पूर्वा भाद्रपदा नक्षत्र विचार


विषय : पूर्वा भाद्रपदा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण पूर्वा भाद्रपदा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील २५ वे नक्षत्र असून नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘मार्काब’ आहे. नक्षत्रामध्ये २ तारे असून ते थोडे पांढऱ्या व पिवळसर रंगाचे असून बरेच तेजस्वी व प्रकाशित आहेत. तारे दिसण्यात बरेच सुंदर व आकर्षक वाटतात. हे नक्षत्र आकाशात सहजपणे ओळखता येते. कारण याच्या थोड्या दक्षिणेस उच्चैःश्रवा नावाची घोड्याची आकृती व उत्तरेला अतितेजस्वी शर्मिष्ठा, पूर्वेला ययाती असे बरेच तारे आहेत.भाद्रपद महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते.

भद्र म्हणजे कल्याण करणे व पूर्वा भाद्रपदा म्हणजे पूर्व आयुष्यात कल्याण करणारे असे हे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. हे अधोमुख, क्रूर, उग्र, मध्यलोचनी व मनुष्यगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचे ३ चरण कुंभ राशीत व १ चरण मीन राशीत असल्यामुळे हे त्रिपाद नक्षत्र आहे.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्र स्वामी गुरु, दैवत अज चरण (अज एकपदा) नावाची देवता, राशी स्वामी शनि व गुरु आहेत. म्हणून या नक्षत्रामध्ये शनीची चिकाटी, दूरदर्शीपणा, प्रगल्भबुद्धी, गुरुचा शहाणपणा व बुद्धीमत्ता यांचा सुरेख संगम आढळून येतो. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे आधिपत्य आहे. हे नक्षत्र तसे शुभ रजोगुणी, सेवावृत्तीचे पण आश्रित वाटते. या नक्षत्राखालची व्यक्ती नम्र, सदाचारी, देवभक्त धर्माचे आचरण करणाऱ्या, विद्याव्यासंगी, विनयशील, बुद्धीमान, परोपकारी, सुखीसमाधानी, मुलाबाळांचे सुख मिळणाऱ्या, बोलक्या, समाजप्रिय, कल्पक, उदार पण नावलौकिकाची हौस बाळगणाऱ्या, सदाचारी, प्रेमळ व कुटुंबवत्सल असतात. कायद्याचे पालन करण्याची वृत्ती असते.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री जन्मलेल्या पुरुषांना हे नक्षत्र तसे अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे धाडस, स्वावलंबन, थोडा कठोरपणा हे गुण या नक्षत्रात प्रामुख्याने असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा थोडा उंचसर, सडपातळ व थोडा भारदस्त आढळतो. हात, पाय, मांड्या, मनगटे यांचा आकार लांब व मोठा असतो. चौरस व भव्य कपाळ व थोडा उभट चेहरा असतो. हे जातक सद्गुणी, सत्शील, नम्र, विद्याव्यासंगी, सदाचारी, देवभक्त व सेवावृत्तीचे, समाजकार्याची व सेवेची आवड असणारे असतात.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री जन्मलेल्या स्त्रियांना हे नक्षत्र सौंदर्याच्या दृष्टीने मध्यम असून तरी बुद्धी व गुणांच्या दृष्टीने बरे आहे. कलेच्या दृष्टीने मात्र ते साधारण आहे. संगीत, नृत्य, चित्रकला, वादन यांना फारसे अनुकूल नाही. पूर्वा भाद्रपदा नक्षत्री जन्मलेल्या स्त्रिया उंच व मध्यम बांधा, प्रमाणशीर व प्रमाणबद्ध शरीर, हाडापेराने मजबूत, चेहरा नाकी डोळी सुरेख, थोडा आकर्षक व उभट असतो. चेहऱ्यावर बुद्धीमत्ता व सात्विकता जास्त आढळते. त्या काटक, चपळ व तरतरीत असतात. स्वभावाने तर नम्र, गोड बोलणाऱ्या, विनयशील, पतीची सेवा करणाऱ्या, मुलाबाळांचे संगोपन करणाऱ्या, कामसू, संसारी व कर्तव्यदक्ष असतात. टापटीप, नीटनेटकेपणा व स्वच्छता यांची आवड असते. धार्मिक, देवधर्म करणाऱ्या पण अंधश्रद्धावादी नसतात. दागिने, फॅशने किंवा छानछोकीपणाचा आवडत असला तरी, फारसा हव्यास नसतो.  सौंदर्यदृष्टी साधारण असते, पण त्यांचे नेसणे, वागणे व राहणी नीटनेटकी, डोळ्यांना समाधान देणारी असते.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री रवि साधारण असतो. शरीरप्रकृती व ऊर्जा मध्यम असून सामान्यत: अधिकार योगही मिळतो. पण बुद्धीच्या दृष्टीने साधारण असतो.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री चंद्र हा प्रकृतीच्या दृष्टीने साधारण, पण सौंदर्य व बुद्धीच्या दृष्टीने बरा. स्वभावाने विद्याव्यासंगी, नम्र व सेवावृत्तीचा असतो. शोधक वृत्ती आढळते.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री बुध हा शरीरप्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने बरा. तब्येत काटक व चपळ असते. बुद्धी कुशाग्र, खोल, विचारी असते. ग्रहण, आकलन, प्रतिभाशक्ती व पाठांतरशक्ती चांगली असते. लेखन वाचनाची आवड असते. कर्तृत्व, संभाषण, जमाखर्च, टायपिंग, पत्रव्यवहार यांना चांगला.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री गुरुला हे नक्षत्र बुद्धीमत्ता व शिक्षणाच्या दृष्टीने फार अनुकूल. मात्र शरीरप्रकृती तशी मध्यमच. बुद्धी, कुशाग्र, खोल, श्रेष्ठ, वैशिष्ट्यपूर्ण, संशोधक, व्यासंगी, हुशार व खरा ज्ञानी असतो. उच्च शिक्षण पूर्ण होते. सायन्स, कॉमर्स, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, कला अशा सर्वच विषयांना उत्तम. प्रोफेसर्स व शिक्षक यांना चांगला. मात्र साधारण अधिकारयोग देते.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री शुक्र मात्र जरा उदासच असतो. शरीरप्रकृती व बुद्धीमत्ता किंवा कला यांना अनुकूल नसतो.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री शनी तब्येत, बुद्धीमत्तेच्या दृष्टीने अनुकूल. तीष्ण, खोल, संग्रही चिकित्सक, चौकस असतो. मात्र शास्त्रांना अनुकूल नसून व्यावहारिक विद्येला बरा. तत्त्वकथन, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स, इंजिनिअर्स यांना बरा.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री राहू शारीरिक प्रकृती व बुद्धीच्या दृष्टीने साधारण.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री केतू हा तत्त्वज्ञान, धर्म, पारमार्थिक व आध्यात्मिकदृष्ट्या बरा.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री हर्षल हा बुद्धीमत्ता, संशोधन व कोणत्याही शाखेतील उच्च संशोधन यांना चांगला. जातकास कर्तृत्ववान व हरहुन्नरी बनवतो.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री नेपच्यून बुद्धीला ठीक असला तरी थोडा उल्हसितपणा व हर्षितपणा यांचा अभाव असतो.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री होणारे आजार फारसे दाहक नसले तरी बराच काळ टिकणारे असतात. विशेषतः थंडी, कफ, सर्दी, ताप, हिवताप, अशक्तपणा. गुरु असता रक्तदाबाचे विकार, चंद्र शनी युती असता थोडा दमा, रुधिराभिसरण किंवा रक्ताभिसरण बरोबर न होणे, गुडघे दुखणे, संधिवात असे रोग जास्त होतात. रवि बिघडला असता हृदयविकाराचे रोगही होऊ शकतात. मंगळ बिघडला असता रक्तन्यूनता व रक्तदोष आढळतात.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्री येणारा वर्ग बराचसा मध्यमवर्गीय आढळतो. हे सेवावृत्ती व बौद्धिक प्रवृत्तीचे असल्याने बुद्धीजीवी व नोकरी करणारा वर्ग जास्त. सरकारी कचेऱ्या, सचिवालय, बँका, म्युनिसिपालटी, रेल्वे, लोकल, बोर्ड, खाजगी कंपन्या, हिशेबनीस तसेच शाळा-कॉलेजातील शिक्षक व प्रोफेसर वर्ग येतो. फार मोठाले व्यापारी न येता किरकोळ व्यापारी किंवा सेल्सटॅक्स, इन्कमटॅक्स कन्सल्टंट, शाळा किंवा क्लासेस चालवणारे हा वर्ग जास्त येतो. शेतकरी किवा कामकरी वर्ग येत नाही.

पूर्वा भाद्रपदा नक्षत्रावर ३ किंवा ८ या अंकाचा प्रभाव जास्त वाटतो व रत्न गुरुचा पुष्कराज किंवा शनीचा नीलमणी लाभदायक होतात. हस्ताक्षर उभट, मोठे, जरा तिरके पण साधे असते. मध्यलोचनी नक्षत्र असल्याने वस्तू हरवल्यास ती फार प्रयत्न केल्यासच पश्चिमेकडे मिळू शकते. नुकसान फार होते.

मुहूर्तशास्त्रात पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र फारसे महत्त्वाचे ठरत नाही. विहिर खणण्यास आरंभ करणे, पुरलेले द्रव्य काढणे, द्यूत खेळणे, गणितारंभ, मद्य काढण्यास आरंभ करणे, विद्याभ्यासारंभ, अन्नप्राशन, मौंजी, प्रयाण, शेतकामास आरंभ ही कृत्ये करावीत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment