प्रभू श्रीराम नामाचा जागर


प्रभू श्रीराम नामाचा जागर

राम… या नावातच एक मूर्तिमंत चैतन्य आहे. किंबहुना राम हेच एक चैतन्य आहे. पूर्वी लोक एकमेकांना भेटले की, नमस्कार करत व नकळत शब्द फुटत असत “राम राम”. म्हणजे तू ही “राम आणि मी ही राम”. आयुष्यात अनुत्साह भरला की सहज बोललं जाई की, आयुष्यात आता काही राम राहिला नाही. कशाची भीती वाटली तर नकळत राम राम राम राम हा जप सुरु होत असे.

हिंदू संस्कृतीत रामनवमी चा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कारण या दिवशी विष्णूचा सातवा अवतार मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्म झाला. तसेच दरवर्षी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांच्या लंकेवरील विजयाच्या स्मरणार्थ दुष्टाचे प्रतीक असलेले रावणाचे दहन केले जाते आणि दसरा साजरा केला जातो. राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध झाले. हे युद्ध पाहून देव आणि दानव हे सर्व आश्चर्यचकित झाले. सर्वांना माहित आहे की राम शिवभक्त होते. श्रीरामांनी युद्धाच्या अगोदर शिवाची पूजा केली. रामेश्वरम याचा पुरावा आहे. अशा या प्रभू श्रीरामांचे नाव प्रत्येक हिंदुच्या हृदयात वसलेले आहे. आणि याचे अगदी अलीकडच्या काळातील बोलके उदाहरण म्हणजे जेव्हा रामायण ही टि.व्ही. वर मालिका सुरु होताच रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा दिसायचे नाही. सर्वजन रामायण बघण्यात दंग. अशा या लोकप्रसिद्ध महापराक्रमी, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे ज्योतिष अभ्यासकांनी कुंडली विश्लेषण केले नसते तरच नवल.

प्रभू श्रीरामाच्या प्रचलित कुंडलीनुसार श्री रामाचे कर्क लग्न उदीत असून कर्क चंद्र रास आहे. जन्मकुंडलीत गुरु लग्न स्थानी आहे. ही स्थिती जातकास न्याय्य आणि क्षमाशील बनवते. गुरु लग्न स्थानी चंद्रासमवेत आहे. कर्क राशीतील ज्ञानाचा कारक गुरु उच्च मानला जातो. ही स्थिती जातकास भावनिक आणि विद्वान आणि विवेकी स्वभाव देते. अशा जातकांना सभ्य जीवन जगणे आवडते. प्रभू श्रीरामांतही हे गुण होते. म्हणूनच एक पत्नी मर्यादापुरुषोत्तम व महाविव्दान म्हणून प्रभू श्रीराम प्रसिद्ध आहेत. मंगळ मकर राशीत आहे. ज्योतिषशास्त्रात, मकर राशीत मंगळ उच्च मानला जातो. मंगळ हा सामर्थ्य, शोर्य, निर्भयता, योद्धा याचा कारक ग्रह आहे. सहाजिकच श्रीराम हे पराक्रमी होते. प्रभू श्रीरामांच्या कुंडलीत मंगळ सातव्या म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या स्थानात आहे. व १० वे स्थानात मंगळाची मेष राशी आहे. जे लाभ स्थानाचे व्यय स्थान आहे. त्यामुळे सीतेच्या सहवासास पारखा झाला. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह मानला जातो. हा शुक्र ९ वे स्थानात गुरुच्या राशीत केतू बरोबर आहे, जो गुरु ६ वे व ९ वे स्थानाचा स्वामी आहे, ९ वे स्थान अनोळखी ठिकाणी प्रवास दाखवतो. ६ वे स्थान शत्रू स्थान असून ७ वे स्थानाचे व्यय स्थान असल्याने. प्रभू श्रीरामांच्या नशीबी वनवासात आला असताना रावणाव्दारे सीतेचे अपहरण व वियोग दिसतो. तसेच ७ वे स्थानाचा स्वामी शनी सुख स्थानात उच्च असूनही ८ या मृत्यू स्थानाचा पण स्वामी असल्याने जोडीदाराचा विरह व दु:ख वाट्यास आले. अशा प्रकारचे विविध विश्लेषण आपल्या ज्योतिष विद्वानांनी केले असेल या बद्दल खात्री आहे.

असे हे प्रभू श्रीराम सूर्य वंशीय होते. सूर्य म्हणजेच साक्षात अग्नी तत्व. मंत्र शास्त्राप्रमाणे “रं” हे अग्नी बीज आहे. या अग्नी बीजाचा जप केला असता अग्नी निर्माण करता येतो. या करता हे बीज सिद्ध करावे लागते. या मंत्राचा प्रभावी वापर करून पूर्वजांनी अनेक शक्ती प्राप्त केल्या. पूर्वीच्या काळी अग्नी अस्त्र या सामर्थ्याने निर्माण केले जायचे. या बीज मंत्राच्या जपाने सूक्ष्म देह शुद्ध होतो. कालांतराने मंत्रातील तेज व शक्ती ग्रहण करण्यासाठी जे मनोबल लागते, ते कमी झाले. माणसे मानसिकरीत्या दुर्बल होऊ लागली. जे लोक खूपच अपवित्र आणि दुष्ट विचारांनी भरलेले असतात, त्यांनी या बीजाक्षराचा जप केला असता त्यांच्या अंगाची आग होऊ लागते. यामुळे तत्कालीन ऋषींनी “रं” या बीजमंत्राला सौम्य करून “राम” या नाममंत्रात रुपांतर केले व राम नामाचा प्रसार होऊन ते सर्वतोमुखी झाले.

अशा ईश्वरी अवतार प्रभू श्रीराम यांच्या जन्मकुंडलीत सूर्य साक्षात कर्म स्थानी मेष राशीत उच्चीचा आहे. तसेच मेष व सूर्याची सिंह ही या धर्म त्रिकोणातील म्हणजेच अग्नी तत्वाच्या राशी आहेत. अशा या प्रभू श्रीरामांचे कर्म धार्मिक व उच्चकोटीचे आहे व त्या तेजस्वी प्रभू  श्रीरामांचे हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. हे सर्व लिहित असताना अजून एक गोष्ट डोक्यात आली ती, म्हणजे जेव्हापासून भा.ज.प. ची स्थापना झाली व भारतभर हिंदुत्वाचा व रामलल्लाचा नारा सगळीकडे दुमदुमू लागला, तेव्हा अग्नीतत्व व धर्म तत्व प्रभावी होणे स्वाभाविक होते. या पक्षाची स्थापना ६ एप्रिल, १९८० रोजी झाली. या पक्षाच्या काळातील तुम्ही घटनांकडे नजर टाकली तर हेच आढळून येईल की, अग्निबाण, क्षेपणास्त्रे, मंगळ यान, सर्जिकल स्ट्राईक, हिंदुत्व, धार्मिकता, अयोध्या राम मंदिर, प्राण प्रतिष्ठा ई. अगदी या आठवड्यातील बातमी म्हणजे सूर्याचे आपण घेतेलेले फोटो अशा अनेक घटना तुम्हाला हेच सुचवतील की अग्नीतत्व प्रभू श्रीरामांच्या कृपेने प्रखर झाले आहे. स्वतंत्र भारताच्या जन्म कुंडलीत जन्म लग्न नक्षत्र व चंद्र नक्षत्र हे सूर्याचेच असून सूर्य पराक्रम स्थानी स्थित आहे. व भारत देश जागतिक राजकारणातील एक प्रभावी व तेजस्वी तारा बनला आहे. उत्सुकता म्हणून भा.ज.प. ची जन्म कुंडली तपासली असता लक्षात आले की, या कुंडलीचे मिथुन लग्न असून कर्म स्थानात सूर्य व पराक्रम स्थानात सिंह रास आहे. मंगळ देखील पराक्रम स्थानात असून मेष रास लाभ स्थानी आहे. व नवांश कुंडलीकडे लक्ष दिले असता. मेष नवांशात राहू व मंगळ आहेत. म्हणजे साक्षात “रा म” अवतरले आहेत. माझ्या बाळबोध बुद्धीने हा अर्थ काढला की, या पक्षाचे हिंदुत्ववादी धोरण, रामाप्रती असलेले प्रेम, राम मंदिर निर्माण त्यांना अग्नितत्वाचे तेज, पराक्रम, प्रखरता बहाल करणार नाही काय. ही तर साक्षात प्रभू श्रीरामांचीच कृपा, ज्या योगे आपला हिंदुस्थान जगात अव्वल असणार आहे.

जय श्रीराम !!!   

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिष विद्या वाचस्पती, ज्योतिष समुपदेशक
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment