पादुका आणि चरण स्पर्श


विषय : पादुका व चरण स्पर्श

लेखक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : स्वअभ्यास व अवांतर वाचन

नमस्कार,

आज लेखनासाठी “पादुका व चरण स्पर्श” हा विषय मांडायची बुद्धी झाली आहे.

पादुका म्हणजे नित्य पूजा, उपासना, दर्शनासाठी देव अथवा गुरु यांचा पायाचा ठसा. पादुका पूजन हे आपल्या वैदिक संस्कृतीत अगदी रामाच्या काळापासून आढळून येते. श्रीराम वनवासात असताना भ्राता भरत याने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीने राज्य कारभार सांभाळला, ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परकीय शत्रूद्वारे मूर्तीभंजनाच्या काळात, याच पादुकांनी वैदिक धर्म टिकवून ठेवण्यास मोठा हातभार लावला. दत्त संप्रदायात तर पादुकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. दत्तात्रेयांचा वा इतर सर्व संत, ईश्वरी अवतार यांचा गुरु स्वरूपात सर्वत्र संचार असतो. वारकरी संप्रदायाचा पालखी सोहळा तर जगभर प्रसिद्धी पावला आहे. पादुकांच्या पूजनामुळे भाविकाचे अंतःकरण शुद्ध होते व पापांपासून मुक्ती मिळते, ही श्रद्धा आहे, त्यामुळे पादुकांचे महत्व आजच्या काळातही धार्मिकांमध्ये टिकून आहे. नरसोबाची वाडी, अक्कलकोट, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा, कुरवपूर, पिठापूर, गिरनार ई. स्थळी आजही भक्तांची गर्दी उसळलेली आढळते.

भारतीय संस्कृतीत पायांचे अढळ स्थान आहे. पायाचे महत्व ठसवणाऱ्या बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले ही म्हण, बटू वामन ची कथा, महाभारतात श्रीकृष्णाचे चरणी बसून अर्जुनास अवघा श्रीकृष्णच सारथी म्हणून प्राप्त झाल्याची कथा ई. अनेक म्हणी, कथा आजही प्रचलित आहेत. भरीव व समाजोपयोगी कार्य केलेल्या विभूतींच्या कार्याच्या पाऊलखुणा या जनमानसाच्या हृदयावर दीर्घ काळ उमटतात.

सद्य काळाच्या ओघात विसर पडत चालला असला तरी, आजही बरेच घरांमध्ये गुरुंच्या, थोरा-मोठ्यांच्या पायावर डोके टेकवून नमस्कार करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आढळून येते. या मुळे गुरूंची, श्रेष्ठांची, सत्पुरुषांची सर्व दैवी, आंतरिक शक्ती जी त्यांच्या चरणांत एकवटलेली असते. चरण स्पर्शाने जी कंपने निर्माण होतात, त्याद्वारे शक्तीच्या नियमाप्रमाणे (LAW OF ENERGY) ती शक्ती उच्च बल स्थानापासून निम्न बलस्थानाकडे वाहत येते आणि आपले आज्ञा चक्र जागृत होऊन, आपल्याला चरण स्पर्श लाभतो. काही जण पायांना शिव आणि शक्तीचे स्वरूप मानतात आणि चरणांना स्पर्श केल्यामुळे आपल्यात समतोलत्व निर्माण होते.

ज्योतिष अभ्यासक असल्यामुळे पादुका व चरण स्पर्श या विषयावर लिहिताना माझी पावले कुंडलीकडे वळणे स्वाभाविक आहे. काल पुरुषाच्या कुंडली मध्ये मेष रास किंवा कुंडलीमधील १ ले स्थान डोके दर्शवते व मीन रास किंवा १२ वे स्थान पाय दर्शवते. परम आत्मा (परमात्मा) हा निर्गुण निराकार असतो. म्हणजेच जो आत्मा सत्व, रज, तम या गुण अवगुणांच्या परे आहे, जो आकाराने अमर्याद आहे म्हणजेच निराकार आहे (Zero tends to infinity), अशा या परमात्माचा अंश आपल्या शरीरात प्रवेश करतो आणि शरीराचे बंधन प्राप्त करतो आणि आपला जन्म होतो. म्हणूनच आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि आपल्याला अहंकार (अहम आकार) होतो व आपण निर्गुण ऐवजी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आदि षडरिपू मध्ये अडकतो. त्यामुळे जन्मलग्न कुंडलीतील लग्न स्थान हे जड शरीर, अहंकार आदि गोष्टी दर्शवते. कोणत्याही कुंडलीतील १२ वे स्थान व्यय स्थान दर्शवते. १२ वे स्थान मोक्ष त्रिकोणातील एक महत्वाचे स्थान आहे.

म्हणजेच आपल्या अहंकाराच्या मायेतून वा षडरीपुंचा व्यय करायचा असेल अथवा त्यांचे तावडीतून मुक्त होऊन आपल्या मूळ स्वरूपात परतायचे असेल, तर १२ वे स्थानाकडे एक एक पाऊल टाकावे लागेल. मोक्षाचे व पायांचे प्रतिनिधित्व करणारी मीन रास गुरुचे स्वामित्वाखाली येते. यावरून आपले मूळ स्वरूप, गुरु, पाय व पादुका यांचा संबंध स्पष्ट होतो.

ज्ञान कारक गुरूला ९ वी रास धनु व १२ वी राशी मीन यांचे स्वामित्व दिलेले आहे. ९ वे स्थान भाग्य, धार्मिकता, अध्यात्मिकता, उच्च ज्ञान, प्रगती, दीर्घ प्रवास, कीर्ती ई. गोष्टी दर्शवते. धर्म त्रिकोणातील ही एक महत्वाचे स्थान आहे. तर १२ वे स्थान आपले पाय जमिनीवर ठेवून, मोह मायेपासून अलिप्त राहून मोक्षाच्या अज्ञात प्रांतात विहार करणे दर्शवते. थोडक्यात आपले जगणे ९ वे स्थान दर्शित धर्म, उच्च ज्ञान, अध्यात्मिक (अधी म्हणजे बुद्धी. बुद्धी व आत्मा यांचा संगम असणारा म्हणजे अध्यात्मिक) उन्नती व १२ वे स्थान संयोगे भौतिक मोहांच्या जडत्वातून अलिप्ततेने सुटका, त्या जोडीला सेवावृत्ती, दान, सत्कृत्य यांची जोड या दोन भक्कम पायांवर उभे असेल तर, आपला जन्म खर्या अर्थाने सार्थकी लागेल.           

ज्योतिष शास्त्रात ९ व १२ या अंकांचे महत्व खूप आहे. ९ ग्रह व १२ राशी मिळून आपल्या आयुष्याची दशा व आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतात. नवांश कुंडलीचे सूक्ष्म फलीतातील महत्व सर्वांनाच माहित आहे. जन्मलग्न कुंडली जातकाचे बाह्यरंग दाखवत असेल, तर नवांश कुंडली त्याचे अंतरंग दाखवते. याची रचना देखील तुम्हाला हेच सांगते की, एका राशीचा नववा भाग म्हणजे नवांश. १२ राशीं गुणिले ९ भाग असे मिळून जन्मलग्न कुंडलीचे एकूण १०८ सूक्ष्म विभाग तयार होतात. या भागालाच किती समर्पक नावे आहेत बघा – पद किंवा चरण. जपमाळ यासाठीच १०८ मण्यांची असते.

सांगायचे प्रयोजन एवढेच की, आपला अहंकार गुंडाळून ठेवून श्रद्धा भावनेने त्या परम शक्तीस शरण जाऊन त्याचे चरणावर डोके ठेवले, तर आपल्याच डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडेल व जगात असताना भाग्यशाली (९) ठराल  व शरीराचा व्यय झाल्यावर जन्म मरणाच्या फेर्यातून मुक्ती (१२) प्राप्त होऊ शकते.

लेखाच्या शेवटी एकच गोष्ट सांगतो, की आजकाल स्वत:च्या तथाकथित उच्च शिक्षणाच्या वृथा गर्वापायी या भक्तांना अंधश्रध्द म्हणून हिणवले जाते. पण गर्वाचे घर हे नेहमी खालीच असते. खाली म्हणजे कोठे, तर पायाच्या ही खाली म्हणजे पाताळात असते, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे व आपल्या पूर्वजांनी ज्या काही प्रथा, पद्धती आपल्याला दिल्या, त्याचे वैज्ञानिक व तात्विक पातळीवर विचार करून जे योग्य आहे ते अंगिकारावे.

हे देवा आम्हा सर्वांना योग्य मार्ग निवडण्यास बुद्धी प्रदान कर हीच तुझ्या “चरणी” मनोभावे प्रार्थना.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment