकोंड्या स्वभाव, कोणाचीहि मदत मिळत नाही व उदासवाणे आयुष्य.

१५ आकस्मिक मृत्यूचा संभव, फसला जाणारा व सारासार विचार नसलेला.

१६ सृष्टीचा अभ्यासक, मेहनती व शेतकी करणारा.

१७ ऐहिक सुख भोगणारा, चैनी, पैसा मिळवील पण उधळून टाकील.

१८ प्रेम संपादन करील पण आयुष्य झगडे करण्यात जाईल.

१९ संग्रह करील पण त्याचा उपयोग करणार नाही.

२० धाडसी, राक्षसी वृत्तीचा, चौकस व शोधक.

२१ गुणी, उदार व प्रसिद्धीस येणारा.

२२ अस्थिर मनाचा व स्वतःची किंमत कमी करून घेणारा.

२३ कुमार्गी, वाईट गोष्टीत प्रसिद्ध व पुष्कळ संकटे भोगील.

२४ दुबळा, निष्काळजी स्वभाव व निरर्थक गोष्टी करणारा.

२५ दुसऱ्यावर अंमल गाजवणारा व शत्रुला जिंकणारा.

२६ जन्मस्थितीपेक्षा उच्च स्थितीला पोहोचेल.

२७ खालावत जाणारा व दुर्दैवी.

२८ परोपकारी व अनेकांची मर्जी संपादन करणारा.

२९ आयुष्यात अडचणी फार परंतु त्यातून मार्ग काढणारा.

३० दरिद्री व त्याला कोणाचीही मदत मिळणार नाही.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947 / 9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment