
विषय : रविची स्थानागत फळे
संकलन : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : नवग्रह साधना
नमस्कार,
आज आपण रवीची स्थानागत फळे पाहणार आहोत.
प्रथम भाव : जन्मलग्नी रवि असेल तर जातक पित्त प्रकृतीचा, नेत्ररोगी, बुद्धिमान चारित्र्यवान, तीव्र जठराग्नीयुक्त, अल्पभाषी आणि प्रवासाची आवड असणारा’ आढळतो. जर रवि उच्च राशीचा मेष राशीचा असेल, तर जातक कीर्तिमान, शुभ व कारक ग्रहांनी दृष्ट असेल तर जातक प्रखर बुद्धीचा, पंडित असतो. नीच राशीचा -तुळेचा असेल, तर जातक विद्वानांशी वैर ठेवणारा, दरिद्री व तिरळा आढळतो; परंतु शुभ ग्रहाने दृष्ट असता, अशी अशुभ फळे मिळत नाहीत. स्वराशीचा किंवा सिंह नवांशाचा रवि लग्नी असेल, तर जातक कोणत्या तरी प्रदेशाचा पुढारी बनू शकतो. कर्क राशीचा रवि लग्नी असेल, तर जातक ज्ञानी पंडित परंतु फोड, पुटकुळ्याने त्रासलेला असतो. कन्या राशीचा रवि लग्नी असेल तर जातक कन्या संतती अधिक असलेला, स्वीचिंतेने व्याकुळ व उपकारकर्त्याचा नाश करणारा असतो. मकर-रवि लग्नी असेल तर हृदय रोगी, कुंभ-रवि असेल तर जातक निर्धन, भाग्यहीन, स्वार्थी गूढ विद्येचा जाणकार असतो. मीन राशीचा रवि असेल तर जातक ज्वर-पीडित असतो.
द्वितीय भाव : धनस्थानी रवि असेल, तर असा जातक स्वतंत्र व्यवसाय करणारा आढळतो. नोकरी किंवा कोणाच्या आधीन राहून काम करणे त्याला आवडत नाही. कुटुंबीयांचा मृत्यू त्यांच्या डोळ्यांदेखत होण्याचा संभाव असतो. पिता-पुत्रात परस्पर सामंजस्य राहत नाही. शरीरात उष्णता, हात-पायाला घाम येणे, डोळ्यांत जळजळ, दृष्टी मंद होणे, उत्तमोत्तम भोजन करण्याची इच्छा होणे असे आढळते. मिथुन, तूळ, कुंभ राशीचा रवि धनस्थानी असेल, तर जातक स्वतः खूप पैसे मिळवतो. तो कंजूष असल्याने पैशाचा चांगला संग्रह करण्यात यशस्वी होतो. लोकांची सहानुभूती त्याला मिळत नाही. रवि हा कर्क, वृश्चिक, मीन राशीचा द्वितीय स्थानी असेल तर जातक उच्चाधिकारी बनतो. धनु राशीचा जातक स्वार्थी आढळतो. स्वतःला मोठे बनण्याची अपार इच्छा असते. जर वृश्चिक, धनु, मकर किंवा कुंभ लग्न असेल आणि रवि धनस्थानी असेल आणि धनभावाचा स्वामी धनेश, गुरू, शनि वक्री असून २, ४, ६, ८, १२ वे स्थानी असेल, तर जातका दारिद्य्र व उपासमारीची वेळ येऊ शकते.
तृतीय भाव : तृतीय स्थानी रवि असेल तर जातक बुद्धिमान आढळतो. त्यास लहान भावाचे सुख लाभत नाही. लहान भाऊ असला, तर त्याच्याशी पटत नाही. मोठ्या भावाचा मृत्यू होणे संभवते. तृतीय स्थानी रविबरोबर पापग्रह असेल, तर व्यक्तीचा स्वभाव हिंसक असतो. उच्चीचा रवि असेल तर व्यक्ती आळशी, गप्पीष्ट आणि कमकुवत विचारांची असते. मिथुन, तूळ, धनु, कुंभ या पुरुष राशींपैकी एका राशीत रवि असेल तर जातक शांत विवेकशील, पुढारी, बुद्धिमान, सामाजिक कार्यात भाग घेणारा असतो. सत्ता गाजविणारा, भावाभावांत वाटण्या गोडीत होतात. स्त्री राशी वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर, मीन यापैकी एक राशीतील रवि तृतीय स्थानी असेल तर वाटणीसाठी मारामाऱ्या, कोर्ट-कचेऱ्या व भांडणे होतात. कुंडलीत तृतीय स्थानी रवि असेल, तर अशा जातकाने भावाबरोबर राहू नये. अन्यथा दोघांचाही भाग्योदय होणार होण्यास कष्ट पडू शकतात.
चतुर्थ भाव : चतुर्थ भावात असलेला रवि बहुधा अनिष्ट फळे अधिक निर्माण करतो. भृगुसूत्रानुसार असा जातक हिनांग असतो. म्हणजे त्याच्या शरीरात कुठलातरी अवयव कमी असतो. तो अहंकारी व भांडकुदळ्या असतो. त्याच्या शरीरात कायम उष्णता असते. मन व्याकुळ, धनधान्याची कमतरता, त्याच्यामुळे पित्याच्या धनसंपत्तीचा, वास्तूचा नाश होतो. मंदबुद्धी, क्रूरपणा, परकीयांशी संबंध, पित्याशी वैर, अस्थिर विचारांचा व लोकांमध्ये अप्रिय असणे इत्यादी फळे रवि, वृषभ, कुंभ, सिंह, वृश्चिक राशीत असला तर दिसतात. चतुर्थेश बलवान असेल, स्वराशीत असेल, त्रिकोण किंवा केंद्रस्थानी असेल, तर वरील फळे मिळत नाहीत. उलट उच्च वाहन प्राप्त होऊ शकते. चतुर्थ भावात रविबरोबर शुभ ग्रह असेल, तर जातक लोकप्रिय व सर्वजन प्रिय असतो. तो युद्धकलेत पारंगत असतो व पुढे होऊन लढतो, पाठ दाखवत नाही. त्याला मृत्यू शांतपणे येतो. चतुर्थ भावात रवि असता जातक लहानपणी दुःखी, तरुणपणी सुखी व वृद्धावस्थेत पुन्हा दुःखी असतो.
पंचम भाव : रवि पंचम भावात असेल, तर जातक स्थूल, निर्धन, अल्प संपत्तीवान व संततिविहीन असतो. अशी फळे बहुधा मेष, सिंह, मिथुन, धनु, तूळ व कुंभ राशीत रवि असता मिळतात. कर्क, वृश्चिक व मीन या जल राशीत रवि असेल, तर संतती रुग्ण अवस्थेत जन्मान्याचा संभाव असतो. जर पंचम भावातील रवि, चंद्र, गुरू, शुक्र, दृष्टियुक्त, युक्तियुक्त असेल, तर संततीच्या जीवास धोका होण्याचा संभाव असतो. रवि वृषभ, कन्या, मकर या पृथ्वीतत्त्वाच्या राशीचा पंचम भावात असेल, तर व्यक्ती दुष्ट बुद्धीची दुराचारी, क्रोधी, कुरूप असते. मिथुन, तूळ, कुंभ या वायुराशीत रवि असून तो पंचम भावात असेल तर जातक क्रोधी, मानसन्मानहीन, मूर्ख, नास्तिक व धार्मिक कार्यात विघ्ने आणणारा आढळतो. मेष, सिंह, धनु या अग्नितत्त्वाच्या रार्शीचा रवि पंचम भावात असेल, तर जातकाचे शिक्षण पूर्ण होते. जर हाच रवि उच्च असेल, तर संततीस धोका असतो. सिंहेचा रवि पंचम असेल, तर संततीस मृत्यूचा धोका असतो. अथवा माता-पित्याला खूप त्रास होतो. स्त्री राशीचा रवि पंचम भावात असेल तर जातक स्वार्थी आढळतो. पंचम भावात कोणत्याही राशीचा रवि असेल तर पुत्र कमी व मुली अधिक असतात.
षष्ठभाव : षष्ठभावात म्हणजे शत्रुस्थानी रवि असेल, तर जातकाला शत्रु फार असतात. याला विष, शास्त्र, संसर्ग रोग व व्यसनामुळे त्रास भोगावा लागतो. हाच रवि पाप प्रभावात असेल तर जातकाचे आरोग्य चांगले राहत नाही. दीर्घकालीन आजार भोगावे लागतात. वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर राशींचा रवि षष्ठभावात असेल तर जातकाला गळ्याचे रोग, फोड- पुटकुळ्या, डिप्थिरिया, दमा व खोकला असे आजार होतात. रवि, कन्या राशीचा असेल तर क्षय होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. फुफ्फुसात कफ होतो, मेष-कर्क, तूळ, मकर या राशींचा रवि असेल तर संधिवात, पोटाचे रोग होतात. षष्ठभावातील रविबरोबर इतर शुभ ग्रह असेल तर जातक मंत्रशास्त्राचा जाणकार, सर्पाचे विष काढणारा असतो. मातुलपक्षाकडून फायदा मिळतो. नेहमी निरोगी व धन-संपत्तीने युक्त असतो.
सप्तम भाव : सप्तम भावात अग्नी राशीचा रवि असेल तर जातकाचे दोन विवाह होण्याची शक्यता असते. प्रथम विवाह विलंबाने होतो. जातक कोणाच्या आधीन कार्य करणे पसंत करीत नाही. स्वतंत्रपणे काही करण्याची इच्छा असते. वायुराशीचा रवि सप्तम असेल तर जातक शिक्षण विभागात मोठा अधिकारी बनतो. वृषभ, कन्या, मकर या राशींपैकी एखाद्या राशीतील रवि जातकाला यशस्वी व्यावसायिक बनवतो. निवडणूक लढवायला भाग पाडतो व जनपद किंवा विधानसभेत पद मिळवून देतो. जल राशीचा रवि सप्तम असेल तर जातक चिकित्सक किंवा विज्ञानवेत्ता बनतो. त्याची पत्नी प्रभावशालिनी, व्यवहारकुशल व संकटात पतीला साथ देणारी, धनप्रिया व दयाळू असते. मेष, सिंह, धनु व मीन राशींचा रवि सप्तम असेल तर जातकाला अपमान सहन करावा लागतो. वृषभ, कन्या, मकर, कर्क, वृश्चिक राशींचा रवि सप्तम असेल तर वयवर्षे ५० पर्यंत दुःखी व त्यानंतर सुखी होतो.
अष्टम भाव : अष्टम रविची बहुधा अशुभ फळेच मिळतात. याचे कारण अष्टम हे नाशस्थान आहे. अष्टम रवि पुत्रसुखात न्यूनता, पत्नी खर्चीक असणे, नेत्ररोग व डोकेदुखीसारखी फले देतो. वाईट फळे अग्नी राशीतील अष्टम रविच्या अनुभवास येतात. वायुराशीला ही फले कमी मिळतात. मिथुन, कर्क, मीन, धनु या राशींचा रवि अष्टम असेल, तर जातकाचा मृत्यु बेसावधपणणे होतो. मेष व सिंह राशीचा रवि अष्टम असता मृत्यु अचानक येतो. इतर रार्शीच्या रदिमुळे मृत्यू हा दीर्घकाळ रोगपीडा भोगल्यानंतर येतो. स्त्री राशीतील अष्टम रवि चांगली फले देतो
नवम भाव : नवम भावात असलेल्या रविची शुभ-अशुभ अशी संमिश्र फले मिळतात. महेश, धुंडिराज, वराहमिहिर या ज्योतिषाचार्यांनी नवम भावातील रविची शुभ फले सांगितलेली आहेत. नवम भाव शुभ आहे, हा त्यामागे तर्क असावा. नवम रवि जातकाला धार्मिक बनवतो; परंतु भाग्यवान नाही. पित्याशी वितुष्ट असते. हा रवि उच्चीचा किंवा स्वराशीचा असेल तर पिता दीर्घायु असतो. मिथुन, तूळ, कुंभ राशीचा रवि नवममध्ये असता जातकाची प्रगती लेखन, प्रकाशन, मुद्रण, अध्यापन या क्षेत्रांत होते. कर्क, वृश्चिक, मीन राशींचा रवि नवम असेल, तर जातक कविता म्हणणारा, नाट्यकलेत प्रवीण, नाट्यविद्येचा जाणकार असतो. हा रवि पृथ्वी तत्त्वाच्या राशीत नवम भावात असता जातक कृषीसंबंधित व्यापार करतो. अग्नी राशीतील रवि नवम असेल, तर जातक सैनिक किंवा इंजिनिअर बनतो. इतर राशींच्या जातकाला आपल्या बलाप्रमाणे ख्याती मिळवून देतो.
दशम भाव : दशम रवि जातकाला सुशिक्षित करून प्रसिद्धी देतो. दशम रवि, वृषभ, मिथुन, कन्या, मकर, मीन राशींचा असेल, तर जातक नोकरीत उच्च अधिकार प्राप्त करतो. इतर ग्रहस्थितीही या रविबरोबर बलवान असेल तर जातक राज्यपाल, मंत्री बनतो. वृश्चिक राशीचा रवि नवम असेल, तर जातक चिकित्साधिकारी बनतो. तूळ राशीत हा रवि असेल, तर जातक न्यायाधीशासारखे पद मिळवतो. दशमभावस्य रवि मेष, कर्क, सिंह, धनु राशीचा असेल, तर जातक सेना, पोलीस, अबकारी, कस्टम इत्यादी विभागांत अधिकारी बनतो. जातक शेवटी धन, देह, पुत्रसुखाने वंचित राहतो.
एकादश भाव : एकादश भावात रवि असेल, तर जातकाला कसले तरी दुःख भोगावे लागते. संपत्ती, संतती यापैकी एक सुख जातकाला मिळते. दोन्ही सुखे तेव्हाच मिळतात, जेव्हा रवि जन्मकुंडलीत शुभ प्रभावात आणि बलवान असेल. नीचस्थ तूळ राशीतील रवि धनवान, प्रतिष्ठा व संततिसुख इत्यादी सर्व देतो. धनु राशीचा रवि जातकाला कायदेपंडित व न्यायाधीश बनवतो. कुंभ राशीत रवि असेल, तर जातक निर्धन असतो. पुरुष राशीचा रवि शुभ फले देतो.
द्वादश भाव : द्वादशम भावातील रविची अशुभ फले मिळतात. हे सर्व प्राचीन महर्षीनी एकमताने प्रतिपादन केलेले आहे. द्वादश भाव हे दुस्थान आहे. द्वादश स्थानी रवि असेल तर जातक आपल्या पित्याशी शत्रुत्व ठेवतो. नेत्ररोग, धन व संततिहीन असतो. पत्नी पथभ्रष्ट असणे, पती-पत्नी स्त्रीगामी- परपुरुष असणे, हेही एक कारण यामागे आहे. जलराशीचा रवि जातकाला खर्चीक बनवतो. त्यामुळे धनभाव समाजात प्रतिष्ठा मिळते. पृथ्वी राशीचा रवि असेल, तर जातक आदर्शवादी असतो. तो हसत संकटांना सामोरा जातो. अग्नी राशीचा रवि जातकाला अभिमानी, दुराचारी, अपराधी व कंजूष बनवतो.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)