
विषय : स्त्री-पुरुष आणि शुक्र-मंगळ
लेखन व संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : कला विलासी शुक्र
नमस्कार,
कालपुरुषाचा रवी हा आत्मा, चंद्र हे मन, मंगळ हे बल, बुध म्हणजे वाणी- वक्तृत्व व बुद्धिमत्ता, गुरू म्हणजे ज्ञान व शुक्र हा सुखकर्ता आणि शनी दुःखकर्ता आहे असे सांगून आचार्य वराहमिहीर शुक्रास मदन असे संबोधतात व त्याला तो रजोगुणी व मंत्री आणि वसंतऋतूचा कारक मानतात. हा ग्रह सुखासक्त, देखणा व सुंदर नयन यांचा कारक आहे असेही प्रतिपादन करतात.
शुक्रास आंग्ल भाषेत ‘व्हीनस’ असे नामाभिधान आहे. शुक्र वा व्हीनस ही सौंदर्याची अधिदेवता आहे. मदनासारखे अगर रतीसारखे लावण्य असा शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो. वराहमिहीर शुक्क हा कांतवपु म्हणजे तेजस्वी कांतिमान शरीर असलेला, सुलोचन म्हणजे सुंदर नयन असलेला, सित म्हणजे गौरवर्ण, सितश्च मदनः म्हणजे मदनासारखा सुंदर व मदनिका असे शुक्राचे वर्णन करतात, तर सवार्थ चिंतामणीकार मदन युवति, तारुण्याने मुसमुसलेली स्त्री, विचित्र कांति, सौंदर्य युवति असे शुक्राचे वर्णन करतात.
म्हणजे शरीरसौदर्य, उत्तम बांधा, गौरवर्ण, मोहकता, नाजुकपणा या गोष्टी शुक्र लग्नी असता अगर लग्नेश म्हणून बलवान असता जातकामध्ये पहावयास मिळतात. शुक्र वृषभ राशीचा (द्वितीय भावदर्शक) अधिपती असून तो व्यय भाव दर्शक मीन राशीमध्ये उच्च असतो. द्वितीय व द्वादश स्थाने ही नेत्रस्थाने आहेत. त्यावरून अनुक्रमे उजवा व डावा डोळा यांचा विचार होतो. शुक्र हा तेजस्वी ग्रह असल्याने जातकाचे डोळे तेजस्वी, पाणीदार असतात व शुक्र प्रबळ असल्यास मोहिनी घालू शकतात.
शुक्र हा तुळ राशीचाही अधिपती आहे. तुला रास समन्वय साधणारी आहे, म्हणून या जातकाचा बांधा प्रमाणबद्ध असतो, शरीर मांसल असून रेखीव असते, गाल फुगीर असतात; आवाज गोड व लाघवी असतो आणि एकूणच व्यक्तिमत्त्व मोहक असते.
तुळ रास व बलवान शुक्र लग्नी असलेल्या जातक व्यक्ती दिसण्यात सुंदर, मोहक, विनयशील व सौजन्यपूर्ण स्वभावाच्या असतात. जातक स्त्रिया जास्तच सुंदर असतात, पण पुरुष जातक ही काही कमी सुंदर नसतात.
शुक्र लग्नी असता जातक गौरवर्णी, विलासी आणि सौदर्य प्रसाधने वापरणारी आढळतो. तसेच हे जातक फॅशनेबल कपडे घालतात. त्यांना नटणे, मुरडणे व दागिन्यांची हौस असते. चेहरा हसतमुख व आकर्षक असतो
तनु आदि द्वादश भाव व मेषादि बारा राशी हे कालपुरुषाच्या कुंडलीत समानार्थी मांडले आहेत. वृषभ रास दुसरी आहे व त्याची फळे द्वितीय स्थानदर्शक आणि तुळ ही सातवी रास असल्याने त्याची फळे सप्तम स्थानदर्शक अहि स्थूलमानाने मानली जातात. मीन रास व्यय भाव दर्शक आहे. वृषभ व तुळ या राशी शुक्राच्या आधिपत्याखाली येत असून शुक्र मीन या शेवटच्या राशीत उच्च समजला जातो. भोगप्रवण, रजोगुणी गुणधर्मी शुक्र हा धन व वैवाहिक सौख्य (पत्नी) यांचा प्रामुख्याने कारक आहे. तसेच शय्यासुख देणारा ग्रह म्हणून व्यय भाव दर्शक मीन राशीत उच्च मानलेला आहे.
धन, पत्नी व विविध सुखोपभोग याकडे सामान्य माणसाचे विशेष आकर्षण असते. याचा अतिरेक झाल्यास वासनापूर्ती, द्रव्यलाभ व द्रव्यलालसा यामुळे तो खालच्या स्तरावर उतरतो व रसिक शुक्र रंगेल आणि विलासि होऊन तमोगुणी बनतो. उन्नत जीवात्मे यावर योग्य आत्मिक नियंत्रण ठेवून या विकारांवर मात करतात व त्यांचे उन्नतिकरण करतात. अशा व्यक्ती शुद्ध सत्त्वगुणी असतात.
सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून रजोगुणी शुक्राचे कार्य वा कारकत्व विवाह, स्त्री, रतिसुख, शुक्रधातू, कामवासना, सौंदर्य व लावण्य, उत्तम व उंची पोषाख, अत्तरे वगैरे सुगंधी पदार्थ, रतिक्रीडा व सर्वत-हेचे ऐषाराम, ऐश्वर्य आणि शयनागार, सुखोपभोगाची प्रकृती, देखणेपणा, उत्तम नेत्र, कुरळे केस, हिरे, माणके वगैरे रत्ने यांची प्राप्ती, सर्व त-हेच्या कला, काव्य, संगीत, वाद्ये, नृत्य, अभिनय ई. असून आणि मोहिनी विद्या, जारण मारणादि विद्या, मंत्रशास्रही या शुक्राच्या अंमलाखाली सांगितलेल्या आहेत.
शुक्राच्या शुभाशुभ फलांचा विचार करताना त्याचे शुभ व अशुभ ग्रहांबरोबर होणारे शुभ, अशुभ योग आणि राशी व स्थान यांचे बलाबल लक्षात घ्यावे लागेल.
रवी, चंद्र व गुरू सत्त्वगुणी आहेत,
बुध व शुक्र रजोगुणी आहेत,
तर मंगळ व शनी हे तमोगुणी आहेत,
असे प्राचीन ग्रंथकारांनी सांगितले आहे.
ग्रह हे प्रामुख्याने मनुष्याचे मन व त्याची बुद्धी यावर परिणाम करणारे असल्याने कुंडलीमध्ये सत्त्व, रज, तम यापैकी कोणत्या गुणाचे प्राबल्य आहे, याचा विचार करून लोभ, मोहादि षड्रिपूंचा किती जोर आहे, याचाही अंदाज घ्यावा लागतो. काम, क्रोध हे मंगळाचे गुण आहेत. मंगळाची अनिष्टता शुक्राला बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते.
प्रथम भाव व मेषरास यांच्या साम्यावर आधारलेली कालपुरुषाची निर्सगकुंडली ही पुरुषप्रधान आहे. म्हणून शुक्र हा ग्रह प्रामुख्याने पुरुष कुंडलीत अभ्यासावा लागतो. जुन्या ग्रंथकारांनी त्यासच प्राधान्य देऊन शुक्राची फले सांगितली आहेत. संतति, विवाह, चारित्र्य वा तत्सम पंचम, सप्तम, व्ययस्थान व द्वितीय स्थान यांच्या विचारासाठी पूर्वाचार्यानी त्यांने प्रत्येक ग्रंथात त्यांची फळे कशी घ्यावी याचे दिग्दर्शन केले आहे.
माझ्या मते स्त्रियांच्या कुंडल्यात मंगळाचा अभ्यास करणे जरूर आहे. याच दृष्टीने तुळ रास प्रथम भाव धरून, स्त्री जातकाची निसर्ग कुंडली मांडली असता, ती कुंडली स्त्री प्रधान निसर्ग कुंडली होईल. स्त्रियांचे चारित्र्य, त्यांचा विवाह, त्यांचे वैवाहिक जीवन, विषयसुख या गोष्टी स्त्रियांना पुरुषत्वापासून प्राप्त होतात आणि पुरुषत्वाचा कारक ग्रह मंगळ आहे, जो तूळ लग्नाच्या कुंडलीत सप्तमेश येईल. म्हणून स्त्री कुंडलीचा अभ्यास करताना मंगळाकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक ठरते.
स्त्री जातक कुंडलीत मंगळ अशुभ असता, तो वक्री असता विवाहसुखात अडथळे निर्माण करतो अथवा विवाहसुख लाभू देत नाही. हाच अनुभव शुक्र वक्री असता पुरुष जातक कुंडलीत अनुभवास येतो. वैवाहिक जीवनातील असमाधान, दुरावा, घटस्फोट वा विवाहातील अडथळे यांचा विचार करताना शुक्र व मंगळ हे वक्री, मागीं, स्तंभी ई. चा विचार करणे आवश्यक ठरेल.
स्त्रीयांच्या कुंडलीतील रवीचा शनीशी योग व पुरुष कुंडलीत चंद्राचा शनीशी योग हे सुद्धा विवाहाच्या बाबतीत निर्णय करताना विचारात घ्यावे लागतील. (विवाह न होणार्या वा अति विलंबाने विवाह होणाऱ्या स्त्रियांच्या कुंडलीत २ ५. ७. १० व १२ मधील शनी अथवा रवीवर शनीची दृष्टी, युती, वाहक असे योग आढळतात.)
शुक्र – मंगळ योग :
शुक्र मंगळाच्या शुभाशुभ ग्रहयोगांचा विचार करताना या दोन ग्रहांचे कारकत्व प्रामुख्याने विचारात घ्यावे लागते. शुक्राचे मंगळाशी असणारे नाते अन्य ग्रहांपेक्षा वेगळे आहे. निसर्गकुंडलीत मंगळ प्रथम स्थानाचा व मेष राशीचा मालक आहे, तर शुक्र सप्तम स्थानाचा व तुळ राशीचा अधिपती आहे. यामुळे या दोन ग्रहांचे परस्परांशी असणारे नाते पुरुष-स्त्री, पती-पत्नी या स्वरूपाचे आहे.
शुक्र हा प्रणयी, विलासी व निर्सगातः कामप्रधान ग्रह आहे.
तर मंगळ हा जबरदस्त शक्ती असलेला कामप्रधान पुरुष ग्रह आहे. त्यामुळे या दोन ग्रहांच्या कोणत्याही योगात विलासीपणा, कामुकता, भोगी वृत्ती, ऐहिक प्रवृत्ती वगैरेंचा भाग जास्तच असतो.
शुक्र- मंगळ शुभ योग :
सर्वसाधारणपणे शुक्र-मंगळांच्या शुभ योगात शुक्राच्या कारकत्वास, गुणधर्मास मंगळाच्या शक्तीने उत्तेजन व प्रोत्साहन मिळते. या योगातील प्रेमास लैंगिक अधिष्ठान असते. स्वार्थी, वस्तुनिष्ठ व अधिभौतिक गोष्टींवर आधारित असे हे प्रेम असते. सर्वच बाबतीतील अपेक्षा जास्त वाढवणारा हा ग्रहयोग आहे. हा ग्रहयोग असणाऱ्या व्यक्ती खऱ्याखुऱ्या अर्थाने शौकीन व हौशी आढळतात. त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात रंगेलपणाही आढळतो. वागण्यात छानछोकीपणा, टापटीप व सर्व सुरेख वस्तूंचे आकर्षण आढळते. पुरुष पत्रिका पत्नी सुस्वरूप दर्शवते. या व्यक्तीची प्रवृत्ती खर्चिक असू शकते.
शुभ योग म्हणजे ६० अंशाचा लाभयोग व १२० अंशाचा त्रिकोण योग.
शुक्र- मंगळ युति योग :
बृहज्जातक मध्ये शुक्र- मंगळ युती योग असता जातक गोपालक, मल्ल, सतत दक्षता घेणारा व पत्नीखेरीज अन्य स्त्रियांशी संबंध ठेवणारा व जुगारी असतो असे वर्णन दिले आहे.
सारावली मध्ये शुक्र- मंगळ युती योग असता जातक आपल्या जातीत अथवा त्या भागातील लोकांचा मुख्य असतो, त्यास लोक मानतात. तो गणितज्ञ असतो; तसेच खोटे बोलणारा व जुगारी असतो असे वर्णन आले आहे.
जातक पारिजात मध्ये शुक्र- मंगळ युती योग असता जातक धातुशास्त्रात प्रवीण, धूर्त व जादूगार असतो असे वर्णिले आहे.
शुक्र-मंगळाच्या युति योगात भोग प्रधानता व पर युवति बरोबर रतत होण्याची लालसा जास्त आढळते. प्रसिद्ध ज्योतिषी बी. सूर्यनारायणन यांनी बृहज्जातकाच्या भाषांतरातील टीकेत पान २८५ वर त्यांचा अभ्यासलेल्या शुक्र-मंगळ युतीच्या कुंडल्यांमधील निष्कर्ष मांडताना म्हणतात, की या व्यक्ती पुरुष वा स्त्री यांचे वर्तन अनैतिक असून त्यांना गुप्त रोगाची बाधा झालेली आढळते.
राशिदृष्ट्या शुक्र- मंगळ युती
सर्वसाधारण पुरुषांच्या पत्रिकेत मेष, कर्क, वृश्चिक, मीन, वृषभ, तुला या राशीत ही युती कामुकता, प्रणय या दृष्टीने जास्त प्रबळ आढळते. तरुण वयात एखादे प्रेमप्रकरण घडण्याचा जास्त संभव असतो. युती एखाद्या ग्रहाच्या कुयोगात असता ‘पर स्त्री संबंध’ येण्याची शक्यता वाढते. वरील राशीतील युती हर्षल, नेपच्यूनच्या कुयोगात असता अथवा चंद्राच्या सप्तमात अगर लग्नाच्या सप्तमात पापग्रह असता प्रतारानेची शक्यता राहते. वरील राशीतील युती, गायन, वादन, नृत्य, अभिनय, फोटोषाची इत्यादी कोणत्याही कलेची आवड व प्रेम उत्पत्र करणारी व त्यात प्रावीण्य देणारी असते.
जल राशीत अथवा स्थानात राशिबली व योगबली अशी युती स्त्रियांच्या कुंडलीत असता, संसार सर्व आधुनिक सोयींनी व साधनांनी सज्ज करण्याकडे त्यांचा कल असतो व सतत तशी धडपड असते. अशा स्त्रियांना घरात उंची व भारी किमतीच्या वस्तू घेण्याचा छंद असतो. अशा गोष्टी त्यांना दैवयोगाने उपलब्ध होतात.
शुक्र- मंगळ अशुभ योग
अशुभ योग ४५ अंश, ९० अंश, १३५ अंश, १५० अंश व १८० अंश मध्ये होत असतात. अशुभ योग सर्वसाधारणपणे व्यक्तीला सुख लाभू देत नाहीत. त्यामध्ये केंद्रयोग व प्रतियोग हे जास्त महत्त्वाचे ठरतात. ते व्यक्तीला वैवाहिक सुख लाभू देत नाहीत. तसेच हे योग असमाधान व वैगुण्य निर्माण करणारे असतात. व्यक्तीला अपेक्षाभंगाचे दुःख होते, जोडीदाराची योग्य ती साथ न मिळाल्यास त्यास दूषणे दिली जातात. लोकांना व परिस्थितीला नावे ठेवण्याच्या मागे त्यांच्या अपेक्षाच जास्त आढळतात.
स्त्रियांच्या कुंडलीत असा योग असल्यास पतीचा स्वभाव मोठा अप्पलपोटी, आपमतलबी आढळतो. अगर पतीच्या आरोग्याचे दृष्टीने काही भास निर्माण करणारा असतो. पती-पत्नी प्रकृतीच्या दृष्टीने एकमेकांना अनुरूप राहत नाहीत. शुक्र निसर्गतः द्वितीय या कुटुंबस्थानाचा कारक असल्याने कुटुंबातील इतर व्यक्तीमुळे त्या जातकास त्रास भोगावे लागतात.
शुक्र- मंगळ अशुभ योगात शनी, हर्षल, नेपच्यून यांसारख्या एखाद्या ग्रहाचा कुयोग असता, भावनांच्या दृष्टीने मोठेच दुःख भोगावे लागते, अगर आपत्ती येतात, पती-पत्नीत वितुष्ट येते अगर बराच काळ एकमेकांपासून वेगळेही राहावे लागते.
शुक्र- मंगळ अशुभ योगामुळे जातक जास्त सुखासीन, उधळी, चैनी होण्याचा संभव असतो. जातकाच्या वागण्यात संयम कमीच आढळतो. याचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. कुंडलीत भावनांचा कोंडमारा करणारे इतर योग असता जातकाला मानसिक दुःख जास्त आढळते.
तात्पर्य हेच की, शुक्र-मंगळ योग अनेक कुंडल्यांत सापडतील. पण सर्वच जातक अनिर्बंध वासनापूर्ती करतील असे नाही. काही जातक मनात मांडे खाऊन संयमाचा प्रयत्न करतील. त्यापैकी काही यशस्वी होतील, तर काही अयशस्वी होतील आणि ही गोष्ट ज्याच्या त्याच्या मानसिक व आत्मिक विकासाच्या पातळीवर, उन्नतीवर अवलंबून राहील. काही जातक योगविद्येचा आश्रय घेऊन जीवनात विषयवासनेवर मात करतील.
हे ग्रह कुंडलीत अनुकूल स्थितीत असतील, तर सौख्य, विलास व ऐहिक सुखाचा कारक ग्रह शुक्र असल्याने त्याला मंगळाची शक्ती फारच पोषक ठरते. व्यक्तीला आनंदी, विलासी व चैनी करण्याकडे या युतीचा कल असतो. ऐहिक इच्छा व आकांक्षा वाढवणारे असे हे दोन ग्रह आहेत.
या युतीत प्रेमळपणा, आनंदी वृत्ती, समजूतदारपणाही जास्त आढळतो. ही युती एकमेकांचा आनंद जपण्यासाठी खर्च करू शकतात.
ही युती उत्तम शरीरसौष्ठव व सौदर्य देणारी आहे स्त्रियांच्या पत्रिकेत काही राशीत ही युती चांगली व आकर्षक व्यक्तिमत्त्व देते. कोणत्याही कलेस ही युती पोषक असते.
(टीप : कोणत्याही निर्णयावर येण्यापूर्वी कुंडलीतील सर्व ग्रह स्थिती, युती, दृष्टी, नक्षत्रे, रास दशा अंतर्दशा, इतर ग्रह योग ई. घटक जाणकार ज्योतिषाकडून तपासून घ्यावेत.)
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)