उत्तराषाढा नक्षत्र विचार


विषय : उत्तराषाढा नक्षत्र विचार

संकलक : ज्योतिष मित्र मिलिंद

संदर्भ : नक्षत्र ज्योतिष

नमस्कार,

आज आपण उत्तराषाढा नक्षत्राबद्दल माहिती घेणार आहोत.

उत्तराषाढा हे नक्षत्र चक्रातील २१ वे क्रमांकाचे नक्षत्र असून इंग्रजीमध्ये या नक्षत्राला ‘पाय साजिटरी’ असे म्हणतात. या नक्षत्रामध्ये २ तारे असून ते अतिशय तेजस्वी, पांढऱ्या रंगाचे व ठळक आहेत. नक्षत्राची आकृती मंचकासारखी तर काहींच्या मते हत्तीच्या सोंडेसारखी आहे. आषाढ महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आकाशात दिसू शकते व सहज ओळखता येते.आषाढ तारका पुंजातील पहिला पुंजका पूर्वाषाढा नक्षत्राचा तर दुसरा उत्तराषाढा नक्षत्राचा आहे. मूळ नक्षत्राच्या पूर्वेस चमकणाऱ्या तारकापुंजातील नंतर उदित होणाऱ्या चतुष्कोनास उत्तराषाढा म्हणतात.

नक्षत्राचा स्वामी रवी, राशी स्वामी गुरु व शनी आणि देव विश्वदेव नावाची देवता  असल्याने या नक्षत्रात रवीची कीर्ती व उदात्तपणा, गुरूचा न्यायीपणा, शनीची चिकाटी व निश्चय आणि विद्येप्रमाणे समाजावर उपकार करणारे अशा सुंदर व सात्विक गुणांचा प्रभाव दिसून येतो. नक्षत्राचे वैशिष्ट्य महणजे शनि व रवि या विरोधी तत्वांच्या व शत्रुग्रहांचे शुभगुणधर्म विकसित झालेले दिसून येतात. म्हणजे शनीचा कंजूषपणा व संशयीपणा नसून चिकित्सक वृत्ती व कष्टाळूपणा दिसतो व रविचा स्थिर व उदात्तपणा दिसून येतो. उत्तराषाढा नक्षत्राचा १ ला चरण धनु राशीत व पुढील ३ चरण मकर राशीत येत असल्याने हे नक्षत्र त्रिपाद आहे. हे मंदलोचनी, अधोमुख, स्थिर व रजोगुणी नक्षत्र आहे. रवीचे हे नक्षत्र सहाय्याने पुढे येर्णारे आहे.

उत्तराषाढा या नक्षत्रावर जन्म झालेल्या जातक व्यक्ती सेवावृत्तीच्या, आज्ञाधारक, नम्र, विनयशील, नेकीने वागणाऱ्या, इमानी, कार्यतत्पर, कामसू, व्यवहारकुशल, थोडा स्वार्थी, स्वतःच्या कुटुंबावर जास्त प्रेम करणाऱ्या, न्यायी, देवधर्माला भिऊन वागणाऱ्या, बेताचे  धाडस करणार्या पण आनंदी व समाधानी वृत्तीच्या असतात.

उत्तराषाढा पुरुष जातकांना हे नक्षत्र बरेच अनुकूल आहे. कारण पुरुषांना लागणारे स्वावलंबित्व, धाडस, अधिकारयोग, स्वातंत्र्यप्रेम हे गुण पुष्कळसे आढळून येतात. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या जातकांचा बांधा मध्यम, उंच, सडपातळ, सडसडीत, हाडापेराने मजबूत व कणखर असतो. सांध्यातील हाडे जरा मोठी दिसतात. काटकपणा जास्त असतो. बांधा जरा मजबूत असतो. कपाळ भव्य व चेहरा रुंद असतो. चेहरा तेजस्वी, नाकी डोळी सुरेख असला तरी चेहऱ्यावर जरा प्रौढपणाचे तेज असते. ओठ जरा जाड व विलग असतात. शारीरिक जीवन व रोग प्रतिकारक शक्ती बरी असते. स्वभावही नम्र, विनयशील, विद्याव्यासंगी, कष्टाळू, मेहनती, दूरदर्शी, व्यवहारकुशल, टापटीप व स्वच्छतेची आवड असणाऱ्या असतात. बुद्धी बरीच प्रगल्भ व खोल असते. हे नक्षत्र तसे दुय्यम अधिकार योग देणारे आहे.

उत्तराषाढा स्त्रियांनाही हे नक्षत्र पुष्कळसे अनुकुल आहे. या नक्षत्रावर जन्मणाऱ्या स्त्रियांचा बांधा थोडा हाडाळ व काटक असला तरी प्रमाणशीर, रेखीव असतो. नाजूकपणा थोडासा कमी असून त्वचा जरा जाड असते. गुडघ्यात जरा वाकलेल्या असून गुडघ्याच्या वाट्या मोठ्या दिसतात. कपाळ जरा रुंद असून डोळे मात्र टपोरे व भुवया रेखीव दिसतात. गाल नितळ असतात व नाक ठसठशीत असते व वरचे दात एका रेषेत असून वरची कवळी जरा पुढे आलेली असते, व हसताना दात एका रेषेत दिसतात. मात्र लहान कुमारिका दिसण्यास सुंदर असल्या तरी थोड्या प्रौढ व उदास दिसतात. या नक्षत्रावरच्या स्त्रिया तशा अतिशय हुशार, बुद्धीमान, चतूर, कष्टाळू, मेहनती, कामसू व कर्तव्यदक्ष आणि संसारी असतात. संसार व घर सांभाळून त्या इतर व्यवसाय करताना आढळून येतात. हौशी, रसिक, कलाप्रिय असल्या, तरी फाजील खर्चिक किंवा उधळ्या नसून योग्य ठिकाणी खर्च करतात. स्वच्छता, टापटीप व नीटनेटकी राहणी असते. स्वतःच्या रूपाला व रंगाला शोभेल असा पेहराव करतील. दिलखुलास, मोकळ्या मनाने खळखळून हसतात. मात्र संगीत, गायन, वादन, नृत्य यात फारसे यश मिळत नाही, अधिकार योग मिळतो.

उत्तराषाढा नक्षत्राखाली येणारा वर्ग विशेष करून मध्यमवर्गीय व सेवक वृत्तीचा असतो. वकील, अॅडव्होकेट, खाजगी कंपन्या, उद्योगक्षेत्री व्यापारी पेढ्या, बँका, कारखाने, रेल्वे पोर्टट्रस्ट, औषधी कंपन्या, विमा कंपनी, प्रॉव्हिडंड खाते, या ठिकाणी काम करणारा वर्ग, सेल्सटॅक्स, इन्कमटॅक्स यांचा स्वतंत्र व्यवसाय करणारे अथवा लहान लहान कारखानदार, कंत्राटदार, आर्किटेक्ट, लहान लहान शेतकरी, पोस्ट खाते, दळणवळण खाते, पेट्रोल पंपाचे मालक किंवा ज्या ठिकाणी थोडी अंगमेहनतीची कामे आहेत अशा ठिकाणी काम करणारा वर्ग येतो. तरी स्वतंत्र व्यवसाय व व्यापार करणारे आढळतात.

उत्तराषाढा नक्षत्रावर होणारे आजार फारसे दाहन नसले तरी बरेच चिकट असतात. विशेषतः सर्दी, पडसे, त्वचेचे विकार, गुडघे दुखणे, संधिवात, फ्ल्यूचा ताप, डोके दुखणे, तर शनि-बुध युति असता खुजेपणा, कुबडेपणा यांचा त्रास असतो. एखादा आजार झाल्यास तो बराच काळ टिकतो. तसेच पाठीचा कणा दुखणे अथवा हाड वगैरे सरकणे, मोडणे यांची भीती असते.

उत्तराषाढा नक्षत्री रवी बराच अनुकूल असतो. शरीरप्रकृती व बुद्धीमत्तेच्या दृष्टीने मध्यम असतो. मात्र गुणाच्या दृष्टीने चांगला, नम्र, विनयशील, सदाचारी व समाधानी असतो. साधारण अधिकारयोग मिळतो. चंद्रदेखील या नक्षत्रात चांगला असतो.

उत्तराषाढा नक्षत्री चंद्र असता दिसण्यात सुंदर, कांतिमान व सुडौल बांधा असतो. सर्व प्रकारची शक्ती मध्यम असते. स्वभावाने हौशी, रसिक, आनंदी, कलाप्रिय, विद्वान व धार्मिक असतो. मात्र दीर्घकालाने यश संपादन करणारा, यशापयश व भाग्यात चढउतार असणारा असतो. स्वभाव चिकित्सक व चौकस असतो. सांपत्तिक हव्यास मध्यम असतो.

उत्तराषाढा नक्षत्री मंगळ शरीरप्रकृती कणखर, सडसडीत, हाडापेराने मजबूत, काटक, चपळ व तरतरीत असतो. यांत्रिक कामाची बरीच हौस असते. हा मंगळ कारखानदारी अथवा दुरुस्ती करण्याचे कारखाने व जड वस्तू, लोखंड, हार्डवेअर अशा व्यवसायांना उत्तम तसेच डॉक्टर्स, इंजिनिअर व आर्किटेक्ट यांना चांगला. स्वकर्तृत्वाने धनवान होईल.

उत्तराषाढा नक्षत्री बुध असता मध्यम उंच पण सशक्त, तरतरीत व चुणचुणीत असतो. चपळ असतो. बुद्धीलाही बुध चांगला, विद्याव्यासंगी, अभ्यासू, उत्तम गणिती, हिशेबनीस, भाषा, व्यापार यांना चांगला. उत्तराषाढा नक्षत्री गुरू विद्या व अधिकार योगाच्या दृष्टीने साधारण. सांपत्तिकदृष्ट्या कमी महत्त्वाचा. शरीरं, बांधा मध्यम पण जरा कृशच, भारदास्तपणा कमी, चेहरा बुद्धीमान, विद्वान पण जरा प्रौढ दिसणारा. भाषा, व्याकरण, व्यापारी शिक्षण, तत्त्वज्ञान, कायदेशास्त्र व शिक्षक किंवा प्राध्यापक यांना चांगला. इतरांच्या सहाय्याची गरज.

उत्तराषाढा नक्षत्री शुक्र साठी फारसे अनुकूल नाही. चेहरा सुरेख पण बांधा सुडौल नाही. कांती जरा खरखरीतच, शरीरात मांसलपणापेक्षा हाडेपेरे जास्त व चेहऱ्यावर मादकपणापेक्षा उच्चपणा जास्त दिसतो. हौशी, रसिक असल्या तरी व्यावहारिकवृत्ती जास्त, कलेपेक्षा व्यापाऱ्याच्या दृष्टीने उत्तम.

उत्तराषाढा नक्षत्री शनी असता हाडापेराने मजबूत, काटक, जरा हडकुळा पण कणखर बांधा. कष्टाळू, श्रमिक, धडपड्या, मेहनती पण प्रामाणिक असतो. विद्येच्या दृष्टी बरा. सायन्स, कायदेशास्त्र जमाखर्च, संख्याशास्त्र यांना चांगला. नोकरीत बरेच कष्ट व काम, दाम कमी नेमक्या अशा नोकऱ्या मिळतात. व्यापारात पसारा व धन जास्त पण नफा कमी.

उत्तराषाढा नक्षत्री राहू असता शरीरप्रकृती व धार्मिकदृष्ट्या बरे. प्रकृत मजबूत, कणखर व निरोगी असते.

उत्तराषाढा नक्षत्री हर्षल या नक्षत्रात बांधा मजबूत पण जर बेढब. संशोधन व बुद्धीमत्तेच्या दृष्टीने बरा असला तरी बुद्धीवैशिष्टच आढळून येत नाही. अनाठायी विदयेकडे जास्त लक्ष असते व बऱ्याच बाबतीत अर्धवटपणा असतो. कारखानदारीस चांगला असतो.

उत्तराषाढा नक्षत्री नेपच्यून फारसा शुभ फलादेश देत नाही. शरीर बांधा बरा असला तरी मन जरा उदास व निराशामय असते. अंतःस्फूर्ती किंवा मनोविकार जागृत नसतात.

उत्तराषाढा नक्षत्री जन्मणाऱ्या व्यक्तीचे अक्षर जरा मोठे, शब्द उभट असतात व फराटे जास्त देतात. नक्षत्रावर १ व ३ अंकाचे वर्चस्व वाटते. रवीचे माणिक किंवा गुरुचा पुष्कराज चांगला असतो. हे मंदलोचनी नक्षत्र असल्याने या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास ही वस्तू थोड्याशा प्रयत्नाने सापडते. वस्तू दक्षिण दिशेला गेलेली असते.

मुहूर्तशास्त्रामध्ये उत्तराषाढा नक्षत्र सर्व शुभकार्यांना चांगले आहे. शुभकार्ये यशस्वी होतात. हे शुभ व स्थिर असल्याने या नक्षत्रावर घराचा पाया घालणे, खणणे, बी पेरणे, देवालये, विहिरी, बागाईत कामास आरंभ, शांतिकर्म, नवीन अलंकार धारण करणे, अष्टप्राशन, विद्यारंभ, अग्निहोत्रादी क्रिया, राजदर्शन, पुंसवन, राज्याभिषेक, विवाह, वधू प्रवेश, प्रयाण, उपनयन ही कार्ये करावी.

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment