
विषय : वारांची उपासना व व्रत वैकल्यांची फलश्रुती
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नवग्रह साधना
नमस्कार,
अनादी काळापासून माणूस त्याचे मनोरथ पूर्ण होण्यासाठी झटत आला आहे. त्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबत आला आहे. आज प्रत्येक घरात एक तरी माणूस कोणता ना कोणता उपास धरताना किंवा उपासना करताना आढळून येतो. यासाठीच इथे मनोरथ पूर्ण होण्यासाठी वारांची उपासना व व्रत वैकल्यांची फलश्रुती काय असेल याचे संकलन आपणासमोर ठेवत आहे.
१) रविवार : ऐश्वर्यप्राप्ती व रोगनाश याकरिता रविवारी उपोषण करावे.
२) सोमवार : संतती, विवाह, द्रव्यप्राप्ती, ऐश्वर्यवृद्धी याकरिता हा वार करावा.
३) मंगळवार : कर्जमुक्ती, देवीची प्रसन्नता, कौटुंबिक पीडा निवारक, स्त्री-सौख्यप्राप्ती तसेच संकटनिवारण होण्यास मंगळवारी उपवास करावा.
४) बुधवार : कार्यसिद्धीसाठी बुधवारी उपवास करावा.
५) गुरुवार : भगवान दत्तात्रेयांची कृपाप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, भूतापिशाच्चादि बाधानिवारण, इच्छित मनोरथ प्राप्ती, संतती सुखार्थ, अरिष्टनाशार्थ, नोकरीत वरिष्ठांच्या प्रसन्नतेसाठी, अधिकारप्राप्तीसाठी, ऐश्वर्यवृद्धी तसेच संकटनिवारणासाठी या वारी उपवास करावा.
६) शुक्रवार : लक्ष्मीची स्थिरता, ऐश्वर्यवृद्धी, संकटनाश, यश, संतती, स्त्री सौख्य, विवाह इ. करिता निशीभार्गवाचे व्रत करतात. (म्हणजे उपवास करावा.)
७) शनिवार : शनि साडेसाती निवारणार्थ, शत्रुनाश संकटापासून मुक्तता, दृष्ट लोकांच्या भयापासून मुक्ती, मंततंत्र, जादूटोणा, भानामती, करणी इत्यादिकांच्या बाधाशमनार्थ आराधना करावी. मारुती व शनि महाराजांच्या प्रसन्नतेसाठी या वारी उपवास करावा.
काही व्रत वैकल्यांची फलश्रुती
१) एकादशी : सत्कार्य, सद्हेतू सात्त्विक गुणसंवर्धन ईश्वरप्रेम व मानसिक समाधान लाभणे. ऐश्वर्यवृद्धी याकरिता हे व्रत करावे.
२) संकष्टी चतुर्थी : संततीसौख्य, ऐश्वर्यवृद्धी, संकटनिवारण व कोर्टकचेरीतील यशप्राप्तीकरिता तसेच विद्या- प्राप्तीकरिता हे व्रत करावे.
३) प्रदोषव्रत : मोठा सन्मान, धनाढ्यता आणि संततीसौख्य, कर्जनिवारण, अक्षय्य द्रव्य व लक्ष्मीचा वास होण्याकरिता सोमप्रदोष, भौमप्रदोष, पक्षप्रदोष ह्यांपैकी कोणतेही व्रत विशिष्ट प्रकाराने करण्याचा प्रघात आहे.
४) शिवरात्री : हे प्रत्येक मासातील कृष्णपक्षात शिवव्रत सकल संकट निवारणार्थ व मुख्यतः संततीचे सुख संवर्धनाकरिता, संतती होण्यास व ती जगण्यासाठी व दीर्घायुष्यी होण्यासाठी हे व्रत करतात.
त्याचप्रमाणे महाशिवरात्री, आषाढी, माघी, कार्तिकी एकादशी, कृष्णाष्टमी, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, श्रीगणेश चतुर्थी यांचे उपवास व आपल्या कुलदैवत, ग्रामदेवतांचे वार्षिक उत्सव आपल्या कुलपरंपरेप्रमाणे इष्ट कार्याच्या सिद्धीकरिता किंवा नवसाप्रमाणे काही वर्षे आचरल्यानेही शुभफलप्राप्ती होते.
हे सर्व करताना तुमच्या मनी शुद्ध भाव व सकारात्मकता असणे गरजेचे आहे.
तुम्ही आत्म्यापासून त्या परमात्म्यास साद देता, तेव्हाच उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)