
विषय : शततारका नक्षत्र विचार
संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद
संदर्भ : नक्षत्र ज्योतिष
नमस्कार,
आज आपण शततारका नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत. शततारका नक्षत्र हे नक्षत्र चक्रातील २४ वे नक्षत्र असून इंग्रजीत या नक्षत्राला ‘लांबडा अॅक्लेरियस’ असे नाव आहे. या नक्षत्रालाच ‘शतीभिषा’ असेही म्हणतात. या नक्षत्रात १०० ताऱ्यांचा समूह असून त्याचा आकार वर्तुळाकृती आहे. तारे मात्र जरा बारीक असून जरा पसरलेले आहेत. तारे पांढऱ्या रंगाचे असून मध्यम प्रतीचे आहेत. शततारका नक्षत्रातील तारे जरा फिक्कट असून हे नक्षत्र भाद्रपद महिन्यात रात्रभर आकाशात दिसू शकते. वेदकालीन एक समजुत प्रचलित होती, की हे तारे म्हणजे एकेक वर्षाचे आयुष्य देणाऱ्या शंभर औषधी किंवा अमृतकुंभ आहेत. त्यांच्या योगाने वरुण देव सर्वाना शतायुषी बनवे.
शततारका नक्षत्राचे ४ ही चरण कुंभ राशीत येत असल्याने ते चतुष्पादी नक्षत्र आहे. या ४ चरणांवर अनुक्रमे गुरु, शनि, शनी व गुरुचे स्वामित्व आहे. नक्षत्राचा स्वामी राहू, राशी स्वामी शनी व दैवत वरुण असल्याने या नक्षत्रात राहूची अप्रतिम बुद्धी व कला, शनीची संशोधक वृत्ती व वरुण देवतेचा थंडावा यांचा सुरेख मिलाफ आढळून येतो.
शततारका हे नक्षत्र राक्षसगणी असले तरी तमो गुणापेक्षा ते जास्त रजोगुणी आहे, तसेच हे नक्षत्र मंदलोचनी, उर्ध्वमुख व चलरूप आहे. हे नक्षत्र कल्याणकारक आहे, तसेच हे नक्षत्र अफाट बुद्धीमत्ता, कला, धन व अधिकारयोग देणारे असून मालकी वृत्तीचे आहे..
शततारका नक्षत्रावर जन्मलेले जातक कर्तृत्ववान, कर्तबगार, विद्या व्यासंगी, संशोधक वृत्तीचे, स्थिर बुद्धी, ज्ञानी, चौकस, चिकित्सक, महत्त्वाकांक्षी, धार्मिक पण बरेच व्यवहारी, विवेकी, धीमे, स्वतःला थोड्याशा विशेष समजणारे पण फार मानी नसून फायद्यापुरते किंवा कामापुरते आपल्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकात मिसळणारे, थोदडेसे धूर्त, व्यवस्थित, शिस्तप्रिय, मेहनती व थोडे ध्येयवादी असतात. सहसा त्यांच्या मनाचा पत्ता लागत नाही. थोडेसे सत्यवादी, निर्भिड, थोडी धन लालसा असलेले आढळून येतात. हे जातक बुद्धीवान व पराक्रमी असून नेहमी अधिकारपद व उच्चपदासाठी धडपडत असतात.
शततारका नक्षत्रावर जन्मलेले पुरुषांना हे नक्षत्र बरेच अनुकूल आहे. शरीरप्रकृती, बुद्धी, कला व अधिकार लालसा हे पुरुषवृत्तीचे गुणधर्म चांगले विकसित होतात. बांधा उंच, सडपातळ पण भारदस्त असतो. अवयव मोठे, लांब व रुंद असतात. बोटे जाड, तत्त्वज्ञानी असतात. नाक ठसठशीत, कपाळ भव्य व डोके चौरस व मोठे असते. चेहरा उदासीन व विचारी, शारीरिक जीवन व रोग प्रतिकारशक्ती उत्तम असते. स्वभावाने या व्यक्ती जरा कर्तृत्ववान, कर्तबगार, महत्त्वाकांक्षा, चौकस व चिकित्सक, संशोधक पण श्रम व कष्ट यांची आवड असणाऱ्या, स्मरण, ग्रहण व आकलनशक्ती उत्तमच असते. मात्र व्यावहारिक वृत्ती जास्त आढळते.
शततारका नक्षत्रावर जन्मलेले स्त्रियांनाही हे नक्षत्र योग्यतेच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र या नक्षत्रात स्त्रियांना लागणारे अप्रतिम सौंदर्य, लाजाळूपणा, नाजूकपणा, प्रणयचतुरता, बालसंगोपन- वृत्ती, परावलंबित्व हे गुण कमी आढळून येतात. स्त्रिया वर्णाने सावळ्या असल्या तरी नाकोडोळी सुरेख व तरतरीत असतात. पण चेहऱ्यावर गांभीर्य, उदासीनपणा व पोक्तपणा दिसून येतो. बांधा उंच, सडपातळ, भारदस्त, प्रमाणशीर असतो. शरीरसौष्ठव दुसऱ्यावर छाप पाडणारे असते. प्रवृत्ती जरा आक्रमक व साधेपणाची राहण्याची असते. केस लांबसडक व काळेभोर असले तरी आकर्षक केशरचना किवा केशकला करणे आवडणार नाही. साधी सरळ वेणी किंवा आंबाडा घालून त्यावर एखादेच साधे फूल असते. सौंदर्यप्रसादनांना फार कमी वेळा हात लावतात. देहावरील वस्त्रे उंची असली तर फार भडक नसतात. फार ठळक किंवा उंची दागिना घालत नाहीत. जरा अरसिकता व वास्तव प्रवृत्तीच जास्त आढळते. बुद्धी, स्मरण, ग्रहण, आकलन शक्ती उत्तम असून सर्वच क्षेत्रात कर्तबगारीने अधिकारयोगावर असतात. तसेच थोड्या मनकवड्या, गोड बोलून काम साधणाऱ्या जरा राखीव व आपल्याच बरोबरीच्या वर्गात मिसळणाऱ्या, मोठेपणाची व अधिकाराची फार आवड असणाऱ्या असून श्रमिक, कष्टाळू, संसारी, कर्तव्यदक्ष असतात. मात्र वृत्ती फारच अतिव्यवहारी, जरा हात राखून खर्च करण्याची असते. त्यांच्या साध्या राहणीचे कारण तेच असते.
शततारका नक्षत्र फार बुद्धीमान व हुशार आहे. बुद्धीवैशिष्ट्य जास्त दिसून येते. ज्ञानपिपासू, अलौकिक बुद्धीमत्ता, विद्याव्यासंगी, उत्तम प्रकारची स्मरणशक्ती, गृहशक्ती, आकलन शक्ती, पाठांतर शक्ती, संशोधक वृत्ती असून हे एकच नक्षत्र असे आहे की ते सर्वच क्षेत्रांत उच्च शिक्षण दाखविते.
शततारका नक्षत्रात मोठमोठे स्पेशलिस्ट डॉक्टर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकौन्टंटस्, कायदे पंडित, बरिस्टर्स, मोठे शास्त्र, इंजिनिअर्स, अर्थशास्त्र, लेखक, प्रकाशक असा सर्व बुद्धीवंत वर्ग येतो. मोठमोठ्या क्षेत्रांत व शाखेत कोणत्याही विषयांचा गाढ व सखोल अभ्यास करून त्यावर प्रबंध लिहिणे त्यांना फार आवडते. या नक्षत्रा खाली येणारा वर्ग बराच उच्च समाजातील अतिप्रिय व सघन असतो. तसेच मोठा मोठा अधिकारी वर्ग, व्यापारी वर्ग येतो. केंद्र किंवा राज्य सरकारातील खात्यातील उच्च अधिकारी प्रशासक, खाजगी उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रातील कंपनीतील मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर, मालक, सेक्रेटरी व अधिकारी वर्ग तसेच खाजगी व्यवसाय करणारे सेल्स व इन्कमटॅक्स कन्सल्टंट, बॅरिस्टर्स, कन्स्टल्टंट, तसेच मोठमोठे कारखानदार, उत्पादक, घाऊक व्यापारी, शेतकरी असा वर्ग येतो. हे नक्षत्र स्वतंत्र कर्तृत्वाने प्रगती देत असून आश्रित नाही.
शततारका नक्षत्री रवी अधिकाराच्या दृष्टीने चांगला, पण तब्येतीच्या दृष्टीने मध्यम. तसा बांधा बाहेरून भारदस्त दिसतो. पण आतून अशक्त असतो. मोठेपणाचा हव्यास असतो व त्यासाठी जास्त श्रम घेतात व आजारी पडतात. अधिकार मात्र चांगले मिळतात.
शततारका नक्षत्री चंद्र असता शरीरप्रकृती व बुद्धीमान व ज्ञानाची आवड असणारा असतो. पण तब्येत व इतर दृष्टीने मध्यम.
शततारका नक्षत्री मंगळ शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, अंगकाठी सडसडीत व बारीक असते. पण तो डॉक्टर, आर्किटेक्ट, कारखानदार यांच्या दृष्टीने उत्तम असतो. शास्त्रीय अभ्यास करणारा असतो.
शततारका नक्षत्री बुध् असता उंच पण मध्यम बांध्याचा मात्र बुद्धीमान, कायदेपंडित, हुशार, चुणचुणीत व चुटचुटीत असतो.
शततारका नक्षत्री गुरु असता उंच पण मध्यम देही, दिसण्यात विद्वान, प्रौढ, गंभीर पण अतिशय हुशार, बुद्धीमान, कायदेपंडित, प्रबंध लिहिणाऱ्या, शास्त्राकडे कल असणारा, उत्तम शिक्षक किवा प्रोफेसर असतो.
शततारका नक्षत्री शुक असता उंच दिसण्यात बरा पण जरा अरसिक, सायन्स व औषधी विषयाकडे बळणारा. शनी असता उंच, हाडापेराने मजबूत, सशक्त, भारदस्त शरीर, अतिशय बुद्धीवान, विद्याव्यासंगी, चिकित्सक, संशोधक, कोणत्याही विषयाचा गाढ अभ्यास करून प्रबंध लिहिणारा (Ph.D.), स्वतंत्र व्यवसाय करणारा, मोठा कारखानदार अथवा घाऊक व्यापारी होतो. शततारका नक्षत्री राहू असता हाडापेराने मजबूत, आकर्षक व मजबूत, बांधा देखणा, बुद्धीवान कलाकार, आर्किटेक्ट व फोटोग्राफी यांना उत्तम. केतू असता फारच चांगले, उंच, भारदस्त शरीर, दिसण्यात बुद्धीवान, विद्वान, हुशार, अकल्पित व अलौकिक बुद्धीचा, उत्तम संशोधक, विमाविद्या, टी.व्ही. इंजिनिअरिंग, रिसर्च व ऊर्जा संशोधन, प्रोफेसर, युनोमधील सभासद, कंपन्यांचे मॅनेजर अथवा डायरेक्टर यांना चांगला. नेपच्यून साधारण शुभ, बांधा उंच मध्यम देही पण जरा उदासीन चेहऱ्याचा असतो.
शततारका नक्षत्री होणारे आजार पण फार दाहक किंवा क्रूर नसले, तरी मुदतीचे व बराच काळ रेंगाळणारे असतात. रक्तदाबाचे विकार, रुधिराभिसरण किंवा रक्ताभिसरण बिघडणे, विशेषतः गुरु बिघडला असता जास्त संभव. तसेच हृदयविकार किंवा हृदयाचे रोग, दमा, श्वासोच्छ्वास करण्यास अडचण येणे. सदर्दी, थंडी, हिवताप (अंगावर काटा येणे) कपाळाच्या शिरा दुखावणे किंवा सुजणे, गुडगे दुखणे, संधिवात, त्वचेचे रोग, डोके दुखणे, एकदम चक्कर येणे तसेच कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, मानसिक विकार यांचा त्रास संभवतो.
शततारका नक्षत्री जन्मणाऱ्या व्यक्तीचे हस्ताक्षर जरा मोठे, उभट, फराटे जास्त, ठळक पण वळणदार नसते. नक्षत्र मंदलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती थोडाफार प्रयत्न केल्यावर मिळू शकते व वस्तू दक्षिणेला गेलेली असते. रत्न राहूचे गोमेद किंवा शनीचा नीलमणी उत्तम. अंकुशाप्रमाणे या नक्षत्रावर ८ किंवा ६ अंकाचे वर्चस्व व कैफियत वाटते.
मुहूर्त शास्त्रामध्ये शततारका नक्षत्र शुभकार्याला फारसे अनुकूल नाही. या नक्षत्रावर घरे, देवालये, गलबते बांधणे, राज्याभिषेक, नवीन वाहनावर बसणे, जनावरे घेणे, मद्य काढण्यास आरंभ करणे, दात बांधणे, औषध घेणे, औषधी वृक्ष लावणे, विहिर खणणे, जमिनी नांगरणे, नृत्यारंभ, प्रथम स्त्रीसंग, मंचका रोहण, मुलांचे नाक-कान टोचणे, मूंजी, वधू प्रवेश, गांधर्व विवाह इत्यादी कृत्ये तसेच ऑपरेशनसाठी हे नक्षत्र अतिशय उत्तम आहे.
ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)