धनिष्ठा नक्षत्र विचार


विषय : धनिष्ठा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण धनिष्ठा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

धनिष्ठा हे नक्षत्र चक्रातील २३ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राला इंग्रजीमध्ये ‘आल्फा डेल्फिनी’ म्हणतात. या नक्षत्राचे पहिले २ चरण मकर राशीत व शेवटचे २ चरण कुंभ राशीत असल्याने हे द्विपाद नक्षत्र आहे. धनिष्ठा नक्षत्र हे अंधलोचन, ऊर्ध्वमुख व चलरूप आहे. नक्षत्र स्वामी मंगळ, राशी स्वामी शनी व दैवत वसु असल्याने या नक्षत्रामध्ये मंगळाचा पराक्रम व निश्चयीपणा, मकरेच्या शनीची चिकाटी व कष्ट करण्याची वृत्ती, कुंभेच्या शनीची स्थिरता व बुद्धीप्रगल्भता व वसु देवतेची परोपकारी वृत्ती यांचा सुंदर मिलाफ आढळून येतो. या नक्षत्राच्या चारही चरणांवर अनुक्रमे रवि, बुध, शुक्र व मंगळाचे स्वामित्व आहे. धनिष्ठा या शब्दाचा अर्थ समशीतोष्ण म्हणजे ऋतुमानाचे ज्ञान देणारा असा आहे. फार प्राचीन काळी संपातबिदू या नक्षत्रामध्ये होता. धनिष्ठा नक्षत्राची आकृती चक्राकृती किवा मृदुंगा सारखी भासते. या नक्षत्रामध्ये एकूण ४ तारे असून ते जरासे काटेरी, तेजस्वी आणि पांढरट रंगाचे आहेत. भाद्रपद महिन्यात धनिष्ठा नक्षत्र रात्रभर आकाशात दिसते.

हे नक्षत्र राक्षसगणी असल्याने त्यात पराक्रम असला तरी, साधारण शुभत्व असून तमोगुण  आढळतात.

धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणारे जातक चंचल, निलाजरे, गायन वादनाचे शौकीन, छानछोकी, खादाड, निर्दयी, साहसी, अविचारी, मोठमोठ्या उलाढाली करणारे, थोडे स्वार्थी, लोभी, मात्र शूर, पराक्रमी, करारी, कर्तबगारी व कर्तृत्ववान आढळतात.

धनिष्ठा नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातक पुरुषांचा बांधा मध्यम, उंच, थोडा अप्रमाणबद्ध, हाडे मोठी, रुंद, सांध्यातील हाडे जास्त मोठी दिसणारी, जरा अरुंद कपाळ, निमुळती हनवटी, गालाची हाडे जरा वर आलेली, काटक, चिवट, चांगली शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकार शक्ती, थोडा प्रौढ चेहरा, उदासीची छटा, जरा स्वार्थी स्वभाव आढळत्तात. हे जातक निश्चयी, शूर, पराक्रमी, कर्तबगार, श्रमिक, कष्टाळू, मेहनती, अंग मोडून काम करणारे, चिकित्सक, चौकस, संशोधक, दीर्घोद्योगी, कोणतेही काम शेवटपर्यंत तडीस नेणारे, प्रतिज्ञा करणारे, किचकट कामाची आवड असणारे, अल्प संयमी व किरकिर करणारे असतात.

धनिष्ठा स्त्री जातकांना हे नक्षत्र साधारण आहे. या नक्षत्राकडे सौंदर्य, रूप व कला, कोमलपणा, नाजूकपणा, हळूवारपणा, संगोपन करण्याची वृत्ती हे स्त्री गुण साधारण असतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा कणखर, काटक व जरा हाडाळ व थोडा अप्रमाणबद्ध आढळतो. चेहरा थोडा सुस्वरूप असला, तरी त्यावर प्रौढपणा व उदासी ची छटा दिसून येते. स्वभाव कष्टाळू, श्रमिक, संसारी, काटकसरी, कर्तव्यदक्ष, धार्मिक, बुद्धीवान व मेहनती, गरिबीतूनही काटकसरीने संसार करणारा, आज्ञाधारक व सेवावृत्तीचा आढळतो. अलंकार, उंची वस्त्र, आधुनिक फॅशन, दागदागिने यांचा फारसा हव्यास नसतो, पण नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा चांगला असते. 

धनिष्ठा नक्षत्र बुद्धीमत्ता, कर्तृत्व, अधिकारयोग यांना अनुकूल असते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक स्वकर्तृत्वाने, हुषारीने व कर्तबगारीने श्रेष्ठपद प्राप्त केलेले आढळून येतात.

धनिष्ठा या नक्षत्राखाली बुद्धीमान तसेच कष्ट व कामकरी वर्गही आढळून येतो. या नक्षत्राखाली बँक किंवा खाजगी कंपनीत काम करणारे हिशोबनीस, कायदेपंडित, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, सेल्स टॅक्स व इन्कमटॅक्सचे काम करणारा वर्ग, कारखानदार, कंत्राटदार, उत्पादक, वितरक, शारीरिक श्रम व कष्ट करणारा मजूरवर्ग, घाऊक व्यापारी, धान्य, तेल, तंबाखू, कोळसा, लोखंड, लोकर यांचे व्यापारी, खाजगी औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग हे सर्व येतात.

धनिष्ठा नक्षत्री रवी आरोग्याच्या’ दृष्टीने साधारण चांगला असतो. मेहनतीच्या कामाला चांगला, पण थोडासा अविचार, निर्दयी, मतलबी व सारासार विचार करणारा नसतो.

धनिष्ठा नक्षत्री चंद्र असता शूर, धाडसी, संपन्न, दाता. निश्चयी, अलौ केक, बुद्धीमान, मेहनती, भोजनप्रिय, धनसंचय करणारा असतो.

धनिष्ठा नक्षत्र मंगळाचे स्वतःचे नक्षत्र असल्याने व या नक्षत्रात मंगळ उच्च होत असल्याने फार चांगले, शरीरप्रकृती मध्यम पण काटक, चपळ, मजबूत, सशक्त, शूर, धाडसी, पराक्रमी, पण थोडा हळू गतीचा, मुत्सद्दी, कर्तबगार, इंजिनिअर, कारखानदार अथवा आर्किटेक्ट यांना चांगला, मात्र थोडा खादाड, निर्दय व छानछोकीची आवड असणारा असतो.

धनिष्ठा नक्षत्री बुध असता बांधा जरा अप्रमाणबद्ध पण चपळ, हुशार, बुद्धीमान, चुणचुणीत असतो.

धनिष्ठा नक्षत्री असलेल्या गुरूसाठी हे नक्षत्र साधारण आहे. शरीरप्रकृतीच्या दृष्टीने मध्यम, बुद्धी बरी, पण पैशाचे दृष्टीने साधारण आहे. जातक थोडा दुराग्रही, स्वार्थी व द्रव्याच्या उलाढाली करणारा आढळतो.

धनिष्ठा नक्षत्री शुक्र असता सुस्वरूप, पण बांधा अप्रमांणशीर, पुढचे दात थोडे मोठे, एका रेषेत नाही. थोडा हाडाळ, मात्र छानछोकी, रंगेल, थोडी खर्चिक, विषयसत्ता, स्वार्थी, आर्किटेक्ट व व्यापार यांच्या दृष्टीने बरा असतो.

धनिष्ठा नक्षत्री शनी असता मजबूत, सशक्त बांधा आणि लांब व रुंद हाडांचा, किंचित थोराड, मिशा कल्ले राखणरा, तसा हुशार, कष्टाळू, मेहनती, धडपड्या, अंगमेहनती, कर्तृत्ववान, निश्चयी व चिकाटीकारक पण जरा संयमी, स्वार्थी, किरकिरा व त्रासिक स्वभावाचा व आतल्या गाठीचा आढळतो. मात्र हा शनी कारखानदार, उत्पादक, घाऊक व्यापारी, स्वतंत्र व्यवसायाची आवड देतो.

धनिष्ठा नक्षत्री राहू असता हाडापेराने मजबूत, काटक, सशक्त, पीळदार शरीर, चपळ, शूर, धाडसी, कर्तृत्ववान, मेहनती, थोडाफार अधिकारभोग, आर्किटेक्टला चांगला,

धनिष्ठा नक्षत्री केतूला साधारण असतो. फक्त तब्येतीच्या दृष्टीने चांगला, पण बुद्धी व धनाच्या बाबतीत अनुकूल नाही. थोडाफार धार्मिक व सत्वगुणी असेल.

धनिष्ठा नक्षत्री हर्षल असता बुद्धीला चांगला, हुशार, संशोधक, उत्तम कल्पनाशक्ती, विजेच्या सहाय्याने चालणारी यंत्रे व कारखाने तसेच अधिकारयोग व दर्जा यांना चांगला. तब्येत मध्यम पण थोडा अविचारी, लहरी, अस्थिर मनाचा, उलाढाल्या करणारा आढळतो.

धनिष्ठा नक्षत्री नेपच्यून साधारण असतो. संशोधक वृत्तीचे नक्षत्र असल्याने दैविकविद्या किंवा चमत्कार वगैरेला वाव नसतो. जरा उदासीन प्रवृत्ती असते. मात्र धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींना बरा.

धनिष्ठा नक्षत्री या नक्षत्राखाली होणारे आजार जरा दाहक व मुरणारे असतात. हे जातक तशा साध्या तापाने किवा सर्दीपडशाने आजारी पडलेले दिसून येत नाहीत. रोग प्रतिकारशक्ती बरी असते. मात्र कापणे, भाजणे, हाड मोडणे, खरचटणे, धडपडणे, फार गुडघे दुखणे किवा संधिवात असला तरी कळा मारणे व सूज दिसते. त्वचेचे रोग, मुखाचे रोग फार होतात. काहीवेळा विलंबीत डांग्या खोकला, दमा यांचा फार त्रास होतो. शिरा सरकणे, सुजणे, अपघात यांची संभावना असते.

धनिष्ठा नक्षत्री जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर जरा बारीक, गिचमीड व थोडे जवळजवळ लिहिलेले असते. मात्र अक्षर एका रेषेत असते.

धनिष्ठा नक्षत्र अंधलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्या, तर त्या थोड्या प्रयत्नाने सापडू शकतात. वस्तू पूर्व दिशेला गेलेली असते.

धनिष्ठा नक्षत्र साठी रत्न मंगळाचे पोवळे अथवा शनीचा नीलमणी असला तरी पोवळे जास्त योग्य वाटते. अंकशास्त्राप्रमाणे या नक्षत्रावर ९ या अंकाचा किवा या अंकाचे वर्चस्व आहे. तरी ९ अंक योग्य वाटतो.

धनिष्ठा नक्षत्र राक्षसगणी असले तरी मौंजी, बारसे, पालकारोहण अशा शुभकार्याला चांगले. तर नारदमान्य विवाहालाही ते योग्य आहे. हे नक्षत्र घरे, देवालये, विहिरी खणणे, गलबत बांधण्यास आरंभ करणे, राज्याभिषेक, वहान घेणे व त्यात बसणे, नवीन वस्त्रालंकार करणे, मुलांचे नाक-कान टोचणे, बी पेरणे, नृत्यारंभ, राजदर्शन, प्रथम स्त्री- समागम, मंचकारोहण, विद्यारंभ, गांधर्वविवाह, दत्तक घेणे, प्रयाण, शिक्का सुरू करणे, बाळंतीणीस स्नान घालणे अशा कार्यांना उत्तम असते.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment