ब्रम्हांडाची कुंडली स्वस्तिक


विषय : ब्रम्हांडाची कुंडली स्वस्तिक

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ ग्रंथ : ज्योतिषतत्व दर्शन

नमस्कार,

आपल्या सर्वांना हे माहित आहेच की बेरीज म्हणजेच ऐक्य हे ( + ) अधिक या धन चिन्हानें दर्शवले जाते आणि वजावट अथवा व्यय ( – ) या ऋण चिन्हानें दर्शवले जाते.

( + ) धन या चिन्हास चार टोके आहेत व त्या प्रत्येक टोकास आपल्या पुर्वाचारींनी विशिष्ट गुणधर्म बहाल केलेले आहेत.

१. वरचें टोक “धर्म” दर्शवते,

२. उजव्या हाताचें टोक “अर्थ” दर्शवते.

३. खालचे टोक “काम” दर्शवते आणि

४. डाव्या हाताचें टोक “मोक्ष” दर्शवते.

या चार टोकांसच मूलाधार असे म्हणतात व हे चार मूलाधार म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्व वेद असे अनुक्रमे चार वेद आहेत.

या चार मूलाधारांवरच ब्रम्हांडाचे चलन वलन पूर्वापार चालू आहे. हे चलन वलन ४ तत्वांत (पृथ्वी, आप, तेज आणि वायू), ३ गुणांत (सत्व, रज आणि तम), ३ स्थितीत (चर, स्थिर आणि द्विस्वभाव), आणि ३  अवस्थांत (उत्पत्ति, स्थिति आणि लय) अव्याहतपणे चालू आहे.

१. या धन चिन्हातील वरचे टोक धर्म, तेजतत्व, रजोगुण, चर स्थिति, दर्शवते.

२. उजव्या हाताचे टोक अर्थ, पृथ्वीतत्त्व, रजोगुण, चर स्थिती दर्शवते.

३. खालचे टोक काम, वायूतत्व, रजोगुण, चर स्थिति दाखवितें आणि

४. डाव्या हाताचें टोक हैं मोक्ष, आपतत्व, रजोगुण, चर स्थिति दाखवितें.

अथवा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही बिंदू रजोगुणात्मक स्थिति भिन्न तत्त्वांत दर्शवते.

अशा प्रकारें हे ब्रह्मांड एकदम उत्पन्न झाले म्हणजे स्थिति या अवस्थेंत आलें. जी जी वस्तू मग ती दृश्य असो वा नसो त्या वस्तूंचा कधी ना कधी लय हा निश्चित असल्यामुळे या ब्रह्मांडाचाही लय एकदां होणार आहे आणि हेच दाखविण्याकरतां एक रेषा म्हणजे गति, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार स्थितींच्या बिंदूपासून “लया’ कडे अथवा ‘त्याच्या’ व्यय (ऋण) स्थानाकडे काढली म्हणजे एक विशिष्ट प्रकारची आकृती अथवा चिन्ह तयार होते. या आकृतीस अथवा चिन्हास “स्वतिक” असें म्हणतात आणि हीच ब्रह्मांडाची कुंडली आहे.

हिंदुसंस्कृतींत हें स्वस्तिक अत्यंत पूर्वापार चालत आलेलें आहे व कोणत्याहि शुभ कार्यात मग तें विवाह असो अथवा रोजची रांगोळी असो त्यांत तें प्रथमतः काढले जाते. याला इतकें महत्त्व असण्याचें कारण असे आहे कीं, या चिन्हांत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार मूलाधारांचें सौख्य देण्याचें सामर्थ्य आहे आणि म्हणूनच ज्या हिंदुस्थानांत हें चिन्ह पूर्वापारपासून प्रचलित आहे,

तो हिंदुस्थान देश उन्नतीच्या उच्च शिखरावर पोहोंचलेला होता. इतकेंच नव्हे तर अर्थ न समजताही ते चिन्ह अद्याप ही उपयोगांत आणले जात आहे आणि म्हणून जगाच्या चढाओढींत या देशानें आजपावेतों टिकाव धरला आहे असेंच म्हणावें लागते.

१. कुंडलीतील चार केंद्र स्थाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या मूलाधार म्हणजेच अनुक्रमें कर्ता, कर्म, क्रिया आणि पद दर्शवतात.

२. धर्म अथवा कर्ता, अर्थ अथवा कर्म, काम अथवा क्रिया आणि मोक्ष अथवा पद यांचे विशिष्ट  उद्देश अथवा हेतु दाखविण्याचें समभुज त्रिकोण हे साधन आहे.

३. कोणत्याही स्थानापासून असा त्रिकोण काढिला असतां तो ज्या स्थानास जाऊन मिळेल तीं स्थानें त्या त्रिकोणाचे हेतु असतात. त्यांतील पहिला हेतु ऐहिक असतो व दुसरा पारमार्थिक असतो. 

या नियमांनुसार “धर्म, कर्ता अववा लग्न ” या स्थानापासून असा एक त्रिकोण काढला असतां तो कुंडलीतील ५ वे स्थान व ९ वे स्थान यांना जाऊन मिळेल व त्या स्थानांवरून ज्या बाबींचा विचार केला जातो त्या बाबीच त्या त्रिकोणाचे हेतु दाखवितात.

१. ५ वे स्थानावरून मुख्यतः संततीचा विचार करतात, त्या अर्थी मनुष्यजन्माचा ऐहिक हेतु संतति निर्माण करून वंश चालू ठेवणे हा आहे.

९ वे स्थानावरून धर्म, आत्मोन्नति अथवा ईश्वरोपासनेचा अनुभव या गोष्टींचा विचार मुख्यतः होत असल्यामुळे मनुष्यजन्माचा पारमार्थिक हेतु आत्मोन्नति करून शेवटीं मोक्ष मिळवावा असा आहे.

हा त्रिकोण कार्यापासून निघतो म्हणूनच याला मूळ त्रिकोण असें ज्योतिषशास्त्रात म्हटलें आहे हें लक्षांत येण्यासारखें आहे.

२. मनुष्य सदोदित कर्म करीत असतो त्याचेंही दोनच हेतु आहेत आणि ते हेतु समजण्यासाठी अर्थ त्रिकोण. कर्म अथवा १० वे स्थानापासून एक त्रिकोण काढला पाहिजे. तो त्रिकोण २ रे स्थान ज्याला धनस्थान म्हणतात त्या स्थानास आणि ६ वे स्थान अथवा रिपुस्थानास जाऊन मिळेल. धनस्थानावरून धनाचा अथवा मुख्यतः मोबदल्याचा विचार होतो म्हणून कर्म करण्याला ऐहिक हेतु त्या कर्माचा कांहीं तरी मोबदला मिळाला पाहिजे असा आहे मग तो द्रव्यद्वारा मिळो अथवा अन्य तर्हेने मिळो; व  ६ वे स्थानावरून वासनांचा अथवा षड्रिपूंचा (शत्रूचा) विचार होत असल्यामुळे कर्माचा पारमार्थिक हेतु, वासनांवर अथवा षड्रिपूंवर ताबा राहिला पाहिजे असा आहे. या त्रिकोणास कर्म अथवा अर्थ त्रिकोण असें म्हणतात.

३. गृहस्थाश्रम प्राप्त होण्यास विवाह हा केला पाहिजे हें खरें, पण असा विवाह करण्याचे हेतु माहीत असणें हें अत्यावश्यक आहे. ते हेतु समजण्यास काम, जाया अथवा ७ वे स्थान यापासून एक त्रिकोण काढला असतां तो ११ वे अथवा लाभस्थानास आणि ३ रे अथवा पुरुषार्थाचे स्थानास जाऊन मिळेल. ११ वे स्थानावरून मुख्यतः समाजाचा आणि नीतीचा विचार होतो आणि त्यावरून विवाह करण्याचा ऐहिक हेतु वधूस वरण्यांत अधिकांत अधिक समाजाचा संबंध यावा व वधुवरांच्या नैतिक वर्तनास जास्तीत जास्त अवसर मिळावा असा आहे. ३ रे स्थानावरून पुरुषार्थाचा, मग तो प्रापंचिक असो अथवा पारमाथिक असो, विचार होत असल्यामुळे विवाह करण्याचा पारमार्थिक हेतु त्या वधूनें वराच्या पुरुषार्थात भर घालावी असा आहे. या त्रिकोणास काम त्रिकोण असें म्हणतात.

४. शेवटीं उरलेला जो त्रिकोण त्याला लय अथवा मोक्ष त्रिकोण असें म्हणतात. हा त्रिकोण “मोक्ष” “निष्काम कर्म’ अथवा ४ थे स्थानापासून निघतो व तो ८ वे अथवा मृत्यु अथवा परोपकार या स्थानास आणि १२ वे स्थानास म्हणजेच व्यय अथवा मर्यादा या स्थानास जाऊन मिळतो. या त्रिकोणाचा ऐहिक हेतु मृत्यूस टाळावें असा आहे व पारमार्थिक हेतु मोक्ष मिळवून पुढच्या जन्म-मरणांतून सुटका करून घ्यावी असा आहे.

अशा या चार त्रिकोणांस एकूण १२ कोंपरे आहेत आणि म्हणूनच कुडलीत १२ भाव अथवा स्थानें आहेत. अशाप्रकारे या ब्रह्मांडाचे चलन वलन चार मूलाधार, ८ हेतु, ४ तत्त्वें, ३ गुण, ३ स्थिति आणि ३ अवस्था यांवरच चालले आहे. पिंडाचाही व्यापार तद्वतच चालू असणार हे उघड आहे.

या ब्रह्मांडाचे ७ विभाग आहेत त्यास सप्तपाताळ असें म्हणतात. अशा सात विभागांचे जे ७ स्वामी आहेत, त्यांना ग्रह असें म्हणतात आणि म्हणूनच सूर्यापासून शनीपर्यंत सातच ग्रह आहेत. या प्रत्येक पाताळास अथवा प्रत्येक ग्रहास ब्रह्मांडाप्रमाणेंच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार मूलाधार आहेत.

ही १२ भावांची कुंडली दिली आहे तिलाच कालपुरुषाची कुंडली असें म्हणतात.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment