
विषय : ॐकार स्वरूपा तुज नमो
संकलन व मांडणी : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ ग्रंथ : दैवत शास्त्र व ओम हा गुरु (स्वरूप बोध)
नमस्कार,
हिंदू संस्कृती हे वैदिक संस्कृती असल्याने आपल्याला अनेक पिढ्यांचा धार्मिक वारसा लाभला आहे. त्यामुळे आजच्या आधुनिक विज्ञान युगात व भौतिक सुखलालसेच्या दुनियेत देखील आस्तिकता टिकून आहे. आपण मनोभावे आपल्या प्रिय व श्रद्धास्थान असलेल्या देवाची आराधना करत असतो. हिंदू धर्मात अनेक देव मानलेले आहेत. गणपती हा एक प्रचंड लोकप्रिय देव. ज्याची महती देश विदेशात पोहोचली आहे.
निर्माण, संचालन व लय दर्शवणारे ॐकार हे जगाचे आदिकारण आहे, त्याची रचना अ, उ, म् व बिंदु आणि अनुच्चारित अर्धमात्रा यांचे संयोगाने झाली आहे. अ हा अविकृत स्वर, उ (ऊ) हा विकृत स्वर, म हा व्यंजनांचा अनुनासिकांचा (इ, ञ, न, म, ण) प्रतिनिधी आणि बिंदू हा शक्तियुक्त उच्चार. म्हणजेच अविकृत स्वर, विकृत स्वर, अनुनासिके आणि बिंदु व अनुस्वार या सर्व शब्दशक्तींचा एकत्रीकरण म्हणजे ॐ कार. हा शब्दांचा अविष्कार म्हणजेच अक्षरब्रह्म. आणि या अक्षरब्रह्माचे प्रकट रूप म्हणजे श्री गजानन.
जगातील सर्व विद्या या अक्षर प्रधान वा शब्द प्रधान असल्यामुळे गजानन ही विद्येची देवता ठरली; व बुद्धिचीही देवता ठरली. जोडाक्षर व गतिचा निदर्शक असे अक्षर ऋत् (गतिदर्शक व सार्वकालिक सत्य ऋतू ) आणि धी म्हणजे बुद्धि ऋ + धी = ऋद्धि यांचा पती म्हणून तो ऋद्धिपती असे हे गजाननाचे अक्षर ब्रह्मरुप आहे.
गणपतीचा टोकेरी दात म्हणजे स्वयंभू शस्त्र. कोठेही शिरण्याची त्याची क्षमता, तीक्ष्ण टोकदार बुद्धिचे प्रतीक आहे.
गणपती आणि हत्ती यांचा अन्योन्य संबंध घनिष्ठ आहे. शक्ती, बुद्धि, विशालत्त्व, स्थैर्य, संवेदनशीलता या गुणांनी हत्ती युक्त आहे. हत्ती श्री लक्ष्मीचाही प्रिय आहे. हत्तीच्या चीत्काराने लक्ष्मीचे आवाहन होते, लक्ष्मीची स्वतंत्र उपासना करावी लागत नाही. लक्ष्मीलाही उपासना शास्त्राप्रमाणे दूर्वा आणि बेल प्रिय आहे. लक्ष्मी-गणेश हेही उपास्य रूप प्रसिद्ध आहे. गजलक्ष्मीचा मद चढू नये म्हणून अंकुशही गरजेचा आहे.
काळ हा सतत चालणारा न थांबणारा आहे. नकळत, गतीशीलतेमुळे तो आयुष्य कुरतडतो याचे प्रतीक म्हणून मूषक. काही वेळा मूषक श्री गजाननाच्या हातातील मोदक खाताना दर्शवतात. श्री. गजाननाने आपल्याला कृपावंत होऊन मोद-क, मोद म्हणजे आनंद, पर्यायाने आनंदमय आयुष्य दिले आहे. पण कालरूपी मूषक ते आयुष्य कुरतडून कमी करत आहे. असा याचा मतितार्थ.
सामुद्रिक शास्त्राप्रमाणे शरीरलक्षणे वर्णन करताना लांब नाक हे प्रखर बुद्धिमत्तेचे लक्षण मानतात. सृष्टीतील सर्व सस्तन प्राण्यात सर्वांत जास्त लांब नाक हत्तीचे आहे. (सोंड किंवा शुंडा) म्हणून महाबुद्धि गणेशाला शुंडा आहे.
देवत्त्व दर्शवण्यासाठी चार भुजा आहेत.
श्री गजानन हा चारी वेदांचा समावेशक आहे.
ऋग मधील ग = ग
यजु मधील ज = जा
सामन् मधील न = न
अथर्वन् मधील न = न
= गजानन
दैवत शास्त्राप्रमाणे पांच महाभूतांपैकी पृथ्वी हे तत्त्व श्री गणपतीचे आहे. व त्याचे बीजाक्षर लं हे आहे. या अक्षराचा गुण गंध आहे. म्हणून गणपतींना गंध-सुगंध अतिशय प्रिय आहे. गजानन पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे तो मातीचा (पार्थिव) बनवतात. श्रावण हा शिवाचा महिना. त्यात कोटी लिंगार्चन करतात. ही लिंगे मातीचीच बनवतात. भाद्रपद हा गणपतीचाच महिना. त्यात गणपती पूजतात तो मातीचाच. अश्विन हा जगदंबेचा-पार्वतीचा महिना. त्यात घट स्थापना करतात. घटही मातीचाच.
एवंच शिव-पार्वती-गणपती ही पृथ्वी तत्त्वाची असल्यामुळे व गणपतीच्या प्रामुख्याने या तीनही महिन्यात पृथ्वी तत्त्वाचा उद्घोष होतो. पण शिव-पार्वतीचा आविष्कार गणपती या सगुण रूपाने असल्यामुळे गणपती हा पृथ्वीतत्त्वाचा मानला जातो. (ॐ या अक्षर ब्रम्हात ५ ही तत्वे समाविष्ट आहेत. चंद्रावरील बिंदू आकाशतत्व, अर्ध मातृका वायुतत्व, आकार मातृका भूमी तत्व उकार मातृका जलतत्व, मकार मातृका अग्नीतत्व दर्शवते.)
गणपती हा निरनिराळ्या लोक समूहांचा (गणांचा) पति मानला गेला, व्रात्य, पिशाच्च, प्रगभ या गणांचा तो अधिपति मानला जातो.
गण म्हणजे मोजणे. तो गणक आहे. (गणक ऋषी).
गण म्हणजे काव्य रचनेतील गण, मात्रा, वृत्ते यांपैकी म्हणून तो काव्यशास्त्रदिकांचाही आधिपति झाला.
ॐ कार हे गणेशाचे ध्वनिचिन्ह रुपाचे प्रतीक आहे. ॐ कारातील वरील भाग मस्तकावर, त्याखाली उदर विस्तार, शुंडा ही नाद (ध्वनी) प्रतीक व मोदक किंवा लाडू हा बिंदू होय.
देवनागरीतील अक्षरे (१) दंडमय (अ, आ) (२) अर्ध दंडमय (इ, ई, ट, ठ-), (३) दंडरहित (उ, ऊ) व सुट्या दंडाचे (ग, ण, श) यापैकी फक्त तीन अक्षरे ग, ण, श हीच सुट्या दंडाची आहेत. ती अक्षरे जर एकत्र केली तरी गणेशाचे रूप तयार होते. त्यातही शुंडा, उदर व पाय हे रूप दृग्गोचर होते.
कोणत्याही दैवताची उपासना किंवा पूजा (१) योग, (२) भोग, (३) वीर आणि (४) अभिचारिक या चार स्वरूपांत होऊ शकते.
मोक्ष किंवा सिद्धिप्राप्तीसाठी योगस्वरुपात, सुख, समृद्धी, शांति, पुष्टि, तुष्टि यांसाठी भोग स्वरूपात, संकटाचे निवारण, आक्रमण करणे, आलेले आक्रमण परतवून लावणे, कठीण कामाला हात घालणे, अप्राप्य वस्तूंची प्राप्ती करुन घेणे अशा कामांसाठी वीर स्वरुपात. जारण, मारण, उच्चाटण, बलिदान, स्वतःची सुरक्षितता व दुसऱ्याचे खंडण या कामांसाठी अभिचारिक स्वरुपात दैवताची पूजा करता येते.
आपल्या इच्छिताच्या प्राप्तीसाठी देवतेचे ते ते रूप पूजावे लागते.
योग अवस्थेतील रूप पद्यासनात ध्यानमुद्रा असलेले असते.
वीर अवस्थेत एका पायाची दुरमडलेली मांडी किंवा खुरमांडी घातलेली किंवा तो पाय लोंबता सोडून त्या मांडीवरुन दुसरा पाय पलिकडे घेतलेला असतो. या अवस्थेतील मूर्ति आपणास गणेशोत्सवात जास्त करुन दिसतात.
भोग स्वरुपात दैवताची शक्ती (किंवा पत्नी) मांडीवर मनुष्यरूपी बसलेली असून, एक हात वरद मुद्रेत व सोबतीला खाद्य किंवा पेय पात्र असते.
अभिचार स्वरूपात कार्याप्रमाणे रंग, रूप इत्यादी बदलतात.
श्री गणपतीच्या उपासनेमध्ये डाव्या सोंडेचा व उजव्या सोंडेचा गणपती असे दोन प्रमुख भेद आहेत. त्यात उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा-उपासना-आराधना ही जनमानसात भिती उत्पन्न करणारी आहे. या मूर्तीचे म्हणजे पर्यायाने पूजेचे सोवळे-ओवळे अतिशय कडक मानले जाते. याचे कारण, ॐ गतिचक्राचे स्वरुप आहे. त्याचे उलटे प्रतिबिंब म्हणजे ओंकाराच्या या स्थितीत सोंडेचे वळण उजवीकडे आहे. साहजिकच गणेशाचे हे रुप उजव्या सोंडेचे ठरते. गणपती हे मांगल्य व विघ्नहर्तारूप आहे. आपण जर हे प्रतिबिंब म्हणजे लय कारक शिवरुप विचारात घेतले, तर ते अघोररूप आहे. या अवस्थेत शिवयोग्याने वेड्यासारखे केस वाढवणे, दाढी-नखे वाढवून हिंडणे, रुप यौवन संपन्न स्त्रियांबद्दल निंद्य विचार, आचार, स्वतःचा मानसिक असमतोल ई. बाबी त्याज्य मानली जातात. सामान्य माणसाला या गोष्टींचे पालन नाही करता आले तर, या गोष्टी त्याच्या लयास कारण होऊ शकतात. त्यामुळे हे या गणेश रुपा बाबतीत सावधानी बाळगणे इष्ट असते. पण जो नैतिक, धार्मिक आचरण ठेवतो. त्याला चिंता करण्याचे काही कारण नाही.
गणपतीचे अनेक संप्रदाय आहेत, त्यापैकी काही प्रचलित संप्रदाय येथे देत आहे.
१) उच्छिष्ट गणपती : तांबडा रंग, चार हात.
२) महागणपती : तांबडा रंग, दहा हात, डाव्या मांडीवर आलिंगनार सिद्धी, हातात मद्यपात्र किंवा अमृतकुंभ, त्रिनेत्र
३) उर्ध्वगणपती : पिवळा रंग, सहा हात, डाव्या मांडीवर शक्ती.
४) पिंगल गणपती : पिंगट (काळपट पिवळा) रंग, सहा हात.
५) लक्ष्मी गणपती : शुभ्र रंग, दोन पत्नी, चार किंवा आठ हात, शक्तीचा रंग पिवळा व शक्तीच्या हातात कमळ.
६) शक्ती गणपती : चार हात, विवाहित, डाव्या मांडीवर शक्ती.
७) सिद्धी गणपती : दोन हात उजवीकडे व तीन डावीकडे असे पाच हात, कमळावर बसलेला.
कार्याचे स्वरुपानुसार देखील गणपतींची काही उपलब्ध वर्णने येथे देत आहे.
१) लक्ष्मी गणपती : श्री, ऐश्वर्य, वैभव यांच्या प्राप्तीसाठी.
२) क्षिप्र गणपती : त्वरित फलदायी, अल्पस्वल्प पण कठीण कामे होण्यासाठी.
३) सिद्ध गणपती : यश प्राप्तीसाठी.
४) शक्ती गणपती : बल आणि प्रभुत्व यांसाठी.
५) उच्छिष्ट गणपती: जारण, मारण, उच्चाटन यांसाठी (तांत्रिक) (पंचमकार युक्त उपासना)
६) एकाक्षर गणपती : आध्यात्मिक शांतीसाठी, केवळ उपासना.
७) चिंतामणी गणपती: चिंता, रोग, अस्वास्थ यांच्या निवारणासाठी.
८) कुमार गणपती : गुरुतत्त्व.
श्री सिद्धीविनायक
उजव्या सोंडेच्या गणपतीला सामान्यतः सिद्धीविनायक म्हणतात. सिद्धीविनायक चार हातांचा, त्रिनेत्र, गजमुख आणि त्याचा रंग माणकाप्रमाणे असतो. प्रात:काळी क्षितिजावर जेव्हा सूर्वस्चि प्रकटते तेव्हा ते अत्यंत तेजस्वी, किरण रहित आणि भडक तांबड्या रंगाचे असते. हा रंग गणपतीचा !
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला सिद्धी विनायकाचे व्रत करतात. पण सर्वच गणेश मूर्ती उजव्या सोंडच्या नसतात किंबहुना या दिवशी सर्वसामान्य माणसे ज्या पार्थिव (मातीच्या) गणपतीची पूजा करतात, तो उजव्या सोंडेचा नसतोच व जोडीला शक्ती किंवा सिद्धीही नसते. पण हे व्रत सिद्धीविनायक व्रत म्हणूनच केले जाते.
या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा गणपतीची २१ नांवे उच्चारुन २१ प्रकारची पत्री वाहतात.
(दैवतशास्त्राप्रमाणे व मंत्रशास्त्राप्रमाणे १, ३, ७, ११ आणि २१ हे महत्त्वाचे आहेत. त्यांपैकी श्रीगणेशाला १, ३, ७ आणि २१ हे अंक आहेत. त्यापैकी १, ३ आणि ७ हे अविभाज्य अंक आहेत व त्यांचा गुणाकार २१ आहे)
भविष्य पुराणात श्री सिद्धीविनायकाची पूजा पद्धत दिली आहे, ती अशी
मूर्तीचे स्वरूप आवडीप्रमाणे असावे. अशी मूर्ती बहुधा घरी असतेच पण उपलब्ध नसल्यास मूर्ती ध्यानात आणावी.
तिची पूजा पुढीलप्रमाणे करावी.
१) आवाहन, आसन व अर्घ्यसमर्पण करुन पंचामृत स्नान घालावे.
२) सर्व प्रदायनमः म्हणून २ तांबडी वस्त्रे वाहावीत. एक वस्त्र नेसूचे व एक उत्तरीय (पांघरण्यासाठी) असावे.
३) गणाध्यक्षाय नमः। म्हणून रक्तगंध वाहावे.
४) विनायकाय नमः म्हणून फुले वाहावीत.
५) उमासुताय नमः म्हणून उदबत्ती किंवा धूप ओवाळावा.
६) विघ्ननाशिने नमः म्हणून नैवेद्य समर्पण करावा. दक्षिणा व विडा वहावा.
७) पुढील नावांनी दुर्वायुग्मे (एकावेळी दोन दुर्वा) वाहावी.
गणाधिपाय नमः। उमापुत्राय नमः । अघनाशनाय नमः। एकदंताय नमः। इभवक्त्राय नमः। मूषक वाहनाय नमः। विनायकाय नमः। ईशपुत्राय नमः । सर्वसिद्धिप्रदायकाय नमः। कुमार गुरवे नमः।
८) गंध, फुले, अक्षता व तीन दूर्वा वाहाव्यात.
९) एक दूर्वा वरील सर्व नावे उच्चारुन वाहावी.
१०) नैवेद्याच्या २१ मोदकांपैकी १ गणपतीला, दहा मोदक ब्राह्मणाला द्यावे व दहा मोदक स्वतःसाठी ठेवावेत.
११) दोन तांबडी वस्त्रे गुंडाळलेली ही गणेश प्रतिमा (जर प्रत्यक्ष प्रतिमा) असेल तर गाणपत्य ब्राह्मणाला दान करावी किंवा स्वतः पूजेत ठेवावी.
शेवटी आपल्या सर्वांच्या मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करो, गणपती बाप्पा तुमच्या आमच्या आयुष्यातील सर्व विघ्नाचे हरण करो व तुम्हाला मंगलमय आयुष्य प्रदान करो, हीच त्या स्वरूपास मनोभावे प्रार्थना.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)
Very nice information 👏
LikeLiked by 1 person