विवाह काळ


विषय : विवाह काळ

संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : कुंडलीची भाषा

नमस्कार,

आजच्या काळात विवाह जमणे हा आयुष्यातील सर्वात मोठा जुगार ठरावा, अशी आजची परिस्थिती आहे. मुले कायदेशीर रीत्या सज्ञान झाल्यावर लवकरात योग्य वयात विवाह होऊन मुलांच्या आयुष्याला स्थैर्य लाभावे, ही एकीकडे पालकांची ईच्छा व भूमिका असते. तर दुसरीकडे मुले उच्च शिक्षण घेऊन अर्थार्जनाच्या मागे धावत सुटलेले असतात, मोठमोठे पॅकेज त्यांना व पालकांना सुद्धा मोहात पाडत असतात. आयुष्यात पूर्ण करण्याची स्वप्ने आभाळास स्पर्श करत असतात व महत्त्वाकांक्षा जेवढ्या उंचावलेल्या असतात, तेवढ्याच मुलांच्या व पालकांच्या स्थळा बद्दलच्या अपेक्षाही उंचावलेल्या असतात. व या सगळ्या गदारोळात विवाहाचे वय व विवाह काळ पुढे पुढे सरकत असतो. आणि एक वेळ अशी येते की, विवाहाच्या बाजारातील किंमत वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर कमी कमी व्हायला लागते. ज्यांचे शिक्षण व उत्पन्न साधारण आहे, त्यांची अवस्था तर आणखीन बिकट असते.

खरेतर हा विवाह काळ कधी असेल, याबद्दल सर्वानाच उत्सुकता असते.

त्यासाठी कुंडलीची भाषा या ग्रंथातील विवाह काळ याबाबतचे संकलन सर्वांसाठी आपल्या समोर ठेवत आहे.

१) गोचरीने अगर भ्रमणाने गुरुची तसेच लग्रेश, सप्तमेश, कुटुंबेश, शुक्र व चंद्र यांची परिस्थिती जन्म कुंडलीत कशी असते हे कळल्यावर विवाहाचे वर्ष व महिना कळू शकतो.

२) अ) गुरुचे लग्नी, व्दितीयात, सप्तमात, पंचमात, भाग्यात, लाभात भ्रमण होते. तो काळ विवाहास अनुकूल समजावा.

ब) गुरु जेव्हा लग्रेश सप्तमेश, शुक्र व चंद्र ह्याच्या वरुन भ्रमण करतो किंवा ह्याच्या सप्तमावर भ्रमण करतो तो काळ विवाहास अनुकूल असतो.

३) गुरु हा जेव्हा कुंडलीत लग्न किंवा चंद्रापासून सप्तमेशात असतो तेव्हा गुरुचे स्वस्थानावरुन किंवा सप्तमातून भ्रमण विवाहास अनुकूल असते.

४) जाया कारक शुक्र व सप्तमेश आपल्या भ्रमणात जेव्हा जन्मलग्नेश अगर नवमांश लग्नेश ह्याच्या जन्म स्थित राशीच्या त्रिकोणात येतात, तो काळ विवाहाचा समजावा.

५) जेव्हा जन्म लग्रेश आपल्या भ्रमणात सप्तमातून जातो, तो काळ अगर जन्म सप्तमेश स्थित राशीवरुन जातो, तो काळ विवाहास योग्य समजावा.

६) योग कारक ग्रहाचा सप्तम भाव व सप्तमेश यांच्याशी जन्मकाळी काही संबंध असल्यास, त्याचे सप्तम अगर सप्तमेशावरुन भ्रमण अगर भ्रमणात त्याच्याशी दृष्टीयोग करीत असल्यास तो काळ विवाहास अनुकूल समजावा.

७) जन्म कुंडलीत गुरुचे संबंध कोणाशी आहेत, सप्तम भाव, सप्तमेश, चंद्र अगर शुक्राशी आहेत काय हे प्रथम ठरवावे. ज्याच्याशी जन्मस्थ योग असतील व तसेच योग भ्रमणाने झाल्यास व विवाहास योग्य वय असल्यास आणि दशामुक्ती अनुकूल असल्यास विवाह काळ समजावा.

८) दशामुक्ती पहातांना जन्म कुंडलीतील सप्तमेशची राशी व त्याची नवमांशीय राशी तसेच शुक्र व चंद्र यांच्या जन्म राशी स्वामी व नवमांश स्वामी यांच्यापैकी जो बलवान असेल, त्याच्या दशामुक्तीत जेव्हा गुरु गोचरीने त्याच्यावरुन भ्रमण करतो, त्याच्या त्रिकोणातून जातो अगर त्याच्यासमोरुन जातो तो काळ विवाहाचा समजावा.

विवाहकाळ सिध्द करतांना जात, धर्म, देश, विचार व गरीबी व श्रीमंती विचार, विवाह करण्याची इच्छा आहे किंवा नाही वगैरे गोष्टींचा देखील विचार करावयास पाहिजे. देश परिस्थितीप्रमाणे काळाच्या ओघाप्रमाणे विवाहाची वर्षे बदलत जातात. आपल्या भारतात ५०-७५ वर्षापूर्वी लहानपणीच लग्ने होत होती. पण आता त्या वयाच्या मर्यादेत बराच फरक पडला आहे. या सर्वांचे अनुसंधान साधून विवाहकाळ ठरवावा लागेल.

कै. विष्णू गोपाळ नवाथे यांनी काही अनुभविक नियम जातक संग्रह ग्रंथात दिले आहेत. ते आपल्या माहितीसाठी देत आहे.

जन्म कुंडलीतील चंद, शुक्र, सप्तमेश व कुटुंबेश यांचा विचार करावा. कुंडलीतील त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी दिलेले योग विवाह संभव काळाकरता पडताळून पहावेत.

१) जन्मकालाच्या शुभ स्थित राशीपासून गोचर शुक्र १-२-७ स्थानी असतो.

२) जन्मकालच्या चंद्रापासून शुक्र १-२-७ स्थानी येतो.

३) कुंडलीतले सप्तम स्थान, त्याचा स्वामी ज्या स्थानी असेल तेथून गोचर शुक्र १-७ स्थानी असावा.

४) जन्म कालच्या जन्मस्थ चंद्र राशीपासून सातवा असावा.

५) जन्म चंद्रावर सप्तमेश असावा.

६) सप्तमेश सप्तमात लग्नी किंवा कुटुंबस्थानी (व्दितीय स्थानी) असावा.

७) कुटुंब स्वामी जाया स्थानी, लग्नी अथवा कुटुंब स्थानी यावा.

८) शुक्र जाया स्थानी कुटुंब स्थानी अगर लग्नी असावा.

९) सप्तमेश कुटुंबेश यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

१०) जाया स्वामी व लग्नेश ह्यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

११) कुटुंब स्वामी व लग्न स्वामी यांची युती १-२-४-५-७-९-११ स्थानी होत असेल.

१२) जाया स्वामी व शुक्र अगर कुटुंब स्वामी व शुक्र यांची युती वरील स्थानी होत असेल.

१३) जन्म काली सप्तम व कुटुंब स्थानी जे ग्रह असतील ते जाया अगर कुटुंब स्थानी येतील.

१४) गुरु २-७ अगर लग्नी भ्रमण करीत असता.

१५) गुरु ज्या वेळी जन्म गुरु, शुक्र, अगर चंद्र ह्यावरुन अगर त्यापासून सातव्या राशीतून जात असता.

१६) गुरु ज्या वेळेस लग्नेश, कुटुंबेश अगर सप्तमेश ह्यावरुन अगर त्यापासून सातव्या राशीतून जात असेल तो काल ‘विवाह संभव काळ समजावा. 

टीप : हे संकलन आहे, प्रत्येकाचे आपल्या पद्धत व अनुभवानुसार मत मतांतरे असू शकतात. श्री. कृष्णराव वाईकर, कै. डॉ. यशवंत शुक्ल, कै. विष्णू नवाथे हे त्यांचे काळातील नामांकित व अनुभवी ज्योतिषी असल्याने त्यांचे विचार उपयुक्त ठरतील या साठी येथे दिले आहेत. विनाकारण वाद घालत बसू नये.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment