श्रवण नक्षत्र विचार


विषय : श्रवण नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण श्रवण नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

श्रवण हे नक्षत्र चक्रातील २२ वे क्रमांकाचे नक्षत्र असून या नक्षत्राचे इंग्रजी नाव ‘आद्वेर’ असे म्हणतात. नक्षत्राचे ४ ही चरण मकर राशीत असल्याने ते चतुष्पादी आहे. या नक्षत्राच्या ४ चरणांवर अनुक्रमे मंगळ, शुक्र, बुध व चंद्र यांचे स्वामित्व आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र, राशीस्वामी शनि व दैवत विष्णू असल्याने या नक्षत्रात चंद्राचा आल्हादपणा, शनीची कष्ट करण्याची वृत्ती व भगवान विष्णूचा शहाणपणा व मुत्सद्दीपणा या सर्व शुभ गुणाधर्माचा सुरेख मिलाफ दिसून येतो.

श्रवण नक्षत्राचे तीन तारे असून ते आडव्या रेषेत आहेत. त्यातील मधला तारा हिरवा असून अतिशय तेजस्वी व प्रखर आहे. हाच श्रावणातला योग तारा होय. मध्यभागी बाळ श्रावण होऊन दोन्ही बाजूचे दोन तारे म्हणजे कावडीत असलेले आई-वडील होत अशी कल्पना आहे. या नक्षत्राच्या जरा उत्तरेला तेजस्वी अभिजित व मागे हंस पक्ष्याचा पिसारा आहे. या भागाला स्वरमंडळ म्हणतात. या नक्षत्रालाच गरूड असेही म्हणतात.

‘बाळ श्रावण, तू बोलत का नाहीस? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही.’ श्रावणचे वडील दशरथ राजाला विचारीत होते. नाइलाजास्तव दशरथांनी सर्व वृत्तांत निवेदन केला. शोकाकूल मातापित्यांनी पाणी न पिता. प्राण सोडला. पण दशरथ राजाला ‘तूही असाच पुत्रशोकाने मरण पावशील’ असा शाप दिला. रामायणातील ही कथा माहीतच आहे. यात श्रावण नक्षत्राला शाप आहे. ज्याचे चंद्र नक्षत्र, रवि नक्षत्र किंवा लग्न बिंदू श्रवण नक्षत्रात असतो त्यांना काही तरी दुःख असतेच. बाहेरून या व्यक्तींनी आपण कितीही सुखी आहोत असे दाखविले तरी अंतर्यामी त्या दुःखी असतातच. तसेच श्रवणाचा माणूसही रागावला की शाप देणारा असतो व तो बाधतो.

श्रवण नक्षत्र ऊर्ध्वमुख चर व सुलोचनी आहे. हे नक्षत्र देवगणी असून त्यात अतिशय सत्त्वगुण आहेत. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती सदाचारी, ईश्वरभक्त, धार्मिक, सच्छील, विद्वान, परोपकारी, सेवावृत्तीच्या, दयाळू, श्रमिक, कष्टाळू, आज्ञाधारक, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, दुसऱ्याचे हित पाहणाऱ्या, थोड्याशा हट्टी व एकनिश्चयी असतात. तसेच समयसूचक व कुटुंबवत्सल असतात.

श्रवण नक्षत्र पुरुषांना बरेच अनुकूल आहे. या नक्षत्रावर जन्मणारे जातक मध्यम उंच, जरा आडवे, थोडा अप्रमान्बाद्ध बांधा, हाडे रुंद व जरा मोठी, शिरा मजबूत, काटक, चेहरा जरा निमुळता, सर्व सांध्यातील हाडे मोठी, अंगावर मध्यम मांस असे असतात. शारीरिक ऊर्जा व रोगप्रतिकारक शक्ती बरी असते. हे पुरुष जातक दिसायला सुंदर असून तेजस्वी व साधुपुरुषांसारखे दिसतात. स्वभाव शांत पण निश्चयी, चिकित्सक, शोधक, श्रम, कष्ट, दगदग यांची आवड असणारा दूरदर्शी, संयमी, धीमा, व्यवहारी, समयसूचक, उदार, धार्मिक, पौराणिक व कर्तव्यनिष्ठ असतो. हे नक्षत्र सांपत्तिकदृष्ट्या व अधिकाराच्या दृष्टीने मध्यम आहे. स्वपराक्रम व स्वकर्तृत्वाने हे जातक उच्च पदाला जातात.

श्रवण नक्षत्री जन्मलेल्या स्त्रियांनाही हे नक्षत्र रूप, गुण, बुद्धी व धन यांच्या दृष्टीने बरेच अनुकूल आहे. या नक्षत्रावरच्या स्त्रिया तशा सुंदर असतात. बांधा मध्यम, उंच, आडवा, जरा बेढब, हाडपेर मोठे व रुंद, मजबूत असते. अंगावर थोडे मांसही असते. थोडी प्रमाणबद्धताही असते. चेहरा जरा वाटोळा व निमुळता असतो. हसणे मोहक असते. चेहरा शांत, आनंदी, प्रसन्न व समाधानी असतो. मात्र चेहरा सुंदर असला तरी चेहऱ्यावर जरा प्रौढपणा व विरक्तपणा असतो. अगदीच साधेपणा किंवा अवखळ फॅशनची आवड नसून देहाला शोभेल अशीच वस्त्र व अलंकार यांची आवड असते. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणा आवडतो. तसेच वागणे व स्वभावही नम्र, विनयशील, आज्ञाधारक व सेवावृत्तीचे असते. तसेच त्या श्रमिक, कष्टाळू, धडपड्या व व्यवहारकुशल असतात. संसारी व कर्तव्यदक्ष असतात. त्या धार्मिक असून त्यांना देवाधर्माची बरीच आवड असते. त्या नोकरी करणाऱ्या असल्या तरी श्रावणी सोमवार करणाऱ्या, मंगळागौर पुजणाऱ्या, वटसावित्रीची पूजा करणाऱ्या व श्रावण महिन्यात व्रतसंकल्प करणाऱ्या असतात.

श्रवण नक्षत्री रवि बरीच शुभ फले देतो. उंची मध्यम, शरीर प्रकृती, कारक, चेहरा तेजस्वी पण करारी, गुणाने सदाचारी, ईश्वरभक्त, परोपकारी, नीतिमान असतो. थोडा फार अधिकार योगही मिळतो.

श्रवण नक्षत्री चंद्र स्वत:चेच नक्षत्र असल्याने चंद्र बराच चांगला असतो. मध्यम उंची आडवा बांधा, अवयव भरलेले, चेहरा सुंदर आकर्षक, गोड व सात्त्विक असून थोडासा होशी, रसिक व कलाप्रिय असतो. बुद्धी चांगली असते. धार्मिक व देवभक्त असतो. तसेच थोडा सुख व श्रीमंती भोगणारा, उदार व सदाचाराने वागणारा असतो. कुटुंबवत्सल असून संसाराची आवड असते.

श्रवण नक्षत्री मंगळ मध्यम असतो. आर्किटेक्चर अथवा कारखानदारीला बरा.

श्रवण नक्षत्री बुध असता बुद्धीमान, हुशार, कर्तव्यदक्ष, संसारी, चाणाक्ष, व्यवहारकुशल, व्यापारी होतो. चुणचुणीत व चुटचुटीतपणा चांगला असतो.

श्रवण नक्षत्री गुरु असता सुंदर, देखणा पण कृश शरीराचा असतो. मात्र बुद्धीमत्ता तीव्र असते. संपूर्ण ग्रहणशक्ती व आकलनशक्ती बरी असते. कॉमर्स, कायदेशास्त्र, तत्त्वज्ञान, वेदान्त यांना चांगला अतिशय तात्विक व देवभोग असून स्नानसंध्येचे व थोडे सोवळ्या ओवळ्याचे फॅड जास्त असते. धन व अधिकाराच्या दृष्टीने मात्र मध्यम असतो.

श्रवण नक्षत्री शुक्र असता सुडौल बांधा, नीटनेटकेपणा व सुबकपणा असतो. मात्र हाडपेरच जास्त मजबूत असते. चेहरा सुंदर आकर्षक व जरा दिसण्यात प्रौढ असतो. दंतपंक्ती फार विरळ असते. हौशी, रसिक व छानछोकीपणा असला तरी उधळेपणा किंवा स्वैरपणा नसून हिशोबीपणा दिसून येतो. बुद्धीमत्ताही बरी असते. रसायनशास्त्र, निसर्गशास्त्र, ललितकला, पेंटिंग, ड्रॉइंग बागा चांगला.

श्रवण नक्षत्री केतू असता शरीरप्रकृती बरी पण अति धार्मिक, अंधश्रद्धावादी व बुवाच्या मागे लागलेला असतो.

श्रवण नक्षत्री हर्षल असता शरीरप्रकृती बरी तसेच बुद्धीमान, हुशार, कल्पक व कारखानदार होऊ शकतो.

श्रवण नक्षत्री नेपच्यूनही बरीच अनुकूल फळे निर्माण करतो. अंतःस्फूर्ती, ध्यान धारणा शक्ती, प्रतिभा शक्ती बरी असते. चेहरा सुंदर, भव्य व ज्ञानी किवा संत पुरुषासारखा असतो.

श्रवण या नक्षत्राखाली होणारे रोग फारसे दाहक किंवा क्रूर नसले तरी रेंगाळणारे, जरा चिकट असतात. मुरणारी सर्दी, त्वचेचे रोग, गुडघे दुखणे, सांधे धरणे, चंद्र शनी युती असता क्षय, दमा, ताप, शरीराची झीज होणे अशा रोगांची भीती असते. साथिजन्य रोग फार होतात.

श्रवण नक्षत्री येणारा वर्ग हा बुद्धीवान व मेहनती असतो. हिशेबनीस, जमाखर्च लिहिणारे, वकील बॅरिस्टर्स, इंजिनिअर, सेल्स टॅक्स व इन्कम टॅक्स प्रैक्टिस करणारा वर्ग, कॉन्ट्रॅक्टर, लहान लहान कारखानदार, उत्पादक करणारा वर्ग, श्रम व कष्ट करणारा मजूरवर्ग, शेतकरी, दलाल, धान्य व तेलाचे व्यापारी तसेच मसाला, लोणची, पापड तयार करणारे, खनिज औद्योगिक क्षेत्रात काम करणारा वर्ग, सरकारी खात्यापैकी पोस्ट टेलिग्राफ खाते व स्वतंत्र व्यवसाय करणारा वर्ग याखाली येतो. तसेच हे धार्मिक नक्षत्र असल्यास पौरहित्य करणारा वर्ग, भटजी, भिक्षुकी करणारा वर्गही येतो.

श्रवण नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचे हस्ताक्षर जरा बारीक, गोल पण एकसारखे सरळ रेषेत व सुंदर असते.

श्रवण नक्षत्र सुलोचनी असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ती कितीही प्रयत्न केले तरी सापडू शकत नाही. वस्तू उत्तरेला गेलेली असते.

रत्न चंद्राचा मोती किंवा शनीचा नीलमणी असले तरी चंद्राचा मोती योग्य वाटतो. अंकशास्त्राप्रमाणे हे नक्षत्र २ किवा ८ अंकाखाली येत असले तरी ८ या अंकाचे वर्चस्व जास्त वाटते.

हे नक्षत्र देवगणी असल्याने सर्व शुभकार्याला योग्य असले तरी धार्मिक व जरा विरक्त प्रवृत्तीचे असल्याने विवाहाला योग्य नाही. काल्पयानाच्याप्रमाणे ते विवाहाला योग्य आहे. मात्र मौजी, बारसे, राज्याभिषेक, औषध घेणे, नवीन औषधी वनस्पती लावणे, नांगरणे, बी पेरणे, विद्यारंभ, नवीन अलंकार वस्तू धारण करणे, यांना योग्य आहे. उपमुखी नक्षत्र असल्याने मजला चढणे, देवालयाचा कळस बांधणे यांनाही चांगले. धार्मिक नक्षत्र असल्याने सत्यनारायण किवा इतर शुभ वैदिक अथवा धार्मिक कार्यसंकल्प अशा कल्पनांना फार शुभ आहेत.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment