
विषय : स्मार्ट फोन स्मार्टनेस आणि कुंडली
लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ लेख : स्मार्टफोन अतिरिक्त वापराचे परिणाम
मूळ लेखक : निखील महाडेश्वर
नमस्कार,
आज मानवाने विज्ञानात इतकी प्रगती केली आहे की, काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग होऊन बसल्या आहेत. मोबाईल स्मार्ट फोन हा त्यापैकीच एक. आज आपण मोबाईल शिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कधी गरज, तर कधी मनोरंजनासाठी मोबाईल वापरतात. कोव्हिडच्या संकटानंतर तर जवळ जवळ सगळ्याच गोष्टी ऑनलाईन चालू आहेत. फक्त ‘वर्क फ्रॉम होम’च नाही तर मुलांचे शाळा-कॉलेजचे शिक्षण, टॅली किंवा स्टॉकमार्केटसारखे स्किल क्लासेस, फिटनेस सेंटर्स, पूर्वी प्रत्यक्ष भेटून साजरी होणारी गेट-टुगेदर्स, पार्टीज आणि अगदी कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा आता ऑनलाईनच चालू झाली आहेत. प्रत्येक वयाच्या वर्गासाठी मोबाईल एक गरज आहे. अगदी आपण लॅपटॉप वापरत असलो, तरीही दैनंदिन व्यवहारांसाठी आपण आपल्या मोबाईलवरच अवलंबून असतो. अशा या यत्र तत्र सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या मोबाईलचा आपण किती वेळा आवश्यक गोष्टींसाठी वापर करतो आणि त्याच्या अनावश्यक वापरामुळे होणारे शारीरिक, मानसिक परिणाम, तसेच आपल्या विचारांवर बसणारा पगडा आणि सुरक्षितता हे आज कळीचे मुद्दे बनले आहेत.
आपण स्मार्टफोन खरंच स्मार्टली वापरतो का ?
स्मार्ट पद्धतीने कामे होण्यासाठी आजचा स्मार्ट फोन तयार केला गेला आहे. आज स्मार्ट फोनने आपल्यातील भौगोलिक अंतर अगदी एका बोटावर आणून ठेवलंय. पूर्वी परदेशी कॉल करणं खूप खर्चिक होतं, पण आता या स्मार्ट फोनमुळे व्हॉटसअॅप किंवा इतर अॅप्स वापरून अगदी कमी पैशात कॉल करता येतात. सोशल मिडीयावरील फोटो, व्हिडिओ, स्टेटस अशा माध्यमांतून आपण आपल्या प्रिय व्यक्ती, मित्र मैत्रिणी, जुने शेजारी अशा जवळच्या आणि लांबच्या लोकांच्या आयुष्यातल्या घडामोडींचे अपडेट्स पाहू शकतो. कामासाठी व्हॉटसअॅप ग्रुप बनवू शकतो. हल्ली सर्व डेटा सिंक होत असल्यामुळे गुगल कॅलेंडर किंवा फेसबुकच्या मदतीने आपल्या जवळच्या लोकांच्या वाढदिवसाचे अलार्म लावणं ई. अनेक रिमाइंडर लावणं, औषधं घेण्याच्या वेळेची आठवण करून देणारे रिमाइंडर, गुगल असिस्टंट च्या मदतीने आपल्या कामाचं नियोजन किंवा मिटींगचे रिमाइंडर लावणं अशी स्मार्ट कामे करण्यासाठी आपण स्मार्टफोन सहज वापरत असतो. तसेच विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषा, कॉम्प्युटर कोर्स, ऑनलाईन ट्रेडिंग यासारख्या नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अॅप्स उपलब्ध आहेत. हल्ली ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याचेसुद्धा अॅप्स आहेत.
पूर्वी तज्ज्ञ व्यक्तीकडून काही शिकण्यासाठी लाखो रुपये खर्चुन दूरवर प्रवास करून त्याच्याकडे जावं लागायचं, पण हल्ली ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा त्याचे युट्यूब व्हिडिओ बघून आणि त्यांच्याशी इमेल द्वारे संवाद साधून आपण ते घरबसल्या करू शकतो. आज स्मार्ट फोनने आपल्याला हे नवीन विश्व दाखवलं आहे.
हा स्मार्ट फोन म्हणजे खरंतर छोटा कॉम्प्युटरच आहे. या सगळ्या स्मार्ट गोष्टी आपला स्मार्ट फोन करू शकतो. म्हणूनच तर त्याला स्मार्टफोन म्हणतात पण आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारू की, आपण या स्मार्ट गोष्टींसाठी स्मार्टफोन वापरतोय का? आणि जर आपण असा स्मार्ट वापर करत नसू तर नक्की आपण स्मार्ट आहोत की फक्त आपला फोनच स्मार्ट आहे?
अनेकदा आपण लोकांचे स्टेट्स, फेसबुक, इन्स्टाग्राम ई.वर अनावश्यक स्टोरीज, रील्स बघण्यात तासंतास गेम्स खेळण्यात, वेबसिरीजचे भाग बघण्यात, गाणी ऐकण्यात किंवा जे काही दिसेल ते बघण्यात अक्षरशः वेळ वाया घालवतो. थोडा वेळ मनोरंजनासाठी, गेम्स खेळण्यात किंवा व्हिडीओ बघण्यात काहीच गैर नाही पण आपण आता त्याच्या आहारी जात चाललो आहोत. याशिवाय हल्ली बरेचजण अनोळखी लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, डेटिंग अॅप्स ई. वर त्यांच्याशी चॅटिंग करत राहतात. या सगळ्यातून आपल्याला मोबाईलचं व्यसन लागतं. याच्या अतिवापरामुळे शारीरिक, मानसिक त्रास हे धोके तर आहेतच, पण आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत.
दिवसभरात आपल्याला जे नोटिफिकेशन्स येतात, ते आपल्या विचारांचा ताबा घेतात. बरेचदा आपण काहीतरी कामाचा फोन करण्यासाठी फोन हातात घेतो आणि त्याचवेळी आपल्याला फेसबुक, इन्स्टाग्राम ई. चं नोटिफिकेशन दिसतं आणि आपण ते बघण्यात इतके हरवून जातो की, कोणत्या कामासाठी फोन हातात घेतला, हेसुद्धा विसरून जातो किंवा अनेकदा व्हॉटसअप उघडून ते काम करत असतो, पण मग बाकी गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. मग आपण विचलित होतो आणि पुढचं काम विसरून लोकांचे स्टेटस, डीपी बघत बसतो. बरेचदा एखाद्या वेबसिरीजचा नवीन भाग आलाय असं नोटिफिकेशन येतं. मग आपण एक भाग बघूया म्हणून मोबाईल हातात घेतो आणि त्यातच गुंतून राहतो. काही वेळेस तर आपण काय बघायचं हेसुद्धा ठरवलेलं नसतं. यु ट्यूब वर एखादा मनोरंजक व्हिडीओ दिसतो, आपण तो बघतो, मग ते बघत असताना सजेस्टेड व्हिडिओज दिसतात. ते आपण एकामागून एक बघत राहतो. आणि असे एकामागून एक नोटिफिकेशन्स उघडून ते पाहण्यात आपला किती वेळ वाया जातोय, याचं आपल्याला भानच राहत नाही. या सगळ्या नोटिफिकेशन्सचा आपल्या नकळत आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. कधी कधी आपल्याला कोणतीही वस्तू घ्यायची नसते, पण ऑफर दाखवणारं अॅमेझॉनचे नोटिफिकेशन आलंय, म्हणून चेक करतो आणि गरज नसतानाही त्या वस्त खरेदी करतो. काही वेळेस एखाद्या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यावर दिसलेली स्टोरी किंवा फोटो कुठेतरी आपल्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनेशी संबंधित असल्यामुळे ते आठवून आपण दु:खी होऊन परत भूतकाळात अडकतो. अनेकदा हे नोटिफिकेशन्स आपण इंटरनेटवर जे सर्च करतो किंवा खरेदी करतो त्याच्याशी संबंधितच असतात. बरेचदा एखाद्याने कुठे फिरायला जाऊन त्या ठिकाणाचे फोटो टाकले की, त्याचा मत्सर/हेवा वाटतो किंवा राग येतो किंवा आपणही कुठेतरी गेले पाहिजे या अवेळी आलेल्या विचारांमुळे कामावर चे लक्ष उडते. अशा अनेक प्रकारे स्मार्ट फोन स्मार्टली तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमची खरेदी अशा सर्वच गोष्टींवर तुमच्याही नकळत ताबा घेत असतो. जगातील अनेक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बराच वेळ या मायाजाला साठी राखून ठेवतात. पण ते कसा याचा वापर करतात, याकडे मात्र आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.
स्मार्टफोन ही एक दुधारी तलवार आहे. याचा वापर कसा करायचा, हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी युट्यूबवरचे व्हिडीओ, अॅप्स, मिटींग्स किंवा कामाच्या वेळांचे नियोजन, श्लोक, स्तोत्रे ई. आकारात्मक उपयोग तुमच्या प्रगतीला हातभारच लावेल. माणसाला वाईट सवयी पटकन लागतात, त्यामुळे स्मार्टफोनच्या आहारी न जाता, मर्यादित वेळेत त्याचा वापर आणि त्यातून नवीन चांगल्या गोष्टी शिकणं, आपल्या ज्ञानात भर घालणं या चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणं तुमच्याच हातात आहे. मौल्यवान वेळ घालवून निरर्थक वेळ वाया घालवण्यापेक्षा मोबाईलचा वापर सुज्ञपणे आणि गरजेपुरताच करेन असा निर्धार आपण करायला हवा.
थोडक्यात कुंडलीच्या भाषेत सांगायचे झाले, तर स्मार्ट फोन हा बुध व शुक्र यांच्या अमलाखाली येतो, असे मला वाटते.
बुध हा बुद्धी, संपर्क, माहिती प्रसारण, मिडिया, संवाद ई. चा कारक आहे. काल पुरुषाच्या कुंडलीतील ३ रे व ६ वे स्थान बुधास दिले गेले आहे. ३ रे स्थान तुमच्या आयुष्यातील, परिवर्तन, कर्तुत्व, विचार, संपर्क ई. गोष्टी दाखवते. तर ६ वे स्थान जे शत्रू व रिपू स्थान म्हटले जाते, ते संघर्ष, प्रयत्न, अडथळे, तुमच्या आयुष्यात काम, क्रोध, भय, मत्सर, लोभ.. ई. षडरिपू च्या आहारी जाऊन वासना निर्माण करणारे व त्यामुळे विविध आजार निर्माण करणारे स्थान आहे.
म्हणजेच देवाने मानवाला बुद्धी दिली आहे, त्याचा योग्य व सकारात्मक उपयोग केला, तर स्मार्ट फोन तुमच्या आयुष्यात एकदम स्मार्ट ली क्रांती घडवून आणेल. पण जर बुद्धी भ्रम झाला आणि मोहात अडकून या स्मार्ट फोनचा नकारात्मक व दुरुपयोग केला, तर मात्र हाच स्मार्ट फोन तुम्हाला खड्ड्यात घालायला कमी करणार नाही.
शुक्र हा सौंदर्य, कला, सादरीकरण, धन, डोळे किंवा दृष्टी ई. चा कारक आहे. काल पुरुषाच्या कुंडलीतील २ रे व ७ वे स्थान शुक्रास दिले गेले आहे. २ रे स्थान धन व कुटुंब दर्शवते, ७ वे स्थान वैवाहिक सौख्य दर्शवते. तसेच २ रे व ७ वे स्थान आरोग्यास मारक स्थान देखील आहे. जर स्मार्ट फोन वापरताना तुम्ही कलात्मकता, सादरीकरण याचा योग्य वापर केला, तर नक्कीच तुम्हाला पैसा देखील कमावून देऊ शकतो. पण जर चुकीचा दृष्टीकोन बाळगून स्मार्ट फोन हाताळाल, तर मात्र तोच स्मार्ट फोन तुमचा, पैसा, कौटुंबिक सौख्य, आरोग्य हिरावून घेईल, यात शंका नाही. शुक्र चांगला असता रसिक व बिघडला असता विलासी, रंगेल बनवतो याचे भान राखणे आवश्यक आहे.
म्हणजेच या सर्वाचा समतोल साधायचा असेल, तर बुद्धी व कलात्मकतेला ज्ञानाचा दृष्टीकोन जोडणे खूप महत्वाचे आहे. ज्ञान, नैतिकता, सचोटी ई. कारक गुरु तुमच्या स्मार्ट बुद्धीला, कलात्मकतेला खोली प्राप्त करून देईल व स्मार्ट फोन चा यथायोग्य वापर तुम्हाला, यश, कीर्ती, प्रसिद्धी मिळवून देऊन भाग्य वृद्धिंगत करेल.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947/9272114292
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)