चंद्र भ्रमणाचे गोचर प्रमाणे फळ


विषय : चंद्र भ्रमणाचे गोचर प्रमाणे फळ

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : जातक वेध

नमस्कार,

माणसाला कायमच भविष्य या विषयाबद्दल उत्सुकता वाटत आलेली आहे. बहुतांश व्यक्ती किमान दिनमान, साप्ताहिक भविष्य वाचताना आढळून येतात. स्थूलमानाने भविष्य कथन करण्याच्या असंख्य पद्धती अगदी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यात नवनवीन संशोधनाची दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. जातक वेध या पुस्तकात अशीच एक पद्धत दिलेली आहे, ज्यात चंद्र भ्रमण हे गोचर प्रमाणे फळ देते. ज्यावरून जातक सध्या कशा प्रकारच्या परिस्थितीत आहे हे सांगता येते. दिनवर्ष पद्धतीवर आधारित ही भविष्य कथन पद्धत आहे.

दिनवर्ष पध्दतीमध्ये एक दिवस म्हणजे एक वर्ष समजून जन्मानंतर पुढील ६०- ७० दिवसांतील ग्रहांचे भ्रमण व त्यांचे एकमेकांशी योग किंवा लग्नबिंदू व दशमबिंदू बरोबर होणारे ग्रहांचे योग त्या त्या वर्षी शुभ किंवा अशुभ फले देतात. आपल्याला माहित आहेच की, चंद्र २७ दिवसांत एक भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे दिनवर्ष पध्दतीमध्ये २७ वर्षाचा एक भ्रमण काळ (१२ राशींचा काळ) पूर्ण करतो. चंद्रास एक राशी पूर्ण करण्यास २७ महिने म्हणजेच सव्वा दोन वर्ष लागतात. म्हणून चंद्राला मूळ चंद्रापासून २७/२७ महिन्यांनी एकेका राशीतून पुढे सरकवले असता त्याचे हे भ्रमण गोचर भ्रमणाप्रमाणे फळ देते.

१) पहिला चंद्र (वर्षे २.२५ पर्यंत) – चांगली परिस्थिती, उत्तम मानसिक स्थिती, आहार, वगैरे

२) दुसरा चंद्र (वर्षे ४.५० पर्यंत)- खर्च.

३) तिसरा चंद्र (वर्षे ६.७५ पर्यंत)- धनलाभ.

४) चवथा चंद्र (वर्षे ९.०० पर्यंत)- अपघात व अनारोग्य,

५) पाचवा चंद्र (वर्षे ११.२५ पर्यंत)- दुःखी अवस्था.

६) सहावा चंद्र (वर्षे १३.५० पर्यंत)- शुभकार्य, मंगल वातावरण.

७) सातवा चंद्र (वर्षे १५.७५ पर्यंत)- मैत्री व अर्थलाभ.

८) आठवा चंद्र (वर्षे १८.०० पर्यंत)- त्रास व खर्च,

९) नववा चंद्र (वर्षे २०.२५ पर्यंत)- चिंता व भीति.

१०) दहावा चंद्र (वर्षे २२.५० पर्यंत)- अर्थलाभ सुव्यवस्था.

११) अकरावा चंद्र (वर्षे २४.७५ पर्यंत)- सुख, आर्थिक सुबत्ता.

१२) बारावा चंद्र (वर्षे २७.०० पर्यंत)- दुःख व तोटा.

हे फळ कसे मिळेल पाहण्याची पद्धत :

१. जातकाची सायन कुंडली बनवा.

२. भ्रमणा नुसार सध्या जन्म चंद्रापासून कितवा आहे ते पहा.

३. सायन जन्मकुंडलीतील लग्न स्थानापासून गोचर चंद्र कोणत्या स्थानात आहे ते पहा. त्या स्थानाने निर्देशित व्यक्तीचे संदर्भात ही घटना घडू शकेल.

उदा.

१. समजा एका जातकाचे वय आत्ता ४० वर्षे आहे.

२. जातकाचे सायन जन्म कुंडलीत तूळ लग्न आहे.

३. जातकाचे सायन जन्म कुंडलीत चंद्र तुळ राशीत आहे.

४. म्हणजेच ४० वर्षे वय वजा २७ वर्ष (एक भ्रमण) = १३ वर्षे

५. म्हणजेच भ्रमण चंद्र जन्म चंद्रापासून ६ वा आहे.

५. जातकाचे सायन जन्म कुंडलीत तूळ लग्न असल्याने लग्नापासून भ्रमण चंद्र ६ वे स्थानात आला आहे.

६. सहावा चंद्र – शुभकार्य, मंगल वातावरण हे फळ दाखवतो.

७. सहावे स्थान मामा निर्देशित करतो.

म्हणजे फळ असे सांगावे लागेल की, जातक ४० वर्षाचा असताना मामाचे घरी एखादे मंगल कार्य होईल.

समजा जातक ४३ वर्षाचा असताना भ्रमण चंद्र ७ वा येईल तेव्हा सातवा चंद्र मैत्री व अर्थलाभ हे फळ दाखवतो. ७ स्थान जोडीदार निर्देशित करतो.

तर जोडीदाराशी त्या सव्वादोन वर्षाच्या काळात मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध असतील व अर्थ लाभ होईल असे फळ सांगावे लागेल.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment