
विषय : वासना, मोक्ष आणि स्थान विचार
लेखन आणि स्वैर अनुवाद : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : परकाया प्रवेश
मूळ लेखक/सौजन्य : रमेश बावकर
नमस्कार,
एका गावात एक श्रीमंत दानशूर शेटजी असतो. त्याला अन्नदान करण्याची खूप हौस असते. एकदा तो काशी क्षेत्री अन्नछत्र उघडतो. त्याची शेकडो नोकर माणसे कामाला लागतात. शेटजी स्वतः लक्ष घालून लोकांना बोलवून आणून आग्रहाने जेवू घालत असतो. काशी क्षेत्रातील घाटाघाटावर हिंडून लोकांना अन्नछत्राची माहिती देत असतो. हजारो माणसे जेवून जात असतात. आणि हे दृश्य पाहून शेटजीला आनंद व समाधान मिळत असते. इतक्यात शेटजींना एक साधू दिसतो. शेटजीने नम्रपणे वाकून नमस्कार करून व अन्नछत्राची माहिती देऊन भोजनास येण्याविषयी आग्रह करतो. परंतु साधूने नम्रपणाने व्रतवैकल्याची कारणे सांगून नकार दितो. त्याच वेळेस तेथून एक अत्यंत गरीब बाई तिच्या पाच-सहा मुलांना घेऊन तिथून चाललेली असते. तिला पाहून शेटजी म्हणतात, ‘बाई, आपण फारच भुकेलेल्या दिसताय. माझे एक अन्नछत्र तिकडे चालू आहे. तिथे या मुलांना घेऊन या व पोटभर जेवा’. तिला चालतानाही भुकेने खूप कष्ट होत असतात. तिची मुलेही तितकीच भुकेलेली दिसत असतात. ती बाई शेटजीला म्हणते, ‘शेटजी, मला आता एक पाऊलही टाकवत नाही. आपण मला व माझ्या मुलांना इथेच जेवण वाढाल काय ?’ शेटजीला बाईची दया येऊन तो तयार होतो. तेव्हा बाई शेटजीला म्हणते, माझी एक अट आहे. मी व माझी मुले पोटभर जेवणार. आमचे पोट भरेपर्यंत तुम्ही वाढणार असाल, तरच आम्ही जेवू, शेटजीन त्या बाईस म्हणाला, ‘बाई तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही अगदी पूर्ण तृप्त होईपर्यंत जेवा. तुम्हाला लागेल तेवढे मागून घ्या. आपण काळजी करू नका. हा संवाद चालू असताना साधू मध्येच म्हणतो, ‘शेटजी, अहो तुम्ही काय करता आहात ? ही बाई फार खादाड आहे. तुमचे सगळे अत्र खाऊन टाकेल. तुम्हाला माघार घ्यावी लागेल.’ शेटजीचा अहंकार दुखावला जाऊन तो साधूला म्हणतो, ‘साधू महाराज, माझी शंभर माणसे या कामाला लावली आहेत. तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका. शिवाय ही बाई व तिची मुले खाऊन खाऊन किती खातील ? अहो पोती पोती धान्य पडले आहे माझ्या गोदामामधून. तेव्हा यांना पोटभर खाऊ घालणे अजिबात अवघड नाही’. साधू म्हणतो, ‘तरी शेटजी, हिला जेवायला बसवताना एक वेळ विचार करा. हिचे नाव काय आहे हे माहीत आहे काय ? हिला ‘आशा’ म्हणतात.’ शेटजी साधूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून नोकरांना त्या बाईला व तिच्या मुलांना वाढण्याविषयी हुकूम सोडतो. पत्रावळी मांडण्यात येतात व त्यांच्यावर अन्नाची रास ओतण्यात येते. आणि काय आश्चर्य ? पुन्हा वाढायला येईपर्यंत पत्रावळ रिकामी झालेली असावयाची. नोकर धावपळ करून अन्न आणून वाढत असतात. शेवटी शिजवलेले सर्व अन्न संपते. नवीन अन्न शिजवण्याचा शेटजी हुकूम देतो. अन्न शिजवले जात असते, नवीन धान्य आणले जात असते. तरी मुलांच्या वा आईच्या पोटाचा खळगा जरासुद्धा भरल्यासारखा दिसत नसते. असे करत गोदामामधील, गावातील, शेजारील गावातीलही धान्य संपते. शेवटी शेटजीला कोणी धान्य देईनासे होते. शेटजी. सर्व भांडी रिकामी झाली तरीही बाई व मुले यांचीही पोटे रिकामीच राहून ते अन्नासाठी आक्रोश सुरू करतात. शेवटी शेटजी हतबल होतात. साधू हे सर्व पाहात असतो. शेवटी दया येऊन शेटजीला जवळ बोलावून ‘शेटजी, या कमंडलूतील पाणी पाजा या सर्वांना’ असे सांगतो. शेटजीने कमंडलूतील पाणी त्या सर्वांना पाजताच आश्चर्य म्हणजे, ती सर्व समाधानाचा ढेकर देऊन उठतात. बाई मात्र साधूला शिव्या देत निघून जाते.
शेटजीला मोठे आश्चर्य वाटते. एवढे प्रचंड अन्न खाऊन ज्यांचे पोट भरले नाही, त्यांचे एवढ्याशा पाण्याने कसे काय पोट भरले ? तो साधूला विचारतो, ‘साधू महाराज, हे कोणते पाणी आहे, की ज्याच्यामुळे यांचे पोट भरले ? साधू उत्तर देतो, ‘समाधान’, ‘समाधाना’चे एक पळीभर पाणी म्हणजे आचमन पुरे असते. पण तेवडेच पाणी प्यायले जात नाही. म्हणजे नेमके कोठे थांबायचे हे लक्षात येत नाही आणि म्हणून सर्वनाश हाच शेवट असतो.
असे हे ६ वे स्थान जे वासना दर्शवते. जोपर्यंत हे समाधानाच्या मर्यादेत प्रयत्न पातळीवर असते तोपर्यंत सगळे योग्य असते. पण जेव्हा वासनेच्या आहारी जातो, तेव्हा स्वत:च स्वत:चा शत्रू बनून अवघे आयुष्य संघर्षमय व दु:खमय होते. वासनेचा व्यय करता आला, तरच उपासने कडे मन वळून पुण्या संचय वाढीस लागतो. (५ वे स्थान हे ६ वे स्थानाचे व्यय स्थान आहे.) जेव्हा आपण आपल्या वासनांना प्रयत्न पूर्वक काट शह देतो तेव्हाच भाग्य, धार्मिकता, अध्यात्मिकता झळाळून उठते. ( ९ वे स्थान हे ६ वे स्थानाचे केंद्र स्थान आहे.) आणि अशा रीतीने प्रयत्न सातत्याने आपण वासनेचा नाश करतो. तेव्हा आत्मभान जागृत होते. (१ ले स्थान हे ६ वे स्थानापासून ८ वे आहे.) आणि आत्मभान जागृत झाल्यावर आपल्या वासनेचा पूर्णत: लय होऊन चिद्वृत्ती परोपकाराकडे, दानाकडे समर्पित होते तेव्हा मन बंध मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीचे दालन उघडले जाते.
शुभं भवतु !!!
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)